Saturday, September 22, 2018

राहुल केजरीवाल?

Image result for rahul rafale cartoon

२०१३ च्या अखेरीस दिल्लीत विधानसभेच्या २८ जागा जिंकलेल्या आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते नेते इतक्या जोशात होते, की त्यांना अवघा देश पादाक्रांत केल्याची स्वप्ने पडू लागली होती. त्यावेळी कोणी सावधानतेचा दिलेला इशाराही त्यांना संतापाचे कारण व्हायचा. अशा काळात दिल्लीतले ज्येष्ठ हिंदी पत्रकार संपादक विनोद शर्मा यांनी दिलेला इशारा आठवतो. ‘आज जे पत्रकार माध्यमे तुम्हाला डोक्यावर घेत आहेत ना? तेच उद्या असे पायदळी तुडवतील, की श्वासही घ्यायला दमछाक होईल.’ या शब्दातला आशय तेव्हा ‘आप’च्या नेत्यांना उमजला नव्हता आणि आज राफ़ायल वा अन्य कुठल्याही खुळचट आरोपांना प्रसिद्धी मिळत असताना, राहुल गांधींनाही पटणारा नाही. त्यांच्यापासून त्यांनाच कोणी वाचवू शकणार नसेल, तर शुभेच्छा देण्यापलिकडे आपल्या हाती काय शिल्लक उरते?

प्रसिद्धी ही देखील एक नशाच असते. एकदा त्याच्या आहारी गेलात, मग त्यापासून माघार घेणे आपल्या हातात रहात नाही. जणू आपण प्रसिद्धी झोतातून बाजुला झालो तर संपलो, अशी धाकधुक मनात सुरू होते. पाच वर्षापुर्वी याच दरम्यान अरविंद केजरीवाल व त्यांचे अन्य सहकारी यांनी अण्णा हजारे यांची साथ सोडून राजकारणाच्या ‘चिखलात’ उडी घ्यायचे ठरवले होते. त्यासाठी त्यांनी आपला स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन केला आणि त्यांचे प्रभावक्षेत्र असलेल्या दिल्ली या नागरी राज्याच्या विधानसभा निवडणूका लढवण्याची तयारी सुरू केली. त्या काळात दिल्लीत सत्ताधारी कॉग्रेस पंधरा वर्षे सत्तेत होती आणि विविध आरोपांच्या घेर्‍यात असतानाच आपली विश्वासार्हता पुर्णपणे गमावून बसलेली होती. शिवाय विरोधातल्या भाजपाकडे कुठलाही स्थानिक प्रभावी नेता नसल्याने राजकारणाचा पुढाकार संपुर्णपणे केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाकडे वा व्यक्तीगत केजरीवाल यांच्याकडेच गेला. लौकरच त्याचे परिणामही दिसू लागले. आपल्या राजकारणाची सुरूवात केजरीवाल यांनी एकामागून एक भन्नाट आरोपातून केलेली होती. त्यात त्यांनी सोनिया गांधींचे जावई व राहुल गांधींचे भावजी रॉबर्ट वाड्रा यांच्यावर आरोप केले होते. त़सेच मग तात्कालीन भाजपा़चे पक्षाध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावरही आरोप केले होते. रोज उठून नवा आरोप करताना त्यांनी राष्ट्रीय माध्यमांचा अवघा अवकाश व्यापून टाकला होता. त्याच्या परिणामी त्यांनी दिल्ली विधानसभेत चांगले यश मिळवले आणि भाजपाला यश मिळाले तरी बहूमत हुकलेले होते. पण आपल्या राजकीय यशाला पचवणे केजरीवालांना साध्य झाले नाही. वर्षभरातच त्यांची राजकीय कारकिर्द अस्थीर होऊन गेली. आज राहुल गांधी नेमके त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून निघालेले वाटतात. फ़क्त हे ओळखण्यासाठी पाच वर्षापुर्वीचा घटनाक्रम आठवला पाहिजे.

विश्वासार्हता संपलेली कॉग्रेस नुसती दिल्ली विधानसभेत आपटली नाही. तिथे पंधरा वर्षे सत्ता भोगणार्‍या कॉग्रेसला ७० पैकी आठ जागा कशाबशा मिळाल्या आणि नंतर तितक्याही टिकवता आल्या नाहीत. तेव्हा आम आदमी पक्षाला अवघ्या २८ जागा मिळाल्या होत्या आणि भाजपाला ३४ जागा मिळालेल्या होत्या. तर भाजपाला सत्तेच्या बाहेर ठेवण्याचा राजकीय डाव म्हणून कॉग्रेसने आपल्या ८ आमदारांना केजरीवाल यांच्या मागे उभे केले. पहिल्याच फ़टक्यात ते मुख्यमंत्रीही होऊन गेले. पण नंतर त्यांनी प्रशासनाचा असा चुथडा करून टाकला, की दिल्लीकरांनी कानाला खडाच लावला पाहिजे. हा काळ २०१३ च्या अखेरचा होता आणि त्या निकालांनी माध्यमे व पत्रकार इतके उत्साहित झाले होते, की त्यांना आता केजरीवाल राष्ट्रीय नेता झाल्याची स्वप्ने पडू लागली होती. योगायोग असा होता, की त्याचवेळी आणखी तीन राज्यांच्या विधानसभा निवडणूका होऊन त्यात भाजपालाही प्रचंड यश मिळाले होते. पण मध्यप्रदेश व छत्तीसगडमध्ये लागोपाठ तिसर्‍यांदा विधानसभा जिंकूनही भाजपा माध्यमांच्या खिजगणतीत नव्हता. राजस्थान भाजपाने पुन्हा जिंकला होता. पण या तीन मोठ्या राज्यातील विधानसभांचे निकाल वा नव्या सरकारांचा शपथविधीही माध्यमांना सविस्तर दाखवण्याची गरज वाटली नाही. राष्ट्रीय राजकारण वाहिन्या व मोठ्या वृत्तपत्रांसाठी दिल्ली व केजरीवाल यांच्यापुरते सीमित होऊन गेलेले होते. नरेंद्र मोदी भाजपातर्फ़े पुढे आले होते आणि त्यांचे आव्हान रोखू शकणार्‍या नेत्याच्या शोधात तेव्हा तमाम माध्यमे व पुरोगामी पत्रकार संपादक होते. त्यांना केजरीवाल यांचे यश इतके भावले होते, की त्यांना भावी पंतप्रधान म्हणून माध्यमे पेश करू लागली होती. थेट पंतप्रधान नाही तर किमान मोदींसाठी मोठे आव्हान म्हणून पेश करण्याचा मोह बहुतेकांना आवरला नव्हता. आजचे राहुल गांधी व तेव्हाचे केजरीवाल तराजूत टाकून बघावेत.

प्रसिद्धीला नशा उगाच म्हणत नाहीत. त्या प्रसिद्धीने इतकी झिंग आणलेली होती, की केजरीवाल यांनी एका क्षणी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजिनामा फ़ेकला आणि आपल्यासह नवजात पक्षालाही थेट लोकसभेच्या आखाड्यात झोकून दिलेले होते. दिल्लीत थेट लढत देऊन त्यानी पंधरा वर्षे मुख्यमंत्री असलेल्या शीला दिक्षीतांना पाडले होते, त्याचीच पुनरावृत्ती करायला मग केजरीवाल मोदींच्या विरोधात वाराणशीला उमेदवारी करायला दाखल झाले. आपला विश्वासू सहकारी म्हणून त्यांनीच कवि कुमार विश्वास यांना थेट अमेठीच्या मोहिमेवर धाडलेले होते. मग काय, केजरीवाल यांनी उठताबसता मोदींना लक्ष्य करणारे आरोप करावेत वा टिंगलवजा वक्तव्ये करावीत आणि वाहिन्यांसह माध्यमांनी त्यावर रसभरीत चर्चा कराव्यात, असा खेळ उरू झाला होता. खरेखुरे आव्हान म्हणून नरेंद्र मोदी लाखोच्या सभा देशात कुठेही कानाकोपर्‍यात घेत होते. पण त्यांच्या लाखांच्या सभेला थेट प्रसिद्धी देणार्‍या वाहिन्या, तुलनेने नगण्य संख्येतल्या केजरीवाल यांच्या रोडशोचा डंका नित्यनेमाने बडवत होत्या. तो माहोल आठवला, तर आम आदमी पक्ष हा लोकसभेत किमान पन्नाससाठी जागा तरी सहज निवडून आणणार, असे चित्र तयार झालेले होते. केजरीवालांचा डेसीबल इतका जोरदार होता, की राहुल गांधी सोनियाही पुरत्या झाकोळून गेलेल्या होत्या. त्या गदारोळाने मेधा पाटकर वा बंगलोरच्या इन्फ़ोसिसचे काही उच्च व्यवहारी उद्योजकही बावचाळून गेलेले होते. त्यांनीही केजरीवालांकडून आपल्या डोक्यावर स्वेच्छेने ‘टोप्या’ घालून घेतल्या होत्या. गांधी समाधी राजघाट किंवा वाराणशीच्या तशाच कुठल्या घाटावर मौनव्रती केजरीवाल वाहिन्यांची जागा व्यापून बसलेले होते. देशभर धुमाकुळ घालणार्‍या नरेंद्र मोदींवर फ़ारशी चर्चही होत नव्हती. फ़ार तर मोदी कसे फ़सतील त्याचा उहापोह चाललेला होता. केजरीवाल यांचे पोवाडे गायले जात होते.

जसजशी निवडणूक जवळ आली, विविध मतचाचण्यांचे आकडे समोर येऊ लागले, तसतशी वाहिन्या व माध्यमांची झिंग उतरू लागली होती. पण केजरीवाल मात्र त्यातून बाहेर पडू शकले नाहीत. निकालाच्याच दिवशी त्यांना शुद्ध आली. तोपर्यंत वेळ निघून गेलेली होती. याच्या उलट्या बाजूला नरेंद्र मोदी होते. वाहिन्या वा माध्यमातून ज्या मोहिमा चाललेल्या होत्या, त्याकडे पाठ फ़िरवून त्यांनी आपल्या पद्धतीने प्रचाराची मोहिम चालविली होती. हळुहळू मोदींच्या भाषणाला मिळणारा प्रतिसाद बघून सर्वांनाच त्यांच्या कुठल्याही सभेच्या थेट प्रक्षेपणाची अगतिकता भोगावी लागली. अखेरच्या चारपाच आठवड्यात तर प्रत्येक वाहिनीला मोदींची मुलाखत हवी होती अणि त्यातल्या नामवंत वाहिन्या व दिग्गज पत्रकाराला मुलाखत देण्याचे नाकारून, मोदींनी या सर्वांना जमिनीवर आणलेले होते. सर्वात कमी व्याप्ती असलेल्या माध्यमांना प्राधान्य देत, मोदी शिरजोर वाहिन्यांना जमिनीवर आणत गेले आणि त्यातूनच त्यांनी नामवंत संपादक पत्रकारांचा अजेंडा जमिनदोस्त करून टाकले. आज त्यातले अनेक संपादक व पत्रकार नामोहरम होऊन गेलेले आहेत. कुठल्याही वाहिन्या वा माध्यमांशिवाय मोदी आपल्या स्वतंत्र मार्गाने जनतेशी संपर्क स्थापन करून यशस्वी झालेले आहेत. रेडिओ वा दुरदर्शन अशा सरकारी माध्यमांचा वापर मोदींनी सत्ता मिळाल्यावर इतका खुबीने करून घेतला, की बाकीच्या खाजगी वाहिन्या व माध्यमांना त्यांच्या कार्यक्रम भाषणांची अजून पुनरावृत्ती करावी लागते आहे. मग तेव्हाचे माध्यमांचे राजपुत्र केजरीवाल कुठे आहेत? आज त्यांची जागा राहुल गांधी यांनी घेतली आहे. तेव्हा बेछूट आरोप करून चर्चेला मुद्दे पुरवण्याचे काम केजरीवाल करीत होते आणि आज ती जबाबदारी राहुलनी उचललेली आहे. कुठलाही विषय घेऊन रोजच्या रोज राळ उडवणे व त्यातून माध्यमांना व पत्रकारांना मुद्दे देण्याचे काम जोरात सुरू आहे. त्याचा काय परिणाम होऊ शकतो?

गेल्या दोनचार महिन्यात प्रसिद्धी माध्यमे राहुल गांधींनी व्यापून टाकलेली आहेत. रोज कुठल्या तरी विषयावर वादग्रस्त विधान वक्तव्य करण्यातून राहुल चर्चेमध्ये असतात. सोशल माध्यम वा जाहिर सभेतील वस्तव्यातून त्यांनी मोदी सरकार वा भाजपाला लक्ष्य केले नाही असे अजिबात होत नाही. माध्यमांना खळबळ उडवून देण्यासाठी काही कच्चा माल हवाच असतो. माध्यमेही त्यावर तुटून पडतात आणि रोजच त्या आरोपांवर उलटसुलट चर्चा वाद होत असतात. त्यातून कुठलाही पुरावा राहुल गांधी देऊ शकत नाहीत, की त्यांच्या प्रवक्त्यांना खुलासे करता येत नाहीत. अर्थात संशय निर्माण करण्यात ते कमालीचे यशस्वी होतात, हे मान्यच करावे लागेल. पण संशयाचा धुरळा भले बुद्धीवादी वर्गात निर्माण झाला, म्हणून त्याचा प्रभाव सामान्य जनता वा मतदारावर कधीच पडत नसतो. अनेकदा तर त्याचा उलट परिणाम होतो. मोदी हा भाजपाला राष्ट्रीय नेताच मुळात अशा अपप्रचार व खोट्यानाट्या आरोपातून मिळालेला आहे. तो मिळताना प्रसारमाध्यमे आपली विश्वासार्हता गमावून बसलेली आहेत. विरोधकांची उक्ती आणि मोदींची कृती यातल्या विषमतेने मोदींना नेहमीच बाजी मारून दिलेली आहे. म्हणून तर माध्यमांनी डोक्यावर घेऊनही केजरीवाल लोकसभेत धुपले. सगळ्या देशात त्यांनी कॉग्रेस व भाजपापेक्षाही अधिक उमेदवार उभे केले आणि सर्वाधिक अनामत रकमा गमावणारा पक्ष असा विक्रम आपने सिद्ध केला. राहुल गांधींनी तेव्हा आपल्या पक्षाला निचांक मिळवून देण्याचा विक्रम केलेला आहे. पण यावेळी त्यांना केजरीवालांचा विक्रम मोडण्याची सुरसुरी आलेली असावी. अन्यथा त्यांनी हे आरोपबाजीचे नाटक सर्व प्रतिष्ठा पणाला लावून सुरू केलेच नसते. नुकतेच अर्थमंत्री अरुण जेटलींनी राहुलना विदुषक म्हटले, त्याचा नेमका अर्थ यात दडलेला आहे. विदुषक नाटक कथानकात विरंगुळा आणतो, त्यापेक्षा त्याला महत्व नसते ना?

4 comments:

  1. भाउ काॅंगरेसच्याच indiatoday चॅनलने सर्वे केलाय त्यात २१%टक्के लोकांना राफेल काय माहित आहे त्यातील८२% लोक म्हनतात किंमत सांगु नये कांगरेसचे कार्यकर्ते दिल्लीत निदर्शने करत होते त्यींना पन माहित नाही त्या्च्या मतेराफेल जर्मनीत आहे तसेच सर्वे मधे ८५% लोक सींगत होते की इंधनाच्या किमती कमी करा हे बघुन राजदीप ॅंगरेस प्रवक्याला म्हनाला की हा विषय घ्या पन तो आणि योगेंद्र यादव राफेल चिकटुन बसले काही दिवसानी सर्वांना कळेल म्हनाले पनहामुद्दाराहुल गुजरात निवडनुकीपासुन काढताय्त आणि सरकार पन त्याच्या आरोपाला उत्तरे देतय पेट्रोलवर सरकारकडे उत्तर नाही

    ReplyDelete
  2. बरोबर ओळखलत भाउ केजरीवालपन अगदी दिल्ली महापालिका हरेपर्यंत असेच वागत होते.लोकसभेवेळेस तर सर्व पत्रकारांनी डोक्यावरच घेतले होते अरविंदला वारानसीमधे एका लोकल पत्रकारानी मोदींना विचारल की केजरावाल तुमच्या विरुद्ध उभे आहेत तु्म्ही उल्लेख पन करत नाही तेवा मोदी म्हनाले की एका शहराच्या नेत्याला वाजवीपेक्षा अधिक प्रसि्दधी आधिच मिळतेय मी नाव घोुन अधिक प्रसिद्धी करायची नाही राहुलला पन अशीच काहीही न करता प्रसिद्धी मिळतेय बेछुट आरेप करुन उलट अरविंदपेक्षा जास्त उथळपना आहे

    ReplyDelete
  3. भाउ राहुल मोदींना चोर काय म्हनाला पुरोोगामीशरीयावाले तांबे म्हनतायत की आता मोदी२०१९ शपथ घेनार नाहीत एवढा हर्षवायु व्हायच कारन का? मोदीनी अजुन उत्तर द्यायचय किती व्याकुळता मोदींना घालवायची गुजरातमधे जागा काय जास्त मिळाल्या तेव्हापनहीचस्वप्नेपडत होती यांना नंतर इशान्य भारत,करनाटक हारले राहुल ३राज्यांचिया निकालाला की शांत बसतील

    ReplyDelete
  4. पण भाऊ राहुल गांधीचे जाऊदे पण आजकाल केजरीवाल कोणतेही स्टंट न करता मोदींनी गुजराथ मधे केले तसेच फक्त कामावर लक्ष केंद्रीत करुन स्वतःची गेलेली इज्जत परत मिळवायच्या मागे आहे असे वाटते

    कदाचित २०२४ साठी लंबी रेस का घोडा व्हायचे असेल..
    सध्या केजरी पूर्ण शांत आहे
    तुम्हाला काय वाटते?

    ReplyDelete