नागरिकता सुधारणा विधेयकावर लोकसभेत बाजूने मतदान केलेल्या शिवसेनेने राज्यसभेत दोन दिवसांनी आपली भूमिका बदलली. तिथे मतदानाचा विषय आला, तेव्हा सेनेने सभात्याग करून आपल्याला बाजूला करून घेतले. त्याचे कारण उघड आहे. शिवसेनेला हिंदूत्व किंवा त्यासंबंधी आजवर घेतलेली कठोर भूमिका सोडून द्यावी लागलेली आहे. पण आपण मुख्यमंत्रीपद वा सत्तेसाठी हिंदूत्व सोडले, असे सेनेने कबुल करावे, ही अपेक्षा आजच्या राजकारणात कोणी करू नये. कुठलाही पक्ष आपल्या तात्विक वा वैचारिक भूमिका नेत्यांच्या गरजा व हव्यासाची अडचण येताच गुंडाळून ठेवत असेल, तर शिवसेनेनेच आपल्या हिंदूत्वाला घट्ट चिकटून रहाण्याची अपेक्षा करता येणार नाही. लोकसभेत जे मतदान झाले त्यानंतर कॉग्रेसने सेनेवर डोळे वटारले आणि त्यांनीही निमूटपणे मान खाली घातली असेल, तर त्यात चुकीचे काय आहे? त्यांच्यापुर्वी अनेक तथाकथित पुरोगामी पक्षांनी सत्तेपुढे अशीच मान तुकवलेली आहे. मग ती सवलत शिवसेनेला कशाला नसावी? आपल्या ठामपणासाठी प्रसिद्ध् असलेल्या बहूजन समाज पक्षाच्या मायावती वा समाजवादी पक्षाचे मुलायम सिंग, त्याच मार्गाने गेलेले आहेत. ममता बानर्जींना त्यातून सुटता आलेले नसेल, तर सेनेने सत्ता कशाला सोडावी? त्यापेक्षा खुर्ची वाचवण्यासाठी विचारसरणीला व भूमिकेला तिलांजली देणे कुठे चुकीचे असते? व्यवहार महत्वाचा असतो आणि मुख्यमंत्रीपद व सत्ता हा व्यवहार आहे. काही हजार पाकिस्तानी हिंदूंच्या भल्यासाठी सेनेने सत्तेवर लाथ मारण्यात कुठला व्यवहार असणार आहे? इडी वा सीबीआयच्या घाकापायी मायावती मुलायम झुकत असतील, तर शिवसेनेने सतेसाठी नागरिकता विधेयकावर भूमिका बदलणे क्षम्य आहे. लोकांची स्मरणशक्ती खुप क्षीण असते आणि म्हणूनच तिच्याच आधारे आपले डावपेच व भूमिका बदलण्याला राजकारण म्हणतात. तात्विक गोष्टी चर्चेपुरत्या असतात.
२०१२ सालात देशाच्या संसदेमध्ये एफ़डीआय म्हणजे परदेशी गुंतवणूक रिटेल व्यवहारात आणायला मोकळीक देणारे विधेयक संसदेत आलेले होते. तेव्हा काय झाले, त्याचा आज सर्वांनाच विसर पडलेला असेल, तर शिवसेनेची टिंगल होणे स्वाभाविक आहे. तेव्हा एफ़डीआय विषयक विधेयक लोकसभेत आलेले असताना बहूजन समाज पक्षाने त्याचा कडाडून विरोध केला होता. पण जेव्हा मतदानाची वेळ आली, तेव्हा बसपाचे वीसहून अधिक सदस्य लोकसभेतून सभात्याग करून बाजूला झाले. त्यामुळे बहूमताचा आकडा तात्काळ खाली आला आणि एफ़डीआय कायदा तिथे मंजूर व्हायला मदत होऊन गेली. एकप्रकारे ते विधेयक संमत व्हायला मायावतींनी हातभारच लावला होता. पण दोन दिवसांनी तेच विधेयक पुन्हा राज्यसभेत आले आणि मायावतींसमोर धर्मसंकट उभे राहिले. कारण तिथे त्यांनी सभात्याग करून भागणार नव्हते. युपीएने आणलेल्या त्या विधेयकाच्या मतदानात मायावतींचा बसपा गैरहजर राहिला, तरी कायदा नामंजूर झाला असता. सहाजिकच लोकसभेतला सभात्याग राज्यसभेत उपयोगाचा नव्हता. त्यामुळे विधेयक बाजूला पडले आणि राज्यसभेत त्यावर बोलण्यापेक्षा मायावतींनी भाजपावर तोंडसुख घेतले आणि कायद्याच्या बाजूने मतदान केलेले होते. म्हणून ते विधेयक संमत होऊ शकले. म्हणजेच एकाच कायदा व विषयाच्या बाबतीत मायावती व त्यांच्या बसपाने दोन्ही सभागृहात भिन्न भूमिका घेतल्या होत्या. त्याला व्यवहार म्हणतात. कारण वैचारिक भूमिकांनी बुद्धीमंत पाठ थोपटत असले, तरी व्यवहारात तोटा सहन करावा लागतो. त्यावेळी मायावती सीबीआयच्या सापळ्यात अडकलेल्या होत्या आणि बुद्धीमंत नव्हेतर युपीए सरकार मायावतींना दिलासा देऊ शकत होते. त्यासाठी लोकसभेतली भूमिका राज्यसभेत बदलण्याला व्यवहार म्हणतात. संसदीय भाषेत त्याला फ़्लोअर मॅनेजमेन्ट म्हणतात. ती नेहमीच्या संसदीय कामकाजात चालू असते.
त्याच म्हणजे एफ़डीआयच्या विषयात एकट्या मायावतीच गुरफ़टलेल्या नव्हत्या. त्यांनीच कोलांटी उडी मारलेली नव्हती. त्यांचे उत्तरप्रदेशातील कडवे विरोधक व प्रतिस्पर्धी मुलायम सिंग यांच्या समाजवादी पक्षानेही विचारधारेला तिलांजली देऊन दोन्ही सभागृहात आपल्या भूमिका तशाच बदलल्या होत्या. लोकसभेत मुलायमच्या समाजवादी पक्षाने युपीए सरकारचे वाभाडे काढणारी भाषणे ठोकली होती. पुढे जाऊन सभात्यागही केला होता. त्यामध्ये विधेयकाला विरोध किती व संख्याबळ घटवणे किती, हे जगाला समजत होते. पण फ़रक पडला नाही. लोकसभेत सपा बसपा यांच्या सभात्यागाने युपीए सरकारला एफ़डीआय विधेयक मंजूर करून घेण्याचा मार्ग सुकर झाला होता. मात्र तशीच स्थिती राज्यसभेत नव्हती. तिथे याच दोन्ही पक्षांनी सभात्याग केला तरी युपीएचे संख्याबळ कमी पडत होते आणि त्यांच्या पाठींब्याशिवाय विधेयक संमत होण्याची बिलकुल शक्यता नव्हती. सहाजिकच दोघांना भूमिका गुंडाळून व्यवहाराला महत्व देण्याखेरीज पर्याय नव्हता. त्यामुळेच राज्यसभेत मायावतींनी विधेयकापेक्षा भाजपाचे वाभाडे काढले आणि लोकसभेतला विरोध गुंडाळून त्याला पाठींबा दिलेला होता. तर मुलायमसिंग यांनी सभात्याग करून संख्याबळ घटवण्याला मदत केली. अशारितीने दोन्ही पक्षांनी आपापल्या भूमिका एका विषयात एकाच अधिवेशनात वेगवेगळ्या सभागृहात बदलून दाखवल्या होत्या. कारण इडी वा सीबीआय कॉग्रेसच्या हातात होते आणि व्यवहार त्यांच्या मर्जीवर अवलंबून होता. राजकीय पक्षांच्या भूमिका व विचारधारा असतात. पण पक्ष नेते चालवतात आणि त्यांच्या भूमिका या त्यांच्या हितसंबंधांवर आधारीत असतात. सत्तेच्या वाटपावर अवलंबून असतात. त्यासाठी मग विचारधारा वगैरे गोष्टी सोयीनुसार वाकवल्या वळवल्या जात असतात. शिवसेनाही आता राजकारणात मुरली आहे. त्यामुळे लोकसभा व राज्यसभेत त्यांनी वेगवेगळ्या भूमिका पार पाडल्यास नवल नाही.
अवघ्या दिड वर्षापुर्वीही शिवसेनेने आपला व्यवहारवाद ठळकपणे दाखवलेला होता. तेव्हा शिवसेना एनडीएमध्ये होती आणि अनंत गीते नावाचे त्यांचे सदस्य केंद्रीय मंत्रीमंडळातही सहभागी होते. राज्यातही शिवसेना भाजपाच्या सोबत सत्तेत होती. पण जुन २०१८ मध्ये एनडीए सोडून बाजूला झालेल्या तेलगू देसम पक्षानेच मोदी सरकारवर अविश्वास प्रस्ताव आणला. तेव्हा शिवसेना कुठे वेगळी वागली होती? त्यांनी एनडीएत सहभागी असूनही अविश्वास प्रस्तावात सरकारचे समर्थन केलेले नव्हते. किंबहूना त्या चर्चेतही सहभागी होण्यापासुन शिवसेना बाजूला राहिली होती. त्यांनी गैरहजर राहून एकप्रकारे आपल्याच सरकारवर अविश्वास व्यक्त केला होता. त्यामुळे राजकारणाच्या व्यवहारात शिवसेना कधीच अन्य पक्षांपेक्षा मुरब्बी झालेली आहे. बिचारे चंद्राबाबू नायडू यांची दया येते. त्यावेळी त्यांना याची किंमत कळली नव्हती आणि आता उमजली आहे. कॉग्रेसने काहीही दिलेले नसतानाही त्यांनी मोदी सरकारला दणका देण्याचा आवेश दाखवला आणि आज एनडीएत नसतानाही त्यांनी सरकारला साथ दिलेली आहे. त्यापेक्षा शिवसेनेचा व्यवहार अधिक चोख आहे. कॉग्रेसमुळेच सेनेला मुख्यमंत्रीपद मिळालेले आहे. तर त्याला लाथ मारून पाकिस्तान वा बांगला देशी हिंदूंसाठी काही करणे कितीसे व्यवहार्य असू शकते? म्हणूनच कॉग्रेसने डोळे वटारताच सेनेने राज्यसभेतून काढता पाय घेतला आणि नागरिकता विधेयकावर मतदान करायचे टाळलेले आहे. चंद्राबाबूंनी कॉग्रेसच्या नादी लागून हातात असलेले मुख्यमंत्रीपद व सत्ता गमावली. शिवसेनेने मात्र कॉग्रेसच्या नादी लागून मुख्यमंत्रीपद व सत्तेत हिस्सा मिळवला आहे. सहाजिकच सेनेला अधिक व्यवहार चतुर म्हणायला नको काय? बाकी तात्विक काथ्याकुट करणार्यांचे काय जाते? त्यांच्या नादी लागून काय मिळायचे आहे? मुद्दा इतकाच, की आता शिवसेनाही मुरब्बी राजकारणी झाली आहे आणि हळुहळू पुरोगामीही होत चालली आहे. आपण या बदलाचे स्वागत करायला हवे. डिवचून काय मिळणार आहे?
महा'विकास'आघाडी की महा'स्थगिती'आघाडी - नक्की वाचा
ReplyDeletehttps://tisarenetra.blogspot.com/2019/12/blog-post_11.html
विषयाची छान मांडणी
Deleteधन्यवाद सर, आणखी काही सूचना असतील तर ब्लॉगवर कमेंट करून नक्की सांगा...
Deleteहे ही ठीकच आहे...
ReplyDeleteपण शिवसैनिकाच्या भावनांचे काय करायचे?
तो तर अजुनही बाळासाहेबांच्या कट्टर हिंदूत्वाला सोडायला तयार नाही...
त्यांना विचारतो कोण? उद्धव तर नक्कीच विचारत नाही.
Deleteहो, नाहीतर असं वागला नसता
Deleteशिवसेना अशीच बदलत राहीली तर शिवसैनिक सुद्धा बदलतील आणि सेनेला सोड चिठ्ठी देतील ,तत्व आणि विचारसरणी या गोष्टी सेनेचा आधार होता एके काळी असं म्हणायची वेळ येईल एवढं स्वार्थी होऊ नये नाहीतर त्याचे परिणाम पुढे दिसतील ।।।
ReplyDeleteआता एक गोष्ट नक्की झाली, शिवसेना संजय राऊत चालवतात आणि शरद पवार हे संजय राऊतांना चालवतात ! म्हणजे शरद पवारांकडे शिवसेनेचा रिमोट कंट्रोल आहे हे खरे !!
ReplyDeleteया दिशेने शिवसेना जात राहिली तर ती ISIS मध्ये पण जाईल.
ReplyDeleteभाऊराव,
ReplyDeleteएक गोष्ट नक्की की मतदारांनी शिवसेनेला निवडून दिलंय ते मोदींना पाठींबा म्हणून. भाजपचे खोगीरभरती झालेले नेते मोदींना काय पाठींबा देणार? त्यापेक्षा शिवसेनेने एकहाती विधानसभा जिंकून ठामपणे मोदींच्या मागे उभं राहिलेलं चांगलंच ना? जनतेकडे काय संदेश गेला पाहिजे याची काळजी उद्धव घेतीलंच.
आपला नम्र,
-गामा पैलवान
पुढच्या निवडणूका येऊदे. मग लोक काय करतील सेनेचे ?
ReplyDeleteसत्तेसाठी अजुन लवचिकता दाखवणार शिवसेना
ReplyDeleteसंजय राऊत यांनी राज्यसभेत विधेयकाला विरोध करताना देशद्रोहाचा मुद्दा उपस्थित करून अमित शहांच्या नावावर खपवला जो विधेयक मांडताना गृहमंत्र्यांनी मांडलाच नव्हता. त्यामुळे त्यांनी विरोधाला उत्तर देताना डिनाय केला.. राऊत मुख्यमंत्री पद वाटून घेण्याचा 'करार' ही असाच खोटेपणाने लादत स्वार्थ साधण्यासाठी त्याचा डांगोरा पिटत होते काय? एवढे करूनही नवीन डेव्हलपमेंटनुसार मलईदार 'खाती' दोन्ही काँग्रेसच्या बोक्यांनी पळवली आणि जबाबदारीच्या ओझ्याचे गृह खाते सेनेला मिळाले!
ReplyDeleteभाऊ आपण मुलायम आणि मायावती यांचा वर जो उल्लेख केला आहे तो अतिशय मार्मिक आहे, स्वतःवरचे खटले बंद करण्यासाठी त्यांनी केंद्रात असलेल्या सरकारचे समर्थन केले होते पण त्याचा परिणाम आज त्यांना भोगायला लागतो आहे कारण राज्यात हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत आणि याचाच फायदा घेत मोदी आणि शहा यांनी 2014 आणि 2019 च्या लोकसभा तसेच 2017 च्या विधानसभा निवडणुकीत मुलायम आणि मायावती यांना अक्षरशः उखडून फेकून दिले, मोदी द्वेषापायी नितीश कुमार लालू आणि काँग्रेस सोबत गेले होते पण ते हुशार निघाले, आपण फसलो आहोत हे लक्षात येताच त्यांनी पलटी मारली आणि परत मोदी यांना येऊन मिळाले, आता सध्या शिवसेनेने तडजोड करून सत्ता टिकवून ठेवली आहे हे जरी खरे असले तरी परत जेव्हा मतदारांना सामोरे जावे लागेल तेंव्हा मात्र मतदार याचा हिशोब चुकता केल्या शिवाय राहणार नाही, काँग्रेस सोबत गेलेल्या लालू, मुलायम, मायावती चंद्राबाबू यांची आज स्वतःच्या राज्यात तसेच केंद्रात काय दुर्दशा झाली आहे हे सगळेच पाहत आहेत.
ReplyDeleteभाऊ 2015 मध्ये नितीशकुमार, लालू आणि काँग्रेस यांचे सरकार बनले होते तेव्हा लालू यांनी आपल्या दोन्ही मुलांना नितीश यांच्या हाताखाली काम करताना त्यांच्याकडून प्रशासनिक कौशल्य आत्मसात करण्याचा सल्ला दिला होता,पुढे हे सरकार टिकले नाही हा भाग वेगळा,या वेळी सत्तावीस वर्षांचे आदित्य ठाकरे पहिल्यांदा विधानसभेत आले आहेत जर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ते उपमुख्यमंत्री म्हणून पुढे आले असते तर जलयुक्त शिवार, मेट्रो, समृद्धी महामार्ग, बुलेट ट्रेन अशा अनेक विषयांवर त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या प्रशासकीय कौशल्यांचा उपयोग झाला असता आणि अनेक गोष्टी शिकता आल्या असत्या,1995 चे युती सरकार आठवा तोपर्यंत तुलनेने दुय्यम असलेले सार्वजनिक बांधकाम खाते नितीन गडकरी यांचेकडे आले आणि आपल्या कर्तृत्वाने नितीन गडकरी एकदम पुढे आले, मुंबई पुणे एक्सप्रेस वे, मुंबईत बांधलेले उड्डाण पूल अशी अनेक कामे त्यांनी केली, तेच गडकरी नंतर महाराष्ट्र भाजप अध्यक्ष आणि नंतर राष्ट्रीय अध्यक्ष झाले, जर मोदींना बहुमत मिळाले नसते तर आघाडी सरकारचे ते कदाचित पंतप्रधान देखील झाले असते, आज आदित्य ठाकरे यांची ती संधी गेली आहे,हरियाणा मध्ये त्यांच्याच वयाचे दुष्यंत चौताला खट्टर यांच्यासोबत कारकीर्द सुरू करत आहेत,शेवटी पद कोणतेही असो कर्तृत्व महत्त्वाचे केवळ आम्ही अमूक एकाची मुले आहोत म्हणून आम्हाला मोठे करा हे आता चालणार नाही असे अखिलेश यादव, लालू यांचा पक्ष, पंकजा मुंडे यांच्यासारख्या नेत्यांना नाकारून मतदाराने सांगितले आहे बाकीच्यांनाही तो भविष्यासाठी इशारा आहे
ReplyDeleteVery good analysis
Deleteनागरिकता सुधारणा विधेयकावर लिहा भाऊ काही.
ReplyDeleteछान भाऊ. पण मग भाजापने Kashmir मधे केले तेव्हा त्यांचे हिंदुत्व जागे होते़ का? आणि आतापर्यंत तत्त्व वैगरे सेना पाळत आली तरी तिला काय मिळाले? डूयम वागणुक?
ReplyDeleteआणि कपटी आणि खोतारड्या भाजपला धडा शिकवणे गरजेच आहे असे वाटते. जर् सेनेने हिंदुत्व सोडले अस्ते तर् लोकसभेत बाजूने मतदान केले अस्ते का? अमित शाह यांनी जर् प्रशानांची उत्तरे दिली अस्ति तर् काही बिघडले अस्ते का?