निवडणुकांचे राजकारण आणि युद्धक्षेत्र यात फ़ार मोठा फ़रक नसतो. जिथे शत्रू तुमच्यावर चाल करून येत असतो, तो नुसत्या शक्तीनिशी हल्ला करीत नाही. तर कुठे हल्ला करायचा आणि कुठे तुम्ही दुबळे आहात, तिथेच हल्ला करायचा अशी व्युहरचना त्याने केलेली असते. अशा वेळी उलटा त्याच्यावर प्रतिहल्ला चढवून भागत नाही. त्याच्या डावपेचांना निकामी करून टाकले, तरी पुरेसे असते. रणनितीमध्ये शत्रू त्याच्या शक्ती व बळावरच विसंबून नसतो, तर तुमच्याकडून त्याला ठराविक प्रतिसाद अपेक्षित असतो. तुम्ही त्याच्या अपेक्षेप्रमाणे वागणे वा प्रतिसाद देण्यालाही, त्याच्या व्युहरचनेत निर्णायक महत्व असते. त्याप्रमाणे तुम्ही वागलाच नाहीत, तर त्याचे सगळे डावपेच निरूपयोगी ठरून जातात. कधीकधी शत्रूच त्याच्या व्युहरचनेचा बळी होत असतो. अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणूकीत भाजपाने सत्ता गमावण्याचे तेच कारण आहे. तिथे भाजपाच्या रणनितीकारांना अपेक्षित असा प्रतिसाद विरोधकांकडून आलाच नाही. ज्याप्रकारे ममता वा मायावती-अखिलेश भाजपा विरोधातली आघाडी उघडून मैदानात उतरले होते, तसा उतावळेपणा ओडीशाच्या नविनबाबूंनी केला नाही. तिथे भाजपा त्यांची सत्ता हिसकावून घेऊ शकला नाही. पण बंगालमध्ये ममताला शह देऊन १८ जागा जिंकण्यापर्यंत भाजपाने मजल मारली. त्याचे श्रेय भाजपाच्या डावपेचांपेक्षाही ममतांच्या उतावळ्या प्रतिसादाला दिले पाहिजे. कारण त्यांच्या आक्रस्ताळेपणाने तृणमूलचा नसलेला वा कॉग्रेस व डाव्यांचा मतदार भाजपाकडे एकत्रित व्हायला बहुमोलाचा हातभार लागला होता. मात्र त्यापासून ममता कुठलाही धडा शिकायला राजी नाहीत. आताही त्यांना भांडण्याची मोठी खुमखुमी आहे आणि त्यांनी तशीच आवेशपुर्ण भाषेत व आवाजात शिवीगाळ करावी; हीच भाजपाची खरी रणनिती आहे. कारण त्यातून विखुरलेला तृणमूल विरोधी मतदार भाजपाकडे आपोआप येत असतो. त्यालाच राजकीय विश्लेषणात मतांचे धृवीकरण म्हणतात.
नव्याने मुलूखगिरी करणार्या पक्षाला आपल्या बाजूला नसलेली मते आपल्याकडे खेचून, यशाच्या दिशेने आगेकुच करावी लागत असते. त्यासाठी वेगवेगळे डावपेच खेळावे लागत असतात. जिथे आपला मतदार कमी असतो, तिथे अन्य पक्षांचा मतदार त्या पक्षाला कंटाळून आपल्याकडे येईल; अशी एक रणनिती असते. त्यालाच जोडून प्रमुख पक्षाच्या विरोधातली मते आपल्याभोवती गोळा होतील, यालाही प्राधान्य द्यावे लागत असते. त्यासाठी विरोधातल्या पक्षांची एकजुट होण्याला प्रोत्साहन देण्यानेही मोठे काम होत असते. भाजपाचा अनेक राज्यातील वाढविस्तार अशाच डावपेचातून झालेला दिसेल. अलिकडल्या काळातील त्याचे ज्वलंत उदाहरण पश्चीम बंगाल हे आहे. तिथे दिर्घकाळ डाव्या आघाडीने कॉग्रेसला संपवून आपले बस्तान बसवलेले होते. त्यांना कोणी आव्हानच देऊ शकत नाही, अशी एक राजकीय समजूत तयार झालेली होती. त्या काळात ममता कॉग्रेसमध्येच होत्या आणि डाव्यांना बंगालमधून संपवण्यासाठी त्या आग्रही होत्या. पक्ष नेतॄत्वाकडून त्यांना प्रतिसाद मिळेना, तेव्हा ममता बाहेर पडल्या व त्यांनी तृणमूल नावाची नवी प्रादेशिक कॉग्रेस स्थापन केली. त्यांच्यासारखा विचार करणारे अनेक कार्यकर्ते नेते त्यांच्या पाठीशी जमा झाले. त्यानंतर कधी भाजपाला सोबत घेऊन, तर कधी कॉग्रेसशी युती करून; ममता डाव्यांशी दोन हात करीत राहिल्या. प्रथम त्यांनी दुसर्या क्रमांकाचा पक्ष होण्यापर्यंत मजल मारली आणि ज्योती बसूंच्या नंतर डाव्यांचे नेतृत्व करणारे भट्टाचार्य मुख्यमंत्री झाल्यावर ममता अधिक आक्रमक झाल्या. त्यांना मुसंडी मारण्यासाठी एक संधी हवी होती आणि ती डाव्यांच्या गुंडगिरीने मिळून गेली. सिंगूर व नंदीग्राम या दोन गावातील जमिन सक्तीने अधिगृहीत करण्याच्या विरोधात तिथले गावकरी उभे ठाकले आणि ममतांनी तिथे जाऊन मुक्कामच ठोकला. बंगालच्या राजकारणाने तिथेच मोठे वळण घेतले.
तीन दशकानंतर कोणी खरोखरच डाव्यांच्या वर्चस्वाला आव्हान देत असल्याने माध्यमांचाही ममतांना पाठींबा मिळाला आणि त्यांचे सिंगूरचे उपोषण देशव्यापी बातमी झाली. डाव्यांची बंगालमधली गुंडगिरी चव्हाट्यावर आली. पण विषय तिथेच संपत नव्हता. डाव्यांना कंटाळलेला बराच मतदार होता आणि तो अन्य पक्षात वा कॉग्रेस पक्षाकडे विखुरलेला होता. तो हळुहळू ममतांच्या पाठीशी एकवटत गेला. ममतांना रोखण्याचे वा दडपून टाकायचे जितके प्रयास डाव्यांनी केले, तितकी ममतांची मते वाढतच गेली. गाव तालुक्यात डाव्या गुंडांना वैतागून गेलेला समाज ममतांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला आणि बघता बघता डाव्यांची सद्दी संपली. एकदा सत्ता ममतांच्या हातात गेल्यावर डाव्यांच्या गुंडांना पोलिसांचेही पाठबळ उरले नाही. मग तशा गुंडांनी आपापली संस्थाने कायम राखण्यासाठी आपोआप ममतांच्या पक्षाचा आश्रय घेतला. थोडक्यात डाव्यांनी गुंडगिरी करून बंगालला आपला अभेद्य किल्ला बनवलेला होता, तिथे आता ममतांची सत्ता प्रस्थापित झाली. दुसर्या पक्षांना निवडणूका लढवणेही अशक्य होऊन गेले. मात्र त्या गुंडगिरीशी टक्कर द्यायची हिंमत डाव्यांचे नवे नेतृत्व हरवून बसलेले होते. कॉग्रेस तर कुठल्याही संघर्षाला अनुत्सुकच होती. मोदींच्या उदयानंतर भाजपाने तिथे लक्ष पुरवले आणि बंगाल आपला नवा गड म्हणून काबीज करण्याची रणनिती अवलंबली. ममतांचा आक्रस्ताळेपणा व त्यांच्या पक्षाच्या गुंडगिरीला तोंड देणारा एकमेव पक्ष, अशी आपली प्रतिमा मागल्या पाच वर्षात भाजपाने उभी केली आणि त्याचा लाभ त्या पक्षाला गेल्या लोकसभेत मिळाला. ज्याला २०१६ मध्ये विधानसभेत डझनभर आमदार निवडून आणता आले नव्हते; त्या भाजपाने २०१९ मध्ये लोकसभेत तब्बल १८खासदार निवडून आणले. डाव्यांचा तर सफ़ायाच झाला आणि ममता बानर्जींनाही दणका बसला. त्यासाठी भाजपाने योजलेल्या रणनितीला ममतांनी दिलेला प्रतिसाद निर्णायक ठरला.
एकतर सत्तेत आल्यापासून ममतांनी आपले सगळे लक्ष पुरोगामी भूमिकेतून मुस्लिमांच्या पक्षपातावर केंद्रीत केले. दुसरीकडे आपल्या पक्षांच्या गुंडांकरवी भाजपाला मारून संपवण्याचा खेळ आरंभला. परिणामी बंगालमध्ये हिंदू भाजपाकडे एकवटत गेला आणि गुंडगिरीने गांजलेला मतदारही भाजपाच्या गोटात जमा होत गेला. सर्वात कहर म्हणजे भाजपाच्या हिंदूत्वाला शह देण्यासाठी ममतांनी हिंदू सण समारंभांनाही प्रतिबंध घालण्यापर्यंत मजल मारली. दुर्गापूजा हा तिथला सर्वात मोठा सार्वजनिक हिंदू उत्सव; त्यालाही चाप लावण्याचे ममतांचे सरकारी फ़तवे कोर्टात टिकले नाहीतच. पण त्यांना कोर्टात आव्हान देणारा भाजपा हिंदू मतदारांसाठी ‘आपला पक्ष’ होण्याला हातभार लागला. बंगालची दुसरी सर्वात मोठी समस्या म्हणजे शेजारी बांगला देशातून आलेले निर्वासित ही आहे. त्यात मोठ्या प्रमाणात मुस्लिमांचा भरणा असून त्यांच्या वाढत्या लोकसंख्येने अनेक सीमावर्ति जिल्ह्यात मतदारसंख्याही बदलून गेली आहे. त्यामुळे तिथला मुस्लिम मतदार खिशात टाकण्यासाठी ममतांनी मुस्लिमधार्जिणे धोरण घेतले आणि आपोआप हिंदू वा बिगर मुस्लिम मतांचा ओढा भाजपाकडे होत गेला. कारण कॉग्रेस वा डाव्या पक्षांमध्ये हिंदूची उघड बाजू घेण्याची हिंमत नाही आणि मुस्लिमांच्या घुसखोरीवर बोलणे त्यांना शक्य नव्हते. त्याचाच लाभ उठवित भाजपा अवघ्या पाच वर्षात बंगालमध्ये हातपाय पसरत गेला. आता त्याने ममतांचेच जुने हत्यार उपसलेले आहे. २००९ नंतर ममता सातत्याने संसदेत बांगला घुसखोरांना हाकलण्याची मागणी करीत होत्या. आता तशीच नव्हेतर तीच मागणी भाजपा सरकारने कायदा रुपाने संमत केली असताना मात्र ममता उलटी भाषा बोलत आहेत. त्यामुळे त्यांचे बदलते मतांचे राजकारण उघडे पडले आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करून ममतांनी त्यांचा आरंभीचा मतदारच भाजपाला देऊन टाकला आहे. त्यासाठी त्यांनी गेल्या दोन आठवड्यात आकाशपाताळ एक केला आहे. पण त्यांनी तसेच करावे, ही भाजपाची अपेक्षा आहे. तीच तर रणनिती आहे.
बांगलादेशी घुसखोर वा निर्वासित यांच्यामुळे बंगालच्या सीमावर्ति जिल्ह्यामध्ये एकूण मतदारसंघाचे चरित्र बदलून गेले आहे. त्यातले अनेक मतदारसंघ क्रमाक्रमाने मुस्लिम बहूल होऊन गेले आहेत. त्यांच्या उचापतींनी बंगालच्या शांततेला तडा गेलेला आहे. पण मुस्लिम मतांवरच राजकारण करणार्या बहुतांश पुरोगामी पक्षांमध्ये त्या विरोधात चकार शब्द उच्चारण्याची हिंमत नाही. परिणामी ती भाजपाची मक्तेदारी होऊन बसली आहे. भाजपा विरोधात जाताना ममता इतक्या हिंदूविरोधी होऊन गेल्या, की त्यांना वेळोवेळी कोर्टाकडूनही थप्पड बसलेली आहे. आताही त्यांनी नागरिकत्व कायदा व राष्ट्रीय नागरीक नोंदणी बंगालमध्ये लागू होणार नसल्याच्या जाहिरातीच सुरू केल्या होत्या. त्यावर प्रथम राज्यपालांनीच आक्षेप घेतला. कारण संसदेने मंजूर केलेला कायदा अंमलात आणणार नाही असे कुठल्याही राज्य सरकारला म्हणता येत नाही वा तसे वागता येत नाही. पक्षाची भूमिका वेगळी असते आणि पक्षाने चालवलेल्या राज्य सरकारची भूमिका घटनात्मक असावी लागते. तिथेच ममतांची गोची झाली आणि आता त्यांच्या या जाहिरातीला कलकत्ता हायकोर्टानेच आक्षेप घेतला आहे. त्याचा मतदारांच्या मनावर काय परिणाम झाला असेल, त्याचा नुसता अंदाज करावा. ममता हिंदूंच्या विरोधात असल्याचेच चित्र यातून निर्माण होते आणि आपोआप असा नाराज वा निराश मतदार आपला कैवारी म्हणून भाजपाकडे बघू लागतो. थोडक्यात ममतांनी असा आक्रस्ताळेपणा करून हिंदूंना दुखवावे, हीच तर भाजपाची रणनिती आहे. ममता त्याला अपेक्षित प्रतिसाद देतात. पर्यायाने भाजपाला मदत करीत असतात. त्यांच्या असल्या जाहिराती वा अलिकडल्या मुस्लिम बहूल परिसरातील दंगली हिंसाचारानंतर किती मुस्लिम मते ममतांना वाढवून मिळतील, हे ठाऊक नाही. पण त्यांच्या अशा वागण्याने नाराज हिंदू मोठ्या संख्येने भाजपाकडे नक्कीच वळणार आहे, वळतो आहे. थोडक्यात व्युहरचना भाजपाची, पण राबवणार्या मात्र ममतादिदी आहेत.
खरंय भाऊ
ReplyDeleteया ब्लॉगचे "ममतांना सणसणीत थप्पड" हे शिर्षक मजकुराशी समर्पक आहे का?
ReplyDeleteभाऊ, सर्वांगसुंदर लेख लिहिला आहे. पश्चिम बंगाल च्या
ReplyDeleteराजकारणातील पदर अत्यंत सिस्टिमॅटिक उलगडला आहे
ममता ह्यांनी धर्मनिरपेक्ष म्हणवून घेताना मध्य आणि निम्न जातींचा जमातवाद पोसला. अल्पसंख्य धर्मगुरूंचे धार्जिण्य केले. हिंदूंनी त्यांच्यातील समन्वयवाद, उदारता हा हिंदूपणा कायम ठेवावा. त्यामध्ये राजकारण आणू नये. मी म्हणेल तीच
पूर्वदिशा मग दुर्गापूजेसाठी अडसर निर्माण करणे, ईमामांचे लाड पुरवणे अश्या थर्डग्रेड लेव्हल ममता ह्यांनी पार केल्या.
आजची भारताच्या सो कोल्ड पुरोगामी पुढार्यांनी त्यांच्या पराकोटीच्या सत्तेच्या लालसेने अत्यंत टॉक्सिक पद्धतीने
स्युडोसेक्युलॅरिझम पसरवला त्यामुळे २०२० लागताना
भारतातिल राज्याराज्यामधील हिंदू आणि बिगरहिंदू
समाजव्यवस्था ही अनेक पातळ्यांवर आणि अनेक अंगांनी अंतव्र्यूहित/ आंतरव्यूहित (कॉम्प्लेक्स) अशी झाली आहे. ती चालवताना त्या त्या पातळीवरचे प्रश्न त्या त्या पातळीवरच कळतात. पातळ्या अटळ आहेत आणि त्यामुळे कार्यात्मक वाटेल अशी श्रेणीयता (फंक्शनल-हायरार्की) bjp सारख्या पक्षांनी अंगीकारणे देखील अटळ आहे. ‘एकाच पातळीवर गोल बसून खेळीमेळीने निर्णय घेऊ!’ हे म्हणणे शुद्ध भंपकपणाचे आहे. प. बंगाल मधील ममतांचा स्युडोसेक्युलॅरिझम वेगळा आहे तर आपल्या राज्यात सत्तेच्या
हवासापोटी शरदरावांनी नाही त्या वयात नाही नाही त्या गोष्टी
करून नको त्यांना एकत्र आणून शिवसेनेस शरदसेना बनवून
जो स्युडोसेक्युलॅरिझम पसरवला तो ममताच्या
स्युडोसेक्युलॅरिझम वेगळा आहे. त्यामुळे Bjp ला भारतातील राज्याराज्यामधील हिंदू आणि बिगरहिंदू
समाजव्यवस्थेतील वेगवेगळ्या प्रकारच्या स्युडोसेक्युलॅरिझम ला पुढच्यावेळी तोंड द्यावे लागेल. सध्याच्या परिस्थितीवरून
तरी Bjp ला भारतातील राज्याराज्यामधील हिंदू आणि बिगरहिंदू समाजव्यवस्थेतील वेगवेगळ्या प्रकारच्या स्युडोसेक्युलॅरिझम ला कडाक्याचे उत्तर देण्यासाठी नवीन मार्ग शोधावा लागेल. ह्यावर प्रकाश टाकणारा विचार मांडल्यास आवडेल.
भाऊ, नाराज मतदार आपल्याकडे ओढण्याने एकदा सत्ता मिळेल पण तो मतदार टिकवायचा कसा व त्याचे रुपांतर सत्तेत कसे करायचे हे भाजपाची थिंकटँक शिकली असेल अशी अपेक्षा करुयात म्हणजे छत्तीसगड व झारखंड होणार नाही. महाराष्ट्र धरत नाही कारण जनतेने कौल दिला होता पण युतितील भागीदारांने चक्क फसवले.
ReplyDeleteभाऊ ममता बॕनर्जी या हिंदू व भाजप द्वेशाने एवढ्या पछाडलेल्या आहेत की आपल्या पक्षाचा व आपला वैयक्तिक ह्रास होत आहे ते पण कबुल आहे. लवकरच होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत प.बंगालच्या सत्ता पालटाची ग्वाही ममता बॕनर्जीच्या आक्रस्ताळी वागण्यामुळे मिळत आहे व भाजपच्या हे पथ्यावर पडत आहे. आत्तापण पं. बंगाल मध्ये CAA व NRC आपण कुठल्याही स्थितित लागू करु देणार नाही आशी राणा भिमदेव थाटात गर्जना केली. लोकसभा व राज्यसभा या दोन्ही ठिकाणी विधेयक मंजूर झाल्यावर कायदा बनतो व तो सर्व राज्यांना बंधनकारक असते एवढे
ReplyDeleteदेखिल ज्ञान नसावे हे प.बंगालचे दुर्दैव. आपल्या कडे पण महाआघाडीच्या काही वरीष्ठ नेत्यांनी महाराष्ट्रात CAA व NRC कुठल्याही स्थितीत लागू करणार नाही अशी गर्जना केली आहे.अॕक्सिस बँकेत असलेली
महत्वाची सर्व खाती स्टेट बँकेत हलवण्या सारखे निर्णय घेऊन सुडबुद्धिचे हीन राजकारण करण्यात नवे नेतृत्व धन्यता मानत आहे,हे सरकार पूर्वीच्या सरकारचे निर्णय फिरवण्यात धन्यता मानत आहे. अशा निर्णयांमुळे ही दोन्ही सरकारे लोकांच्या मनातुन हद्दपार व्हायला फार वेळ लागणार नाही. पं. बंगाल व महाराष्ट्राच्या भविष्या बद्दल आपले विचार मांडावेत ही विनंती.
भाऊ, तुम्ही म्हणता ते खरे आहे. पण तीच गोष्ट महाराष्ट्रातसुद्धा घडते आहे. तोंडी तलाक विरोधी कायद्याला शरद पवारांचा विरोध, तोंडाने "रयत" आणि "दिल्लीश्वरांपुढे न झुकण्याचे" बोलणारे शरद पवार आणि त्यांच्या पक्षाचे अमोल कोल्हे ३७० च्या मात्र विरोधात बोलत होते. शरद पवार केवळ मतांसाठी मुसलमानांना ५% आणि मराठा समाजाला १५% आरक्षण पण देणार होते. वर पुन्हा पूर्वीचे मोगल आणि आताचे मुसलमान वेगळे हेही सांगत होते. मुंबई बॉम्बस्फोटांच्या वेळी मुस्लिमबहुल भागात सुद्धा स्फोट झाल्याचे खोटे बोलून तो मास्टरस्ट्रोक असल्याचे आता ते स्वतःचे जे कौतुक करून घेत आहेत, ते सुद्धा मुस्लिम मतांसाठीच आहे. कारण एकदा अशी काही कबुली दिली कि पुन्हा जर अशी काही अतिरेकी घटना घडली तर जनता राज्यसरकारवर खरोखरच कितपत विश्वास ठेऊ शकेल? हे लक्षात न येण्याइतके शरद पवार भोळसट नक्कीच नाहीत. निदान पुढच्या निवडणुकांपर्यंत तरी लोकांना ह्या गोष्टी समजतील अशी आशा....
ReplyDeleteहे तुम्ही समजावं असं लिहिता आणि सगळं सोपं होत जातं
ReplyDeleteममता बॅनर्जी यांचा मुळ माथेफिरू मुस्लिम धार्जिणा आक्रस्ताळेपणा यावरच भाजपची व्युहरचना अवलंबून आहे.
ReplyDelete