Sunday, December 8, 2019

नाथाभाऊंचा ‘वेगळा’ विचार

Image result for khadse pankaja

महाराष्ट्र विधानसभांचे निकाल लागल्यापासून राज्याचे एकूण राजकीय वातावरण ढवळून निघालेले आहे आणि त्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आल्यावरही भाजपाला विरोधात बसावे लागलेले आहे. त्यामुळे त्या पक्षात नाराजांचे सूर चढलेले असून, आजवर दबून राहिलेल्या भावना व प्रक्षोभाला वाट करून द्यायला अनेकजण पुढे आलेले आहेत. त्यात अनुभवी अशा एकनाथ खडसे यांनी पुढाकार घेतला, याचे नवल नाही वाटले. तर त्यांनाच आपला इतिहास आठवत नाही याचे नवल वाटले. गेल्या विधानसभा निवडणूकांचे निकाल लागून सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाने अल्पमताचे सरकार बनवले; तेव्हा नाथाभाऊ काय बोलत होते? आणि कसे वागत होते? त्यावेळी लागोपाठ युती व आघाडी मोडली होती. आधी युती मोडीत निघाली व नंतर तासाभरात आघाडीही राष्ट्रवादीने मोडीत काढली होती. त्यामुळे स्वबळावर मेगाभरती केलेल्या भाजपाला सर्वात मोठा पक्ष म्हणून यश संपादन करण्याचा मार्ग शरद पवार किंवा राष्ट्रवादीनेच मोकळा करून दिलेला होता. त्यावेळी युती मोडण्यामागे आपला किती मोठा पराक्रम वा धाडस होते, त्याची रसभरीत कथा नाथाभाऊच पत्रकारांना रंगवून सांगत होते. पण अशा कथाकथनातून दिर्घकालीन मित्रपक्ष शिवसेनेला आपण खिजवतो आहोत, याचे भान त्यांना कुठे होते? राजकारणात कोणालाही दुखावण्यापेक्षा सर्वांना समाधानी राखून मोठी मजल मारता येते; याचे भान नाथाभाऊंना तरी कुठे राहिले होते? भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने युती मोडण्याचे आव्हान समोर ठेवलेले होते, पण ते पेलण्याची कुवत कोअर कमिटी म्हणवणार्‍या अन्य कुणा नेत्यापाशी नव्हती. ती घोषणा करायला आपण पुढे झालो होतो, अशी फ़ुशारकी वारंवार कोण मारत होता? त्याच्या वेदना शिवसेनेला देण्यात धन्यता कोण मानत होता? खडसेच त्यात पुढाकार घेत होते ना? कारण सेना त्या डावात हरलेली होती आणि अल्पावधीतच नाथाभाऊंना सत्तेची खुर्ची सोडून वनवासात जावे लागलेले होते. तेव्हापासून त्यांना आपल्या जखमा चघळत बसण्यापलिकडे अधिक काही करता आलेले नव्हते. आज त्यांना वेगळा विचार सुचतो आहे.

पाच वर्षाची सत्ता उपभोगताना भाजपाच्या अन्य नेत्यांना ह्या सत्तेचा खरा मानकरी नाथाभाऊ असल्याचे स्मरण राहिले नाही, याची वेदना त्यांना असह्य झालेली असेल. पण बोलता येत नव्हती. नेमकी तशीच अवस्था त्या काळात शिवसेनेची होती. संख्या कमी व राष्ट्रवादीचा छुपा पाठींबा म्हणून भाजपा शिरजोरी करीत होता व सेनेला त्यावर मात करता येत नव्हती. तरी शिवसेना निदान तक्रारी करीत होती. सत्तेत सहभागी होऊनही सेनेने राजिनामे फ़ेकण्याच्या पोकळ धमक्या तरी दिलेल्या होत्या. पण जवळपास चार वर्षे राजकारणातून बाजूला फ़ेकले गेल्यावरही नाथाभाऊंना ‘वेगळा विचार’ करण्याचे धाडस झालेले नव्हते. अगदी विधानसभेची उमेदवारी नाकारली गेल्यावरही ‘वेगळा विचार’ त्यांच्या मनाला शिवला नाही. कारण त्यांचा बालेकिल्ला असलेल्या खानदेशाही पक्षात त्यांना पर्याय उभा राहिला होता आणि बंडाचा झेंडा खांद्यावर घेऊन काहीही साध्य होण्याची शक्यता नव्हती. मग आताच त्यांच्यात धाडस नव्याने कुठून संचारले आहे? तर राज्यातील भाजपाचे नेतृत्व सत्ता गमावल्याने मरगळले आहे, तेव्हा नाथाभाऊंना जोश आला आहे. त्यांच्या इतकीच दयनीय अवस्था पंकजाताई मुंडे यांची आहे. आपल्या पित्याच्या बालेकिल्ल्याला राखणेही त्यांना मंत्रीपदी राहून शक्य झालेले नाही. त्यांना सोबत घेऊन नाथाभाऊ बंड पुकारण्य़ाची भाषा बोलत आहेत. तेव्हा मजा वाटते. ज्यांना आपले पारंपारिक बालेकिल्लेही जपता राखता आले नाहीत, त्यांनी पक्षातल्या दगाबाजीची तक्रार किती करावी? शरद पवार यांनी अनेक पक्ष बदलले व अनेक डावपेच खेळले. पण बारामती हा असा अभेद्य किल्ला बनवून ठेवला आहे, की पराभवाच्या काळातही तिथे नव्याने पायावर उभे रहाण्याची उर्जा मिळत रहावी. नाथाभाऊ वा पंकजाताईंना तितकेही शक्य झाले नसेल, तर बंडाच्या वल्गना करण्यात अर्थ नाही. ‘वेगळा विचार’ करण्यात दम नाही.

पाच वर्षापुर्वी पवारांचे अनेक सरदार नाथाभाऊंनीच फ़ोडलेले होते. तरीही पवार गळपटून गेले नाहीत. अलिकडेच त्यांच्या गोटातले अनेक वतनदार गिरीश महाजनांनी फ़ोडून भाजपात आणले, तरी प्रतिकुल प्रकृती असतानाही पवारांनी किल्ला एकाकी लढवला. दिग्विजय मिळवला नसला तरी आपला किल्ला शाबूत राहिल इथपर्यंत मजल मारली. त्यांनी देशाच्या पातळीवर आव्हान उभे करून पराभव व अपमान नक्की सहन केलेले असतील. पण राज्यातला आपला ठसा पुसला जाऊ नये, यासाठी ‘वेगळा विचार’ केल्यावरही शरणागत होण्याची चतुराई दाखवलेली आहे. त्यासाठी नुसते धाडस उपयोगाचे नसते, तर राजकीय लवचिकता निर्णायक असते. म्हणून तर महायुती फ़ोडून त्यांनी पाच वर्षात आपल्या चेल्यांना पुन्हा सत्तेत आणून बसवण्यापर्यंत जुगार यशस्वी केला आहे. शिवसेना व कॉग्रेस यांना एकत्र बसवताना सत्तेची सुत्रे व रिमोट आपल्या हाती राहिल, अशी खेळी कितीकाळ यशस्वी होईल सांगता येत नाही. पण सध्या तरी ‘वेगळा विचार’ इतरांच्या गळी मारून आपले इप्सित साध्य करण्यात पवार यशस्वी झाले आहेत. कारण राजकारणाच्या आखाड्यात नुसते धाडस उपयोगाचे नसते; तर त्यात आपले अस्तित्व टिकवून पुढे पाऊल टाकण्याची तजवीज करता आली पाहिजे. ती करताना अजितदादा वा तत्सम बळीचे बकरे होणार्‍यांची छोटीशी फ़ौजही हाताशी असावी लागते. प्रकाश खांडगे किवा पंकजाताई त्यात बसणारे मोहरे आहेत काय? ‘वेगळा विचार’ असली भाषा करण्यापुर्वी नाथाभाऊंनी जरा पवारांच्या राजकारणाचा अभ्यास केला पाहिजे. पराभवाच्या जखमा चाटत बसण्यापेक्षा त्यातूनही कुठला डाव खेळता येईल आणि कोणाला बळीचे बकरे बनवता येईल, त्याचा शोध घेणारी काकदृष्टीही आवश्यक असते. अजूनही आपण महायुती मोडली असे कुठे पवार म्हणालेले नाहीत आणि उद्धव यांच्याकडून त्यांनी ते काम परस्पर उरकून घेतलेले आहे. नाथाभाऊंनी तो धडा शिकून घ्यावा आणि मगच ‘वेगळा विचार’ करायला पुढे सरकावे.

अर्थात नाथाभाऊंचा सगळा रोख माजी मुख्यमंत्री व पक्षातील त्यांचे तरूण सहकारी देवेंद्र फ़डणवीस यांच्यावर असल्याचे लपून रहात नाही. पण हा तरूण सहकारी अल्पावधीत शरद पवार यांच्याकडून किती धडे शिकला आहे? त्याकडे नाथाभाऊंनी साफ़ दुर्लक्ष केलेले दिसते. सत्तांतर झाल्यापासून आपल्या तोंडून कुठलाही चुकीचा शब्द बाहेर पडू नये, याची हा तरूण काळजी घेतो आहे आणि तोलूनमापून बोलतो वागतो आहे. सत्तेत आलेली आघाडी विरोधाभासाने दबलेली आहे, हे सत्य लपून राहिलेले नाही. आपल्याच ओझ्याखाली ती आघाडी कुठल्याही क्षणी कोसळून पडण्याची शक्यता कायम आहे. त्या आघाडीला तिच्याच वजनाखाली चिरडून जाण्याची संधी देण्याची गरज आहे. भाजपाने काही उचापत करण्याने त्यांच्या सैल बंधूभावामध्ये जवळीक घट्ट होऊ शकते. तशी संधीच द्यायची नाही असे राजकारण फ़डणवीस खेळत असतील, तर ‘वेगळा विचार’ नाथाभाऊंना कुठे घेऊन जाईल? आधीच पक्षात त्यांना आपले वर्चस्व कायम राखता आलेले नाही. त्यांना बाजूला टाकूनही नव्या नेतृत्वाने पाच वर्षे सत्ता राबवून दाखवलेली आहे. पक्षात हुकूमत उभी केलेली आहे. ज्याला केंद्रातील नेतॄत्वाने पाठबळ दिलेले आहे. त्याच्यावर मात करायची तर आपला पाया मजबूत असला पाहिजे. वेगळा विचार करताना होईल त्या नुकसानाला सामोरे जाण्याची हिंमतही राखावी लागते. ते धाडस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेले आहे. हिंदूत्व बाजूला ठेवून त्यांनी कॉग्रेसशी केलेली हातमिळवणी सेनेच्या आजवरच्या पुण्याईला जुगारात लावून बसलेली आहे. तिथून मागे फ़िरायचे सर्व मार्ग बंद झालेले आहेत. नाथाभाऊंना तितका ‘वेगळा विचार’ करणे शक्य असले तरी तो अंमलात आणण्याची क्षमता आहे काय? त्याची किंमत मोजण्याची कुवत आहे काय? असेल तर जरूर आव्हान देऊन पुढे यावे. नुसत्या वल्गना वा हुलकावण्यांनी लढाया जिंकता येत नसतात. जुगार हा असा खेळ आहे, ज्यात काही गमावण्याच्या तयारीने उडी घ्यायची असते आणि मिळाले तरी त्याला नशिब समजायचे असते.

7 comments:

  1. भाऊ, सध्या नाथाभाऊ चर्चेत रहाण्याचा प्रयत्न करताहेत असे दिसते, मग तरी नेतृत्वाचे लक्ष जाईल अशा आशेने. पण आपण त्यांच्या ताकदीचे योग्य विश्लेषण केले आहे.

    ReplyDelete
  2. भाऊ,

    शरद पवारांनी अजित पवारांना बळीचा बकरा बनविले असे तुम्ही इथे म्हंटले आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी भाजप ला दिलेल्या समर्थनाचा इथे संदर्भ आहे का? आणि त्या निर्णया मागे शरद पवारच होते असे तुम्हाला वाटते का?

    ReplyDelete
  3. भाऊ, तुम्ही सांगितल्या प्रमाणे भाजप च मिशन कर्नाटक फत्ते होतय, लवकरच झारखंड अन दिल्ली चा रिझल्ट येईल. महाराष्ट्रावर परिणाम करणारा पहिला डाव भाजप च्या बाजूने गेलाय.उरलेले दोन्ही रिझल्ट भाजप च्या बाजूने गेले तर महाराष्ट्र व मघ्यप्रदेश मघ्ये सरकार बदलणार असे तुम्ही भाकीत केले आहे..

    ReplyDelete
  4. झकास भाऊ!
    "वेगळा विचार करताना होईल त्या नुकसानाला सामोरे जाण्याची हिंमतही राखावी लागते. ते धाडस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेले आहे. हिंदूत्व बाजूला ठेवून त्यांनी कॉग्रेसशी केलेली हातमिळवणी सेनेच्या आजवरच्या पुण्याईला जुगारात लावून बसलेली आहे. तिथून मागे फ़िरायचे सर्व मार्ग बंद झालेले आहेत." त्यातच आज् NRC act ला पाठिंबा देवून सेनेने भक्तांचे तोंड बंद करून NCP आणि Congress दोघांनाही इशारा दिला आहे की सेनेला त्यांचा वीचार कायम ठेवून aaghaadi करायची आहे

    ReplyDelete
  5. राजकारणात कोणालाही दुखावण्यापेक्षा सर्वांना समाधानी राखून मोठी मजल मारता येते; याचे भान नाथाभाऊंना तरी कुठे राहिले होते?

    म्हणजे फडणवीस ना पण राहिले नव्हते म्हणून आज बाहेर बसावे लागते आहे, स्वपक्षीय आमदार पाडून त्यांनी काय साधले हे दिसतच आहे की

    ReplyDelete
  6. भाऊ, एक छोटासा बदल प्रकाश खांडगे ऐवजी शेंडगे..

    ReplyDelete