Friday, December 13, 2019

चंद्राबाबूंच्या वाटेने

TDP chief N Chandrababu Naidu during a meeting with Shiv Sena chief Uddhav Thackeray in Mumbai on Feb.5, 2014. - N Chandrababu Naidu

मुख्यमंत्री झाल्यापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जोशात आहेत. त्यांचे सल्लागारही जोशात आहेत. गंमत म्हणजे त्यांनी जी काही पावले उचललेली आहेत, ती त्यांच्याच पक्षाला अपायकारक असूनही त्यांना फ़िकीर दिसत नाही. कारण स्पष्ट आहे. पक्षहीत वा पक्षाचे भवितव्य हा विषय मागे पडलेला असून; ज्याला शत्रू मानलेले आहे, त्याला दुखावण्याला प्राधान्य आलेले आहे. म्हणूनच नागरिकत्व सुधारणा विधेयकात लोकसभेतील समर्थनानंतर राज्यसभेत शिवसेनेने सभात्यागाचे नाटक रंगवले. त्याचे सोपे कारण शिवसेनेची मदतही भाजपाने वा अमित शहा यांनी मागितली नाही. लोकसभेत भाजपाचे स्वत:चे बहूमत असल्याने तशी मदत मागायचे कारणही नव्हते. म्हणून सेनेने फ़ारसे मनावर घेतले नाही. पण राज्यसभेत भाजपापाशी बहूमत नाही. त्यामुळे तेव्हा तरी भाजपा मतांसाठी गयावया करील अशी सेनेची अपेक्षा असावी आणि तीच दुर्लक्षित झाल्याच्या रागापोटीच सेनेने वेगळा पवित्रा घेतला. त्याखेरीज अर्थातच आजकाल सेनेला जनपथ येथून आदेश मिळतात. त्यानुसारही ही वेगळी भूमिका आलेली आहे. पण त्याहीपेक्षा इतके वाकड्यात जाऊनही भाजपा आपल्याला साधा संतप्त प्रतिसादही देत नसल्याचे दुखणे अधिक आहे. त्यामुळे चिरडीला आल्यासारखी सेना अधिकच भरकटत चालली आहे. किंबहूना त्यातून चुका करून सेनेने आपली विश्वासार्हता गमवावी, अशीच भाजपाची अपेक्षा व खेळी आहे. कारण त्यामुळे सेनेचा चहाता वर्ग व पाठीराखा अधिकाधिक नाराज होऊन भाजपाकडे वळणार आहे. यालाच तेलगू देसम पवित्रा म्हणतात.

तिन्ही पक्षांचे नवे सरकार स्थापन करण्यापुर्वी आपल्या आमदारांची मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली. तेव्हा एक मनातले दुखणे बोलून दाखवले होते. देवेंद्र वगळता अन्य कुठल्याही वरीष्ठ भाजपा नेत्याने आपल्याशी संपर्क साधला नाही, असे त्यांनी म्हटलेले होते. म्हणजेच तसे घडले असते तर आपल्याला काही तडजोडीचा मार्ग शोधता आला असता, असेच त्यांना सुचवायचे होते. किंबहूना त्याचाच संताप अधिक आहे. मोदी शहा मातोश्रीला अजिबात दाद देत नाहीत, हे खरे दुखणे आहे. त्याचा राग काढताना जे टोक उद्धवरावांनी गाठले आहे, त्यात त्यांनी मातोश्रीचे स्थानमहात्म्यच संपवून टाकले आहे. गेल्या दोन आठवड्यात कुठे माध्यमात मातोश्री हा शब्दही झळकलेला नाही. इथेही संसदेत तेच दुखणे आहे. निदान राज्यसभेत तरी विधेयकाला पाठींबा मिळवण्यासाठी मोदी शहा संपर्क साधतील, ही अपेक्षा होती. पण तसे करण्यापेक्षा भाजपा नेतॄत्वाने सेनेशिवायच राज्यसभेत बहूमत मिळेल अशी व्यवस्था करून टाकली होती. त्यामुळे सेनेच्या तीन मतांची भाजपाला गरजच राहिली नाही. आपण इतकी कोंडी करूनही भाजपाचे नेतृत्व आपल्याशी संपर्कच करत नाही, हे दुखणे आता अधिक होत चालले आहे. त्याचे प्रत्यंतर विविध कृतीमध्ये दिसू लागले आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयकाची अंमलबजावणी महाराष्ट्रात होणार काय? हा विषय त्याच खुळेपणातून आलेला आहे. कारण हा विषय राज्याचा नसून केंद्राच्या अखत्यारीतला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असले तरी त्याविषयी इथे काहीही करू शकणार नाहीत.

राजकीय शत्रूत्व अशाही पातळीवर जाण्याची गरज नसते, जिथे तुम्ही खुळे पडत जाता आणि परिणामी निरर्थक होऊन जाता. आंध्राचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू अशाच मार्गाने वाटचाल करीत गेले होते आणि मोदी शहांनी त्यांना रोखण्याचाही प्रयत्न केला नव्हता. एनडीएतून बाहेर पडल्यावर असाच खुळेपणा चंद्राबाबूंनी केलेला होता व ममतांनी त्यांचे अनुकरण केलेले होते. त्यांनी आंध्रामध्ये सीबीआयला कुठलेही काम करण्यास व कारवाई करायला प्रतिबंध लागू केला होता. केंद्रातील पोलिस तपास यंत्रणेला राज्यात काम करताना राज्य सरकारची संमती गृहीत धरलेली असते. पण ती संमती नायडूंनी रद्द केली. पण पुढे एका प्रकरणात सुप्रिम कोर्टानेच ममतांचा कान पकडला आणि हायकोर्टाच्या आदेशामुळे आंध्रामध्ये सीबीआयला चंद्राबाबू रोखू शकलेले नव्हते. नागरिकत्वाचा विषय तर फ़क्त केंद्राच्या अधिकारातला आहे. त्याला उद्धव ठाकरे कसे रोखू शकणार आहेत? तसे केल्यास ममता बानर्जी यांच्याप्रमाणेच पदोपदी न्यायालयाचे फ़टकारे सोसावे लागतील. पण सल्लागार अर्धवटांना हे कुठे समजते आहे? ते अजून बालवर्गातील शाळेतले हेडमास्टर आहेत. त्यामुळे हातात छडी घेतल्यासारखे बडबडत असतात. पण यातला मुद्दा वेगळाच आहे. भाजपा आपल्या इतक्या टोकाच्या विरोधाला व शत्रूत्वाला हिंग लावूनही विचारत नाही, हे आता दिवसेदिवस शिवसेनेचे दुखणे होत चालले आहे. त्यातून हा खुळाचार चालू झाला आहे व वाढतोच आहे. त्याचे परिणाम दिसतील, तेव्हाच जाग येईल. पण वेळ गेलेली असेल. जशी चंद्राबाबूंची वेळ गेली आहे.

कुठल्याही लढाईत तुम्ही मजल दरमजल करीत पुढेच जाता आणि वाटेत कुठला अडथळा येत नाही, तेव्हा थांबून अंदाज घ्यायचा असतो. रान मैदान मोकळे आहे, की लावलेला सापळा आहे, जो आपल्याला सोपा वाटतो आहे? कारण अनेकदा सापळा असा लावला जातो, की वाटचाल सोपी वाटावी आणि अलगद सावजाने त्यात येऊन फ़सावे. चंद्राबाबू एनडीएतून बाहेर पडल्यावर भाजपाने वा मोदी शहांनी त्यांच्या अजिबात गयावया केल्या नाहीत. उलट ते जितके विरोधकांच्या आहारी गेले तितके जाऊ दिले. आता त्यांच्यापाशी निष्ठावान म्हणावे असे नेतेही शिल्लक उरलेले नाहीत. त्यांच्या पक्षाचे जुने अनुभवी नेतेही भाजपात दाखल झाले आहेत. चंद्राबाबू निवडणूक जिंकू शकले नाहीत, तर त्यांचा पक्ष विरघळून जाईल आणि अनेक नेते कार्यकर्ते भाजपात येतील, हाच तर सापळा होता. म्हणून नायडूंनी इतका अतिरेक करूनही भाजपाने त्यांना प्रतिसाद दिला नाही.  कारण त्यामधून नायडू आपल्याच पक्षाचा पाया खणून काढत होते आणि शिवसेना आजकाल त्यांचेच अनुकरण करते आहे. मोदी शहा किंवा भाजपाशी शत्रूत्व हा एक विषय असतो आणि शिवसेनेचे अस्तित्व हा वेगळ विषय असतो. भाजपाला धडा शिकवताना शिवसेनेचे अस्तित्वच धोक्यात आणण्यापर्यंत मजल मारली; तर भाजपाचे कुठले नुकसान होणार नाही. पण शिवसेनेला भवितव्य उरणार नाही, जसे आज नायडूंचे झाले आहे. सगळीकडून जमिनदोस्त झाल्यावर त्यांनी आपली चुक कबूलही केली आहे. पण त्यातून पक्षाला सावरून पुन्हा उभे रहायला दहाबारा वर्षे लागणार आहेत, त्याचे काय? भाजपाला मात्र ओरखडाही उठलेला नाही. तेव्हा नायडूंना हरभर्‍याच्या झाडावर चढवणारा कॉग्रेस पक्षही आता त्यांच्याकडे ढुंकून बघायला तयार नाही. सेना वेगळे काय करते आहे? पुढल्यास ठेच तर मागचा शहाणा असे म्हणतात. पण ती वस्तुस्थिती नसते ना?

32 comments:

  1. लेख छान आहे भाऊ..
    वरती वाचून मला वाटते कि थोडी चूक झाली आहे - CBI ला राज्यात लगाम लावली ती बंगाल मध्ये ममता नी , वरती चंद्राबाबू चा उल्लेख आहे..

    ReplyDelete
    Replies
    1. लेखात लिहिले आहे - "एनडीएतून बाहेर पडल्यावर असाच खुळेपणा चंद्राबाबूंनी केलेला होता व ममतांनी त्यांचे अनुकरण केलेले होते."

      https://www.indiatoday.in/india/story/mamata-banerjee-blocks-cbi-entry-west-bengal-1390242-2018-11-16

      Delete
  2. भाऊ, आपल्या राजकीय विश्लेषणाचे आम्ही चहते आहोत ते उगीच नाही, विशेषतः CAB महाराष्ट्रात लागू करणार नाही या वक्तव्यामुळे आम्हाला राग येत होता व भिती पण वाटत होती पण ती आता गेली. आपणहून सापळ्यात अडकण्याला चंद्राबाबू होणे व भाजपाच्या या पवित्र्याला तेलगू देसम म्हणायचे हे आवडले.

    ReplyDelete
  3. भाऊ खरंय.कारण जेव्हा राऊतना राज्यसभेविषयी विचारल तेव्हा ते भाजपला राज्यसभेत बहुमत नाही असं म्हणाले होते,म्हणजे त्यांना अपेक्षा होती.

    ReplyDelete
  4. देवेंद्र फडणवीस यांच्या मुलाखतींचा सार... नक्की वाचा...
    "बिहाइंड द सिन आणि बिटवीन द लाईन्स"

    https://tisarenetra.blogspot.com/2019/12/blog-post_14.html

    ReplyDelete
  5. बुध्दिबळाच्या डावात ५ ते ८ पुढचे डावाचा विचार करुन अत्ताचा डाव खेळायचा असतो, राजकरण आणी बुधदिबळ सारखेच। शिवसेनेचा पार खोल रूततो आहे

    ReplyDelete
  6. जनमत डावलून स्वार्थ साधण्याचा काय परिणाम होतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे कर्नाटकातील सत्तासंघर्ष. महाराष्ट्रातही अशी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता.

    ReplyDelete
  7. UT = ऊद्धव ठाकरे....पण आता खेदाने म्हणावे लागेल काकांनी त्यांना बनवले आहे UT = युज अँड थ्रो

    ReplyDelete
  8. 'शिवसेनेला शिकवणारे तुम्ही कोण? आम्ही तुमच्या शाळेचे principal आहोत.' इत्यादी मनोवृत्ती असलेले तुमचा ब्लॉग कधीच गंभीरपणे घेणार नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. Barobar ata faqt Shivsenela
      2 thikani shikavni
      1.Silver oak
      2.Das Janpath

      Delete
  9. भाऊ टीकाकारांनी केलेल्या टिकेकडे दुर्लक्ष करून आपले काम करत राहावे ही मूळ रा.स्व.संघाची कार्यपध्दती आहे, आज संघ समाजाच्या प्रत्येक स्तरात पोहोचला आहे काही लाख सेवा कार्ये आज संघाच्या नावावर चालू आहेत आणि विरोधक अजून नथुराम मध्ये मशगुल आहेत त्यामुळे आज संघाचा एक प्रचारक लागोपाठ दोनदा स्वतःचे बहुमत घेऊन सत्तेत आला आहे तर दुसरीकडे समाजवादी, डावे औषधाला देखील शिल्लक उरलेले नाहीत, आता शिवसेनेने जो संपादक आणि प्रवक्ता दप्तरी ठेवला आहे तो या समाजवादी मानसिकतेचा आहे त्यामुळे असे असेल तर शिवसेनेचे भवितव्य काय आहे हे समजून घ्यायला कोणत्याही भविष्यवेत्याची आवश्यकता नाही, भाऊ आपण अतिशय मार्मिक असा लेख लिहिला आहे

    ReplyDelete
  10. भाऊ नरेंद्र मोदी यांची एक कार्यपध्दती आहे, निवडणूक प्रचारातील दिवस सोडले तर ते सहसा कोणत्याही टीकेला उत्तर देण्याच्या फंदात पडत नाहीत, अरुण शौरी, यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा अशा लोकांना त्यांनी केवळ अनुल्लेखाने संपवून टाकले, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी हीच नीती अमलात आणली आहे, सत्ता गेल्यावर ते अतिशय सहजपणे विरोधी पक्ष नेत्याच्या भूमिकेत आले आहेत आणि ते देखील अतिशय सभ्य आणि सुसंस्कृत पणे त्यामुळे आक्रस्ताळेपणा करणारे सामना वृत्तपत्र आणि त्याचे संपादक हे दिवसेंदिवस उघडे पडत चालले आहेत हेच तर भाजपला हवे आहे, सर्व प्रकारची संसदीय आयुधे वापरून देवेंद्र फडणवीस सेनेच्या संसदीय राजकारणात नवख्या असलेल्या मुख्यमंत्र्यांना जेरीस आणणार आहेत त्याची चुणूक त्यांनी पहिल्या दोन दिवसात दाखवून दिली आहे इथून पुढे खरी मजा येणार आहे

    ReplyDelete
  11. असच व्हायला हवंय हेच सगळ्यांना आज मनापासून वाटतंय.

    ReplyDelete
  12. भाऊकाका, उत्कृष्ट लेख

    ReplyDelete
  13. भाऊराव,

    ही बातमी झळकली : 'कॅब'च्या मुद्द्यावर शिवसेनेशी तडजोडीला तयार; भाजपची खुली ऑफर
    https://www.timesnowmarathi.com/maharashtra-news/mumbai-news/article/devendra-fadnavis-offer-shiv-sena-ncp-congress-maharashtra-vikas-aghadi-government-formation-uddhav-thackeray-cm-politics-news-marathi-google-batmya/272452

    उपरोक्त बातमीत आशिष शेलारांचा प्रस्ताव असल्याचं म्हंटलंय. असा काही प्रस्ताव खरोखरच असेल तर मुख्यमंत्रीपद शाबूत ठेऊन उद्धव यांनी खुशाल भाजपसोबत जावं म्हणतो मी.

    हाच प्रस्ताव देवेंद्र फडणविसांनीही सादर केल्याचं इथे म्हंटलंय :
    https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/bjp-is-ready-to-compromise-with-shiv-sena-if-they-implement-new-citizenship-law-in-maharashtra/articleshow/72588978.cms

    एकंदरीत भाजपवाले गंभीर दिसताहेत. उद्धव सोबत जाणार असतील तर चांगलंच आहे. उद्धव यथोचित निर्णय घेतीलंच.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
  14. भाऊ हे तंतोतंत खरे आहे. पण ज्याला आत्मघात करायचा आहे त्याला दुसर चांगल काय सुचणार. बर त्यांच्यातल्या एका नेत्याला तर आपणच हे सरकार स्थापन केलय अशी प्रौढी आहे. सल्लागार तरी चांगले अभ्यासक हवेत.

    ReplyDelete
  15. भाऊ, एकदम परफेक्ट... विनाश काले विपरित बुद्धी अस तर नाही ना होत,माझ्यामते भाजपशी चर्चा करायला यांना सोपे गेले असते जरा इगो बाजूला ठेवला असता आणि सल्लागाराचे ऐकले नसते तर ...
    भाजप येत नाही (देवेंद्र सोडून) तर यांनी तिकडे जायला काय अडचण होती , काँग्रेस चे पाय धरण्यापेक्षा ते बरं झालं असतं ना ।।

    ReplyDelete
  16. It really pains to sympathizers of SS by d path chosen by SS.We were expecting it to b with BJP till Congress reduced to negligible force and hoping for SS to become another Hindutva party challenging d BJP.But with such a suicidal step SS will finish its own existence.There is time to correct this wrong step and join hands with BJP.

    ReplyDelete
  17. भाऊ,देशभरात बाळासाहेबांना मानणारे अनेक अमराठीजन सुध्दा शिवसेनेच्या धोरणाबद्दल आश्र्चर्य करताना दिसतात. अगदी जम्मु पासून कन्याकुमारीपर्यंत.
    चौफेर विश्वास कमवायला हयात घालवावी लागते तर घालवायला एक मुख्यमंत्रीपद पुरते.

    ReplyDelete
  18. भाऊ, शिवसेनेला आता कितीही जग आणण्याचा प्रयत्न केला तरी ती सुधारणार नाही, कारण डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे

    ReplyDelete
  19. काही अंशी सहमत! पण सेनेने जे प्रश्न उपस्थित केले होते त्यास उत्तर दिले गेले अस्ते तर् बरे झाले अस्ते Amit शाह यांनी. आणि CBI ला काम नक्कीच कारून दिले जाईल असे वाटते जर् CBI पोपटाच्या भूमिकेतून बाहेर आल्यास

    ReplyDelete
  20. एकदा का पवार साहेबांकडे सत्ता आली की ते काहीही करून तिकावतात. ह्याचा प्रत्यय 1999 साली आपण घेतलाय. सेना भाजपच्या "तुला ना मला" भांडणामुळे तेव्हा जी संधी गेली त्यानंतर थेट 2014 ची वाट पाहावी लागली. त्यामुळे चंद्रा बाबुशी तुलना काही पटत नाही. इथला लाल मातीतला पहिलवान जास्त तयारीचा आहे. आणि त्याची चुणूक त्याने 2 दिवसाचे रात्रीत बनलेले सरकार पडून दाखऊन दिली आहे. यावर मात कायची असल्यास भाजपला जनतेत जनाधार असलेला नेता हवा. फडणवीस कितीही चांगले शासक असले तरी त्यांना जनाधार नाही. हे सत्य मानायलाच हवे.

    ReplyDelete
    Replies
    1. "two is company, three's a crowd" हे लक्षात घेतले की कळेल ह्यावेळी सरकार टिकणे का अवघड आहे. मी अवघड म्हणतोय, अशक्य नाही. शिवसेना हा दोन्ही काँग्रेसच्या जातकुळीचा पक्ष नाही पण तो आघाडीतील सर्वात मोठा पक्ष आहे. १९९९ साली आघाडीला १३३ जागा मिळाल्या होत्या व त्यांना १२ जागा कमी पडत होत्या. युतीला १२५ जागा होत्या व त्यांना २० जागा कमी पडत होत्या. इतर ३० जणांपैकी १२ जणांचा पाठिंबा घेणं हे २० जणांचा पाठिंबा घेण्यापेक्षा सोपं होत. आज काँग्रेस-राष्ट्रवादीला फक्त ९९ जागा आहेत व शिवसेनेसारख्या पक्षाबरोबर तडजोड करायची आहे. शिवाय १९९९ मध्ये शरद पवार भावी पंतप्रधान म्हणवण्याइतके प्रभावशाली होते. २० वर्षांनी त्यांचा जनाधार काय आहे तो कळला. स्वबळावर ६० जागासुद्धा निवडून नाही आणता आल्या. बघू काय होतयं पुढे.

      Delete
  21. गळ्यात हार घालून खाटीक खानकडे धावत निघालेल्या बोकडला कोण वाचवू शकतो.

    ReplyDelete
  22. भाऊ आपले लेक आजपर्यंत वाचत आलो आहे... खूप छान आणि विश्लेषण आधारित असतात. पण चंद्राबाबू च्या वाटेने उद्धव याचे विश्लेषण करताना आपण 10% परिस्थिती दाखवली आहे. उर्वरित 90% चा उल्लेख नाही. चंद्राबाबू आणि bjp वेगळी झाली याचे नुकसान चांदरबाबू ना झालेच आहे. पण bjp चे काय? त्यांना भोपळा तरी फोडता आला का? ज्यांच्या जीवावर bjp तिथे होती ती आता आहे का? चांदरबाबू ना 23 सीट भेटल्या. Bjp ने तर मागील मताधिक्य ही गमावलं.

    भाऊ या लेखातून आपली पत्रकारीकता उघडी पडल्या सारख वाटतंय.... आपल्या या लेखावर bjp समर्थक आणि ज्यांना राजकीय ज्ञान थोडं कमी आहे ते खुश होतील... मात्र आपण राजकीय विश्लेषणात फोल ठरला जाताय.

    असो आपण एक आपला चाहता वाचक गमावला आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. माझा अंदाज असा आहे की भाऊंनी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही तुलना केली असावी, विधानसभेच्या नव्हे. भाजपचे अस्तित्व कर्नाटक वगळता इतर दाक्षिणात्य राज्यात नगण्य आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत आंध्र प्रदेशात चंद्राबाबूंना भाजपची साथ सोडण्यापेक्षा भाजपवर टीका करण्यामुळे जास्त नुकसान झाले जे निश्चित टाळता आले असते. मोदींनी पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांवर हल्ला केल्यावर केवळ भाजपला विरोध म्हणून त्यावर शंका घेऊन काँग्रेस व कंपूला चिकटणे चंद्राबाबूंना नडले. लोकसभेला चंद्राबाबूंनी तटस्थपणा दाखवला असता तरी जास्त जागा मिळाल्या असत्या. लोकसभेचा निकाल: वाय.एस.आर. काँग्रेस - २२, तेलुगू देसम - ३, काँग्रेस - ०, भाजप - ०. वाय.एस.आर. काँग्रेसला ५०% मते मिळाली व २०१४ पेक्षा १४ जागा जास्त जिंकल्या. तेलुगू देसमला ४०% मते मिळाली, पण त्यांनी २०१४ पेक्षा १२ जागा गमावल्या. १५ वरून ३ वर आले. भाजप २ वरून ० वर. याचाच अर्थ काँग्रेस, भाजप ह्या राष्ट्रीय पक्षांना नाकारून आंध्र प्रदेशच्या लोकांना स्थानिक पक्ष हवा होता. तेलुगू देसमने भाजपवर टीका केल्यामुळे मतदार आपसूक वाय.एस.आर. काँग्रेसकडे वळले व वाय.एस.आर. काँग्रेसला २५ पैकी २२ जागी विजय मिळाला.
      तुम्ही तेलुगू देसम २३ जागा जिंकल्याचे सांगत आहात ते विधानसभेचे. विधानसभेतही ह्याचीच पुनरावृत्ती झाली. काँग्रेस, भाजप ह्या राष्ट्रीय पक्षांना ० जागा मिळाल्या. तेलुगू देसम १०२ वरून थेट २३ वर आला. वाय.एस.आर. काँग्रेसने १७५ पैकी १५१ जागा जिंकल्या. भाजपला कोणी मत देणार नव्हते कारण तेथे भाजपचे अस्तित्वच नाही. पण भाजपवर टीका करण्यामुळे चंद्राबाबूंना सोडून लोकांनी वाय.एस.आर. काँग्रेसचा पर्याय निवडला. १/२...

      Delete
    2. मागील प्रतिसादात मी सांगितले की आंध्र प्रदेशात जनतेने लोकसभा व विधानसभा दोन्ही वेळेस फक्त स्थानिक पक्षांचा पर्याय निवडला. पण असे महाराष्ट्रात आजवर कधीही घडले नाही व जवळपास अशक्य आहे. शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे किंवा इतर स्थानिक पक्षांकडे मतांचे ध्रुवीकरण होणार नाही. त्यामुळे विधानसभेला शिवसेनेला फटका बसला नाही तरी लोकसभेला त्यांची मोठी पीछेहाट होऊ शकते. शिवसेनेला आघाडीत घेणार नाहीत. त्यामुळे फारफार तर भाजप व शिवसेनेच्या मतदारांत फूट पडून आघाडीचा उमेदवार निवडून येईल. असे घडू नये असे मतदारांना वाटले तर महाराष्ट्रात स्थानिक अस्मितेपेक्षा राष्ट्रीय अस्मितेचा विचार करून मतदार भाजपकडे वळण्याची जास्त शक्यता वाटते. भाजपला नुकसान झाले तरी ह्यात शिवसेना मोठी होत नाही.

      एखादा लेख पटला नाही म्हणून थेट "वाचक गमावला" :)) हे जरा अतीच वाटलं. असो. तुमची मर्जी. पण एक वेगळा विचार म्हणून भाऊंचे लेख वाचण्यास हरकत नसावी. २/२...

      Delete
  23. हिंदुत्वाच्या राहुटीतुन ऊंट बाहेर पडला हेही नसे थोडके!

    ReplyDelete