Monday, December 9, 2019

शिकणार्‍यांसाठीचा धडा

Image result for kumarswamy swearing in

कर्नाटक विधानसभेच्या १५ मतदारसंघात झालेली पोटनिवडणूक महाराष्ट्रातील नव्या सरकारसाठी मोठा धडाच आहे. अर्थात धडा शिकणार्‍यांसाठी असतो. ज्यांना शिकायचा नसतो, त्यांच्यासाठी त्याचा काहीही उपयोग नसतो. महाराष्ट्रात आज जे सरकार सत्तेत आहे, ते अंकगणितावर आधारलेले सरकार आहे. त्याच्यापाशी निर्विवाद बहूमत आहे. दिड वर्षापुर्वी कर्नाटकातही अशीच स्थिती होती आणि निकालानंतर एक अंकगणिती लोकशाहीचे सरकार स्थापन करण्यात आलेले होते. तिथे सिद्धरामय्यांचे कॉग्रेस सरकार निवडणूकीला सामोरे गेले होते आणि त्याच्या पाच वर्षाच्या कारभारावर जनतेने आपले मतप्रदर्शन केलेले होते. त्यात कॉग्रेसला १२० हून अधिक आमदारांवरून ७८ इतके खाली यावे लागलेले होते. याचा अर्थ कॉग्रेस पक्ष सत्तेत नको, असाच स्पष्ट कौल मतदाराने दिलेला होता. पण भाजपाला सर्वाधिक जागा जिंकताना बहूमताचा पल्ला ओलांडता आलेला नव्हता. अशावेळी तिसर्‍या क्रमांकाची मते मिळवणार्‍या जनता दल सेक्युलर पक्षालाही कॉग्रेस विरोधातील मते मिळाली होती. म्हणूनच त्यांनी भाजपासोबत जाऊन जनतेला हवे असलेले बिगर कॉग्रेस सरकार देणे संयुक्तीक ठरले असते. पण त्यांना मुख्यमंत्रीपदाचा मोह पडला होता आणि कॉग्रेसच्या निम्मे आमदार असूनही कॉग्रेसने कुमारस्वामी यांच्या जनता दल पक्षाला पाठींबा देऊन संयुक्त सरकार स्थापन करण्याचे आमिष दाखवले. भाजपाला सत्तेबाहेर ठेवणे हा त्यांचा किमान समान कार्यक्रम झाला आणि वर्षभर दोघे सत्तेत होते. यात भाजपाला काय वाटले, हा भाग वेगळा. जनतेला काय वाटले वा वाटते, त्याला महत्व असते.

आज महाविकास आघाडी स्थापन करून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदी बसवणारे शरद पवार म्हणत आहेत, की मतदाराने भाजपाला इथल्या विधानसभेत नाकारले. नेमके तेच व तसेच शब्द त्यावेळी २०१८ च्या मे महिन्यात तमाम पुरोगामी बुद्धीमंत विश्लेषक वापरत होते आणि भाजपाला सत्तेबाहेर बसवण्याचे गुणगान करण्यासाठी देशातले तमाम विरोधी पक्ष नेते बंगलोरला जमलेले होते. हात उंचावून त्यांनी मतदाराला अभिवादन केले होते. तर मुख्यमंत्री झालेल्या कुमारस्वामी यांनी दिल्लीला जाऊन राहुल गांधींचे पुण्यात्मा म्हणून गुणगान केलेले होते. मात्र काही महिन्यातच त्यांनी डोळ्यांना रुमाल लावून श्रोत्यांसमोर रडत आपल्याला कॉग्रेसने कारकुन व चपरासी बनवून सोडले असल्याचे रडगाणे गायला आरंभ केला होता. महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले उद्धव ठाकरे अजून सहा मंत्र्यांना आपापली खातीही वाटू शकलेले नाहीत. दोघांमध्ये कुठला गुणात्मक फ़रक आहे, तो प्रत्येकाने आपली बुद्धी वापरून शोधावा. पण दिड वर्षापुर्वी कर्नाटकात जे अंकगणित सोडवले गेले होते, ते फ़क्त दहा महिन्यातच तिथल्या मतदाराने पुसून टाकले. एकत्रित लढूनही कॉग्रेस सेक्युलर जनता दलाला लोकसभेच्या निवडणूकीत जमिनदोस्त करून टाकले होते. तिथून मग त्या पुरोगामी सरकारला घरघर लागली होती. मतदाराने नाकारलेल्या सरकारचा पाठींबा काढून घेण्यासाठी त्या पुरोगामी सत्ताधारी गटातून आमदारांची पळापळ सुरू झाली. एक एक आमदार आपल्या पदाचा राजिनामा देऊन भाजपात सहभागी होण्यासाठी रांग लावू लागले. त्यांना रोखण्यासाठी कॉग्रेसने सुप्रिम कोर्टापासून सभापतींचे अधिकारही पणाला लावले. पण काय हाती लागले?

खरे तर निकालानंतर एकमेकांच्या विरोधात लढलेल्या पक्षांनी एकत्र येण्याचा प्रकार नवा नाही. पण ज्या पक्षाच्या बाजूने मतदाराचा अधिक कौल आहे, त्यालाच बाहेर बसवून केलेल्या आघाड्या व युत्यांची सरकारे मतदाराने फ़ार काळ चालू दिलेली नाहीत, हा भारतीय राजकारणाचा इतिहास आहे. त्याला दडपून विश्लेषण करता येते. पण ते सत्य ठरत नाही. जेव्हा बाजी मतदाराच्या हातात येते, तेव्हा तो कुठल्याही बलदंड पक्षाला धडा शिकवित असतो. त्याचीच कर्नाटकात प्रचिती आलेली आहे. वास्तविक लोकसभा निकालानंतर कुमारस्वामी सरकार विरोधातला जनमताचा कौल स्पष्ट झाला होता आणि तेव्हाच त्यांनी सत्तेचा मोह सोडायला हवा होता. पण कसेही करून सत्तेला चिकटून रहाण्यासाठी जी लाजिरवाणी धडपड या पक्षांनी केली; त्याची किंमत आता मोजली आहे. आमदार राजिनामे देऊन बाजूला झाल्यावर त्यांना जबरदस्तीने आपल्याच बाजूला राखण्यासाठी सुप्रिम कोर्ट व सभापती पदाचे अधिकार चुकीच्या पद्धतीने वापरले गेले. तरीही विश्वास प्रस्तावाचे नाटक तीन दिवस रंगवण्यात आले. तुम्ही बहूमत गमावलेले आहे, हे जगजाहिर होते. तरी कुमारस्वामी व सिद्धरामय्या यांनी त्या प्रस्तावावर चारचार तास भाषणे करून चार दिवस सरकार टिकवले. मजेची गोष्ट म्हणजे विश्वास प्रस्तावावर विरोधी भाजपाचा कुठलाही सदस्य चकार शब्द बोलला नाही आणि चर्चा तीन दिवस चालवली गेली. हा निव्वळ बेशरमपणा व लोकशाहीची केविलवाणी थट्टा होती. ती करण्यातून कॉग्रेस व जनता दलाने जी पत घालवली, त्याचेच प्रतिबिंब ताज्या निकालात पडलेले आहे. आज भाजपाचा विजय अजिबात झालेला नाही, त्यापेक्षा तो पुरोगामी लांडीलबाडीचा झालेला दारूण पराभव आहे,

सत्ता टिकवण्यासाठी व बळकावण्यासाठी कुठल्या टोकाला जाऊन पुरोगामी लोक युक्तीवाद करतात, त्यावरचा मतदाराने व्यक्त केलेला हा राग आहे. त्यात कर्नाटकच्या मतदाराने भाजपाच्या कामासाठी पाठ थोपटली असे नक्की म्हणता येणार नाही. पण सत्तालालसा पुरोगाम्यांची इतकी नागडी उघडी पडली, की त्यांच्या तुलनेत भाजपा बरा असेच मतदाराला वाटल्याचा हा निकाल आहे. कर्नाटकात तरी जनता दल व कॉग्रेस एकमेकांच्या विरोधात लढले होते आणि दोघांना भाजपाच्या विरोधात मते मिळालेली होती. इथे महाराष्ट्रात तयार झालेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये तर भाजपाच्या सोबत महायुती म्हणून मते मागितलेल्या शिवसेनेने मतदाराच्या कौलाची थेट पायमल्ली केलेली आहे. तिथे भाजपा मोठा पक्ष असून त्याला सत्तेबाहेर बसवणारे दोघेही भाजपाच्या विरोधातले होते. इथे मतदाराला भाजपा सोबत सरकार बनवण्याचे आश्वासन देऊन लढलेली शिवसेनाच भाजपाला सत्तेबाहेर बसवण्यासाठी दोन्ही कॉग्रेसशी हातमिळवणी करून बसलेली आहे. मग उद्धवरावांनी आपल्या वडीलांना दिलेला शब्द जरूर पाळला आहे. पण कालपरवा आक्टोबर महिन्यात मतदाराला दिलेल्या शब्दाचे काय? त्याच्या विश्वासाची पायमल्ली केलेली नाही काय? तो मतदार टेलिव्हीजनच्या स्टुडीओत येऊन प्रतिवाद किंवा युक्तीवाद करत नसतो. पण प्रत्यक्ष मतदान असते, तेव्हा तो आपला हिसका दाखवतो. म्हणूनच आज निकाल कर्नाटकातील पोटनिवडणूकांचे लागलेले आहेत. पण त्यात महाराष्ट्रातील विविध पक्षांसाठी मोठाच धडा सामावलेला आहे. ती येऊ घातलेल्या भविष्याची चाहूल असते. पण कान बंद करून बसलेल्यांना आक्रोश कुठून ऐकू येणार म्हणा.

11 comments:

  1. भाऊ, बरोबर बोललात कान बंद असणाऱ्यांना आक्रोश कोठून ऐकू येणार? मी व माझ्या घरातील कमीतकमी तीन माणसे शिवसेनेचे मतदार आहोत पण आता शिवसेनेबद्दल एवढा राग येतो आहे की पुढच्या कोणत्याही निवडणुकीत सेनेला मतदान होणार नाही, कारण आम्ही युतीला मतदान केले होते पवार आणि सोनिया यांच्या विरोधात.

    ReplyDelete
  2. अगदी तसेच घडो. २०२० या वर्षातच हा अनुभव महाराष्ट्र राज्यात अनुभवायला मिळो


    ReplyDelete
  3. महाराष्ट्र मध्ये भाजप ने, सामाजिक समिकरणे ठीक ठेवली, भाषणे समतोल ठेवली, तर हे इतर विरोधक पराभूत होतील. लेखाबद्दल धन्यवाद

    ReplyDelete
  4. खूप सुंदर विश्लेषण सर. जनमत डावलून स्वार्थ साधण्याचा काय परिणाम होतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे कर्नाटकातील सत्तासंघर्ष. महाराष्ट्रातही अशी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

    ReplyDelete
  5. मार्मिक विश्लेषण भाऊ! जर् शिवसेनेने पायमालली केली असेल तर् भाजपने देखील केली आहे अजित पवार यांच्या बरोबर रात्रीस खेळ चाले करून. त्यामुळे महाराष्ट्र मधील परिस्थिती थोडी वेगळी आहे. कारण भाजप नेते सत्तेत बसण्यास किती अधीर झाले होते आणि अजूनही आहेत हे जनतेने पहिले आहे. ज्यांनी २०१४ मधे राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन,आवजी मतदानाची क्रीडा करून सत्ता मिळवली होती त्यांनी आज सेनेला दोष देवू नये । जर् video (patrakar परिषदेत)मधे दिलेला शब्द पाळला अस्ता तर् आज जनतेच्या koulaachi पायमालली झाली नस्ती

    ReplyDelete
  6. कर्नाटक पोटनिवडणुकीत जे निकाल लागले त्याचा कुठेतरी महाराष्ट्रात गेले दीड महिना जो सत्तेचा खेळ चालू आहे त्याच्याशी संबंध असावा, मतदाराने बहुमताच्या अगदी जवळ असलेल्या भाजपला एकपक्षीय कौल देऊन अस्थिरता संपवली आहे, महाराष्ट्रात भाजप त्यामानाने बहुमताच्या बराच दूर आहे पण अजून खाते वाटप न झालेल्या सरकारचा असाच कारभार चालू राहिला तर मात्र या तिघाडी पैकी कोणत्या ना कोणत्या पक्षाचे बहुसंख्य आमदार फुटून देवेंद्र फडणवीस यांचे सरकार परत आणू शकतात, खास करून शिवसेना आणि काँग्रेसचे बहुसंख्य आमदार पाच वर्षांच्या आत मतदाराला सामोरे जाण्यासाठी अजिबात तयार असणार नाहीत,फडणवीस म्हणून कदाचित कोणताही आक्रस्ताळेपणा न करता यांचा खेळ शांतपणे पहात असावेत

    ReplyDelete
  7. भाऊ, तुमचा ब्लॉग समर्पक आहे. पण ज्यांना शिकायचेच नाही, त्यांनी काय करायचे?

    ReplyDelete
  8. भाऊ,
    तुम्हीच मागे एक ब्लॉग लिहिला होतात, 'सत्तेबाहेर ची शिवसेना फोफावते' तो उद्धवजी यांना वाचायला द्या.

    ReplyDelete
  9. खरं भाऊ, मतदार यांना धडा शिकवणारच ,पण तो पर्यंत हे जो सावळा गोंधळ घालून ठेवतील त्याने महाराष्ट्र बराच मागे गेलेला असेल, अजून खाते वाटप नाही, मंत्रिमंडळ विस्तार नाही ,शेतकरी मदतीची वाट बघत आहेत ,सगळं ठप्प आहे....काय होणार काय माहीत पुढे ।।

    ReplyDelete
  10. भाऊराव,

    मतदाराच्या रागापासून वाचायचा एकंच मार्ग उद्धव यांच्याकडे आहे. तो म्हणजे आपण जंगजंग पछाडूनही सरकार चाललं नाही अशी बतावणी करणे. त्यामुळे मध्यावधीची पूर्वतयारी पक्की होईल.

    अर्थात, हे करतांना हिंदुत्वाचा मुद्दा आजिबात सोडता कामा नये. जनतेस काँग्रेस हिंदू झाल्याचा संदेश गेला पाहिजे. शिवसेना सेक्युलर झाल्याचा नव्हे. उदा. : नागरिकत्वाच्या कायद्याला राज्यसभेत केलेला विरोध हिंदूंना दुखावणारा आहे. उद्धव ठाकऱ्यांच्या हे लक्षात आलं असेल अशी आशा आहे.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete