Thursday, December 12, 2019

औट घटकेचे मुख्यमंत्री

satish prasad singh के लिए इमेज परिणाम

सतीशप्रसाद सिंग 

पाठीशी खरे बहूमत नसतानाही मुख्यमंत्री होऊन आठवडाभरात राजिनामा देणारे अडीच दिवसाचे गणपती, अशी देवेंद्र फ़डणवीस यांची हेटाळणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटिल यांनी केलेली होती. पण देशातले सर्वात कमी काळ मुख्यमंत्रीपद भूषवलेले मुख्यमंत्री कोण, याचा पत्ता जयंतरावांनाही नसावा. कारण तसे अनेकजण आहेत आणि अगदी दोन दिवसात राजिनामा द्यावे लागलेले मुख्यमंत्री कमी नाहीत. अगदी अलिकडे दोन दिवसात कर्नाटकचे मुख्यमंत्री येदीयुरप्पा यांना राजिनामा द्यावा लागलेला होता. कारण बहूमताच्या जवळ पोहोचलेल्या भाजपाला तो जादूई आकडा गाठता आलेला नव्हता. तत्पुर्वीच राहुल गांधी यांनी तिसर्‍या क्रमांकावरच्या कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रीपद देऊ करून भाजपाला रोखलेले होते. पण अपक्ष व छोट्या पक्षांना सोबत घेऊन बहूमताचा पल्ला गाठायचा प्रयास करताना येदीयुरप्पांनी नाचक्की करून घेतली. कोर्टाने हस्तक्षेप करून त्यांना दोन दिवसातच बहूमत सिद्ध करायला भाग पाडले आणि त्यांना माघार घ्यावी लागली होती. पण हा दोन दिवसांचा विक्रम त्यांचा एकट्याचा नाही. त्यांच्यापुर्वी १९९८ सालात उत्तरप्रदेशात अशा विक्रम जगदंबिका पाल यांनीही राज्यपाल रोमेश शर्मांना हाताशी धरून साजरा केलेला होता. तेव्हापासून अशा बाबतीत कोर्टाचा हस्तक्षेप ही परंपराच होऊन गेलेली आहे. मात्र औट घटकेचे मुख्यमंत्री ही परंपरा तब्बल अर्धशतकाहून अधिक जुनी आहे. योगायोग म्हणजे त्याचा आरंभ राजकारणातील साधनशुचिता सांगणार्‍या समाजवादी पक्षाकडून झालेला आहे. तिथे अवघ्या पाच दिवसाचा मुख्यमंत्री करताना जे लाजिरवाणे राजकारण झाले, त्याला इतिहासात तोड सापडणार नाही. फ़डणवीस तर त्यांच़्या पासंगालाही पुरणारे नाहीत. यात सर्वच पक्षांनी आपापल्या परीने लोकशाहीचा व राज्यघटनेतील तरतुदींचा यथेच्छ गैरवापर करून घेतला आहे. त्यामुळे कोणीही कोणाला नाक मुरडून दाखवण्याची गरज नाही.

१९६७ सालात चौथ्या सार्वत्रिक निवडणूकात बहुतेक राज्यात आघाडीच्या राजकारणाला नव्याने आरंभ झालेला होता. आपापल्या विचारधारा व तत्वज्ञान खुंटीला टांगून आघाड्या करायच्या आणि मतविभागणी टाळून शिरजोर कॉग्रेसला हरवायचे, हा त्या काळातला किमान समान एककलमी कार्यक्रम झालेला होता. आज भाजपाच्या नावाने नाके मुरडणारे बहूतांश पक्ष त्यात सहभागी झाले होते आणि तात्कालीन भाजपा म्हणजे जनसंघही त्यात समाविष्ट होता. आज चक्र उलटे फ़िरले असून, भाजपाला हरवण्यासाठी अशा आघाड्या उभ्या रहात असतात. त्या काळात बिहारमध्ये अशीच आघाडी अस्तित्वात आलेली होती आणि त्यात एकमेकांवर कुरघोडी करणार्‍या पक्षांना कुठलेही सरकार सलग वर्षभर टिकवता आलेले नव्हते. तेव्हा पक्षांतर कायदा नव्हता आणि एकदोन आमदारही फ़ोडून सत्तापरिवर्तन करणे सोपे काम होते. अशावेळी सतीशप्रसाद सिंग नावाच्या नेत्याची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली. त्याने आणखी दोन मंत्र्यांसह नव्या सरकारचा शपथविधी उरकून घेतला आणि कुठलेली महत्वाचे सरकारी काम केले नाही. त्याने फ़क्त समाजवादी पक्षाचे लोकसभेतील खासदार बिंदेश्वरी प्रसाद मंडल, यांना विधान परिषदेचे सदस्य म्हणून नियुक्त करावे,असा प्रस्ताव मंत्रीमंडळात संमत करून राज्यपालांकडे पाठवला. तो मान्य होऊन गॅझेटमध्ये छापून येईपर्यंत मुख्यमंत्रीपद उपभोगले आणि पाच दिवसांनी राजिनामा दिला. याचा अर्थ इतकाच होता, की त्याला फ़क्त एका व्यक्तीला विधान परिषदेचा आमदार बनवायलाच मुख्यमंत्रीपदी आणले गेले. ते काम संपताच ते सरकार बरखास्त झाले. मग नवे आमदार झालेल्गा बिंदेश्वरी प्रसाद मंडल यांची नवे मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आणि महिन्याभरात त्यांचीही गच्छंती व्हायची पाळी आली. मग हा सगळा उपदव्याप कशासाठी करण्यात आला होता? त्याची कहाणी भीषण आहे. ती लज्जास्पद अशी घटनात्मक कारवाई होती व आहे.

बिंदेश्वरी प्रसाद यांच्या गटाने बिहारचे राजकारण खेळलेले होते आणि खासदार असूनही मंडल यांना मुख्यमंत्री व्हायचे होते. पण आमदार म्हणून निवडून येण्याची त्यांना खात्री वाटत नव्हती. म्हणूनच आमदार नसल्याची अडचण मुख्यमंत्री झाल्यावर येऊ नये, म्हणून त्यांनी हा औट घटकेचा मुख्यमंत्री आणुन आपली आमदारकी त्याच्या माध्यमातून संपादन केली. स्वत:च मुख्यमंत्री होऊन आपलीच आमदार म्हणून नेमणुक करायचा सल्ला राज्यपालांना देणे अनुचित ठरले असते, म्हणून एका मुख्यमंत्र्याचा पाच दिवसासाठी शपथविधी उरकला गेला होता. हे मंडल म्हणजेच मंडल आयोगाच्या शिफ़ारशी करणारे गृहस्थ होत. आणखी एक गंमत याच सतीशप्रसाद सिंग यांच्याविषयी सांगता येईल. त्या काळात त्यांना मिळालेला सरकारी बंगला त्यांनी आजतागायत सोडलेला नव्हता. मध्यंतरी हायकोर्टाच्या आदेशानुसार सरकारी बंगले सक्तीने मोकळे करण्यात आले तेव्हाच हे महोदय १९६८ सालात मिळालेल्या बंगल्यातून बाहेर पडले. असो, त्याच पद्धतीने आणखी एक बिहारी मुख्यमंत्री अवघा आठवडाभर सत्तेत राहिला, त्यांचे नाव नितीशकुमार असे आहे. २००० सालात तिथल्या विधानसभा निवडणूका झाल्या तेव्हा लालूंच्या पक्षाचा नितीशची समतापार्टी व भाजपाने मिळून पराभव केला होता. पण लालूंचे हुकलेले बहूमत नितीश यांच्याही आघाडीला मिळालेले नव्हते. पण केंद्रात वाजपेयी सरकार असल्याने राज्यपालांनी नितीशना शपथ देऊन सरकार स्थापण्याला मदत केली. पण आठ दिवसातही नितीश बहूमत जुळवू शकले नाहीत आणि त्यांना सत्ता सोडावी लागली होती. मात्र त्याचा वचपा २००६ सालात काढल्यावर नितीश मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले, ती खुर्ची त्यांनी अजून सोडलेली नाही. सलग तेरा वर्षे कुठल्याही समिकरणाने सत्तेत रहाण्यात ते यशस्वी झालेले आहेत. मात्र पहिल्या प्रयत्नात अल्पायुषी मुख्यमंत्री होण्याच्या यादीत त्याचाही समावेश आहे.

याहीपेक्षा खतरनाक अल्पकालीन मुख्यमंत्री म्हणजे आजकाल तुरूंगात भ्रष्टाचारासाठी शिक्षा भोगणारे ओमप्रकाश चौटाला आहेत. १९८९ सालात देशामध्ये मोठी राजकीय उलथापालथ झालेली होती. व्ही, पी. सिंग यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या जनता दलात जुन्या लोक दलाचे ताऊजी चौधरी देविलाल यांचा समावेश होता. त्यांची उपपंतप्रधान म्हणून निवड झाली. तेव्हा ते हरयाणाचे मुख्यमंत्री होते आणि आपला वारसा पुत्राकडे सोपवण्यासाठी त्यांनी कुठलीही कसर सोडली नाही. दिल्लीतील हरयाणा भवनात राज्यपालांना बोलावून त्यांनी त्यांच्याकडे आपला राजिनामा दिला व तात्काळ आपल्या जागी ओमप्रकाश चौटाला यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधीही उरकून घेतला. त्यामुळे राजकीय जगतामध्ये मोठी खळबळ उडाली. खुप टिका टिप्पण्या झाल्या. मात्र त्यानंतरच्या काळात चौटाला यांना पोटनिवडणूकीत यश मिळाले नाही आणि हरयाणात मोठा हिंसाचार माजला होता. परिणामी चौटाला यांना राजिनामा द्यावा लागला होता. पण विक्रम वेताळाच्या कथेप्रमाणे चौटालांनी हट्ट सोडला नाही. ते अनेकदा पुन्हा पुन्हा अल्पकालीन मुख्यमंत्री होत राहिले आणि आता त्यांचेच नातू किंवा पुत्र यांच्यातल्या बेबनावामुळे लोकदल पक्ष व देवीलाल यांच्या पुण्याईची धुळधाण उडालेली आहे. त्यांचा नातू दुष्यंत चौटाला याला पवित्र करून घेत भाजपाने त्याला हरयाणाचा उपमुख्यमंत्री केले आहे. औट घटकेची सत्ता वा मुख्यमंत्रीपद अनेकांना कायम भुरळ घालत असते आणि त्यासाठी कुठलाही पक्ष व नेते आपली सर्व पुण्याई पणाला लावून वाटेल तो जुगार खेळत असतात. आपल्याकडे तीन पक्षांच्या तीन पायांची शर्यत स्विकारून शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी वेगळे काहीही केलेले नाही. शरद पवार हे सरकार टिकणार असल्याची हमी देत असल्याने त्याचे आयुष्य किती, याची शंका येणे स्वाभाविक आहे. पण सत्तेचा मोह कोणाला सुटला आहे?

१९९५ सालात उत्तरप्रदेशात मध्यावधी निवडणुका होऊन बसपा व सपा यांची युती सत्तेत आलेली होती. बसपाला प्रथमच मोठे यश मिळाले होते आणि सत्तेची चव चाखता आलेली होती. तोपर्यंत कोणाला मायावतींचे नावही ठाऊक नव्हते. आज महाराष्ट्रातील भाजपाप्रमाणेच तिथला कल्याण सिंग यांचा भाजपा सर्वात मोठा पक्ष असूनही सत्तेबाहेर बसलेला होता. त्यांनी ४०=५० आमदारांच्या बसपाला मुख्यमंत्रीपद देऊ करून आघाडी मोडायला प्रवृत्त केले. मायावती त्या मायाजालात फ़सल्या आणि त्यांनी भाजपाचा बाहेरचा पाठींबा घेऊन सरकार बनवले होते. ते कोसळलेच. पण पुढल्या काळात आणखी दोनदा मायावतींनी भाजपाच्या डळमळीत पाठींब्याने मुख्यमंत्रीपद उपभोगलेच. प्रत्येक वेळी तीच कहाणी होती. तरीही मायावतींना मोह आवरला नाही. एकदा तर अर्ध्या अर्ध्या कालखंडासाठी मुख्यमंत्रॊपदाचा प्रस्ताव तयार झाला आणि भाजपाला सत्ता देण्याची वेळ आल्यावर आघाडी फ़िसकटून गेली होती. त्याचीच पुनरावृत्ती नंतर कर्नाटकातही झाली. कॉग्रेस सेक्युलर जनता दलाचे सरकार पाडून भाजपाने कुमारस्वामींना वीस महिन्यांसाठी मुख्यमंत्री केले. नंतर भाजपाचे येदीयुरप्पा मुख्यमंत्री झाल्यावर कुमारस्वामींनी ते महिन्याभरात पाडले होते. यावेळी त्याच्या उलटी कहाणी कर्नाटकात घडली. सत्ता व मुख्यमंत्रीपदाचा मोह कोणाला होत नाही? १९७८ सालात शरद पवार त्या मोहाला बळी पडले असतील, तर २०१९ सालात अजितदादांना दोषी कशाला म्हणायचे? उत्तरप्रदेशात मायावती मोहाला बळी पडल्या तसे पवारांचे अजितदादा सत्तांतर का घडवू शकणार नाहीत? भाजपाने ३६ आमदारांच्या बदल्यात मुख्यमंत्रीपद देऊ केल्यास अजितदादा कुठलाही चमत्कार घडवू शकतात ना? तो मक्ता फ़क्त शिवसेना वा उद्धव ठाकरे वा शरद पवारांनाच कोणी दिलेला नाही. मोह देवेंद्रना होत असेल तर अजितदादांना का होणार नाही? शेवटी सगळेच राजकारणी मातीचीच माणसे आहेत. कोणी दैवी दूत नाही की साधूसंत नाही. औट घटकेसाठीही मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्यासाठी आयुष्य पणाला लावले जाऊ शकते.

12 comments:

  1. प्रत्येकाला सत्ता ही प्यारी असते .
    आणि त्यातच जर मोठं पद मिळत असेल तर ते कुणाला नको आहे.

    ReplyDelete
  2. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर देखील एकदा ही वेळ येऊन गेलेली आहे.

    ReplyDelete
  3. कलम ३७० हटवण्यामागची मोदींची मास्टर स्ट्रॅटेजि... नक्की वाचा...

    https://tisarenetra.blogspot.com/2019/12/blog-post_12.html

    ReplyDelete
  4. नेहमीप्रमाणे लेख आवडलाच. या ब्लॉगवरील प्रत्येक लेखावर प्रतिसाद लिहित नसलो तरी प्रत्येक लेख अगदी न चुकता वाचतोच.

    अशा औटघटकेच्या मुख्यमंत्र्यांमध्ये गोव्याचे रवी नाईक आणि झारखंडचे शिबू सोरेन ही आणखी दोन नावे आहेत.

    १९९०-९१ मध्ये गोव्यात अनेक घडामोडी झाल्या. अनेक पक्षांतरे झाली. त्यात रमाकांत खलप यांच्यासारख्या चांगल्या नेत्यानेही उपमुख्यमंत्रीपद मिळवून आपले हात धुऊन घेतले होते. त्यानंतर जानेवारी १९९१ मध्ये रवी नाईक मुख्यमंत्री झाले. ते मुळचे म.गो.पक्षाचे पण त्यांनी काँग्रेसमध्ये पक्षांतर करून मुख्यमंत्रीपद पटकावले. त्यांच्या पक्षांतराला विधानसभा अध्यक्षांनी वैध ठरविले पण त्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान दिले गेले आणि मे १९९३ मध्ये हायकोर्टाने त्यांचे विधानसभा सदस्यत्व पक्षांतरबंदी कायद्याखाली रद्द केले. त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. दरम्यानच्या काळात विल्फ्रेड डिसूझा मुख्यमंत्री झाले.

    रवी नाईक यांनी हायकोर्टाच्या निकालाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आणि मधल्या काळात सुप्रीम कोर्टाचा निर्णय त्यांच्या बाजूने लागला. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री म्हणून परतायचे होते. नवे मुख्यमंत्री विल्फ्रेड डिसूझा आणि राज्यपाल भानुप्रकाशसिंग यांचे अजिबात जमायचे नाही. त्यांच्यात वाद विकोपाला गेला आणि कोणत्या खाजगी संभाषणात मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांविषयी काही अपशब्द काढले हे राज्यपालांना कळले. त्यानंतर एप्रिल १९९४ मध्ये राज्यपाल भानुप्रकाशसिंग यांनी मुख्यमंत्री विल्फ्रेड डिसूझा यांना एकाएकी बडतर्फ केले आणि रवी नाईक यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली.

    राज्यपालांची ही कृती अभूतपूर्व आणि असंवैधानिक पण होती. त्यामुळे केंद्रातील नरसिंहराव सरकारने राज्यपालांना पदावरून हटविले आणि केरळच्या राज्यपालांना गोव्याचा अतिरिक्त कारभार दिला. तसेच काँग्रेस पक्षाने रवी नाईक यांना राजीनामा द्यायला लावून विल्फ्रेड डिसूझा यांना परत मुख्यमंत्री केले. या सगळ्या घडामोडी एप्रिल १९९४ च्या पहिल्या आठवड्यात दोन दिवसात झाल्या होत्या.

    तसेच झारखंडमध्ये मार्च २००५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये ८१ पैकी भाजप-जनता दल संयुक्त युतीला ३६ जागा मिळून बहुमत थोडक्यात गेले होते. त्यावेळी झारखंड मुक्ती मोर्चा-काँग्रेस आणि राजद यांची २००४ च्या लोकसभा निवडणुकांप्रमाणे युती नव्हती. या तीन पक्षांना मिळून ३३ जागा मिळाल्या होत्या. भाजप-संजद युतीला पाच आमदारांचा पाठिंबा होता म्हणजे बहुमताला लागणारा ४१ हा आकडा त्यांच्याकडे होता त्यामुळे युतीच्या अर्जुन मुंडांना मुख्यमंत्री म्हणून पाचारण करायला काही अडचण नव्हती. पण राज्यपाल सय्यद सिब्ते रझींनी झारखंड मुक्ती मोर्चाच्या शिबू सोरेन यांना मुख्यमंत्री म्हणून शपथ देऊन टाकली. त्यानंतर या पाच अपक्षांना पळवून न्यायचा प्रयत्न झाल्यावर भाजपने हे आमदार पहिल्यांदा मित्रपक्ष बिजू जनता दलाचे सरकार असलेल्या ओरिसात नेले आणि तिथून दिल्लीला थेट राष्ट्रपतींसमोर आणि मिडियासमोर आणले. त्यानंतर शिबू सोरेन यांना राजीनामा द्यावा लागला. सोरेन १० दिवस मुख्यमंत्री होते. आता देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून शपथ द्यायच्या महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या निर्णयावर टिका करणारे लोक हा इतिहास सोयीस्करपणे विसरतात. निदान कोश्यारींपुढे अजित पवारांनी दिलेले आमदारांच्या सह्यांचे (भले वादग्रस्त असेल) पत्र तरी दिले होते म्हणजे त्या निर्णयाला काहीतरी आधार होता. झारखंडमध्ये त्यापैकी काय होते? हरियाणात १९८२ मध्ये राज्यपाल गणपतराव तपासेंनी खेळलेला गेम बराच जुना झाला म्हणून समजा कोणाच्या लक्षात नसला तरी झारखंडमधला प्रकार त्यामानाने बराच अलीकडचा होता. त्याकडे सोयीस्करपणे डोळेझाक का? आणि विशेष म्हणजे राज्यपालांचा निर्णय कसा योग्य याविषयी कुमार केतकरांनी लोकसत्तात अग्रलेखही लिहिला होता. लोकांची स्मरणशक्ती कमी असते म्हणून काहीही चालून जाते त्यातला हा प्रकार. असो.

    लेखात दोन दुरूस्त्या सुचवू इच्छितो:

    १. जगदंबिका पाल यांना शपथ देणाऱ्या उत्तर प्रदेशच्या राज्यपालांचे नाव रोमेश भंडारी होते रोमेश शर्मा नाही.
    २. नोव्हेंबर २००७ मध्ये येडियुरप्पांचे सरकार कुमारस्वामींनी एका आठवड्यात खाली खेचले होते. ते महिनाभर थांबले नव्हते.

    ReplyDelete
    Replies
    1. ��������������

      Delete
  5. तुम्ही अशीच आस लावून बसा भाऊ,बकीच्यत राज्यात एक फरक आहे . तिथे ज्यांनी कोणी हे खेळ केले ते स्वतःचा बळावर. मोदिंशिवया फडणवीसांची क्षमता फार तर ३० आमदार आहे.त्यांची फक्त चाकरी करण्याची क्षमता आहे

    ReplyDelete
  6. भाऊराव,

    तुम्ही म्हणता की उद्धव यांना सत्तेचा मोह पडलाय. हे बरोबर आहे. पण एक गंमतीची गोष्ट अशी की हे तिघाडी सरकार चालावं अशी खुद्द पवारांचीच इच्छा आहे. त्यांना पैसा खायचाय. तो भाजपच्या राज्यात खाता येणार नाही. त्यासाठी शिवसेनेचाच मुख्यमंत्री हवा. हे सरकार पडलं तर पवारांचं मोठं नुकसान होईल. त्यामुळे उद्धव यांचं सरकार चालवायचं काम जिकिरीचं असलं तरी अगदीच अशक्यही नाही.

    पवारांच्या जोरावर उद्धव काँग्रेसला धमकावू शकतात. आज मध्यावधी निवडणुका घ्याव्या लागल्या तर उद्धव यांना मतदारांची सहानुभूती निश्चितंच मिळेल. त्यामुळे हे सरकार चालवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाईल असं वाटतंय.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
  7. सांप्रत विरोधीपक्षनेते सध्या विविध चॅनेल्सवर मुलाखती देत फिरत आहेत, त्याचा रिलेव्हन्स आम्हांस समजत नाही. भाऊ, तुम्ही समजावून सांगू शकाल?

    ReplyDelete
  8. भाऊ एक विचार करण्याची गोष्ट आहे की, शिवसेनेचे 56 आमदार पैकी फक्त 2 ते 4 आमदारच टीवी वर प्रसारमध्यमा समोर येत आहेत. बाकीचे सगळे कोठे लपले असावेत, घरात की त्याना लाज वाटते की आणखी काय?

    ReplyDelete
  9. संसदेत दोन्ही सभागृहात मान्य झालेल्या CAB च्या विरोधात जर काँग्रेसप्रशासित राज्यसरकारे गेली तर अशी राज्यसरकारे राष्ट्रपतींकडून बरखास्त होऊ शकतात का?

    ReplyDelete
  10. "भाजपाने ३६ आमदारांच्या बदल्यात मुख्यमंत्रीपद देऊ केल्यास अजितदादा कुठलाही चमत्कार घडवू शकतात ना?"
    बरोबर भाजापने २०१४ साली ncp चा पाठिंबा घेतला होता किं. पण असे केल्यास उरली सुरली पत् देखील जाईल. कारण आधीच रात्रीस खेळ करून आपण सत्तेसाठी काहीही करू शकतो हे दाखवले आहेच आणि असे केल्यास ३० वर्षा च्या मित्राला अडीच वर्षे देण्यास नकार मात्र अजीत साठी पाय घड्या?
    भाऊ तुम्ही भाजपच्या या फालतू stunt बद्दल कधी लीहणार आहात? किं तुम्ही सुद्धा अंध भक्त झाले आहात??

    ReplyDelete