Friday, December 6, 2019

बेशरम चर्चांचे गुर्‍हाळ

Image result for hyderabad encounter

हैद्राबाद येथील सामुहिक बलात्काराची पिडीता व तिच्यावर अत्याचार करणार्‍यांचा चकमकीतला मृत्यू; हा विषय अकस्मात राष्ट्रीय पटलावर आलेला आहे. गेला आठवडाभर मुळात ह्या गुन्ह्याचा गाजावाजा चालू होता आणि साधा गुन्हा नोंदवायलाही विलंब झाला, म्हणून देशव्यापी कल्लोळ चालला होता. आता त्याच्याही पुढे जाऊन पोलिसांनी त्या गुन्हेगारांचा खात्मा करून टाकला, तर न्यायालयीन सुनावणी व तपासकामाचे गुर्‍हाळ कशाला लावले नाही, म्हणून गदारोळ सुरू झाला आहे, एकूण काय? बलात्कारीता वा तिच्यावर अन्याय करणार्‍यांना शिक्षा, अशा कुठल्याही विषयात या चर्चेकरूंना काडीमात्र रस नसतो. त्यांना चघळायला काही खुमासदार विषय असण्यापलिकडे त्यांना अशा गुन्हे वा घटनांविषयी कसलेही कर्तव्य नसते. त्यामुळे बलात्कारीतेला सहन कराव्या लागलेल्या यातना, तिच्या आप्तस्वकीयांना सहन कराव्या लागलेले दु:ख किंवा पोलिसांना गुन्हेगारांना पकडताना करावे लागणारे कश्ट, याची कोणाला काहीही फ़िकीर नसते. त्याबाबतीत बहुतांश बुद्धीमान लोक वा चर्चा करणारे पुर्णतया बधीर असतात. मरणार्‍या कोंबडी वा बकरीच्या शिजलेल्या भाजलेल्या मांसाविषयी चविष्ट चर्चा केल्यासारख्या गप्पा म्हणूनच असे तमाम लोक या घटनाक्रमाकडे बघत असतात. त्याचीच पुन्हा एकदा प्रचिती शुक्रवारी येत होती. कोणीही बलात्कारीतेच्या वेदनांविषयी किंवा महिलांच्या सुरक्षेविषयी चकमकीनंतर बोलत नव्हता. एका बाजूला झटपट न्याय मिळाला, म्हणून मोठी लोकसंख्य सुखावली होती आणि दुसर्‍या वाजूला यात काय बेजायदेशीर आहे, त्याची चिकित्सा करणार्‍यांचा आवाज सुरू झालेला होता. समाजाच्या पावित्र्याचा व न्यायाचा आपणच मक्ता घेतलेला आहे; अशा थाटात हे लोक कायम बोलत असतात आणि नाकर्तेपणातून कर्तबगारांची निंदानालस्ती करण्यातच अवघे आयुष्य खर्ची घालत असतात. भारतीय किंवा जगभरच्या पुढारलेल्या देशात हा नवा साथीचा रोग पसरला आहे,.

कुठल्याही बाबतीत प्रत्यक्ष संकट सामोरे आल्यावर ढूंगणाला पाय लावून पळून जाणारे शूरवीर, यात प्रामुख्याने समाविष्ट असतात. सर्वत्र सर्वकाही शांत झाल्यावर आपापल्या बिळातून बाहेर येऊन, असे लोक चौकशा व तपासाचे आग्रह धरू लागतात. पण त्यांच्या साक्षीने अशा घटना व गुन्हे घडत असताना, मध्यमवर्गीय शहाणपणा सावधपणा दाखवून त्याकडे पाठ फ़िरवित असतात. मुंबईच्या बोरीवली लोकल ट्रेनमध्ये काही वर्षापुर्वी घडलेली अशीच घटना यापुर्वी मी अनेकदा कथन केलेली आहे. तिथे डोळ्यादेखत एका गुंडाने धावत्या गाडीत केलेला बलात्कार निमूट बघणारे आणि आता चकमकीवर झोड उठवणारे. एकाच माळेचे मणी असतात. घटना घडून गेली व आरोपी मधल्या स्थानकावर उतरून गेल्यावर त्या सभ्य सुशिक्षित प्रवाशांनी पोलिसात तक्रार दिलेली होती. पण प्रत्यक्ष बलात्कार होताना पाचसहा प्रवासी त्या एकट्या गुन्हेगाराला रोखायला पुढे झाले नाहीत. कायदा पोलिसांनी राबवायचा असतो आणि आपण गुन्हा घडताना प्रेक्षक म्हणून पहायचा असतो काय? त्यात हस्तक्षेप करण्याचे एक जागरूक नागरिक म्हणून आपले कर्तव्य नसते काय? त्या कर्तव्याला पारखे असणारेच अधिक तक्रार करतात. दोन वर्षापुर्वी बंगलोरच्या कुठल्या वर्दळीच्या नाक्यावर नववर्षाच्या स्वागतासाठी जमलेल्या गर्दीत टारगट पोरांच्या एका टोळक्याने मुलीशी अतिप्रसंग केला. तेव्हाही सभ्य समाज निव्वळ प्रेक्षक म्हणून बघत राहिला होता. पोलिसांनी अमूकतमूक करावे अशी बौद्धिके करणार्‍यांना त्यापैकी काय करणे शक्य होत असते? पोलिस भले काही चुक करीत असेल वा योग्यच करीत असेल. पण निदान करतो. आपल्यासारखा नाकर्ता बघ्या बनत नाही, हे अशा दिवाळखोर शहाण्यांच्या कधीच लक्षात येत नाही काय? की आपले नाकर्तेपण वा नपुंसकत्व झाकण्यासाठी हा उलटसुलट हलकल्लोळ माजवला जात असतो? बलात्कारापासून चकमकीपर्यंतचा सर्व तमाशा त्याच ढोंगीपणाचा जीताजागता पुरावा आहे.

कायदा व त्यातले शब्द निर्जीव असतात. ते अंमलात आणणारा कोणी असावा लागतो. तो अंमलदार वा पोलिसच असला पाहिजे, असे अजिबात नाही. त्या कायद्याचे प्रसंगानुसार पालन करताना प्रत्येक कायदेभिरू नागरीकच कायद्याचा अधिकारी असतो. रस्त्यावर कुठल्या मुलीची चाललेली छेड बघून परस्पर काढता पाय घेणारे सुरक्षित जागी पोहोचल्यावर शौर्याचा आव आणून बोलू लागतात. न्यायाची भाषा अगत्याने बोलू लागतात. पण जिथे त्यांच्याच हातात सभ्यता टिकवण्याची संधी असते, तिथून पळ काढतात. कुठल्याही वर्दळीच्या जागी तरूणीला छेडले जाणे, तिच्यावर एकतर्फ़ी प्रेमातून हल्ला होणे, एसीड फ़ेकले जाणे, असले प्रकार डझनावारी साक्षिदार ठेवून केले जातात. हस्तक्षेपाला कोणी पुढे येतो का? निर्भया वा आताची दिशा, यांच्याही बाबतीतला अनुभव वेगळा नाही. निर्भया निदान तासभर विव्हळत दिल्लीच्या रस्त्यावर पडलेली होती आणि बाजूने भरधाव वेगाने दौडणार्‍या एकाही वाहनाने थांबून तिला मदत करण्यासाठी पुढाकार घेतलेला नव्हता. ते काम पोलिसांवर ढकलून त्यांनाच गुन्हेगार ठरवणे, हा बुद्धीवाद झाला आहे. दोन दिवसांनंतर माध्यमातून पोलिस काय करीत आहेत, इथपासून सरकार झोपले आहे काय? असले सवाल खड्या आवाजात विचारले, मग बुद्धीमंत वा समाजसेवक म्हणून मिरवता येत असते. तिकडे बहुतेकांचा ओढा असतो. पण प्रत्यक्ष आसपास अशा घटना घडताना डोळेझाक करण्याला मध्यमवर्गिय शहाणपणा मानला जातो. सामान्य बुद्धीचे लोक त्याला दुटप्पीपणा वा शहाजोगपणा म्हणतात. अशा सभ्य लोकांपेक्षा गल्लीतला दादा किंवा गावातल्या महिलांच्या अब्रुला धक्का लागला म्हणून मुडदे पाडणारा गुंड दरोडेखोर; सामान्य माणसाला प्रेषित वाटतो. उपकारकर्ता वाटतो. एकप्रकारे तो कायदा हाती घेत असतो आणि प्रसंगी कायदा झुगारूनही महिलांना मुलींना संरक्षण देण्याचे कर्तव्य बजावत असतो. हैद्राबादच्या पोलिसांनी केले ते कायदेशीर कृत्य नसेलही. पण त्यांनी लाखो करोडो लोकांच्या मनात सुरक्षेची भावना जोपासण्याला हातभार लावलेला आहे. त्यामुळे लोक त्यांच्यावर उगाच फ़िदा झालेले नाहीत.

त्या पोलिसांनी खोटी चकमक घडवली काय? डोकेदुखी नको म्हणून त्या आरोपींना ठार मारून टाकले काय? हा मुद्दा गौण आहे. आरोपींवर गुन्हा सिद्ध झालेला नसला म्हणून ते निर्दोष असल्याचाही कुठला पुरावा कोणाला देता आलेला नाही. पण त्याच्याही पलिकडे कायदा न्यायासाठी असतो आणि लोकांना न्याय झाला असेच वाटले असेल, तर घडलेली चकमक योग्यच म्हणावी लागेल. कारण न्याय म्हणजे कायद्यानुसार झालेला निर्णय नसतो, लोकांना ज्यातून अन्याय दुर झाला असे वाटते वा अनुभूती येते, त्याला न्याय म्हणतात. त्यासाठीच कायद्याची निर्मितती झालेली आहे. जर हैद्राबादच्या चकमकीने करोडो लोकांना न्याय मिळाला असे वाटलेले असेल, तर तो न्यायच असतो. त्यात काहीही गैरलागू असू शकत नाही. त्या मुलीच्या मात्यापित्यांनी तिच्या आत्म्याला शांती मिळाली असे उद्गार काढलेले आहेत. त्याला न्याय म्हणतात. मुठभर शहाण्यांना ज्यामुळे समाधान प्राप्त होते, त्याच्याशी सामान्य माणसाला वा पिडीताला काहीही घेणेदेणे नाही. हैद्राबादच्या मुलीला मिळालेला झटपट न्याय, निर्भयाच्या कुटुंबाला सुखावून गेला आहे. आपल्या मुलीला आठ वर्षे उलटूनही कायदा न्यायालये अजून न्याय देऊ शकलेली नाहीत, म्हणून ते मातापिता व्याकुळ आहेत. कारण निर्भयाला द्यायचा न्याय समाजातील शहाण्यांच्या समाधानाचा विषय झाला आणि तिच्या कुटुंबासाठी आयुष्यभराची विटंबना होऊन बसला आहे. खालच्या कोर्टापासून सुप्रिम कोर्ट व राष्ट्रपतींपर्यंत सर्व दारे वाजवूनही निर्भयाचे खुनी बलात्कारी सरकारी पाहूणचार झोडत आहेत. बुद्धीमंत फ़ाशी योग्य की अयोग्य, यावर चर्वितचर्वण करीत आहेत. खरे बलात्कारी व खुनी पण कमी विकृत असतात. ते देहाची विटंबना करतात. बुद्धीवादी शहाणे चर्चेतून त्या अत्याचाराच्या जखमा चघळत अधिक यातनामय चिकित्सक विटंबना करीत असतात. त्याला कंटाळलेल्या करोडो लोकांना म्हणूनच हैद्राबादच्या चकमकीने सुखावले आहे. त्या पोलिसांमध्ये लोकांना आशेचा किरण दिसला आहे.

24 comments:

  1. भाऊ, इतरत्र कुठेतरी लिहिलेले, इये पण लिहितो, तुमचे मत सांगा -

    प्रश्न ते लोक मेल्याचा नाही, प्रश्न मानावाधिकारांचा पण नाही. ते लोक तसेही मरणारच होते, आज नाही तर दोन वर्षांनी. पण आजच त्यांना मरावं लागेल असे काय त्यांना माहीत होतं हा प्रश्न आहे.

    साधारण सोशल मीडिया वरती प्रतिक्रिया पहिल्या तर हे सहज समजेल की ती एन्काऊंटर फेक होती याबद्दल समर्थन करणाऱ्या एकाच्याही मनात शंका नाही.
    प्रश्न हा आहे की आपण केवळ ते मेले, त्यांना शिक्षा मिळाली म्हणून आनंद व्यक्त करून शांत बसायचे का?

    ती गोरक्षक होती वगैरे खूप पुढचे मुद्दे आहेत, ती गोरक्षक होती हे ऐकायच्या खूप अगोदर, जेव्हा मी ही बातमी ऐकली तेव्हाच यात काहीतरी काळेबेरे आहे याबद्दल माझ्या मनात खात्री होती. का?

    १. पोलीस रोज असे अनेक गुन्हे बघतात, त्यामुळे त्यांनी राग येऊन असे कृत्य केले असे होणे अशक्य आहे.
    २. अन्य कोणत्याही बाबींपेक्षा पोलीस आपल्या नोकरीची अधिक काळजी करतो, जनता जनार्दन सेवा वगैरे नंतर, पहिली नोकरी, बढती वगैरे, म्हणजेच इथे, ज्या वेळेस सगळ्या जगाला ही फेक एन्काऊंटर आहे हे कळणारे, तिथे पोलीस असा हात घालणे अशक्य.
    ३. याचाच अर्थ असा होतो की कोणीतरी वरच्या माणसाने दबाव / प्रोत्साहन देऊन जबाबदारी घेण्याची हमी दिल्याशिवाय हे कृत्य होणार नाही.

    आता प्रश्न असा आहे, की हा वरचा माणूस कोण असेल, आणि त्याने हे पाऊल का उचलले असेल?
    हे दोन प्रश्न मला सकाळपासून छळतायत. मानवाधिकार वगैरे गेले चुलीत, पण या प्रकरणात या लोकांचा बळी देऊन कोणाला वाचवायचा तर प्रयत्न होत नाहीये ना?

    ती गोरक्षक होती का हे मला माहीत नाही, असेल तर कदाचित या प्रकाराला धार्मिक रंग असू शकतो. प्रत्यक्ष गृहामंत्र्याने या प्रकारची पाठराखण करणे हे या सगळ्या प्रकरणाची गुंतागुंत वाढवणारे आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. ती तरुणी गोरक्षक होती आणि अश्या तत्सम वावड्या विनाकारण उठवणे यातून त्या तरुणीचे हाल आणि चारित्र्यहनन मृतयूनंतरही संपले नाही हेच दिसते. फक्त, आता ही जबाबदारी आरोपींनी नाही तर इतरांनी घेतली आहे.

      हे लक्षात घ्या की पीडित तरुणी "Vet" म्हणजे पशुरोगतज्ज्ञ होती. म्हणजे जनावरांच्या रोगांवर उपचार हा व्यवसाय असताना तिने गायी, शेळ्या, मेंढ्या, कुत्री-मांजरे इतकेच नव्हे तर डुकरे आणि कोंबड्या यांचे इलाज पण केले असणार. ह्यावरून तिला गोरक्षक ठरवणे (किंवा इस्लाम-विरोधी ठरवणे), ह्यासारखा बिनडोकपणा दुसरा नसेल. पण दुर्दैवाने ज्यांच्या हातात सोशल मीडिया आहेत त्यांना इतके साधे भान राहिले नसावे, किंवा ह्या माहितीचा हेतुपुरस्सर विपर्यास करून ह्यातून घाणेरडे राजकारण करण्याचा हेतू दिसतो. थोडक्यात, इतर बलात्काराच्या घटनांमध्ये जे दिसते तेच इथे दिसते -- पीडितेला न्याय मिळवून द्यायचा हेतू दुय्यम आणि स्वतःचा राजकीय लाभ करून घ्यायचा हेतू प्राथमिक.

      Delete
  2. भाऊ, मर्मभेदी विश्लेषण. जंजीर चित्रपटापासून अभिताभ प्रेक्षकांचा नायक बनला तो याच कारणामुळे की जितल्यातिथे न्याय. निर्भयाच्या केस मध्ये आरोपीनी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला आहे आणि तो पेंडीग आहे. मुळात गुन्हा पुराव्यानिशी गुन्हा न्यायालयात सिद्ध झाला आणि फाशीची शिक्षा झाली मग राष्ट्रपतींकडे दयेच्या अर्जाची तरतूद कशासाठी? या क्रूरकर्म्यांकडे निर्भयाने दया मागितली नसेल? नक्कीच असणार अगदी हातापाया पडली असेल पण यांना दया आली नाही मग यांना दया मागायचा हक्क काय आहे? जर राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज मंजूर केला व शिक्षेत बदल झाला तर निर्भयाच्या न्यायाचे काय? आपल्याकडचे विचारवंत हे नेहमी जनमताच्या विरुद्धच विचार करतात, म्हणून तर अफजलसाठी मध्यरात्री न्यायालय उघडण्यापर्यंत मजल गेली, यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार?

    ReplyDelete
  3. आर्थिक मंदी रोखण्याचा मोदींचा मास्टरप्लॅन... नक्की वाचा.

    https://tisarenetra.blogspot.com/2019/12/blog-post.html

    ReplyDelete
  4. भाऊ, तुमची बुध्दी अतिशय नेमकेपणाने लक्ष्यवेध घेत आहे ,

    ReplyDelete
  5. खरे बलात्कारी व खुनी पण कमी विकृत असतात. ते देहाची विटंबना करतात. बुद्धीवादी शहाणे चर्चेतून त्या अत्याचाराच्या जखमा चघळत अधिक यातनामय चिकित्सक विटंबना करीत असतात.

    Completely agree...

    ReplyDelete
  6. अगदी सर्व सामान्यांच्या मनातील विचारच भाऊ आपण मांडले आहेत.सो कॉल्ड व्हाईट कॉलर वाले नुसतेच चर्चेचे गुऱ्हाळ लावतात.आता tv वाले trp साठी चर्चेची गुऱ्हाळे चालू करतील आणि सोकॉल्ड बुद्धीमंत आपल्या अकलेचे तारे तोडताना दिसतील.सर्वांनी अश्या चॅनल वर बहिष्कार घातला पाहिजे.

    ReplyDelete
  7. This is giving wrong message for other similar cases, will go on way of gangajal movie. Everyone start saying do encounter for all such cases, put pressure on police and political leaders.

    ReplyDelete
  8. आपली दळभद्री वेळखाऊ न्यायपालिका न्याय देऊ शकत नाही.

    ReplyDelete
  9. जिवित तर दानव व मेला की मानव असे चाललंय

    ReplyDelete
  10. भाऊ, with all due respect, आपल्याकडून ह्या लेखाची अपेक्षा नव्हती. आपल्याला कायदेकानू आणि त्याबद्दलचे ज्ञान आहे, पण ह्या बाबतीत आपल्याशी सहमती दाखवणे अवघड वाटते. खरोखरच हे पोलिसांनी सर्व प्रकारावर पडदा घालण्यासाठी केलेले कृत्य कशावरून नसेल? आता तर ही केसच बंद झाली ना? म्हणजे कुठलाही गुन्हा घडून त्याचे देशव्यापी पडसाद उठतात आणि पोलीस आणि न्यायव्यवस्थेवर दडपण येऊ लागते तेव्हा त्या कटकटीतून सुटका म्हणून पोलीस कुणालाही पकडून, जबरदस्तीने जबानी मिळवून नंतर त्यांना एन्काऊंटर मधून मारून टाकू शकतात. हे कितपत योग्य आहे? म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो, ही म्हण आपल्याला लक्षात असेलच. पुन्हा, लोकशाही म्हणजे फक्त मतदानाचा हक्क नाही, प्रत्येकाला न्यायाचा हक्क आहे आणि तसा तो आरोपीना पण आहे.

    ह्याची दुसरी दुर्दैवी बाजू अशी की आज आपल्याकडे बलात्कारी गुन्हेगारांच्या मानसिकतेचा अभ्यासही पुरेसा झालेला नाही. ह्या विषयावरचे सर्व ज्ञान हे अमेरिकेत केलेल्या अभ्यासावरून मिळवलेले आहे. अमेरिकेत लोकांचा लैंगिकतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि तिथली समाजव्यवस्था आणि ह्या अश्या इच्छापूर्तीचे मार्ग हे भारतातल्यापेक्षा कितीतरी भिन्न आहेत, तेव्हा अमेरिकेत ज्या हेतूने आणि भावनेने गुन्हे होतात त्या भावनेने भारतात होत नाहीत आणि ह्या बाबत स्वतंत्र अभ्यास जरुरीचा आहे. पण जर गुन्हेगारांना मरून टाकायचे धोरण अवलंबले तर कसा काय होणार हा समाजाचा अभ्यास? मग कसे कळणार की हे गुन्हे का होताहेत ते, आणि कसे कळणार की हे गुन्हे थांबवायचे कसे?

    अगदी अट्टल दहशतवादी गुन्हेगारांना सुद्धा कित्येकवेळा जिवंत पकडून आणण्याचे आदेश दिले जातात. ह्याचे कारण म्हणजे त्यांच्याकडून गुन्ह्यासंबंधी दूरगामी माहिती मिळण्याची शक्यता असते. सरकारी पाहुणचार वगैरे शब्दप्रयोग खूपच उथळ आहेत.

    ReplyDelete
    Replies
    1. अभ्यास करण्यासाठी तुमच्याकरीता निर्भया केस मधिल आरोपी वाट पाहत आहेत, त्यावर तुमची पी एच डी करून घ्या.

      Delete
  11. सर्वसामान्य लोकांना जे वाटले तेच तुम्ही निर्भीडपणे लिहिले. उज्ज्वल निकम यांचे वक्तव्य ऐकून म्हणावेसे वाटते... निकम तुम्ही सुद्धा?
    बलात्कारीतेच्या शारिरीक, विशेषतः मानसिक जखमा काळच्या ओघात जराशा भरून येण्याच्या सुमारास खटला चालू करतात इतक्या विलंब कायद्याच्या नावाखाली केला जातो... आरोपी मजेत असतो तर पिडीत व्यक्तीला भयानक प्रसंगाचा पुनरुच्चार करायला लावणारे प्रश्न विचारले जाऊन मानसीक छळवाद मांडला जातो हे माहीत असूनही निकम यांचे हे वक्तव्य अपेक्षित नव्हते.

    ReplyDelete
  12. उशिरा होणारा न्याय हा एक प्रकारचा अन्यायच ...
    सज्जनार नी एक नंबर कामे केले

    ReplyDelete
  13. या विषयावर मला एक घटना आठवते. मागे 2004 साली नागपुरमध्ये अक्कू यादव नावाचा गुंड स्थानीक महिलांवर बलात्कार करत असे. त्याला पोलिसांनी पकडले होते. त्याच्या जामिन अर्जावर सुनावणीसाठी त्याला न्यायालयात आणले जात होते. ही बातमी सर्वत्र पसरली. अनेक शंभरच्यावर महिला जमा झाल्या. त्याने पिडलेल्या एका बलात्कारीत बाईला बघून तो सर्व पोलिस आणि वकिलांच्या समोर ओरडला की तुझ्यावर परत बलात्कार करीन. तिने चपला घेऊन त्याला बडवायला सुरुवात केली. त्यापुढे इतर बायकांनी कोर्टाच्या आवारातच त्याच्यावर मिरची पावडर फेकली आणि त्याच्यावल भाजी कापायच्या सुरीने हल्ला केला. त्यात अक्कू यादवचा मृत्यू झाला. तेथील प्रत्येक बाईने सांगितले की या कृत्यात त्या सहभागी होत्या. त्यांना अटक केली. पुराव्याच्या अभावी त्या सर्वांना निर्दोष सोडले.

    मला समजत नाही त्या अशिक्षीत महिलांचा उल्लेख अशा बाबतीत का केला जात नाही.

    ReplyDelete
  14. Judicial system is solely responsible for this scenario. Parallel judicial system already emerged in India. People are trusting Local gundas than judicial authority. Many curopt police officers are also acting as mediator in all sort of crimes. If current judicial system not changed it will surely demolished Indian democracy also

    ReplyDelete
    Replies
    1. Correct analysis. Justice delayed is justice denied. The rapists in Nirbhaya case are still not punished and does not look like it will happen anytime soon, so people have lost faith in judiciary. Even the police have lost faith in judiciary. Judicial system in India is completely broken already, as you can see from the crimes rising and criminals getting bail so that they can commit crime again (the recent example is Unnao).

      Delete
  15. हा मुद्दा गौण आहे. आरोपींवर गुन्हा सिद्ध झालेला नसला म्हणून ते निर्दोष असल्याचाही कुठला पुरावा कोणाला देता आलेला नाही.
    हा मुद्दा गौण नाही . जनतेने कायदा हातात घेणे जसे अयोग्य तसेच पोलिसांनी शिक्षा करण्याचे न्यायालयाचे काम स्वतःकडे घेणे चूकच आहे .अपराधी निर्दोष असल्याचा पुरावा कोणी दिलेला नाही हे खरे पण त्यांच्या अपराधी असण्याचेही पुरावे अजून सादर व्हायचे होते आणि ते सादर करणे ही ज्यांची जबाबदारी त्यांनी ती पार पाडण्याआधी/पाडण्याऐवजी पकड्लेल्याना आपणच मारून टाकणे हे कोणत्याही प्रकारे समर्थनीय नाही. पोलिसांची प्रतिमा तुम्ही त्यांची बाजू घेऊन तावातावाने त्यांच्या बेकादेशीर कृत्याचे समर्थन करावे एवढी चांगली निश्चितच नाही. तथाकथित बुद्धिवादी लोकांची तुम्हाला चीड आहे म्हणून तुम्ही ही भूमिका घेत आहात असे वाटते आणि याचा खेदही होतो .

    ReplyDelete
  16. जर ही बघ्यांची गर्दी गुन्हे घडताना प्रतिक्रिया देऊ लागली तर गुन्हे होणारच नाहीत.

    ReplyDelete
  17. भाऊ गुन्हा होताना या दिडशहाण्यांचा(यात मीपण) पळपुटेपणा मला माहित आहे.पण याचा अर्थ असा नही की नुसता आरोप असलेल्याना गोळी घालून ठार करने.निदान पूर्ण चौकशी तरी झाली पाहिजे.असेच जर् कठुआ केस मध्ये केले असते तर निर्दोष विशाल जंजोत्रा आज जिवंत नसता.भले हजार अपराधी सुटले तरी बेहत्तर पण एक निर्दोष फसला नाही पाहिजे,हेच आपले ब्रिदवाक्य आहे.

    ReplyDelete
  18. तुमचे विचार आवडतात आणि पटतात देखील पण हा लेख नाही पटला. ज्यांना मारले त्यांच्याबद्दल सहानुभूती नाही, ते मरायलाच पाहिजे होते पण जो मार्ग निवडला तो चुकीचा होता. प्रत्येक ठिकाणी पोलिसांनी अशी कारवाई केली तर अराजकता माजेल, याचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो. न्यायालयात वेळ लागतो कारण गुन्हेगारांना वाचवणारे कायद्यातील पळवाटा शोधतात.

    ReplyDelete