Wednesday, October 7, 2015

बोलेगा तो बोलोगे के बोलता है



उत्तर प्रदेशच्या गौतमबुद्ध नगर जिल्यात दिल्लीलगत दादरी नावाचा एक मोठा दाट वस्तीचा प्रदेश आहे. तिथे एका वस्तीत अखलाख महंमद नावाच्या मुस्लिम व्यक्तीच्या घरावर हिंदू जमावाने हल्ला केला आणि मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. त्याच्यासह कुटुंबालाच मारहाण झाली होती व त्याचा पुत्र दानिश इस्पितळात उपचार घेत आहे. ज्याचा सुपुत्र देशाच्या हवाई दलातून देशाच्या सुरक्षेसाठी संघर्षरत आहे, अशा व्यक्तीची अशी जमावाकडून अमानुष हत्या खरोखरच शरमेची गोष्ट आहे. त्याची ग्वाही हवाई दलाचे प्रमुख समोर आले आणि त्यांनी दिली. यापेक्षा अधिक अपेक्षा करण्यात अर्थ नाही. कारण कुठल्याही निकषावर घडलेल्या कृत्याचे समर्थन होऊ शकत नाही. ही त्या घटनेच्या संदर्भातील एक बाजू झाली. त्याची दुसरी बाजू तितकीच हिडीस आहे. लगेच अशा दुर्घटनेचे भांडवल करण्यासही अनेकजण पुढे आलेले आहेत. देशात भाजपाचे सरकार असल्याने हिंदूत्वाच्या उन्मादातून अशी घटना घडल्याचे सिद्ध करणारे युक्तीवाद त्याचे पुरावे आहेत. जेव्हा अशाप्रकारे एका हत्याकांडाचे राजकारण सुरू होते, तेव्हा मग बचावाची दुसरी बाजू तयार होत असते. योगायोगाने ही दुसरी बाजू तितकीच हिडीस आहे. त्यांना मृत्यूमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकाच्या वेदना यातनांशी कसले कर्तव्य नसते. कारण आज ते हत्येसाठी हळवे झालेले असतात आणि कठोर शिक्षेची मागणी करीत असतात. पण उद्या परिस्थिती भिन्न असेल तर कठोर शिक्षा म्हणजेच अमानुषता असाही दावा करीत असतात. कालपरवा तसलाच युक्तीवाद करून याकुब मेमनसाठी आक्रोश करणारेच आज कठोर शिक्षेची भाषा वापरताना दिसतात, त्याला राजकारण म्हणतात. एकीकडे गुन्हेगाराचा जीव त्यांना मोलाचा वाटतो आणि दुसरीकडे बळी पडलेल्याचा जीवही मोलाचा वाटतो. यातली गफ़लत लक्षात घेतली पाहिजे.

असो, राजकारणाचा दुसरा भाग मग याकुबसाठी कोण टाहो फ़ोडत होता, अशा विचारण्याने सुरू होत असतो. कारण ज्यांना हत्याकांड समर्थनीय वाटलेले नाही, त्यांच्याही बाबतीत केवळ एका राजकीय विचारांचे असतील म्हणून आरोप होतात, तेव्हा त्यांना बचावाचा पवित्रा घेत नसत्या गोष्टी उकराव्याच लागतात. एका खुनाचे समर्थन दुसर्‍या हत्येने होत नाही. पण अन्य कुठल्याही निकषावर मानवी हत्येला पाठीशीही घालता येत नाही. तसे होऊ लागले, मग आपोआप हत्येच्या समर्थनाचे विविध युक्तीवाद  निर्माण होत असतात, पुढे केले जात असतात. पण तेवढ्या दोनच बाजू अशा राजकारणाला नसतात. त्यापासून संपु्र्ण अलिप्त असलेले काही लोकही अगदी साळसूदपणे अशा हत्याकांड व दुर्घटनेचे राजकारण कराण्याचे उद्योग करत असतातच. त्याचे उदाहरण म्हणून आपण अडगळीत पडल्याने व्यथित असलेल्या लालकृष्ण अडवाणी यांच्या ताज्या वक्तव्याकडे बघू शकतो. एका पुस्तकाच्या प्रकाशन समारंभासाठी गौतमबुद्ध नगर येथे आलेले असताना अडवाणी यांनी केलेले वक्तव्य अत्यंत निंदनीय असे आहे. दादरीबद्दल आपण प्रामाणिक मत व्यक्त केले तर ते अटलजींना आवडणारे नाही, म्हणून आपण त्याविषयात काही बोलणार नाही, असे अडवाणींनी म्हटले आहे. काहीही नेमके न बोलता त्यांनी खुप काही बोलून टाकले आहे. आजचे मोदी अरकार तोकडे पडते आहे चुकले आहे, असेच त्यांना म्हणायचे आहे. किंबहूना दादरीची घटना हे मोदी सरकारचे अपयश आहे, असेच वेगळ्या शब्दात अडवाणींनी सांगितले आहे. पक्षांतर्गत त्यांचा जो कोंडमारा झाला आले, त्याला वाचा फ़ोडण्यासाठी इतक्या वयस्कर नेत्याने अशी दु:खद घटना वापरावी, हे म्हणूनच निंदनीय आहे. आपल्या अनुभव आणि वयाला शोभणार नाही असे अडवाणींचे हे कृत्य आहे. अर्थातच मागल्या तीन वर्षात त्यांनी अनेक अशोभनीय कृती केल्याने यात थक्क होण्यासारखे काही नाही.

अटलजी दहा वर्षापुर्वीच कृतीशील राजकारणातून निवृत्त झाले आहेत आणि आजची त्यांची प्रकृती घडामोडी समजून घेण्याच्या पलिकडे गेलेली आहे. आपल्याला भेटायला कोण आले वा काय म्हणाले, त्याचेही आकलन होण्याच्या अवस्थेत अटलजी नाहीत. तेव्हा अडवाणी काय म्हणाले वा त्याचा अर्थ काय होतो, त्याच्याशी अटलजींना कर्तव्य असू शकत नाही. पण त्यांना आवडणार नाही, असे म्हणत आजचे मोदींचे भाजपा सरकार जे काही करते आहे, तेही अटलजींना आवडणारे नाही, असेच अडवाणी सूचवत आहेत. ते आपल्याच अधिकारात सांगायची त्यांच्यामध्ये हिंमत राहिलेली नाही. म्हणून मग आपल्या मनातली धुसफ़ुस त्यांनी अटलजींच्या नावावर खपवण्याचा उद्योग यातून केला आहे. म्हणजे एका बाजूला अखलाखच्या मृत्यूचा वापर आणि दुसरीकडे अटलजींच्या अलिप्ततेचे भांडवल अडवाणी करतात, हे त्यांच्या वयाच्या व त्यांच्या अनुभवाच्या राजकारण्याला शोभादायक नाही. तसे बघितले तर तीन वर्षापुर्वी गोवा येथील पक्ष अधिवेशनात मोदींना प्रचारप्रमुख बनवण्यापासून अडवाणी अडथळा बनून राहिले होते. आपली मोदींविषयीची असूया व्यक्त करण्याचे नानाविध हास्यास्पद मार्ग त्यांनी अवलंबून बघितले. पण त्याचा उपयोग झाला नाही. सर्व पदांचे राजिनामे देण्यापासून पक्ष व्यक्तीगत महत्वाकांक्षेचा शिकार होत असल्यापर्यंत अनेक तक्रारी त्यांनी करून उपयोग झाला नाही. अखेर पक्षाचे सरकार सत्तेत येऊन आपले शिव्याशाप निरूपयोगी ठरल्याचा अनुभव घेतल्यावरही अडवाणींना असूयेच्या मनोभूमिकेतून बाहेर पडणे शक्य झालेले नाही. चरफ़डत रहाणे त्यांच्या नशिबी आले आहे. ताजे वक्तव्य त्यातूनच आलेले आहे. मात्र जो राग संताप वा आक्षेप आहे, तो आपल्या अधिकारात व्यक्त करण्याची जेठमलानी यांच्यात असलेली साधी हिंमत अडवाणी दाखवू शकत नाहीत. म्हणून ते अधिक केविलवाणे भासतात.

यातून अडवाणी काय साध्य करतात तेही समजत नाही. वाढलेले वय आपल्याला भीष्माचार्य ठरवण्यापर्यंत गेले आहे याचे भान नक्कीच आहे. मात्र त्यानुसार नव्या पिढीला आशीर्वाद देण्यातून सन्मान मिळवण्याची समज त्यांच्यापाशी दिसत नाही. अजून ते गुडघ्याला बाशींग बांधलेल्या नवरदेवासारखे लुडबुडत असतात. भीष्माचार्य म्हणून मिरवायचे असेल तर सत्तेपासून अलिप्त रहाण्याचा मनोनिग्रह आवश्यक असतो. त्याचा मागमूस त्यांच्यात आढळत नाही. उलट मोदी खुलेआम आपल्या विरोधात बोलत नाहीत, याचा गैरफ़ायदा घेण्याकडे अडवाणींचा कल आहे. पण मोदींना असे राजकारण नवे नाही. केशूभाईंना एकही अपशब्द सोडा टिकेचा शब्द न उचारता, मोदींनी सहज बाजूला सारले. अगदी केशूभई अखेरच्या काळात उघड मोदी विरोधात शड्डू ठोकून उभे राहिल्याने काहीही फ़रक पडला नव्हता. हे उदाहरण अडवाणींना समजू शकले असते, तर त्यांनी खुप आधीच दिलखुलास पाठींबा देऊन मोदींच्या यशाचे श्रेय आपल्या पदरात पाडून घेण्य़ाचा मोठेपणा मिळवला असता. पण लहान मुलाप्रमाणे मतदारसंघासाठी रुसून बसण्यापासून अनेक तमाशे करीत अडवाणींनी आजवरची आपली प्रतिष्ठा धुळीस मिळवली. मात्र इतके होऊनही अपमानास्पद वाटेल असा एकही शब्द मोदींच्या तोंडून निघालेला नाही. श्रद्धा व सबुरी हे गुण मोदींमध्ये ठासून भरलेले आहेत. त्याच्याशी अडवाणी म्हणूनच सामना करू शकलेले नाहीत. तर मोदींना शह काटशह देण्याची बाब खुप दूरचा पल्ला आहे. आपल्याच अशा जंजाळात फ़सून अडवाणींनी स्वत:ला संपवावे अशी मोदींची चाल असून याप्रकारचा बोलघेवडेपणा करून अडवाणींचे मोदींचा डाव यशस्वी करीत असतील, तर मोदींनी त्यांची फ़िकीर कशाला करावी? त्यांची दखल तरी कशाला घ्यावी? बोलणार नाही, हे सांगण्यासाठीच पुन्हा बोलणार्‍याला कोणी काय बोलावे? बोलायला जागा उरते काय?

3 comments:

  1. UP सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या विषयात मोदी बोलले काय किंवा न बोलले काय , काय फरक पडतो ??? ती त्यांची जबाबदारी नाही, त्यांच्या अधिकारात ही हा विषय येत नाही

    ReplyDelete
  2. Bhau tumche vishlestion akdam mast

    ReplyDelete