Wednesday, October 21, 2015

‘गुंड’ शिवसेनेशी पुरोगाम्यांची चुंबाचुंबी



स्थापनेपासूनच शिवसेना हा उडाणटप्पू तरूणांचा जमाव किंवा झुंड अशी टिका होत आली आहे. सहाजिकच कालपरवा पाकविषयक भूमिकेतून सेनेने ज्या गोष्टी केल्या, त्यावरून उठलेल्या प्रतिक्रीयांमध्ये नवे असे काहीच नाही. हुल्लड वा घुडगुस हे शब्द शिवसेना पहिल्या दिवसापासून स्विकारत आलेली आहे. त्याखेरीज सेनेवर बंदी घालण्याचेही प्रस्ताव नवे नाहीत. सवाल इतकाच आहे, की अशा विषयावर आपले पावित्र्य मांडायला जे लोक धावतात, त्यांनी निदान आपल्या वागण्यातून सोवळेपणा दाखवायला हवा ना? मगच त्यांच्या वक्तव्याला वजन येऊ शकेल. शिवसेनेच्या गुंडगिरी विरोधात आजवर ज्यांनी आवाज उठवला आहे, त्यांनीही संधी मिळाली व शक्य असेल तिथे तितकीच हिंसा वा गुंडगिरी करून दाखवली आहे. त्यात आता आम आदमी पक्षाची नव्याने भर पडली आहे. लोकसभा निवडणूकीच्या कार्यक्रमाची घोषणा झाली, तेव्हा ‘आप’प्रमुख अरविंद केजरीवाल गुजरातचा दौरा करीत होते. तात्काळ आचारसंहिता लागू झाल्याने त्यांच्या गाड्यांचा ताफ़ा तिथल्या पोलिसांनी रोखला आणि कारवाई केली. त्यानंतरचा घटनाक्रम कोणाला आठवतो काय? तासाभरात दिल्लीतल्या भाजपा कार्यालयाच्या दारात एक टोपीधारी झुंड येऊन उभी ठाकली आणि मोदी व भाजपाच्या विरोधात घोषणाबाजी सुरू झाली. आधी नुसत्या घोषणा देणारा हा जमाव, अल्पावधीतच इतका हिंसक झाला, की मिळतील ते दगडधोंडे विटांचा मारा भाजपाच्या कार्यालयावर होऊ लागला. तिथे गेटच्या भितीवर चढून त्याचे नेतृत्व आशुतोष नावाचा माजी पत्रकार करीत होता. अगदी कुंड्याही फ़ेकल्या गेल्या. अशा पक्षाने शिवसेनेवर बंदी घालण्याची मागणी करावी, याला विनोद म्हणायचे की दुसरे काय? आपल्या नेत्याला गुजरातमध्ये रोखले गेल्यावर दिल्लीत दंगल माजवणार्‍यांनी, शिवसेनेला दंगलखोर ठरवून बंदीची मागणी करावी का?

एकूणच देशातील राजकारण, बुद्धीवाद वा सामाजिक क्षेत्रात किती छछोरवृत्ती बोकाळली आहे, त्याची प्रचिती सध्या येत आहे. शिवसेना निदान पावित्र्याचा आव आणत नाही. पण प्रत्येकवेळी राजघाटावर जाऊन गांधी समाधीसमोर मौनाचे नाटक रंगवणारे इतक्या थराला जातात, तेव्हा लोकांना गुंडगिरी आवडली तर नवल नाही. गांधीं वा अन्य कुणा महात्म्याच्या नावाने गळा काढायचा आणि गुंडगिरीही करायची, यापेक्षा सरळ गुंडगिरीचा पवित्रा निदान अधिक प्रामाणिक असतो. या निमीत्ताने थोडा जुना राजकीय इतिहासही सांगण्याची मग गरज वाटते. शिवसेना आरंभापासून अशीच आहे. पण तिच्या गुंडगिरीला राजकीय मान्यता व सन्मान देण्याचे पहिले पाप कोणी केले? त्या काळात कम्युनिस्टांकडून सतत मार खाणार्‍या प्रजा समाजवादी पक्षाला लाल बावट्याशी दोन हात करणारे ‘गुंड’ हवे होते आणि नव्याने आकार घेत असलेल्या शिवसेनेत तशाच तरुणांचा भरणा होता. म्हणूनच प्रा. मधू दंडवते यांनी सेनेला हाताशी धरले. १९६८ ही शिवसेनेने लढवलेली पहिली पालिका निवडणूक! त्यामध्ये शिवसेनेला सोबत घेऊन युती करणारे होते मधू दंडवते! तेव्हाही सेनेवर वसंतसेना असा आरोप व्हायचा आणि आजही त्याची आठवण करून दिली जाते. पण समाजवादी लोकांनी सेनेशी हातमिळवणी करण्याचे महत्वाचे कारण कम्युनिस्टांची आक्रमकता हेच होते. कृष्णा देसाई वा तत्सम हुल्लडबाजी करणार्‍या कम्युनिस्ट कार्यकर्त्यांशी समाजवादी दोन हात करू शकत नव्हते. त्यासाठी शिवसेना उपयुक्त होती आणि म्हणून ती गुंड नव्हती. आज कम्युनिस्ट व समाजवाद्यांना एकत्रित पुरोगामी संबोधले जाते. पण पाच दशके मागे गेलात, तर कम्युनिस्ट सुद्धा गुंड असल्याचे दाखले समाजवाद्यांच्या तेव्हाच्या वक्तव्ये व विधानातून मिळू शकतील. याचा अर्थ इतकाच, की सोयीचे असेल तेव्हा गुंड लढवय्ये असतात आणि गैरसोय होऊ लागली मग नुसतेच गुंड असतात.

इतक्या जुन्या कालखंडात ज्यांना जायचे नसेल, त्यांनी अलिकडल्या म्हणजे ३० वर्षापुर्वीच्या राजकीय घडामोडी तपासून बघायला हरकत नाही. तेव्हा सोवियत दौरा करून आलेल्या ‘नवाकाळ’ संपादक निळूभाऊ खाडीलकरांनी ‘प्रॅक्टीकल सोशालिझम’ नावाची पुस्तिका लिहीली होती. त्यात मास्कोमध्ये कुणाही बाहेरच्या व्यक्तीला येऊन मोकाट वास्तव्य करता येत नाही, असा उल्लेख वाचून बाळासाहेब प्रभावित झाले. तेव्हा त्यांना कम्युनिस्ट करण्याची मोहिम हाती घेण्यात आलेली होती. कॉम्रेड डांग्यांचे जावई बानी देशपांडे व प्रकाशक कॉम्रेड वा. वि. भट मातोश्रीवर जाऊन शिवसेनाप्रमुखांना दास कॅपिटलचे धडे देऊ लागले होते. त्यातूनच मग तेव्हाच्या दसरा मेळाव्यात श्रीपाद अमृत डांगे नावाचे ‘एक’ कम्युनिस्ट नेते सेनेच्या व्यासपीठावर येऊन दाखल झाले होते. १९८० च्या दशकातली गोष्ट आहे. तेव्हा कुणा डाव्यांना आपला वयोवद्ध कॉम्रेड गुंडगिरीच्या आहारी जात असल्याचे कसे सुचले नाही? मात्र इतक्या सहजगत्या कुणाच्याही आहारी जायला बाळासाहेब हा माणूस पुरोगामी विचारवंत नव्हता. म्हणूनच कम्युनिझम बाजुला पडला आणि काही महिन्यातच शिवसेनेने हिंदूत्वाचा ध्वज खांद्यावर घेतला. हा सगळा इतिहास आजच्या पुरोगामीत्व चघळणार्‍यांना ठाऊक नसावा किंवा गैरसोयीचा असल्याने त्याबद्दल बोलायची हिंमत नसावी. सवाल इतकाच आहे, की शिवसेनेविषयी कुठले तरी एक ठाम मत कोणी पुरोगामी दाखवू शकले आहेत काय? एकदा मधू दंडवते शिवसेनेच्या कुबड्या घेतात, तर कधी कॉम्रेड डांगे सेनेच्या व्यासपीठावर स्थानापन्न होतात. शिवसेना तीच आहे आणि तिच्यातली हुल्लडबाजी तशीच्या तशी कायम आहे. मग वेळोवेळी वैचारिक भूमिकांचे तोल कशाला जात असतात? विचार पक्का असेल, तर एकाच बाबतीत सदोदीत वेगवेगळ्या भूमिका घ्याव्या लागायचे कारण नाही ना?

शिवसेनेकडे कुठलाच विचार नाही वा राजकीय भूमिका नाही, असे सातत्याने सांगितले गेले आहे. पण ज्यांच्यापाशी राजकीय भूमिका वा निश्चीत विचारसरणी आहे, त्यांना सातत्याने आपल्या भूमिका कशाला बदलाव्या लागतात? त्याचे उत्तर कोणी देणार नाही. कारण उत्तर असायला हवे ना? आम आदमी पक्षाच्या मुंबई व महाराष्ट्र शाखेचे पक्षाचे सर्वेसर्वा केजरीवाल यांनी महिनाभरापुर्वी विसर्जन केले आहे. ते खरे असेल, तर मग प्रिती मेनन नावाच्या त्याच पक्षाच्या मुंबईतील प्रवक्त्या पक्षाच्या वतीने सेनेवर बंदी घालायची मागणी कशी करू शकतात? त्यांचा पक्ष आणि केजरीवाल यांचा पक्ष भिन्न आहे काय? माध्यमातल्या कोणी या प्रितीचे विधान प्रसिद्ध करण्यापुर्वी निदान त्याची खातरजमा करून घ्यायला नको काय? पण पत्रकारिताही पुरोगामी झाली असल्यावर अशी धरसोड अपरिहार्य नाही काय? एका दैनिकाच्या सहसंपादकाने पत्रकारितेच्या केविलवाण्या पुरोगामीत्वाचा किस्सा याच आठवड्यात सोशल मीडियात मांडला. एका गुजराती दैनिकाने गोव्यातील एका साहित्यिकाने आपला पुरस्कार अकादमीला परत केल्याची बातमी छापली आणि शोधाशोध सुरू झाली. तर असा कोणी साहित्यिक गोव्यात नसून ते नाव तिथल्या प्रसिद्ध दारूचे असल्याचे निष्पन्न झाले. पुरोगामी म्हणुन काहीही खुळचटपणा करा की तात्काळ त्याला मोठी प्रसिद्धी कशी दिली जाते, त्याचा हा नमूना! पण अशा पोरखेळातून एक राजकीय विचारसरणी किती दिवाळखोर व हास्यास्पद होत गेली आहे, त्याचा विचारही कोणाला सुचलेला नाही. म्हणूनच मग विचारसरणी नसलेली शिवसेना फ़ोफ़ावत जाऊ शकते आणि राजकारणासाठी वैचारिक भूमिकेची गरज उरलेली नाही, असे सामान्य माणसाला वाटले तर काय नवल? कारण पुरोगामी म्हणून मिरवणार्‍यांनी त्या विचारसरणीचे पुरते दिवाळे वाजवून टाकले आहे.

5 comments:

  1. हिंदुचा विरोध म्हणजेच पुरोगामित्व अशी नविन व्याख्या तयार झाली आहे

    ReplyDelete
  2. विचारसरणी वगैरे असं काही नसतं (आजच्या काळात!) प्रत्येकजण स्वतःच्या स्वार्थाचा निर्णय घेतो अन ते आपल्या विचारसरणीत तोडून-मोडून बसवू पाहतो! शिवसेना हा इतरांसारखा पक्ष नसून एका सामान्य माणसाची प्रतिक्रिया आहे; शिवसेनेच्या वागण्याचा नेम नसतो, एखाद्या लहरी तरुणाप्रमाणे! जे स्वतःला पुरोगामी असं लेबल स्वतःच लाऊन घेतात ते स्वतःलाच फसवत असतात... असंही महात्मा गांधींचे विचार फक्त २ ऑक्टोबर च्या भाषणातच कामाचे आहेत...!

    ReplyDelete
  3. भाऊ
    आज सोशल मिडीया वर काही मेसेज फिरत आहेत ते किती खरे व किती खोटे हे आपण कृपया मार्गदर्शन कराल काय...?

    1) प्रसिद्ध महाकवी होमरची महाकाव्ये असलेली इलियाड आणि ओडीसी या ग्रंथावरुनच वाल्मिकीने रामायण आणि व्यासाने महाभारत हे काव्य लिहिले/रचले आहे .
    अगदीच स्प्ष्टपणे सांगाचचे तर , copy-paste केलेले आहे .
    जेव्हा मिनीऐंडर हा ग्रीक राजा वायव्य भागात राज्य करत होता तेव्हा बौद्ध भिख्खु नागसेनसोबत तो वादविवादात हरला व त्याने बौद्ध धम्म स्विकारला तेव्हा भारतीय आणि ग्रीक संस्कृतीचा अनोखा मिलाफ घडुन आला . तेव्हा अनेक कला , नाटके , काव्ये यांचा दोन्ही संस्कृतीत आदानप्रदान होण्यास मदत झाली .
    त्यातुनच होमरच्या महाकाव्याच्या प्रभावातुन रामायन आणि महाभारत ही महाकाव्ये इसवी सनाच्या दुसर्या ते चौथ्या शतकादरम्यान रचले गेले . मुळ रामायनात राम इतर पात्रांसारखाच सामान्य पात्र होता परंतु यात सारखे बदल होत नंतर चौदाव्या शतकात तुलसीदासाच्या रामचरितमानसमध्ये रामाला नायक आणि देवतेसमान दाखविण्यात आले . नंतरच्या काळात महाभारतात भगवान बुद्धांच्या गाथांमधुन गीतेचे सार ओतुन त्याला भगवतगीता असे धर्मग्रंथाचे स्वरुप दिले गेले , अन्यथा आज महाभारत तितकेसे प्रसिद्ध झाले नसते किंवा धुळ खात पडले असते .
    यातुन रामायन व महाभारताच्या कथामध्ये आणि इलियाड व ओडिसीच्या कथांमध्ये प्रचंड साम्य आहेत हेही ध्यानात येते . रामायन व महाभारत हे खुपच अलिकडे रचलेले ग्रंथ आहेत . आपण जर चाणक्य , चंद्रगुप्त मौर्य , सम्राट अशोका यांना राम आणि कृष्ण कोण होते हेदेखिल माहिती नसल्याचे स्पष्टपणे दिसुन येईल कारण यांचा काळ या रामायन आणि महाभारत या ग्रंथनिर्मितीच्या जवळजवळ ५०० वर्षे अगोदरचा आहे .
    मित्रांनो , उघडा डोळे .... वाचा नीट ...

    ReplyDelete
  4. आज हे वाचने खुप महत्वाचे आहे
    👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

    " बोधिसत्व रावण "

    आपण पाहतो कि सुमारे ७५-८० वर्षापासून भारतात रावण दहनाचा सोहळा दरवर्षी विजया दशमीला सनातन धर्मियांच्या वतीने साजरा करण्यात येत असतो. याला वाईट प्रवृत्तीवर चांगल्या प्रवृत्तीचा विजय होय असे गर्वाने सांगण्यात येते. या कृत्याला विद्वान म्हणवून घेणारेही दुजोरा देताना दिसतात. रावण दहनाच्या सोहळ्यात बहुजन समाज फार मोठ्या संख्येने सहभागी होतांना दिसतो. पण त्यांचा सहभाग डोळसपणे नसतो. याचे कारण म्हणजे त्यांच्यावर पिढ्यानपिढ्या करणायत आलेले अंधश्रद्धा निर्माण करणारे संस्कार होय.
    बहुजन समाजाला ब्राम्हणवाद्यांनी वेद व मनुस्मृती वगैरे ग्रंथाचा आधार घेऊन शिक्षण घेण्यास घातलेली बंदी हे या अंधश्रद्धेचे मूळ कारण आहे. मुळातच बुद्धिमान आणि लढाऊ प्रवृत्तीच्या बहुजनांचा मेंदू शिक्षणाच्या अभावाने गोठवून ठेवला गेला. त्यामुळे त्यांना सत्य -असत्य ओळखण्याची बुद्धिमत्ता राहिली नाही. खरा इतिहास त्यांच्यापासून लपवून ठेवण्यात आला. आणि खोटा इतिहास त्यांच्या गाली उतरविण्यात आला . म्हणूनच आपला बहुसंख्य बहुजन समाज ह्या रावण दहनासाठी हजारोंच्या संख्येने गोळा होतांना दिसतो .
    तर खरा रावण कोण होता ते आपण पाहूया .
    रावण हा गोंड राजा होता . इसवी सनाच्या १४ व्या शतकातील मध्यप्रदेशाचा राजा ' संग्रामसिंग ' हा गोंड राजा होता. उत्खननात ह्या राजाची सोन्याची नाणी सापडली असून त्यावर असलेल्या चित्राखाली ' पौलस्त्य ' वंश असे कोरले होते.
    रावणही 'पौलस्त्य ' वंशाचाच होता. रावण हा रक्षक संस्कृतीचा जनक होता. रक्षक संकृती ही अंधश्रद्धेला थारा न देणारी , मिश्र रोटीबेटी व्यवहाराला प्रोत्साहन देणारी, संकृती होती.
    विकृत रूपाचे राक्षस जन्मलेले नाहीत : जगातील सर्व स्त्री- पुरुष मानव जातीचेच होते. आणि आताही आहेत . कोणतीही मानव जात अाक्राळविक्राळ चेहऱ्याची पूर्वीही नव्हती आणि आताही नाही. शबर, वानर, राक्षस ह्या सर्व मानव जातीच होत्या . यांच्यात कुणीही वानरासारखे तोंडचे व शेपटाचे , आक्राळ -विक्राळ चेहऱ्यांचे किंवा अस्वलासारखे नव्हते. जगाच्या पाठीवर उत्खननातून असले अवशेष सापडत नाहीत. म्हणून त्या सर्व मानव जातीच होत्या हेच लक्षात ठेवणे आवश्यक आहे .
    रावणाचे व्यक्तिमत्व प्रभावी , तेजस्वी होते. रावण संस्कृत भाषेत बोलत असे. बाहेरचे जी व्यक्ती लंकेला जात असे ती रावणाचा उपदेश ऐकून ( रक्षक ) संस्कृतीचा स्वीकार करीत असे कारण रक्षक हे फारच सुसंस्कृत होते. रावण हा सर्व प्रजेचा रक्षणकर्ता होता. म्हणूनच त्याच्या राज्यात सर्व प्रजा सुखी होती. तो भेदभाव करीत नसे. रावण हा महान दार्शनिक राजा होता. जनतेचा दयाळू त्राता व रक्षक एक वीर पुरुष ,एक महाबलिष्ठ व्यक्ती ,एक शूर शिपाई ,एक धर्मात्मा पुरुष आणि आनंदाचा समुद्र होता. रावण दया व करुणेचा हिमालय होता .असा विविध गुण रावणाच्या अंगी होते.
    रावण हा विंध्य पर्वताच्या अमरकंटक शिखरावरील लंकानगरीचा राजा होता. म्हणजेच तो मध्यप्रदेशातील राजा होता . याला सबळ पुरावेही आहेत. अमरकंटक पर्वताच्या जंगलात गोंडजातीचे लोक राहतात. जणगणनेमध्ये माहिती देतांना तेथील गोंड लोक स्वतःची नोंद ' रावण वंशीय ' करण्यास सांगतात. रावणाची पत्नी मंदोदरी हि मंदसौरच्या मय दानवाची मुलगी होय. मंदसौर येथे रावणाची ३५ फुट उंच अशी मूर्ती मांडलेली आहे .
    त्याचप्रमाणे मध्यप्रदेशातील विदिशा जिल्ह्यात ' रावणग्राम ' नावाचे एक खेडे आहे . तेथे रावणाची आठ फुट लांबीची ६०० वर्षापूर्वीची जमिनीवर पहुडलेली मूर्ती आहे फक्त विजयादशमीच्याच दिवशी तेथील लोक रावणाची ( त्या मूर्तीची ) पूजा करतात. ' रावणबाबा आम्हांला सुखशांती आणि आरोग्य देवो ' अशी प्रार्थना करतात.
    रावण गौतमबुद्धाचा समकालीन होता त्याने स्वतः गौतमबुद्धांकडून उपदेश ग्रहण केला होता.
    एकदा तथागत भगवान बुद्ध लंकेला होते तेव्हा स्वतः रावण त्या पर्वतावर गेला व त्याने तथागतांना वंदन केले व विनंती केली कि हे ' तथागता , आपण आम्हांला धम्मदेशना करा, आम्ही लंका निवासी ते ऐकू इच्छितो . " तथागतांनी रावणाची विनंती स्वीकार केली. व त्याप्रमाणे सर्व जनतेस आणि रावणास धम्मदेसना दिली. तथागतांनी बुद्धत्व प्राप्तीनंतर ३ वेळा लंकेला भेटी दिल्या आहेत .प्रथम भेट बुद्धत्वप्राप्तीनंतर ९ महिन्यांनी, दुसरी भेट ५ वर्षांनी आणि तिसरी भेट ९ वर्षांनी भेटीचा काळ होता. इ.सन . पूर्व ५२८ ते इ.सन पूर्व ५१९ . बुद्धाच्या भेटी विंध्य पर्वतावरील अमरकंटक ( मलय ) शिखरावर झाल्या आहेत. ह्याचे सर्व पुरावे ' लंकावार सुत्र ' या ग्रंथामध्ये आहेत.
    बुद्ध शिष्य रावण हा मुलनिवासी भारतीयांचा आदर्श राजा होता. म्हणून आपण आपल्याच पूर्वजांचा रावणाचा द्वेष करणे, त्याला नीच समजणे , त्यांच्या पुतळ्याचे दहन करणे म्हणजे ' कुऱ्हाडीचा दांडा गोतासकाळ

    ReplyDelete
    Replies
    1. माहीती खरच संशोधनाचा विषय आहे.पण कुणी तरी लिहीलेय किंवा वाचलय शक्यतो भाऊंच्या ब्लॉगवरच. ईतिहास हा जिंकनाराच लिहीतो कारत हारनारा शक्यतो जिवंत नसतो किंवा त्याला तो अधिकार नसतोच. स्वातंञानंतर पण खुप ऊदाहरण दाखवता येतील. पण ह्या रंगमंचावरची पाञ नायक त्यालाच म्हनतात जो जिंकतो. आपल्याकडे जसे राष्टपिता आहेत तसेच पाकीस्तानात पन आसतील पण ते आपल्या ईतिहासाच्या पुस्तकात खलनायक रंगवतात कारन फक्त जिंकनारा ईतिहास लिहीतो.

      Delete