Sunday, October 25, 2015

दाऊद मारला जाऊ शकतो का?



सध्या पाकिस्तान सातत्याने भारतावर दहशतवाद माजवल्याचे आरोप करू लागला आहे. आपल्याकडे जितक्या सहजपणे आय एस आय या पाक हेरसंस्थेवर आरोप केले जातात, तशीच पकिस्तानात भारतीय रॉ या संस्थेवर आरोप करण्याची फ़ॅशन आहे. मात्र यावेळी एक गंभीर आरोप होतो आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ़ व लष्करे तोयबाचा म्होरक्या सईद हाफ़ीज, यांची हत्या करण्याचा डाव भारताने शिजवला असल्याचा हा आरोप आहे. तो कुणा पाकिस्तानी पत्रकाराने उठवलेली आवई नाही, तर पाकिस्तानच्या पंजाब राज्याच्या गृहखात्याने तसा इशारा अनेकांना दिला आहे. शरीफ़ यांच्या हत्येतून पाकिस्तानात अराजकाची स्थिती निर्माण करण्याचा राजकीय हेतू असल्याचे त्यात म्हटले आहे. शरीफ़ व हाफ़ीज यांच्याविषयी त्यांना शंका आहे. पण कोणा तरी महत्वाच्या व्यक्तींची हत्या करण्याचा भारताचा डाव असल्याची खात्री व पुरावा असल्याचे त्यात म्हटले आहे. त्यावर मग तिथल्या वृत्तपत्रांनी बातम्या रंगवल्या किंवा अग्रलेख खरडले तर नवल वाटायचे कारण नाही. नवल आहे ते भारतात त्याविषयी साधी बातमीही आलेली नाही. आपल्या आरोपाला दुजोरा देण्यासाठी स्थानिक पातळीवर जो हिंसाचार चालू आहे, त्याचेही खापर भारताच्या माथी फ़ोडलेले आहे. लष्करे जंगवी किंवा तहरिके तालिबान यांच्या हस्ते अशा हत्या घडवण्यात येतील, असेही त्यात वर्तवले आहे.

आजकाल पाकिस्तानात अनेक शहरात व वस्त्यांमध्ये सातत्याने हिंसाचाराच्या घटना लागोपाठ घडत असतात. त्याचा भारताशी काय संबंध, ते पाकिस्तानला स्पष्ट करता आलेले नाही. कारण अफ़गाण तालिबान वा तहरिके तालिबान ही पाकिस्तानची निर्मिती आहे. त्याचा भारताशी काय संबंध? त्यांनी माजवलेला हिंसाचार धर्माधिष्ठीत राजकारणातून आलेला आहे. नित्यनेमाने शिया वस्ती वा शियापंथीय मुस्लिमांच्या श्रधास्थानाअर हल्ले होत असतात. मोठमोठे बॉम्बस्फ़ोट शियांच्या मशिदीत होतात. ते करणारा कोणी भारतीय नाही. हे सगळे पाकिस्तानने जन्माला घातलेले व पोसलेले अतिरेकी आहेत. आज ते तुमच्यावर उलटले, तर त्यात भारताचा संबंध काय? अफ़गाणिस्तानात पाकची अप्रत्यक्ष हुकूमत राखण्यासाठी जे तालिबान तयार करण्यात आले, तेव्हा बुगती या बलुची नेत्याची मदत घेण्यात आली होती. पुढल्या काळात त्याचा उपयोग नव्हता आणि तो पाक सरकारला दाद देईना, म्हणून लष्करी कारवाईत त्याची हत्या करण्यात आली. तेव्हापासून हे रण माजले आहे. अफ़गाण जिहाद चालविताना बलुची भूमीचा वापर झाला. जगातून कुठूनही आलेल्या जिहादींना तिथे आश्रय देण्यात आला. त्यातून जे स्थानिकांशी रोटीबेटी व्यवहार करून स्थायिक झाले, त्यांचा आणि अफ़गाण तालिबानांचा जिव्हाळा आहे. सोयीसाठी त्यांना वापरले. मग गैरसोय झाल्यावर त्यांनी आपसातील रक्ताची नाती तोडण्याची अपेक्षा कशी करता येईल? त्यातून हा पेच पाकिस्तानपुढे उभा राहिला आहे. बलुची टोळीवाले आणि तहरिके तलिबान ही पाकिस्तानच्या नरडीत अडकलेली हड्डी बनली आहे. मग त्याचे खापर भारतीय हेरखात्याच्या माथी फ़ोडणे, ही फ़ॅशन झाली.

यावेळी त्याच्या पुढे मजल गेली आहे. शरीफ़ वा सईद हाफ़ीज यांच्या हत्येचा डाव? यातला हाफ़िज खुलेआम भारताला पेटवून देण्याच्या वा राखरांगोळी करण्याच्या धमक्या उठताबसता देत असतो. त्याला पाकिस्तान रोखू शकत नसेल, तर भारताला त्याचा बंदोबस्त करण्याचा अधिकार आपोआप पोहोचतो. अर्थात कायदेशीर मार्गाने असे काही कृत्य भारत करू शकणार नाही. म्हणूनच अन्य मार्गाने अशा गोष्टींची विल्हेवाट लावली जात असते. प्रत्येक देश हे उद्योग करतो. ओसामाला पाक लपवून ठेवत असेल, तर अमेरिकेने त्याचा परस्पर काटा काढलाच ना? तसेच भारताने करावे अशी अपेक्षा कोणी करणार नाही. पण अन्य मार्गाने म्हणजे कोणा पाकिस्तानी टोळी वा संघटनेच्या मदतीने भारत हे करू शकतो आणि त्यात वावगे काहीच नाही. उदाहरणार्थ कसाब टोळी भारतात आली व तिने शेकडो लोकांचा मुंबईत बळी घेतला. तेव्हा पाकिस्तानने काय म्हटले होते? ते अनधिकृत लोकांनी केलेले कृत्य होते. उद्या असेच कोणी पाकिस्तानात पाक नागरिकानेच केले, तर भारतालाही तसे म्ह्णत येईल ना? दाऊदला हाताशी धरून जे उद्योग मागली दोन दशके पाक करतो आहे, त्याचीच भुते पाकिस्तानला आता भेडसावत आहेत, असे म्हणता येईल. अन्यथा पाकच्याच काही जिहादी संघटनांकडून भारतीय हेरखाते हत्याकांड घडवणार, ही भिती कशाला?

अर्थात पाकिस्तानची भिती तद्दन खोटी वा बिनबुडाचा आरोप, असे म्हणण्यातही अर्थ नाही. काट्याने काटा काढता येतो, अशी भाषा संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर बोलले आहेत. तेव्हा यातला काटा जो कोणी आहे, त्याचा काटा काढायला काटाही पाकिस्तानी असू शकतो, असा त्याचा अर्थ घेता येईल. लष्करे जंगवी हा काटाच आहे. तसाच हाफ़ीजही काटाच आहे. पण तितकेच काटे नाहीत. दाऊद इब्राहीमही काटाच आहे. मग एका काट्याला हाताशी धरून दुसरा काटा काढण्यात गैर ते काय? तशा हालचाली भारत करत नसेल, असे कोणी म्हणू शकत नाही. म्हणूनच पाकिस्तानी पंजाबच्या सरकारने दिलेला इशारा संपुर्णतया खोटा म्हणता येत नाही. त्यात शरीफ़ व हाफ़ीज खेरीज अन्यही कोणी महत्वाचे लक्ष्य असू शकते, असे म्हटलेले आहे. ते लक्ष्य दाऊद असू शकते. कडेकोट बंदोबस्तात असलेल्या दाऊदपर्यंत कोणी भारतीय मारेकरी जाऊन पोहोचू शकत नाही. पण पाकिस्तानी तर पोहोचू शकतो ना? हाफ़ीजपर्यंत भारतीय पोहोचणे शक्य नाही. पण त्याच्याच जिहादी छावण्यांमध्ये प्रशिक्षित झालेला कोणी जिहादी हाफ़ीजपर्यंत पोहोचू शकतो ना? भिती व्यक्त होत आहे, ती त्यासाठी! शरीफ़ यांचे नाव अकारण जोडले आहे. अशी माहिती कुठलेही गुप्तचर खाते सरळ देत नाही. त्यांना जो परिणाम साधायचा असतो, त्यादृष्टीने उपयुक्त ठरेल इतकी खरी व बाकीची दिशाभूल करणारी माहिती भेसळ करून दिलेली असते. माध्यमांना पाक सरकारने दिलेली माहिती नेमकी तशी आहे. शरीफ़ यांना मारल्याने पाकिस्तानात कसला गोंधळ उडणार आहे? ऐन प्रचाराच्या रणधुमाळीत बेनझीर भुत्तो यांची हत्या भर चौकात झाली. म्हणून काहीही झाले नव्हते. हुकूमशहा झिया उल हक यांच्या समवेत सगळे मोठे सेनापती विमान अपघातात ठार झाले, म्हणुन पाकिस्तान कोसळून पडला नव्हता. म्हणुनच शरीफ़ यांना ठार मारून कुठल्याच शत्रूला काही साधता येणार नाही. मग त्यांच्या हत्येचे कारस्थान भारत कशाला शिजवणार? परंतु हाफ़ीज वा दाऊद यांचा काटा काढला गेला, तर पाकिस्तानातील जिहादी यंत्रणाच कोसळून पडणार हे निश्चीत! भारताला त्या दोघांपैकी कोणालाही संपवायची संधी असेल तर नक्कीच हवी आहे. म्हणूनच ज्या बातम्या पाकिस्तानी माध्यमे देत आहेत, त्यातली नावे बाजूला ठेवून त्या माहितीकडे बघावे लागेल.

एक गोष्ट स्पष्ट आहे. दाऊदला मारायला भारत टपलेला आहे. पण तसा कोणी भारतीय माणूस पाकिस्तानात नाही, असाच पाकचा दावा आहे. म्हणूनच त्याची हत्या करण्याचा डाव भारताने योजला, असे पाकिस्तान म्हणू शकत नाही. कारण त्यातून दाऊद पाकिस्तानात असल्याची कबुली दिली जाईल. म्हणून मग ‘अन्य महत्वाच्या व्यक्तीची हत्या’ अशी शब्द योजना केलेली असू शकते. त्याचा रोख हाफ़ीजचे नाव घातल्याने कळू शकतो. पाकिस्तानात पंतप्रधान शरीफ़ यांच्या इतका हाफ़ीज हा महत्वाची व्यक्ती आहे काय? असेल तर म्ग दाऊद इब्राहीमही तितकीच महत्वाची व्यक्ती असू शकते. पंजाब गृहखात्याने काढलेला फ़तवा म्हणूनच दाऊदचा जीव धोक्यात असल्याचा इशारा असू शकतो. मात्र दाऊद मारला गेल्याने पाकिस्तानात कुठलेही अराजक माजण्याची शक्यता नाही. कारण दाऊद तिथल्या कुठल्या राजकीय क्षेत्रातला मातब्बर माणूस नाही, की कुठल्या सत्तापदावर नाही. पण त्याचवेळी दाऊद पाकिस्तानात मोठी गुंतवणूक केलेला व्यापारी भांडवलदार आहे. खेरीज भारतातील त्याच्या टोळीबाजी व गुन्हेगारी हस्तकांमुळे पाकसाठी मोठी उपयुक्त व्यक्ती आहे. भारताने दाऊदचा काटा काढला, तर पाकिस्तानच्या भारतविरोधी कारवायांचा कणाच मोडला जाऊ शकतो. म्हणूनच अनेक अर्थाने दाऊद ही शरीफ़ यांच्यापेक्षा पाकिस्तानातील महत्वाची अघोषित व्यक्ती आहे. त्याचाच काटा काढला गेला, तर भारतातील अनेक संपर्क व हस्तक जमिनदोस्त होऊ शकतात. शरीफ़ यांच्या जागी दुसरा पंतप्रधान पुढे येऊ शकतो, किंवा हाफ़ीजच्या जागी अझहर मेहमुद वा अन्य कोणी लखवी उभा राहू शकतो. पण दाऊदला पर्याय नाही. म्हणूनच दाऊद मारला जाणे म्हणजे पाकिस्तानच्या भारतविरोधी जिहादी लढाईत अराजक निर्माण होणे आहे. पाक माध्यमात झळकणार्‍या बातम्यांचा अर्थ तोच आहे.

आता हे सर्व खरे मानले, तर प्रश्न असा उरतो की पाकिस्तानला इतकी खबर लागली असेल, तर त्यांनी त्याविषयी बोंब ठोकून काय मिळवले? गुप्तचर खात्याची लढाई नेहमी अंधारातली व सावल्यांची असते. त्यातून त्यांना परस्परांना शह काटशह द्यायचे असतात. या बातमीतून त्यांनी भारतीय हेरखात्याला इशारा दिला असू शकतो, की दाऊदचा खात्मा करण्याचा डाव शिजवत आहात, त्याची खबर आम्हाला लागली आहे. सहाजिकच आम्ही इतक्या सहजासहजी तुम्हाला त्यात यश मिळू देणार नाही. पण त्याहीपलिकडे आणखी एक हेतू त्यातून साधायचा असतो. पाकिस्तानात हाताबाहेर गेलेल्या जंगवी वा तहरिके तालिबान यांना देशाचे शत्रू ठरवून ते भारताचे हस्तक असल्याचा गवगवा करणे! म्हणजे सामान्य जनतेमध्ये त्या दोन्ही संघटनांविषयी देशाचे शत्रू म्हणून द्वेष निर्माण करण्याचाही हेतू साधला जातो. शिवाय मग त्यांच्या कुठल्याही सदस्यवर भारताचा एजंट म्हणून खटले भरून त्यांना दिर्घकाळ गजाआड ढकलता येत असते. पण दुसर्‍या बाजूला हाफ़ीज वा तोयबांविषयी देशप्रेमी अशी प्रतिमा निर्माण व्हायला हातभार लागतो. थोडक्यात पाकिस्तान सरकारही त्यांच्या जनतेशी सत्य बोलत नसते. तर परिणाम साधला जावा अशी दिशाभूल करणारी माहिती माध्यमातून पसरवली जात असते. इतका गंभीर आरोप पाकिस्तानात होत असताना, त्याची साधी दखलही भारतीय माध्यमांनी घेतलेली नाही, कारण भारताच्या हेरखात्याने वा भारत सरकारनेही त्यावर कुठली प्रतिक्रिया दिलेली नाही.

पण कुठलेही कारण असो, पाकिस्तानात दडी मारलेला दाऊद आता सुरक्षित नाही, इतकाच याचा अर्थ आहे. मागल्या काही महिन्यात सईद हाफ़ीजच्या धमक्या आटल्या आहेत. दाऊदचा ‘प्रवक्ता’ छोटा शकीलही कुठल्या भारतीय माध्यमांशी पत्रकारांशी बोललेला नाही. ह्या गोष्टी सूचक आहेत. प्रामुख्याने याकुबच्या फ़ाशीच्या वेळी बदला घेण्याच्या धमक्या देणारे कुठल्या कुठे बेपत्ता आहेत. पण त्याच पहाटे टायगर मेमनने आपल्या माहिमच्या घरी फ़ोन करून बदला घेण्याचे वचन आईला दिलेले होते. मग काही दिवसातच दाऊदच्या पत्नीला कोणीतरी भारतातून थेट फ़ोन करून बातचित केल्याचे रेकॉर्डींग आपण ऐकले आहेच. त्यानंतर सर्वांची बोलती एकदम बंद होऊन गेली. कारण घरचा फ़ोन लागला म्हणजे घरचा पत्ता लागतो. पत्ता कळला की लपून बसलेली जागा कळते. तिथून दाऊदला अन्यत्र हलवला असेल, तरी त्याच्या हालचालीवर नजर ठेवलेल्यांना नवी जागा कळू शकते. अशा वेगवेगळ्या काळातल्या बातम्यांचे तुकडे जोडले, तर ताज्या बातमीचे संदर्भ उघडे होतात. पाकिस्तानी पंजाब सरकारच्या इशार्‍याप्रमाणे शरीफ़ वा हाफ़ीज यांच्या हत्येसाठी रॉ प्रयत्नशील असल्याची अफ़वा असावी आणि प्रत्यक्षात दाऊद हेच भारताचे लक्ष्य असल्याने पाकिस्तान गडबडलेला असावा, ही शक्यता अधिक आहे.

पूर्वप्रसिद्धी  तरूण भारत नागपूर
रविवार   २५/१०/२०१५

3 comments:

  1. माझा प्रतिसाद :
    https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=480578355446959&id=172939776210820&comment_id=480684922102969

    -गा.पै.

    ReplyDelete
  2. Bhau Khup chhan vishleshan aahe. Tumacha tark khara tharo

    ReplyDelete
  3. खरं आहे. असं वागणं गुप्तहेरांसाठी योग्यच.

    ReplyDelete