जनलोकपाल आंदोलनापासून त्याचे प्रणेते व म्होरके नेहमी उठसुट गांधी स्मारक असलेल्या राजघाटावर जाऊन बसायचे. उपोषणाच्या आधी अण्णा हजारे यांनी तिथे बसून काहीकाळ मौनव्रत घेतले होते. तर कुणा कार्यकर्त्याने थप्पड मारली म्हणून केजरीवालही एकदा राजघाटावर जाऊन बसले होते. आज चार वर्षांनी गांधी जयंतीच्या मुहूर्तावर त्याच लोकांची कृती गांधी विचारांना कितीशी सुसंगत आहे? गांधीजयंतीचा मुहूर्त साधून आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी महाराष्ट्र व मुंबई येथील पक्षाच्या शाखा बरखास्त करून टाकल्या आहेत. त्यामुळे अर्थात मुंबईतले नुसत्या नावाचे मयंक गांधी खवळले आहेत आणि त्यांनी केजरीवाल यांच्यावरच पक्ष रसातळाला घेऊन जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. यात कोण खरा वा चुकीचा, हे आपण ठरवू शकत नाही. जिसकी लाठी उसकी भैस हाच ज्यांचा नियम असतो, त्यांनी कितीही लोकशाही वा गांधींजींचा नामजप केल्याने वास्तव बदलत नसते. केजरीवाल कधीही लोकशाहीवादी नव्हते. कारण त्यांचा एकांगी स्वभाव राहिलेला आहे. त्यामुळे अन्य पक्षांवर कितीही आरोप केले, तरी त्यांनाही त्याच मार्गाने जाणे आवश्यक होते. पक्ष चालवणे म्हणजे लोकशाहीची चर्चा करणे नसते. तिथे सहमतीने निर्णय घेण्याची कल्पना खुप आकर्षक असली, तरी व्यवहारात एकमत वा सहमती अशक्य असते. तिथे कोणीतरी आपले मत लादणारा आवश्यक असतो. केजरीवाल यांच्यापाशी तो ‘दुर्गुण’ आहे. म्हणूनच जनलोकपाल आंदोलनापासून आजपर्यंत त्यांच्या अन्य सहकार्यांपेक्षा तेच यशस्वी झालेले दिसत आहेत. आरंभीच्या काळात त्यांनी जी सहमतीची नाटके रंगवली. ती लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी होती. त्यातून आपण लोकशाहीवादी असल्याचा आभास निर्माण करून माध्यमांकरवी आपली एक उजळ प्रतिमा केजरीवाल यांना निर्माण करायची होती. आता त्या नाटकांची गरज उरलेली नाही.
मागल्या लोकसभा निवडणूकीत एकाएकी देशभर उमेदवार इभे करण्याचा निर्णय कुणाच्या सहमतीने झाला होता? कुठेही कुणालाही उमेदवारी देताना, काय निकष वा कसोटी वापरली गेली होती? कोणालाही पक्षात घेताना वा नेतापद बहाल करताना, कुठल्या सहकार्यांशी केजरीवाल विचारविनिमय करीत होते? पण देखावा असा उभा केला होता, की सर्वकाही सहमतीने चालू होते. बाकीचे सहकारी केजरीवाल यांची प्रतिमा पक्षाला लाभदायक ठरेल, म्हणून निमूट बसले होते. पण जेव्हा बाहेरच्यांना गप्प करण्यात केजरीवाल यशस्वी ठरले. त्यानंतर त्यांनी आपल्याच एक एक सहकार्यांचा बळी घ्यायला सुरूवात केली. शिसोदिया व केजरीवाल सोडून मुळच्या जनलोकपाल आंदोलनातील कोण त्यांच्यासोबत शिल्लक उरले आहे? कालपरवा पक्षात थेट उमेदवार व्हायला आलेले आशुतोष वा आशिष खेतान यांच्यासारखे लोक हुकूमत गाजवत आहेत. कुमार विश्वास, प्रशांत भूषण, शाझिया इल्मी असे तमाम लोक कुठल्या कुठे दूर फ़ेकले गेलेत. मयंक गांधी वा अन्य महाराष्ट्र मुंबईतील आप नेत्यांसाठी तोच इशारा होता वा असतो. निमूटपणे हुकूमत मान्य करायची. जमणार नसेल, तर पक्ष सोडून निघून जायचे. गेला नाहीत, तर गठडी वळली जाईल. हेच इतरांच्या बाबतीत झाले होते. मग मयंक गांधी कसल्या प्रतिक्षेत होते? गांधी जयंतीदिनी आपल्याला बरखास्त करायची वाट बघत बसले होते काय? नितीन गडकरींपासून कपिल सिब्बल यांच्यापर्यंत अनेकांना लोकसभा निवडणूकीपुर्वी भ्रष्ट घोषित करणारे केजरीवाल पुढे दारूवाले, बारवाले, बिल्डर, गुन्हेगारांना दिल्लीतली उमेदवारी देत गेले. त्यातून आदर्शवादी पक्ष उभा रहातोय, अशा समजूतीत मयंक गांधी होते काय? यापेक्षा आम आदमी पक्षात काहीही वेगळे होणे अपेक्षित नव्हते आणि होणारही नाही. निव्वळ ब्लॅकमेल हे हत्यार घेऊन जो माणूस सार्वजनिक जीवनात येतो, याच्याकडून कुठल्या आदर्शाची अपेक्षा बाळगता येईल?
आपल्या पहिल्या शपथविधीच्या वेळी केजरीवाल यांनी रामलिला मैदानावरून उपस्थितांना केलेले आवाहन बोलके होते. कोणी लाच मागितली तर नाही म्हणू नका. अशा अधिकारी सरकारी कर्मचार्यांशी सौ्दा पक्का करा आणि तो करीत असताना खिशातल्या मोबाईलवर त्याच्या बोलण्याचे रेकॉर्डींग करून घ्या. त्याचा पुरावा घेऊन आलात तर आपण लाचखोरी बंद करून दाखवतो, असे आश्वासन केजरीवाल यांनी दिलेले नव्हते काय? त्यातून ते जनतेला काय शिकवत होते? अशा रितीने कोणालाही सापळ्यात अडकवले, मग त्याच्यावर कारवाई कशाला करायची? रेकॉर्ड करणाराच त्याला नुसती हुलकावणी देऊन खंडणी उकळू शकतो ना? विविध प्रकारच्या क्लिप्स युट्युबवर येतात वा नेटवर टाकल्या जातात, त्यापेक्षा केजरीवाल यांचे आवाहन कितीसे वेगळे होते? याला कोणी गांधीवाद म्हणणार आहे काय? आशुतोष वा खेतान यांनी अशाच उठवळ पत्रकारितेत त्यातूनच नाव कमावले आणि तेच केजरीवाल यांचे उजवेडावे हात झाल्यावर दुसरे काय व्हायचे होते? त्याचाच प्रयोग मग एकेदिवशी योगेंद्र यादव यांच्यावर झाला आणि त्याचाच उपयोग कुणी केजरीवाल यांचेच फ़ोनवरील शिवीगाळ रेकॉर्ड करण्यात झाला. आपल्याच ज्येष्ठ सहकार्यांना कमिने वगैरे सन्मान्य बिरूदे लावणार्या केजरीवाल यांच्याकडून आदर्श राजकारण वा समाजकारणाची अपेक्षा कोणी गुंडही करणार नाही. अशा व्यक्तीने काढलेल्या पक्षात आज तीन आमदार कायदेशीर जाळ्यात फ़सले आहेत. कोणावर खोट्या प्रमाणपत्राचा आरोप आहे, तर कोणावर पत्नीला हुंड्यासाठी छळल्याचा आरोप आहे. त्यापैकी एक माजी मंत्री आणि दुसरा विद्यमान मंत्री असताना पकडले गेले. यातून केजरीवाल यांची संगत कळते. हे जनलोकपाल आणुन देशातला भ्रष्टाचार संपवणार होते? अण्णा कमी शिकलेले असले तरी त्यांच्यापाशी अधिक व्यवहारी म्हणूनच विवेकी बुद्धी असावी. त्यांनी आरंभीच त्यापासुन फ़ारकत घेतली.
किचड साफ़ करना है तो किचडमे उतरनाही पडेगा, हे केजरीवाल यांचे प्रसिद्ध वाक्य आहे, जे त्यांनी अण्णांनाच ऐकवले होते. जनलोकपालसाठी राजकारणात जायचे केजरीवाल यांनी ठरवले आणि अण्णांनी त्याला विरोध केला, तेव्हाचे हे वाक्य आहे. असे लोक किचड म्हणजे चिखलात जात नाहीत तर खातेर्यात रममाण होतात, हे अण्णांना पक्के ठाऊक होते. म्हणूनच त्यांनी केजरीवाल यांच्यापासून वेळीच फ़ारकत घेतली. पण बाकीचे अत्यंत सुशिक्षित व अभ्यासू बुद्धीमान लोकपालवादी अरविंद केजरीवाल यांच्या जाळ्यात फ़सते गेले आणि आम आदमी पक्षाच्या लोकप्रियतेचा लाभ उठवण्याच्या खातेर्यात उड्या मारत गेले. मेधा पाटकर यांनाही त्या मोहापासून दूर रहाणे शक्य झाले नाही. त्यांच्यापेक्षा मयंक गांधी यांचा अनुभव मोठा नाही. केजरीवाल पहिल्या दिवसापासून साधूसंत असल्याचे नाटक करीत होते आणि त्यामध्ये नवनवे रंग भरण्यासाठी साधेपणा, शुचिता यांचे तमाशे करीत होते. त्यातले ढोंग सामान्य माणसाला दिसू शकत होते. अण्णा ते ओळखू शकले. यादव, भूषण वा मयंक गांधींना बुद्धीमान असल्याने ते सत्य बघता आले नाही. मग त्याचे परिणाम त्यांना भोगावेच लागणार ना? महाराष्ट्रात मुळात आम आदमी पक्ष होताच किती? पुर्वीच्या कालबाह्य झालेल्या बुडालेल्या समाजवादी वा पुरोगाम्यांनी काडीचा आधार म्हणून आपचा आश्रय घेतला होता. लोकसभा निकालांनी त्यांना सत्य दाखवले, तरी बघता आले नाही आणि पुढल्या निवडणूका लढायच्या नाहीत, असा फ़तवा काढून केजरीवाल सत्य दाखवत असताना त्यांना ते बघायचे नाही. मग त्यांनाच भ्रमातून बाहेर काढण्यासाठी केजरीवाल यांना ठाम कारवाई करावी लागणार ना? त्यांनी बुडालेल्यांना वाटणारा काडीचा आधारही काढून घेतला आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत निदान केजरीवाल यांचा निर्णय योग्य म्हणावा लागेल. नसलेला पक्ष त्यांनी बरखास्त करून तो नसल्याचे सिद्ध केले.
मोदी नेहरू गांधी कुटूंबाला घाबरत नाहीत हे ठीक आहे पण त्यांनीही महात्माजींना श्रद्धांजली दिली परंतु शास्त्रीजींना श्रद्धांजली देण्यासाठी वेळ दिला नाही हे खटकण्या सारखे आहे. साधेपणा, निर्भयता आणि कठीण प्रसंगी नेतृत्व करण्याचे त्यांचे कौशल्य तसेच आपल्या कामाचा डांगोरा न पिटणे हे शास्त्रीजींचे गुण पुढील नेत्यांनी आणि लोकांनी लक्षांत ठेवण्यासारखे आहेत.
ReplyDeleteचूक, त्यांनी शास्त्रीजींना हि श्रध्धानजली दिली, माध्यमांनी दाखवली नाही.... फेसबुक वर आहे....
DeleteMr pradhan, me swataha gandhiji ani shastriji doghanahi shraddhanjali wahatanache modijinche photo fb war upload kelele. Tyashivay kaal badlat asto. sagle gandhi kiva shastri hou shalat hanit. hi mansa unique hoti. Mhann tyani kele tyache anukaran konihi karu shaknar nahi. shastrijinchya netrutwanche anukaran karnyaparyanta theek ahe. pan sadhepana, kamacha dangona na pitne ityadi gunanche anukaran koni ka karave yache karan sangayche upkar karavet.
DeleteUnderstandable that those we have 'put in lot of efforts' might be upset with AAP Leader Kejriwal. But 'tantrums' as expressed in this blog post are hardly likely to make any difference. I have no 'beef' in this nor want to justify what Kejriwal did. For me, his most stupid act was to resign from CM position for 'theater' in his first election. After that he has learnt the lesson, Delhi voters have been surprisingly in forgiving mode to elect him back and for good part he is trying. Let us see if he can make any difference in this gracious second chance. The fact that Delhi voters tolerated his shenanigans in the first attempt means; there is a solid 'demand' for corruption free politics. Which also means if AAP fails; some another party can pursue this 'corruption free politics'. It is very potent and badly needed for India.
ReplyDeleteRemember one thing - 'anger' can take you only so far in public life. This post reads full of anger only, all complaints about Kejriwal. India is bigger than one Kejriwal and you have whole of lot field open to 'make difference in lives of Indian people'. Choose one of those other avenues, don't wait for one Kejriwal.
Best wishes.
Kejriwal is the WRONG person in the RIGHT field
ReplyDelete