Saturday, October 17, 2015

मोदींचा जास्त भरवसा पुरोगाम्यांवर!



Insanity: doing the same thing over and over again and expecting different results.   -Albert Einstein

 साधारण तीन वर्षापुर्वीची गोष्ट असेल, गुजरात दंगलीचा उल्लेख करून नरेंद्र मोदींना पंतप्रधानकीच्या शर्यतीतून माघार घ्ययला लावण्याची जोरदार मोहिम पुरोगामी माध्यमे व विचारवंत जोशात राबवत होते. त्यातलाच एक पत्रकार व राजकीय नेता असलेला ‘नई दुनिया’ या उर्दू दैनिकाचा संपादक शाहीद सिद्दीकी मात्र बदलला होता. त्याने मोदींचे समर्थन कधीच केले नाही. पण खोट्या अपप्रचारातून मोदी कसे देशभर लोकप्रिय होत चाललेत त्याकडे आपल्या पुरोगामी सहकार्‍यांचे लक्ष वेधण्याचा कसोशीचा प्रयत्न मात्र सुरू केला होता. पण आपल्या मुर्खपणावर अगाध श्रद्धा असलेल्यांकडून त्याचीही टिंगल सुरू झाली होती. आज तीन वर्षे उलटून मोदी पंतप्रधानपदावर चांगलेच स्थिरावले असतानाही, त्या मुर्खपणाचे परिणाम बघायचीही इच्छा अशा शहाण्यांना होत नाही, याचे म्हणूनच नवल वाटते. माझी कहाणी सुद्धा वेगळी नाही. तेव्हा म्हणजे भाजपाही मोदींना उमेदवारी द्यायला घाबरत होता, तेव्हा सिद्दीकीच्या शब्दांनी मला एक दिशा दिलेली होती. त्यावरून अभ्यास करताना मोदी कसे भाजपाला यश देवू शकतील, त्याचे विवेचन मी अनेक लेखातून व संदर्भासह करीत होतो. पण त्यातला पुरोगामी मुर्खपणा स्पष्ट शब्दात मांडत असल्याने मला मोदीभक्त ठरवण्यात पुरोगामी धन्यता मानली गेली. मात्र मी उपस्थित केलेले मुद्दे तपासून चुका सुधारण्याची इच्छा कुणाला झाली नाही. आजही त्यातले अनेकजण सोशल मीडियातील तेव्हाची त्यांचीच विधाने व मुर्खपणा तपासून बघू शकतील. त्याची जाहिरात करण्याची गरज नाही. पण चुका कुठे झाल्या आणि मोदींना त्याचा लाभ कसा मिळाला, त्याचे तरी आत्मपरिक्षण कराल की नाही? त्यातून आपल्या चुकांचे परिमार्जन शक्य नसले, तरी त्याच चुकांची पुनरावृत्ती तरी नक्कीच टाळता येईल ना? पण चुका नाकारून तेच करीत रहाणे, यालाच आता पुरोगामी आजारपणाचे स्वरूप आलेले आहे.

मोदींच्या यशाचे भाकित करणे सोडून द्या! त्यात खास असे काहीही नव्हते. कुठल्याही सामान्य पत्रकाराला निष्पक्षपाती राजकीय घडामोडी अभ्यासताना मोदींच्या यशाचे भाकित करता आले असते. त्यात माझे मोठेपण काडीमात्र नाही. पण त्याच निमीत्ताने पुरोगामी वा नेहरूवादी असलेल्यांना येऊ घातलेला धोका मी तेव्हाच समोर मांडला होता. निदान त्याचा तरी तेव्हा विचार व्हायला हरकत नव्हती. ‘आसाबियाचा आधुनिक अविष्कार’ या शिर्षकाचा एक लेख मी ‘पंचनामा’ या माझ्या ब्लॉगवर दोन वर्षापुर्वीच टाकला होता. त्यानंतर सात महिन्यांनी मोदी पंतप्रधान झाले. त्या लेखाचे महत्व मोदींच्या विजयाशी नव्हते. त्यांचा विजय पुरोगाम्यांनी खुप मेहनतीने पक्का केलेला होता. पण त्या मुर्खपणातून कुठला धोका नेहरूवादी पुरोगामीत्वावर येऊ घातला आहे, त्याचा इशाराही मी संगतवार दिलेला होता. राजकारणाची भावी दिशा निव्वळ देशातील सत्तापालटाची नाही, तर स्थित्यंतराची आहे, असे बहुधा मी वगळता अन्य कुठल्या विश्लेषकानेही मांडण्याचे तेव्हा धाडस केलेले नव्हते. कारण मुळात मोदी जिंकूच शकत नाहीत, याविषयीची कडवी अंधश्रद्धा! नेमके माझे शब्द काय होते? ‘सात आठ दशकातील सत्तेला नेहरू घराण्याचीच राजवट मानावे लागते. मोदी हा त्या अर्थाने आक्रमक वा बाहेरचा आहे आणि तो प्रस्थापित नेहरू राजवटीला आव्हान देण्यासाठी पुढे सरसावलेला आहे. जे काही स्वातंत्र्योत्तर काळात चालू आहे, ते तसेच पुढे चालवण्याची त्याची तयारी नाही आणि त्यात आमुलाग्र बदल करण्याचा मनसुबा घेऊनच ह्या लढवय्याने पाऊल उचलले आहे. मोडकळीस आलेली प्रस्थापित नेहरूवादी व्यवस्था व राजकीय सत्ता यांना परिघाबाहेरून धडका देणारे अनेक गट त्यामुळेच मोदी भोवती जमा होऊ लागले आहेत.’ थोडक्यात मोदी नुसती सत्ता हस्तगत करणार नाहीत, तर शतकभर चाललेली नेहरू व्यवस्था उध्वस्त करतील, हेच मी सुचवले होते.
 http://panchanaama.blogspot.in/2013/10/blog-post_5.html

इथल्या पुरोगाम्यांनी मला मोदीभक्त ठरवून हसण्यावारी नेल्याने माझे व्यक्तीगत कुठलेच नुकसान झाले नाही. पण आज दोन वर्षानंतर तेच लोक माझे भकित खरे ठरल्याने कसे सैरभैर झालेत, ते आपण साक्षात बघू शकतो. पण दुर्दैव असे आहे, की शहाण्याची व पुरोगाम्यांची अंधश्रद्धा कमालीची कडवी असते आणि ती त्यांच्यातच असलेल्या विवेकबुद्धीला कधीच शिरजोर होऊ देत नाही. म्हणूनच अनुभूती आली तरी समजुतीमध्ये रममाण होण्याखेरीज त्यांना पर्याय नसतो. थोडक्यात जुन्याच चुकांची पुनरावृत्ती करण्यापासून त्यांचीही सुटका नसते. जसा मागल्या दोन वर्षातील मोदी विरोध कालबाह्य म्हणून निकामी ठरला, तशीच त्यातली रणनितीही आता कालबाह्य होऊन गेलेली आहे. ज्याच्याशी लढायचे व ज्याला पराभूत करायचे आहे, त्याला अशा डावपेचांनी ओरखडाही उठत नाही, हे आजचे वास्तव आहे. म्हणून मग नवी रणनिती आखणे भाग आहे. किंवा जुन्यातल्या चुका हेरून त्यात आमुलाग्र बदलही आवश्यक आहे. पण त्यासाठी आधी जुन्या कालबाह्य निरूपयोगी भुमिकांचा त्याग करावा लागेल. पुढे भवितव्याकडे बघण्याइतके खरोखरचे पुरोगामी व्हावे लागेल. पण त्याचेच नामधारी पुरोगाम्यांना वावडे आहे. म्हणून मग आपणच निर्माण केला त्या अंधारात ही मंडळी चाचपडत आहेत. जितके खोटे बोलून मोदींना बदनाम करण्याचा प्रयास झाला आणि त्यातूनच मोदी लोकपिय झाले असतील, तर आता आंणखी खोटे बोलून चालणार नाही. कल्पनेच्या नंदनवनातून बाहेर पडून वास्तवाला भिडावे लागेल. साहित्यिक वा पुरस्कार यांचे कौतुक कोणालाच नसते आणि म्हणुन त्याचे भांडवल करून माध्यमांना मोठी ब्रेकिंग न्युज मिळाली, तरी मोदी सत्तेवर त्याचा काडीमात्र परिणाम होत नाही. सवाल बातम्यात झळकण्याचा नसून परिणामकारी ठरण्याचा आहे. त्याचे भान अजून आलेले नाही. आपण अस्तित्वाची लढाई लढतोय, याचे भान उरले नाही, मग नामशेष व्हायला पर्याय उरत नाही.

अनेकदा कुठल्या तरी नाटक सिनेमावरून खुप गदरोळ होतो. कधीकधी मुद्दाम माजवला जातो. त्यातून मग प्रेक्षकांची झुंबड उडणार आणि गल्ला भरणार; याची खात्री असते. होतेही तसेच! मात्र बहुतेकदा असे वादग्रस्त झालेले सिनेमा वा नाटके एकदोन आठवड्यात कोसळतात. कारण जितके नाट्य फ़ुगवलेले असते, तितके त्यात काही असल्याचा गवगवा प्रथम घावलेल्यांकडून पुढे झाला नाही, तर बोर्‍या वाजतो. हे वादग्रस्त काही बघायला धावलेले निराश होऊन बाहेर पडतात, त्यांच्याकडून खरी किमया होत असते. त्यांनी ‘कुछभी नही यार’ अशी प्रतिक्रीया दिली, मग लोकांचे कुतूहल संपते आणि वादाने गाजलेले सिनेमे जमिनदोस्त होऊन जातात. मोदी विरोधात बहुतांश वेळी असे झाले आहे. कारण नसलेले मुद्दे घेऊन वा उकरून गदारोळ माजवला गेला आणि त्यातली हवा संपली, मग मोदीच लोकांना खरे वाटत गेले. अविष्कार स्वातंत्र्याची गळचेपी वा धर्मनिरपेक्षतेला धोका असल्या बाष्कळ विषयावर काहूर माजवण्यापेक्षा, हेच लेखक साहित्यिक विचारवंत महागलेली तुरडाळ, एकूणच बाजारातील महागाई असले मुद्दे घेऊन रस्त्यावर आले आणि पुरोगामी पक्ष संघटनांनी त्यांच्यामागे आपली शक्ती उभी केली, तर मोदी सरकार व भाजपा यांना नाकी दम यायला वेळ लागणार नाही. अशा आंदोलनात मग दादरी वा विचारवंतांच्या हत्या हे विषय असायला हरकत नाही. पण त्यातून जो कल्लोळ माजेल तेव्हा तुरडाळीचे मोल भाजपाच्या सत्तेला डळमळीत करू लागेल. त्याचा आवेश वाढू लागला असताना साहित्यिकांनी पुरस्कार परत करण्याची मोहिम राबवली असती, तर सामान्य जनतेने त्यांना डोक्यावर घेतले असते. पुरोगामीत्वाला जनतेचा उत्स्फ़ुर्त पाठींबा मिळू शकला असता. मोदी विरोधातले असे अनेक मुद्दे आहेत, जे सामान्य जनतेच्या वास्तविक जीवनाला जाऊन भिडणारे आहेत. पण त्याचा थांगपत्ता पुरोगाम्यांना लागलेला नाही. म्हणून तर मोदी निश्चींत आहेत. मोदींचा आपल्या मतदारापेक्षाही पुरोगामी मुर्खपणावर जास्त विश्वास आहे. अन्यथा त्यांना इतका पल्ला अल्पावधीत कशाला मारता आला असता?

3 comments:

  1. अचुक निदान होते ते , आणि त्याच पोस्ट पासुन मी तुमची प्रत्येत पोस्ट वाचतो मोदीभक्त म्हनुन नाही तर वास्तव काय आहे हे एक ञयस्तः म्हनुन तुमचे मत आवडले म्हनुन धन्यवाद भाऊ

    ReplyDelete
  2. Bhau , ya shadiyantra magache sutradhar desha baheril aasave ? Etar deshat ludbud karna he Amerikecha dhoran aahe , hi purogami mandali tyach dhoranachi pillavali aahet asa tumhala nahi ka vatat ?

    ReplyDelete
  3. भाऊ,
    ठरल तर !

    तुम्ही मोदीजींना हरवण्याची युक्ति, action plan, सांगायचा. सगळे पुरोगामी एकमताने तुम्हाला एखादा साहित्य पुरस्कार देतील.
    बघा पटतय का?

    ReplyDelete