लागोपाठ तीन डाव्या विचारवंत व्यक्तींची हत्या झाल्यामुळे अलिकडे सनातन या संस्थेवर पुरोगामी हल्ले सातत्याने चालू आहेत. अंधश्रध्दा निर्मूलन कार्यात गुंतलेल्यांच्या विरोधात पहिल्यापासून सनातन ही एकमेव हिंदू संघटना मैदानात असल्याने त्यांच्याकडेच संशयाने बघितले जाणेही स्वाभाविकच आहे. पण नुसत्या संशयाच्या आधारावर कुठल्या कायदेशीर कारवाया होत नसतात. म्हणूनच या तिन्ही हत्याकांडांचा तपास बारगळला आहे. कारण त्यात पोलिसांचे काम अंधश्रध्दा निर्मूलनाच्या मागणीनुसार तत्वानुसार व्हायला हवे असा हट्ट आहे. मग भले खरा खुनी सापडला नाही, तरी बेहत्तर! अशी पानसरे दाभोळकर यांच्या पाठीराख्यांची भूमिका आहे. पानसरे हयात असताना दाभोळकर हत्येच्या शोधकामात कुणा पोलिस अधिकार्याने प्लॅन्चेटचा वापर केला, म्हणून पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांच्या विरोधात इतका गदारोळ झाला, की त्यातून पुढे सरकणे अशक्य होऊन गेले. मात्र दाभोळकरांच्या छायाचित्रावर सनातनच्या कुठल्या अंकात वा संकेतस्थळावर फ़ुल्ल्या मारल्या, म्हणजेच हत्येला तीच संस्था जबाबदार असणार, हा बिनबुडाचा संशय वैज्ञानिक मानायचाही अट्टाहास आहे. सहाजिकच खुनी कुठलाही असला, तरी पकडला जाणारा आरोपी सनातन संस्थेचा असला पाहिजे, असा आग्रह आहे. असा राजकीय हट्ट पुरवणे एकवेळ शक्य असते. पण न्यायालयिन वा कायदेशीर हट्ट पुरवता येत नाही. कारण न्यायालये अंधश्रध्दा निर्मूलन विज्ञानानुसार चालत नाहीत, तर जगात प्रस्थापित असलेल्या विज्ञानानुसारच चालतात. त्यामुळे तिथे तशा विज्ञानाधिष्ठीत पुराव्यांची गरज असते आणि अंधश्रध्दा निर्मूलनाचे विज्ञान ही वेगळी श्रध्दा आहे. त्या चळवळीत सहभागी असलेल्यांचा शब्द हा त्यांच्यासाठी वैज्ञानिक पुरावा असतो. सुदैव किंवा दुर्दैवाने अजून तरी न्यायालये त्या विज्ञानाला मान्यता देत नाहीत. म्हणूनच या तीन भीषण हत्याकांडांचा उलगडा होऊ शकलेला नाही.
पण दरम्यान कोणी कुणाच्या अंधश्रध्दा रोखूही शकत नाही. सरकार जसे सनातनच्या धर्मश्रध्दांना लगाम लावू शकत नाही, तशाच अंधश्रध्दा निर्मूलनाच्या वैज्ञानिक श्रध्दांनाही लगाम लावू शकत नाही. म्हणूनच घोंगडे भिजत पडले आहे. पाठीराख्यांना सनातनी खुनीच हवा आहे, तर कोर्टाला पुराव्यानिशी सिद्ध होईल असा खुनी हवा असतो. त्यात बिचार्या पोलिस खात्याची तारांबळ उडाली आहे. कारण त्यांना असा दोन्ही बाजूंचे समाधान करणारा आरोपी मिळू शकलेला नाही. मग दरम्यान दोन्ही बाजू एकमेकांवर आरोप करण्यात मशगुल आहेत. सतत एकाच बाजूचे आरोप ऐकले मग कंटाळा येत असतो. तेव्हा मग दुसर्या बाजुचे आरोप थोडे मनोरंजन करत असतात. ह्यातही तसेच झाले आहे. सनातननेच ही हत्याकांडे घडवल्याचा आरोप आता कंटाळवाणा झालेला असताना, त्यात सनातनने श्याम मानव याच्यावरच खुनाचा आरोप केल्याने थोडी उत्सुकता निर्माण झाली आहे. अर्थात बाकीचे अंधश्रध्दा निर्मूलनवादी व श्याम मानव यांच्यात एक किंचित फ़रक आहे. मानव यांना संमोहन शास्त्र अवगत आहे असा त्यांचा दावा आहे. तो कितपत विज्ञानवादी आहे व कितपत निव्वळ अंधश्रध्दा आहे, त्याचा खुलासा होऊ शकलेला नाही. कारण संमोहन अवस्थेत कोणाकडूनही गैरकृत्ये करून घेता येतात आणि नंतर त्याला काही आठवत नाही, असा मानव यांचा दावा आहे. त्यासाठी ते सनातनच्या जनकाचाच दाखला देतात. सनातनचे संस्थापक डॉ. जयंत आठवले हे जागतिक दर्जाचे संमोहन शास्त्री आहेत आणि त्यांनी मानव यांच्यावरही तसे प्रयोग केल्याचे मानव यांनीच पत्रकार परिषदेत सांगुन टाकलेले आहेत. सहाजिकच तेवढ्यासाठी का होईना आपण मानव यांच्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही. मानव यांचाच दावा मान्य करून आपण खरेखोटे तपासायला काय हरकत आहे?
संमोहीत व्यक्तीकडून कुठलेही गैरकृत्य करून घेता येते आणि नंतर त्याच्या स्मृती पुसून टाकल्या की त्याला आपला गुन्हाही आठ्वत नाही, असा मानव यांचा पहिला दावा आहे. आपण शंभर टक्के तो खरा मानावा. मग दुसर्या दाव्याकडे वळू! १९८९ सालात आठवले व सनातन यांनी खुद्द श्याम मानव यांच्यावरही संमोहन केले, असा मानव यांचा दुसरा दावा आहे. तो खरा मानायचा, तर संमोहन केल्यानंतरही मानव यांची स्मरणशक्ती शाबुत कशी आणि पाव शतकानंतरही त्यांना आपल्यावरच केलेला संमोहनाचा प्रयोग आठवतो कसा? मानव यांनी त्याचाही खुलासा करायला हवा ना? तितकाच एक प्रश्न विचारून विषय संपत नाही. पंचवीस वर्षापुर्वी त्यांच्यावर जो संमोहनाचा प्रयोग झाला, त्यानंतर इश्वरीय राज्याच्या स्थापनेसाठी सनातनने मानव यांच्याकडून कुठले गैरकृत्य करून घेतले, त्याचाही तपशील मानव यांनी दिला पाहिजे ना? इथे मानव यांचे संमोहनशास्त्र व स्मरणशक्ती चिकित्सक व दुटप्पी होतात. सोयीच्या तितक्या स्मृती शाबुत रहातात आणि गैरसोयीच्या स्मृती मात्र पुसल्या हातात. म्हणून आपल्यावर संमोहन झाल्याचे मानव यांना आठवते आणि त्या संमोहन काळात आपण काय दिवे लावले, त्याची विस्मृती होते. क्या बात है? या मानवाला देवही उगाच घाबरत नाही. जे तथाकथित देव किंवा इश्वरालाही शक्य नाही, ते चमत्कार श्याम नावाचा मानव घडवू शकतो. श्याम मानव तेव्हाच्या संमोहनाच्या प्रभावातून नक्की बाहेर पडलेत, याची खात्री कोणी द्यायची? की आजही त्यांचे जे काही उद्योग चालू आहेत, ते सनातनच्याच संमोहनातून चालले आहेत? बुद्धीला पटेल असे काहीतरी मानव यांनी सांगायला हवे ना? सनातन ही इतकीच पाताळयंत्री संस्था असती आणि स्मृती पुसून टाकणे असे शक्य असते, तर त्यांनी मानव यांच्या सनातन विषय स्मृती कशाला सुखरूप बाहेर जाऊ दिल्या असत्या? का पुसल्या नाहीत?
खरे म्हणजे जे कोणी अंधश्रध्दा निर्मूलनवाले आहेत, त्यांचा विज्ञानावर किंचित विश्वास असेल, तर असे सवाल त्यांनी श्याम मानव यांना विचारायला पुढे यायला ह्वे होते. पण त्यांचा प्रचलित विज्ञानाशी कसलाही संबंध नाही. म्हणूनच त्यांना असे कुठलेही बुद्धीप्रामाण्यवादी प्रश्न पडत नाहीत, की मानवाला विचारावे असे वाटत नाही. मग काय मानव कुणातही खुनी सनातनी शोधतो, कधी मनोमनी शोधतो. एक गोष्ट मात्र श्याम मानव यांची मान्य करावी लागेल. त्यांनी निर्मूलनवादी गोटातल्या अनेकांच्या गैरसोय करणार्या स्मृती यशस्वीरित्या पुसून टाकलेल्या असाव्यात. अन्यथा कोणीही असे नेमके टोकेरी प्रश्न मानवाला विचारले असते आणि मानव संमोहीत असल्यासारखे तर्कहीन बरळत फ़िरले नसते. मानव किंवा निर्मूलनवाले एक गोष्ट विसरतात, की खुन हत्या करणार्याच्या स्मरणापुरता विषयच नसतो. जी घटना घडते, ती मारेकर्याच्या स्मरणात नोंदलेली असणे वा पुसली जाण्याचा अन्य पुराव्याशी काडीमात्र संबंध नसतो. गुन्हा वा खुन झाल्यावर अनेक पुरावे मागे शिल्लक उरतात, ते कोणी संमोहनाने पुसून टाकू शकत नाही. अगदी रक्ताचे पुसलेले डागही उलगडण्याचे विज्ञान आता विकसित झाले आहे व त्याला कोर्टाची मान्यता मिळालेली आहे. म्हणूनच समीर गायकवाड असो वा आणखी कोणा गुन्हेगाराची स्मृती पुसण्य़ाने खुनाचे रहस्य उलगडायचे थांबू शकत नाही. त्याच्या इन्काराने पुरावे खोटे पडत नसतात. मात्र बिनबुडाचे काल्पनिक दावे कधी टिकत नाहीत वा खरे ठरत नाहीत. भ्रामक विज्ञानाच्या आधारे जगणार्यांना संमोहित करायचीही गरज नसते. ते आपल्या समजूतीने इतके भारावलेले असतात, की आपण काय करतो बोलतो, याचेही त्यांना भान उरत नाही, खुद्द श्याम मानव त्याची प्रात्यक्षिके कॅमेरे व पत्रकार मंडळींना देत आहेत. म्हणूनच संमोहित पत्रकारही त्यांना नेमके प्रश्न विचाराण्याची स्मृती पुसट झाल्यासारखे वागताना दिसतात.
>>संमोहीत व्यक्तीकडून कुठलेही गैरकृत्य करून घेता येते आणि नंतर त्याच्या स्मृती पुसून टाकल्या की त्याला आपला गुन्हाही आठ्वत नाही, असा मानव यांचा पहिला दावा आहे<<
ReplyDeleteअसे त्यांचे विधान नाहीये. मधे ब्रेन वॊशिंग चा भाग आहे आणि शाम मानवांच्या मताशी हमीद दाभोलकर व संमोहन तज्ञ मनोहर नाईक सहमत नाहीत.
Khupach chhaan lekh ....BHau....!!!
ReplyDeleteशाम मानव यांचे इनोदी फार्सिकल नाटक
ReplyDelete" शाम मन मोही।संमोही॥
सर्वही हसती।टिंगल पुर्ती कायद्याची॥
खुप छान झोड़पलेत मानव नावे मर्कटलीला करणाऱ्यांना !!
ReplyDeleteमानवावर बरेच प्रयोग होत असतात.
ReplyDeleteसंमोहिनी, "सोम" मोहिनी, "मोहिनी" इ. इ.
हा कशाचा अंमल असावा?
ओळखा पाहू.
देवाने जेव्हा अक्कल वाटली तेव्हा मान व कुठे गेला होता शेण खायला
Deleteदेवाने जेव्हा अक्कल वाटली तेव्हा मान व कुठे गेला होता शेण खायला
ReplyDeleteअंधश्रद्धा निर्मूलन हा चांगला विचार आहे, पण केवळ हिंदू धर्म व साधूंना विरोध करण्याच्या नादात हे लोक भरकटले. अनिसच्या नावावर भोंदूगिरी करणारे अनेक समाजद्रोही एकत्र आल्याने चळवळ अस्ताकडे जात आहे... अर्थात यात बारतीय समाजाचे नुकसान होणार आहे...
ReplyDelete