Sunday, October 4, 2015

दादरीला नाशिकचे चोख उत्तर



नांदेड व औरंगाबाद येथील महापालिका निवडणूकीत यश मिळवल्यावर आणि विधानसभेच्या मतदानात आपला प्रभाव पाडणार्‍या हैद्राबादच्या ओवायसी बंधूंना नाशिकमध्ये प्रथमच चोख उत्तर मिळाले आहे. देशातील मुस्लिमांना वेगळे करून त्यांच्या मतांची मक्तेदारी आपल्याकडेच असल्याचे सिद्ध करण्यासाठी झटणार्‍या या रझाकारांच्या वारसांना भारतातल्या मुस्लिमांनी आपला खरा रंग दाखवण्यास आरंभ केला असे नक्कीच म्हणता येईल. कारण लौकरच दिड वर्षात नाशिकसह अनेक महापालिकांच्या निवडणूका व्हायच्या आहेत आणि त्यात नाशिकचाही समावेश आहे. तिथे मुस्लिम वस्तीत व लोकसंख्येत आपले  बस्तान बसण्याचा प्रयत्न एम आय एम या पक्षाने चालविला आहे. त्यासाठी पक्षाचे आमदार इम्तियाझ जलिल यांच्या नेतृत्वाखाली नाशिक येते एक मिरवणूक आयोजित केली होती. प्रामुख्याने मुख्य रस्ते व मुस्लिम भागातून फ़िरणार्‍या या मिरवणूकीला भद्रकाली भागात मुस्लिम वस्तीतच काळे झेंडे दाखवण्याचा प्रकार झाला आणि तणावाची स्थिती निर्माण झाली. सहसा असा प्रकार बिगर मुस्लिम पक्ष वा संघटनांकडून होत असतो. म्हणून तणावाची स्थिती निर्माण होते. पण नाशिकची कहाणी खुप वेगळी आहे. तिथे मुस्लिम वस्तीत आपले स्वागत होईल, अशी या पक्ष नेत्यांची अपेक्षा होती. पण घडले उलटेच! तिथल्या मुस्लिम नागरिकांनी पुढाकार घेऊन ओवायसींच्या नेते व पाठीराख्यांच्या या मिरवणूकीचे काळ्या झेंड्यांनी स्वागत केले. तिरंगाही फ़डकवला. आपल्याला ओवायसी नकोत तर धार्मिक सौहार्द हवे, अशा घोषणा हा मुस्लिमांचा जमाव देत होता. तिथे अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला व त्यांच्याच संरक्षणात ओवायसी पाठीराख्यांची मिरवणूक पुढे न्यावी लागली. याचा अर्थ नाशिकचे मुस्लिम राष्ट्रवादी वगैरे प्रमाणपत्र देण्य़ाची गरज नाही, तर त्याचा सर्वांनी समंजस विचार करणे आवश्यक आहे.

गेल्या तीनचार वर्षात ओवायसी हैद्राबाद सोडून महाराष्ट्रात सतत मुलूखगिरी करीत आहेत आणि मुस्लिम वस्त्यांना लक्ष्य करून आपले बस्तान बसवण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांना अनेक भागात चांगला प्रतिसादही मिळाला आहे. दोन महापालिकात मोठ्या संख्येने नगरसेवक निवडून आले, तर दोन आमदारही विधानसभेत पोहोचले. अनेक जागी त्यांचे विधानसभा उमेदवार दुसर्‍या क्रमांकाने पराभूत झाले. त्यामुळेच मग ओवायसी यांनी बिहारच्या विधानसभा निवडणूकीतही उडी घेतली आहे. त्याचीच पुनरावृत्ती नाशिक व अन्य शहरात होण्याची अपेक्षा त्यांनी बाळगली तर गैर मानता येणार नाही. मात्र मुस्लिमांनीच ओवायसी नकोत अशी निदर्शने करण्याची ही घटना वा अनुभव, त्या पक्षाला नवा किंवा पहिलाच आहे. किंबहूना त्या निदर्शनात भाग घेणार्‍या मुस्लिमांच्या घोषणाही काही भयंकर सत्य सांगणार्‍या आहेत. धार्मिक सौहार्द हवे आणि ओवायसी नकोत, याचा अर्थ हा पक्ष वा त्याचे नेते धार्मिक तेढ निर्माण करतात, ही मुळात शिवसेना वा भाजपाची तक्रार आहे. त्यावर पुरोगामी सहसा बोलत नाहीत. म्हणूनच मग ओवायसींच्या पक्षाच्या धर्मांधतेला आश्रय मिळत गेला होता. नुसती त्यांच्याविषयी तक्रार केली तरी तक्रार करणार्‍याला हिंदूत्ववादी ठरवून झोड उठवली जात होती. अगदी स्वत:ला पुरोगामी म्हणवणारे पक्षही त्याबद्दल अवाक्षर बोलत नव्हते. अशा पार्श्वभूमीवर नाशिकच्या मुस्लिमांचे स्वागत करायला हवे. कारण इथल्या पुरोगाम्यांना जे बोलायची हिंमत होत नाही, ते मुस्लिम सामान्य नागरिकांनी खुलेआम रस्त्यावर येऊन बोलू लागला आहे. तेवढेच नाही, तर धार्मिक तेढ कुठून कोण निर्माण करतो, त्याकडे त्याने बोट दाखवले आहे. जे पुरोगाम्यांनी बोलावे त्यासाठी सामान्य मुस्लिमांना रस्त्यावर येण्याचा प्रसंग यावा, यातच सेक्युलर विचारांच्या पाडावाचे कारण लक्षात येते.

नाशिकच्या मुस्लिमांच्या या कृतीला आणखी एक पदर आहे. ज्यावेळी देशभऱचे व महाराष्ट्रातले पुरोगामी शहाणे उत्तरप्रदेश दादरी येथील अमानुष हिंदू जमावाच्या कृतीचा निषेध करण्यात गर्क आहेत, त्याच काळात नाशिकच्या मुस्लिमांनी आपल्या धार्मिक सौहार्दाचा झेंडा हाती घेतला आहे. वास्तविक दादरी येथील एका निष्पाप मुस्लिम वृद्धाची निर्घृण हत्या झालेली असताना, त्याचा राग म्हणून नाशिकच्या मुस्लिम वस्तीत ओवायसींचा जयजयकार व्हायला हवा होता. आजवर बहुधा असेच होत आले आहे. किंबहूना असे घडायचे तेव्हा पुरोगाम्यांनी त्याला चुचकारण्याचाही उद्योग कायम केला आहे. त्यातून मग सतत हिंदू मुस्लिम तेढ वाढत गेली आहे. त्यातून मग ओवायसी यांच्यासारख्या धर्मांध विखारी नेत्यांना प्रोत्साहन व बळ मिळत गेले आहे. मात्र त्याचे दुष्परिणाम सामान्य मुस्लिमांना व हिंदूंनाही दंगल रुपाने भोगावे लागले आहेत. ओवायसींचे वा इतर कोणाचेही राजकारण होते आणि आपल्याला प्राणाचे मोल मोजावे लागते, याचा साक्षात्कार मुस्लिमांना होऊ लागल्याचा हा धडधडीत पुरावा आहे. त्यानुसार त्यांनी स्वयंस्फ़ुर्तीने केलेली कृती म्हणूनच स्वागतार्ह आहे. पण मोलाची गोष्ट अशी, की दादरीच्या घटनेचा बोलबाला असताना मुस्लिम वस्तीतून दाखवला गेलेला संयम हिंदूत्वाचे झेंडे मिरवणार्‍यांनाही समज देणारा आहे. भले कोणी दादरीच्या घटनेचे भांडवल करणार असेल व आम्हाला भडकवू बघत असेल, पण मुस्लिम अशा चिथावण्यांना बळी पडणार नाहीत, हे बहुसंख्य समाजाला समजावण्याचा हा इवलासा प्रयत्न आहे. पण त्याची प्रेरणा खुप व्यापक आहे. दादरीच्या क्रुर कृत्याला तशाच भाषेत उत्तर देणे माणूसकीचे नाही, तर त्याच जखमांवर फ़ुंकर घालणे त्यावरचा उपाय आहे, असे कृतीतून नाशिकच्या मुस्लिमांनी दाखवून दिलेले आहे. दादरीला इतके चोख उत्तर गेल्या चार दिवसात कोणी दिले नाही.

दादरीची घटना ताजी असताना ओवायसींच्या पाठीराख्यांनी नाशिकमध्ये काढलेला मोर्चा वा मिरवणूक स्पष्टपणे दुखर्‍या भावनांचा लाभ उठवण्यासाठीचा खेळच होता. पण तो हाणून पाडायला कोणी पुरोगामी पक्ष पुढे आला नाही, की कोणी हिंदूत्ववादी विरोधात पुढे आले नाहीत. अशा वेळी तिथल्या मुस्लिमांनी घेतलेला पुढाकार सर्वच राजकीय पक्ष व आपापल्या भूमिका कुरवाळत बसलेल्यांना लाजवणारा प्रयोग आहे. भूमिका व भांडणात भवितव्य कोणाचे नसून सौहार्दात व एकोप्यात भविष्य असल्याची नाशिककर मुस्लिमांनी दिलेली साक्ष बहुमोलाची आहे. आता किती पुरोगामी त्यांची पाठ थोपटायला पुढे यतील ते दिसेलच. पण जबाबदारी फ़क्त पुरोगाम्यांचीच नाही. स्वत:ला हिंदू संघटना व हिंदू हिताचे पुरस्कर्ते म्हणवून घेतात, त्यांनीही अशा मुस्लिमांना शक्ती व प्रोत्साहन द्यायला पुढे यायला हवे. कारण सौहार्दाने जसे मुस्लिम सुरक्षित होतात, तसेच हिंदूही सुरक्षित होतात. कितीही मतभेद वा परस्पर विरोध असला, तरी शेवटी माणुस म्हणून आपले हित परस्परांशी सहकार्य करण्यात आहे. त्यात दादरीसारख्या घटना हे अपवाद समजून पुढे गेले पाहिजे, असे कृतीतून सांगितले गेले आहे. शिवाय त्याच्याही पुढे जाऊन ओवायसी नकोत इथपर्यंत हे मुस्लिम मजल मारतात, त्यांची सामाजिक जाण सन्मानीय ठरायला हवी. मुस्लिमांनी ओवायसी तेढ वाढवणारा म्हणून नको अशी भूमिका घेतली असेल, तर हिंदूमध्येही अशा धार्मिक तेढ वाढवणार्‍या ज्या प्रवृत्ती आहेत. त्यांना नकार सांगायला हिंदू पुढे आले पाहिजेत. हिंदू याचा अर्थ तथाकथित पुरोगामी नव्हेत. ज्यांना आपल्या धर्माचा अभिमान आहे, पण त्यातल्या वाईट प्रथा चालीरितीचा तिटकारा आहे, अशा हिंदूंनी या मुस्लिमांची पाठ थोपटून त्यांच्या सूरात सुर मिळवला पाहिजे. कारण नाशिककर मुस्लिमांनी केवळ ओवायसी नाकारलेले नाहीत, तर दादरीच्या हिंसक हिंदू जमावालाही कृतीतून संयमी अहिंसक चपराक दिली आहे.

8 comments:

  1. ओवेसी कॉंग्रेसची मते खात असल्यामुळे ही त्यांचीही खेळी असू शकते.

    ReplyDelete
  2. एक चांगला प्रयोग

    ReplyDelete
  3. हि एक स्वागतार्ह घटना आहे त्याचे यथोचित कौतुक व्हावयास पाहीजे

    ReplyDelete
  4. सुतावरून स्वर्ग गाठण्याची कसरत ह्या लेखात आढळते. ओवेसीचा विरोध करुन हिंदूंना उपकृत केले म्हणून हुरळून जाऊन प्रतिक्रिया देण्या सारखी ही घटना नाही. आलिप्त पणे दखल घ्यावी हे ठीक.

    ReplyDelete
  5. याचा अर्थ नाशिकचे मुस्लिम राष्ट्रवादी वगैरे प्रमाणपत्र देण्य़ाची गरज नाही-
    what is its meaning?

    ReplyDelete
  6. अभिमानास्पद.

    विवीधतेत एकता, जय हिंद।

    ReplyDelete
  7. "याचा अर्थ नाशिकचे मुस्लिम राष्ट्रवादी वगैरे प्रमाणपत्र देण्य़ाची गरज नाही, तर त्याचा सर्वांनी समंजस विचार करणे आवश्यक आहे." यातील पहिला भाग कळाला नाही

    ReplyDelete