Tuesday, October 6, 2015

शिया सुन्नी संघर्षाची भयानकता



ज्या सिरीयातून चाळीस लाखाहून अधिक निर्वासित युरोपकडे पळत सुटले आहेत, त्याच देशावर सध्या रशियाने हवाई हल्ले सुरू केले आहेत. मात्र त्याच देशाचा राष्ट्रप्रमुख बशर असद त्या हल्ल्याचे स्वागत करतो आहे. किती चमत्कारीक बाब आहे ना? एका बाजूला देशातील अस्थिरतेने अराजक माजले आहे आणि त्याचवेळी परदेशी हवाई हल्ल्याचे देशाच्या प्रमुखाने स्वागत कशाला करावे? तर जे लोक असद यांची सत्ता उलथून पाडायला बंड करून उठले आहेत, त्यांनाच रशियाचे बॉम्बहल्ले निकामी करतील, अशी असद यांना आशा आहे. त्यात रशियाला यश मिळावे अशी असद यांची प्रार्थना आहे. तेवढ्यावर असद थांबत नाहीत. रशिया अपेशी ठरला तर मध्य-पश्चिम आशियात यादवी अंधाधुंदी माजेल असाही इशारा असद यांनी दिला आहे. खरे तर असे हल्ले नवे नाहीत. तीन वर्षापुर्वी नाटो या पाश्चात्य देशांच्या लष्करी संघटनेने असेच हल्ले सिरीयात केलेले होते. मात्र ते बंडखोरांना संपवायला नव्हते, तर असद यांनी बंडखोरांच्या विरोधात रासायनिक अस्त्रे वापरली, म्हणून झाले होते. म्हणजेच आपण माणुसकीच्या दृष्टीने सिरीयात हवाई हल्ले केल्याचा पाश्चात्य देशांचा दावा होता. पण त्यातून शेजारच्या इराकमधील जिहादी इतके शिरजोर झाले, की त्यांनी सिरीयाच्या प्रदेशात घुसून काही प्रांत बळकावला. तेव्हा त्यांना रोखायला असदपाशी ताकद शिल्लक उरली नव्हती. या इराकी जिहादींना आता जग इसिस म्हणून ओळखते. त्यांना सौदी अरेबिया व अन्य सुन्नी अरबी देशांचा पाठींबा आहे. म्हणूनच त्यांनी सौदी वगैरे भागात नाक खुपसलेले नाही. अमेरिकाही सौदीशी मैत्री करून असल्याने तिने इसिस या सौदीच्या बुजगावण्याला हात लावायचा प्रयत्न केला नाही. निव्वळ इशारे मात्र पाश्चात्य देश देत असतात. कारण त्यांना असदला पुर्ण नामोहरम करायचे आहे. सौदीलाही तेच हवे आहे.

इथे काही गोष्टी ज्या लपवल्या जातात, त्या संदर्भ जोडून बघाव्या लागतील. अफ़गाण भूमीपलिकडे असलेल्या पश्चिम आशियात सर्वच देश मुस्लिम वा अरब असले तरी त्यात एक वांशिक व धार्मिक भेद आहे. शिया व सुन्नी अशा दोन इस्लामी पंथामध्ये त्यांची विभागणी झालेली आहे. दोन्ही मुस्लिम पंथ परस्परांना कायम पाण्यात पहात असतात. त्यात जोपर्यंत सद्दाम मध्ये होता, तोवर सौदीने लक्ष घातले नव्हते. पण सद्दाम संपला आणि शियाबहुल इराकमध्ये शिया सत्ताधीश येण्याची शक्यता निर्माण झाली. तसे झाले तर इराण, इराक, सिरीया व लेबानॉन अशी उभी भिंत सौदी व अन्य अरबी सुन्नी देशांना धोक्यात आणू शकते. त्यासाठीच मग बहुसंख्य असून इराकमध्ये शिया पंथीय सत्ताधीश होऊ द्यायचा नाही, हा सौदीला अट्टाहास होता. अमेरिकेने त्याला मान्यता दिलेली आहे. तर इराण इराकमध्ये शिया शिरजोर होण्यासाठी सर्व पाठबळ पुरवित असतो. त्यातून हा सत्तासंघर्ष पेटला आहे. त्यात पाश्चात्य देश सुन्नीचे पक्षपाती झाल्यावर रशियाला शियांच्या बाजूने उभे रहाणे भाग आहे. ही विभागणी समजून घेतली तर इसिसचाही उलगडा होऊ शकतो. इराकमधील शियासत्तेला व बहुसंख्येला हैराण करण्यासाठी सौदीच्या सहाय्याने जी छुपी बंडखोर मंडळी उभी करण्यात आली ते मुळातच सद्दामच्या सैन्यातील सुन्नी सैनिक होते. त्यांना पैसा व रसद पुरवून, सौदीने आपले बुजगावणे उभे केले. पुढे त्यांनाच सिरीयातील अराजकाचा लाभ उठवायला प्रोत्साहन दिले आहे. त्यात अडचण नको व असदपुढे हे सुन्नी जिहादी तोकडे पडू नयेत, म्हणून सौदीने पाश्चात्यांकडून हवाई हल्ले सिरीयावर करून घेतले. त्याला थेट धर्मपंथाचा रंग दिला जाऊ नये, म्हणून रासायनिक अस्त्रांच्या वापराचे कारण पुढे करण्यात आले. आता निर्वासितांचा लोंढा अंगावर आला, तेव्हा पाश्चात्य देशांची तारांबळ उडाली आहे तर रशिया सौदी गंमत बघत आहेत.

इतके दिवस पाश्चात्यांशी वाद नको म्हणून रशियाने थेट हस्तक्षेप केला नव्हता. पण असदची सत्ता कोसळू नये इतकी मदत रशिया उघडपणे करीत होता. आता पाश्चात्य देश निर्वासितांमुळे गांजले असताना रशियाने आपल्या असद नामे शिया बुजगावण्याला शिरजोर करण्याची संधी शोधली आहे. त्याला अर्थातच इराणचा पाठींबा असणार. त्यात रशियन हल्ले इसिसला मदतकारी ठरतील, अशी भिती पाश्चात्य देशांनी व्यक्त केली आहे. पण वास्तवात त्यांच्याच आधीच्या हल्ल्याने इसिसचा जन्म झाला आहे. पाश्चात्य देशांना भिती इतकीच आहे, की रशियाच्या हस्तक्षेपाने इसिस सैल पडली तर पुन्हा असद बलवान होईल. पर्यायाने इराणचा या विभागतला प्रभाव वाढेल. तीच भिती सौदीला आहे. कारण सौदी व इराण हेच या भागातील दोन खरे तुल्यबळ देश आहेत आणि त्यांच्या सत्तास्पर्धेत बाकीचे लहानमोठे देश भरडले जात आहेत. त्यात अर्थातच आपापला स्वार्थ बघून बडे देश व सत्ता आपापले हेतू साध्य करून घेत असतात. पण आज जगासमोर जे चित्र निर्वासित वा पेट्रोलवर वर्चस्व असे निर्माण केले जाते, त्यापेक्षा वस्तुस्थिती भिन्न आहे. पश्चिम आशियातील हा संघर्ष शेकडो वर्षे जुना असून वसाहतीच्या साम्राज्य काळात त्याला धार्मिक धार फ़ारशी नव्हती. किंवा बोथट झालेली होती. कारण तिथल्या सत्ताधीशांना युरोपियन साम्राज्याचे मांडलिक म्हणून जगावे लागत होते. स्वतंत्र होऊन आपापल्या सत्ता प्रस्थापित झाल्यावर मुळचा धार्मिक व पंथिक संघर्ष पुन्हा उफ़ाळून आला आहे. त्यात मग विविध पुढारलेले देश आपापला स्वार्थ साधून भाग घेत असतात वा भूमिका घेत असतात. म्हणूनच पाश्चात्य देश असोत किंवा रशिया असो, त्यापैकी कुणालाही पश्चिम आशियातील जनतेच्या सुरक्षित जीवनाची फ़िकीर नाही. किंबहूना तिथल्या तमाम सत्ताधीशांनाही जनतेविषयी आपुलकी नाही. सगळा झगडा शिया-सुन्नी याच गुंत्यातला आहे.

एक गोष्ट मात्र निश्चीत, की असल्या राजकीय गुंतागुंतीचे विचित्र परिणाम भोगण्याइतकी पश्चिम आशियातील जनता सुखवस्तु नाही. म्हणूनच घरदार सोडून जीवावर बेतलेला युरोपचा आश्रय घ्यायला हजारोच्या संख्येने हे लोक बाहेर पडले. पण त्यातून युरोपीय लोकांच्या सुखवस्तू जीवनात जे वादळ घोंगावू लागले आहे, त्याचे भीषण परिणाम भोगायला युरोपियन जनता कितपत तयार आहे? आठ दशकांपुर्वीच्या युद्धकालीन आठवणी सांगणारी पिढी तिथे संपलेली आहे आणि पुढल्या काळातल्या सुबत्ता व सुखवस्तुपणाने आळसावलेली पिढी आज निष्क्रीय जीवन जगते आहे, हालअपेष्टा सोसण्याची कुवत या युरोपियन समाजात राहिलेली नाही. त्यांच्यावर असल्या राजकारणाने जे संकट येऊ घातले आहे, त्याने जागतिक युद्धाला तोंड लागू शकेल. आज पश्चिम आशियात जे अराजक आहे, त्यातून सुटायला युरोपात घुसलेल्या त्या हजारो लाखो लोकांना समावून घेताना व त्यांचे रागलोभ सोसतानाम युरोपियन लोकसख्या विचलीत होईल. तेव्हा तिथे नव्या यादवीला तोंड द्यावे लागणार आहे. सोशिक युरोपियन व आक्रमक अरबी संस्कृतीचा संघर्ष पेटला, तर तो जगाला नव्या युद्धाच्या खाईत लोटल्याशिवाय रहाणार नाही. जे काही चालले आहे, ते महायुद्धाला दिलेले आमंत्रण ठरू शकेल. म्हणूनच असद म्हणतो, त्यात काहीसे तथ्य आहे. रशियाचे अपयश पश्चिम आशियाला यादवीच्या गर्तेत घेऊन जाईलच. पण मग त्यातून पळत सुटणारा लोंढा युरोपच्या सीमांवर धडका देऊ लागेल. तेव्हा आतले आधीचे निर्वासित दार वाजवणार्‍या बाहेरच्या नव्या निर्वासितांच्या मदतीला जातील, की युरोपियनांच्या बाजूने उभे रहातील? म्हणूनच हा पश्चिम युरोप व पश्चिम आशियाला भेडसावणारा प्रश्न आहे. त्याचा भडका उडाला, तर आगीशी खेळणार्‍या सौदीला व इराणलाही त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागतील, यात शंका नाही. हा शिया-सुन्नी संघर्ष अवघ्या जगाला आपल्या लपेट्यात घेऊ शकेल.

1 comment: