Monday, October 26, 2015

छोटा राजनच्या अटकेतील गुंतागुंत?

Chhota Rajan (

(अटकेनंतरही हसतमुख छोटा राजन?)

छोटा राजन ह्या कुख्यात गुंडाला इंडोनेशियात अटक झाल्याची बातमी खळबळजनक ठरणे स्वाभाविक आहे. कारण निदान मागली पंधरा वर्षे तरी तो भारतीय कायद्याला हुलकावणी देतोय. तसे बघितले तर तीस वर्षे त्याने भारतीय कायद्याला हुलकावण्य़ा दिल्या आहेत. पण खरोखरच अशा गुंडांना पकडण्याविषयी भारतीय पोलिस किती गंभीर होते, याचीच नेहमी शंका येते. कारण १९८० च्या दशकात दाऊद सोबतच अनेक माफ़िया गुंड दुबईत वास्तव्य करून होते. त्यांच्यावर इथे अनेक गुन्हे नोंदलेले असले तरी, त्यांना मायदेशी आणून कोर्टाच्या हवाली करण्यासाठी काय झाले, त्याचा तपशील कधीच समोर आला नाही. पण १९९२ मध्ये बाबरी पाडली जाण्याची घटना व नंतर काही महिन्यातच मुंबईतली बॉम्बस्फ़ोट मालिका; यानंतर दाऊद व राजन यांच्यात बेबनाव निर्माण झाला. तेव्हापासून राजनने स्वत:ला हिंदूचा कैवारी असल्याचा मुखवटा पांघरून दाऊदशी खुले वैर पत्करले होते. तिथे दुबईतून राजन फ़रारी झाल्याच्या बातम्या होत्या, तशाच तिथे व भारतात या दोन टोळीबाजांच्या साथीदारात एकमेकांच्या साथीदारांचे मुडदे पाडण्याचे सत्र सुरू झाले होते. त्याचा कळस मग २००२ सालात थायलंडची राजधानी बॅन्कॉक येथे राजनवर गोळीबाराने झाला. तिथे रोहित वर्मा नामक राजनच्या साथीदाराच्या मुलाचा वगैरे वाढदिवस होता. त्यानिमीत्त जमलेले असताना अकस्मात तिथे घुसलेल्या मारेकर्‍यांनी राजनचा गेम साधला. पण राजन त्यातून बचावला. वर्मा मारला गेला आणि राजन खिडकीतून उडी मारून फ़रारी झाला. तो अर्थातच पोलिसांच्या हाती लागला होता. पण त्याला भारतात आणण्याची कुठलीच कारवाई झाली नाही आणि एकेदिवशी राजन इस्पितळातून फ़रारी झाल्याच्या बातम्या झळकल्या. ते बहुधा २००२ साल असावे. पुढे कोणाला कधी राजनचा ठावठिकाणा लागला नव्हता.

राजनवर हल्ला करणारे मारेकरी पकडले गेले आणि त्या हल्ल्याची जबाबदारी दाऊदचा विद्यमान उजवा हात छोटा शकील याने घेतली होती. पुढे त्या मारेकर्‍यांचा तिथे बचाव करायला पाकिस्तानातून नामवंत वकीलही पोहोचले होते. यावरून पाकिस्तानात दाऊद वा शकीलचे असलेले वजन लक्षात येऊ शकते. त्या खटल्याचे पुढे काय झाले त्याचा पत्ता नाही. पण छोटा राजन मात्र थायलंड वा बॅन्कॉकमध्ये थांबला नाही. तो तिथून कसा निसटला व गायब झाला, ते आजही रहस्य आहे. तेव्हाची आणखी एक आठवण नमूद करण्यासारखी आहे. महाराष्ट्रात तेव्हा छगन भुजबळ उपमुख्यमंत्री व गृहमंत्री होते. त्यांनी मुंबई पोलिसांना राजनला भारतात आणण्यासाठी बॅन्कॉक येथे धाडले होते. पण त्या पथकाला हात हलवत परत यावे लागले. कारण अशा कारवाया अन्य राज्यातून आरोपी आणतानाही उतावळेपणाने होत नाहीत. इथे तर भिन्न देशातून आरोपीला आणायचे होते. त्यासाठी भारत सरकारच्या परराष्ट्र खात्यामार्फ़त प्रयत्न व्हायला हवे होते. पण भुजबळांच्या उतावळेपणाने सगळ्याच गोष्टींचा विचका होऊन गेला. आज इंडोनेशियात राजनला अटक होऊ शकली, तर तेव्हाही भारत सरकारच्या मदतीने राजनला भारतात आणणे अशक्य नव्हते. पण परस्पर मुंबई पोलिसांचे पथक बॅन्कॉकला पाठवणे शुद्ध अतिरेक होता. अखेर राजन तिथून अलगद निसटला. कारण थायलंडमध्ये त्याच्या विरोधात कुठला गुन्हा नव्हता की खटला चालू नव्हता. तिथपासून आजपर्यंत राजन भारतीय कायद्याला हुलकावण्या देत राहिला. अनेकदा विषय निघाला, तेव्हा त्याने फ़ोन करून भारतीय माध्यमांना मुलाखती दिल्या किंवा खुलासेही दिले होते. म्हणजेच त्याला हुडकून काढणे अशक्य नव्हते. पण तसे का झाले नाही हे जितके रहस्य आहे, तितकेच आता अकस्मात ऑस्ट्रेलिया व इंडोनेशिया सरकारशी संपर्क साधून राजनला अटक करण्याचे कारणही रहस्यमय आहे.

मध्यंतरी सात आठ वर्षापुर्वी मुंबईतील एका इंग्रजी पत्रकाराची उपनगरात हत्या झाली होती. नेहमीप्रमाणे आपल्या मोटरबाईकने निघालेल्या जे डे नामक या पत्रकाराला वर्दळीच्या रस्त्यावर गोळ्या झाडल्या गेल्या होत्या. त्याची हत्या राजनच्या साथीदारांनी केल्याची बोंब होती. मग काही दिवसांनी त्याच गुन्ह्यात एका महिला पत्रकाराला अटक झाली. तिच्यावर डे याच्या हालचालींची माहिती राजनला पुरवल्याचा आरोप होता. दुसरीकडे डे हा पत्रकार म्हणून काम करताना राजनची माहिती शकीलला देत असल्याचेही म्हटले गेले. पुढे त्यावर पडदा पडला. अधूनमधून शकील व राजन परस्परांना भारतीय माध्यमांच्या ‘मध्यस्थीने’ धमकावत राहिले. पण राजनचा पोलिसांनी तपास घेतला, असे सहसा कुठे वाचनात आले नाही. ही पार्श्वभूमी लक्षात घेतली, तर अकस्मात राजनविषयी भारतीय पोलिस यंत्रणा व सरकार इतके दक्ष कशासाठी झाले, हे खरे रहस्य आहे. एका बाजूला दाऊद थकल्याने परत मायदेशी येऊ इच्छितो अशा बातम्या कानावर येतात आणि त्याचाच समवयस्क राजन आता बेड्या ठोकून मायदेशी आणला जाणार आहे. थकल्या वयात गुन्हेगारी साम्राज्य चालवणे अशक्य असल्याने मायदेशी येण्याची त्याचीच इच्छा यातून पुर्ण केली जात असावी काय? कारण कितीही खटले व गुन्हे दाखल झालेले असले, तरी राजनसारख्या गुन्हेगाराची प्रकृती सुखरूप राखणे हे कायदा व्यवस्थेचे काम रहाणार आहे. म्हणजेच उद्या जेव्हा केव्हा राजनला भारतात आणले जाईल, तेव्हा त्याला तुरूंगात कोंबण्यापेक्षा कडेकोट बंदोबस्तामध्ये एखाद्या वैद्यकीय व्यवस्थेत ठेवले जाण्याची शक्यता अधिक आहे. किंवा त्यासाठीच त्याला इथे आणले जात नसेल कशावरून? हे एकूणच घटनाक्रमाचे खरे रहस्य आहे. ज्याच्यावरचा पडदा दिर्घकाळ उठवला जाऊ शकणार नाही. कारण अटक परदेशी झालेली आहे आणि इथे आरोपीला आणायला अजून काही दिवस जातील.

इंडोनेशिया वा ऑस्ट्रेलिया यांच्या मदतीने राजनला पकडण्यात आल्याचे वृत्त आहे. म्हणजेच त्याचे दिर्घकाळ वास्तव्य दक्षिण आशियात असावे. थायलंडमध्ये त्याला शेवटचे बघितले गेले होते. तेव्हा जखमी अवस्थेत त्याचे फ़ोटो व चित्रण वाहिन्यांवर झळकले होते. त्यानंतर तो गायब होता व अनेक देशात फ़िरत होता. इंडोनेशिया वा मलेशिया, ऑस्ट्रेलिया अशा कुठल्या तरी देशातून त्याने माध्यमांशी संपर्क साधलेला असल्याचे आपण वारंवार ऐकत आलो. म्हणजेच त्याचे तिथे असलेले वास्तव्य हे रहस्य नव्हते. मग इतके दिवस भारतीय कायदा यंत्रणेने त्याच्यासाठी प्रयत्न का केले नव्हते? की त्याला गुन्हेगार असूनही त्या त्या देशांनी आश्रय दिलेला होता? राजनची व दाऊदची गोष्ट एकदम भिन्न आहे. १९९३ च्या स्फ़ोटानंतर दाऊद जवळपास अंतर्धान पावला. त्याचे दुबईनंतरचे फ़ोटो व फ़ोन पुर्णत: थंडावले होते. शकीलकडून दाऊदच्या नावे धमक्या वा इशारे यायचे तितकेच. मध्यंतरी दाऊदच्या घरी कराचीत फ़ोन लावला गेला व त्याच्या पत्नीनेच उचलून बातचित केल्याचा गाजावाजा झाला होता. पण राजन खुलेआम माध्यमांशी संपर्क साधत राहिला. मग त्याचा मागोवा भारतीय कायद्याने कशाला घेतला नव्हता? हे जितके रहस्य आहे तितकेच अकस्मात त्याला अन्य देशांच्या मदतीने ताब्यात घेणेही रहस्यमय आहे. मात्र त्याचा कुठलाही खुलासा दिर्घकाळ होऊ शकणार नाही. सीबीआयने त्याविषयी माहिती दिलेली आहे, म्हणजेच सध्यातरी त्याच यंत्रणेच्या ताब्यात राजन येईल. पण पुढल्या काळात त्याचा ताबा कोणाकडे असेल व ‘कसून’ चौकशी कोण करतो, यावरच राजन अटकेच खरे रहस्य उलगडायचे धागेदोरे उलगडू शकतील. तोपर्यंत माध्यमांना खळबळ उडवायचे निमीत्त, यापेक्षा राजनच्या अटकेला अधिक महत्व नाही. धुरळा खुप उडेल वा उडवला जाईल. पण माहिती म्हणून तसूभर तपशील हाती लागण्याची शक्यता नाही.

रविवारीच दाऊदविषयी मी लिहीलेला लेख आकस्मिक नव्हता, हे राजनच्या अटकेतून स्पष्ट होईल का? 

5 comments:

  1. Bhau i recently read a book Byculla to Bangkok..
    Thr bhau tosekar was mentioned..is that you?
    If it is you then it shows that you know mumbai underworld of that time.. Please write some articles in that..

    ReplyDelete
  2. Hope it helps to track down Dawood

    ReplyDelete
  3. दावूद चा शत्रू ; तो आपला मित्र !!! असे तर नाही ना ?

    ReplyDelete
  4. Bhau...aja sakali batami wachali tevha mala tumacha daud war cha nawa lekhach athawala. Ase watate aahe ki tumhi barobar andaj ghetala aahe....shekado mumbai karanchya khunyala lawkar shiksha whawi hich ichcha .

    ReplyDelete
  5. भाउ जे डे चि हत्या २०१२ ला झालेलि पवइ ला ७-८ वर्षा पुर्वि नाहि

    ReplyDelete