"The whole problem with the world is that fools and fanatics are always so certain of themselves, and wiser people so full of doubts." - Bertrand Russell
स्वत:ला विचार करणारे म्हणून विचारवंत समजणार्यांची हीच गोची असते, की त्यांना कुठल्याही बाबतीत ठामपणा स्विकारता येत नाही. ते कायम शंकाग्रस्त असतात. उलट मुर्ख किंवा माथेफ़िरू नेहमीच आपल्या भूमिकांविषयी ठाम असतात. बर्ट्रांड रसेल या बुद्धीमंतानेच असे विधान करून ठेवलेले आहे आणि तो त्याचा विचारवंतांमध्ये वावरण्यातून आलेला अनुभव असावा. किंबहूना तशीच काहीशी भूमिका रामचंद्र गुहा यांनी वैफ़ल्यग्रस्त होऊन सहा महिन्यापुर्वी मांडलेली आहे. गुहा हे इतिहासकार व लेखक म्हणून पुरोगामी वर्तुळात ख्यातकिर्त आहेत. देशातल्या तमाम पुरोगाम्यांप्रमाणेच त्यांच्याही मनात नरेंद्र मोदी बहूमत जिंकून पंतप्रधान झाल्याचे वैषम्य आहे. आपण इतके सातत्याने मोदी विरोधात अफ़वा पसरवून, खोटेनाटे आरोप करूनही तो माणूस पंतप्रधान होतो, याची वेदना त्यांना कधी लपवता आली नाही. त्यांच्यासारख्या कॉग्रेसने पोसलेल्या बहुतांश विचारवंतांची तशीच वेदना आहे. सहाजिकच त्यातून कॉग्रेसच आपल्याला बाहेर काढू शकेल, असा आशावाद त्यांनी जोपासला असला तर नवल नाही. पण गुहा हे मोजक्या अशा पुरोगाम्यांपैकी आहेत, की अजून त्यांची विवेकबुद्धी क्षीण स्वरूपात का होईना कार्यरत असावी. म्हणूनच त्यांचा उत्तरप्रदेश विधानसभेत भाजपाच्या प्रचंड विजयाने भ्रमनिरास झाला आणि त्यांनी वैफ़ल्यग्रस्त होऊन एक मुलाखत दिलेली होती. त्यात त्यांनी केलेले निदान काहीसे योग्य आहे. मोदी वा भाजपाच्या विजयाला त्या लोकांची मेहनत जितकी उपयुक्त ठरलेली नाही, तितका पुरोगामी मुर्खपणा व आततायीपणा कामी आला असल्याची कबुलीच गुहांनी त्या मुलाखतीत दिली आहे. मोदी विरोधाच्या नशेत देशातले पुरोगामी कसे देशद्रोहापर्यंत वाटचाल करत गेले, त्याचीही मिमांसा गुहा यांनी केली आहे. कुलभूषण जाधवच्या आई व पत्नीला राक्षसी वागणूक पाकिस्तानमध्ये मिळाल्यानंतरचे इथले पुरोगामी मौन गुहांच्या मिमांसेची आठवण करून देणारे आहे.
रामचंद्र गुहा म्हणतात, भारतीय डाव्यांमध्ये दोन मतप्रवाह होते. त्यातला कम्युनिस्ट प्रवाह कधीच देशप्रेमी वा राष्ट्रवादी नव्हता. ते बहुतांश सोवियत युनियन वा चीनशी एकनिष्ठ होते. पुढल्या काळात त्या निष्ठा क्युबा, व्हिएतनाम अशा बदलत गेल्या. दुसरा प्रवाह समाजवादी चळवळीचा होता. त्यांचे देशावर प्रेम होते आणि सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत त्यांचाच पुढाकार होता. आपला देश व समाज अधिक सुखी व समतावादी होण्याकडे त्यांचा कल होता. प्रामुख्याने म्हणूनच हिंदू समाजवादी उदारमतवादी बहुसंख्य हिंदू समाजात प्रभावशाली होते. नंतरच्या काळात समाजवादी चळवळ भरकटत गेली आणि त्यांनी देशप्रेम वा राष्ट्रनिष्ठा वार्यावर सोडून दिल्यामुळे, राष्ट्रवादाची संपुर्ण जागाच त्यांनी उजव्यांना मोकळी झाली. उदारमतवादाच्या आहारी गेलेल्या पुढल्या पिढीतील समाजवादी लोकांचे दोन गट झाले. त्यातला एक गट परिवारवादाच्या आहारी जाऊन (यादव) घराणेशाहीत घुसला आणि दुसरा गट हिंदू समाजात स्वत:विषयी तिरस्कार निर्माण करण्यासाठीच राबत राहिला आहे. त्यातून राष्ट्रवादाची सगळी भूमीच उजव्यांना आंदण दिली गेली आहे. जयप्रकाश नारायण, कमलादेवी चटोपाध्याय वा राममनोहर लोहिया यांच्यासारख्यांना बहुसंख्य अशा हिंदू समाजात असलेली प्रतिष्ठा, आजच्या समाजवाद्यांनी पुरती लयास घालवली आहे. मुस्लिम समाजात उदारमतवादाला कधीच स्थान नव्हते आणि हिंदू समाजातील उदारमतवादी लोकांनी हिंदूमध्ये असलेले स्थान गमावले आहे. त्यामुळे राष्ट्रवाद ही उजव्या किंवा हिंदूत्ववादी वर्गाची मक्तेदारी झाली आहे. किंबहूना ती जागाच समाजवादी लोकांनी भाजपा वा तत्सम लोकांना आंदण देऊन टाकली आहे. याचा अर्थ असा, की आता उदारमतवादी समाजवादी राष्ट्रप्रेमी राहिलेले नाहीत आणि कम्युनिस्ट तर कधीच देशप्रेमी नव्हते.
गुहा यांच्या उपरोक्त विधाने व विवेचनाचा अर्थ इतकाच होतो की आपल्या भूमिका, वक्तव्ये किंवा चळवळीतून उदारमतवादी समाजवादी वर्गाने बहुसंख्य भारतीयांच्या मनात शंका व संशय निर्माण केला आहे. त्यातून त्यांच्याकडे लोक देशद्रोही म्हणून बघू लागले आहेत. त्याच्याच परिणामी उजव्या लोकांकडे राष्ट्रप्रेमाची मक्तेदारी गेली आणि तमाम पुरोगामी उदारमतवादी देशद्रोही, अशी प्रतिमा होऊन गेली आहे. आता अर्थातच गुहा यांना कोणी मोदीभक्त म्हणू शकेल, कारण ती आजकालची पुरोगामी फ़ॅशन झालेली आहे. पुरोगाम्यांच्या चुका वा मुर्खपण दाखवला, की तो बघण्यापेक्षा समोरच्याला मोदीभक्त वा हिंदूत्ववादी ठरवणे सोपे असते. आपल्यात काही सुधारणा करण्याचे कष्ट टाळले जातात. त्यापासून मुक्ती मिळते. पण त्यामुळेच जनमानसात पुरोगाम्यांची देशद्रोही अशी प्रतिमा ठळक होत गेली आहे. ती पुसून काढण्यापेक्षा आजकालचे सेक्युलर ती अधिक पक्की करण्यालाच हातभार लावत असतात. आपली प्रतिमा सुधारण्याचे बाजूला राहिले. असे लोक भाजपा वा हिंदूत्ववादी लोकांना डिवचण्यासाठी अधिकाधिक मुस्लिमवादी वा पुढे पाकिस्तानवादी होत गेलेले आहेत. त्यातूनच मग मोदी विरोध वा भाजपा विरोध म्हणजे पाकिस्तानचे समर्थन, इतकी घसरगुंडी होऊन गेलेली आहे. आज लोहिया असते तर त्यांनीही पाक राजदूत व मनमोहन यांच्या छुप्या मेजवानीवर सवाल उपस्थित केले असते. पण त्यांचाच वारसा सांगणारे मात्र त्या मेजवानीचे समर्थन करण्यासाठी आपली बुद्धी झिजवताना दिसत आहेत. त्यातून या लोकांनी आपला शहाणपणा कुठे गहाण ठेवला आहे, असा प्रश्न पडतो. तर त्याचेही कारण आहे. लोहिया वा त्यांच्या कालखंडात हा समाजवादी मतप्रवाह चळवळीत उतरून काम करत होता आणि लोकांमध्ये वावरत होता. आजच्या जमान्यातल्या समाजवादी लोकांचा सामान्य जनतेशी काडीमात्र संबंध उरलेला नाही. म्हणून त्यांना जनमानसातील प्रतिमेची कसलीही फ़िकीर नाही.
मध्यंतरी म्हणजे १९८० नंतरच्या काळात पुर्वाश्रमीच्या बहुतेक समाजवादी नेते व कार्यकर्त्यांचा ओढा परदेशी अनुदानावर पोटपाणी चालवणार्या समाजसेवी उद्योगाकडे वळला आणि लोकांपासून त्यांचा संबंध संपत गेला. माध्यमातून प्रसिद्धी व त्यातूनच चळवळीचा देखावा उभा करण्यात ही चळवळ मर्यदित होऊन गेली. त्यापैकीच काहींनी माध्यमात किंवा विद्यापीठात मोक्याच्या पदावर बस्तान मांडून विचारवंत किंवा समाजाचे धुरीण असल्याचे चित्र उभे करण्यात धन्यता मानली. असे विविध गट एकमेकांना सहाय्य करीत दिर्घकाळ समाजाच्या माथी आपला शहाणपणा मारत राहिले. त्यांची कसोटी मग मतदानात व राष्ट्रीय भूमिकांच्या परिक्षेला लागली. उजव्यांना वा हिंदूत्ववादी संघटना पक्षांशी दोन हात करणे शक्य नसल्याने अशा समाजवादी उदारमतवादी लोकांनी मुस्लिम वा ख्रिश्चन धर्मांधतेलाही शरण जाण्यासाठी मागेपुढे बघितले नाही. त्यामुळेच कधीकाळी तलाक विरोधात आंदोलन करणार्या समाजवादी वारशाला झुगारून लोहिया जयप्रकाशांचे वंशज तिहेरी तलाकची पाठराखण करताना दिसत आहेत. पाकिस्तानचे समर्थन करून ‘भारत तेरे तुकडे होगे’ अशा घोषणांच्याही समर्थनाला उभे रहाताना आपण बघू शकतो. कारण कसोटीच्या वेळी काय भूमिका घ्यावी, प्राधान्याचे विषय कसे ओळखावे, याचेही भान त्यांना उरलेले नाही. भाजपा वा रा. स्व. संघ यांना विरोध करताना भारतीय राष्ट्रीय भावनेलाही विरोध करण्यापर्यंत हे लोक कधी जाऊन पोहोचले, त्याचा त्यांनाही अजून पत्ता लागलेला नाही. भाजपाला हरवण्यासाठी भारताला हरवून पाकिस्तानला विजयी करण्यासाठीही झटण्यास हे लोक मागेपुढे बघायला आता तयार नाहीत. कारण तसे केल्यास बहुतांश भारतीय जनताच आपल्या विरोधात जाईल, याचीही त्याला फ़िकीर राहिलेली नाही. साध्या भाषेत त्याला दिवाळखोरी म्हणतात. बुद्धीजिवी भाषेत त्याला बौद्धिक दिवाळखोरी म्हणतात.
कसला राष्ट्रवाद? कुठले राष्ट्रप्रेम? असले सवाल अलिकडल्या काळात सातत्याने विचारले जात असतात. त्याला लोक मतातून उत्तर देत असतानाही डाव्यांना किंवा समाजवादी लोकांना अक्कल येत नाही. तर त्यांचे डोके ठिकाणावर नाही, असेच म्हणावे लागेल. कारण लोकशाहीत लोकमत सर्वोपरी असते. त्याच मतांच्या बळावर बहूमत व सत्ता मिळत असते. किंबहूना म्हणूनच लोकमत मोदींच्या बाजूला अधिकाधिक वळत गेलेले आहे. देशद्रोह्यापेक्षा इतर कुठलाही राजकारणी चालला, असे़च मग लोकांना वाटत असेल, तर गैर काय? पाकिस्तान भारतीय जवानांना रोजच्या रोज सीमेवर गोळ्या घालणार आणि भारतात घातपाती पाठवून उचापती करणार. पण इथले समाजवादी हिंदू दहशतवादाचा डंका पिटून कांगावा करीत रहाणार, हे लोक कसे चालवून घेतील? सामान्य माणसे व्यवहारी असतात आणि त्यांना बुद्धीवादी युक्तिवाद समजत नाही. गुहा त्याच दुखण्याकडे बोट दाखवत आहेत. देशातल्या राजकारणात मोदींची लोकप्रियता वाढलेली नाही, तर सामान्य माणसाला पुरोगाम्यांनीच देशद्रोहाचा पवित्रा घेऊन आपल्या विरोधात उभे केलेले आहे. त्याचा परिणाम म्हणून मोदी जिंकलेले दिसतात. पुरोगामी उदारमतवादी लोकांनी आपला देशद्रोही पवित्रा झटकून टाकला पाहिजे. हेच गुहा मिमांसा करून सांगत आहेत. पण कुठलीही गोष्ट समजून घेण्यापेक्षा नाकारण्यातच आपला शहाणपणा सामावलेला असल्याची समजूत करून बसलेल्यांना कोणी जागे करावे? आत्महत्येमध्ये संजीवनी शोधणार्यांना कोण कसे वाचवू शकेल? अशा डाव्या उदारमतवादाचा अस्त अपरिहार्य आहे. कारण तो झेंडा खांद्यावर घेतलेल्यांना आपल्या अस्तित्वाचा हेतू वा कार्यकारणभावच उमजलेला नसेल, तर त्यांचे भवितव्य काय असू शकते? राजकीय क्षितीजावरून त्यांचा सूर्य कधीच मावळला आहे. सामाजिक जीवनात त्यांचा कधी अस्त होतो ते बघायचे.