आपल्या कुणाही परिचितांच्या घरात कुठला शुभ समारंभ असला, मग आपण एकेमकांना त्याचे खास आमंत्रण देत असतो आणि त्यात नेहमी तेच चेहरे भेटत असतात. पण असे समारंभ फ़ार तुरळक असतात. लागोपाठ एकाच गोतावळ्यात अशा भेटीगाठी होत नसतात. किंबहूना कामधंद्यात गुंतलेल्यांना नात्यातले वा आप्तस्वकीयातले असूनही दिर्घकाळ भेटता येत असते, ती संधी अशा अशा समारंभाच्या निमीत्ताने मिळत असते. म्हणूनच मग लोक अगत्याने अशी आमंत्रणे स्विकारतात आणि हजेरीही लावत असतात. मग त्या मंडपात किंवा हॉलमध्ये जमलेली मंडळी आपापले गट घोळके करून शिळोप्याच्या गप्पा मारताना आपल्याला बघायला मिळत असतात. पण जेव्हा असे समारंभ लागोपाठ येतात, तेव्हा मग उपस्थिती घटू लागते आणि समारंभ असूनही तिकडे फ़िरकण्याची टाळाटाळ सुरू होत असते. त्यातली मौज संपून गेलेली असते आणि नविन काही बोलायलाही नसल्याने लोक तिकडे फ़िरकायचे कमी होतात. मग जो कोणी पुर्वीच्या समारंभात होता आणि आता दिसतही नाही; त्याच्या कुचाळक्याही नंतरच्या समारंभात होऊ लागतात. कारण बाकी तिथे जमलेल्यांना काहीही करण्यासारखे नसते. काहीसा तसाच प्रकार आजकाल टिव्हीच्या विविध वृत्तवाहिन्यांवर सातत्याने दिसू लागला आहे. गेल्या जुन महिन्यात कर्नाटकची राजधानी बंगलोर येथे कुमारस्वामी यांच्या शपथविधीला जशी विरोधी पक्षनेत्यांची झुंबड उडालेली होती, तशी आजकाल इतर राज्यांच्या राजधानी वा दिल्लीतल्या धरणी समारंभांना गर्दी दिसत नाही. त्यात जमणार्या वा हजेरी लावणार्यात आपल्याला तेच बंगलोरचे चेहरे बघायला मिळतात. पण कोलकात्यात दिसणारे चेहरे दिल्लीत नसतात आणि दिल्लीत दिसणारे लखनौ वा भोपाळमध्ये गायब झालेले असतात. ही सहासात महिन्यानंतर आज महागठबंधन म्हणवून घेणार्या गोतवळ्याची दुर्दशा होऊन गेली आहे.
बंगलोरच्या त्या समारंभानंतर चेन्नईला द्रमुकचे स्टालीन यांनी आपल्या पित्याच्या, करूणानिधींच्या पुतळ्याचे वाजतगाजत अनावरण केलेले होते. पण तिथे बंगलोरची सगळी हर्दी जमलेली नव्ह्ती. मग ममतांनी कोलकात्याच्या परेड ग्राऊंड मैदानावर अफ़ाट मेळावा योजून सर्व विरोधकांना अगत्याने आमंत्रित केलेले होते. पण तिथेही राहुल सोनिया वा अखिलेश मायावतींची गैरहजेरी जाणवली. तर नंतर कोलकात्याच्या पोलिस आयुक्तासाठी ममतांनी बेमुदत धरणे धरून याच सर्वांना आमंत्रित केले होते, पण बहुतेकांनी तिकडे पाठ फ़िरवली. अशा सगळ्या आमंत्रणाला पोटभर जेवून आईस्क्रीम आहे काय, असा प्रश्न विचारणारे आंध्राचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडी दिल्लीत उपोषणाला बसले असताना, ममता किंवा कुमारस्वामी स्टालीन तिकडे फ़िरकले नाहीत. हळुहळू त्यातली हवा किंवा गंमत संपत चालली आहे. पण भव्यदिव्य समारंभ आयोजित करून लोकांच डोळे दिपवण्याची हौस काही संपताना दिसत नाही. याचे सोपे कारण असे, की त्यातून पुढे काहीही निष्पन्न होताना कोणालाच दिसलेले नाही. नाही म्हणायला अशा सगळ्या समारंभात दोन माणसे अगत्याने हजेरी लावलेली आपल्याला बघायला मिळतात. त्यातले एक आहेत काश्मिरचे रिकामटेकडे नेते फ़ारूख अब्दुल्ला आणि दुसरे अनुयायी वा पक्ष संघटना नसलेले शरद यादव. त्यांना कोणीही बोलावले तर ते पहिल्या पंगतीला अगत्याने हजर असतात. भाषणाची प्रचंड हौस आणि ऐकणारा कोणीही हाताशी नसल्याने त्यांना गर्दी जमवणार्याचे आमंत्रण फ़ेटाळणे अशक्य आहे. सहाजिकच ते अगत्याने सर्वत्र् दिसतात. बाकी महागठबंधन नावाच्या शब्दातली जादू संपून गेलेली आहे. हळुहळू असे समारंभ म्हणजे विवाह सोहळा संपलेल्या मंडपातील उदासिन वातावरणासारखे भासू लागलेले आहेत. कारण तिथे जमणार्यांपाशी आता मोदींवर करायला नवे आरोप वा नव्या शिव्याशापही शिल्लक उरलेले नाहीत.
मुद्दा इतकाच आहे, की असे लोक जमून नेमके काय साधत असतात? कारण प्रत्येक वेळी जमून एकजुटीने भाजपाला किंवा मोदींना संपवण्याच्या आणाभाका घेतल्या जातात. पण आपण एकजुट करणार म्हणजे काय आणि कधी, त्याचे उत्तर त्यापैकी एकालाही देता आलेले नाही. तीन विधानसभांच्या निवडणूकीत डिसेंबरमध्येच राहुल गांधी यांनी आपण इतरांसाठी थोडीही झीज सोसणार नसल्याचे सांगून टाकलेले आहे. उत्तरप्रदेशात अखिलेश मायावतींनी जागावाटप उरकून आपणही कॉग्रेसला सोबत घेणार नसल्याचे स्पष्ट करून टाकलेले आहे. बाकी ममता, स्टालीन वा चंद्राबाबूंना आपापल्या राज्यात दुसरा पक्ष सोबत वा भागिदार नको आहे. त्यामुळेच एकत्र येऊन म्हणजे काय, त्याचे उत्तर यापैकी एकाही नेत्यापाशी नाही. प्रत्येकाला मोदींना वा भाजपाला पराभूत करायचे आहे. पण त्यासाठी नेमके काय करायचे, ते अजून ठरवता आलेले नाही. मात्र त्यातले एक छुपे कलम आहे, ते आपल्याखेरीज अन्य कोणी शिरजोर होऊ नये असे आहे. म्हणजे मायावतींना मोदी हरायला हवेतच. पण भाजपाचा पराभव होताना कॉग्रेस शिरजोर व्हायला नको आहे. नेमकी तीच कॉग्रेसचीही मनिषा आहे. मोदी हरताना मायावती व अन्य पक्ष दुबळेच रहावेत अशी कॉगेसची पक्की धारणा आहे. म्हणूनच एकूण राजकीय प्रगती लग्न समारंभात जमलेल्यांनी परस्परांच्या कुचाळक्या करण्यापलिकडे जाऊ शकलेली नाही. समोरासमोर एकमेकांचे गुणगान आणि मोदींची निंदानालस्ती असा एक ठरलेला अजेंडा नक्की आहे. पण तो साधला गेल्यावर एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढण्याला पर्याय उरत नाही ना? त्यामुळे असे समारंभ योजून एकमेकांना शाली पांघरणे व आपल्या आमंत्रणाची परतफ़ेड म्हणून आपणही त्यांना आमंत्रित करणारा समारंभ योजणे, हा महागठबंधनासाठी एककलमी कार्यक्रम होऊन बसला आहे. मुद्दा कोणी बोलायचा?
कुठलीही आघाडी वा संस्था परस्पर विश्वासावर स्थापन होते किंवा चालत असते. आघाड्या चालत नाहीत असे अजिबात नाही. केरळात गेली कित्येक दशके डाव्यांची व कॉग्रेसची आघाडी टिकलेली आहे. त्या दोन आघाड्यातच राज्याचे एकूण राजकारण विभागले गेलेले आहे. बंगालमध्ये साडेतीन दशके मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली एकच आघाडी कायम टिकलेली होती. स्थानिक निवडणूकात तेही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढायचे. पण विधानसभा वा लोकसभा निवडणूकीत त्यांच्यात कधी बेबनाव नव्हता आणि त्यांनी सतत आपली शक्ती वाढवत नेलेली होती. पण त्यांच्यात कधी परस्पर अविश्वासाचे धुके नव्हते. बाकी महागठबंधन म्हणून नाचणारे जे दोन डझन पक्ष आहेत, त्यांच्यात त्याच विश्वासाचा पुर्णपणे अभाव आढळून आलेला आहे. एका मंचावर उभे राहून ते एकजुटीची भाषा बोलतात आणि नंतर अन्य कुठल्या कार्यक्रमात बोलताना आपल्या राज्यात दुसर्या कुठल्या पक्षाशी आघाडी वा जागावाटप करणार नसल्याचेही इतक्याच ठामपणे सांगत असतात. अर्थात आधीच एकत्र येण्याची गरजही नाही. आता एकमेकांच्या विरोधात लढू आणि निकालानंतर भाजपाला सत्तेपासून दुर ठेवण्यासाठी एकत्र येऊ; असेही यापैकी कोणी प्रामाणिकपणे बोलायची हिंमत करू शकलेला नाही. म्हणूनच मग राहुलच्या भोपाळ जयपूरच्या शपथविधीला मायावती फ़िरकल्या नाहीत किंवा राहुलचे पंतप्रधानाला स्टालीनने नाव सुचवल्यावत ममता विचलीत झाल्या होत्या. कारण सगळा महागठबंधनाचा प्रकार आता लग्नसमारंभात चालणार्या गप्पागोष्टी वा कुचाळल्यांच्या थराला गेलेला आहे. कालपरवाचे चंद्राबाबूंचे दिल्लीच्या आंध्रा भवनातील धरणेही तसेच छान पार पडले. भरपूर आमंत्रित आले आणि काही तिकडे फ़िरकले नाहीत. ते उपोषण होते म्हणून नाहीतर चंद्राबाबूंनी तेव्हाही जरीने मढलेल्या शाली पांघरून प्रत्येकाचे मनापासून स्वागतच केले असते. असो, गोतावळ्यात असेच चालते ना?
सगळ्या आमंत्रणाला पोटभर जेवून आईस्क्रीम आहे काय very will written article
ReplyDeleteआमंत्रणाला पोटभर जेवून आईस्क्रीम आहे काय, very nicely written article
ReplyDeleteमच्छिंद्र कांबळी असतं तर त्याने ह्या लेखात भरपूर जागा शोधल्या असत्या. मजा आली.
ReplyDeleteवा!!! काय perfect comparison आहे । 👌
ReplyDeleteपण आताशा गंम्मत न वाटता चीड येऊ लागली आहे । Legitimately elect केलेल्या पंतप्रधानाला सरळ सरळ चोर म्हणायची audacity आता आपलाच पर्सनल अपमान वाटू लागला आहे । अति हुन ही जास्त होऊ लागलं आहे ।
असो, आज Swarajya मध्ये Major General मृणाल सुमन यांचा Rafale related लेख नक्की वाचवा असा आहे ।
Media किती नीच level ला उतरलं आहे याचं clear चित्र येतं ।
Very nicely said
Deleteसुपर भाउ
ReplyDeleteअशा समारंभाला गेले तर पंचपक्वान्ने खायला मिळतात. अनेक स्वतःला महान समजणाऱ्या नेत्यांना भेटता येते आणि त्यांच्याबरोबरचे फोटो काढता येतो. हे फोटो दाखवून आपल्या निकटच्या साथीदारांवर impression मारता येते. असे विविध फायदे आहेत.
ReplyDeleteश्री भाऊ तुमचा राजकारणाचा अभ्यास एवढा जबरदस्त आहे की तुम्ही कितीही लिहा अस वाटत अजून खूप बाकी आहे मनःपूर्वक धन्यवाद
ReplyDeleteमहागठबंधनाची ऐशीतैशी 👌👌👌
ReplyDeletehttps://swarajyamag.com/defence/the-anti-rafale-campaign-would-go-down-as-one-of-the-lowest-points-of-indian-media
ReplyDeleteIt is the best artical . Your study is so deep that you write a lot and we read very anxiously and fully devoted to your writing.Honourable Bhau please go on writing.Apparao Kulkarni .Ved Pratishthan latur
ReplyDelete