कॉगेसचे एकाहून एक बुद्धीमान नेते व जाणकार त्या पक्षाला कसे रसातळाला घेऊन चालले आहेत, त्याचा नमूना म्हणून शशी थरूर या नेत्याकडे बघावे लागेल. खरे तर ह्याला नेता का म्हणावे, तेही समजत नाही. लोकसभेत निवडून आला म्हणून कोणी नेता होत नाही. जो स्वबळावर निवडून येऊ शकतो किंवा आपल्या सहकार्यांना निवडून आणू शकतो, त्याला नेता म्हणता येईल. अन्यथा असले बुद्धीमान लोक कुठल्याही पक्ष वा संघटनेसाठी बांडगुळे असतात. ती सशक्त झाडावर चढतात आणि त्याच झाडाचा जीवनरस शोषून आपली उपजिविका चालवताना, त्याच झाडाला मारूनही टाकत असतात. थरूर यांच्यासारख्यांची स्थिती नेमकी तशीच असते. आपल्या कर्तॄत्वावर पक्षाला चार मते मिळवून देण्य़ाची त्यांच्यात क्षमता नसते आणि पक्षाला मिळू शकणारी मते आपल्या उचापतखोरीने घालवण्याची कुवत त्यांच्यामध्ये ठासून भरलेली असते. थरूर हे एकटेच असे कॉग्रेस नेता नसून, मागल्या दोनतीन दशकात अशाच उपटसुंभांच्या भरतीने त्या पक्षाची विल्हेवाट लागलेली आहे. अंगी नसलेल्या शहाणपणाचे प्रदर्शन मांडण्याच्या हव्यासापोटी हे लोक पक्षाची लोकप्रियता घसरवण्याचे उद्योग सतत करीत असतात. मणिशंकर अय्यरपासून दिग्विजय सिंगांपर्यंत, ह्या लोकांनी कॉग्रेसला रुग्णशय्येवर आणून ठेवलेले आहे. त्या दोघांची तोंडे बंद केली, तर थरूर मोकाट झालेले आहेत. हे बघितले मग वाटते कॉग्रेसमध्ये सगळेच असे नंगे आहेत की काय? नसते तर थरूर यांनी कुंभमेळ्याच्या निमीत्ताने आपली मुक्ताफ़ळे कशाला उचळली असती? ज्या मेळ्याला जगातून बारा कोटी लोक श्रद्धेने येतात आणि गंगेत स्नान करतात, त्यांना नंगे घोषित करणार्या शशी थरूर यांची अब्रु झाकायला कायदा वगळता कुठले वस्त्र शिल्लक आहे? पत्नीच्या खुनाचा आरोप माथी असलेल्या या आरोपीने कुणाला कसले शहाणपण शिकवावे?
नुकतेच या माणसाने एक ट्वीट केले. ‘गंगा भी स्वच्छ रखनी है और पाप भी यही धोने है. इस संगम मे सब नंगे है. जय गंगा मैयाकी.’ अशी मुक्ताफ़ळे थरूर यांनी उधळली आहेत. कुंभमेळा प्रयागला भरलेला असून त्याला संगम म्हणतात. तिथे गंगेचे पात्र सर्वाधिक पवित्र असल्याची श्रद्धा असून कुंभ मेळ्यात गंगास्नान केल्याने पापक्षालन होत असल्याची श्रद्धा आहे. म्हणून इतका जनसागर तिथे लोटतो. अशा जागतिक सोहळ्याला संयुक्त राष्ट्रसंघानेही जगातला अजुबा म्हणून मान्यता दिली आहे आणि कधीकाळी थरूर त्याच राष्ट्रसंघामध्ये उपसचिव म्हणून कार्यरत होते. आपल्या ताज्या विधानातून त्यांनी फ़क्त अक्लल पाजळलेली नाही, तर आपल्याच आजवर केलेल्या कामावरही पाणी सांडले आहे. कारण त्यांना आज गंगा ही नंग्या लोकांचा संगम वाटत असेल, तर त्यालाच महान मानवी सत्संग ठरवणार्या राष्ट्रसंघाला अक्कल नाही, असेच म्हणावे लागेल. मग तिथे दिर्घकाळ सेवा रुजू करणारा तरी कशा शहाणा असू शकतो? अर्थात थरूर मुर्ख असले म्हणून राष्ट्रसंघ त्यांच्यासारख्या नादानांचा मेळावा नाही. टोपलीतला एक आंबा सडका निघाला म्हणून सगळे आंबे सडके नसतात. पण त्यांना सडवण्याचे कर्तृत्व त्या एका सडक्या आंब्यापाशी नक्कीच असते. बहुधा त्यामुळेच दहा वर्षापुर्वी सचिव पदासाठी ह्या सडक्या आंब्याला जगातल्या लोकप्रतिनिधींनी नाकारलेले असावे. बान की मून यांच्या विरोधात थरूर यांनी सचिव पदाची निवडणूक लढवलेली होती. पण ते मोठ्या फ़रकाने पराभूत झाले. हे भारताचे नशिबच म्हणायचे. अन्यथा अशा दिवट्याने भारताचा प्रतिनिधी म्हणून जी कही मुक्ताफ़ळे उधळली असती, त्याचे खुलासे देताना भारताची जगात बेअब्रुच झाली असती. मुद्दा इतकाच, की बेशरमी हा या माणसाचा मोठा गुण आहे. आयुष्यात प्रतिष्ठेचे वा गुणवत्तेचे कुठलेही काम हा माणूस करू शकलेला नाही.
गंगा वा कुंभमेळ्याविषयी बोलण्यापेक्षा थरूर यांनी आपल्या पत्नीच्या संशयास्पद मृत्यूविषयी सत्य बोलण्याची हिंमत करावी. पाच वर्षापुर्वी त्यांचे पत्नीशी कडाक्याचे भांडण झालेले होते. तिरुअनंतपुरम येथून विमानाने दिल्लीला येताना विमानातही त्यांची धुसफ़ुस चालू होती आणि नंतर दोनच दिवसात त्यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांचा एक पंचतारांकित हॉटेलात संशयास्पद मृत्यू झालेला होता. तेव्हा पोलिसांवर दबाव आणून त्याची चौकशी टाळली गेली होती आणि नंतर कोर्टाच्या आदेशानुसार चालू असलेल्या चौकशीत हा इसम पोलिसांशी सहकार्य करू शकलेला नाही. सवाल नुसत्या शंकास्पद मृत्यूचा नाही. त्या मृत्यूची पार्श्वभूमी मोठी रहस्यमय होती. थरूर एका दुबई भेटीत कुणा पाकिस्तानी महिला पत्रकाराची खुप अघळपघळ वागले आणि त्यांचा सोशल मीडियातला संवाद पत्नी सुनंदाला कळलेला होता. त्यावरूनच त्यांच्यातले भांडण जुंपलेले होते. तेव्हा आपल्या दगाबाज पती थरूर यांना पुरते नंगे करण्याची जाहिरात सुनंदा पुष्कर यांनी केलेली होती. पण तो मामला पतीपत्नीचा असल्याने त्यात अन्य कोणी नाक खुपसण्याचे कारण नाही. मात्र सुनंदाने केलेले आरोप व घेतलेला संशय. राष्ट्रीय सुरक्षेशी निगडीत असल्याने त्यातील थरूर यांची शंकास्पद भूमिका सार्वजनिक हिताचा विषय नक्कीच आहे. आपल्या पतीशी पाकिस्तानी महिला पत्रकार नको तितकी जवळीक करीत असून ती पाक हेरखात्याची हस्तक असल्याचे सुनंदाने म्हटलेले होते. जेव्हा ही घटना घडली तेव्हा थरूर कोणी सामान्य भारतीय नागरीक नव्हते, तर भारत सरकारचे मंत्री होते. म्हणूनच हा मंत्री पाक हेराशी कुठले गुफ़्तगु करीत होता, तो मामला खाजगी उरत नाही. पण यातून थरूर यांना ‘नंगा’ हा शब्द इतका प्रिय कशाला त्याचा खुलासा होऊ शकतो. अत्यंत सैल चरित्राचा हा माणूस, पत्नीला इतका दगा देऊ शकत असेल, तर समाजाने त्याच्यावर विश्वास किती ठेवायचा?
एक गोष्ट स्पष्ट आहे, यासारखे शिकलेले बुद्धीमान लोक पक्षात भरती करून संघटनेची बुद्धी वाढवावी, अशी कॉग्रेसची अपेक्षा असावी. पण व्यवहारात बघितले तर अशा लोकांनी आपल्या पापावरचे पांघरूण म्हणूनच कॉग्रेसचा सर्रास वापर केलेला आहे. मग ते मणिशंकर अय्यर असोत किंवा दिग्विजय वा थरूर असोत. सुनंदाने मृत्यूपुर्वी केलेली घोषणा यासाठी महत्वाची होती, की तिने नाव न घेताही थरूर यांना पुरते नंगे करून टाकण्याची धमकी दिलेली होती. आयपीएल स्पर्धेत केरळसाठीचा संघ विकत घेण्या़चे जे व्यवहार झाले, त्यात आपल्या नावाचा गैरवापर झाला हा सुनंदाचा आक्षेप होता. थरूर यांच्या त्यातल्या व्यवहारावर शंका घेतल्या गेल्या होत्या. किंबहूना तसा काहीसा आरोप एका जाहिर सभेत नरेंद्र मोदींनी केल्याचा खुप गवगवा झालेला होता. थरूर यांच्या असल्या व्यवहाराचा ओझरता उल्लेख मोदींनी ‘पचास लाखवाली गर्लफ़्रेन्ड’ असा केला होता. त्यांनी कोणाचे नाव घेतलेले नव्हते, पण ते शब्द कॉग्रेससहीत थरूर यांना खुप झोंबले होते. मृत्त्यूपुर्वी सुनंदाने त्यावरच गौप्यस्फ़ोट करण्याचा इशारा दिलेला होता. मग तेव्हा कोणाला नंगा होण्याच्या भितीने पछाडले होते? तिरुअनंतपुरम विमानतळावर किंवा नंतर विमानात शशी थरूर आपल्या पत्नीच्या नाकदुर्या कुठल्या पापाचे क्षालन करण्यासाठी काढीत होते? आज संगमात स्नान करणार्यांच्या पापाची चिंता करणार्या थरूरांना आपली कोणती पापे तेव्हा भयभीत करीत होती? सामान्य माणूस आपल्या श्रद्धेसाठी पापक्षालनाला गंगेत वा संगमात गेल्यावर नंगा असतो, तर थरूर सार्वजनिक जागी व जीवनात कुठे झाकलेले असतात? त्यापेक्षाही ते अधिक नंगे असतात ना? ज्याला जगासमोर पत्नीच नंगा करून टाकण्याचा इशारा देते, त्याने संगमात डुबकी घेणार्यांच्या नंगेपणाची फ़िकीर करू नये, की गंगेच्या सफ़ाईची चिंता करू नये. आपल्या पुर्वकलंकित जीवनाची सफ़ाई देण्यासाठी बुद्धी वापरावी ना?
असे हमाममे किंवा कॉग्रेसमे किती लोक नंगे आहेत, त्याची गणती थरूर यांनी करायला हरकत नव्हती. दिर्घकाळ माजी अर्थमंत्री चिदंबरम विविध न्यायालयात धाव घेऊन आपली अब्रु झाकण्यासाठी आटापिटा करीत आहेत. त्यांच्या पुत्राला अटक होऊन जामिन मिळाला आहे आणि पत्नीही अटक टाळण्यासाठी कसरती करीत आहे., ते शुभ्रवस्त्रधारी आहेत म्हणून थरूरना अब्रुदार वाटतात काय? कुठल्याही फ़ाटक्या कपड्यातल्या सामान्य गरीबापेक्षाही असे कॉग्रेसवाले जगासमोर कधीच नागडेउघडे होऊन गेलेले आहेत. त्यांची पापे इतकी भयंकर आहेत, की गंगा किंवा संगमात धुवून ही साफ़ होऊ शकणार नाहीत. त्यांना कुठल्या ना कुठल्या न्यायालयात आपली मलीन वस्त्रे धुवावी लागत आहेत आणि ती धुण्यासाठी नित्यनेमाने नागडेच व्हावे लागते आहे. सामान्य हिंदूला निदान पापक्षालनासाठी कुभमेळ्याची प्रतिक्षा करावी लागते. थरूर चिदंबरम किंवा हुडडा यासारख्यांना गंगेतही मोक्ष मिळू शकत नाही. कोर्टात वकीलांचे पौरोहित्य घेऊन विधी करावे लागत असतात. खुद्द कॉग्रेसच्या आजी व माजी अध्यक्षांनाही जामिन घेऊनच आपले पापक्षालन नॅशनल हेराल्ड प्रकरणात करावे लागते आहे. अशा गोतावळ्यात जगणार्यांना गंगा कशी स्वच्छ होईल त्याची चिंता कशाला? त्यापेक्षा अशा दिवाळखोरांपासून कॉग्रेसची मुक्तता कशी होईल, त्याची फ़िकीर करावी. गळ्यात जानवे घातल्याने कोणी हिंदू होत नाही किंवा लोक त्याला हिंदू धर्मश्रद्ध मानत नाहीत. कुठल्याही धर्मपालनात पावित्र्याला प्राधान्य असते आणि थरूर सारख्यांना कुठल्याही पावित्र्याचे कायम वावडेच राहिलेले आहे. त्यांना संगमात सगळे नंगे दिसतात, कारण त्यांचा भवताल नंग्यांनीच कायम भरलेला फ़ुललेला असतो. त्यांना गंगेचा संगम माहिती असण्यापेक्षा आपल्या राजकीय उकिरडे व गटारांचाच संगम गंगा वाटलेली असेल, तर अशी मुक्ताफ़ळे उधळली जाण्यालाही पर्याय नसतो ना?
कॉग्रेस गेल्या दशकात लोकांच्या मनातून का उतरत गेली त्याचे हे उत्तर आहे, ज्या देशातला बहूसंख्य मतदार व जनता हिंदू आहे, त्याला प्रत्येक संधी साधून हिणवणे व नामोहरम करणे, हेच कॉग्रेसचे धोरण राहिलेले असेल, तर आपल्या अपमानासाठी कुठला नागरिक त्या पक्षाला मते देऊ शकतो? २०१४ च्या दारूण पराभवानंतर जी अभ्यास समिती नेमली होती, तिचा अहवालही तेच सांगतो. अन्थोनी समितीने साफ़ तेव्हाच सांगून टाकलेले आहे. कॉग्रेसची प्रतिमा हिंदूविरोधी झाल्यामुळेच इतक्या मोठ्या पराभवाची नामुष्की पक्षावर आली. पण ते पचवायला दोनतीन वर्षे निघून गेली आणि गुजरात विधानसभा निवडणूकीपासून राहुल गांधींनी आपल्या हिंदू असण्याचे नाटक रंगवायचे काम हाती घेतले. त्यातून मंदिरांच्या पायर्या झिजवल्या गेल्या आणि अशा प्रत्येक प्रयत्नांना सुरूंग लावण्याचे काम मणिशंकर अय्यर, दिग्विजयसिंग वा कपील सिब्बल करीत राहिले. सिब्बल यांनी सुप्रिम कोर्टात जाऊन अयोध्येतील राममंदिराला विरोध करायचा आणि अय्यर यांनी निर्वासित काश्मिरी हिंदूंच्या जखमेवर मीठ चोळत तिथल्या फ़ुटीरवादी प्रवृत्तीचे कोडकौतुक करायचे. दिग्विजयसिंग पदोपदी हिंदूंना अपमानित करणार्या जिहादींचे समर्थन करणार आणि आता शशी थरूर हिंदू धर्माच्या विविध प्रथा लाथाडण्यालाच हिंदू ठरवण्याचा खटाटोप करीत असतात. खरा हिंदू तोच जो अयोध्येत रामाच्या मंदिराचा आग्रह धरणार नाही, अशी व्याख्या कोणी केली होती? हेच थरूर महाशय होते ना? असे नग शोधून निवडून कॉग्रेसमध्ये भरती केले, तर त्या पक्षाला पराभूत करण्यासाठी भाजपाला हिंदूत्वाची गरजच उरलेली नाही. ते काम कॉग्रेसचे असे वरीष्ठ दिग्गज नेते सातत्याने करीत असतात आणि कॉग्रेसमे सब नंगे असल्याचा डंकाच पिटत असतात. त्यामुळे मोदींचे व अमित शहांचे काम सोपे झालेले आहे. राहुल गांधी उरलीसुरली कसर भरून काढत असतातच.
भारताच्या स्वातंत्र्याची चळवळ म्हणून सुरू झालेली कॉग्रेस आता आपलाच पुर्वेतिहास पायदळी तुडवत असते. त्या काळात हिंदूंचा म्हणजे बहूसंख्यांकाचा पक्ष अशीच कॉग्रेसची जनमानसातील प्रतिमा होती. मागल्या दोन दशकात ती अल्पसंख्यांकांचा किंवा प्रामुख्याने मुस्लिमांचा पक्ष अशी प्रतिमा ज्यांनी बनवली, त्यांनीच कॉग्रेसची कबर खोदलेली आहे. जितके नुकसान झाले तितके पुरेसे नसावे, म्हणून आता त्यात थरूर यांच्यासारखे नंगे भरती करण्यात आलेले आहेत. आपण जगभरच्या शंभर कोटी हिंदू श्रद्धाळूंच्या धार्मिक भावना दुखावत आहोत आणि त्यातले बहूसंख्य भारताचे नागरिक आहेत, याचेही ज्यांना भान नसते, त्यांना मग नेता तरी कशाला म्हणायचे? कुठला कडवा धर्मांध मुस्लिम नेताही इतक्या खालच्या थराला जाऊन हिंदूच्या धर्मभावनांची पायमल्ली करणार नाही. असे नमूने राहुलनी कॉग्रेस पक्षामध्ये भरती केलेले असतील, तर त्याला कुठल्या धर्माचा प्रेषितही वाचवू शकणार नाही. कारण तुमच्या पक्षात किती विद्वान बुद्धीमान लोक आहेत, त्यानुसार सर्वसाधारण मतदार मते देत नसतो. तर त्याच्या जगण्यातल्या श्रद्धा व भावनांची कदर करणारा सत्ताधीश त्याला हवा असतो. कॉग्रेसने ती जागा म्हणूनच गमावली आहे आणि आता थरूर यांच्याच भाषेत कॉग्रेस म्हणजे त्यांच्यासारख्या पाप्याच्या पितरांनी आपापली पापे धुण्याचा तो एक संगम होऊन बसला आहे. कुठलेही गुन्हे अपराध करावे आणि ते धुण्यासाठी कॉग्रेसच्या पाणवठ्यावर येऊन उभे रहावे, अशी त्या शतायुषी पक्षाची दुर्दशा होऊन गेलेली आहे. अशा भामट्यांच्या गोतावळ्यात दाखल झाल्यावर शशी थरूर यांना ‘संगमात सगळे नंगे’ दिसू लागले तर नवल कुठले? थोडक्यात या महाभागाला सांगायचे आहे की लहानसहान पापे धुण्यासाठी गंगा किंवा संगमात जावे आणि मोठमोठी भयंकर पापे धुवायची असतील तर मात्र कॉग्रेस नावाच्या राजकीय संगमात दाखल व्हावे.
Too good Bhaoo.अगदी सर्व सामान्य किमान समज असलेल्या माणसंच्या मनांतील विचारच तुम्ही प्रगट केले. धन्यवाद. एक तपशील"50 करोड की गर्ल फ्रेंड".
ReplyDeleteशशी थरुर हे त्यांच्या तिसऱ्या पत्नीच्या मृत्युसंबंधीच्या केसमध्ये अडकले आहेत. नाहितर त्यांनी एव्हाना चवथ्या लगनानंतर बायकोला सोडून पाचवे लग्न केले असते. तसे झाले नाही म्हणून त्यांचे चित्त थाऱ्यावर नाही.
ReplyDeleteभाऊ...
ReplyDeleteखुप झोडलात...छान...
नंग्याचा कडदोरा पण तुम्ही खेचून घेतलात, भाऊ... 👍
ReplyDeleteअप्रतिम लेख भाऊ,
ReplyDeleteसडका मेंदू, कुजकी विचारसरणी आणि हिंदू धर्मावर गलिच्छ वक्तव्य्ये करणे म्हणजे पुरोगामीपणा असा एक सार्वत्रिक गैरसमज आहे. ह्या माणसासाठी एक उत्तम संधी सध्या आली आहे. इंग्लंडच्या राणीसाठी नुकतीच एक जाहिरात बकिंगहम राजवाड्याने प्रसिध्ह केली आहे. .राणीला एक इंग्रजी बोलणारा,लिहिणारा आणि इंग्रजी रितीरिवाजं माहीत असणारा बटलर हवा आहे. त्याने पाहुण्याची सरबरई करणे,त्यांच्या नाश्ता जेवण,मद्यपान ह्यांची खातीर करणे आणि चतुर संभाषण करणे अपेक्षित आहे. राहणे खाणे गणवेश फुकट आणि वर पगार सालींना 19,993 पाउंड असा आहे. ह्या माणसाला नोकरी नक्की मिळेल. नाहीतरी हे महाशय सर्व काळ आपले अंग्लाळलेले अर्धवट रूप पाजळत असतात.
भाऊ,
ReplyDeleteतुमची लेखणी भल्या भल्यांना पेलवत नाहीत जर तुम्ही सकाळ मध्ये आले असते तर एक दिवस सुद्धा नसते,
ह्या केलेल्या चिरफाडीने आपल्या मागिल गोबेल्स वर लिहिलेल्या लेखाची आठवण झाली,राहूल गांधी ने अशा कोडग्यांची खोगीरभरती करुन ठेवली आहे की त्यांना सगळे आलबेल च वाटते आहे, आपण केलेली मिमांसेला तोडच नाही
छत्तीसगडचा मुख्यमंत्री ख्रिश्चनांच्या जाहीर प्रार्थनेत सामील झाला, त्या घटनेवर शशी थरूरने प्रतिक्रिया दिलेली नाही.
ReplyDeleteपण करोडो हिंदू पवित्र कुंभ मेळ्यात सहभागी झाले, याबद्दल अकारण टीका केली.
हिंदूंनी सहनशीलता सोडण्याची वेळ आली आहे.