Wednesday, February 13, 2019

मला बी जत्रंला येऊ द्या कीर रं....

sharad pawar के लिए इमेज परिणाम

आज दुपारी एका वाहिनीच्या पत्रकाराचा घाईघाईने फ़ोन आला, तेव्हा की जेवत होतो. त्याला एका राजकीय विषयावर फ़ोनो हवा होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा माढा येथून लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि त्यावर तिथे ब्रेकिंग न्युज चालू होती. त्यात अनुभवी पत्रकारांच्या प्रतिक्रीया विचारल्या जात होत्या. खरे तर यात ब्रेकिंग न्युज कुठली असते, ते मला समजत नाही. कारण माणसाला कुत्रा चावला तर बातमी नसते आणि माणूस कुत्र्याला चावला तरच बातमी होते, असे आम्ही उमेदवारीच्या काळात शिकलेले होतो. आजकाल बहुधा बातमीची व्याख्या बदललेली असावी. अन्यथा कुत्रा माणसाला चावला ही ब्रेकिंग न्युज कशाला झाली असती? किंवा होत राहिली असती? शरद पवार यांनी शब्द फ़िरवला किंवा यु टर्न घेतला, ही बातमी कशी काय असू शकते? कुठलीही भूमिका घ्यायची आणि नंतर सराईतपणे कृती करण्यालाच पवार सिद्धांत समजला जातो. त्यामुळे निवडणुकीच्या आखाड्यातून संन्यास घेतल्याची घोषणा पवारांनी २०१४ सालात केली तेव्हाच त्यांचा युटर्न कधी येतो, त्याची प्रतिक्षा होती. पाच वर्षे लागली. पण खरेतर त्या घोषणेतच युटर्न सामावलेला होता. कारण त्यांनी लोकसभेचे मतदान होण्यापुर्वीच साळसूदपणे राज्यसभेत आपली निवड करून घेतली आणि अप्रत्यक्ष निवडणूकीत आपण कायम असल्याची साक्ष दिलेली होती. पण ती पत्रकारांच्या आवाक्यातली बातमी नसावी. म्हणून आज त्यांनी माढ्यातून लोकसभा लढवायचे ठरवताच ब्रेकिंग न्युज होऊन गेली. मग त्यात राजकारण शोधणे सुरू झाले. पवारांच्या कुठल्याही कृतीमध्ये म्हणजे अगदी नाक पुसण्यातही राजकारण असल्याची समजूत त्याला कारण आहे. पण वास्तवात त्यांना काय करायचे असते, ते त्यांनाही कृती उरकून जाईपर्यंत ठाऊक नसते. मग आताही हा निर्णय घेण्याचा अर्थ इतरांना कसा लागावा?

निवडणूकीच्या राजकारणातून बाहेर पडलेले शरद पवार कायम निवडणूकीत असतातच. म्हणूनच त्यांनी मागल्या लोकसभेनंतर विधानसभेपुर्वी ऐनवेळी कॉग्रेसशी असलेली आघाडी पंधरा दिवस आधी मोडली आणि राष्ट्रपती शासन महाराष्ट्रात आणायची वेळ साधली होती. लोकसभेपासून विधानसभेपर्यंत अर्ध्या चड्डीकडे कारभार देणार काय? असला सवाल प्रत्येक सभेत सामान्य मतदाराला करणारे पवार, विधानसभेचे निकाल लागेपर्यंतही थांबले नाहीत. भाजपाचे विधानसभेतूल स्पष्ट बहूमत हुकण्याची चिन्हे दिसताच, त्या पक्षाला सरकार बनवण्यासाठी पवार पाठींबा देऊन मोकळे झालेले होते. मग आताच त्यांना पुन्हा लोकसभेची निवडणूक लढवण्याची उबळ कशाला यावी? काही दिवसांपुर्वीच अजित पवार यांनी आपणही लोकसभा निवडणूक लढवू शकतो, अशी सुचित धमकी वा इशारा दिल्याचा तो परिणाम असावा काय? पक्षांतर्गत सुप्रिया व अजितदादा यांच्यातला बेबनाव आटोपण्यासाठी पवारांनी माढ्यात उडी घेतलेली आहे काय? कितीतरी अशा शंका काढल्या जाऊ शकतात. पण त्यापैकी एकाही शंकेचे समाधानकारक उत्तर साहेब देऊ शकणार नाहीत. कारण त्याची खरीखुरी उत्तरे त्यांनाही ठाऊक नसतात. मात्र उपरोक्त वाहिनीच्या संवादात पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी दिलेली सफ़ाई पटणारी नव्हती. आजवर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तुमचे ऐकले, आता तुम्ही आम्हा कार्यकर्त्यांचे ऐकले पाहिजे; अशी निर्वाणीची भाषा झाल्यानेच साहेबांनी असा निर्णय घेतला असावा, अशी अटकळ काकडे यांनी बांधलेली होती. अलिकडेच अहमदनगर येथील कार्यकर्त्यांनी भाजपाचा महापौर निवडून आणायला हातभार लावला, तेव्हाही कार्यकर्त्यांनी पवारांचे किंवा साहेबांनी कार्यकर्त्यांचे ‘ऐकलेले’ नव्हते, अशा बातम्या होत्या. मग अचानक ही नेता कार्यकर्ता सुसंवादाची किमया कुठून आली? युटर्न ही वास्तविकता आहे आणि आयुष्यभर पवार तसेच वागत आलेले असतील, तर त्यांचा निर्णय अतिशय तर्कशुद्ध आहे.

मुद्दा असा आहे, की गेल्या जुन महिन्यापासून देशभरच्या राजकीय प्रादेशिक पक्षांना लोकसभेचे वेध लागलेले आहेत. त्यानी महागठबंधन नावाचा प्रयोग गाजावाजा करून मांडलेला आहे. पण त्याला इतके महिने उलटून गेल्यावरही त्याला आकार मिळू शकलेला नाही. कारण प्रत्येक पक्षाचे भाजपा व मोदींना हटवण्यावर एकमत होत असले, तरी तिथे रिकाम्या होणार्‍या जागी बसायचे कोणी, यावर कमालीचे मतभेद आहेत. अशावेळी मग तुमच्या पंतप्रधानाचा चेहरा कोणता व नाव कुठले; असा सवाल सतत विचारला जात असतो. त्या नावांच्या यादीत आपले आरक्षण असावे, अशी इच्छा माढ्याच्या लढतीमागची प्रेरणा आहे. तसा हा मतदारसंघ पवारांना नवा नाही. २००९ सालात त्यांनी कन्येला बारामती मोकळी करून देताना तिथूनच लोकसभा गाठलेली होती. त्यामुळे माढ्यातून साहेब उभे रहात असतील, तर बालेकिल्ल्यातच लढणार आहेत. किंवा त्यांना जिंकण्याची हमी हवी आहे. त्यातून पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रेरीत करणे व उत्साहीत व्हायला हातभार लावणे वगैरे काहीच असू शकत नाही. तर हुकमी मिळणारी जागा त्यांना हवी आहे. त्यामुळे उद्या कॉग्रेस मोठा पक्ष असूनही त्याच्या बाहेरचा पंतप्रधान शोधायची वेळ आल्यास आपण सज्ज असले पाहिजे; हा त्यातला खरा हेतू आहे. आपण शर्यतीत असल्याचा सिग्नल साहेबांनी यातून दिलेला आहे. किंबहूना मागल्या दोनचार महिन्यात महागठबंधनाचा पंतप्रधान कोण आणि महागठबंधनाचे स्वरूप काय असावे, त्याची मांडणी पवारांच्या इतकी नेमकी कोणी केलेली नाही. आपापल्या राज्यात प्रभावशाली असलेल्या प्रादेशिक पक्ष व नेत्याच्याच नेतृत्वाखाली आघाडी व्हावी व जागावाटप व्हावे; असा आग्रह साहेब कायम धरून बसलेले आहेत. मग जे कोणी बिगरभाजपा सदस्य निवडून येतील, त्यांनी सर्वानुमतीने पंतप्रधानाची निवड करता येईल. ह्या प्रस्तावाचा अर्थ आपण देवेगौडा व्हायला राजी असल्याचा सिग्नल असतो.

आता पवारांचा युटर्न वगैरे शिळोप्याची टिकाटिप्पणी खुप होईल. पण ज्यांची हयात युटर्न घेण्यातच संपत आलेली आहे, त्यांच्या अशा निर्णयाकडे नुसता युटर्न म्हणून बघणे मुर्खपणाचे ठरेल. कारण युटर्न हा पवारांचा ब्रान्ड आहे. राहुल, ममता, मायावती, इत्यादिंनी कितीही गमजा केल्या, तरी त्यापैकी कोणाच्याही नावावर विरोधकात एकवाक्यता होऊ शकत नाही. याची आजतरी पवारांना पुरेपुर खात्री आहे. त्यांच्या तुलनेत पवार हे नाव अधिक वजनदार व सर्वसंमती मिळवू शकणारे आहे. त्यामुळेच अशा उमेदवारीतून साहेबांनी आपण पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असल्याचीच घोषणा केलेली आहे. ती महाराष्ट्रातील राजकारणासाठी नाही, तर दिल्लीतील प्रस्थापितांना दिलेला सिग्नल आहे. आपल्या नावाचा आतापासून विचार व्हायला हरकत नाही, असेच साहेबांना त्यातून सुचवायचे आहे. बाकी कार्यकर्त्यांचा आग्रह किंवा नेत्यांमधून आलेली मागणी वगैरे गोष्टी दिखावू आहेत. चार वर्षापुर्वी विद्यमान पंतप्रधान बारामतीमध्ये साहेबांच्याच आग्रहाने आलेले होते आणि तिथल्या समारंभात ख्यातनाम उद्योगपती राहुल बजाज यांनी व्यक्त केलेले मत लोक आज विसरून गेलेले आहेत. पण त्यातला आशय साहेब अजिबात विसरलेले नाहीत. बजाज यांनी ‘न लाभलेले पंतप्रधान’ असा पवारांचा त्या सोहळ्यात उल्लेख केलेला होता. तर तशी शक्यता निर्माण होताच त्यांनी पुन्हा एकदा १९९१ प्रमाणे त्या शर्यतीमध्ये आपण असल्याचाच इशारा दिला आहे. प्रामुख्याने माध्यमातून ज्या आगामी किंवा पर्यायी पंतप्रधानाच्या नावाच्या चर्चा रंगवल्या जातात; त्यात आपल्या नावाचा किंवा अनुभवाचा उल्लेखही येत नसल्याने बहुधा साहेब अस्वस्थ झालेले असावेत. त्यांनी तमाम राजकीय विश्लेषकांना यातून साद घातली आहे. आपल्यालाही विचारात किवा शर्यतीत घ्यावे असे आवाहन केलेले असावे. मग ते प्रसिद्ध मराठी लोकगीत आठवते.

काठी अन घोंगडं घेऊ द्य की रं....
मला बी जत्रंला येऊ द्या कीर रं....

39 comments:

  1. तुम्हाला साष्टांग दंडवत

    ReplyDelete
  2. साहेबांनी 2009 मध्येच माढा ऐवजी शिरूर येथून निवडणुकीत उतरायला हवे होते.

    ReplyDelete
  3. शरद पवार क्रिकेट,खोखो वगैरे खेळांत निष्णात म्हणवतात. पण ते खरे "तळ्यात मळ्यात" या खेळात सर्वार्थाने तज्ञ आहेत. त्यांनी हा खेळ आंतरराष्ट्रीय पातळीवर न्यावा.

    शरद पवार हे नेहमीच भावी पंतप्रधान म्हणून मिरवतात. पुढेही ते तसेच भावी पंतप्रधान म्हणूनच रहातील. त्यांचा हा हक्क कोणीच हिरावू शकणार नाही.

    ReplyDelete
  4. या वेळेस साहेबांना माढा मतदारसंघ अवघड जाईल. या मतदारसंघातील टेंभूर्णी, करकंब, माढा हि मोठी गावे आहेत. पैकी करकंब मध्ये गेल्या वेळी ५० - ५० % मते पडली होती. बाकी दोन्ही ठिकाणीही विशेष मताधिक्य नव्हते. गेल्या वेळी पैसाही वाटला गेला नव्हता. आता ५ वर्षात सगळ्यांकडे स्मार्टफोन आलेत. मोदी लाट अगदी शेतमजुरातही आहे. एकंदर तगडा उमेदवार समोर असेल तर अवघड आहे साहेबांचे.

    ReplyDelete
  5. Sir मी माढा लोकसभा मतदारसंघातील आहे येथे पवारसाहेबांना विरोध होत आहे पवारसाहेबांनी विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या विरोधात कारस्थान केले अशी मोहीते-पाटील समर्थकांची भावना आहे..
    दुसरे असे की विजयसिंह मोहिते-पाटील ऊभे राहीले की त्यांना संजय शिंदे विरोध करतायत म्हणुन ही पवारसाहेबांची खेळी असु शकते

    ReplyDelete
  6. भाऊराव,

    हेमंत जोशींनी हीच शक्यता स्पष्ट शब्दांत ऑक्टोबर २०१८ मध्ये वर्तवली होती.

    >> पुढले पंतप्रधान जर नरेंद्र मोदी झाले नाहीत तर त्याजागी एकमेव, फक्त आणि फक्त
    >> शरद पवार हेच असतील

    संदर्भ : http://www.vikrantjoshi.com/2018/10/blog-post_24.html

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
    Replies
    1. konihi chalel..agdi gadhav, bail, kutra, manjar suddha chalel pan sharad pawar nako re baba

      Delete
  7. Spot on भाऊ, कसं काय जमतं तूम्हाला हे?

    ReplyDelete
  8. पवारांच्या मानसिकतेचा तुम्ही जितका अभ्यास केला आहे तितका कुठल्याच पत्रकाराने केलेला नाही भाऊ

    ReplyDelete
  9. याला शोकांतिका म्हणायचं की अगतिकता?

    ReplyDelete
  10. एकदम बरोबर शेंबड्या पोराला पण माहीत आहे हे पलटी मारणार...

    ReplyDelete
  11. टायटल एकदम समर्पक

    ReplyDelete
  12. वा, भाऊ झकास । तथाकथित जाणत्या राज्याच्या ह्या राजकीय कोलांट्या उड्यांचा नेमका अर्थ आणि त्याचे परखड विश्लेषण तुम्ही केले आहे । पण त्यांचे स्वप्न म्हणजे मुंगेरीलाल के सपनेच राहणार आहे हे मात्र नक्की ।

    ReplyDelete
  13. वा, भाऊ झकास । तथाकथित जाणत्या राज्याच्या ह्या राजकीय कोलांट्या उड्यांचा नेमका अर्थ आणि त्याचे परखड विश्लेषण तुम्ही केले आहे । पण त्यांचे स्वप्न म्हणजे मुंगेरीलाल के सपनेच राहणार आहे हे मात्र नक्की ।

    ReplyDelete
  14. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग.

    ReplyDelete
  15. जबरदस्त भाऊ....
    पण वास्तवात त्यांना काय करायचे असते, ते त्यांनाही कृती उरकून जाईपर्यंत ठाऊक नसते....
    हे सगळ्यात भारी...

    ReplyDelete
  16. Mr. Sharadrao prawar is a seasoned politician. What he speaks he doesn't do it.What he does he does not speak . He is only politician.He always wants power.So don't waste Bhau your precious time on this man .Please write on Raj Thakare. We are waiting anxiously.A reader of your blog
    .

    ReplyDelete
  17. भाऊ रास्तच, पवारांना आमचा माढा आता अवघड जाणार हे नक्कीच फक्त भाजपची साथ हवी.... हो भाजपचीच साथ हवी!

    ReplyDelete
  18. पवार साहेबांचे वागणे,आपण म्हणता तसे u टर्न घेणारे असतं हे अगदी बरोबर.पण मला त्या पेक्षा असे म्हणावेसे वाटते की,"सर्व साधारण कोणी एखादया स्त्रीला हे तुमच्या साठी आहे घ्या".असे म्हटल्यावर ती कश्याला,कश्याला असे म्हणते.बाकीच्यांनी अजून आग्रह करायची वाट पहात असते.सगळ्यांनी आग्रह केल्यावर बरं असूदे म्हणत स्विकार करते.तसेच पवार साहेब यांचे आहे.किंवा निवडणुकीस उभे राहण्याचे बाबतीत,"अग अग म्हशी मला कुठे नेशी"असे वागणे असतं.मागील वेळेला 2014,ला निवडणुकीला उभे राहिले नाहीत त्याचे कारण मोदी लाटेत पडण्याची भिती वाटत असावी.संसदेत तर जायचं मग ते मागील दाराने(राज्यसभा मार्गे).राजकारणाची नशा चढलेली माणसे ,परमेश्वराने रिटायर केल्याशिवाय राजकारणाचा मोह सोडत नाहीत. अगदी देवेगौडा उदाहरण समोर असले तरी.भाऊ तुमच्या सारखे अनुभवी पत्रकार,'बिटविन द लाईन'बरोबर। वाचणारे अभ्यासू पत्रकार कमी आहेत.जे थोडेफार आहेत त्यांनी आपली नाळ पत्रकारितेशी कमी व्यक्तीतशी,पक्ष्यांशी जोडलेली आहे.त्यामुळे तुमचे लेख कूप भावतात.

    ReplyDelete
  19. शरद पवार राजकारणातून बाहेर कधीच पडणार नाहीत. कारण राजकारण आणि तेही जातीआधारीत असेल तरच त्यांचे दुकान चालते.बाकी स्वाभिमान वगैरे गल्लीत मारायच्या गप्पा.

    ReplyDelete
  20. Sharad Pawar he Rajya sabhetoon hee Pantprahan hou shakataat. Manmohansingh Rajyasabhetoon ch PM zale hote. Ase asataanaa LS madhun janyaachaa attaahaas kaa? Tyanchee RS chee mudat ajun shillak aahe. Nantar Punha nivadun yeu shakataat. LS madhye jaayache tar RS chaa raajeenaamaa dyava lagnaar. Tithe punha nivadnuk he chakra thambaayalaa havay.

    ReplyDelete
  21. पवारसाहेब कशाला इतकी धडपड करतात कुणास ठाऊक!खरं तर त्यांच्या "भावी पंतप्रधान" या पदाला कुणाहीकडून कसलाही धोका नाही.

    ReplyDelete
  22. Very perfect analysis of sickly ,greedy and corrupt man. He is hoping to be Devgovda amongst bunch of anti national Crooks. Only problem is all are hoping to be Govada and each one feels that their ambitions is not seen openly.

    ReplyDelete
  23. भाऊ, कृपया तुम्ही एक युट्युब चॅनल सुरु करा. एका सर्वे नुसार २०२० पर्यंत वेब इंडस्ट्री टेलिव्हिजन इंडस्ट्रीला मागे टाकणार आहे आणि तिथे सेन्सॉर नसल्यामुळे प्रचंड प्रमाणात माहितीची भेसळ होणार आहे. आम्हाला आजूबाजूला घडणाऱ्या घटनांची खरी नस कळावी यासाठी तुम्ही युट्युब वर या. ज्याप्रमाणे त्या दोन मुलांनी तुम्हाला वृत्तपत्रावरून ब्लॉग वर आणलं तसेच तुमचे ब्लॉग वाचक तुम्हाला आग्रह करत आहोत.

    प्रवासामध्ये वाचनापेक्षा श्रवण जास्ती चांगल्या पद्धतीने होऊ शकतं त्यामुळे याचा गांभीर्याने विचार करा. युट्युब वर व्हिडियोज टाकणे कठीण काम नक्कीच नाही पण तुमचा जो अभ्यास आहे तो नक्कीच कठीण आहे बाजारात इंटरनेट असलेले टीव्ही आलेले आहेत त्यामुळे आम्ही त्यावर पारंपरिक बातम्या पाहण्यापेक्षा तुमचे युट्युब चॅनल पाहू. इतर वाचकांनी कृपया समर्थन द्यावे आणि हि प्रतिक्रिया भाऊंपर्यंत पोहोचवावी.

    ReplyDelete
    Replies
    1. भाऊ खरंय तुम्ही हे कराच त्याला subtitle पण ठेवा कळुदे सगळ्या शोध पत्रकारिता करणारे अर्धशिक्षित पत्रकारांना

      Delete
  24. भाऊ, युट्युब चॅनल Think Bank वर तुमचे व्हिडियो पहिले. त्या चॅनल वर सध्या ४४५ सभासद आहेत त्यामुळे त्या चॅनल वर अपलोड केलेल्या व्हिडियोज ना सरासरी २०० ते ३०० जण पाहतात पण फक्त तुमचा व्हिडियो सर्वाधिक म्हणजे ३००० हुन अधिक लोकांनी पाहिलाय म्हणजे सभासदांच्या एकूण संख्येहून जवळपास ६५०% (सहाशे पन्नास टक्क्यांहून जास्त) व्हायरल झाला आहे. लोकं माहिती मिळवण्यासाठी उत्सुक आहेत त्यामुळे कृपया तुमचे (इतर हस्तक्षेप टाळण्यासाठी) स्वतःचे यूट्यूब चॅनल सुरु करा, आम्ही टीव्हीच्या बातम्या पाहण्यापेक्षा मोबाईल, टीव्ही, कॉम्प्युटर वर तुमचे व्हिडियो पाहू. शुभस्य शीघ्रम! वाचकांनी कृपया हि प्रतिक्रिया भाऊंपर्यंत पोहोचवावी.

    ReplyDelete
    Replies
    1. even me too , searching for your videos on u tubes, almost all seen by me . and even videos where you are participant in debate

      Delete
  25. जबरदस्त आणि अचूक विश्लेषण.... फारच छान.

    ReplyDelete
  26. आपली टायटल व फोटो नेहमीच यथोचित व विचार करायला लावणारी असतात.

    ReplyDelete
  27. Such great articulation and depth of knowledge. .I like

    ReplyDelete
  28. आदरणीय भाऊ तोरसेकर आपले विचार फारच परखड व सत्य असतात अर्थात् मी सर्वच वाचलेत असे नाही परंतु आतापर्यंत जेवढे वाचनात आले ते सर्वच आवडले आहे। धन्यवाद। व खुप खुप शुभेच्छा। दिपक जोशी पुणे।

    ReplyDelete
  29. आपला अभ्यास खुप सखोल आहे।

    ReplyDelete
  30. नेहमीच छान लिहीत असतात।

    ReplyDelete