Saturday, February 23, 2019

युतीची कसोटी बारामतीमध्ये

प्रतिमेत याचा समावेश असू श्‍ाकतो: एक किंवा अधिक लोक आणि लोकं बसली आहेत

गेल्या लोकसभेत म्हणजे २०१४ च्या मतदानात महाराष्ट्रातील अनेक राजकीय साम्राज्ये आणि बालेकिल्ले उध्वस्त होत असताना, बचावलेला एक बालेकिल्ला होता, तो शरद पवार यांच्या बारामतीचा. तिथून त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे प्रथमच काठावरचे मताधिक्य घेऊन कशाबशा निवडून आल्या. त्यामुळे मोदी लाटेत खुद्द पवारांचा बालेकिल्ला थोडक्यात बचावला होता. पण तो वाचवण्यासाठी पवारांनी आधीच तहनामा लिहून दिलेला होता. सुप्रिया सुळे यांच्या विरोधत लढलेले एनडीए आघाडीचे उमेदवार आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी त्याचा खुलासा नंतरही केलेला होता. देशाच्या अशा सर्व बालेकिल्ल्यात आक्रमकपणे जाऊन मोठ्या सभा घेणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बारामतीत सभा घेतलेली नव्हती. त्याच कारणास्तव आपण पराभूत झालो अशी कबुली जानकर यांनी दिलेली होती. अर्थात सुळे यांच्या विजयाचे तितकेच कारण नव्हते. त्यापेक्षाही त्या विजयाला कारणीभूत झाले होते, विजय शिवतारे. शिवतारे तिथे उभे राहिले नाहीत आणि सुप्रियांचा विजय निश्चीत झालेला होता, खरा सौदा वा तहनामा तोच होता. बारामतीत मोदींनी सभा घेण्यापेक्षाही विजय शिवतारेंना तिथून बाजूला करण्यातच सुप्रियाताईंच्या विजयाची खातरजमा करण्यात आलेली होती. किंबहूना उमेदवारीत शिवतारे यांचा बळी आणि नंतर बळीचा बकरा म्हणून जानकरांना तिथून उमेदवारी देण्यात आलेली होती. म्हणूनच आता नव्याने जी शिवसेना भाजपा युती झालेली आहे, त्यात बारामती संघ कोणाकडे जाणार, यावरच राज्यातील खर्‍या युतीचा खुलासा होऊ शकणार आहे. खरेच ही शिवसेना भाजपा युती आहे की पडद्याआड राष्ट्रवादी भाजपा युती झाली आहे, त्याची साक्ष बारामतीची जागा शिवसेनेला मिळते की भाजपा आपल्याकडे ती जागा ठेवून सुप्रियाताईंना अभय देते, ते बघावे लागेल.

मागल्या खेपेस मोदीलाट असल्याचे सर्वप्रथम ओळखून आपला बालेकिल्ला वाचवण्यासाठीच पवारांनी थेट निवडणूकीतून माघार घेतलेली होती. कारण त्या त्सुनामीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघात आपलाही टिकाव लागण्याची खात्री पवारांना राहिलेली नव्हती. त्यापेक्षा मागल्या दाराने राज्यसभेत जाण्याचा मार्ग त्यांनी चोखाळला होता. त्याच्याही पुढे जाऊन कन्येच्या सुरक्षीत विजयासाठी त्यांनी बारामतीत कोणी दुबळा उमेदवार मिळावा, म्हणून आटापिटा केलेला होता. कारण तेव्हा शिवसेनेचे पुरंदरचे आमदार विजय शिवतारे लोकसभेच्या तयारीला लागल्याचे लपून राहिलेले नव्हते. पुणे जिल्ह्यात पवारांच्या साम्राज्याला एकहाती आव्हान देण्याची हिंमत करणारा हा़च एक नव्या पिढीतला नेता आहे. त्याने बारामतीला हात घातला तर उद्या बारामती विधानसभाही हातात रहाणार नाही, याची पवारांना खात्री होती. म्हणूनच त्यांनी भाजपाशी छुपा समझोता केलेला होता. त्यातली पहिली खेळी बारामती भाजपाने शिवसेनेला देऊ नये अशी होती आणि माढ्यातून आदल्या निवडणूकीत पराभूत झालेले जानकर यांना बारामतीत उमेदवार करण्याचा खेळ झाला. दिसायला जानकर आव्हानवीर ठरत असले तरी प्रत्यक्षात त्यांच्यापेक्षा विजय शिवतारे यांना परस्पर बाजूला करणे, ही खरी खेळी होती. म्हणूनच अखेरच्या क्षणी शिवतारे यांना बाजूला व्हावे लागले. शिवसेनेला त्या जागेचा आग्रह सोडायला भाग पाडले गेले आणि पवारांना बारामती सुरक्षित करून देण्यात आली. तरीही मोदीलाटेचा प्रभाव किती होता, त्याची साक्ष मतमोजणीतून मिळालेली होती. नेहमी दोनतीन लाखाच्या फ़रकाने तिथून कोणीही पवार सहज निवडून यायचे, तिथे सुप्रियाताईंना कशाबशा पाऊण लाखाच्या फ़रकाने लोकसभेचे तोंड बघता आले. सहापैकी बहुतांश विधानसभा क्षेत्रामध्ये बाहेरचे असूनही जानकर यांनी आघाडी घेतली होती आणि स्थानिक शिवतारे असते तर सुप्रियाताईंना लोकसभेत पोहोचता आले नसते. आता काय होईल?

सोमवारी अमित शहा मातोश्रीवर पोहोचले आणि त्यांनी सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी युतीवर शिक्कामोर्तब केलेले आहे. त्यानुसार सेनेला २३ आणि भाजपाला २५ जागा लढवायच्या आहेत. आजच भाजपा़चे २३ सदस्य लोकसभेत आहेत. म्हणजेच त्या पक्षाला नव्या फ़ारतर दोन जागाच मिळणार आहेत. शिवसेनेला नव्याने एक जागा मिळयच्या आहेत आणि त्या अर्थातच पुर्वी मित्रपक्षांनी लढवलेल्या तीनपैकी असू शकतात. त्यात हातकणंगले आणि माढा यांच्यासह बारामतीचा समावेश होतो. त्यात जिथे यश हमखास मिळू शकते अशी जागा बारामती आहे. ज्या उमेदवाराला व नेत्याला पवार परिवार आपल्यासाठी मोठे आव्हान समजतो, अशाच नेत्याला मग बारामतीतून उभे करणे, ही युतीची गरज असू शकते. ते आव्हान महादेव जानकर किंवा अन्य कोणी भाजपा उमेदवार असू शकत नाही, तर शिवसेनेचे राज्यमंत्री विजय शिवतारे असू शकतात. ते पुन्हा लोकसभा लढायच्या तयारीत कितपत आहेत, त्याची कल्पना नाही. पण बारामतीचा किल्ला ढासळून टाकण्याची धमक असलेला नेता ही त्यांची ओळख आहे. सवाल त्यांनी व्यक्तीगत लोकसभा लढवण्याचा किंवा उमेदवार होण्याचा नसून, त्यांचा कोणी निकटवर्तिय तिथे युतीतर्फ़े उभे रहण्याचा आहे. म्हणूनच तिथे पवारांना पराभूत करण्यासाठी थेट आघाडीवरून लढण्याची जबाबदारी शिवतारे यांच्यावर टाकली जाण्याला निर्णायक महत्व आहे. मात्र त्यातलॊ पहिली अट ती जागा शिवसेनेच्या वाट्याला येण्याची असू शकते. म्हणजे आपली लोकसभेतील सदस्यसंख्या शिवसेनेला वाढवायची खरीच प्रामाणिक इच्छा असेल, तर सेना नेतृत्वाने त्या जागेसाठी हट्ट धरला पाहिजे. कारण त्याच पक्षाकडे बारामती पादाक्रांत करू शकणारा नेता किंवा लढवय्या आहे. मात्र खुद्द शिवतारे वा त्यांचा कोणी निकट्वर्तिय त्या आखाड्यात उतरवला गेला पाहिजे. ज्याच्यासाठी शिवतारे आपली सगळी ताकद पणाला लावतील असा कोणी हवा.

असा पहिल्या पसंतीचा उमेदवार खुद्द विजय शिवतारे असू शकतात. आमदार असताना शिवतारे यांनी बांधलेली पक्ष संघटना व मंत्री झाल्यावर आसपासच्या परिसरात निर्माण केलेल्या सदिच्छा त्यांच्यासाठी शक्ती बनलेल्या आहेत. म्हणूनच मागल्या खेपेस पवारांनाही ते मोठे आव्हान वाटलेले होते. त्यानंतर पुणे जिल्हा व बारामतीच्या आसपास परिसरात त्यांनी अजितदादांच्या राजकारणाला मोठा शह दिलेला आहे. सहकारी संस्था किंवा साखर कारखाने अशा बाबतीत हे आव्हान पवारही पेलू शकलेले नाहीत. पण एका खासदारापुरता हा विषय नाही. बारामती हा बालेकिल्ला आहे आणि तिथे सुप्रियाताईंना मोठे आव्हान ठरू शकणारा उमेदवार, शिवसेना किंवा युती देऊ शकली, तर तो देशव्यापी राजकारणातला मोठा सनसनाटी माजवणारा विषय होऊ शकतो. पण अर्थातच सुप्रियाताई व विजय शिवतारे यांच्यातली लढत तशी सनसनाटी माजवू शकणार नाही. त्यासाठी शिवतारे यांची पत्नी वा कन्या मैदानात आणावी लागेल. त्यातही कन्येला महत्व आहे. कारण शिवतारे यांची कन्या विवाहित असून तिचे पती हे पोलिस प्रशासनातील मोठे नाव आहे. शिवतारे यांचे जावई शिवदीप लांडे हे आयपीएस असून, बिहारमध्ये त्यांनी आपली कारकिर्द दबंग अधिकारी म्हणून गाजवली आहे. सध्या त्यांना महाराष्ट्रात हंगामी सेवेसाठी आणलेले असून, विभिन्न भागात त्यांनी आपला दरारा निर्माण केलेला आहे. असा पती आणि कर्तबगार लोकप्रिय पिता, यांच्याशी थेट नाते असलेली कन्या हा बारामतीच्या बुरूजाला खिंडार पाडणारा तोफ़गोळा ठरू शकतो. पिता व पतीने या महिलेच्या मागे आपली पुण्याई उभी केली, तर सुप्रियाताईंना खरेखुरे आव्हान उभे राहू शकते आणि बारामतीची लढत निर्णायक होऊ शकते. पण त्याचवेळी हे आव्हान म्हणजे जायंट किलरसारखे असू शकेल. तिथे नवखी महिला उमेदवार दोनदा जिंकलेल्या सुप्रियाताईंना भयभीत करू शकेल आणि पवारांनाही राज्यातल्या अन्य जागांकडे पाठ फ़िरवून बालेकिल्ल्यात बंदिस्त करील.

हा अर्थात़च जरतरचा विषय आहे. नुकतीच दोन पक्षात युती झालेली असून, अजून त्यांच्यात लढवाय़च्या जागाही निश्चीत झालेल्या नाहीत. प्रामुख्याने आधीपासून ज्या जागा आहेत, त्यात फ़ारसा बदल होऊ शकणार नाही. पण ज्या विरोधी पक्षाकडे आहेत किंवा मित्रपक्षांना सोडलेल्या जागा होत्या, त्याविषयी निर्णय व्हायचा आहे. त्यात बारामतीचा समावेश होतो. अशी जागा कोणत्या पक्षाच्या वाट्याला जाते आणि तिथे कोण उमेदवार दिला जातो, यालाच युतीची खरी कसोटी म्हणावे लागेल. कारण तो उमेदवार लेचापेचा किंवा दुबळा असेल वा ती जागा शिवसेनेच़्या मार्गाने शिवतारे यांच्या बाट्याला येणार नसेल, तर पुन्हा एकदा पवारांना आंदण दिली; असाच काहीसा अर्थ काढावा लागणार आहे. याचा आणखी एक संदर्भ विचारात घेतला पाहिजे. आठवड्याभरापुर्वी अचानक शरद पवार यांनी आपली भीष्मप्रतिज्ञा मोडून निवडणूकीच्या रिंगणात पुन्हा उडी घेत असल्याची घोषणा केली. त्याला बारामतीच्या बालेकिल्ल्याचाही संदर्भ आहे. तेव्हा युती झालेली नव्हती तरी युती होण्याच्या वाटाघाटी झालेल्या होत्या आणि म्हणूनच शिवसेनेकडे बारामती जाऊन शिवतारे हे आव्हान आपल्या मुलीच्या समोर उभे रहाण्याचा सुगावा साहेबांना लागलेला असावा. म्हणूनच ५ वर्षापुर्वी निवडणूक न लढवण्याची प्रतिज्ञा त्यांनी विनाविलंब मोडीत काढली. माढ्यात आजही राष्ट्रवादीचे विजयसिंह मोहिते पाटिल खासदार आहेत आणि मागल्या मोदीलाटेतही त्यांनी ती जागा त्यांनी जिंकलेली होती. मग आताच पवारांना पुन्हा तिथून लढण्याची उबळ कशाला यावी? तर बारामती व माढा हे शेजारचे मतदारसंघ असून त्यापैकी एकात पवार खुद्द उभे असले, तर बारामतीवर त्यांचा कायम वावर राहू शकतो. आपल्या हजेरीने त्यांना बारामती आपण़च लढवित असल्याचा देखावाही उभा करण्या़ची संधी मिळते. त्यामुळे आगामी लोकसभेत बारामती मतदारसंघाचे महत्व लक्षात घेता येईल.

२००९ आणि २०१९ अशा दहा वर्षात किती राजकारण बदलून गेले आहे, त्याचा यातून अंदाज येऊ शकतो. तेव्हा मुलीला लोकसभेत सुरक्षितपणे घेऊन जाण्यासाठी पित्याने बारामतीची जागा मोकळी केली होती, तर निर्धास्तपणे जिंकता येईल अशी माढ्याची जागा आपल्यासाठी निवडली होती. आता त्यांना बारामती वाचवण्यासाठी माढ्यातून पुन्हा लढतीमध्ये उतरावे लागते आहे. त्याचे आणखी एक कारण आहे. भाजपा वा शिवसेना हे समोरचे प्रतिस्पर्धी आहेत. त्यांच्याशी सौदेबाजीही करणे शक्य आहे. पण पक्षांतर्गत बेबनावाला सौदेबाजीने हाताळणे आता साहेबांच्याही आवाक्यात राहिलेले नाही. मध्यंतरी अजितदादांनी लोकसभेची निवडणूक लढविण्याची मनिषा व्यक्त केलेली होती. त्याचा अर्थ ते बारामतीतून लढणार असा होऊ शकत नाही. तिथे सुप्रियाताईंची राखीव जागा आहे. सहाजिकच दादांचा डोळा शेजारच्या माढावर असणार, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यांनी अट्टाहास केला तर नकार देणे शक्य नसल्याने खुद्द साहेबच माढ्याच्या बोहल्यावर चढायला सिद्ध झाले. कारण राष्ट्रवादीचा कारभार सध्या सुप्रियाताईंकडे गेलेला असून, त्यात अजितदादा वा अन्य नेत्यांना निर्णय प्रक्रीयेत फ़ारसे स्थान उरलेले नाही. त्यातून जो बेबनाव तयार झाला आहे, तो हाताळताना साहेबांची मोठी तारांबळ उडालेली आहे. त्यामुळे आजही आपणच पक्षाचे निर्णयाधिकारी आहोत हे नजरेत भरेल, असे डावपेच खेळणे भाग आहे. एका बाजूला अशी पक्षात तारांबळ उडालेली असताना खुद्द बारामतीमध्ये मोठे आव्हान साहेबांना नको आहे. पण ते आकार घेताना कुठेतरी त्यांनाही दिसलेले असावे. तिथेच आपली शक्ती क्षीण झाली तर राज्याच्याही राजकारणात आपल्याला स्थान उरणारे नसल्याचे भान साहेबांना आलेले आहे. त्यामागची खरी चालना बारामतीतून आलेली असावी. मुद्दा इतकाच आहे, की शिवसेना भाजपा युती साहेबांना उरलासुरला बालेकिल्ला आंदण देणार काय?

त्याचे उत्तर फ़ार लांब नाही. पहिली गोष्ट म्हणजे युतीमध्ये ही जागा कोणाच्या वाट्याला येते आणि तिथे कोणाला उमेदवारी मिळते; याकडे खुद्द शरद पवार डोळे लावून बसलेले असतील. कारण सेना भाजपा एकेकटे लढले असते, तर त्यांना बारामतीत तितके मोठे आव्हान उभे राहिले नसते. भाजपाशी सौदा करूनही बालेकिल्ला त्यांना सहज राखता आला असता. मग त्यात राष्ट्रवादीतल्या नाराजांनी कितीही दगाबाजी केली असती, तरी त्यांना फ़िकीर नव्हती. भाजपाशी त्यांनी मागल्या खेपेस तशी सौदेबाजी केली होती आणि बारामती राखल्याच्या बदल्यात विधानसभेचे निकाल लागण्यापुर्वी बाहेरून पाठींबा देण्याची घोषणा करून त्या उपकाराची परतफ़ेड सुद्धा केलेली होती. यावेळी शिवसेना मागल्या इतकी दुबळी नाही आणि काहीशी आपल्या अटी भाजपाकडून मान्य करून घेण्याइतकी शिरजोर झालेली आहे. अशावेळी बारामती शिवसेनेच्या वाट्याला जाण्याच्या भयाने साहेबांना व्याकुळ केलेले आहे आणि त्या डोकेदुखीचे खरे कारण पुरंदरचा शिवसेनेचा आमदार मंत्री विजय शिवतारे़च आहे. पवारांच्या पुणे जिल्ह्यातील वर्चस्वाला आव्हान देणार्‍या या अश्वमेधाला रोखण्याची भ्रांत माढ्याला उभे रहाण्यापर्यंत घेऊन गेली आहे. आता फ़क्त बारामतीमध्ये आपल्या पसंतीचा उमेदवार युतीच्या गळ्यात बांधण्याची गरज आहे. तो बांधायचा असेल तर ती जागा युतीत शिवसेनेच्या वाट्याला येता कामा नये आणि गेलीच तर तिथे शिवतारे किंवा त्यांचा कोणी निकटवर्तिय उभा राहू नये; यासाठी आटापिटा चालला आहे. म्हणूनच युतीची खरी कसोटी बारामती कोणाला मिळणार आणि तिथला उमेदवार कोण; यावर लागणार आहे. नसेल तर पुन्हा जानकरांना बळीचा बकरा बनवले जाईल. तसे झाले तर बारामती पुन्हा पवारांना आंदण दिली गेली, असे खुशाल समजावे. उलट शिवतारे यांच्या वाट्याला बारामती गेली तर तिथली लढत देशाचे लक्ष वेधून घेणारी होऊ शकेल.

20 comments:

  1. बारामती जिंकून शिवसेना प्रबळ होऊ शकतो हे लक्षात घेऊन पण आता भाजपाने भीमटोला हाणावा कारण आता ही सुवर्णसंधी आहे.पवार साहेब जिंकले तरी बारामती हरणे म्हणजे सगळं संपणे

    ReplyDelete
  2. धन्यवाद भाऊ. आम्हाला ही माहिती ठाऊक नव्हती. याचा अर्थ असाही होतो. २०१४ च्या निवडणूकीत शिवसैनिकांनी भाजपचा उमेदवार निवडून येऊ नये म्हणून अपेक्षित सहकार्य केले नाही.

    ReplyDelete
  3. भाऊसाहेब .... साहेबांना माढा तरी कुठे सुरक्षित उरलाय ? भाजपाने लोकमंगल च्या देशमुखांना परत लढतीत उतरवले तर साहेब बरेच दमतील. काळ बदललाय, शेतमजुरालाही पुलवामा वगैरे गोष्टी स्मार्ट फोन च्या माध्यमातून समजतात. १० वर्षांपूर्वीचे जग आज नाहीये.

    ReplyDelete
  4. खर आहे.बारामती जिंकलीच पाहिजे. त्याशिवाय राजकारणाची ऊलथापालथ होणार नाही

    ReplyDelete
  5. यावेळेस एक एक जागा महत्वाची आहे.युती मनापासून असेल तरच फायदा होईल

    ReplyDelete
  6. Bhau .. NCP chi paristhiti evadhi avaghad aahe?? swataha Sharad Pawar sabhet boltana gondhal hoto he changle lakshan nahi

    ReplyDelete
  7. छान लेख आहे. त्यामुळे राजनिती समजते.

    ReplyDelete
  8. गिरीष महाजन, देवेंद्र फडणवीस आणि दानवें यांचे बारामती बाबतचे स्टेटमेंट कदाचित, भाऊ तुम्ही म्हणतात तस होणार याचा संकेत आहे. बारामती ढासळला हा संदेश महाआघाडी ला कायम स्वरुपी संपवण्यास निदान पवारांच राजकारण एक पाऊल मागे नेण्यात महत्त्वाचे ठरेल.

    ReplyDelete
  9. लेखानी निवडणूकीची रंगत वाढवली

    ReplyDelete
  10. It is really a Good opportunity to force Pawar to be busy in saving Baramati. It will benefit BJP in Rest of the state. Becuase, currently, it is more important to fill up the seat numbers in LS than pulling SS down in Maharashtra.

    ReplyDelete
  11. Bhau, article 35 A, what centre can do about it, SC Verdict on it, hyavar ekda liha please

    ReplyDelete
  12. बारामती युती ने जिंकण्याची वेळ फक्त आणि फक्त 2014 च होती, यावेळी डबल शिवतारे उभे राहिले तरी सुप्रिया ताई 2 लाख तरी मताधिक्य घेतील

    ReplyDelete
  13. शिवसेनेने हातकणगले लोकसभा मतदार संघावर दावा सांगितला आहे . तेथे राष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता माने यांना लोकसभा तिकीट देतो असा शब्द देऊन शिवसेनेत घेतले आहे .तेथेही शिवसेनेची मजबूत अशी पकड आहे .कारण तेथे सध्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी हे खासदार आहेत .त्यांच्या संघटनेतील एक निष्टवान कार्यकर्ता ,शेट्टींच्या गावातीलच (शिरोळ) नेता आपल्यावर जातीवरून अन्याय झाला या भावनेतून भाहेर पडून शिवसेनेत गेले व विधानसभा सुध्दा जिंकली आहे . तसेच सदर लोकसभा कार्यक्षेत्रात शिवसेना ,भाजप ,आणि विनय कोरे (जनसुराज्य ) यांची ताकद वाढलेली आहे .त्यामुळे तेथे शिवसेनेने आपला हक्क सांगितला आहे .
    म्हणून मला वाटत हातकनंगले लोकसभा शिवसेना घेणार .

    ReplyDelete
  14. कार्यकर्ते लढण्यासाठी तयार असले तरी, दोन्ही पक्षाचे सर्वोच्च नेतेच मॅच फिक्स करून बसले आहेत.

    ReplyDelete
  15. शिवतारे बापूंना उतरवून मुख्यमंत्री अख्या पवार कुटुंबियांना फक्त बारामतीत अडकवून ठेवतील आणि खरंच जर पवारांचं राजकारण संपवायचं असेल तर विजय शिवतारे यांना बारामतीत उमेदवारी द्यावी

    ReplyDelete
  16. माफ करा मी आपल्या येवढा मोठा नाही मात्र या पोस्ट मध्ये काही लिखाण हे चुकीचे लिहलं आहे

    1) सगळ्यात महत्वाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 रोजी बारामतीत मध्ये सभा घेतली होती ती ही महादेव जानकर यांच्या प्रचारासाठी

    बाकी बऱ्याच गोष्टी आहेत मायर5त्या सांगणे योग्य नाही

    ReplyDelete
  17. सुप्रिया सुळे या ठाकरे कुटुंबातील असल्याने शिवसेना त्यांच्या विरोधात ताकदवान उमेदवार देणार नाही

    ReplyDelete
  18. कोणी शिवसेनेवाले अथवा बिजेपीवाले वाचतेय का

    ReplyDelete
  19. भाऊ भाजपच्या कुल खेळीवर पण लिहा की जरा
    वाचायला आवडेल

    ReplyDelete