Wednesday, February 6, 2019

भविष्यवेत्ता जॉर्ज फ़र्नांडीस



२००४ च्या विधानसभा निवडणुकांचा काळ होता. तेव्हा नामदेव ढसाळची दलित पॅन्थर शिवसेनेच्या सोबत होती आणि अचानक एका रात्री त्याचा मला फ़ोन आलेला. शिवसेना-भाजप युतीने नामदेवसाठी विधानसभेच्या दोन जागा सोडलेल्या. एक होती नागपाडा ही मुंबईची आणि दुसरी होती सातारा जिल्ह्यातील दक्षिण कराडची. तर मुंबईत नामदेवच स्वत: लढणार होता आणि त्याला कराडला लढू शकेल असा उमेदवार हवा होता. त्याचा फ़ोन आला, तेव्हा मी मुंबईत होतो आणि कराडला कमलाकर सुभेदारला उभा करता येईल, असे मी त्याला सुचवले. कमलाकर समाजवादी चळवळीतला आणि दलित पॅन्थरच्या आधीपासून नामदेवच्या सहवासातला मित्र होता. ते नाव नामदेवला आवडले. पण हा समाजवादी शिवसेनेच्या नावावर उमेदवारी भरील किंवा नाही; याची त्याला शंका होती. त्याने मलाच ते काम करायला सुचवले आणि तेव्हा कमलाकर सातार्‍याला त्याच्या गावी माण तालुक्यातल्या महीमानगडला होता. रात्रीच मी त्याच्याशी फ़ोनवर संपर्क साधला आणि त्याच्या गळी पडलो. त्याने काही आढेवेढे घेत मान्य केले. तर त्याला तात्काळ मुंबईला यायला सांगितले आणि बातमी नामदेवला दिली, तोही खुश झाला. त्यानेही मग कमलाकरशी फ़ोनवर संपर्क साधला. अशारितीने दक्षिण कराडला दलित पॅन्थर शिवसेना युतीला उमेदवार मिळाला होता. दोन दिवसांनी आम्ही तिघे व नामदेवचे काही सहकारी मातोश्रीवर चिन्हाचे अधिकारपत्र मिळवायला गेलो होतो. तिथे घोटाळत असताना नामदेवला कुठून तरी सुगावा लागला, की जॉर्ज फ़र्नांडीस मुंबईत आलेले आहेत. माहिम बांद्रा येथून जवळ होते आणि तिथल्या एका पोर्तुगिजा नावाच्या हॉटेलात जॉर्ज असल्याचे कळताच नामदेव म्हणाला, चटकन त्याला भेटून येऊ. ही माझी आणि फ़र्नाडीस यांची दुसरी व शेवटची भेट. तिथे जो काही प्रकार घडला, तो नवलाईचा होता.

बांद्रा येथून माहिमला जॉर्जला भेटायला जात असताना मी नामदेव आणि कमलाकर यांना एक घरातला किस्सा सांगितला. १९९८ सालात प्रथमच वाजपेयी सरकार सत्तेत आले होते. त्याच्या विश्वास प्रस्तावावर बोलताना जॉर्ज फ़र्नांडीस यांनी केलेले प्रभावी भाषण माझ्या शाळकरी कन्येला खुप आवडले होते आणि हा माणूस देशाचा पंतप्रधान व्हायला पाहिजे, असे तिचे ठाम मत झालेले होते. पुढेही कधीच ते मत बदलले नाही. आजच्या पिढीतल्या मुलांना तरूणाईतला जॉर्ज ठाऊक असायचे कारण नव्हते. पण मुद्देसुद बोलताना वाजपेयी विरोधकांचे धिंडवडे काढणारा जॉर्ज, माझ्या मुलीला भावला होता. हे नामदेवने ऐकले आणि मनात ठेवलेले होते. माहिमला पोहोचल्यावर पोर्तुगिजा हॉटेल आम्ही शोधून काढले. तर तिथल्या एका कोप‍र्‍यात हा माजी संरक्षणमंत्री तळलेले मासे खात बसलेला होता. त्यांचे काही मित्र सहकारीही अवतीभवती होते. नामदेवला त्यांनी लगेच ओळखले आणि हालहवाल विचारली. तसा कमलाकरही जॉर्जचाच जुना कार्यकर्ता होता. मग अकस्मात नामदेवने माझ्या कन्येचा विषय छेडला. ती कॉलेजची मुलगी जॉर्जची फ़ॅन असल्याचे सांगून त्याने तिच्याशी थोडे बोलावे असा आग्रह धरला. आजच्या पिढीतली मुलेही आपली फ़ॅन असू शकतात काय? म्हणजे तसे आश्चर्य व्यक्त करून जॉर्जनी नामदेवचा आग्रह मान्य केला. मग नामदेव महोदय माझ्याकडे वळले आणि कन्येचा फ़ोन नंबर विचारला. काम सोपे नव्हते. कारण तेव्हा कन्या अमेरिकेत मास्टर्स डिग्री करायला गेलेली होती आणि माझ्यापाशी तिच्या नंबर नव्हता. तर घरी फ़ोनाफ़ोनी करून ती जिथे होती तिथला नंबर मिळवला आणि नामदेवला दिला. त्याने विनाविलंब मोबाईलवर तो नंबर फ़िरवून माझ्या हाती दिला आणि म्हणाला ‘पोरीला सांग जॉर्जसाहेब बोलतोय म्हणून’. सुदैवाने फ़ोन लागला आणि तिचे अभिनंदन करून जॉर्जसाहेब मस्त पंधरा मिनीटे मराठीत तिच्याशी बोलले.

मी ऐकलेला संवाद असा होता. अमेरिका हा चोरांचा देश आहे. पण तिथे शिक्षण व्यवस्था उत्तम आहे. तिथे चांगले चांगले शिकून मागे आपल्या देशात यायचे आणि भारतासाठी खुप काही चांगले करता येईल असे बघायचे. हा उपदेश या थोर नेत्याने केला. तो काळ मोबाईलचे बिल खुप येत असे. पण त्याची नामदेवला फ़िकीर नव्हती की जॉर्जना. तिथून बाहेर पडल्यावर मी नामदेवला छेडले. म्हणालो, तू आजपर्यंत माझ्या पत्नीला भेटलेला नाहीस की मुलीचे तोंड बघितलेले नाहीस. मग हे धंदे तुला कोणी सांगितले? मख्ख चेहर्‍याने नामदेव उत्तरला, ‘आपल्या पोरांचं कौतुक आपण नाही तर कोणी कराय़चं?’ असा जिव्हाळ्याचा वा मित्राच्या कन्येलाही आपलंच पोर मानणारा नामदेव, किती लोकांच्या नशिबी आला ते मला तरी ठाऊक नाही. त्याच्या इतकाच जॉर्ज नावाचा मनमोकळा नेता. त्यानेही कुठल्या कोणाच्या मुलीसाठी पंधरा मिनीटे उपदेश करण्यात खर्ची घालावीत, हे आक्रितच. नामदेव जॉर्जचा जुना कार्यकर्ता. पण त्याचा अग्रह बिनाअट मानून त्यांनी हे सर्व केले. ते मुलीने खुपच मनावर घेतले. मास्टर्स डिग्री केल्यावर फ़ारकाळ ती अमेरिकेत रमली नाही. मायदेशी येण्याचे तिला वेध लागले आणि बहुधा त्यात जॉर्ज नावाच्या नेत्याचे योगदान मोठे असावे. देशासाठी काही करावे, असे सहजगत्या बोलून गेलेल्या त्या नेत्याचे कोवळ्या वयात कानावर पडलेले शब्द तिला भारतात घेऊन आले. युपीएससीची परिक्षा देऊन ती कायमची भारतात रमली. नामदेव असो की जॉर्ज, दोघेही तिला कधी व्यक्तीगत भेटलेले नाहीत. पण त्यांच्याच कृपेने आज ती मायदेशी टिकलेली आहे. सहकारी वर्गमित्र सगळे परदेशात स्थायिक होण्याच्या भवतालात तिला ही प्रेरणा नकळत याच दोघांमुळे मिळाली. आजही जॉर्ज फ़र्नांडीस तिचा आवडता नेता आहे. त्याच्या राजकीय भूमिकांविषयी तिला आस्था आहे आणि मध्यंतरी अनेक वर्षे तो आजारी असताना, ती मला अधूनमधून त्यांच्या प्रकृतीविषयी विचारत राहिलेली आहे. अशी माणसे सहवासात यावीत आणि आपली व्हावीत, यासारखी श्रीमंती नसते.

आजकाल सोबत गोतावळा घेऊन फ़िरणार्‍या नेत्यांचा जमाना आहे. साधा कोपर्‍यावरचा नगरसेवकही सोबत डझनभर माणसे घेऊन फ़िरत असतो. आजी असो वा माजी असो. अशा काळात एक माजी संरक्षणमंत्री आणि मुंबईचा बंदसम्राट म्हणून इतिहास घडवणारा माणूस, तिथे सामान्य हॉटेलात एका कोपर्‍यात जुन्या मित्रासोबत मासे खात आरामात गप्पा मारतोय, हे दृष्यच गुंगवून टाकणारे होते. आणि सत्ता गमावल्यानंतरचीच ही कहाणी नाही. मंत्री म्हणून दिल्लीत बंगला मिळाला असताना, त्यातलली एक खोली स्वत:साठी ठेवून बाकी सगळा बंगलाच पक्ष व कार्यकर्त्यांना बहाल करणारा हा नेता होता. जसा तुम्हाला टिव्हीवर दिसायचा, तसाच खाजगी जीवनातही होता. एकदा संरक्षणमंत्री असताना मुबईच्या मंत्रालयात साध्या गाडीने आलेला होता आणि सवयीने तिथल्या पोलिसांनी त्याची गाडी रोखली होती. सुदैवाने एका ज्येष्ठ पोलिस अधिकार्‍याने जॉर्जना ओळखले आणि त्यांना मंत्रालयात प्रवेश मिळाला होता. देशाचा संरक्षणमंत्री आणि केंद्रातील हा एकमेव मंत्री ज्याच्या बंगल्यात वा व्यक्तीगत सेवेत कोणी सुरक्षा कर्मचारी नव्हते की ताफ़ाही नसायचा. असला माणूस वा नेता विरळाच असतो. ढोंगी नेते व समाजवादी गोतावळ्यात त्याची कदर कशाला व्हायची? अखेर भाजपाच्या आघाडीत सहभागी झाला म्हणून त्याच्याच आप्तस्वकीय समाजवादी मंडळींनी यथेच्छ टिका केली. ज्यांची हयात विविध ढोंगवाजी करण्यात गेली, त्यांना जॉर्जच्या व्रतस्थ जीवनाची किंमत कशाला वाटावी? शब्द वा तत्वापेक्षाही परिणाम व हेतूला प्राधान्य देणारा हा नेता, समाजवादी पाखंडी गोतावळ्यात खड्यासारखा वेगळा व खटकणाराच होता. माणसे तोडण्यात आयुष्य खर्चलेल्यांना माणसे जोडण्यासाठीच आयुष्य वाहिलेला जॉर्ज कळावा तरी कसा ना? ज्या भूमीत असे झंजावात जन्माला येतात, ती भारतभूमी म्हणूनच अनेक आक्रमणे पचवून अजिंक्य राहिली आहे.

आपल्या वैचारिक निष्ठा जपताना जोपासताना तो कधीच पाखंडी नव्हता. ग्रंथप्रामाण्यावाद त्याच्यातल्या क्रांतीकारकाला कधी पचला नाही की रुचला नाही. म्हणूनच १९९६ सालात ठामपणे आपल्या समाजवादी साथींच्या भ्रष्ट डावपेचांना झुगारून जॉर्जनी भाजपशी हात मिळवला. उभी हयात कॉग्रेस विरोध आणि विरोधी राजकारण करण्यात गेलेला जॉर्ज एकमेव समाजवादी किंवा डावा नेता नव्हता. पण जेव्हा कॉग्रेस नामशेष व्हायची वेळ आली, तेव्हा तेच जुने साथी व कॉम्रेड भ्रष्ट कॉग्रेसला जीवदान द्यायला पुढे आले आणि त्यांच्यावर तुटून पडायला जॉर्जने मागेपुढे बघितले नाही. १९९८ सालात वाजपेयी सरकारच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आला असताना हाच जॉर्ज सरकारच्या समर्थनाला उभा ठाकला आणि त्याने आजकाल बोकाळलेल्या सेक्युलर पाखंडाची धिंडवडे उडवणारे भाषण केलेले होते. तेव्हा लोकसभेत कॉग्रेस आणि मार्क्सवादी पक्षाचे खासदार एकाच सुरात बोलत होते आणि एकमेकांना प्रतिसादही देत होते, अशावेळी जॉर्ज उभा राहिला आणि त्याची तोफ़ कॉग्रेस विरोधात आग ओकू लागलेली होती. त्याच्या भाषणात व्यत्यय आणणारे त्याचेच जुने समाजवादी साथी होते आणि डाव्यांसह कॉग्रेसचेही खासदार हलकल्लोळ करीत होते, कारण त्यांच्याच पाखंडाची लक्तरे जॉर्ज संसदेच्या वेशीवर टांगत होता. सरकारचे समर्थन करताना आणि तथाकथित सेक्युलर नाटकाचे मुखवटे फ़ाडताना मधेच जॉर्जनी एक पुस्तिका घेतली आणि त्यातले उतारे तो वाचू लागला. तर तो कुठली पुस्तिका वाचत आहे आणि तिची विश्वासार्हता किती, म्हणून अडथळे आणले जात होते. पण अध्यक्षीय संरक्षण मागून जॉर्जनी आपला हल्ला चालूच ठेवलेला होता. पुस्तिकेचा लेखक व जन्मदाता लौकरच कळेल, असे सांगूनही विरोध थंडावत नव्हता. हळुहळू कॉग्रेसच्या मदतीला डाव्या आघाडीचेही खासदार पुढे सरसावले आणि मग त्यांच्यावर जॉर्जनी नामुष्कीची पाळी आणली.

अध्यक्ष महाराज, मला इथे एका मोठ्या भक्कम संघटनेने कॉग्रेसविषयी व्यक्त केलेली मते मांडायची आहेत. कॉग्रेस पक्ष हा देशातील भ्रष्टाचाराचा शिरोमणी आहे. ब्रिटीश भारत सोडून गेले आणि त्यांची जागा कॉग्रेसने घेतली. गेल्या पन्नास वर्षात कॉग्रेसने भ्रष्टाचाराचे नवनवे विक्रमच प्रस्थापित केलेले आहेत. कॉग्रेसचे मंत्री नेहमी कुठल्या ना कुठल्या घोटाळ्यात अडलेले आहेत किंवा गुंतलेले असतात. स्वातंत्र्योत्तर काळातील मुंदडा प्रकरणापासून ही घोटाळ्यांची मालिका सुरू होते आणि चुरहाट लॉटरी, बोफ़ोर्स, सुखराम, हर्षद मेहता अशा घोटाळ्यांनी देशाला कंगाल करून टाकलेले आहे. देशातील प्रत्येक संस्था आपल्या स्वार्थासाठी वापरताना त्यांचा कॉग्रेसने सत्त्यानाश करून टाकलेला आहे. लोकशाहीच्या प्रत्येक अंगाला कॉग्रेसने भ्रष्ट व नामोहरम करून टाकलेले आहे. आता मात्र कॉग्रेस आणि डाव्यांना ऐकून घेणेही अशक्य झाले आणि त्यांनी सभापतींना जॉर्जना बिनबुडाचे आरोप करण्यापासून रोखायचा आग्रह धरला. कुठल्या पुस्तिकेतून हे आरोप वाचले जात आहेत, त्याचा खुलासा जॉर्ज फ़र्नांडीस यांनी द्यावा, म्हणून धुमाकुळ सुरू झाला. पण हा पठ्ठ्या बिचकला नाही की थांबला नाही. आपण निश्चीतच या पुस्तिकेचा प्रकाशक व लेखक संसदेला कथन करणार असल्याचे आश्वासन देत त्यांनी आपले भाषण चालूच ठेवले. मात्र ते सत्य ऐकण्याचा संयम सेक्युलर कॉग्रेस व डाव्यांपाशी उरलेला नव्हता. इतके उतावळे होऊ नका असे सांगून जॉर्ज पुढे म्हणाले, कॉग्रेस पक्षाचा सेक्युलर चेहराही विद्रुपच आहे, राजीव गांधी पंतप्रधान असताना दिल्लीत तीन हजार शिखांची कत्तल झाली आणि देशात अनेक राज्यात कॉग्रेसची सत्ता असताना विविध दंगलीत शेकड्यांनी लोकांचे बळी घेतले गेलेले आहेत. गैरकारभार आणि भ्रष्टाचाराच्या मदतीने जगातला कुठलाही देश प्रगती करू शकलेला नाही आणि कॉग्रेसला तर याच दोन रोगांनी कायम ग्रासलेले आहे.

हा सगळा प्रकारच पुरोगाम्यांना ररडकुंडीला आणणारा होता. त्यामुळे आणखी ऐकून घ्यायला कोणीही राजी नव्हता. मग आपल्या धुर्त हास्यातून डाव्यांकडे दृष्टीक्षेप टाकत जॉर्ज म्हणाले, तुम्हाला इतकीच घाई असेल तर पुस्तिकेचे आईबापच सांगून टाकतो, म्हणजे तरी शांत व्हाल. असे म्हणून त्यांनी आपल्या हाती असलेली पुस्तिका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा त्याच लोकसभा निवडणूकीतला जाहिरनामा असल्याचे सांगून टाकले. तेव्हा हलकल्लोळ करणार्‍या दोन्ही पक्षाच्या खासदारांची वाचाच बसली. मग मिश्किल हसत फ़र्नांडीस त्याच पुरोगामी मित्रांकडे वळून आणि अध्यक्षांना उद्देशून म्हणाले, काय झालं मित्रांनो? एकदम ही स्मशानशांतता कशी? तुम्हाला शरम वाटली पाहिजे. लोकांना काय सांगून मते मागितलीत आणि आता इथे कसले युक्तीवाद करीत आहात? कुणाचा बचाव करीत आहात? हा कसला आला आहे सेक्युलॅरीझम? डाव्या मित्रांनो, एकतर तुम्ही तुमच्याच पक्षाचा जाहिरनामाही वाचत नसणार, किंवा त्यात जे लिहीलेले आहे, त्याच्यावर तुमचाच विश्वास नसावा. ज्या कॉग्रेसचे असे धिंडवडे काढून लोकांकडून मते मागितलीत, आज त्यांच्याच पापावर पुरोगामी म्हणून पांघरूण घालताना तुम्हाला लाज वाटायला हवी. ज्या कॉग्रेसने भ्रष्टाचाराचे सगळे विक्रम मोडलेत, त्यांचे समर्थन करताना तुम्हाला शरम कशी वाटत नाही? लौकर शहाणे व्हा, नाहीतर तुमचा पक्ष इतिहासजमा होऊन जाईल. किती नेमके शब्द होते ना? आज त्याच डाव्यांचे नामोनिशाण त्रिपुरा व बंगालमधून पुसले गेले आहे आणि केरळात उरलासुरला मार्क्सवादी पक्ष अस्तित्वासाठी झगडतो आहे. हे सर्व पुरोगामी पाखंडाचा बचाव करताना झालेले आहे. एकप्रकारे जॉर्ज पुरोगाम्यांचा भविष्यवेत्ताच म्हणायचा ना? आगामी लोकसभा निवडणूकीत पुरोगामी म्हणून रोज नाचणारे लहानसहान पक्ष त्याच मार्गाने नष्टप्राय होऊन जाणार आहेत.

26 comments:

  1. जॉर्ज फर्नांडिस,अटल बिहारी वाजपेयी इ.मंडळी अत्यंत अभ्यासू,भूत वर्तमान याचे भान असणारी व भविष्याचा अचूक वेध घेणारी व्यक्ती होत्या.भारताच्या राजकीय इतिहासातील माईल स्टोन म्हणून गणना केली जाईल.ही माणसे या डोळ्याने प्रत्यक्ष पाहता आली त्यांची भाषणे समोर बसून ऐकता आली हे आमच्या पिढीचे भाग्य.अत्रे साहेबांच्या शब्दात,गेल्या दहा हजार वर्ष्यात अशी माणसे झाली नाहीत आणि पुढील दहा। हजार वर्षे होणार ही नाहीत..…

    ReplyDelete
  2. वरील लेखाने ज्ञानात भर पडली
    पण सर जोपर्यत घराणेशाहीच राजकारण संपत नाही तोपर्यत देश विकसित होने अशक्य

    ReplyDelete
  3. जुन्या काळातील चालताबोलता सन्दर्भग्रन्थ तुमच्या रूपाने आहे हे आम्हा वाचकाचे भाग्य

    ReplyDelete
  4. कालाय तस्मै नम:
    तो काळच आता भारताच्या शत्रूंचा कर्दनकाळ ठरो.
    _/\_

    ReplyDelete
  5. सुंदर लेख आवडला आणि वाचून जॉर्ज या मोठया नेत्या बद्दल माहिती मिळाली.

    ReplyDelete
  6. मस्त लेख भाऊ.

    ReplyDelete
  7. Can we get YouTube link of this speech?

    Bhau, u r realreal Journa _/\_
    All references given, no unrealistic write ups, no boot licking....

    ReplyDelete
  8. खुपच ह्रदयस्पर्शी आणि जॉर्ज पुन्हा एकदा छान उलगडले,
    मी आत्ता पर्यंत आपले जेवढे लेख वाचलेत, त्या पैकी सर्वोत्तम,
    मी हा लेख जपुन ठेवत आहे

    ReplyDelete
  9. जॉर्जसाहेबांचे मोठेपण आपणामुळे समजले!!

    ReplyDelete
  10. भाऊ,असेच जेपी आणि त्यांच्या आंदोलनाबद्दल वाचायला आवडेल.

    ReplyDelete
  11. अतिशय मार्मिक विवेचन सध्या महाराष्ट्रात शिवसेना त्याच मार्गाने चालली आहे, कार्यकारी संपादक सामना मधून रोजच्या रोज ज्या सरकारमध्ये सेना सहभागी आहे त्या सरकारला शिव्यांची लाखोली वहात असतात आणि राहूल गांधींच्या स्तुतीचे पूल उभे करत असतात त्यामुळे भविष्यात सेनेची स्थिती या पुरोगामी पक्षांसारखी होणार आहे हे नक्की

    ReplyDelete
  12. जॉर्जची आणखी एक आठवण:
    जॉर्ज केंद्रीय मंत्री असताना सरकारी कामासाठी अमेरिकेला गेला होता. त्याच्या समाजवादी/वामपंथी विचारधारेमुळे व कदाचित मंत्री होऊनही आपल्या मूळ विचारांचा त्याग न करण्याच्या त्याच्या ठाम वृत्तीमुळे अमेरिकन प्रशासन त्याच्यावर नाराज असावे. जॉर्जकडे राजनैतिक पारपत्र असूनही त्याचं frisking केलं गेलं. पण मुख्य मुद्दयाकडे लक्श ठेवून व राष्ट्रहिताचा विचार करून त्याने सदर प्रकरणाचा issue करण्याचे टाळले. ह्या प्रसंगानंतर थोड्यांच दिवसांनी झालेलं My Name Is Khan चं नाटक आठवलं की जॉर्जचं मोठेपण आणखीच भावतं.

    ReplyDelete
  13. भाऊ धन्यवाद आपणाला, खूप छान लेख आणि जॉर्ज फर्नांडिस साहेब आज आम्हाला कळाले.

    ReplyDelete
  14. जार्ज फर्नांडिसांच्याबद्दलचा आदर चै्ागुणा झाला.

    ReplyDelete
  15. भाऊ ह्या लेखसोबतचा जो photo आहे तो मस्त आहे.
    Great.

    ReplyDelete
  16. मस्तच,वाचण्यासाठी काढलेला वेळ सार्थकी लागला...

    अशी माणसे दुर्मिळच...

    मी टीव्ही वर पाहिलेय जॉर्ज साहेबांचे ते संसदेतील भाषण...

    ReplyDelete
  17. जॉर्ज फर्नांडिस यांच्या बाबतचा आदर आणखीन वाढला.

    ReplyDelete
  18. Great article, great personality George Fernandez

    ReplyDelete
  19. भाऊ, कृपया तुम्ही एक युट्युब चॅनल सुरु करा. एका सर्वे नुसार २०२० पर्यंत वेब इंडस्ट्री टेलिव्हिजन इंडस्ट्रीला मागे टाकणार आहे आणि तिथे सेन्सॉर नसल्यामुळे प्रचंड प्रमाणात माहितीची भेसळ होणार आहे. आम्हाला आजूबाजूला घडणाऱ्या घटनांची खरी नस कळावी यासाठी तुम्ही युट्युब वर या. ज्याप्रमाणे त्या दोन मुलांनी तुम्हाला वृत्तपत्रावरून ब्लॉग वर आणलं तसेच तुमचे ब्लॉग वाचक तुम्हाला आग्रह करत आहोत.

    प्रवासामध्ये वाचनापेक्षा श्रवण जास्ती चांगल्या पद्धतीने होऊ शकतं त्यामुळे याचा गांभीर्याने विचार करा. युट्युब वर व्हिडियोज टाकणे कठीण काम नक्कीच नाही पण तुमचा जो अभ्यास आहे तो नक्कीच कठीण आहे बाजारात इंटरनेट असलेले टीव्ही आलेले आहेत त्यामुळे आम्ही त्यावर पारंपरिक बातम्या पाहण्यापेक्षा तुमचे युट्युब चॅनल पाहू. इतर वाचकांनी कृपया समर्थन द्यावे आणि हि प्रतिक्रिया भाऊंपर्यंत पोहोचवावी.

    ReplyDelete