Saturday, February 9, 2019

भावी पंतप्रधानाची चर्चा

nehru indira के लिए इमेज परिणाम

खुप कोवळ्या वयात म्हणजे संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा काळ असेल, तेव्हा आसपासची वडीलधारी माणसे राजकारणाविषयी जे काही बोलत, त्यातून मला राजकीय घडामोडीबद्दल स्वारस्य निर्माण झाले. अर्थात ही वडीलधारी माणसे म्हणजे कोणी राजकीय अभ्यासक किंवा जाणकार नव्हते. अगदी ज्यांना सुशिक्षित म्हणता येतील, असेही लोक नव्हते. ते सामान्य कष्टकरी, कर्मचारी होते. त्यातले जे कोणी कुठल्या संस्था संघटनेत फ़ावल्या वेळेत काम करीत आणि वर्तमानपत्र नित्यनेमाने वाचणारे लोक, म्हणजेच माझ्या कोवळ्या वयातील वडीलधारे लोक होते. सुरक्षित अंतरावर बसून वा थांबून मी त्यांच्या गप्पा ऐकत असे. त्यातले कोणी समाजवादी, कम्युनिस्ट वा कॉग्रेस पक्षाच्या बाजूने बोलणारे असत. त्यामुळेच त्या त्या पक्षाच्या नेत्यांबद्दल वा भूमिकांबद्दल कानावर काहीबाही पडायचे. त्याच दरम्यान मग अशा पालकांच्या हातातून निसटलेला रिकामटेकडा पेपर हाती लागला; तर त्यातल्या बातम्या मी वाचत असे. पण त्यातले लेख वाचायचा मला कंटाळा असायचा. कारण लेखांची लांबी अधिक व मुद्दे डोक्यावरून जाणारे असत. अशा काळातही जिद्दीने लेख वाचण्याचा मात्र प्रयास चालू असे. मग त्या वडीलधार्‍यापैकी कोणाला तरी वाचनातून उभ्या राहिलेल्या शंकाही विचारत असे. पण त्यातले बहुतेकजण खेळायला जा, नसत्या भानगडी हव्यात कशाला; म्हणून पिटाळूनच लावायचे. सहाजिकच त्यांची नजर चुकवून त्यांच्यातल्या गप्पा ऐकणे, हाच राजकारण शिकण्याचा समजण्याचा एकमेव मार्ग होता. तशा काळात म्हणजे १९६० पुर्वी देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते आणि त्यांच्या संबंधाने ऐकलेली एक चर्चा अजून आठवते.

   पंडितजी देशाचे पहिले व लोकप्रिय पंतप्रधान होते आणि त्यांच्यानंतर कोण पंतप्रधान होऊ शकतो, अशी चर्चा सगळीकडे व्हायची. वर्तनामपत्रातून व्हायचीच, पण लालबागच्या आमच्या गिरणगावातही सामान्य कष्टकर्‍यांमध्ये ती चर्चा अधुनमधून कानावर यायची. खरेच देशात ती राष्ट्रीय नेतृत्वाची जबाबदारी पेलू शकेल, असा कुणी दुसरा नेताच नाही; अशी एक सर्वसाधारण भावना होती. अगदी कॉग्रेसच्या विरोधात अटीतटीने बोलणार्‍या कार्यकर्त्यांपासून मोठमोठ्या विरोधी नेत्यांनाही नेहरूंना पर्याय नाही; असेच वाटत असे. त्याला म्हणे एक पर्याय होता तो जयप्रकाश नारायण यांचा. पण स्वातंत्र्य चळवळ संपताच जयप्रकाशांनी राजकारणातून अंग काढून घेतले व ते सर्वोदय आंदोलनात सहभागी झाले. त्यामुळे विरोधी पक्षातर्फ़े नेहरूंना असलेले आव्हान संपल्यासारखेच होते. तरीही नेहरूंनंतर कोण अशी चर्चा चालायची. त्यासंबंधाने कानावर पडलेला एक संवाद अजून आठवतो. कॉग्रेस कार्यकारिणीच्या एका बैठकीत म्हणे असा मुद्दा खुद्द नेहरूच बोलले; तर कॉग्रेसचे ज्येष्ठ नेता असलेले रफ़ी अहमद किडवाई तात्काळ उत्तरले, ‘पंडितजी सत्तापदावरून उतरून बघा. नेहरूंनंतर कोण तो हयातीतच बघू शकाल.’ अर्थात ते विनोदाने तसे बोलले असे म्हटले जात होते. त्यातले किती खरे किती खोटे मला माहित नाही. अजाण वयात सामान्य कार्यकर्ते वा नागरिकांच्या तोंडून ऐकलेली ही गोष्ट आहे. पण तेवढा भाग सोडला, तर आपल्या देशात कधी पंतप्रधान कोण होईल; अशी चर्चा सहसा व्हायची नाही, किंवा ऐकायला मिळालेली नाही. त्यामुळेच भावी पंतप्रधान म्हणून पुढल्या काळात नाव आले, ते अटलबिहारी वाजपेयी यांचे.

   पंतप्रधान पदावर दावा सांगणारा किंवा देशात बिगरकॉग्रेसी पर्यायी सत्ता प्रस्थापित करण्याचा मनसुबा उघडपणे व्यक्त करणारा १९६० नंतरचा पहिला पक्ष होता जनसंघ. या पक्षाची स्थापनाच मुळात स्वातंत्र्योत्तर काळात झालेली. त्यामुळे नेहरू असेपर्यंत जनसंघ सत्तेच्या जवळ जाण्याची कुठली शक्यता दूरदूर दिसत नव्हती. पण त्या पक्षाचे विचारवंत नेते दीनदयाल उपाध्याय यांच्या मृत्यूनंतर पक्षाची धुरा राष्ट्रीय नेता म्हणून वाजपेयी यांच्याकडे आली. तेव्हापासून भावी तरूण पंतप्रधान अशीच जनसंघीयांनी त्यांची प्रतिमा उभी करण्याचा कसोशीने प्रयत्न केला होता. अबकी बारी अटलबिहारी’ ही तेव्ह्पासूनची घोषणा. मात्र तरीही त्या पक्षाला कुठल्या एका राज्यात आपला मुख्यमंत्रीही सत्तेवर बसवणे शक्य झालेले नव्हते. त्यामुळे नुसत्या प्रचारकी घोषणा यापेक्षा वाजपेयींच्या नावाला फ़ारसा अर्थ नव्हता. पुढे चीनी आक्रमणात भारताचा दारूण पराभव झाल्यावर नेहरू मनाने खचले होते आणि दोनच वर्षात त्यांचा देहांत झाला. तेव्हा कॉग्रेसने लालबहादूर शास्त्री यांची पंतप्रधानपदी निवड केली. पण शास्त्रीजींचे नाव त्यापुर्वी कधी पंतप्रधान म्हणून घेतले गेले नव्हते. त्यानंतर पाकिस्तानला पाणी पाजून चिनी पराभवाचा कलंक धुवून काढणार्‍या शास्त्रीजींचेही आकस्मिक निधन झाले आणि नव्या पंतप्रधानांच्या निवडीचे राजकारण कॉग्रेसमध्ये रंगले. त्यात मोरारजी देसाई यांनी यांनी पंतप्रधान पदावर दावा केलेला होता. पण ऐनवेळी त्यांना शह देण्यासाठी त्यांच्याच पक्षातील प्रतिस्पर्ध्यांनी नेहरूकन्या इंदिरा गांधी यांना पुढे केले. तत्पुर्वी शास्त्री सरकारमधल्या नभोवाणीमंत्री इंदिराजींकडे कोणी कधी भविष्यातल्या पंतप्रधान म्हणून बघितले नव्हते. त्याआधी त्यांच्या नावाची चर्चाही झालेली नव्हती. घडला तो बराचसा आकस्मिक प्रकार होता. त्यानंतरच्या काळात देशाच्या राजकारणावरची कॉग्रेसची पकड ढिली होत गेली, तरी कॉग्रेसबाहेरचा वा आतला अन्य कोणी पंतप्रधान होऊ शकतो किंवा व्हावा; अशी चर्चा सहसा होत नसे. अपवाद दोनच होते. मोरारजी देसाई पंतप्रधान व्हायला उत्सुक होते, पण त्यांचे नाव कोणीच पुढे आणत नव्हता. देशव्यापी पर्यायी पक्ष होऊन सत्ता मिळवण्याची स्वप्ने बघणारा जनसंघ वाजपेयींचे नाव पंतप्रधान पदासाठी घेत असे. पण अशा दोन्ही नावांकडे कोणी कधी गंभीरपणे बघितले नाही. मुद्दा इतकाच, की मला राजकारणाच्या अभ्यासाची तोंडओळख होऊ लागल्यापासून कधी आपल्या देशात गंभीरपणे कुठल्या व्यक्ती वा नावाची भावी पंतप्रधान म्हणून चर्चा झाल्याचे आठवत नाही.

   १९६६ साली इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या व देशाची सत्तासुत्रे त्यांच्या हाती गेल्यावर कॉग्रेसमधील दोन प्रवाह उघडपणे समोर येऊ लागले. जेव्हा इंदिरा गांधींची निवड झाली, तेव्हा समाजवादी विचारवंत नेते डॉ. राममनोहर लोहियांनी तर कॉग्रेस मुखंडांच्या हातातली कठपुतळी; किंवा ‘गुंगी गुडिया’ अशीच त्यांची संभावना केली होती. दोनतीन वर्षात म्हणजे १९६७ च्या निवडणूका नऊ राज्यात कॉग्रेसने गमावल्या आणि लोकसभेत काठावरचे बहूमत येऊन सत्ता टिकवली. त्यानंतर ही ‘गुंगी गुडीया’ स्वत:च राजकारण खेळू लागली. पक्षाबाहेरचे विरोधक व पक्षातले विरोधक यांच्या कोंडीत सापडलेल्या इंदिरा गांधींनी अत्यंत प्रतिकुल स्थितीत देशासमोर आपली अशी एक स्वतंत्र प्रतिमा उभी केली. तिथून पक्षिय व विचारधारांच्या राजकारणाचा जमाना क्रमाक्रमाने अस्तंगत झाला. अवघे राजकारण इंदिरावादी वा इंदिराविरोधी अशी घुसळण घेत पुढे सरकू लागले. त्यांच्या तुलनेत पंतप्रधान पदावर दावा करणारा लोकप्रिय नेता वा तितके संघटनात्मक पाठबळ असलेला अन्य कोणीच नेता देशात नव्हता. ती पोकळी भरून काढण्यासाठीच पुढल्या काळात वाजपेयी यांचे व्यक्तिमत्व उभारण्याचा प्रयास जनसंघ करीत होता. ते वास्तवात यायला तब्बल तीन दशके लागली. असो, सांगायचा मुद्दा इतकाच, की नेहरूंच्या काळात जसे राजकारण त्याच्याच लोकप्रिय व्यक्तिमत्वाच्या भोवती घुटमळत होते. त्याच्याही पुढली पायरी इंदिराजींनी गाठली होती. नेहरू कितीही मोठे नेते असले, तरी नेहरू म्हणजेच कॉग्रेस, अशी स्थिती कधीच नव्हती. इंदिराजींच्या कारकिर्दीत ती वेळ आली. इंदिरा म्हणजेच कॉग्रेस, असे चित्र त्यांनी पद्धतशीरपणे निर्माण केले आणि आजही त्यातून त्या पक्षाला बाहेर पडता आलेले नाही. तशी स्थिती वाजपेयी यांची कधीच नव्हती. नेहरू वा इंदिरा गांधी इतक्या लोकप्रियतेचे दुसरे नाव कधी समोर आलेच नाही. ज्या नावे किंवा व्यक्तिमत्वाच्या भोवती देशाचे राजकारण वा चर्चा घुटमळत रहाव्या, असा नेता पुन्हा झालाच नव्हता. त्याचे कारणही तसेच होते. इंदिराजींच्या निर्वाणानंतर त्यांच्या वारसांना त्याच निष्ठेने पूजण्याची प्रथा कॉग्रेसमध्ये पडलेली असली, तरी त्या वारसांना इंदिराजींची गुणवत्ता वा कौशल्याची प्रचिती घडवता आलेली नाही.

‘अर्धशतकातला अधांतर’ या आगामी पुस्तकातून

7 comments:

  1. पुस्तकाची उत्कंठा वाढली आहे!

    ReplyDelete
  2. भाऊ, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

    ReplyDelete
  3. आशिष म्हसाळकरFebruary 9, 2019 at 4:48 AM

    भाऊ, ऊत्सुकतेने वाट बघतोय या पुस्तकाची.

    ReplyDelete
  4. 'गूंगी गुडीया'कोण म्हणाले होते?लोहिया की कामराज?

    ReplyDelete
  5. इंदिरा गांधी नंतर व्यक्ति केंद्रीत राजकारण हे मोदींनी यशस्वी पणे केले. पुढील काळात ते अजून त्या दिशेने जाईल व अध्यक्षीय पध्दत भारतात येउ शकेल.
    निवडणूकांमधला भ्रष्टाचार कमी करण्यासाठी तोच प्रभावी उपाय असेल.

    ReplyDelete