Saturday, February 9, 2019

राळेगण सिद्धी आणि कार्यसिद्धी

anna hazare के लिए इमेज परिणाम

तुम्ही कुठे आहात आणि कुठे पोहोचायचे आहे, त्याचे भान उरले नाही, मग निघता येत नाही आणि कुठेही पोहोचता येत नाही. घाण्याचा बैल जसा खुंटाभोवती फ़िरत रहातो आणि झापडे लावलेली असल्याने त्याला समोरचे काही दिसत नाही, तशीच माणसाचीही अवस्था होऊन जाते. अर्थात माणसाला कोणी झापडे लावलेली नसतात. डोळे उघडे असतात. पण डोळे जे दाखवतात, ते बघायला मेंदू शुद्धीवर असावा लागतो. अन्यथा मनाला हवे आणि आवडते; तेच दिसायला लागते आणि झापडे लावलेल्या प्राण्यासारखा माणूसही तिथल्या तिथे फ़िरत रहातो. अण्णा हजारे यांची तशीच काहीशी शोकांतिका झालेली आहे. ते बघू पहातात, तेच त्यांना सवंगडी दाखवित असतात आणि जे ऐकायचे असते, तेच अण्णांना भेटायला येणारे सांगत असतात. सहाजिकच अण्णा कायम आपल्या मस्तीत असतात आणि आपण जग हलवू शकतो, म्हणून खुशही असतात. त्यातून त्यांच्या अलिकडल्या प्रत्येक आंदोलनाची अवस्था हास्यास्पद होऊन गेलेली आहे. तसे बघायला गेल्यास २०११ सालातही अण्णांना आपण देश हादरून टाकला असे वाटलेले असले; तरी तशी वस्तुस्थिती नव्हती. विविध राजकीय व अन्य क्षेत्रातील हितसंबंधियांनी अण्णांच्या भोळेपणाचा आपल्या हेतूसिद्धीसाठी बेमालूम वापर करून घेतला होता. त्यामुळे अण्णांना जी झिंग चढली, ती अजून उतरलेली नाही. दरम्यान त्यांचा आपल्या स्वार्थासाठी वापर करणारे त्यांना सोडून निघून गेलेत आणि उरलेले राजकीय नेते अण्णांना त्याच समजूतीमध्ये राखून, आपला कार्यभाग उरकून घेत असतात. अन्यथा अण्णांवर अशी अगतिक होऊन उपोषण सोडण्याची नामुष्की आलीच नसती. किंबहूना आता अण्णांना आपली खरी प्रतिष्ठा व शक्ती समजू लागली आहे, पण प्रसिद्धी झोतात रहाण्याचा हव्यास त्यांना शांत बसू देत नसावा. अन्यथा त्यांच्यावर ही वेळ आली नसती.

२०११ सालात अण्णा तसे महाराष्ट्राला जुने झालेले होते आणि त्यांच्या उपोषणाला वा अन्य सत्याग्रहांना इथे कोणी वचकण्याची कुठलीही परिस्थिती राहिलेली नव्हती. अशा वेळी अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या टोळीने अण्णांना उचलून दिल्लीला नेलेले होते. खरेतर देशात तेव्हा साक्षात अराजक माजलेले होते. युपीए नावाने कॉग्रेस अल्पमताचे सरकार चालवताना बेछूट निर्णय घेत होती आणि भाजपाला विरोध या पुरोगामी खुळामुळे बाकीच्या विरोधी पक्षांनी तॊ देशाची लूट राजरोस होण्याला काही आडकाठी ठेवलेली नव्हती. भाजपाही अडवाणींच्या नेतृत्वाखाली इतका मरगळला होता, की देशात सरकारला रोखण्याची कुणातच इच्छाशक्ती उरलेली नव्हती. सामान्य जनता बेचैन होती, पण तिला नेतॄत्व देऊ शकेल, असा कोणी पक्ष नव्हता, नेता नव्हता, की संघटनाही नव्हती. त्याचा फ़ायदा घेऊन केजरीवाल या धुर्त माणसाने एक बिगर राजकीय मंच उभा केला. त्यात विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्थांना व व्यक्तींना ओढलेले होते. त्याही लोकांना केजरीवालचा अंतस्थ हेतू कधीच समजला नव्हता. देशातला सामान्य तरूण बेचैन होता. त्याला मुजोर झालेल्या सत्ता व भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवण्याची खुमखुमी होती. त्याला योग्य मंच केजरीवाल यांनी उभा करून दिला. इंडिया अगेन्स्ट करप्शन नावाचा तात्पुरता ढाचा उभा करून केजरीवाल यांनी एक कोअर कमिटी बनवली. त्यात सहभागी असलेला कोणीही आज अण्णांच्या सोबत उरलेला नाही, की केजरीवालच्या सोबत शिल्लक नाही. इकडे अण्णा नामोहरम होऊन गेलेत आणि केजरीवाल एक राजकीय पक्ष काढून दिल्लीचा मुख्यमंत्री बनुन बसला आहे. भ्रष्टाचार व बेशरमीच्या सगळ्या मर्यादा ओलांडून जाण्याचाही पराक्रम केजरीवाल करून बसलेले आहेत आणि लोकपाल नावाची संस्था स्थापन व्हावी, म्हणून तेच अण्णा आपल्या गावात उपोषणाला बसलेले होते.

दिल्लीत केजरीवाल यांच्यापाशी एक संघटना होती आणि तिला चालवण्यासाठी लागणारा सगळा खर्च देणारेही होते. परदेशी आर्थिक मदतही होती. भाजपा किंवा इतरही राजकीय पक्ष तेव्हा हतबल होऊन, अशा सरकारविरोधी आवाजाला प्रतिसाद देण्याच्या मनस्थितीत होते. अशावेळी केजरीवाल यांनी लोकपाल मागणीसाठी आंदोलनाचा बेत आखला. त्यांच्यापाशी तसा चेहरा व ओळख नव्हती. ती गरज भागवण्यासाठी असा माणूस या टोळीला हवा होता, की ज्याच्या चारित्र्यावर कोणी शंका घेऊ शकत नाही. नंतर उचलून बाजूला केला तरी तो आपल्याला अडथळा होऊ शकणार नाही. त्या व्याख्येत अण्णा नेमके बसत असल्याने केजरीवालनी राळेगण सिद्धीतून अण्णांना उचलले आणि दिल्लीच्या रामलिला मैदानावर आणुन बसवले. सगळे विरोधी पक्ष मरगळलेले असताना उपटलेले हे आंदोल,न मोकाट सुटलेल्या युपीएच्या सत्तेला भयभीत करून गेले. सत्तेने मग या असंघटीत वाटणार्‍या आंदोलन व जमावाला पांगवण्यासाठी अकारण शक्तीचा वापर केला आणि मनातून घगधगणारी लोकांची  भावना उफ़ळून रस्त्यावर आली. आधी जंतरमंतर आणि नंतर रामलिला मैदान फ़ुलून गेले. ती अण्णांची लोकप्रियता असण्यापेक्षाही अस्वस्थ जनभावना होती. याची पुर्ण जाणिव असलेला एकच माणूस त्यांच्याजवळ होता आणि त्याचे नाव केजरीवाल. त्यांनी माध्यमातील काही पत्रकार आणि अन्य क्षेत्रातले भुरटे हाताशी धरून ह्या आंदोलनाला आकार दिलेला होता. त्याची सुत्रे कायम अण्णांकडे असल्याचे चित्र उभे करण्यात आलेले असले, तरी खरा सुत्रधार केजरीवाल होता आणि आपली राजकीय महत्वाकांक्षा पुर्ण करून घेण्यासाठी त्याने सर्वांचा धुर्तपणे वापर करून घेतला. अण्णांसह अनेकांना त्याचा अर्थ व हेतू समजण्यापुर्वी त्यांचे बळी गेलेले होते. त्यांनी मग परिस्थितीशी समझोते केले आणि पर्याय शोधून अन्यत्र रमले. त्या नशेतून बाहेर पडू शकलेले नाहीत, ते एकटे अण्णा!

गल्ली वा परिसरात वर्गणी काढून मंडप थाटणारे व गाजावाजा करणारे खरे सुत्रधार असतात आणि मंडपात बसवलेल्या गणपतीचीच पूजा चाललेली असते. पण उत्सव संपला, की आपले विसर्जन होणार याचे भान असलेली मुर्ती कधी स्वयंभू होण्याचा आगावूपणा करीत नाही. ती आयोजक मंडळाच्या अधीन असते. लोकपाल आंदोलनात अण्णा हे मंडपातले गणपती होते. प्रत्येकजण त्यांच्याच पाया पडत होता आणि केजरीवाल मंडळी सर्वांना प्रसाद देण्यापासून वर्गणी देणगी गोळा करण्यापर्यंत सर्व व्यवहार छान संभाळत होती. उत्सव छान पार पडला आणि नंतर विसर्जनही झाले. पण अण्णा आपली प्राणप्रतिष्ठा विसरून जायलाच राजी नव्हते. म्हणूनच आपल्या स्वयंभू शक्तीचे प्रदर्शन करण्याचे मोह त्यांना मागल्या आठ वर्षात आवरता आलेले नाहीत. त्यांच्या आंदोलनाचा तात्कालीन राजकीय फ़ायदा केजरीवाल टोळीने मस्तच उचलला आणि दिल्लीतला हा सामान्य कार्यकर्ता नवा पक्ष काढून त्या नगरराज्याचा मुख्यमंत्रीही होऊन गेला. पण अशा राजकीय उलथापालथीचा डोलारा पेलण्याची त्या उपटसूंभाची कुवत नव्हती, की त्याच्यापाशी तितकी सज्जता नव्हती. कुणा खंबीर नेता वा पक्षालाच ते शक्य होते आणि तितकी संघटनात्मक शक्यता भाजपापाशी होती तरी त्यांच्यापाशी निदान दिल्लीत तसे शीर्षस्थ नेतृत्व नव्हते. दुर गुजरातमध्ये बसलेल्या मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी हा मोका ताडला आणि लोकपाल आंदोलन संपतानाच त्यांनी प्रक्षुब्ध भारतीय जनतेला हवा असलेला पर्याय म्हणून दिल्लीच्या आखाड्यात उडी घेतली. केजरीवाल किंवा त्यांना पुढे करणार्‍या पडद्यामागच्या इतर सुत्रधारांना ती शक्यता माहीतही नव्हती. मोदी त्या असंतोषावर असे स्वार झाले, की अण्णांना लोक कुठल्या कुठे विसरून गेले आणि केजरीवाल यांचा फ़ुगा त्यांच्या माध्य्मातील साथी व सवंगड्यांनी कितीही फ़ुगवून फ़ुगला नाही. तिथेच अण्णांची महती संपलेली होती.

खरेतर दिल्लीच्या रामलिला मैदानावरचे अण्णांचे उपोषण हा त्यांच्या कारकिर्दीतला परमोच्च बिंदू होता आणि त्यांनी तिथेच सार्वजनिक जीवनातून संन्यास घ्यायला हवा होता. कारण त्या आंदोलनाला चेहरा अण्णांचा होता, तरी ते त्यांचे आंदोलन नव्हते की त्याचे श्रेय अण्णांना नव्हते. तो सगळा परिस्थितीचा चामत्कार होता. तेव्हा सत्ताधीश मुजोर झालेले होते आणि विरोधी पक्ष बेजार होते. जनमानसात प्रक्षोभ होता आणि कोणीही आवाज उठवायला पुढे येणार्‍याच्या मागे लोक शावणार होते. हीच स्थिती १९७४ सालात होती आणि मस्तवाल इंदिरा गांधींना रोखायला जयप्रकाश नारायण पुढे सरसावले. त्यांना बंदिस्त करून इंदिराजींनी आणिबाणी लादली. विरोधी पक्षांनाही जेरबंद करून टाकले. त्याच्या विरोधाला जनता रस्यावर उतरलेली नव्हती. पण आपला क्षोभ प्रदर्शित करण्याची पहिली संधी मिळताच मतदाराने इंदिराजींना रायबरेलीतही पराभूत केले होते. पण त्या समग्र क्रांतीच्या आंदोलनाला मार्ग मिळाल्यावर जेपी बाजूला झाले होते आणि त्यांनी निवडणूकात इंदिराजींना पराभूत करायचे आवाहनही लोकांना केले होते. पण निर्णय प्रक्रीयेतून जेपी बाजूला होते. २०१२-१३ ची स्थिती काहीशी तशीच होती. त्याचे नेतृत्व करायला अण्णा पुढे आले नाहीत, की त्यांनी विरोधकांना साथही दिली नाही. अशा स्थितीत लोकांना राजकीय पर्याय हवा असतो आणि तोच नरेंद्र मोदींच्या स्वरूपात पुढे आला. तोच लोकांनी स्विकारला. कारण अण्णा जो पर्याय देऊन गेले होते, तो आम आदमी पक्षाचा पर्याय आळवावरचे पाणी होते. २०१३ च्या दिल्ली विधानसभा निवडणूकीनंतर आपणही प्रचलीत राजकारण्यांपेक्षा तीळमात्र वेगळे नसल्याचे केजरीवाल यांनी अल्पावधीत दाखवून दिले आणि पर्यायाने मोदींचे पारडे जड झाले. अण्णांचा अवतार तिथेच संपलेला होता. पण ते त्यांना अजून उमजलेले नाही. हीच अण्णांची शोकांतिका होती.

आपल्या नावाने राजकीय खेळ केलेल्या केजरीवाल यांचा अण्णा कधी कान पकडू शकले नाहीत आणि दोनतीन प्रसंगी त्यांच्या मर्यादा त्यांनी़च जगासमोर आणलेल्या होत्या. रामलिला मैदान गाजवल्यावर मुंबईत उपोषणाचा खेळ अण्णांनी उभा केला आणि गर्दीअभावी त्यांना तिसर्‍या दिवशी गाशा गुंडाळावा लागलेला होता. गर्दीशिवाय आणि प्रसिद्धीच्या झोताशिवाय अण्णा उपोषण करू शकत नाहीत, ह्या मर्यादा मुंबईच्या बीकेसी मैदानावरच सिद्ध झालेल्या होत्या. कारण केजरीवाल यांच्यासारखी संघटनात्मक शक्ती मुंबईत अण्णांच्या मागे नव्हती. किंवा केजरीवाल इथे तितकी साधने व गर्दी जमवू शकलेले नव्हते. पुढे दिल्लीतही अण्णांनी ममतांच्या सहकार्याने रामलिला मैदानावर लोकपालचा दुसरा प्रयोग योजलेला होता. पण तिथे केजरीवालनी पाठ फ़िरवली व गर्दीअभावी अण्णाही तिकडे फ़िरकले नाहीत. बिचार्‍या ममतांना तोंडघशी पाडून अण्णा त्या मेळाव्यापासून नामानिराळे राहिले. ही अण्णांच्या शोकांतिकेची सुरूवात होती. लोकपाल आंदोलनात अण्णांना पित्यासमान मानणारे व त्याचे प्रदर्शन करणारे सर्व ‘आम आदमी’ कुठल्या कुठे बेपत्ता झालेले होते. अण्णा सगळीकडून एकाकी पडत गेले. या़चे पहिले कारण लोकक्षोभ हा आपला करिष्मा नाही, हे अण्णांना कधीच कळले नाही आणि आजही उमजलेले नाही. आज त्यांना मोदी वा महाराष्ट्र सरकारच्या विरोधात बातम्यांचे रान उठलेले दिसत असले, तरी २०११ इतका असंतोष वा संताप जनमानसात नाही. म्हणूनच थंड मनांना पेटवण्याचा प्रयास गैरलागू होता व आहे. अण्णाच कशाला, विविध संघटना व राजकीय पक्षांनी गेल्या दोन वर्षात असे अनेक प्रयास करून झालेले आहेत. पण त्याला फ़ळ आलेले नाही किंवा लोकांचा संताप उफ़ाळून येऊ शकलेला नाही. पण अण्णांना हे कोणी समजावून सांगावे? ते रामलिला मैदानावरच्या त्या आठ वर्षे जुन्या आठवणीतून बाहेरच पडायला राजी नाहीत.

जनमानसात प्रक्षोभ असला, मग कोणीही त्याला काडी लावू शकतो. त्या असंतोषाच्या ज्वाळांनी आगडोंब उसळताना बघून कुठलाही सत्ताधीश हवालदिल होऊन जातो. तेच तेव्हा कॉग्रेस आणि युपीएचे झालेले होते. कारण जितका मस्तवालपणा सताधीश करीत होते, त्याच्या विरोधात कोणी विरोधी पक्ष वा नेताही ठामपणे उभा ठाकत नव्हता, की माध्यमातूनही आवाज उठवला जात नव्हता. जनमानसाचा प्रक्षोभ आंदोलनातून वा माध्यमातून व्यक्त होतो. तेव्हाचे पत्रकार संपादक सरकारला पाठीशी घालत होते आणि म्हणून अण्णा वा रामदेव यांच्या आंदोलनाला प्रतिसाद मिळालेला होता. आज नेमकी उलटी स्थिती आहे. विरोधक व माध्यमांसह बुद्धीवादी वर्गातून नसलेल्या जनप्रक्षोभाला काडी लावण्याचा प्रयास नित्यनेमाने चालू आहे. बातम्या वा चर्चेतून रंगवला जाणारा प्रक्षोभाचा तमाशा, धादांत खोटा आहे. म्हणूनच त्यातून कुठले आंदोलन उभे राहू शकलेले नाही, की अण्णांच्या उपोषणाला वा अन्य कुठल्या आंदोलनाला सरकारने प्रतिसादही दिलेला नाही. तिथेच अण्णांची फ़्सगत होऊन गेली आहे. ते माध्यमातल्या बातम्यांवर विश्वास ठेवून आंदोलनाच्या आखाड्यात उतरले आणि एकदा यात उडी घेतल्यावर माघारीला जागा नसते. उपोषणात तर जाणार्‍या प्रत्येक तास दिवसाने आपली मुदत संपुष्टात येत असते. आपणच रचलेल्या सापळ्यातून सुटण्यासाठी केविलवाणी तारांबळ उडत असते. सहाजिकच यासारख्या आंदोलनात उडी घेण्यापुर्वी शंभरदा विचार करायचा असतो. आपल्या साधनांसह शक्ती व आपल्यापाशी असलेल्या लढण्याच्या मुदतीचाही हिशोब मांडावा लागत असतो. अण्णांपाशी तशी काही यंत्रणा नाही की डावपेच वा रणनिती नाही. खरे सांगायचे तर राळेगण सिद्धी व रामलिला मैदानातला फ़रकच अण्णांना कधी उमजलेला नाही. तीच अण्णांची शोकांतिका आहे. त्यांच्या भोळेपणाला कोणीही येऊन सहज वापरून जातो. त्यामुळे राळेगणसिद्धीचे हे अवतार पुरूष कार्यसिद्धी करण्यात अपयशी ठरले आहेत.

21 comments:

  1. मार्मिक पण अचूक

    ReplyDelete
  2. 'खरेतर दिल्लीच्या रामलिला मैदानावरचे अण्णांचे उपोषण हा त्यांच्या कारकिर्दीतला परमोच्च बिंदू होता आणि त्यांनी तिथेच सार्वजनिक जीवनातून संन्यास घ्यायला हवा होता'.
    Perfect... 👌👌

    ReplyDelete
  3. आजचा लेख is a study in the art of mass politics...
    Completely appreciate your insights and wisdom + the ability to articulate... 👏👏👏

    ReplyDelete
  4. भाऊ, अतिशय उत्तम लेख आहे. अण्णा आणि केजरीवाल यांचे पितळ उघडे पाडले आहे.

    ReplyDelete
  5. अण्णांचे इतके योग्य मोजमापन आज पर्यंत कोणी केलेले नसेल. आपण म्हणालात तसे ’
    "खरेतर दिल्लीच्या रामलिला मैदानावरचे अण्णांचे उपोषण हा त्यांच्या कारकिर्दीतला परमोच्च बिंदू होता आणि त्यांनी तिथेच सार्वजनिक जीवनातून संन्यास घ्यायला हवा होता." निदान राळेगण सिध्दी सारखा आणखी निरनिराळ्या व आवश्यक असलेल्या गावी वा ठीकाणांवर जावून तसेच प्रयोग करीत रहात अजून पाचपंचवीस "राळेगण सिध्दी" निर्माण केले असते तर तेथील गावकर्‍यांनी तर डोक्यावर घेतले असतेच पण सरकार दरबारीही ते अधिक नावारूपाला आले असते, निदान नंतर झालेली नामुष्की तरी वाचली असती !

    ReplyDelete
  6. श्री भाऊ अतिशय मार्मिक, परखड आणि भयानक सत्य

    ReplyDelete
  7. अगदी बरोबर विश्लेषण भाऊ . माणसाला कुठे थांबायचे हे कळायला हवे . अण्णां सारख्या माणसाचा या लोकांनी एक विदूषक करून ठेवला. काळाचा महिमा.

    ReplyDelete
  8. नेहमीप्रमाणे अप्रतिम भाऊ!
    अतिशय वस्तुनिष्ठ व साक्षेपी

    ReplyDelete
  9. अण्णांच्या अपयशाचे परखड विवेचन

    ReplyDelete
  10. आता पुढच आमरण ऊपोषण विधानसभेच्या वेळी, आणी हे उपोषणाचे नाटक मरे पर्यंत चालू राहणार मग सरकार कुणाचेही असूदे

    ReplyDelete
  11. भाऊ, राज ठाकरेंबद्दल जरा सविस्तर लिहा की... विशेषतः त्यांनी मोदी द्वेषाचे राजकारण सुरू केल्यानंतरचे. त्यांचे आणि त्यांच्या पक्षाचे काय होईल येत्या निवडणुकीत, त्याबद्दल. एक अतिशय हुशार आणि अभ्यासू नेता कसा मोदीद्वेषाने भरकटत चालला आहे याबद्दल सांगा ना जरा.

    ReplyDelete
    Replies
    1. हो सर्व जन वाट पाहत आहेत भाऊ काका.

      Delete
    2. आमचे साहेब असं का वागतायेत हे कळावां या साठी आम्हीही उत्सुक आहोत

      Delete
    3. are bhava, rajache aganit rupaye duble na bhau

      Delete
  12. व्वा, भाऊ!
    तुम्ही २०११ ते कालपर्यंतचा काळ सुसूत्रपणे समोर अगदी जिवंत केला. तेव्हा आम्ही सुध्दा उस्फूर्त पणे मोर्चा मध्ये सहभागी झालो होतो. पण त्यातला कावेबाजपणा लक्षात आला नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. खरं आहे...

      केजरीवालमुळे इतके नुकसान झाले आहे की आता निदान वीस पंचवीस वर्षे तरी कुणा आंदोलनकारी नेत्यावर विश्वास बसणे शक्य नाही..

      Delete
  13. Very best explanation.It is Anna's best disection . It is better to stop Anna his fast drama. A good artical Apparao Kulkarni

    ReplyDelete
  14. भाऊ, मार्मिक विश्लेषण,केजरीवालच.त्या वेळच्या टिव्ही क्लिप्स् पाह्यल्या तर काही भाष्य करण्याची गरजच नाही.जाहीर सभेत मुलांच्या शपथा घेऊन राजकारणांत न जाण्याच्या थापा असो वा टिव्ही वरील मुलाखतीत दिलेली प्रतीक्रिया असो.या महाशयांनी वाड्रावर जमीन हडप व आर्थिक गैरव्यवाहारावर केलेल्या आरोपांविषयी ईडी/आय् टी कारवाई का होत नाही अस विचारता दिलेल उत्तर आठवत कि आय टी मधे सोनिया/वाड्रा यांना साधी नोटीस पाठवण्याची कोणाला हिम्मतच नाही हे स्वानुभवावरुन सांगीतल. आणी आता अशी हिम्मत दाखवल्यावर हेच महाशय मोदींना शिव्या घालत काँग्रेस/वाड्राच्या मागे उभे. सगळेच संधिसाधू.अण्णा बेरकी तर केजरीवाल महाबेरकी,आपली शिडी होतेय हे अण्णांना कळल असणारच पण त्यांचाही फायदा होता ना.देश परदेशांत फुकटची प्रसिध्दी.

    ReplyDelete
  15. Anna Tatum Kahi shiktil Ashi apeksha ahe. Lekh farch apratim

    ReplyDelete
  16. अण्णांनी आवर्जून वाचायला हवं हे, कदाचित थोडा बदल घडेल!

    ReplyDelete