Thursday, February 14, 2019

मांजराची मुलायम पावले

mulayam support modi के लिए इमेज परिणाम

एकविसाव्या शतकात नवे महाभारत लिहीले जात असून, त्यात यादव कुळातले श्रीकृष्ण मुलायम सिंग यादव यांनी लोकसभेत घेतलेल्या भूमिकेने अनेक राजकीय विश्लेषक व बुद्धीमंतांची मती गुंग करून टाकलेली आहे. कारण त्यांना महाभारत वा रामायण ह्या काल्पनिक कथा वाटतात. अशा पुराणकथातला विषय महत्वाचा नसतो, तर आशय महत्वाचा असतो आणि मुलायमसिंग यांनी त्याचीच प्रचिती बुधवारी आणुन दिलेली आहे. तिथे लोकसभेत मुलायम पहिल्या रांगेत सोनियांच्या थेट बाजूला उभे होते आणि त्यांनी अखेरच्या सत्रात बोलताना विरोधकांना बहूमत मिळण्याची शक्यता नसल्याची ग्वाही दिली. मग नरेंद्र मोदींनीच पुन्हा एकदा बहूमताने पंतप्रधानपदी यावे, असा आशीर्वादही देऊन टाकलेला आहे. आपला सख्खा लाडका पुत्रच मोदीविरोधी आघाडी उभी करण्यात दंग असताना, मुलायम असे का बोलले? त्याचे रहस्य बुद्धीमंतांना कुठल्याही राज्यशास्त्राच्या आधुनिक पुस्तकात वाचून सापडलेले नाही. म्हणून ते चक्रावून गेलेले असतील तर त्यात नवल नाही. यादवकुलीन मुलायमसिंग सुद्धा राज्यशास्त्राच्या पुस्तकाचा अभ्यास करून राजकारणात आलेले नाहीत. ते श्रीकृष्णाचे वंशज आहेत आणि आपल्या कुलपुरूषाच्या पावलावर पाऊल टाकतच त्यांनी आजवर राजकारण खेळलेले आहेत. महाभारतात कौरव पांडव मदत मागायला आले, तेव्हा श्रीकृष्णाने काय केले होते? त्याचे उत्तर आधुनिक राज्यशास्त्रात मिळत नाही. पण महाभारत कथेत सापडते. त्याने आपली सगळी सेना कौरवांच्या गोटात पाठवून दिली होती आणि दस्तुरखुद्द श्रीकृण पांडवांच्या बाजूने उभा राहिला होता. त्यानेच एका प्रसंगी सुदर्शन चक्र उचलून चालही केलेली होती. मग आज पक्षाला मोदीविरोधी गोटात पाठवून मुलायम तरी काय वेगळे करीत आहेत? त्यातून त्यांनी आजच्या महाभारतात कोण कौरव आणि कोण पांडव त्याचीच साक्ष दिलेली आहे. समझनेवालों को इशारा काफ़ी होता है ना?

असे म्हणतात, की मांजराला कितीही उंचावरून फ़ेकले वा ते आपोआप पडले तरी आपल्या चार पायावर सहज उभे रहाते. त्याला जखमा इजा होत नाही. कारण त्याची पावले कमालीची मुलायम असतात. बहुधा तीच गुणवत्ता उपजत असल्याने यादव घराण्यात पाऊणशे वर्षापुर्वी जन्मलेल्या नेत्याच्या जन्मदात्यांनी त्याचे नाव मुलायम ठेवलेले असावे. कारण गे्ल्या अर्धशतकात सामान्य कार्यकर्त्यापासून देशातल्या सर्वात मोठ्या राज्याचा प्रभावशाली नेता होताना मुलायमसिंग यादव यांनी नेहमी प्रतिकुल परिस्थितीतही आपल्या पायावर उभे राहून दाखवलेले आहे. जनता दलाची सत्ता असताना अयोध्येत कारसेवकांवर गोळ्या झाडण्यातून रोषाला पात्र झालेले मुलायमसिंग यांनी त्यांच्या कट्टर विरोधक कल्याणसिंग यांच्याशी राजकीय संगत करून दाखवलेली आहे आणि चतूराईने त्याच कल्याणसिंग यांच्यावर मात करण्यासाठी कांशीराम यांना हाताशी धरून भाजपाची सत्ता संपवलेली सुद्धा आहे. तेच मुलायम सिंग नंतर मायावतींचे कट्टर विरोधक म्हणून उभे ठाकले आणि आपल्या मुलाने त्याच त्या मायावतींशी हातमिळवणी केली असतानाही तटस्थपणे बघत राहिलेलेही आहेत. अशा मुलायम सिंगांनी लोकसभेच्या अखेरच्या बैठकीत निरोपाचे भाषण करताना नरेंद्र मोदींचे गुणगान करावे आणि पुन्हा त्यांचीच बहूमताने सत्ता येण्याच्या शुभेच्छा द्याव्यात; याला हसण्यवारी नेता येत नाही. वय झाल्याने मुलायम बरळले असे काहींना वाटले तर नवल नाही. पण डुख ठेवून डावपेच खेळण्यात त्यांच्यासारखा धुर्त राजकारणी अलिकडल्या उत्तरप्रदेशात कोणी झालेला नाही, हेही तितकेच सत्य आहे. असे मुलायम सिंग अकस्मात वा बोलण्याच्या ओघात मोदींना शुभेच्छा देऊन गेले, असा समज म्हणूनच गैरलागू आहे. ती त्यांनी केलेली एक खेळी असू शकते. म्हणूनच त्यात या नेत्याची मुलायम पावले कुठल्या दिशेने पडत आहेत, त्याचा शोध घेण्याला महत्व आहे.

२०१२ सालात त्यांच्याच पक्षाने उत्तरप्रदेश विधानसभा जिंकलेली होती आणि अतिशय चतुराईने त्यांनी आपल्या लाडक्या पुत्राच्या हाती सत्तासुत्रे सोपवून महत्वाकांक्षी सख्ख्या भावाला खड्यासारखे बाजूला केले. ते करताना आपल्याकडे कमीपणा घेण्यालाही त्यांनी मागेपुढे बघितले नाही. २०१२ सालात बंगालच्या ममता बानर्जी यांचे कॉगेसशी फ़िसकटले होते आणि त्यांनी सोनियांना आव्हान देण्यापर्यंत मजल मारलेली होती. त्यासाठी ममता मुलायमच्या घरी पोहोचल्या आणि आपल्या नेहमीच्या शैलीत त्यांनी परस्पर राष्ट्रपतीपदाचा उमेदवार घोषित करून टाकलेला होता. तेवढ्यापुरते पत्रकारांच्या समोर मुलायम यांनीही ममताला दुजोरा दिला आणि पाठ वळली तर विषय संपवून टाकला होता. २००८ मध्ये हेच मुलायम सिंग डाव्यांना मोठा आधार वाटलेले होते. अणूकराराच्या निमीत्ताने डाव्यांना मनमोहन सरकार पाडण्यासाठी घाई झालेली होती आणि त्यांच्या रणनितीमध्ये मुलायमचा पाठींबा गृहीत होता. मात्र प्रत्यक्ष लोकसभेत बहुमत दाखवायची वेळ आली तेव्हा मुलायम बाजू बदलून कॉग्रेसच्या पाठींब्याला उभे राहिलेले होते. नंतरही परकीय गुंतवणूकीचा विषय आल्यावर त्यांनी टिकेची झोड उठवून सभात्यागातून व राज्यसभेत प्रत्यक्ष मतदानातून त्याच प्रस्तावाचे समर्थनही केलेले होते. आपल्या विविध चेहर्‍यापैकी मुलायम कुठला मुखवटा लावून कधी बोलत असतात, ते त्यांच्या निकटवर्तियानाही समजणार नाही अशी कायम स्थिती राहिलेली आहे. कधीकाळी अमरसिंग यांच्यामुळे आझमखान मुलायमपासून दुरावले होते आणि नंतर त्याच आझमखानसाठी अमरसिंग बाजूला पडलेले होते. त्यामुळे मुलायमच्या कुठल्या शब्दावर विश्वास ठेवावा आणि कधी त्यात फ़ार काही अर्थ शोधू नये; याचा अंदाज लागू शकत नाही. आपल्याकडे शरद पवार आणि उत्तरप्रदेशात मुलायम सारखेच आहेत. म्हणूनच त्यांनी मोदीच पुन्हा पंतप्रधान संबोधण्यातला अर्थ गहन असू शकतो.

मागल्या विधानसभा निवडणूकीत पुत्राने सत्ता टिकवण्यासाठी कॉग्रेस व राहुलशी युती केलेली मुलायमना आवडली नव्हती, त्याचेही कारण आहे. मुळातच कॉग्रेसच्या पायाचे दगड घेऊन आपल्या पक्षाचा पाया घातलेल्या मुलायमना त्यातला धोका उमजला होता. पण पुत्रानेच पित्याचे ऐकले नाही आणि आता पुन्हा कॉग्रेसशी आघाडी नको म्हणून कानाला खडा लावलेला आहे. मायावती वा मुलायम यांचे प्रादेशिक पक्ष उत्तरप्रदेशात कॉग्रेसचाच मतांचा गठ्ठा बळकावून बसलेले आहेत. त्यांनी त्याच पक्षाशी युती करणे म्हणजे आपला पायाच कॉग्रेसला आंदण देण्यासारखे आहे. हे मुलायम छानपैकी जाणून आहेत. म्हणूनच कॉग्रेसचे पुरोगामीत्व त्यांना निवडणूकीतली भागी म्हणून नको असते. निकाल लागल्यावरची आघाडी त्यांना मान्य असते. कारण भाजपा हा समोरचा शत्रू आहे आणि कॉग्रेस अस्तनीतला निखारा आहे, याची त्या अनुभवी नेत्याला जाण आहे. किंबहुना त्यासाठीच त्यांनी अत्यंत नेमक्या मुहूर्तावर आपले हे आशीर्वाद मोदींना दिलेले आहेत. भाजपाने शत्रू म्हणून समाजवादी पक्षाचे जितके नुकसान केलेले नाही, त्यापेक्षा कॉग्रेसने आपल्याला अधिक त्रास दिलेला आहे, असे त्यांनी याहीपुर्वी अनेकदा बोलून दाखवलेले आहे. सहाजिकच त्यांना आपल्या प्रभावक्षेत्रात कॉग्रेस बलशाली होण्यापेक्षा भाजपा अधिक ताकदीने निवडून आल्यास हवी आहे. लोकसभेच्या अखेरच्या बैठकीपुर्वी उत्तरप्रदेशात कॉग्रेसने प्रियंका गांधींचा नवा पत्ता फ़ेकलेला आहे आणि तो भाजपापेक्षाही आपल्याला त्रासदायक ठरू शकतो, हे ओळखूनच मुलायमसिंग यांनी अखेरच्या भाषणात कॉग्रेसला अपशकून केला आहे. ते आशीव्राद खोटे नसून वास्तविक आहेत. त्यातून मुलायमना आपल्यासारख्या विविध विरोधी पक्षांना सुचवायचे आहे, की आपली रणनिती भाजपाच्या विरोधातली असतानाही कॉग्रेसला पुरक असता कामा नये. तो अशा छोट्या पक्षांसाठी आत्मघात असेल, असा त्यातला खरा इशारा आहे.

एक गोष्ट निश्चीत आहे, आज मुलायम जुन्या आवेशात नसतात. ते थकलेले आहेत आणि पक्षावरही त्यांची हुकूमत पुर्वीसारखी राहिलेली नाही,. पण पुत्राला आजसुद्धा पित्याच्याच नावाने मते मागावी लागत असतात. तो आपला सुपुत्र कुठले डावपेच खेळतो आहे, त्याला आपण किंमत देत नाही. आपल्या पाठीराख्या मतदाराने निवड करताना कॉग्रेसला झुकते माप जाणार नाही, याची काळजी घ्यावी. त्यापेक्षा नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झालेला चालेल, असाच इशारा त्यांनी दिलेला आहे. समाजवादी मतदार किंवा त्यांच्या तळागाळातील कार्यकर्त्याला तो इशारा नेमका समजतो. त्याच्यासाठीच मुलायमनी हे शब्द उच्चारलेले आहेत. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नम्रतापुर्वक अभिवादन केले यातला गर्भित अर्थ स्पष्ट आहे. ही त्या दोघांची मिलीभगतही असू शकते. कारण मुलायम यांचा संघविरोध वा भाजपाविरोध अलिकडला असला तरी हयात कॉग्रेस विरोधात गेलेली आहे. ते डॉ. लोहियांचे शिष्य आहेत आणि लोहिया म्हणायचे मोठ्या राक्षसाला संपवण्यासाठी छोट्या राक्षसाला सोबत घ्यावे. तशी भाजपाची मदत मुलायमनी यापुर्वी अनेकदा घेतलेली आहे. पण भाजपाने मुलायम वा अन्य विरोधकांना संपवण्याचे घातपाती डावपेच कधी खेळले नाहीत. कॉग्रेसने ते डावपेच कायम खेळलेले आहेत. अणुकराराच्या वेळी पाठींब्याच्या बदल्यात मनमोहन यांनी मंत्रिमंडळात स्थान देण्याचे मान्य केले होते. पण सोनियांनी त्यांना शब्द पाळू दिला नाही, त्याचा डुख मनात ठेवलेला हा नेता उगाच मोदींना पुन्हा पंतप्रधान होण्याच्या शुभेच्छा देत नसतो. त्यात पडद्यामागचे अनेक डावपेच असू शकतात आणि अशा खेळी मोदीही मोठ्या धुर्तपणे पवारांशीही खेळलेले आहेत. उगाच पवारांनी विधानसभेपुर्वी महाराष्ट्रात आघाडी मोडली होती? मांजराची मुलायम पावले ज्यांना ओळखता येतील, त्यांनाच सोनियांच्या शेजारी बसून मुलायमनी मोदींना दिलेल्या शुभेच्छातला संदेश उमजू शकतो.

15 comments:

  1. मुलायमसिंग यादव यांना भाजपपेक्षा मुलावर सुड घ्यायचा आहे. त्यासाठी त्यांनी असे वक्तव्य केले.

    ReplyDelete
  2. सुपर भाउ याच विश्लेषन हवच होत मुलायम अस का बोलले तेही सेोनियाच्या शेजारी बसुन तोही एक डाव असावा.

    ReplyDelete
  3. श्री भाऊ तुमचे राजकीय अंदाज अगदी बरोबर असतात, काल श्री शरद पवार यांनी जाहीर केले ते पुन्हा लोकसभेत जाणार, आणि आज भाजप शिवसेना 25: 23 काय जबरदस्त समज आहे हो तुमची

    ReplyDelete
  4. काल मुलायमसिंगांनी मोदींना परत पंतप्रधान होण्यासाठी शुभेच्छा दिल्याची बातमी आल्यावर त्यावर भाऊ काय म्हणतील हे वाचायची उत्सुकता होतीच.

    मुलायमसिंग नक्की कोणती गोष्ट कधी करतील याचा खरोखरच नेम नसतो. १९९९ मध्ये वाजपेयींचे सरकार एक मताने पडल्यावर आयत्या वेळी काँग्रेसला पाठिंबा द्यायचे नाकारून सोनियांना पंतप्रधान बनण्यापासून मुलायमसिंगांनी रोखले आणि एका अर्थी भाजप-वाजपेयींना अनुकूल खेळी केली. तोपर्यंत समाजवादी पक्षाच्या २१ खासदारांचा पाठिंबा सगळ्यांनी जवळपास गृहितच धरला होता पण त्या सगळ्यांचा मुखभंग मुलायमसिंगांनी केला.

    मार्च २००१ मध्ये तहलका प्रकरणी अडकल्यानंतर जॉर्ज फर्नांडिसांना वाजपेयींच्या मंत्रीमंडळातून संरक्षणमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. पण त्यानंतर ७ महिन्यातच वाजपेयींनी परत जॉर्ज फर्नांडिसांचा समावेश मंत्रीमंडळात करून परत एकदा संरक्षणखाते त्यांना दिले. त्यावेळी काँग्रेस आणि इतर सर्व विरोधी पक्षांनी जॉर्ज फर्नांडिसांवर बहिष्कार टाकला होता. म्हणजे फर्नांडिस कोणत्याही प्रश्नाचे उत्तर द्यायला किंवा अन्य कारणाने संसदेत बोलायला उभे राहिले की हे विरोधी सदस्य सभात्याग करत. पण मुलायमसिंगांनी मात्र त्या प्रकारात कधी भाग घेतला नाही. २००२ मध्ये फर्नांडिसांवर बहिष्कार घालायची 'नौटंकी' खूप काळ चालू राहिली आहे असेही ते म्हणाले होते.

    ReplyDelete
  5. मुलायम आणि मायावती यांचे वितुष्ट जगजाहीर आहे त्यात मुलाचा पवित्रा पटत नसतानाही ते आता काही करू शकत नाहीत पण हा त्यांनी आपल्या समर्थकांना सूचक संदेश दिला असावा आता येणाऱ्या काळात मोदी सभेत काय बोलतील यावरून मिलीभगत आहे का हे पण उघड होईलच दिल्ली दूर नाही,भाऊ तुमचं विश्लेषण बरोबर होणारच खात्री आहे.

    ReplyDelete
  6. नेहमीप्रमाणे अभ्यासपूर्ण असे विचार आहेत. सणसणीत, रोखठोक.

    ReplyDelete
  7. Very marvelos! I was confused why Mulayam gave best wishes to Honorable Modi.It is Mahabharata happened in 2019. It is no his sixer to Mahamilawat.Thanks Bhau for your good artical.Apparao Kulkarni. Latur.

    ReplyDelete
  8. भाऊ,लोकसभेच्या समारोपाच्या भाषणात मुलायम सिंग पुढील पंतप्रधान नरेन्द्र मोदी होवोत असे बोलले हे वरवर बघता शिष्चाटार म्हणून बोलले आसे वाटले तरी या वक्तव्या मुळे विरोधकांचे खास करुन महागठबंधन मधिल नेत्यांच्या पाया खालची जमिन सरकली आहे.या एका वाक्याने माहागठबंधनचे भवितव्य काय ते स्पष्ट झाले . मुलायम सिंग यांनी अचुक वेळ साधुन
    शेजारीच बसलेल्या सोनिया यांना गांधी यांना पण ईशारा दिला.आपलौया कडून महाराष्ट्रातिल संभाव्य भाजप सेना युतीवर लेखाची अपेक्षा आहे.आपला लेख नेहमी प्रमाणेच लाजवाब.

    ReplyDelete
  9. राजकारणातला एक डाव

    ReplyDelete
  10. भाऊ,
    खूपच जबरदस्त!
    असे निष्पक्ष,निस्पृह विचार करता येणे ही देणगी आहे.

    ReplyDelete
  11. वाह भाऊ.. महा'भारत'..! उत्सुकता ताणली जात आहे हे खरं..!

    ReplyDelete
  12. असे म्हणले जाते कि, मुलायम ज्यांना पंतप्रधानपदासाठी शुभेच्छा देतात तो पक्ष पुन्हा सत्तेवर येत नाही. मागच्या लोकसभेच्या वेळी मुलायमसिंगांनी मनमोहन सिंगांना शुभेच्छा दिल्या होत्या. पुढे इतिहास साक्षी आहे.

    ReplyDelete
  13. भाऊ, कालच पुलवामा येथे केंद्रिय राखीव दलावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० च्यावर जवान मारले गेले. सर्वत्र भावना तीव्र आहेत. धडा शिकवावा असेे सर्व म्हणतात. तुमच्या मते तो धडा कसा असावा. दहशतवादींची शेपूट वाकडी ती वाकडीच. पण थेट हल्ला वा सर्जिकल स्ट्राईक न करता कसा कायमस्वरुपी अथवा दीर्घ स्वरुपीे धडा शिकवता येईल ? त्यात सामान्य माणसाला काय भूमिका असेल ?

    ReplyDelete
  14. खूपचं छान विश्लेषण केले आहे.आज मुलायमसिंग व शरद पवार यांची शारिरीक अवस्था सारखीच आहे.आपण म्हटल्या प्रमाणे राजकीय डावपेच आपला कट्टर विरोधक कोण हे त्यांना पक्के माहिती असते,शत्रूला बेसावध ठेवून खिंडीत गाठण्यात मातब्बर आहेत.

    ReplyDelete
  15. धाड पडण्याच्या भीतीने हे बोल निघाले असण्याची शक्यता कशी वाटते ?

    ReplyDelete