१९७५ सालात देशभर आणिबाणी लागू झाली आणि विरोधकांना कुठल्याही आरोप वा खटल्याशिवाय तब्बल एकोणिस महिने इंदिराजींनी गजाआड ढकलून दिले. त्यात विविध पक्षांच्या क्रियाशील कार्यकर्ते व नेत्यांचा समावेश होता. पण आणिबाणी उठली आणि निवडणूकीचे वारे वाहू लागले, तेव्हा आणिबाणी राबवणार्या अनेकांनी पटापट पलिकडे उड्या मारून नव्या जनता पक्षात प्रवेश मिळवला होता. त्यात संसदेमध्ये आणिबाणीचा प्रस्ताव मांडणार्या बाबू जगजीवन यांचाही समावेश होता. आता जसे सूर्यकांता पाटिल वा बबनराव पाचपुते आपल्या आधीच्या पक्षावर आरोप करीत पावन होत आहेत आणि भाजपा शिवसेना त्यांचे शुद्धीकरण करून घेत आहेत, तसेच तेव्हाही झाले होते. निवडणूकांची तारीख जाहिर झाली आणि विरोधकांची तुरूंगातून सुटका झाली; तशी नव्या पक्षाची जुळवाजुळव सुरू झाली होती. त्यांचे नव्या पक्षात रुपांतर होण्यापुर्वीच राम यांनी आपल्या काही सहकार्यांसह कॉग्रेस सोडली व कॉग्रेस फ़ॉर डेमॉक्रसी नावाचा पक्ष स्थापन केला. त्याची रितसर नोंदणी होण्यापुर्वीच जनसंघ, समाजवादी, संघटना कॉग्रेस व भारतीय लोकदल यांच्या विलयातून नव्या जनता पक्षाची स्थापना व्हायचे वेध लागले होते. राम यांनी हेमवतीनंदन बहुगुणा व नंदिनी सत्पथी यांच्यासह आपला गट नव्या पक्षात विसर्जित करण्याचा मार्ग पत्करला. जनता वारे व इंदिरा विरोधी लाट इतकी घोंगावत होती, की त्यामुळे बिथरलेल्या अनेक कॉग्रेसजनांनी मग दिल्लीला धाव घेऊन राम यांचे निष्ठावान म्हणून नव्या जनता पक्षात आपले स्थान पक्के केले. त्यातच तेव्हाचे ताडदेव मलबार हिलचे आमदार बलवंत देसाई यांचा समावेश होता.
१९७७ ची निवडणूक संपली आणि सत्तेवर आलेल्या मोरारजी सरकारने देशातील आठ विधानसभा बरखास्त केल्या. नव्या निवडणूका घेतल्या. महाराष्ट्रात कॉग्रेस पक्षाचा निर्णायक पराभव झालेला नसल्याने इथली विधानसभा मुदत संपेपर्यंत राहिली व १९७८ मध्ये इथे निवडणूका झाल्या. तोपर्यंत नवा जनता पक्ष स्थापन झाला होता आणि त्याचे तेव्हाचे महाराषट्रातील अध्यक्ष एस एम जोशी होते. त्यांची विविध पुर्वाश्रमीच्या पक्षातील गट संभाळुन घेताना धावपळ व्हायची. अशा अण्णांना मग प्रथमच विधानसभेच्या उमेदवार्या वाटायची वेळ आली. त्यात जुन्या सर्व पक्ष गटांचे लोक सामावून घ्यायचे आणि दिल्लीतल्या नेत्यांचे इथले बगलबच्चे सामावून घेणे, मोठे जिकीरीचे काम होते. पण त्याला पर्याय नव्हता. जुन्य समाजवादी वा निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी वा न्याय देण्याचा जमाना मागे पडला होता. त्यात मग अनेक चांगल्या कार्यकर्त्यांचा बळी गेला. राजनारायण गटाचे म्हणून कुर्ल्यात लियाकत हुसेन याला तिकीट देताना एक्नाथ कोपर्डेना घरी बसवावे लागले, तर के. ए खान यांना उमेदवारी द्यायची म्हणून जनसंघाचे वामनराव परब यांचा बळी गेला. तसाच प्रकार ताडदेव मलबार हिलमध्ये झाला. आणिबाणीच्या झळा सोसून तुरूंगात गेलेल्या नारायण तावडे यांना उमेदवारी नाकारून त्याच आणिबाणीचे समर्थन करणार्या बलवंत देसाई यांना जनता उमेदवारी मिळाली. त्यातून तावडेंसारखा कार्यकर्ता खवळला तर नवल नव्हते. त्यांनी बंडखोरी केली आणि अपक्ष अर्ज भरला होता. मग काय व्हायचे? लाटेला अक्कल वा विधीनिषेध नसतो. म्हणून देसाई निवडून आले. तावडेंना आपल्याच वडिलधार्या एसेमकडून हाकालपट्टीची कारवाई अनुभवण्याचे दुर्दैव आलेले होते. हे सगळे तडजोडीचे राजकारण असते. सत्तेचे राजकारण तत्वांच्या चौकटीत बसून होत नाही. तिथे यश संपादन करण्याची सक्ती असते. अन्यथा एसेमसारख्या चारित्र्यसंपन्न नेत्यावर असे दुर्दैव कशाला ओढवले असते?
पुढे १९८० नंतर जनता लाट ओसरली आणि तेच बलवंत देसाई विनाविलंब माघारी कॉग्रेस पक्षात गेले आणि तितका काळ जनता पक्षातून बाहेर फ़ेकले गेलेले नारायण तावडे पुन्हा पडझड झालेल्या चंद्रमौळी जनता पक्षात हजर झाले. आपल्या या निष्ठावान प्रामाणिक कार्यकर्त्यावर एसेमसारख्या साधूवृत्तीच्या नेत्याने असा अन्याय कशाला केला? कॉग्रेस पक्षातून अठरा आमदार घेऊन फ़ुटलेल्या व सत्तांतर घडवणार्या गद्दार शरद पवारांना मुख्यमंत्री पदावर बसवण्याचे पारितोषिक तेव्हा एसेमनी कसे दिले? कशासाठी दिले? एसेम ह्या माणसाला जे ओळखतात, ते त्यांच्यावर कधी सत्तालंपटतेचा आरोप करू शकणार नाहीत. पण त्यांनाही तेव्हा असे वागायची नामुष्की आलेली होती. कशाला? त्यातून काय साधले गेले? सत्तेचे राजकारण असेच निर्दय असते आणि ते साधायचे तर पापपुण्याचे तत्वज्ञान गुंडाळून कुठल्याही मार्गाने यशाचा पल्ला गाठायचे व्यवहार उरकावे लागतात. पण ज्यांनी पुण्यवंत बघितले नाहीत, की साधूवृत्तीने आयुष्य झोकून देणारेही तत्वांना व्यवहारासाठी मुरड घालताना पाहिले नाहीत, त्यांना आजचे पक्षांतर वा नेत्यांची पळापळ बघून नवल वाटते आहे. कॉग्रेस राष्ट्रवादीतून सेना भाजपामध्ये दाखल होणारे भले पवित्र पुण्यवंत नसतील. पण त्यांना आपल्या पक्षात आणून वा पावन करून घेणार्यात कोणी एसेम जोशी यांच्या इतका धुतल्या तांदळासारखा शुद्ध पवित्र आहे काय? मग त्यांच्याकडून एसेमपेक्षा अधिक पवित्र कर्तव्याची अपेक्षा करता येईल काय? अपेक्षा चुकीची म्हणता येत नाही. पण आदर्श आणि व्यवहारी वास्तव, यात जमीनअस्माना इतका फ़रक असतो. म्हणूनच एसेम तेव्हा आपल्याच मनाविरुद्ध तसे वागले. नुसते निवडणूकीच्या आधीच नव्हेतर निकालानंतर वसंतदादांच्या सत्तेला पाडण्यासाठी त्यांनी शरद पवार यांच्या गद्दारीला आशीर्वाद दिला होता. म्हणून त्यांचे चाल चेहरा चरित्र शंकास्पद झाले काय?
आज पोपटपंची करणार्यांनी अशा सगळ्या बाजू तपासून बघायच्या असतात. कारण जग आदर्शाचा पाठलाग करीत असले, तरी व्यवहारावर चालते. युधिष्ठीरालाही नरो वा कुंजरोवा करून स्वत:च्या सच्चेपणाला विटाळ लावून घ्यावा लागतो. पापापुण्याच्या व्याख्या स्थळ, काळ व व्यवहारानुसार बदलत असतात. अवघ्या चार महिन्यापुर्वी ममता बानर्जी यांना सफ़ारी चप्पल घालून फ़िरणार्या मुख्यमंत्री म्हणून आशीर्वाद व सर्टीफ़िकेट देणारे अण्णा हजारेही आज शारदा चिटफ़ंड घोटाळा निघाल्यावर गप्प कशाला असतात? हीच तर ममताच्या पुण्याईची कसोटी घेण्याची वेळ असते आणि अण्णांनी ममताला आशीर्वाद कोणत्या कसोटीवर दिला होता, त्याचेही स्पष्टीकरण देण्याची हीच वेळ असते. मोदींच्या चहात्यांना वा समर्थकांना ‘भक्त’ म्हणून अगत्याने हिणवणार्यांना आजचे अण्णांचे शारदा प्रकरणातले मौन कुठली ‘ममता’ वाटते? मोदी भक्त वा सेना भाजपाच्या पुढल्या सत्तेत कोण कुठल्या पदावर असतील, त्याची विवंचना करणार्या अण्णा भक्तांनी सुद्धा चार महिन्यापुर्वी अण्णा ममताबाबत कशाला हळवे झाले, त्याचा खुलासा अण्णांकडे एकदा तरी मागितला आहे काय? नसेल, तर तसा आग्रह सुद्धा नाही. कारण त्यातही व्यवहारच असतो. फ़क्त आपला व्यवहार वा तत्सम तडजोडी म्हणजे पुण्यकर्म आणि मोदी-भाजपाचा विषय आला, मग त्याच तडजोडी पापकर्म म्हणू नये, इतकीच अपेक्षा कोणीही करील. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी असे त्यालाच म्हटलेले आहे. मग त्यात कॉग्रेस, भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी असोत की जनलोकपालचा आग्रह धरून संन्यस्त वृत्तीचे प्रदर्शन मांडणारे असोत, काटे असायचेच त्यांचे आकार प्रकार बदलतात. त्यातून एसेमची सुटका नव्हती, अण्णांची नाही की मोदींची नसते. कुठले काटे कमी बोचतात, त्यानुसार त्यांच्या पापपुण्याचे हिशोब मांडावे लागतात. सुसह्यता बघून वाट शोधावी लागते.
एकदम सडेतोड मांडणी केलीत भाऊ. केवळ मोदीविरोध हा एकच अजेंडा घेऊन माध्यमातून आणि सोशल साईटवर विद्वत्तेचा आणि सभ्यतेचा बुरखा पांघरून एकांगी टिका करत रहाणे हा सध्या काही मंडळींचा उद्योग झाला आहे. अशा बोरूबहाद्दरांना हा लेख म्हणजे चांगलीच चपराक आहे. विशेषतः आण्णा कंपूतील काही विद्वान यात फारच आघाडीवर आहेत. एकीकडे राजकारणाला चिखल, गटार वगैरे शेलक्या शिव्या द्यायच्या, राजकारण्यांना शूद्र लेखायचे आणि दुसरीकडे आण्णांच्या छुप्या राजकारणाची मात्र अख्ख्या 'विश्वभर चौधरी'गीरी करत फिरायचे हे यांचे उद्योग .
ReplyDelete