Monday, September 8, 2014

रिबेरो साहेब तुम्ही सुद्धा?



तपशीलाचा घोळ किती मजेशीर असतो बघा. यापुर्वीच्या एका लेखामध्ये मी राजू परूळेकर यांनी घडवलेला चमत्कार पेश केला होता. त्यात परुळेकरांनी खुन होण्यापुर्वीच त्यातले संशयित ठरवून शिवसेनाप्रमुखांना अटक केली होती. त्या अटकेनंतर मुंबईत भीषण दंगली घडवून आणली होती. असे तपशीलाचे घोळ पत्रकारच करतात असे मानायचे काही कारण नाही. आपल्या आक्रमक शैलीने गाजलेले पोलिस अधिकारी ज्युलिओ रिबेरो देखील त्याच मार्गाने गेलेले आहेत. त्यांचे ‘बुलेट फ़ॉर बुलेट’ हे खुप गाजलेले आत्मकथन प्रसिद्ध आहे. छापून होण्यापुर्वी त्याचे काही भाग अनेक वृत्तपत्रांनीही प्रकाशित केले होते. असेच एक प्रकरण तेव्हाच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये छापून आलेले होते. तो भाग वाचल्यामुळे मग पुढे रिबेरो यांचे पुस्तक वाचण्याची मला इच्छाच झाली नाही. कारण त्यांनीही परुळेकरांचाच कित्ता गिरवला होता. खरे म्हणायचे तर त्यांचे पुस्तक आधी प्रसिद्ध झालेले असल्याने, परुळेकरांनी रिबेरोंचा कित्ता गिरवला म्हणायला हवे. परुळेकरांनी खुनाआधीच संशयित ठरवून आरोपीला गजाआड टाकले होते. तर रिबेरो यांच्यासारख्या जबाबदार अधिकार्‍याने इमारत उभी रहाण्यापुर्वीच त्यावर दगडफ़ेक करून तिथे दंगलीची परिस्थिती निर्माण केली. त्यासाठी पिस्तुल रोखून दंगल शमवली सुद्धा आहे. पटकन कुणाचा विश्वास बसणार नाही, अशी स्थिती आहे ना? योगायोगाने तोही किस्सा कम्युनिस्ट आमदार कृष्णा देसाई यांच्या खुनाशी निगडीत आहे.

आपल्या पुस्तकात रिबेरो लिहीतात, कृष्णा देसाईच्या हत्येनंतर त्याची अंत्ययात्रा सेनाभवन जवळून जात होती आणि पोलिस उपायुक्त म्हणून तिथे त्यांची ड्युटी होती. आधी अंत्ययात्रा अन्य मार्गाने न्यावी असा त्यांनी आयोजकांकडे आग्रह धरला होता. पण ते शक्य झाले नाही. त्यामुळे फ़ौजफ़ाट्यासह सेनाभवनाची राखण करणे रिबेरोंना भागच होते. अंत्ययात्रा सेनाभवनापाशी आली आणि परिस्थिती अचानक स्फ़ोटक बनली. स्वाभाविकच होते. जमाव कम्युनिस्टांचा होता आणि समोर मारेकरी मानल्या गेलेल्या संघटनेचे मुख्यालय होते. जमावातील संतप्त कम्युनिस्टांनी सेनाभवनावर दगडफ़ेक सुरू केली. त्याचे रक्षण करणे पोलिस म्हणून रिबेरो यांचे कामच होते. त्यांनी जमावाला शिस्तीने पुढे जाण्याचा इशारा दिला. इतकेच नाही तर आपले पिस्तुल काढून रोखले. त्यामुळे जमावातील प्रमुख कम्युनिस्ट नेते पुढे सरसावले. त्यात कॉम्रेड रेड्डी (जी एल) व त्यांची पत्नीही होती. त्यांनी रिबेरोंना धमकावले, पिस्तुलातल्या गोळ्या संपल्यावर काय? जमावाच्या हाती सुत्रे जातील. जमावाने हिंसा आरंभली असती, तर सेनाभवन उध्वस्त झाले असते आणि मुंबईभर दंगल उसळली असती.

आता गंमत बघा, परुळेकर ज्या खुनासाठी ठाकरेंना संशयित म्हणून अटक करून तुरूंगात टाकतात आणि त्या अटकेसाठी मुंबईत दंगली घडवुन आणतात, तीच दंगल आपल्या प्रसंगावधानामुळे कशी टाळली गेली, त्याचे कौतुक गाजलेले पोलिस आयुक्त रिबेरो आपल्या आत्मकथनातून गातात. मग यातल्या कुणावर विश्वास ठेवायचा? अर्थात इथे रिबेरो यांनी रेड्डी पतीपत्नीचा उल्लेख केला आहे, त्यामुळे तसे काही घडले नाही, असे म्हणायची सोय नाही. कृष्णा देसाई यांची भव्य अंत्ययात्रा निघालेली होती व तेव्हा वातावरण स्फ़ोटक होते, ही वस्तुस्थितीही कोणी नाकारू शकणार नाही. तात्कालीन वृत्तपत्रातही त्याची वर्णने आलेली आहेत. सहाजिकच आजच्या पिढीने रिबेरो यांचे पुस्तक संदर्भासाठी घेतले आणि त्यातून परुळेकर यांच्यासारख्यांनी आपापले भलतेसलते निष्कर्ष काढले; तर नवल वाटायचे कारण नाही. मुद्दा इतकाच आहे, की सर्व घटनाक्रम खरा असला तरी स्थलकालाचे भान रिबेरोंना राहिलेले नाही. त्यामुळेच त्यांनी अस्तित्वात नसलेल्या शिवसेनाभवनाला उध्वस्त होण्यापासून वाचवल्याचे अनाठायी श्रेय आपल्याला घेतले आहे. कृष्णा देसाई यांची हत्या होऊन त्यांची भव्य अंत्ययात्रा निघाली, तेव्हा आजच्या जागी शिवसेना भवन उभेच राहिलेले नव्हते. त्यामुळे त्यावर कम्युनिस्टांनी हल्ला वा दगडफ़ेक करण्याचा प्रश्नच उदभवत नाही. हा संघर्षाचा जो प्रसंग रिबेरो यांनी रंगवला आहे, तो अंत्ययात्रा रानडे रोडने दादर स्मशानभूमीकडे जाण्याच्या मार्गाचा आहे. सेनाभवन गोखले रोड उत्तरेच्या टोकाला कोहीनूर मिलसमोर उभे आहे. मात्र रानडे रोडवर एक बारीकशी गल्ली आत वळते, तिथे त्यावेळी ठाकरे यांचे जुने घर होते आणि त्याच्या खिडकीवर ‘ठाकरे’ अशी पाटी लावलेली होती, घडलेला स्फ़ोटक प्रकार तिथे घडलेला असू शकतो. कारण त्या काळात शिवसेनेचे कुठे मुख्यालयच नव्हते.

कृष्णा देसाई यांची हत्या ५ जुन १९७० रोजी झाली आणि तेव्हाच नव्हे तर पुढे चार वर्षे तरी आज सेनाभवन उभे असलेल्या भूखंडावर बैठी दुकाने होती. कोपर्‍यावऱचे सर्वात प्रशस्त दुकान म्हणजे शापूर नावाचे इराणी हॉटेल होते. आमच्यासारखे तरूण कॉलेजचे विद्यार्थी तिथे चहा सिगरेट घेत किंवा ज्युकबॉक्सवर सिनेमाची गाणी ऐकण्याचा अड्डा टाकून बसलेले असायचे. पुढली चार वर्षे म्हणजे १९७४ पर्यंत असे मी ठामपणे का सांगू शकतो? तर तेव्हा इंदिरा गांधींच्या सरकार विरोधात बराच असंतोष धुमसू लागला होता आणि अशाच एका निदर्शनात आम्ही भाग घेतल्यावर तिथे शापूरमध्ये चहा प्यायलेले आठवते. कमलाकर सुभेदार, रमेश जोशी, नामदेव ढसाळ, निळूजगन्नाथ कोठेकर इत्यादी मित्रांसह त्याच नाक्यावरून जाणार्‍या इंदिराजींच्या गाडीसमोर आम्ही लोकांनी निदर्शने केलेली होती. तेव्हा अझीझ नाजा याची एक कव्वाली खुपच लोकप्रिय झाली होती आणि त्याची रेकॉर्ड आम्ही चहा घेताना तिथे वाजत होती. त्यातली एक ओळ मला चक्रावून गेली. ‘इसकी बेटीने उठा रखी है सरपर दुनिया, ये तो अच्छा हुवा अंगुर को बेटा ना हुवा’. त्याक्षणी अंगुरच्या जागी नेहरू हा शब्द टाकला, तर अर्थ किती बदलतो हा विचार मला थक्क करून गेला. कव्वालीचे विडंबन मला शापूरमध्ये बसलो असताना त्याच निदर्शनानंतर असे सुचले होते. या एका ओळीने चक्रावल्यानंतर काही दिवस गुणगुणताना तिचे विडंबन मी जुळवत गेलो होतो. आणि ती गोष्ट १९७४ सालची.

थोडक्यात राजू परुळेकर खुन होण्यापुर्वी संशयिताला अटक करतात आणि रिबेरो सेनाभवन उभारले जाण्याच्या चार वर्षे आधीच ते उध्वस्त होण्यापासून वाचवतात ना? तपशील व स्थलकालाचे भान सुटले, मग कसे अर्थाचे अनर्थ होऊ शकतात, त्याचे असे कित्येक नमूने असतात. अनेकांनी आजवर रिबेरो यांचे पुस्तक वाचलेले असेल आणि त्याचे संदर्भही कुठे ना कुठे दिलेले असतील. पण त्यापैकी कितीजणांनी त्यातले तपशील तपासून घेतले आहेत? इतिहासाचे विकृतीकरण तिथून सुरू होत असते. उद्याच्या पिढ्य़ा एक जाणता नामवंत पोलिस आयुक्त म्हणून रिबेरो यांचे आत्मकथन मुंबईची अस्सल कथा म्हणून संदर्भासाठी वापरणार आहे किंवा वापरतही असेल. आजच्या काळात आपण शेकडो वर्षे जुन्या ऐतिहासिक नोंदींच्या गफ़लती शोधण्यात गर्क असतो, भिंगातून संदर्भ तपासून घेण्यासाठी धडपडत असतो. पण आजची कागदपत्रे वा नव्या वर्तमानाच्या नोंदी पुढल्या पिढ्यांना सुखरूप मिळाव्यात व त्यात हेराफ़ेरी असू नये, याविषयी किती गाफ़िल असतो ना?

=====================================

A Communist MLA, Krishna Desai, was alleged to have been murdered by Shiv Sainiks in a blatant attempt to provoke the Communists. There was much tension and some clashes following this murder. The funeralprocession of the murdered MLA passed through my jurisdiction, past Shiv Sena Bhavan. My attempts to persuade the Communists to change the route failed. Finally, I had to guard the Bhavan with a massive contingent of policemen. Even then, a volley of stones was thrown by the processionists at the Bhavan as well as at the police guarding the building. At this juncture, I warned the processionists in no uncertain terms. I even took out my revolver and brandished it in the air. This angered Comrade Reddy and his wife, two leading members of the CPI. They, in turn, threatened to deal with me after my bullets were emptied. It was a touch-and-go affair. The processionists could have easily overwhelmed the policemen and destroyed Sena Bhavan. If that had happened, citywide riots would have followed.
http://expressindia.indianexpress.com/ie/daily/19981231/36550504p.html

4 comments:

  1. भाऊ तुम्ही बोलला ते बरोबर पण इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राची लायकी एवढीच आहे

    ReplyDelete
  2. कव्वाली तील शाब्दिक बदल फार चपखल होते...
    चला त्या निमित्ताने काही घटना व स्थान महात्म्य यात गल्लत पकडलीत... अंगूर की बेटी चा प्रभाव?

    ReplyDelete
  3. उत्तम माहीती भाऊ!
    नाहीतर आम्हाला हे कसे कळले असते.

    ReplyDelete