Wednesday, September 3, 2014

आस्तिक झाडावरची नास्तिक बांडगुळे



ऐन गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर चित्रपट दिग्दर्शक रामगोपाल वर्मा याच्या एका टिप्पणीने खुप खळबळ माजवली आणि शेवटी आपले शब्द या अतिशहाण्याला मागे घ्यावे लागले. मग त्या निमीत्ताने अनेक बुद्धीमंतांना आपले पुरोगामीत्व सिद्ध करण्याची नवी संधी प्राप्त झाली. खरे तर वर्माला आताच चतुर्थीच्या मुहूर्तावर असली अक्कल पाजळण्याचे काही कारण नव्हते. त्याच्या नास्तिक असण्याला कोणी विरोध केलेला नाही. आस्तिक व नास्तिक असा संघर्ष या खंडप्राय देशामध्ये आणि जगामध्ये दिर्घकाळ चालू आहे. पण जेव्हा असे प्रसंग व वेळ निवडली जाते, तेव्हाच त्या संघर्षाला धार येते. पण त्यावर सहसा गंभीर चर्चा होत नाहीत. वादविवाद नेहमीच एकतर्फ़ी व गोलमाल स्वरूपाचे होत असतात. उदाहरणार्थ वर्माच्या टिप्पणीने उदभवलेला वाद त्यानेच मुद्दाम उकरून काढला होता. त्यात त्याला फ़ुकटातली प्रसिद्धी मिळवायची होती यात शंका नाही. त्याचा हेतू मोहोळ उठवण्याचाच होता. त्याला नास्तिकता किंवा बुद्धीप्रामाण्यवादाशी कसलेही कर्तव्य नव्हते. पण असे काही केले, मग स्वत:ला पुरोगामी समजणारे त्यातला मुद्दा विसरून अविष्कार स्वातंत्र्याचे ढोल घेऊन, डॉल्बीपेक्षा अधिक कर्कश वितंडवाद करणार हे वर्मालाही नेमके माहिती होते. झालेही तसेच. वर्माचे विधान कितीही मुर्खपणाचे असले, तरी त्याला मतप्रदर्शनाचा हक्क असल्याचे युक्तीवाद सुरू झाले. पण त्यापैकी कितीजणांनी वर्माचे शब्द नेमके समजून घेण्याचा प्रयास तरी केला काय? त्याने दैवताला नावे ठेवली इतकाच तो विषय नाही. त्याने गणपतीची पूजाअर्चा करणार्‍यांना शुभेच्छा देण्याचे नाटक करताना गणेशभक्तांना शिवीगाळ केली, हा खरा विषय होता. ‘बट हॅपी गणपती डे टू मोरॉन्स’ असा त्या ट्वीटचा शेवट आहे. यातला मोरॉन्स म्हणजे काय? बेअक्कल मुर्खांनो तुम्हाला शुभेच्छा? असे शब्द लिहीण्यामागचा साधासरळ हेतू काय?

मुद्दा नेहमीच हा असतो. तुमच्या विद्वत्तेला कोणी आव्हान दिलेले नाही. तुमच्या नास्तिकतेला कोणी अधिकार नाकारलेला नाही. पण तुम्ही शहाणे वा बुद्धीमान असायला इतरांना मुर्ख ठरवण्याचा अट्टाहास कशाला? तुमचे स्वातंत्र्य वा बुद्धीमत्तेचा आवेश इतरांच्या भावना, अभिमान वा अस्तित्वाला इजा करण्यापर्यंत जाऊ शकत नाही. वर्माला गणपती भजायला वा पूजायला कोणी आग्रह धरलेला नाही. पण जे पूजतात त्यांना अवमानित करण्याचा अधिकार कुठल्या राज्यघटनेने वा तिच्यातल्या कलमाने दिलेला आहे? तोच खरा कळीचा मुद्दा आहे. कुठल्या मुलीला वा महिलेला तिच्या सुंदरतेचे कौतुक म्हणून हिडीस शब्दात वा कृतीतून अभिवादन करायचा अधिकार असू शकतो काय? प्रत्येक व्यक्तीला आपापली मते व श्रद्धा असण्याचे घटनेने स्वातंत्र्य दिलेले आहे. पण त्याची श्रद्धा वा स्वातंत्र्य इतरांच्या अधिकारावर गदा आणणारे असू नये, असेही त्या व्यक्तीस्वातंत्र्याचे बंधन आहे. ती मर्यादा ओलांडता, तेव्हा आपोआपच तुमचे स्वातंत्र्य बाद होत असते. मग आपल्या बचावासाठी वा आपल्या स्वातंत्र्याच्या जपणूकीसाठी योग्य हालचाली करण्याची मुभा आपोआपच समोरच्या व्यक्तीला मिळत असते. त्यासाठी प्रत्येक वेळी सरकार दरबारी वा कोर्टाकडे जाण्याची गरज नसते. बलात्कार वा अत्याचार होताना गप्प बसून मग कोर्टाकडे न्याय मागता येत नसतो. आधी अत्याचार थांबवणे हेच उत्तम नागरिकाचे प्रथम कर्तव्य असते. कायदा वा प्रशासन यंत्रणा प्रत्येक जागी हजर असतेच असे नाही. अशा वेळी प्रत्येक जागरूक नागरिकाने समाजविघातक काही घडत असेल तर त्यात हस्तक्षेप करण्यालाच खरे नागरी कर्तव्य म्हणतात. त्याने अन्याय बघत बसणे, ह्याला संयम नव्हेतर अन्याय अत्याचाराला परस्पर मौन प्रोत्साहन देणे म्हणतात. याच वृत्तीने देशात सातत्याने गुन्हेगारी व अत्याचार वाढत गेलेले आहेत.

कालपरवा उत्तर प्रदेशातील कुठल्याशा शहरात एका मुलीची धावत्या गाडीत छेड काढण्याचा प्रकार घडला. तेव्हा त्या मुलीने गाडी थांबवून त्या रोडरोमियोंचा तिथेच समाचार घेतला होता. तीनचार दिवस बहुतेक वाहिन्यांवर त्याच मुलीच्या हिंमतीचे गुणगान चालले होते. पण कोणी त्या मुलीवर अतिरेक केल्याचा आरोप केला नाही. उलट त्याच घटनेची विविध कोनातून छायाचित्रे दाखवून, त्यात आसपासचे शेकडो बघ्ये निष्क्रीय राहिल्याची निर्भत्सना वाहिन्यांवर चालली होती. मग अशा बातम्या रंगवून सांगणार्‍यांची काय अपेक्षा होती? त्या बघ्यांनी पुढे येऊन बदमाशी करणार्‍या टपोरी तरूणांना गांधीवादावर प्रवचन द्यावे ही अपेक्ष होती काय? एकाकी गुंडांशी दोन हात करणार्‍या तरूणीच्या मदतीला कोणी पुढे झाला नाही, अशी तक्रार होती. मग बघ्यांनी काय मदत करायला हवी होती? एकट्या लढणार्‍या तरूणीच्या मदतीला धावणे, म्हणजे त्या गुंडांना पकडणे व त्यांनी निसटण्याचा प्रयास केल्याच थप्पडा मारून अडवणे, हाच मार्ग होता ना? इतके घडल्याचा गाजावाजा झाला, तरी पोलिसांनी स्वत: पुढाकार घेऊन कुठली तक्रार नोंदवली नाही, की कारवाई केली नाही. तरूणीने ठाण्यात येऊन तक्रार नोंदण्याची पोलिस प्रतिक्षा करीत बसले. याला एकप्रकारे वर्मा प्रकरणाशी जोडायला हवे. ते रस्त्यावरचे टपोरी व सोशल मीडियातून कुरापती करणारे दिडशहाणे, यात तसूभर फ़रक नसतो. त्या टपोरी पोरांनी मुलीची छेड काढणे व रामगोपाल वर्माने गणेशभक्तांना मुर्ख म्हणून शुभेच्छा देण्यात कुठला फ़रक असतो? वर्माही अकारण छेडच काढत असतो. त्याला आस्तिक नास्तिक अशा वादात रस नसतो, तर कुरापत काढायची असते. तिचा संबंध अविष्कार स्वातंत्र्याशी जोडण्यातच मुर्खपणा किंवा बदमाशी असते. त्यातूनच अशा समाजविघातक प्रवृत्तींना प्रोत्साहन दिले जात असते. तोगडीया वा रामगोपाल वर्मा यांच्या चिथावणीखोरीत कुठलाही गुणात्मक फ़रक पडत नसतो.

एकूणच असली नास्तिकता व त्यातून आपल्या बुद्धीवादाचे प्रदर्शन मांडण्याची खोड दिवसेदिवस बांडगुळासारखी सोकावली आहे. वास्तविक असे नास्तिक दिखावू अधिक व व्यवहाराने आस्तिक असतात. म्हणूनच त्यांना असे मुहूर्त शोधून आपल्या नास्तिकतेचे प्रदर्शन मांडावे लागत असते. आस्तिकाला दुखावल्याखेरीज त्यांची नास्तिकता मोक्षाप्रत जाऊ शकत नसते. खरेच देव-इश्वर नसेल, तर त्याच्या नसण्याला सिद्ध करण्यासाठी नास्तिकाने जिवाचा इतका आकांत करण्याचे काही कारण नाही. जो कोणी आस्तिक असेल, त्याच्या आस्तिकतेची बोचणी नास्तिकाला अधिक कशाला सतावते? सतत असले पूजाअर्चा बघून आपलीही देवाधर्मावर श्रद्धा बसण्याची भिती अशा नास्तिकांना भेडसावत असते. म्हणून तर नास्तिकांच्या कुठल्याही कार्यक्रमात सहसा कोणी आस्तिक प्रतिकार वा विरोध करायला फ़िरकत नाही. पण जिथे म्हणून आस्तिकांचे काही चालू असते, तिथे नास्तिकाला धावायचा मोह आवरत नाही. त्यातून मग नास्तिकतेच्या स्खलनशीलतेवरचा विश्वासच अधिकाधिक स्पष्ट होत असतो. त्या काळात गॅलिलीओला पोपने नास्तिकता व विज्ञानवादासाठी माफ़ी मागायला लावली. त्यानेही मागितली. कारण त्याला मुर्खांसाठी आपला बहूमोल वेळ खर्ची घालायचा नव्हता. आजच्या नास्तिकांप्रमाणे गॅलिलीओ वागला असता, तर आजचे जग किती महान वैज्ञानीक शोधांना मुकले असते, त्याचाही तोच धडा आहे. खरा नास्तिक वा विज्ञाननिष्ठ आस्तिकाला समजावण्यापेक्षा विज्ञानाला पुढे घेऊन जायला बहूमोल वेळ वापरतो. उलट दिखावू नास्तिक वा विज्ञाननिष्ठ लोक आस्तिकतेच्या झाडावर बांडगुळासारखे जगतात. झाडच मेले वा संपले, तर यांचेही अस्तित्व संपुष्टात येत असते. म्हणूनच त्यांना रामगोपाल वर्माच्या बदमाशीत आपले अविष्कार स्वातंत्र्य शोधावे लागते. आस्तिकापेक्षा नास्तिक श्रद्धाळू असतात, त्याचाच हा पुरावा असतो.

5 comments:

  1. bhau bhau bhau !!! shatada naman tumchya pratibhashaktila v vivechan koushalyala!! sadetod rokhthok bindhast vichar!! trivar abhivadan !!

    ReplyDelete
  2. bhau bhau bhau !!! shatada naman tumchya pratibhashaktila v vivechan koushalyala!! sadetod rokhthok bindhast vichar!! trivar abhivadan !!

    ReplyDelete
  3. दाभोलकर तर ऑफ झाले पण उरलेल्या अनिसवाल्याना या लेखातील म्हणणे कुणीतरी समजावून सांगा रे

    ReplyDelete
  4. I agree that a true atheist does not care about poking/provoking. But it also raises important point that lot of superstitions that are prevalent in a society should be and must be eradicated and anytime a person raises her/his voice against it the "sentiments" are going to hurt. It was probably foolish of Verma to make that comment, but I have fundamental problem with 'hurting sentiments' any thing and everything can hurt sentiments. It is not objective measure at all. Tomorrow if I say eating potato "hurts" my sentiment then is it rational for me to expect ban on potato? It is not, so it is much easier to ignore such stupidity of a moron (i am sure i will hurt sentiment of ram gopal verma's fans) than to give importance to it.

    ReplyDelete