Saturday, September 20, 2014

कोण हवा? गळेकापू की खिसेकापू?



खुप जुनी बोधकथा किंवा इसापनिती वगैरेपैकी गोष्ट आहे. चार दरोडेखोर असतात. ते मोठा दरोडा घालून सोनेनाणे लूट मिळवतात. मग सुरक्षित जागी संपत्ती लपवून झाल्यावर विश्रांती घेऊन काही नियोजन करतात. दोघे सर्वांसाठी खायला काही आणायला जातात आणि दोघे संपत्ती दडवली, तिथेच पहारा देत बसून रहातात. पण मन कुणाचेच साफ़ नसते. त्यामुळे इथे पहारा करायला बसलेले आपसात एक कारस्थान शिजवतात. जेवण आणायला गेलेल्या दोघांचा काटा काढला, तर मिळालेली सर्वच लूट आपल्या दोघांच्या वाट्याला येईल, असा त्यांचा विचार असतो. म्हणून दोघेही साथीदार जेवण घेऊन परतले, की त्यांना ठार मारायची योजना हे आखतात. त्याची पुर्ण सज्जता होते आणि दोघे खुश असतात. एका बाजूला धावपळ न करता दोघांना पोटभर खायला मिळणार असते आणि शिवाय सर्वच संपत्ती दोघांची होणार असते. त्याप्रमाणे दबा धरून बसतात आणि जेवण घेऊन साथीदार आले, की विनाविलंब त्यांचा खात्मा करतात. आता त्यांचा मार्गच मोकळा झालेला असतो. आपले साथीदार मेल्याची खात्री करून घेतल्यावर जवळच्या ओढ्यात जाऊन हातपाय धुतात आणि माघारी येतात. मेलेल्या दोघांनी आणलेले अन्न घेऊन दुसर्‍या जागी जाऊन त्यवर ताव मारतात. जसजसे त्यांचे पोट भरत जाते, तशी त्यांना कुठली तरी नशा चढत जाते आणि त्यांचे भान हरपू लागते. काही वेळातच त्यांच्या जीवाची तडफ़ड होते आणि बघता बघता उरलेले दोघेही मरतात. कारण त्यांना विषबाधा झालेली असते. जेवण आणायला गेलेल्या दोघांनीही यांच्यासारखाच विचार केलेला असतो. त्यासाठी त्यांनी थांबलेल्या मित्रांना संपवायचा सोपा बेत केलेला असतो. आपण जेवून आलो म्हणायचे आणि आणलेले विषारी अन्न थांबलेल्यांना खाऊ घालायचे. फ़क्त अन्न खाऊन दोघे निमूट मरणार की सर्व संपत्ती आपली.

गोष्ट खुप जुनी आणि कुठे ना कुठे ऐकलेलीच असणार. जेव्हा असे मित्र असतात, तेव्हा तुम्हाला शत्रूची गरज उरत नाही. राजकारणात हल्ली असेच मित्र उदयास आलेले आहेत किंवा मैत्रीची अशीच व्याख्या झालेली आहे. आपण गेले दोन आठवडे महाराष्ट्राच्या राजकारणात नेमक्या अशाच मित्रांचे बेत, प्रस्ताव, चर्चा वादविवाद ऐकत आहोत ना? प्रत्येकजण १५ ते २५ वर्षाच्या जुन्या मैत्रीचे हवाले देतो आहे. पण मैत्रीचा पुरावा म्हणून पुढे कुठले दाखले आणतो आहे? दिर्घकालीन मैत्री काळात मित्राने आपली कशी फ़सवणूक केली किंवा आपला गैरफ़ायदा कसा घेतला, त्याचे पुरावे ह्रीरीने सादर केले जात आहेत ना? मग त्या गोष्टीतल्या चार दरोडेखोरांपेक्षा आजचे महाराष्ट्रातील राजकारणी कितीसे वेगळे मानता येतील? सत्ताधारी आघाडीतील दोन पक्षांनी गेल्या पंधरा वर्षात एकत्र सत्ता भोगली आहे आणि विरोधातल्या युती पक्षांनी पंधरा वर्षे वनवास अनुभवला आहे. लोकसभेतील यशामुळे आणि विविध चाचण्यांमुळे विरोधकांना यावेळी सत्ता मिळायची आशा निर्माण झाली आहे. पण दोन्हीकडे एकमेकांना संपवण्याचे डावपेच सारखेच आहेत ना? त्या चौघा दरोडेखोरांनी लूट मिळवल्यावर घातपाताच्या योजना आखल्या होत्या. पण इथे बाजारात तुरी म्हणावी तशी स्थिती आहे. अजून महिनाभराने खरे निवडणूक निकाल समोर यायचे आहेत. पण त्याआधीच एकमेकांना शह काटशह देण्याची कारस्थाने रंगात आलेली आहेत. त्यात मग आपल्याला मिळावे याचीही फ़िकीर कोणाला दिसत नाही. आपल्याला मिळण्यापेक्षा दुसर्‍याला काय व कसे मिळू नये, याचीच भ्रांत चारही पक्षांना पडलेली दिसते आहे. त्यातून मग अजब चमत्कारीक युक्तीवाद व मुद्दे पुढे आणले जात आहेत. पण कोणालाही सत्ता आपल्या बळावर मिळायची शाश्वती नाही. म्हणूऩच युती वा आघाडी पण हवी आहे. आपले होत नसेल तर दुसर्‍याचे नुकसान कसे होईल, त्याची फ़िकीर आहे.

लोकसभेच्या निकालात युतीला २४६ विधानसभा क्षेत्रात मताधिक्य मिळाले असल्याने, आगामी विधानसभा मतदानातही त्यांना दिडशेपेक्षा अधिक जागी मताधिक्य मिळू शकते, यात शंकेला जागा नाही. म्हणजेच कुठलाही फ़ॉर्म्युला असला तरी युतीतले दोन पक्ष व त्यांचे छोटे मित्र मिळून बहुमताचा पल्ला पार करणार,, यात शंका नाही. म्हणजेच पाव शतक जसे एकत्र लढले, तसे झाले तर सत्ता त्यांनाच मिळणार आहे. पण कालपर्यंत सत्तेबाहेर बसलेल्या या पक्षांना नुसती सत्ता नको आहे. त्यात सर्वाधिक सत्तेचा वाटा आपल्याकडेच यावा, याची आतापासून शर्यत लागली आहे. त्यासाठी मग दुसर्‍याला अधिक यश वा जागा मिळू नयेत, याची खरी चिंता आहे. दुसरीकडे सत्ताधारी आघाडीतील दोन्ही पक्षांना आपल्या अपयशाची खात्री असली तरी चुकून सत्ता आलीच, तर आपलाच वरचष्मा असावा याची घाई झालेली आहे. किंबहूना पराभवातही आपल्या मित्राचा मोठा पराभव व्हावा, अशी अतीव इच्छा सत्ताधारी आघाडीत दिसते. म्हणूनच की काय, त्यांचे वागणे पाहिल्यास यांनीच इतकी वर्षे एकत्र सत्ता राबवली यावर विश्वास बसू नये अशी स्थिती आलेली आहे. देशभरात मोठ्या पराभवाला सामोरे गेल्याने विकलांग झालेल्या कॉग्रेसला राज्यात आणखी दुबळी करायचा राष्ट्रवादी नेत्यांचा मनसुबा आहे. उलट सत्ता जाणारच असेल, तर त्यानंतर राष्ट्रवादीला डोके वर काढायला जागा राहू नये, इतक्या भानगडी त्याच्या नेत्यांच्या मागे लावायचे डावपेच कॉग्रेस खेळते आहे. अजितदादांनी पुन्हा या मुख्यमंत्र्याच्या सोबत काम करायचे नाही, अशी घोषणाच करून टाकली आहे. तर दादा व तटकरे यांच्यामागे चौकशीचे शुक्लकाष्ट लावायची सज्जता पृथ्वीराज यांनी केल्याची बातमी सूचक आहे. युती व आघाडी होणार असे हवाले दिले जात असतानाच, तोडण्याचे संकेतही तितक्याच आवेशात दिले जात आहेत. आणि हेच सगळेच जुन्या मैत्रीचे दाखलेही देत असतात.

दरोडेखोरांच्या त्या काल्पनिक गोष्टीत निदान चौघे लुटेरे दोन गटात विभागले गेलेले होते आणि त्या दोघा दोघांनी एकमेकांना चांगली प्रामाणिक साथ दिलेली दिसते. इथे एकमेकांच्या जीवावर उठल्याचे बोलणारे दोघे, व्यवहारात आपसातच जीवावर उठल्यासारखे राजरोस वागत आहेत. मित्राने वा साथीदाराने आपल्यावर विश्वास ठेवावा असे त्यांना अजिबात वाटत नाही. पण बघणार्‍या त्रयस्थांनी त्यांच्यातल्या अविश्वासालाच विश्वास मानून स्वत:ची फ़सवणूक करून घ्यावी; अशी अजब इच्छा या चौघा पक्षातून दिसून येते. त्यांच्यात मैत्री आहे आणि दोन गटातले हे पक्ष एकमेकांना चांगली साथ देतील, यावर जनतेने विश्वास ठेवून काय व्हायचे आहे? परस्परांच्या मदतीने त्यांना सत्ता हस्तगत करायची असेल किंवा काही मिळवायचे असेल, तर त्यांनी परस्परांमध्ये विश्वासाने वागण्या़ची गरज आहे. एकमेकांना दगाफ़टका करायचा विचारही त्यांच्या मनात येता कामा नये. तरच जिथे मित्र कमजोर आहे तिथे त्याला सावरता येईल आणि आपण कमजोर असू तिथे त्याच्या मदतीने आपल्याला मजबूत करता येईल. असे वागले तरच समोरच्या प्रतिस्पर्ध्याला पराभूत करता येईल. पण त्याचा मागमूस दोन्ही बाजूला दिसत नाही. दोन्ही बाजूचे मित्र, शत्रू गोटातल्या कोणाच्या तरी साथीने मित्रालाच संपवायचे बेत करीत असावेत, अशी एकूण स्थिती आहे. मात्र तुम्हीआम्ही अशा वैरभावनेला मैत्री मानावे, असा आग्रह आहे. त्यानंतरही आघाडी व युती झालीच, तर पुढल्या दोनतीन आठवड्यात मित्र कसे केसाने गळा कापतात. त्याचे जगावेगळे चित्र आपल्यासमोर सादर होणार आहे. अर्थात त्याचा निकालावर मोठा परिणाम होण्याची शक्यता कमीच आहे. कारण सत्तांतर घडवून आणायला सामान्य जनता व मतदार उतावळा झालेला आहे. त्या मतदाराचे दु:ख इतकेच, की गळेकापू व खिसेकापू यातून एकाची निवड करायचे दुर्भाग्य त्याच्या नशीबी आलेले आहे.

1 comment:

  1. भाऊ, असे म्हणावेसे वाटते की "देवा, यांना माफ कर ! ते काय करत आहेत याची जाणीव त्यांना नाही." त्या दरोडेखोरांनी मागे ठेवलेली संपत्ती एखाद्या गरीब वाटसरूला मिळाली असेल, तशीच ही महाराष्ट्राच्या सत्तेची संपत्ती तशाच कोणा गरीब पक्षाला मिळावी अशी तिव्र इच्छा मनात आली आहे.

    ReplyDelete