Tuesday, September 2, 2014

राहुल गांधींचा दिग्विजय



गेल्या काही वर्षात प्रामुख्याने चारपाच वर्षात आपल्या वाचाळपणाने कॉग्रेस पक्षाला सातत्याने गोत्यात घालणार्‍या नेत्यांमध्ये दिग्विजय सिंग यांचा प्रामुख्याने समावेश होतो. पण आपल्या तर्कहीन व टोमणेवजा भाषेने विरोधकांना हैराण करण्याची त्यांची कुवत, त्यांना पक्षात इतक्या महत्वाच्या पदावर घेऊन गेली आहे. दहा वर्षापुर्वी मध्यप्रदेश या महत्वाच्या राज्यात मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या दिग्विजय सिंग यांच्या कारभाराने तिथला पक्षाचा पाया कायमचा उखडला गेला होता. सत्तेचा व कारभाराचा त्यांनी इतका बोजवारा उडवला होता, की नुसत्या रस्ते, पाणी व वीज शब्दावर तिथल्या मतदाराने कॉग्रेसचा सुपडा साफ़ करून टाकला. गेल्या वर्षाखेर तिथे तिसरी लागोपाठ विधानसभा निवडणूक कॉग्रेस मोठ्या मताधिक्याने हरली. त्याचे कारण दिग्विजय असे म्हटल्यास वावगे ठरू नये. कारण दहा वर्षे तिथे असलेले भाजपा सरकार फ़ारसा उत्तम कारभार करणारे नसले, तरी सिंग यांच्यापेक्षा खुपच समाधानकारक काम करते आहे. पुन्हा कॉग्रेसला यश मिळाले, तर दिग्विजय यांच्या हाती सत्ता जाईल अशा भयाने मतदार कॉग्रेसला मत द्यायला तयार नाहीत. सहाजिकच अशा माणसाला पक्षातून खड्यासारखे बाजूला करायला हवे होते. पण केवळ गांधी-नेहरू खानदानाची भाटगिरी करण्याच्या कर्तृत्वावर हा माणूस पक्षाचा महासचिव होऊन मजा मारतो आहे. बदल्यात त्याने केवळ भाजपाला डिवचणारे शब्द टोमणे वापरायचे, इतकेच त्याचे काम राहिले आहे. कोणालाही चमचेगिरी नजरेस यावी अशा थराला जाऊन सिंग लाळघोटेगिरी करू शकतात. अडिच वर्षापुर्वी उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणूकीत राहुल गांधी यांनी स्वत:ला पुर्णपणे झोकून दिलेले होते. तेव्हा तिथे कॉग्रेस बहूमतच मिळवणार असल्याच्या वल्गना हेच सिंग महोदय करीत होते. पण यश मिळाले नाही तर काय, अशा प्रश्नावर त्यांनी दिलेले उत्तर त्यांच्या भाटगिरीचा उत्तम नमूना होता.

भट्टा परसोल वा तत्सम प्रकरणात राहुल गांधी यांनी खुप तमाशा करून तीन महिने उत्तर प्रदेशात खुप रान उठवले होते. त्याखेरीज आधीच्या २००९ च्या लोकसभा निवडणूकीत कॉग्रेसला दोन दशकानंतर त्या राज्यात वीस जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे त्याला राहुलचा करिष्मा ठरवून पुन्हा उत्तर प्रदेश पादाक्रांत करण्याची स्वप्ने कॉग्रेस बघत होती. सहाजिकच मतदानानंतर निकालांविषयी दिग्विजय सिंग यांना प्रश्न विचारले गेले होते. छातीठोकपणे त्यांनी आपणच जिंकणार व सरकार स्थापन करण्याची हमी दिलेली होती. पण समजा पराभव झाला तर? त्यावर सिंग यांचे उत्तर होते, पराभव झाला तर तो कॉग्रेस कार्यकर्त्याचा असेल आणि विजय मिळवला तर त्याचे श्रेय राहुल गांधींचे असेल. आता कदाचित खुद्द सिंग यांनाच आपले शब्द आठवत नसावेत. कारण लोकसभेचा पराभव होऊन तीन महिने उलटल्यावर त्यांना त्या पराभवाविषयी साक्षात्कार झाला आहे आणि राहुलच्या डोक्यावर खापर फ़ोडण्यापर्यंत सिंग यांची मजल गेली आहे. प्रचारात मागे पडलो आणि आपल्या सरकारच्या कामाचा प्रचार योग्य झाला नाही. पण आमच्या त्रुटी मात्र भाजपाने ठळकपणे जनतेच्या नजरेस आणून दिल्या. त्यामुळे पक्षाचा पराभव मतदानाच्या आधीच नुसत्या कल्पना विश्वात झाला होता. मतदानानंतर तो मतपेटीतून समोर आला, असे निदान सिंग यांनी केले आहे. पण त्यात म्हणजे प्रचारात कोण कुठे कमी पडला? कारण पक्षाचे कार्यकर्ते व इतर नेते प्रचाराची धुरा संभाळत नव्हते. ती जबाबदारी एकहाती राहुल गांधी यांनी उचलली होती आणि सिंगच त्यांचे चाणक्य होऊन मार्गदर्शन करत होते. सहाजिकच राहुल कमी पडले असतील, तर तितकीच जबाबदारी त्याच्या चाणक्यावर येते. चाणक्य कोणते दिवे लावत होते? रोजच्या रोज नुसती टोमणेवजा मुक्ताफ़ळे उधळण्यापलिकडे दिग्विजय सिंग यांनी करी काय केले?

त्या काळात राहुल गांधी यांनी अनेक बेताल विधाने केली, तर्कहीन आरोप व हास्यास्पद युक्तीवाद चालविले होते. माध्यमांसहीत विरोधी पक्षातल्या अनेक जाणकारांनी राहुलच्या त्या पोरकटपणाकडे लक्ष वेधले होते. त्यावेळी या चाणक्यांनी आपल्या शिष्योत्तमाला कानपिचक्या देऊन सुधारणा करायला नको होती काय? आपण लोकांना समजावण्यात व मतदारापर्यंत पोहोचण्यात तोकडे पडतोय, हे राहुलना कोणी दाखवून द्यायचे होते? तर त्याच मुर्खपणाचे समर्थन करण्यात सिंग त्यावेळी धन्यता मानत होते. कितीही पोरकटपणा राहुलने करावा आणि सिंग यांच्यासारख्या दिवट्यांनी त्यालाच समर्थनीय ठरवण्यात आपली सगळी शक्ती खर्ची घातली होती. त्यामुळे आता त्यातल्या त्रूटी दाखवणे हा निव्वळ नमकहरामीपणा म्हणावा लागेल. बिहार पाठोपाठ उत्तरप्रदेशच्या दारूण पराभवाला राहुल गांधी जबाबदार होते आणि तशी तक्रार स्थानिक पक्ष नेत्यांनी केलेली होती. डिसेंबरच्या चार विधानसभा निकालांनी तेच पुन्हा दाखवल्यावर तरी कोणी सत्य बोलण्याची हिंमत करीत होता काय? दिल्लीतल्या विधानसभा प्रचारात राहुल गांधी बोलायला उभे राहिल्यावर लोक उठून जाऊ लागले होते. तिथेच त्यांच्या हाती पक्ष सुखरूप नसल्याची साक्ष अनेकांना मिळालेली होती. त्यामुळे किती तरी उमेदवारांनी राहुलना प्रचाराला पाठवू नका असा आग्रह धरला होता. तरीही लोकसभेची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आणि सर्वच निर्णय राहुलने घेण्याचा जुगार खेळला गेला. तेव्हा तरी दिग्विजय सिंग यांनी तोंड उघडायला हवे होते. कारण राहुलपर्यंत सामान्य नेता वा कार्यकर्ता पोहोचू शकत नव्हता. पण सिंग यांना ती संधी होती. मग तेव्हा सत्य बोलायला त्यांना कोणी रोखले होते? पराभवाची छाया दिसू लागल्यावरही पोरकटपणाचे कौतुक करणारा वास्तविक पक्ष बुडवत होता. पोरकटपणा करणारा दुय्यम होता. त्यामुळे राहुल दोषी असतील, तर त्या पोराला पक्षाचा सत्यानाश करण्यापर्यंत मोकळीक देणारे खरे गुन्हेगार आहेत.

लोकसभेचे निकाल लागल्यावर अनेक नेत्यांनी हळूहळू राहुलविषयी सत्य बोलायची हिंमत केली. केरळचे माजी मंत्री वा राजस्थानचे विद्यमान आमदार अशा लोकांनी उघडपणे राहुल गांधी विदूषकासारखे प्रचार करीत होते, असे म्हणताच त्यांची पक्षातून हाकालपट्टी झाली. काय चुकीचे बोलले होते हे नेते? प्रत्येक सभेत गुब्बारे उडवण्याचा बालीश डायलॉग मारून राहुल स्वत:वर खुश असायचे. मोदींच्या व्यक्तीगत जीवनाविषयी व विवाहाचे उल्लेख करून कोणते मुद्दे मांडले जात होते? राहुल गांधी यांना त्यापासून परावृत्त करायला सिंग यांना कोणी रोखले होते काय? आपल्या पक्षाच्या व सत्तेच्या त्रुटी मोदींनी योग्यरित्या मांडल्या असे सिंग म्हणतात. तेव्हा मोदी वा भाजपाच्या कोणत्या त्रुटी राहुल मांडत होते? खुद्द सिंग यांनी तरी व्यक्तीगत गलिच्छ टिका सोडून काय दिवे लावले? सोनिया व राहुल यांच्यासमवेत सर्वच कॉग्रेस नेते मोदींवर आचरट आरोप करण्यात गर्क होते. पण आपल्या वा पक्षाच्या गुणवत्तेबद्दल कुठला मुद्दाच समोर ठामपणे मांडत नव्हते. आता त्याचे सर्व खापर राहुलच्या एकट्याच्या माथी मारून कसे चालेल? राहुल यांचे विचार काय आहेत ते त्यांनी अधिक खुलेपणाने लोकांमध्ये जाऊन मांडायला हवेत. सातत्याने लोकांपर्यंत पोहोचायला हवे, हे शहाणपण सिंग यांना कधी सुचले आहे? नावातला दिग्विजय दारूण पराभवापर्यंत घेऊन गेल्यावर आलेली अक्कल आहे ना? चुकणार्‍या नेत्याला तिथल्या तिथे हटकण्याची कुवत असलेले सहकारी मोदींनी गोळा केलेत. त्यामुळेच त्यांना इतका मोठा विजय मिळवता आला. नेमकी उलटी स्थिती राहुल गांधी यांची आहे. त्यांच्या चुकांनाही टाळ्या वाजवून अधिक खड्ड्यात उडी मारायला प्रोत्साहन देणार्‍याच्या घोळक्यात राहुल फ़सलेले आहेत. त्यातून बाहेर पडून कानपिचक्या देणार्‍या सहकार्‍यांची त्यांना व पक्ष नेतृत्वाला गरज आहे. तरच इतक्या मोठ्या परभवातून सावरणे शक्य आहे. पराभवात दिग्विजय दाखवणारे भोवती गोळा केले मग पराभव अपरिहार्य होणारच ना?

3 comments:

  1. भाऊ, आपण एकदम सडेतोड विश्लेषण केले आहे. दिग्विजय सिंग यांच्या बोलण्याचा काहीही फायदा होणार नाही. बेताल वक्तव्य करण्यात या सिंगचा कोणीही हात धरु शकत नाही. हे काँग्रेसवाल्यांना माहीत आहे. तेही असेच समजतीलकी दिग्विजय सिंगचे राहुल गांधी बद्दलचे वक्तव्यही तसेच बेताल आणि मुर्खपणाचे आहे. म्हणून राहुलच्या वागण्यात काहीही फरक पडणार नाही. तसेही राहुलबाबाला राजकारणात पुढे करणे म्हणजे माशाला झाडावर चढून दाखव असे म्हणण्यासारखे आहे.

    ReplyDelete
  2. आणि आता तर गोव्यातील दिग्विजय ही हैटच झाली. इतक्या जेष्ठ नेत्याला गोव्यात काहीच कसे सुधारले नाही. हास्यास्पद फजिती म्हणजे दिग्विजय म्हणतात गोवेकर सद्ध्या. 😂😂

    ReplyDelete