Wednesday, September 10, 2014

डाव्यांची पिछाडी उजव्यांची आघाडी



गेल्या अर्धशतकात देशाच्या राजकारणात आमुलाग्र उलथापालथ झालेली आहे. त्याची मिमांसा विचारवंतांकडून होत नाही, की नेमकी केली जाऊ शकत नाही. त्याचे कारण आपल्याकडे आजकाल ज्यांना विचारवंत अभ्यासक मानले जाते, तेच मुळात डावे आहेत. सहाजिकच आपलाच मुर्खपणा कुठलाही बुद्धीमंत कबुल करू शकत नसल्याने अशी रास्त मिमांसा होऊ शकलेली नाही. स्वातंत्र्योत्तर काळात जनमानसावर कॉग्रेसच्या चळवळीचे इतके गारूड होते, की त्यातच पहिली दोन दशके निघून गेली. साधारण १९६० च्या दशकात नेहरू व कॉग्रेसची जादू ओसरू लागली आणि राजकीय पर्यायांकडे लोक हळुहळू झुकू लागले. त्याच काळात डाव्या चळवळीनी उभारी घेतली होती. स्वातंत्र्याची फ़ळे सामान्य जनतेला चाखायला मिळावीत, अशी त्यामागची अपेक्षा होती आणि म्हणूनच तळागाळातून आलेले झुंजार कार्यकर्ते डाव्या पुरोगामी चळवळीत पुढे येत चालले होते. तिची लोकप्रियता बघून कॉग्रेसचे नेतृत्व करणार्‍या नेहरूंनी समाजवादाची कास धरली. तरी कॉग्रेसची भाषा समाजवादाची व कारभार भांडवलशाहीकडे झुकणारा असा होता. त्यामुळे डाव्यांमध्येही दोन तट पडू लागले होते. पुरोगाम्यातील एक गट नेहरूंचा वापर करून समाजवाद आणायच्या कल्पनेत मशगुल झाला होता. तर दुसरा अतिडावा गट सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने साम्यवाद प्रस्थापित करायची स्वप्ने रंगवत होता. राजकीय पटलाच्या दुसर्‍या टोकाला व्यापारी उद्योगपती व संस्थानिक सरदार जमीनदारांचा गट होता. त्याचा समाजवादाच्या विरोधातला पवित्रा होता. अशा उजव्या राजकारणाची जबाबदारी स्वतंत्र पक्षाने आपल्या शिरावर घेतली होती. त्यांच्याशी आर्थिक जवळीक साधणारी भूमिका असलेली हिंदूत्ववादी वा सांस्कृतिक राष्ट्रवादाची भूमिका असलेला जनसंघ होता. अशा दोन टोकांच्या मधोमध कॉग्रेस आपला राजकीय तोल संभाळत होती.

दोन दशकात कॉग्रेस व नेहरूंची जादू संपली आणि चिनी आक्रमणाने त्यांचा प्रभावही कमी झाला. त्यांच्या निधनाने कॉग्रेस पक्षात नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली. ती भरून काढायला इंदिरा गांधींचा उदय व्हायला आणखी सहासात वर्षे गेली. तोपर्यंत जनतेमध्ये डाव्या चळवळीने पाय रोवले होते. त्यावर मात करण्यासाठी मग इंदिरा गांधींनी थेट समाजवादाचाच झेंडा खांद्यावर घेतला आणि डाव्या चळवळीचा पायाच ठिसूळ झाला. राष्ट्रीयीकरणाचा सपाटा लावत इंदिराजी सत्ता आपल्या हाती केंद्रीत करत गेल्या. त्याचे समाजवाद म्हणून पुस्तकी डाव्यांनी स्वागत केले आणि व्यवहारात समाजवादाच्या नावाने भांडवलशाही अधिकच घट्ट होत गेली. पण इंदिराजींच्या समाजवादाच्या आहारी गेलेल्या डाव्या चळवळीत क्रमक्रमाने पुस्तकी उच्चभ्रू वर्गाचा पगडा प्रस्थापित होत गेला. त्यांच्यातून तळागाळातील वर्गाकडे दुर्लक्ष होत चालले आणि नेमक्या त्याच कालखंडात जातीपातीच्या अस्मिता टोकदार होत चालल्या होत्या. त्यात मिसळून काम करणार्‍या उजव्या मानल्या जाणार्‍या रा. स्व. संघाने अशा वंचित समाजाच्या अस्मितेला आपल्या पंखाखाली घेण्याचा रितसर प्रयास सुरू केला. १९७० च्या दशकात संघाने आपल्या कामाचा विस्तार तळागाळात नेऊन वंचित समाज व जातींचे नेतृत्व हिंदूत्वाच्या आवाहनाने आपल्या पंखाखाली आणायचा योजनबद्ध प्रयास केला. त्यातून खरा वंचित वर्ग संघाकडे किंवा सशस्त्र उठावाचा आग्रह धरणार्‍या नक्षलवादी डाव्यांकडे, अशी वाटणी होत गेली. त्यातलाच एक गट समाजवादी म्हणजे सौम्य डाव्यांकडेही ओढला गेला होता. कारण डॉ. राममनोहर लोहियांच्या नेतृत्वाखाली अशा इतर मागासवर्गियांच्या अस्मिता चुचकारल्या जात होत्या. ही घुसळण १९७० पासून १९९० पर्यंत चालू होती. त्यात क्रमाक्रमाने डाव्यांची पिछेहाट होत चालली होती. त्यांनी आपले राजकीय संघटन उभे करण्यापेक्षा आघाडीच्या राजकारणाचा आश्रय घेतला होता.

विसाव्या शतकाच्या अखेरीस भारतीय राजकारणाचे स्वरूप बघितल्यास डाव्यांमध्ये उच्चभ्रू सुखवस्तू वर्गातले नेतृत्व शिरजोर होत गेले आणि पिछड्या वर्गातले नेतृत्व त्यासमोर टिकू शकले नाही. डाव्या राजकारणाची सुत्रे अशा उच्चभ्रू वर्गाच्या हाती एकवटत गेली. उलट उजव्या मानलेल्या भाजपा किंवा संघाच्या गोटात तळागाळातील मागास व पिछड्या जातीचे नेतृत्व आघाडीवर येत चालले होते. आपल्या विचारांचे बाळकडू देत जातीपातीच्या पलिकडे हिंदूत्व व राष्ट्रवाद अशा पायावर संघाने नेतृत्वाची नवी फ़ळी उभी केली. एकविसाव्या शतकाच्या आरंभी भाजपा वा संघाचे राजकीय नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे बघितले जाते, त्यात उच्चभ्रू वर्गाचा पगडा कमी आणि वंचित वर्गातून आलेल्यांचा वरचष्मा अधिक दिसतो. थोडक्यात ज्या काळात डाव्या विचारांचे नेतृत्व पुस्तकी होत उच्चभ्रू वर्गाच्या वळचणीला जात होते, त्याच काळात संघाने आपल्या नेतृत्वात वंचित वर्गाला समाविष्ट करून घेत नवी नेतृत्वाची फ़ळी उभी केली. ती त्रुटी शोधून ओळखून भरून काढण्यापेक्षा समाजवदी डाव्या मंडळींनी तडजोडी व तात्पुरत्या उपायांचा आश्रय घेतला. कॉग्रेसची कालबाह्य भांडवली छाप असलेली सद्दी संपत असताना, डावा पर्याय समर्थपणे लोकांसमोर मांडण्यापेक्षा डावे नेतृत्व निवडणूकी जिंकण्यासाठी वा त्याच क्षेत्रात भाजपाला रोखण्यासाठी कॉग्रेसशी हातमिळवणी करण्यापर्यंत घसरत गेले. उलट भाजपा व संघाने कॉग्रेसला राजकीय पर्याय म्हणून सामोरे येण्याचा कष्टप्रद मार्ग चोखाळला. १९७७ साली जनता पक्षात विलीन झाल्यानंतरचा अनुभव आणि १९९० सालचा जनता दलाचा अनुभव घेतल्यावर भाजपाने स्वयंभूपणे राष्ट्रीय पर्याय होण्याचा चंग बांधला. स्थानिक युत्या आघाड्या केल्या, तरी जनमानसात कॉग्रेसला पर्याय अशी प्रतिमा ठसवण्याचा हट्ट अजिबात सोडला नाही. तिथेच डाव्यांची पिछेहाट अपरिहार्य होऊन गेली होती.

लोकांना कॉग्रेसला पर्याय हवा असेल आणि तुम्ही डावा पर्यय देण्यापेक्षा सेक्युलर लेबलाखाली पुन्हा कॉग्रेसच जनतेच्या गळी मारायला निघालात, तर दुसरे काय होणार होते? डाव्यांनी अकारण भाजपा वा त्यांच्या हिंदूत्वाचा बागुलबुवा करण्यापेक्षा डावा पुरोगामी देशव्यापी पर्याय उभा करण्याचे याच काळात कष्ट घेतले असते, तर आज भाजपा विस्तारला त्याजागी डाव्यांचाच प्रभाव दिसून आला असता. जिथे जिथे पुरोगाम्यांनी हिंदूत्वाला रोखण्यासाठी कंबर कसून भाजपाच्या विरोधात शड्डू ठोकला, तिथेच भाजपाचा प्रभाव वाढत गेल्याचे दिसेल. गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र अशा राज्यात भाजपाला मिळालेले स्थान कधीकाळी पुरोगाम्यांचे बालेकिल्ले होते. पण त्यांनी कॉग्रेसशी चुंबाचुंबी करण्यातून कॉग्रेसविरोधी जागा भाजपाच्या हवाली केली. तशी स्थिती नव्हती तिथे, बंगाल ओरीसामध्ये भाजपाचा विस्तार होऊ शकला नाही. गेल्या लोकसभा निवडणूकीत डाव्यांच्या बंगाल व केरळ या बालेकिल्ल्यालाही मोदींनी कॉग्रेसमुक्त भारत अशा भाषेनेच खिंडार पाडलेले आहे. याला दोनच कारणे प्रामुख्याने जबाबदार आहेत. एक म्हणजे गरीब पिछड्यांचे तत्वज्ञान व उच्चवर्णियांच्या हाती केंद्रीत झालेले नेतृत्व आणि दुसरे कारण तळागाळातल्या अफ़ाट लोकसंख्येशी, तिच्या भावविश्वाशी डाव्या नेते व संघटना कार्यक्रमांची तुटलेली नाळ, असे आहे. त्याचा परिपाक असा झाला आहे, की जुन्या चुका कबुल करणे आणि अधिक उत्साहाने नव्या चुका करायला धावत सुटणे; अशी डाव्यांची अवस्था झालेली आहे. अधिक बदलत्या काळाशी सुसंगत असे विचार व कार्यक्रम बदलण्यास नकार देण्याचा अट्टाहास तितकाच कारण आहे. पण सर्वच नेते अत्यंत तल्लख बुद्धीमत्तेचे असल्याने पराभवातही विजय मिळाल्याची आपली समजूत करून घेण्यात धन्यता मानली जाते. पिछड्या वर्गातून आलेला संघाचा प्रचारक देशाचा पंतप्रधान बनतो आणि उच्चभ्रू वर्गातले सुखासिन डावे तळागाळातल्या जनतेचा न्याय मागत, त्याच्यावर टिकेचा भडीमार करतात, असा विरोधाभास त्यातूनच आपल्यासमोर आला आहे.

2 comments:

  1. सर्वच नेते अत्यंत तल्लख बुद्धीमत्तेचे असल्याने पराभवातही विजय मिळाल्याची आपली समजूत करून घेण्यात धन्यता मानली जाते
    This is superb..... As Congressmen were saying "We didn't communicated the facts well" after debacle in LS poll

    ReplyDelete