काही महिन्यांपुर्वी देशातली तार संपर्क यंत्रणा कायमची बंद करण्यात आली. कारण आता तिची उपयुक्तता संपलेली आहे. अर्थात एक काळ असा होता, की देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात वेगवान संपर्क यंत्रणा म्हणून टेलेग्राफ़ सुविधा उभारण्यात आलेली होती. तो काळ कधीच मागे पडलाय. कमाक्रमाने त्याच तंत्राचा विकास होत आज जग कितीतरी जवळ येऊन पोहोचले आहे. साध्या मोबाईल फ़ोनचा वापर करून जगात कुठेही नुसताच संदेश वा आवाज पाठवला जात नाही, तर थेट चित्रांचे प्रक्षेपण होऊ शकते. अशा काळात जुने ते सोने असले, तरी टेलेग्राफ़ कालबाह्य झाले आहेत. म्हणून ती सुविधा कायमची थांबवण्यात आलेली आहे. याचा अर्थ त्या सेवेने तंत्राने आजवर केलेल्या सेवेची महत्ता कोणी नाकारली असे होत नाही. नेमकी अशीच बाब इतर अनेक सुविधा वा गोष्टींची असते. पंडित नेहरू किंवा इंदिरा गांधी यांनी देशासाठी मोक्याच्या कालखंडात दिलेले राष्ट्रीय नेतृत्व आणि त्याची महत्ता, कोणाला नाकारता येणार नाही. पण त्याची किंमत म्हणून त्यांच्या वंशजांना देशाची सत्ता गंमत करायला सोपवणे कितपत योग्य ठरेल? कॉग्रेस पक्षाने त्याचा विचार करण्याची गरज होती. तसे झाले असते, तर आज त्या पक्षावर अशी दुर्दैवी वेळ ओढवली नसती. मुळात राजीव गांधी यांच्या पश्चात सोनियांनी पक्षाचे नेतृत्व करायचा आग्रहच चुकीचा होता. पण अनेक गुणवंत अनुभवी नेते कॉग्रेसमध्ये असूनही आपण सर्वोच्चपदी बसून देशाला व पक्षाला नेतृत्व द्यावे; असा विचारही कोणाच्या मनात आला नाही. आणि आला असेलच, तर त्याने कधी बोलायची हिंमत केली नाही. कारण पक्षात रहायचे असेल, तर घराण्याची महत्ता मानूनच रहावे लागेल, अशी जणू पुर्वअट घातलेली होती. परिणामी पाच वर्षापुर्वीं कुठली कुवत वा गुणवत्ता नसलेल्या राहुल गांधी या वंशजाकडे पक्षाची धुरा आली. त्याने लाडावलेल्या पोराने खेळणे मोडावे, तशी पक्षाची विल्हेवाट लावून टाकली आहे.
असे होणार हे कुणाही कॉग्रेस नेत्याला कळत नव्हते असे अजिबात म्हणता येणार नाही. खरे सांगायचे तर इंदिराजींच्या हत्येपुर्वीच कॉग्रेसचा र्हास सुरू झाला होता. पण विरोधी पक्षात कुणी देशाचे नेतृत्व समर्थपणे करू शकणारा नेता पुढे आला नाही, की कॉग्रेसमधल्या घराणेशाहीला कोणी आव्हान दिले नाही. म्हणून राजीवपासून राहुलपर्यंत घसरगुंडी होत राहिली. ज्या पक्षाकडे तितकी क्षमता होती, त्या भाजपाला इतर पक्षांना सोबत घेउन जाता आले नाही आणि ज्या अन्य पक्षीय नेत्यांपाशी नेतृत्वक्षमता होती, त्यांच्या पक्षापाशी संघटनात्मक बळ नव्हते. अधिक बहुतेक बुद्धीमान नेत्यांमध्ये आत्मविश्वासापेक्षा द्वेषभावनेचा प्रभाव अधिक होता. म्हणूनच मग अशा नेत्यांनी सोनियांचे नेतृत्व मानण्यापर्यंत आपली अधोगती करून घेतली. सेक्युलर असा मुखवटा सोनियांनी परिधान केला, किंवा भाजपाच्या जातीयवादाचा नुसता बागुलबुवा दाखवला आणि इंदिराजींच्या समर्थ नेतृत्वाला नाकारणार्या बहुतांश सेक्युलर नेते पक्षांनी सोनियांसमोर लोटांगण घातले. अशा परिस्थितीत पर्यायी राजकीय पक्ष म्हणून पुढे येण्य़ाची क्षमता एकट्या भाजपामध्ये होती. मात्र त्याच्यापाशी तितके मुसंडी मारणारे आक्रमक नेतृत्व नव्हते. म्हणूनच दहा वर्षे सोनिया व राहुल यांचा पोरखेळ देशात चालू शकला. सोनियांच्या नंतर राहुलच्या पोरकटपणालाही कॉग्रेस व अन्य सेक्युलर नेते नंदीबैल होऊन माना डुलवत होते. तरीही भाजपा मात करू शकला नाही. कारण झुंजार नेत्याचा अभाव होता. ज्याक्षणी मोदी हा झुंजार नेता पुढे आला; तिथूनच कॉग्रेसचा खरा र्हास सुरू झाला होता. मात्र राजकारण्याच्या संसर्गाने आपली बुद्धी वापरायचेही विसरलेल्या अभ्यासकांना तो र्हास बघता येत नव्हता. त्यासाठी मतदान होऊन निवडणूकीचे निकाल समोर यावे लागले. त्यात कॉग्रेस बुडालीच. पण आता पुढे काय असा प्रश्न जाणत्यांनाही भेडसावतो आहे.
शतायुषी असलेला कॉग्रेससारखा एक देशव्यापी पक्ष असा संपून जाऊ शकतो काय? त्याचे उत्तर कॉग्रेसलाच द्यावे व शोधावे लागणार आहे. बुडव्याच्या हाती पक्ष असला तर तो बुडणार हे सांगायला ज्योतीषी लागत नाही. गेल्या पाच वर्षात राहुल क्रमाक्रमाने पक्षाची असलेली संघटनात्मक बैठक मोडून काढत होते. पण त्यांना कालबाह्य वाटणार्या संघटनेच्या जागी उपयुक्त अशी पर्यायी संघटनाही उभारत नव्हते. त्यामुळे कॉग्रेसचा र्हास होतोय हे दिसत होते. मात्र कोणी ते मानायला तयार नव्हता. म्हणून तर कॉग्रेसमुक्त भारत अशी घोषणा मोदींनी केली, त्याची बुद्धीमंतांनीच अधिक टवाळी केली. पण कोणाला मोदींच्या घोषणा वा विधानातील अर्थ शोधायची गरज वाटली नाही. कॉग्रेसमुक्त भारत म्हणजे तो पक्ष संपणार की संपवणार? कोण-कसा संपवणार अशा प्रश्नांची उत्तरे शोधायची गरज कोणाला भासू नये, यातच खरी शोकांतिका दडलेली आहे. मोदींनी कॉग्रेस संपवायचे कुठले डावपेच खेळले नाहीत. पण त्या पक्षाची सुत्रे ज्याच्या जाती आहेत, त्यालाच पक्षाचा सत्यानाश करायला मात्र प्रोत्साहन दिले. राहुलच कॉग्रेस संपवू शकतो, हे एकट्या मोदींनी ओळखले होते आणि नुसते पर्याय घेऊन उभे राहिले, तरी कॉग्रेसला लोक झिडकारणार; याविषयी मोदी निश्चींत होते. जणू त्यांनी्च कॉग्रेसपासून देशाला मुक्ती देण्याची जबाबदारी राहुलवर सोपवली होती. लागोपाठच्या विधानसभा निवडणूकात त्याची प्रचिती येत होती. एका बाजूला कॉग्रेसची विचारधारा व संघटनाच कालबाह्य झालेली होती आणि तिची जी काही उपयुक्तता शिल्लक होती, तिला नामशेष करायची मोहिम राहुल राबवत होते. यातून कॉग्रेस आपटणार आणि मोडीत निघणार; हे ओळखूनच मोदी तशी भाषा वापरत होते. ते सर्व होऊन गेल्यावरही कॉग्रेस व तिचे नेते अजून भ्रमातून बाहेर पडायला तयार नाहीत, मग त्या पक्षाला कोण कसे वाचवणार?
कॉग्रेस कोण सावरणार, या प्रश्नाचे उत्तर एका समारंभात नामदार पतंगराव कदम यांनी दिले, असे म्हणायला हरकत नाही. आता योग्य वेळ आहे आणि समान विचाराच्या राष्ट्रवादी कॉग्रेसने मूळ पक्षात विलीन व्हावे असे त्यांनी सांगितले. त्याचे वेगवेगळे अर्थ काढताना पतंगरावांची टिंगल झाली व होईल. पण म्हणून त्यातला गंभीर अर्थ कोणी शोधायचा प्रयास केला आहे काय? मित्र पक्षाला खिजवण्यासाठी पतंगराव असे बोलले, असाच त्याचा अर्थ लावला गेला आहे. पण वास्तवात त्याचा अर्थ असाही होऊ शकतो, की पक्ष संघटना व राजकारणातला धुर्तपणा ओळखून लवचिकता दाखवणारे धोरणी नेतृत्वच यापुढे कॉग्रेसला गाळतून बाहेर काढू शकेल. त्याचा रोख नुसत्या मित्र पक्षाच्या विलीनीकरणाशी नसून निदान महाराष्ट्रात कॉग्रेसला सावरणारे जाणते नेतृत्व मिळावे, असाही असू शकतो. पतंगरावांचा रोख शरद पवार यांच्याकडे असावा. पवार पुन्हा कॉग्रेसमध्ये आले व राज्यासह त्यांनी राष्ट्रीय संघटनेची जबाबदारी स्विकारली, तर बसलेल्या धक्क्यातून कॉग्रेस पक्षाला नव्याने उभारी आणण्याचे काम सुरू होऊ शकेल. राहुल वा त्याच्या अननुभवी उपटसुंभांना गप्प करण्याची व दूरगामी धोरणांनी जनमानसात पक्षाला पुन्हा स्थान मिळवून देण्याची कुवत पवारांमध्ये असल्याचे पतंगराव सुचवत नसतील, असे कोणी म्हणू शकतो काय? खरेच जनतेला जाऊन भिडणारे, जनमानसाची नाडी ओळखू शकणारे व लोकांना आकर्षित करू शकणारे नेतृत्व; ही कॉग्रेसची गरज आहे. आंध्रातील जगमोहन, बंगालची ममता, कर्नाटकातील सिद्धरामय्या अशा नेत्यांमुळे कॉग्रेस सावरली जाऊ शकते. थोडक्यात गांधी घराणेमुक्त कॉग्रेस, हाच त्या पक्षाला सावरण्याचा एकमेव मार्ग आहे. पण वंशनिष्ठेची बाधा झालेले आजचे किती नेते तो पर्याय स्विकारतील, याची शंकाच आहे. कारण तसा सूर निघाला तरी राहुल समर्थकांनी ज्येष्ठांना हाकलण्याची धमकी दिली आहे.
gandhigharane mukt congress !
ReplyDelete