Tuesday, September 23, 2014

युती आघाडी कधीच संपलीय



लोक खरेच पंधरा वर्षे सत्तेत असलेल्या कॉग्रेस व राष्ट्रवादी आघाडीच्या सरकारला कंटाळले आहेत. त्यांनी माजवलेल्या अराजक व अनागोंदी कारभारातून महाराष्ट्राच्या जनतेला मुक्ती हवी आहे. त्यावरचा जालीम उपाय एकच आहे, तो म्हणजे महायुतीतल्या पक्षांनी आपापल्या मित्रांचे पंख छाटले पाहिजेत. दुसरीकडे देशाला आणि महाराष्ट्राला जातीयवादी प्रवृत्तीचा मोठाच धोका निर्माण झालेला आहे. तो टाळण्यासाठी सेक्युलर मतविभागणी होता कामा नये. ते उद्धीष्ट साधायचे असेल, तर कॉग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही पुरोगामी पक्षांनी आपल्या मित्रांना दुबळे करण्याला पर्यायच नाही. गेल्या आठवडाभरात जे राजकीय चर्चा वा रुसव्याफ़ुगव्यांचे गुर्‍हाळ महाराष्ट्रात चालू आहे त्याचे इतकेच सार असू शकते. तुमच्या आमच्यासारख्या सामान्य बुद्धीच्या लोकांना यात कितीही विरोधाभास दिसला, तरी राज्यातले महान बुद्धीमंत व राजकीय मुत्सद्दी त्यालाच राजकीय सूज्ञपणा समजतात. अन्यथा त्यांनी इतक्या उत्साहात असे गुर्‍हाळ कशाला घातले असते किंवा माध्यमातल्या अत्यंत सुक्ष्मबुद्धीच्या जाणकारांनी सातत्याने त्यावर इतका उहापोह कशाला केला असता? उमेदवारी अर्ज भरायला शनिवारी आरंभ झाला आणि त्यानंतर चौथ्या दिवशी किंवा अर्ज भरण्याची मुदत आणखी चारच दिवस शिल्लक असतानाची दोन्ही बाजूंनी ही अवस्था आहे. मैत्री टिकवण्यासाठी मित्रांची अडवणूक व फ़सवणूक यालाच कोणी मुत्सद्देगिरी वा राजकीय धुर्तपणा समजत असेल, तर सामान्य माणूस तितका दुधखुळा नाही, हे राजकीय पक्ष व नेत्यांप्रमाणेच इथल्या जाणत्या अभ्यासकांनी सुद्धा लक्षात घेतलेले बरे. कारण युद्धभूमीवर किंवा युद्धाचे रणशिंग फ़ुंकले गेलेले असताना, अशाप्रकारच्या वाटाघाटी होत नसतात किंवा असले रुसवेफ़ुगवेही चालत नसतात. सामान्य जनतेच्या मनातले ‘शल्य’ यापैकी कोणालाही समजून घ्यायची बुद्धी होत नाही, हे वैषम्य आहे.

लोकसभा निवडणूकीचे वेध लागण्यापुर्वी आणि नरेंद्र मोदी यांनी सहा महिने आधी आपली प्रचार मोहिम सोडण्यापुर्वीच, महाराष्ट्रात युतीने आपली लढाई आरंभलेली होती. त्यात आजवरचा अनुभव लक्षात घेऊन आणखी मित्रपक्ष जोडण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला होता. युतीत आधीपासून सहभागी असलेल्या रामदास आठवले यांच्याखेरीज शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना आणले गेले. इतकेच नव्हेतर अखेरच्या कालखंडात शिवसंग्राम संघटनेचे नेते मेटे यांनाही आणून युतीचा किल्ला अधिक चिरेबंदी करण्याचा प्रयास झाला होता. शेवटचे दिवस उरले असताना मतविभागणी टाळण्यासाठी नितीन गडकरी यांनी मनसेला लढण्यापासून परावृत्त करण्यासाठी गळ घालण्यापर्यंत प्रयत्न झाले होते. त्याबद्दल उद्धव ठाकरे व शिवसेनेच्या गोटातून नाराजीचा सूर निघताच भाजपाचे पक्षाध्यक्ष राजनाथ सिंग यांनी खुलेआम जाहिरसभेत राज ठाकरेंवर तोफ़ डागण्यापर्यंत सेनेची मर्जी भाजपाने जपलेली होती. याला युती वा मैत्री म्हणतात. पण त्याचा मागमूस गेल्या चार महिन्यात कुठे दिसला आहे काय? नव्याने जोडलेल्या मित्र पक्षांशी संवाद दूरची गोष्ट झाली. गेल्या पाव शतकात डझनभर निवडणूका एकत्र लढलेल्या सेना-भाजपात असलेला संवादही तुटण्यापर्यंत मजल गेली. त्यातून कणाकणाने युतीची भावना मारली गेली. युतीचा आत्मा असा मारून टाकल्यावर उरलेली युती फ़लकावर अथवा जाहिरनाम्यात जरूर असेल. पण ती निवडणूकीच्या रणमैदानावर कितपत असेल? या दोन्ही पक्षातले नेते कॅमेरासमोर मस्त हसून हस्तांदोलन करताना दिसतील. पण त्यांचा सामान्य कार्यकर्ता, म्हणजे लढणारा गल्लीबोळातला गाव खेड्यातला लढवय्या कितपत खांद्याला खांदा लावून लढणार आहे? त्याच्या मनात गेल्या महिनाभरात पेरले गेलेले विष किंवा किल्मीष असे जागांचे आकडे जुळल्याने संपलेले असेल काय?

सत्तेची समिकरणे जुळवताना नेत्यांना आपापले स्वार्थ व मतलब शोधून जुळवून घेणे सोपे असले, तरी आपापल्या गल्लीत गावात अटीतटीने लढणार्‍या कार्यकर्त्यासाठी अशी लढत वा भांडणे थेट व्यक्तीगत पातळीवर जाऊन भिडत असतात. लोकसभेच्या सहा महिन्यांच्या प्रचार मोहिमेत ती जुळणी इतकी बेमालूम झालेली होती, की कोण शिवसैनिक, कोण भाजपावाला, कोण रासप-शेतकरी संघटनेचा याचा भिंग घेऊन शोध घ्यावा लागत होता. प्रत्येकाच्या तोंडी ‘हरहर मोदी’ हेच शब्द होते. गेल्या महिनाभरात तोच मंत्र हरवला आणि एकमेकांना दूषणे देण्यात वेळ खर्ची पडला आहे. मग वर सुरू झालेला हा बेबनाव तळागाळापर्यंत पोहोचतो, तेव्हा संभाव्य उमेदवार असतो, त्यालाही संभाव्य पाठीराख्या अन्य पक्षांच्या कार्यकर्त्यांचा रोष झेलावा लागत असतो. उद्या ज्यांनी युतीचा उमेदवार म्हणून अर्ज भरायचे आहेत, त्यांना मधल्या महिन्याभरात युतीच्याच मित्र पक्षातल्या कार्यकर्त्यांनी शिव्याशाप मोजलेले आहेत. असा शिव्याशाप देणारा येत्या दोन आठवड्यात आपल्या भावना सुधारून कितपत राबू शकणार आहे? पक्षशिस्त म्हणून आपल्या पक्षाचा उमेदवार नसल्यास मित्र पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात मैदानात उतरणार नाही. पण त्यालाच पाडायला विरोधातल्या उमेदवाराशी हातमिळवणी  केल्याशिवाय राहिल काय? छुपी मदत व पाठींबा अशावेळी मोठे चमत्कार घडवून आणतो. म्हणूनच नेत्यांनी जाहिर हेवेदावे मांडण्यापेक्षा कार्यकर्त्यांची भावना दुखावली जाणार नाही; इतकी काळजी घ्यायची असते. नाही तर हाच कार्यकर्ता बंडखोर उभा करतो किंवा युती वा आघाडीच्या उमेदवाराला विजयापासून पारखा करू शकतो. पुढल्या वेळी पुन्हा मित्र पक्षाला आपल्या मतदारसंघात दावा करता येऊ नये, यासाठी आतापासूनच केलेली ती सज्जता असते. म्हणूनच कार्यकर्त्याचे ‘शल्य’ समजून नेत्यांनी वागायला हवे.

महाभारताच्या युद्धात कर्णाचा सारथी म्हणून बसलेला शल्य राजा हेच सामान्य कार्यकर्त्याचे ‘शल्य’ असते. कौरवांचा सेनापती झालेल्या कर्णाचे सारथ्य करणारा राजा शल्य, अखंड तोंडाने दासीपुत्र म्हणून कर्णाची अवहेलना करीत असतो. कर्णाला विचलीत करणारा सारथी असल्यावर त्याने पुरूषार्थ दाखवायचा कसा? निवडणूकीच्या मैदानात जी लढाई होते, त्यात उमेदवार लढवय्या असला तरी त्याचे सारथ्य सामान्य कार्यकर्ताच करीत असतो. तो सारथीच आपल्या मित्रपक्षीय उमेदवाराला घातपात करणार असेल, तर लढाई जिंकायची कशी व कोणी? लोकसभेला अशा मित्रपक्षीय कार्यकर्त्याची एकजिनसी मोट बांधली गेली होती आणि विधानसभेचे वेध लागल्यावर ती मोट सेना-भाजपा यांनी पद्धतशीर रितीने जणू उध्वस्त करून टाकलेली आहे. जिथे पक्षाचा उमेदवार स्वबळावर जिंकण्याची शक्यता कमी असते, म्हणुन मित्रपक्षाची मदत घेतली जाते, तिथे मित्रपक्षाचा कार्यकर्ताच विजयाचा शिल्पकार ठरणार असतो. त्यालाच दुखावल्यानंतर होणारी युती कितपत लाभदायक असेल? ती  जागावाटपात दिसेल, कागदावर आणि व्यासपीठावर दिसेल. पण जिथून मतदार आणला जातो आणि मतदान घडवून आणले जाते, तिथे युती खिळखिळी झालेली आहे. परिणाम असा, की आता युती असो किंवा आघाडी, त्यातल्या एका पक्षाचे कार्तकर्ते दुसर्‍या पक्षाचा उमेदवार खांद्यावर घेऊन मिरवायला कितपत राजी असतील, याचीच शंका आहे. म्हणजेच जागावाटपाने समोरासमोर लढायची शक्यता टळलेली असली, तरी प्रत्येक पक्षाला आपले उमेदवार आपल्याच बळावर निवडून आणावे लागणार; यात शंका नाही. काही जागी मग शत्रूला मदत, मित्राला घातपात होईल. तर काही बाबतीत आपल्या पक्षाचा उमेदवार नसेल, तर पक्षाचा उमेदवार शेजारी असेल तिथे पक्षाची कुमक जाईल. थोडक्यात मैत्रीपुर्ण निवडणूका होतील. पण आघाडी वा युती म्हणून एकदिलाने लढती होण्याशी शक्यता संपलेली आहे. जागावाटप यशस्वी करून देखावा मात्र कायम राखला जाईल.

2 comments:

  1. भाऊ आपले म्हणणे १००% बरोबर आहे. आघाडी आणि महायुतीतील कार्यकर्त्यांची मने आता दुभंगली आहेत. याचा प्रत्यय फेसबुक वरील पोस्ट आणि प्रतिक्रिया मधून येत आहे. आघाडीपेक्षा महायुतीतील पक्षांना याचा अधिक फटका बसणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागावाटपाची जेवढी चर्चा झाली नाही त्याच्या दहापट चर्चा महायुती बद्दल झाली आहे. मिडियाने सुद्धा महायुतीतील जागावाटपाला आधिक महत्त्व दिलेले दिसते. कुठल्याही परिस्थितीत महायुती तुटेल कशी हेच पाहिले गेले आहे. भाऊ आप मानो या ना मनो इसके पीछे सोची समझी साजीश हैं।
    महायुतीतील कार्यकर्त्यांना माझे एवढेच सांगने आहेकी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि मिडियाच्या 'गोबेल्स' नितीला बळी पडू नका आणि,
    "इंसाफ की डगरपर चलना बच्चो संभलके,
    ये देश है तुम्हारा, तुम नेता हो कलके।" हे सतत लक्षात ठेवा.

    ReplyDelete
  2. बारा मतीची निती

    ReplyDelete