Wednesday, November 13, 2019

राष्ट्रपती राजवटीचा अर्थ

Related image

विधानसभा निकालानंतर पहिल्या तीन पक्षांना सरकार बनवण्यासाठी पाचारण केल्यावर कोणीही पुढे आला नाही. म्हणून राज्यपालांनी केंद्राला राज्यात अस्थीर स्थिती असल्याचा अहवाल पाठवला आणि मंगळवारपासून तिसर्‍यांदा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे. यापुर्वी प्रथम १९८० आणि नंतर २०१४ साली दोनदाच ही स्थिती आलेली होती. अन्यथा विधानसभेचे निकाल त्रिशंकू लागूनही प्रत्येकवेळी ठराविक मुदतीच्या आत विविध पक्षांनी आपसात झटपट तडजोडी करून तशी स्थिती येऊ दिलेली नव्हती. यावेळी मात्र ही भांडणे नको तितकी ताणली गेली आणि राजकारण पुरते विस्कटून गेले आहे. तसे बघायला गेल्यास असा वाद उफ़ाळून यायला नको होता. कारण सरकारिया आयोगाच्या शिफ़ारशींनुसार ही विधानसभा त्रिशंकू अजिबात नव्हती. रणांगणात दोन प्रमुख आघाड्या उभ्या राहिल्या होत्या आणि त्यापैकी कॉग्रेस राष्ट्रवादी आघाडीला मतदाराने विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिलेला होता. तसे त्यातले दोन्ही पक्ष वारंवार सांगतच होते. पण ज्या आघाडीला म्हणजे शिवसेना व भाजपा महायुतीला मतदाराने बहूमताचा कौल दिलेला होता, त्यांच्यात सत्तावाटप किंवा मुख्यमंत्री पदाचा विवाद शिगेला पोहोचला आणि युतीच निकालात निघाली. सहाजिकच त्यातला मोठा पक्ष असलेल्या भाजपाला राज्यपाल महोदयांनी प्रथम सरकार स्थापनेसाठी पाचारण केले. वाद झालाच नसता, तर भाजपा नेत्याला महायुतीचा नेता म्हणून पाचारण करण्यात आले असते आणि एव्हाना सरकार स्थापन होऊन कामालाही लागले असते.

भाजपाचे एकट्याचे बहूमत नव्हते. किंवा अन्य छोट्या पक्ष अपक्षांना सोबत घेऊनही बहूमताचे समिकरण जुळणार नव्हते. म्हणून त्यांनी सरकार स्थापनेत असमर्थता व्यक्त केली आणि दुसर्‍या व तिसर्‍या क्रमांकाच्या पक्षांपर्यंत राज्यपाल पोहोचले. त्यांनी नकार दिला नाही तरी मुदत वाढवून मागितली. पण इतका काळ लोकनियुक्त सरकार नसताना कारभार हाकणे अशक्य असल्याने राज्यपालांनाही वैकल्पिक व्यवस्थेचा पर्याय स्विकारावा लागलेला आहे. आता एकत्र येण्याच्या प्रयत्नात असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी व कॉग्रेसने आपल्यापाशी भरपूर वेळ असल्याचे म्हटलेले आहे आणि त्यात चुक काहीच नाही. राष्ट्रपती राजवट ही तात्पुरती व घटनात्मक व्यवस्था असून विधानसभा अशा कालखंडात स्थगित ठेवलेली असते. तिच्या सदस्यांमध्ये बहूमताविषयी काही जुळवाजुळवी झाली तर नंतरही असे पक्षनेते जाऊन संख्याबळ राज्यपालांना दाखवू शकतात. त्यांचे समाधान झाले तर राष्ट्रपतींना अहवाल पाठवून नव्याने सरकार स्थापनेचा मार्ग खुला होऊ शकतो. त्यामुळे गडबडून जाण्याचे काहीही कारण नाही. पण हे समिकरण कधी जुळणार, हा प्रश्न सर्वाधिक नवनिर्वाचित आमदारांना भेडसावत असतो. कारण निवडून आलेले असले तरी ते अजून कायदेशीर व घटनात्मक पद्धतीने आमदार ठरू शकलेले नाहीत. तीच खरी समस्या आहे.

कुठल्याही विधानसभा लोकसभा निवडणूकीत जे नवे सदस्य निवडून येतात, त्यांचा सभागृहात शपथविधी पार पडत नाही, तोपर्यंत त्यांना लोकप्रतिनिधी म्हणून कुठलेही अधिकार मिळत नाहीत वा लाभांनाही ते वंचित असतात. सहाजिकच सध्या जे निवडून आलेले विविध पक्षाचे आमदार आहेत, त्यांची संख्या म्हणजे रोखीत रुपांतर होऊ शकणार नाही असा धनादेश आहे. त्यांना साधे पगार व भत्तेही मिळू शकणार नाहीत. शिवाय नवी विधानसभा परस्पर बरखास्त होईल काय, अशी टांगली तलवारही आहे. २००५ साली अशीच स्थिती बिहारमध्ये आलेली होती. त्रिशंकू विधानसभा निवडली गेलेली होती आणि एका बाजूला भाजपा व नितीशकुमार यांना बहूमत हुकलेले होते. दुसरीकडे सत्तेत असूनही राबडीदेवींनी बहूमत गमावले होते. म्हणजे लालू कॉग्रेसच्या आ्घाडीने बहूमत गमावलेले होते. या दोघांमध्ये रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाचा तिसरा गट उभा होता. त्यांच्यापाशी २९ आमदार होते आणि ते लालू-कॉग्रेस आघाडीला अडवून बसलेले होते. त्यांना राबडीदेवी मुख्यमंत्री म्हणून नको होत्या आणि लालू त्याला मान्यता द्यायला राजी नव्हते. तर पासवान नितीश भाजपाकडे येण्याची बिलकुल शक्यता नव्हती. म्हणून सत्तास्थापनेचा तिढा निर्माण झाला. काहीच समिकरण जुळेना म्हणून राज्यपाल बुटासिंग यांनी राष्ट्रपती राजवटीची शिफ़ारस केली आणि विधानसभा स्थगित अवस्थेत गेलेली होती.

ही स्थिती तब्बल तीन महिने चालू राहिली. त्यामुळे दोन्ही आघाड्यातले आमदार निश्चींत असले तरी पासवान यांच्या पक्षातले नवे आमदार मात्र रडकुंडीला आलेले होते. त्यामुळे दोन महिन्यातच त्यापैकी एक मोठा गट नितीशकुमारना भेटला आणि त्याने पासवानचा पक्ष सोडून नितीशकडे येण्याचा पवित्रा घेतला. त्याचा सुगावा लागताच लालुंनी राज्यपाल बुटासिंग यांना हाताशी धरले आणि रातोरात विधानसभा बरखास्तीचा निर्णय केंद्राने घेतला होता. राज्यपालांनी दिल्लीत बसूनच अहवाल लिहीला आणि तासाभरातच गृहमंत्री व पंतप्रधानांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रपती अब्दुल कलाम रशियात मास्कोला होते. त्यांना फ़ॅक्स पाठवून सही घेण्यात आली आणि बिहार विधानसभा एकाही बैठकीशिवाय बरखास्त झाली. आज महाराष्ट्राच्या विविध पक्षातील नवनिर्वाचित आमदारांसाठी तीच मोठी समस्या आहे आणि त्याची चिंता प्रत्येक पक्षाला करावी लागणार आहे. भरपूर वेळ आहे, या युक्तीवादाला म्हणूनच व्यवहारी अर्थ फ़ारसा नाही. कारण अशा चलबिचल झालेल्या आमदारांच्या निष्ठा डगमगू लागायला फ़ार वेळ लागत नाही. कारण सत्तास्थापना हा नेत्यांसाठी व पक्षांसाठी अहंकाराचा व प्रतिष्ठेचा विषय असला तरी सामान्य नवनिर्वाचित आमदारासाठी जीवनमरणाचा विषय असतो.

12 comments:

  1. 2014 सालीच शिवसेनेकडे मागण्या मान्य करून घ्यायला मस्त चान्स होता

    भले भ्रष्टवादी ने भाजप ला पाठिंबा दिला होता, तरीही भाजपला सुद्धा माहीत होते की त्या जोरावर जास्त काळ सरकार चालवता येणार नाही

    भाजप भ्रष्टवादी युती विरोधात रान उठवता आले असते, पण शिवसेनेचे विधानपरिषदेतील नेते सत्ते करता उतावीळ झाले होते

    तिकडेच शिवसेनेचा घात झाला

    ह्याही वेळेस, जरा चांगली मंत्रीपदे मिळवता आली असती पण अवसानघातकी पणा मुळे सर्व काही गमावून बसले

    ReplyDelete
  2. जर त्रिपक्षीय सरकार तीन पक्षांनी बनवलच तर ते लोकशाही सरकार असण्यापेक्षा सरंजामशाही सरकार होईल का असे वाटते! तीन घराण्यांनी (गांधी, पवार आणि ठाकरे) चालवलेली सत्ता कितपत योग्य आणि लोकाभिमुख असेल?

    ReplyDelete
  3. १. मला तरी असेच वाटतेय की, राकाँ व काँग्रेसच्या सहाय्याने मुख्यमंत्री पद मिळवायचे शिवसेनेने अगोदरच ठरवलेले असावे. अन्यथा निवडणूक निकाल लागण्याची प्रक्रिया चालू असतानाच, सर्व पर्याय खुले असण्याची घोषणा झाली नसती. ती घोषणा, एका प्रदीर्घ घटनेतील एक टप्पा असावी असेच माझे मत बनले. शिवसेनेच्या हातात कोणतीच हुकमाची पाने नव्हती हे आता कळल्यावर, शिवसेनेचा आक्रमकपणा पाहून माझे हे मत जास्त पक्क झालंय. मनसे शिवसेनेचा कट्टर शत्रू. त्यालापण शिवसेनेची मते जाताहेत हे जाणवल्यावर माझा हा संशय जास्तच बळावला. हे तपासायला पुण्याचे उदाहरण पुरेसे आहे.

    अजून लढवलेल्या जागांवरची टक्केवारी जाहीर झाली नाहीये. ती मिळाली असती तर जास्त पुराव्यानिशी माझे मत मांडता आले असते. असो.

    २. त्यामुळे जिथे भाजपाचा उमेदवार उभा होता तिथे शिवसेनेची बरीच मते राकाँ व काँग्रेसला गेली आहेत. कारण या दोघांचा निवडणूक निकालानंतर पाठिंबा मिळवायचा असेल तर त्यांचे आमदार निवडून आले पाहिजेत ही तर शिवसेनेचीच गरज बनते व भाजपाचे १४४ आमदार होऊ नयेत ही जबाबदारी ठरते. ह्या दोन्ही गोष्टी पवारसाहेबांच्या फायद्याच्या असल्याने त्यांनीही तोंडभरून आश्वासने दिली असणे शक्य आहे.

    ३. १९६७ पर्यंत काँग्रेसला विरोधकांची भिती वाटत नव्हती. पण लोहियांची विरोधी पक्षांची युती बनवून काँग्रेस विरोधात एकास एक उमेदवार देण्याची निती यशस्वी होते म्हणल्यावर, विरोधकांची एकजूट होऊ नये यासाठी डावपेच आखणे हे काँग्रेसचे मुख्य धोरण बनले.
    त्यानुसारच पवारसाहेब राजकारण करतात व त्यात ते सद्या तरी सर्वात प्रविण आहेत असे वाटते. यावरून महाराष्ट्रात युती भारी पडतेय म्हणल्यावर त्यात फूट पाडणे हेच महाआघाडीचे दिर्घकालीनधोरण असणार यात काही संशय नाही.
    थोडक्यात महाराष्ट्रातील निवडणूकांत काँग्रेस व राष्ट्रवादीने एकत्रीत लढणे व शिवसेना व भाजपाने वेगवेगळे लढणे हा एक मार्ग आहे जो महाआघाडीला सत्तेपर्यंत नेऊ शकतो.

    जर युती तुटली असेल तर ती फक्त ताणली जात राहील एवढेच फक्त पहावयाचे आहे व परत जोडली जाऊ नये यासाठी प्रयत्न करावयाचे आहेत. त्यासाठी शिवसेनेचे सरकार यावयाची जरूरी नाही.

    ४. परत निवडणुका झाल्या तर त्या शिवसेना व भाजपाने एकत्रीत लढवू नयेत एवढीच महाआघाडीची इच्छा किंवा धेय्य असावे असे वाटतेय. यासाठी प्रथम राज यांना बाजूला केले. या राजच्या त्रासातून शिवसेना खूप मागे खेचली गेली. बाळासाहेबांची पुण्याईही कामी येऊ शकली नाही. त्याचा फायदा त्यांना २०१४ पर्यंत झाला. फोडा व झोडा पध्दतीत नेहमी रागीट माणसाला हाताशी धरले जाते. कारण रागाच्या भरात त्याच्यावर कबजा मिळवणे सोपे असते. त्यामुळे यावेळी राऊतांद्वारे शिवसेनेला जाळ्यात पकडण्यात आलेय. राऊतांवरचा ऊध्वजींचा विश्वास हे हत्यार वापरले गेलंय.

    ReplyDelete
  4. ५. पण मोदी उदयानंतर सगळंच गणित फिसकटायला लागलेय. शिवसेनेच्या बळावर मोठे होण्याची अगतिकता भाजपाची राहिलेली नाही. भाजपचे वाढते बळ त्याचा पुरावा आहे. त्यामुळे परत निवडणुका झाल्या व शिवसेना वेगळी लढली तर त्यांची आघाडीला गेलेली मते परत फिरतील.

    भाजपकडे यावेळेस इच्छूक जास्त झाले होते व जागा २०१४ पेक्षा कमी झाल्या होत्या. पण परत निवडणुका झाल्यास, लढायच्या जागा १५६ वरून २८८ झाल्यामुळे बंडखोरांचा प्रश्न सुटेल. भाजपातील लाॅयल कार्यकर्ते त्यामुळे खुष झाल्याने पुढच्या निवडणुकीत मतदान टक्केवारी वाढेल, जी शहांची नेहमीचीच रणनिती आहे.

    ६. जर शिवसेनेने पुढील निवडणुकीत महाआघाडीशी हात मिळवणी केली तर भाजपाला ते हवेच असेल. ध्रुविकरण भाजपाला नेहमीच फायद्याचे ठरत आले आहे.

    काँग्रेस विरोधातील आपला अवकाश शिवसेना आपणहून सोडून देत असेल तर भाजपा नक्कीच खूष होईल. भाजपा यापध्दतीनेच मोठी होत आली आहे. मात्र यासाठी संधीची वाट बघत बसायला लागते व त्यासाठी खूप पेशन्स लागतो. तो मोदी शहांकडे नक्कीच आहे असे वाटते.

    ७. थोडक्यात, भाजपा, काँग्रेस व राकाँ यांचे पुढील धोरण निव्वळ वेळकाढूपणाचे असेल असे वाटते. यासाठी एखादी कोर्टकेस वगैरे सारखा उपाय योजणे हा मार्ग मस्त. जो काँग्रेस नेहमीच अवलंबते. फक्त कोणाकडे तरी बोट दाखवता आले की झाले.

    राऊतांनी बोलणी पवारांशी केली. ते आता पवारांकडे बोट दाखवत असतील. पवार बोट दाखवताहेत काँग्रेसकडे. काँग्रेस बोट दाखवतीय केरळ काँग्रेसकडे.

    ८. पण
    जास्तीचं काहीही न देता शिवसेना जवळ येत असेल तर भाजपा ही संधी साधेल असं वाटते.
    दीड दोन महिने फडवणीस संपले संपले असं वाटत असताना परत उभे राहतात, असं बऱ्याच वेळेस झालंय. यावेळेसही हे होऊशकते.
    यावेळेसही फडणवीस यांनी समारोपाच्या वेळी युतीच सरकार बनवेल असं म्हणूनच ते थांबले आहेत.

    ९. असंच होणं योग्य असेल. कारण राजकारणात डाव ओळखून प्रतिडाव टाकावा लागतो. बाकी सगळे गौण याचे भान राखावे लागते. जर युती तुटावी हा डाव असेल तर युती टिकवनणे हाच प्रतिडाव असतो. शिवसेना कशी वागली याबाबत सर्वसामान्य भाजपा कार्यकर्त्यांना येणारा राग नेत्यांना पोटात ठेवावा लागतो.

    भाजप पुढेमागे युती तोडेलही. पण ती सोयीची वेळ ते ठरवतील. पवार साहेबांनी त्यांच्या सोयीने निवडलेली वेळ भाजपाने साधणे शहाणपणाचे ठरणार नाही.

    अर्थात हे सर्व राजकारणी माझ्यापेक्षा नक्कीच हुषार असणार म्हणा. :)

    ReplyDelete
    Replies
    1. उत्तम विश्लेषण. पुष्कळ मुद्दे पटण्यासारखे आहेत.

      Delete
    2. छान कल्पना चालवली आहे!

      Delete
  5. धन्यवाद भाऊ! राष्ट्रपती राजवटीतील एक अलिखित पैलू मस्त सांगितलात! 👌👌👌

    ReplyDelete
  6. राफेल प्रकरण प्रकरणी काँग्रेस खोटे बोलत होती हे सुप्रीम कोर्टाच्या निकालावरून स्पष्ट होते आणि अशा खोट्या लोकांवर शिवसेना जात आहे याला काय म्हणावे

    ReplyDelete
  7. राफेल प्रकरणी काँग्रेस होते बोलत होते हे सुप्रीम कोर्टाच्या निकालावरून स्पष्ट होते आणि अशा खोट्या लोकांवर विश्वास ठेव ठेवून शिवसेना चालली आहे याला काय म्हणाल

    ReplyDelete
  8. भाऊ 2014 ला वेगळे लढून भाजपने 122 जागा मिळवल्या तर सेनेला 63 जागा होत्या आता या वेळी भाजप 105 तर सेना 56 जागी निवडून आले आहेत आणि बंडखोर धरून भाजपचे 120 आणि शिवसेना 64 असा आकडा होतो आहे म्हणजेच ही 2014 चीच स्थिती आहे, आणि 1990 पासून ते 2019 पर्यंत शिवसेना एकदाच 1995 मधे त्यांचा सर्वोच्च आकडा म्हणजे 73 जागा मिळवू शकली,याचाच अर्थ असा की महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना यांची मिळून हिंदुत्ववादी मतपेढी आहे भाजप जेंव्हा मोदी आणि शहा या दोन हिंदुत्ववादी नेत्यांच्या हातात गेल्यावर लागोपाठ दोनदा 100 चा आकडा पार करून गेला. आता शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेल्यामुळे सेनेला हिंदुत्ववादी मतदान होऊन मिळणाऱ्या सरासरी 60 जागा या रिकाम्या होणार आहेत, आणि भाजपला 2014 आणि 2019 मध्ये मिळालेल्या जागा आणि बहुमत या मधले अंतर 25 ते 35 जागा एवढे आहे, आतापर्यंत जागा वाटपात भाजपवर गुरगुरणारी शिवसेना जर काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेली तर 288 जागा तिघांमध्ये वाटून घ्यायला लागतील आणि भाजप एकटा 288 जागांवर निवडणूक लढवेल आणि हिंदुत्ववादी मतपेढीचा लाभार्थी एकटा भाजप होऊ शकेल, म्हणूनच कदाचित निकाल लागल्या दिवसापासून संजय राऊत भाजपला जी लाखोली वाहात आहेत त्यावर कोणतीही तडजोड करण्याचा प्रयत्न भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने केला नाही,शिवसेना स्वतःच्या पायानेच काँग्रेस राष्ट्रवादीच्या गोटात चालली जावी हीच तर अमित शहा यांची रणनीती नसेल?

    ReplyDelete