“The battlefield is a scene of constant chaos. The winner will be the one who controls that chaos, both his own and the enemies” - Napoleon Bonaparte
युद्धभूमी ही कायमस्वरूपी संघर्षाने व्यापलेली असते. त्यातल्या अराजकतेला जो निर्णायकरित्या नियंत्रीत करू शकतो, तोच विजेता असतो. ती अराजकता जशी शत्रू गोटातली असते तशीच ती आपल्याही गोटातली असू शकते. युद्धभूमीवर काहीही ठरल्या बरहुकूम होत नसते. युद्धाची घोषणा होईपर्यंत आणि युद्धाला तोंड लागण्यापर्यंत दोन्ही बाजूच्या सेना भले शिस्तीत हलणार्या वागणार्या असतात. पण युद्ध पेटल्यावर समोरचा जसा अंगावर येईल, त्यानुसारच त्याला प्रत्येक सैनिकाला तोंड द्यावे लागत असते आणि त्याला कुठला सेनापती त्या प्रसंगी मार्गदर्शन करू शकत नाही की मदतही करू शकत नाही. अशा सैनिकांच्या लढण्यातून जे अराजक उभे रहात असते, त्याला यशस्वीपणे नियंत्रित करणारा अखेरीस विजेता ठरत असतो. आधुनिक जमान्यात युद्धभूमी असे काही निश्चीत क्षेत्र राहिलेले नाही. नित्यजीवन हाताळणारी राजकीय सत्ता व तिच्या विरोधात कुरापती करणारा विरोधक, हे युद्धक्षेत्र असते आणि तिथे कायमचे अराजक माजलेले असते. म्हणूनच त्यात विजयी होऊ बघणारा वा राज्य करणारा, याला दोन्ही बाजू नियंत्रणाखाली ठेवण्याखेरीज पर्याय नसतो. त्यात जसे समोरून लढणारे विरोधक असतात, तसेच आपल्याच गोटातले मित्र सहकारीही दगाफ़टका करण्याची शक्यता लक्षात घेऊन नेतृत्व करावे लागत असते. दिर्घकाळ देशावर राज्य केलेल्या कॉग्रेस पक्षाला तसे नेतृत्व मिळत राहिले. म्हणून त्यांना आपले बस्तान बसवता आलेले होते. सत्ता खुप काळ उपभोगता आलेली होती. भाजपाला देशाची सत्ता दिर्घकाळ उपभोगायची व राखायची असेल, तर दोन्ही बाजूंना आवाक्यात ठेवण्याखेरीज पर्याय नाही. ते करताना मित्रपक्षांना खेळवणे भाग आहे, तसेच विरोधकांनाही आटोक्यात ठेवण्यातून सुटका नाही. लोकशाही ही अजब व्यवस्था आहे. तिथे सत्ता मिळवण्यासाठी लढाई करावी लागत नाही, तर कायमस्वरूपी लढाईच्या पवित्र्यातच सज्ज रहावे लागत असते. ही लढाई निवडणुकीपुरती मर्यादित नसते.
गेल्या विधानसभा निकालाचे आकडे जाहिर होत असताना मी एबीपी माझा वाहिनीवर होतो. तिथे तीसचाळीस पत्रकार विश्लेषकांचा गोतावळा गोळा करण्यात आला होता आणि दुपारी तीन वाजल्यानंतर एकूण निकालाचे चित्र स्पष्ट झालेले होते. भाजपाला बहूमत गाठता येणार नाही हे स्पष्ट झाले, तसेच शिवसेनेला सोबत घेऊनच त्यांना सरकार बनवावे चालवावे लागणार असल्याचेही साफ़ झाले. पण एकमेकांच्या उरावर बसल्यासारखा प्रचार निवडणूकीत केल्याने आलेली कटूता मिटणार कशी व कोणाच्या पुढाकाराने? दोन पक्षातला वाद होता, राज्यात मोठा भाऊ कोण आणि त्यासाठी युती मोडून दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढलेले होते. त्यात अर्वाच्य भाषाही वापरली गेल्याने कमालीची कटूता आलेली होती. म्हणूनच चित्र स्पष्ट झाल्यावर बहूमताची समिकरणे मांडण्याचा खेळ निकाल पुर्ण होण्यापुर्वीच सुरू झाली होती. सहाजिकच चॅनेलच्या चर्चेनेही तेच वळण घेतले. त्यावेळी माझ्या शेजारच्या खुर्चीत माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी बसलेले होते आणि त्यांनी मांडलेला तोडगा सर्वात उत्तम व योग्य होता. प्रचारातला रागलोभ संपला, मोठी संख्या आल्याने भाजपाच मोठा भाऊ ठरलेला आहे. त्यामुळे आता भाजपाने थोरल्या भावाप्रमाणेच मोठेपणा दाखवून शिवसेनेला सोबत आणायला पुढाकार घेतला पाहिजे. जागा कोणाच्याही कितीही असोत, युती म्हणून दोन्ही पक्षांना अर्धी अर्धी सत्तापदे व मुख्यमंत्रीपद भाजपाला असा प्रस्ताव भाजपानेच पुढे करावा. त्यातून कटूता संपेल आणि महिन्याभराचा सर्व विखारी भावही निकालात निघून जाईल; असे धर्माधिकारी यांनी सुचवले होते. अर्थात त्यांनी कुठल्या पक्षाला वा नेत्याला खाजगीत दिलेला हा सल्ला नव्हता. तर जाहिरपणे व्यक्त केलेले मतप्रदर्शन होते. तो भाजपाने तेव्हाच मनावर घेतला असता, तर पुढल्या काळात वा आता निवडणूक निकालानंतरही जी कटूता कायम राहिली आहे, ती कधीच संपून गेली असती. पण तसे होऊ शकले नाही. आजही होताना दिसत नाही.
अर्थात कुठल्याही घरात कुटुंबात संघटनेत सौहार्दाने माणसे जगत वागत असली, तर त्यात मीठाच खडा टाकण्यालाच शरद पवार राजकारण मानतात. त्यामुळे चॅनेल चर्चेत धर्माधिकारी समेटाचा फ़ॉर्म्युला मांडत असतानाच शरद पवार यांनी एकतर्फ़ी भाजपाला पाठींबा दिल्याची बातमी आली आणि समझोत्याला पाचर मारली गेली. ती अजून निघालेली नाही. आधीच मोठे यश मिळून मोठा भाऊ झालेल्या भाजपाला झिंग चढलेली असली तर नवल नव्हते. अशावेळी सरकार स्थापनेला जागा कमी पडण्याची जाणिव काहीशी बोथट होणारच. त्याच मस्तीत पवारांनी पाठीब्याची घोषणा केल्यावर भाजपाला स्वर्ग दोन बोटे उरला होता. त्यांनी शिवसेनेची त्याक्षणी पर्वा करण्याचे भान कुठले असायचे? त्यापेक्षा ती सेनेला जास्त खिजवण्याची संधी समजून भाजपा वागत गेला आणि एकट्याच्या बळावरच सरकार स्थापण्यापर्यंत त्याने मजल मारली. सहाजिकच दोन्ही पक्षातली कटूता अधिक वाढत गेली. राष्ट्रवादीचा पाठींबा कायमस्वरूपी स्थीर सरकार चालवण्यासाठी विश्वासार्ह पर्याय नाही, हे मुख्यमंत्रीपदी बसल्यावर फ़डणवीसांच्या लौकरच लक्षात आले आणि राष्ट्रवादीचा पाठींबा शाप ठरू शकतो याची जाणिवही झाली. म्हणून त्यांनी भाजपाच्या राष्ट्रीय नेतृत्वाला समजावून सेनेला सत्तेत सहभागी करून घेण्याच्या हालचाली सुरू केल्या. अर्थात ‘तीच खरी वेळ होती’ भाजपाला तडजोडीत नमवायची. पण सेनेच्या नेत्यांना व नेतृत्वाला सत्तेची इतकी घाई झाली होती, की मिळेल ते पदरात पाडून घेत सेना निमूट सत्तेत सहभागी झाली व पुढल्या काळात फ़रफ़टत गेली. आज जे हट्टाचे नाटक सेना रंगवते आहे, तेवढा संयम तेव्हा दाखवला असता तरी उद्धव ठाकरे यांना अधिकाराने मुख्यमंत्र्याला खेळवता आले असते. बाहेरून पाठींबा देऊन कायम फ़डणवीसांना तारेवरची कसरत करायला लावणे शक्य होते. पण त्याकरिता संयम व काही गमावण्याची तयारी लागते, तिथेच सेना तोकडी पडली व आजही त्यांना भाजपा म्हणून जुमानत नाही.
सत्तेसाठी किंवा लाभासाठी उतावळे झालेल्यांना मोठे जुगार खेळता येत नाहीत, किंवा जिंकताही येत नाहीत. तिथे सेनेची कोंडी झालेली आहे. जर तेव्हाच महत्वाची वा संख्येच्या प्रमाणात महत्वाची मंत्रालये मागून शिवसेना अडवून बसली असती, तर उत्तम सौदा शक्य झाला असता आणि पुढली पाच वर्षे नुसतेच हातपाय आपटण्यात घालवावी लागली नसती. ही झाली शिवसेनेची गफ़लत. भाजपाने मोठा भाऊ झाल्यावर मनाचा जो मोठेपणा दाखवायला हवा होता, तोही दाखवला नाही, ही बाब नेत्यांचा अहंकार सुखावणारी असली, तरी दोन पक्षातली कटूता वाढवण्याला सतत कारणीभूत झालेली होती. त्या कटुतेमुळेच आज दोन्ही पक्षांची युती झाली तरी ती मतांमध्ये परावर्तित होऊ शकली नाही. एकमेकांच्या विरोधात बंडखोर दोन्ही पक्षांनी उभे केले आणि एकमेकांचे पाय ओढण्यात किमान पन्नास जागा गमावल्या आहेत. कुठलीही मैत्री जमवायला वर्षानुवर्षे जातात. पण त्यात मीठाचा खडा पडला तर येणारी कटूता तडकाफ़डकी संपुष्टात येत नाही. दिसायला भाजपा नेत्यांची विधाने सेनेला हिणवणारी होती, पण व्यवहारात शिवसेनेच्या मतदारालाही दुखावणारी होती. त्याचा प्रभाव मतदानावर पडत असतो. म्हणून युती झाली तरी अनेक जागी भाजपाला हवी असलेली सेनेची मते मिळू शकली नाहीत आणि बंडखोरांकडे वळली. पण अन्य पक्षांकडे फ़ारसा मतदार वळला नाही. अन्यथा त्याचे प्रतिबिंब मतदानातही पडलेले दिसले असते. राजकीय पक्ष चालवताना जनमानसात आपली प्रतिमा उजळ ठेवण्याला खुप महत्व असते. त्याचे भान कधीच ठेवले नाही, म्हणून सहा दशके राजकारणात खपूनही पवारांची विश्वासार्हता शुन्य आहे. इडीचा खेळ वा पावसात भिजूनही त्यांना सहानुभूतीची मते मिळू शकली नाहीत. युतीतल्या बेबनावाचा लाभ म्हणून त्यांच्या जागा वाढल्या आहेत. मुळात युतीपक्षांनी आपणच आपल्या पायावर कुर्हाड मारून घेतलेली आहे.
आणखी एक मोठी भाजपाने केलेली चुक म्हणजे आपल्याच निष्ठावान कार्यकर्त्यांमुळे इथपर्यंत पोहोचलो, याचेही नेतृत्वाला आज भान उरलेले नाही. अधिकच्या जागा किंवा बहूमत गाठण्याच्या घाईने अनेक निष्ठावानांना दुखावण्यापर्यंत नेतृत्वाची मजल गेलेली आहे. उदाहरणार्थ एकनाथ खडसे, विनोद तावडे, बावनकुळे अशा जुन्या व निष्ठावंत कार्यकर्ते नेत्यांना मिळाली अपमानास्पद वागणूक नजरेत भरणारी होती., मेधा कुलकर्णी यांना तिकीट नाकारून चंद्रकांत पाटील यांना कोथरूड येथे आणण्यामागचे राजकारण कोणालाही समजू शकते. राहुल गांधींना केरळात वायनाड येथून लढवण्यामागे अमेठी धोक्यात असल्याचेच कारण होते आणि ते जगजाहिर होते. पण त्याची सज्जता कशी करण्यात आली? तिथल्या स्थानिक पक्ष संघटनेनेच राहुलना तिथे आणण्याचा ठराव केला आणि जणु पक्षाच्या आदेशान्वये राहुल वायनाडला आणले गेल्याचा देखावा उभा करण्यात आला, कोणी रुसले नाही वा बंड पुकारले नाही. पण खडसे असोत वा मेधा कुलकर्णी असोत, त्यांना अंधारात ठेवून अपमानित करण्याचे काय कारण होते? इतकी वर्षे पक्षात खर्ची घालून ज्येष्ठ झालेल्या नेत्यांनाही आपल्याला वगळल्याची माहिती माध्यमातून वा बातमीतून समजण्याचे काय कारण होते? त्यांना उमेदवारी नाकारली गेल्यावर माध्यमात कल्लोळ उडणार, हे नेतृत्वाला समजत नव्हते काय? अशा प्रश्नांच्या सरबत्तीला आपलेच हे ज्येष्ठ नेते समाधानकारक उत्तर देऊ शकणार नाहीत, हे समजू शकत नसेल ते नेतृत्व कसले? पहिली यादी दुसरी यादी अशा प्रतिक्षेत ठेवून त्यांना जगासमोर अपमानित करण्यात आले नाही काय? नकार मिळाल्यावर बंड करण्याइतकी या नेत्यांची पक्षनिष्ठा सैल होती काय? नसेल तर त्यांना विश्वासात घेऊन नकार आधीच कशाला कळवण्यात आला नव्हता? तसे झाल्यास त्यांची प्रतिष्ठा कायम राहिली असती आणि पक्षाची प्रतिष्ठाही वाढलीच असती. पण एकूण अशा आपल्याच ज्येष्ठ नेत्यांना कार्यकर्त्यांना अपमानित करण्याची मोठी चुक नेतृत्व करीत गेले. ते सामान्य लोकांच्या नजरेत भरणारे होते.
भाजपा हा शिस्तीचा पक्ष अशी त्याची आजवर असलेली ओळख, या निवडणूकीने पुसली गेली आहे. कारण १९६०-८० पर्यंत कॉग्रेसमध्ये उमेदवारी नाकारल्यावर संतप्त नेते कार्यकर्ते बंडाळी करीत, त्याचीच पुनरावृत्ती भाजपामध्ये दिसून आली. बंडखोरी होण्याच्या भयाने उमेदवारी अर्ज भरायची शेवटची तारीख उलटली तरी भाजपाला आपले उमेदवार जाहिर करता येत नव्हते, की मित्रपक्षांना दिलेल्या जागांचा तपशील जाहिर करता आला नव्हता. कॉग्रेसचे अनेक नेते दिल्लीत ठाण माडून आपल्याला उमेदवारी मिळवून माघारी यायचे. त्यापेक्षा भाजपाशी अवस्था किती वेगळी होती? आपल्याला कोणी हरवू शकत नाही, म्हणून त्या दोनतीन दशकात कॉग्रेस श्रेष्ठींना जी मस्ती चढलेली होती, त्याच्यासमोर स्थानिक पक्ष संघटना व नेतृत्व दुबळे होऊन गेले होते. त्यापेक्षा भाजपाचे उमेदवारी वाटप भिन्न होते काय? भ्रष्टाचार हा फ़क्त पैसे खाण्यातून वा कारभारातून होत नाही. वागण्यातही भ्रष्टाचार लोकांना आवडत नाही. राजकारणात अनेक तडजोडी कराव्या लागतात. पण तडजोडी म्हणजेच राजकारण नसते. मागल्या पाच वर्षात भाजपाने काय कारभार केला, त्यापेक्षाही भाजपाचे रुपांतर क्रमाक्रमाने कॉग्रेस संस्कृतीत होत असल्याचा लोकांचा अनुभव त्रासदायक होता. जेव्हा वेगळ्या अपेक्षांनी लोक तुम्हाला अगत्याने मते देतात व सत्तेपर्यंत आणतात, तेव्हा अपेक्षाभंग फ़क्त कारभारापुरता नसतो. तो वागण्याच्या बाबतीतही असतो. आपल्याच नेत्यांना देण्यात आलेली अपमानास्पद वागणूक व निष्ठावान कार्यकर्त्यांना दुखावणे, पक्षाचा अंतर्गत मानला नसतो. अपेक्षा बाळगणार्या मतदाराचाही मामला होऊन जात असतो. त्यात भाजपा व त्याचे नेतृरत्व तोकडे पडले, हे मान्य करावे लागेल. गैरकारभारामुळे भाजपाची मते व जागा घटलेल्या नाहीत. पण असल्या विखुरलेपणाने आपसात लढण्याची वेळ आणल्याने भाजपावर ही पाळी आली. त्याला नेतृत्व जबाबदार आहे. नेतृत्व कसे असावे? त्याने काय करावे? नेपोलियन तेच म्हणतो.
पाच वर्षापुर्वी भाजपाने मोठा भाऊ म्हणून आपल्याला निवडणूकीतील निकालातून सिद्ध केले. त्यानंतर शिवसेनेला सोबत घेऊन सत्ता राबवताना निदान आपल्या गोटात शांतता राहिल, अशी काही तजवीज करायला हवी होती. ती केली नाही आणि आपलाच एकट्याचा विजय असल्याच्या थाटात कारभाराला आरंभ केला, ही मुलत: चुक होती. त्यात शिवसेनेला सहभागी करून घेतल्यावर तिच्याकडून आपल्याला अडथळे निर्माण केले जाणार नाहीत, याची काळजी घ्यायला हवी होती. तिथे हलगर्जॊपणा झाला आणि जेव्हा प्रत्यक्ष निवडणूकीची तुंबळ लढाई सुरू झाली, तिथेसुद्धा शत्रूपक्षच नव्हेतर मित्रपक्षातही अराजक होते. त्याच्याही पलिकडे खुद्द भाजपाच्याच गोटात भयंकर अराजक माजलेले होते. अशा अराजकात भाजपाचे नेतृत्व आपला आवाका गमावून बसले आणि म्हणून निकालानंतरचे अराजकही त्यांना आवरता आलेले नाही. काही गोष्टी गोडीगुलाबीने साध्य केल्या जात असतात. तिथे अकारण शक्तीचा प्रयोग वा उपयोग अपायकारक ठरत असतो. त्याचे परिणाम भोगण्यातून सुटका नसते. आज हा लेख लिहीताना निकाल लागून सहा दिवस उलटून गेलेले आहेत आणि बहूमत संपादन केलेल्या शिवसेना भाजपा युतीला अजून सरकारची स्थापना करण्याविषयी कुठलेही ठाम पाऊल उचलता आलेले नाही. मजेची गोष्ट म्हणजे इथे शत्रू गोटातले वा विरोधातले आव्हानच समोर उभे नाही. गडबड माजलेली आहे, ती सत्ताधार्याच्या गोटातच माजली आहे. नुसती गडबड नाही. तर अराजक सादृष चित्र आहे. त्यातून नेतृत्वातील त्रुटीच समोर येतात. जी समस्या आज सरकार स्थापनेत उभी राहिली आहे, ती दोनतीन महिने आधीच समजूतदारपणे निकालात काढली जाणेही शक्य होते. समस्या पुढे ढकलली वा टाळाटाळ केली म्हणून संपत नाही. ती अधिक अक्राळविक्राळ होऊन सामोरी येत असते आणि भेडसावतही असते. निकालानंतरची जी राजकीय परिस्थिती उत्पन्न झालेली आहे, त्याचे एकमेव कारण भाजपाच्या नेतृत्वाने प्रदर्शित केलेली अपरिपक्वताच आहे. नेपोलियनच्या एका वाक्यातला सामावलेला आशय त्यांनी समजून घेतला तर दिर्घकाळ सत्ता राबवता येईल. अन्यथा कुठलीही मोठी सत्ता आळवावरचे पाणीच असते.
Correct
ReplyDeleteनिदान महाराष्ट्रात तरी भाजप घसरणीला लागलाय . २०१४पेक्षाही जास्त तयारी, पैसा आणि फडणवीसांना दिलेलं एकछत्री नेतृत्वही पक्षाला तारू शकलेलं नाही . युती नसती तर चित्र आणखी भयाण असतं . भाजप समर्थकांना पटणारं नसलं तरी आजचं चित्र हेच आहे . जर यातन मार्ग नाही निघाला तर भाजपचे आजवरचे डाव नुसते उलटणार नाहीत तर पक्षाला परतीच्या मार्गाला लावणार .
ReplyDeleteभाजपला लवकरच मार्ग शोधावा लागणार .
एक नंबर भाऊ. भक्तांचे डोळे उघडतील ही अपेक्षा.
ReplyDelete"काही गोष्टी गोडीगुलाबीने साध्य केल्या जात असतात. तिथे अकारण शक्तीचा प्रयोग वा उपयोग अपायकारक ठरत असतो"
ReplyDelete100% मान्य...
तुमच्या पुढील १५ वर्षातील भावी पंतप्रधानाच्या कमरेचा ओच्या काढून धोतर शिवसेनेने फेडलं आहे. जनतेने पूर्णतया नाकारलेल्या भाजपला आता सेनेने घरी पाठवलेले आहे. आता पूर्ण जनाधार असलेले शिवसेनेचे त्रिपक्षी सरकार स्थापन झाले की महाराष्ट्रातील जनतेला आधार मिळेल, स्थिरता प्राप्त होईल! शिवसेनेसारख्या प्रामाणिक, कामदार, सचोटीच्या पक्षाला समर्थन देऊ या.
ReplyDeleteसावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत सेना गेली तर आयुष्यभर सेनेला मत नाही
Deleteशिवसेना आणि प्रामाणिक, कामदार, सचोटी हे विरूद्धार्थी शब्द आहेत..
DeleteEven now BJP must show large hearted ness and finalize d formula with SS.Let SS reject BJPs proposal.Common voters will punish d guilty definitely.
ReplyDeleteभाऊ 2014 मध्ये युती तुटली तरी भाजपने जाहीर केले होते की आम्ही सेनेवर टीका करणार नाही, सेनेने मात्र अफझलखान आणि बरेच काही बोलून झाले, त्यानानंतरही मंत्रिमंडळात सहभागी झाल्यावर देखील सामनामध्ये तेंव्हापासून ते आजपर्यंत जहरी टीका चालूच आहे, स्वतः सरकारचे घटक असूनही त्याच सरकारला झोडपून काढायचे यात कोणता शहाणपणा आहे माहिती नाही, भाऊ सेनेचा प्रश्न भाजप हा नाहीच आहे, प्रश्न आहे तो दरबारी नेते, नारायण राणे, गणेश नाईक, भास्कर जाधव हे शिलेदार देखील याच दरबारी राजकारणाला कंटाळून सेना सोडून गेले, 1990 मध्ये सेनेने 51 जागा जिंकल्या होत्या आणि भाजपने 42 जागा, आज 2014 आणि 2019 दोन्ही वेळा भाजप 100 जागा पार करून गेला आहे आणि सेना तिथेच आहे, आपण निवडणूक निकाल लागल्यावर 40 वर्षे एकाच वर्गात असा पवारांवर लेख लिहिला होता तो सेनेलाही तसाच लागू आहे, अशा स्थितीत आम्ही काहीच न करता सत्तेत सहभागी होऊ रोज मुखपत्रातून त्याच सरकारला शिव्या घालू,50 टक्के भागीदारी द्या, मुख्यमंत्री पद द्या, अशी अरेरावी भाजप सारखा राष्ट्रीय पक्ष कशासाठी सहन करेल हा देखील प्रश्नच आहे. उद्या भाजपची जिरवायची म्हणून सेना काँग्रेस राष्ट्रवादी कडे गेलीच असली थेरं हे पक्ष तरी सहन करतील का?
ReplyDeleteशिवसेना भाजप वगळता कुणाकडेही गेली तर तिची अवस्था कर्नाटकमधल्या कुमारस्वामींसारखी होईल याबद्दल तिळमात्र शंका नाही.. सामनातल्या अग्रलेखांना काडीमात्र किंमत नसेल..
Deleteभाऊराव,
ReplyDeleteया लेखाच्या पार्श्वभूमीवर एक निरीक्षण नोंदवावं सं वाटतं. ते म्हणजे सेनेने युती चटकन आढेवेढे न घेता केली. उद्धव ठाकऱ्यांची इच्छा होती की अमित शहांनी मातोश्रीवर यावं. त्यानुसार ते आले आणि अवघ्या काही तासांत युतीची वार्ता झळकली. भले मागची चार वर्षं भाजपला शिव्याशाप दिले असतील, पण महत्त्वाची वेळ येताच कृती झपाझप केली. याउलट भाजपची चालढकल, निर्णयलकवा जास्त दिसतो आहे. त्यातंच पक्षांतर्गत सुसंवादाचा अभाव आता माझ्यासारख्या त्रयस्थाच्याही लक्षांत येऊ लागलाय. हे सुचिन्ह नाही. फडणविसांना लोकांसमोर येऊन काहीतरी भाष्य व/वा घोषणा करावी लागेल.
आपला नम्र,
-गामा पैलवान
शहाण्या ला शब्दाचा मार
ReplyDeleteBhau, Ekadam perfect.
ReplyDeleteनाही पटला लेख, भाऊ. सेनेनीच ही वेळ भाजप वर आणलेली आहे. असं सर्वसाधारण पणे वाटतयं तर आता सेना भोगेल
ReplyDeleteभाजपच्या निवडणुकीतल्या पराभवाचे अतिशय योग्य विश्लेषण ।।
ReplyDelete150 मधून 105 हा पराभव? आणि 128मधून 54 की 55 हा विजय?
Deleteगणित समजले नाही.भाजप समर्थक ला भक्त म्हणता मग सेने चे समर्थक काय मतिमंद का?
भाऊ पाकिस्तान मधे बर्याच उलथापालथ चालु आहे त्याच्या सद्य परिस्थिती बद्दल काही लिहा.
ReplyDeleteभाऊ सही विश्लेषण..
ReplyDeleteयात भाजपला 2014 साली बॅक टु बॅक लोकसभा व विधान सभे मध्ये मिळालेल्या विजयाची झिंग होती.
व शतप्रतीशत भाजप ही घोषणा ही त्यांच्या झिंगेची ग्वाही होती... याला देश पातळी वरिल नेतृत्वाची फुस होती म्हणुन युती दुभंगली..
यातील कटुता कायम राहिली आहे..
परंतु भाजप भारत देश जाती प्रांत धर्म भाषा उच्च निच, शेतकरी कामगार व भांडवलदार, शिक्षीत अशिक्षीत यावर दुभंगलेला देश आहे.. व यातच कोणाचे ही अती छान सुखकारक चाललेले बघवत नाही यातच भ्रष्टाचार व सहज विश्वास घात करण्याची शापीत वृत्ती हे विसरतो आहे... एका सुखासीनते मध्ये एक दोन पिढ्या सहज आराजक परिस्थिती निर्माण करुन ठेवते..( पहा स्वातंत्र्याच्यानतरची 7 दशके जवळपास दोन पिढ्या गुरुदत्त राज कपुर ते अमिताभ तलत महमुद ते मुकश किशोर लता कुमार सानु पुल वपु भिमसेन फडके अरुण दाते यात मश्गुल राहिला.. व याचाच फायदा भ्रष्टाचारी संधी साधु यांनी घेतला.. व राजकारणाचा गजकर्ण नव्हे सोरासीस झाला.. व महारोग्या प्रमाणे दुर्लक्षित राहिले.. यातुनच देशाची सद्य परिस्थिती निर्माण झाली आहे..
सहज आजुबाजुला पाहिलेत तर एके काळात देशाला खंबीर नेतृत्व देणारा व देश कार्याला वाहुन घेतलेला मध्यमवर्गीय आज ही मोदी सारख्या वर विश्वास दाखवत नाही व आपल्या केवळ स्वार्थी व कोत्या वृत्ती मुळे विरोधी बोलत असतो.. व शुल्लक कारणाने शिव्या घालत असतो.. पण पर्याय काय हे विचारले तर थातुर मातुर ऊत्तर देउन परत नामा निराळा होतो.. परंतु हलक्या कानाची अशिक्षीत जनता सहज दिशाभूल होते..
शरद पवारांचे भिजते भाषण पण सहानुभूती देत राजकीय सारीपाट बदलते...
अशाच भोळी भाबडा वर्गाचा फायदा घेण्यासाठी अनेक नेतृत्व संपवली गेली..
महाराष्ट्रात शरद पवार यांचे राजकारण जो पर्यंत चालू आहे तो पर्यंत हे असेच चालु रहाणार...
याच मुळे महाराष्ट्रात गेली पन्नास वर्षे फडणीस व्यतीरीक्त कोणत्याही मुख्यमंत्र्याने पाच साल राज्य केले नाही व करु दिले नाही..
आता परत तिच परिस्थिती आहे...
जनता जनार्दन हा सहज अनेक अन्याय व छोट्या मोठ्या घटना अनुभव सहज विसरतो..
व आठवण करुन देणारे पत्रकार, पुरोगामी, लेखक, सामाजीक कार्यकर्ता हे पण सहज विकले जातात.. व ईम्पार्शीलीटी व देश समाज हितासाठी काम करत नाहीत..
यामुळे लोकशाही ही याच झोक्यावर हिंदोळत रहात आली आहे.. व हे पुढे शेकडो वर्षे चालेल.. असेच वाटते...
एकेएस
एकदा मत देऊन झाले की मतदारराजाची अवस्था म्हाताऱ्या लिअर सारखी किंवा आपल्या सर्वांच्या परिचयाच्या ' नटसम्राट नाटकातील ' गणपतराव बेलवलकर यांच्यासारखी होते . आता ज्यांना आपण मत दिले आणि (किंवा दिले नाही तरी ) निवडून आले ते काय करतात ते असहाय्यपणे पाहत राहणे एवढेच त्याच्या नशिबी उरते . "घर देता का घर 'च्या चालीवर ' सरकार बनवता का सरकार 'असे म्हणत राहण्यापलीकडे लोक काही करू शकत नाहीत .मुख्यमंत्रीपद हे ध्रुवपदासारखे अढळ नाही उलट ते मिळाल्यावर दुसऱ्या कोणाला तर ते मिळणार नाही ना अशी कायम भीती असलेल्या इंद्रासारखी आपली अवस्था करून टाकणारे ते पद आहे हे माहित असूनही ते निदान अडीच वर्षे तरी आपल्याला मिळावे यासाठी जीव टाकणाऱ्यांकडे पाहून " कृष्णराव आम्हाला एक चान्स द्या की ." या गेल्या पिढीत अश्लील म्हणून विवाद्य ठरलेल्या आचार्य अत्रेलिखित संवादाची आठवण येते .
ReplyDeleteभाऊ, जशा आपण भाजपने केलेल्या चुका दाखवल्या आहेत तश्या सेनेने केलेल्या चुकांवर सुद्धा एक लेख लिहा, कारण सत्तेत असताना कायम विरोधी पक्षा पेक्षाही जहरी टीका सामना मधून होत होती. अशी वारंवार केलेली टीका कुठल्या मित्राला सहन होईल? की मोठा भाऊ म्हणून कायमच नमते घेतलं पाहिजे असं आपलं मत आहे?
ReplyDeleteभाजपाची या वेळची नेमकी रणनीती समजून येत नाही. ज्या तर्हेने तिकीट वाटप झाले, प्रचार सभा झाल्या, ऐन निवडणूकीआधी झालेल्या पुरपरिस्थितीची हाताळणी आणि निवडणूक निकालानंतरचे वर्तन. कशाचा ताळमेळ नाही.
ReplyDeleteSenesobat uti karne hich mulat chuk hoti.jyanchi layki nahi asha lokana dokyawar chadhvun ghetlyawar dusre kay honar hote?senela tichi jaga dakhavnyache evdhe chhan thikan dusre navhte.pan bjpla kalalech nahi.atat asangashi sang ani pranashi gath .bhoga ata.
ReplyDeleteजो बारामती वर विसंबला , त्याचा कार्यभाग संपला .
ReplyDeleteहे सेना, भाजप ला समजायला हवे होते.
भाऊ, बाळासाहेबांपासून तर फडतूस राऊतापर्यंत सर्वांनीच भाजपाला कायम हिणवण्याचेच काम केले. त्यात संघालाही अनेकवेळा विनाकारण ओढले. हासुद्धा भाजपाचाच दोष आहे का ? औकात नसताना सेनाप्रमुख ज्या मागण्या करतात त्या कशाच्या बळावर ?
ReplyDeleteअनिरुध्द गरगटेंच विश्लेषण चपखल !
ReplyDelete१) निवडणुकीत भाजपच्या चुका सांगितल्या आहेत २)पण निवडणूक आधी, युती करणाऱ्या शिवसेना चुका सांगितल्या नाहीत. अनिरुद्ध गरगटे यांनी सविस्तर लिहिलेले योग्य वाटते.३) लोकशाही मध्ये मतांसाठी कार्यकर्ते व लोकांत जावे लागते हा फरक आहे. असो.wait and watch
ReplyDelete