शुक्रवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणविस यांनी आपल्या पदाचा राजिनामा राज्यपालांना सादर केला आणि एकप्रकारे सत्तास्थापनेच्या त्या रंगलेल्या खेळातून आपली सुटका करून घेतली आहे. कारण विधानसभेच्या निवडणुका लढवताना, त्यांचा भाजपा एकटाच मतदाराला सामोरा गेलेला नव्हता. त्यांनी शिवसेनेशी युती केलेली होती आणि त्या युतीला मतदाराने बहूमत दिलेले होते. तरी दोघांची मिळून असलेली विधानसभेतील संख्या घटलेली होती. त्यामुळे प्रचलीत पद्धतीनुसार त्यांनी राज्यपालांकडे जाऊन सत्तेसाठी दावा करायला हवा होता. पण त्यांच्यापाशी भाजपाचे एकट्याचे बहूमत नव्हते आणि महायुतीतील शिवसेना त्यांच्यासमवेत राज्यपालांकडे यायला राजी नव्हती. परिणामी त्या दिशेने हालचाली होतील म्हणून फ़डणवीस यांना प्रतिक्षा करावी लागली. एकीकडे शिवसेनेचे पक्षप्रमुख असलेले उद्धव ठाकरे त्यांच्या हाकेला उत्तर देत नव्हते आणि दुसर्या बाजूला सेनेचे प्रवक्ते मात्र सेनेचाच मुख्यमंत्री मान्य असेल तर युती; असा हट्ट जाहिरपणे सांगत होते. त्यामुळे युतीला बहूमत मिळूनही सत्तेचा दावा शक्य झाला नाही आणि जुन्या विधानसभेची मुदत संपत असल्याचे फ़डणवीस यांना आपल्या पदाचा राजिनामा द्यावा लागला आहे. त्यामुळे आता सर्वाधिकार राज्यपालांकडे गेलेले असून, फ़डणवीस हे पुढली प्रशासकीय घटनात्मक व्यवस्था होण्यापर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री झालेले आहेत. पण असेच दिर्घकाळ चालू शकत नाही. निकालानंतर महिनाभर सरकार स्थापन झाले नाही वा कोणी जबाबदारी घ्यायला पुढे आला नाही, तर राज्यपालांना केंद्राला पर्यायी व्यवस्था करण्यासाठी शिफ़ारस द्यावी लागेल. त्या व्यवस्थेला राष्ट्रपती राजवट असे म्हटले जाते. ती टाळायची असेल तर निवडून आलेल्या पक्षांनी हालचाली कराव्या लागतात. बहूमताचा दावा करून पुढे यावे लागते. फ़डणवीस यांनी राजिनामा दिल्यामुळे त्यात आपली असमर्थता अप्रत्यक्षपणे व्यक्त केलेली आहे. म्हणजेच अन्य कुणाला तरी पुढाकार घ्यावा लागेल.
निकाल लागल्यापासून शिवसेनेचे प्रवक्ते आपलाच मुख्यमंत्री होणार असा दावा करीत राहिले आहेत आणि आपल्यापाशी १७० आमदारांची संख्या असल्याचेही त्यांनी म्हटलेले आहे. शिवाय संख्याबळ बघता शिवसेना दुसर्या क्रमांकाचा पक्ष आहे. त्याला मुख्यमंत्रीपद भाजपा देणार नसेल तर अन्य पक्षांच्या मदतीने त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. कॉग्रेस व राष्ट्रवादी अशा दोन पक्षांची संख्या बघता शिवसेनेसह बहूमताचा आकडा सिद्ध होऊ शकतो. पण तसे करायचे तर सेनेला महायुती सोडल्याचे जाहिर करावे लागेल आणि अन्य दोन पक्षांच्या आमदारांनी सेनेला पाठींबा देत असल्याचे लेखी स्वरुपात जाहिर करावे लागेल. तरच राज्यपाल त्या दिशेने निर्णय घेऊ शकतील. पत्रकार परिषदेत वा वाहिन्यांवर आकड्यांचे दावे ग्राह्य मानून राज्यपाल कुठला निर्णय घेत नसतात. त्यांना समोर कागदोपत्री दावा विचारात घ्यावा लागतो. थोडक्यात फ़डणवीस यांनी राजिनामा देऊन या गुंत्यातून आपल्याला सोडवून घेतले आहे. पर्यायाने दोन आठवडे मुख्यमंत्रीपदावर जाहिर दावे करणार्या शिवसेनेच्या गळ्यात सत्तास्थापना करण्याचे घोंगडे घातलेले आहे. ते गणित कसे जमवायचे व राज्यपालांसमोर कसे मांडायचे, हे शिवसेनेच्या चाणक्यांची जबाबदारी आहे. त्यासाठी आकडे कॉग्रेस व राष्ट्रवादी यांच्या गोटात उपलब्ध आहेत. पण त्यांची मान्यता सहजगत्या मिळणारी नाही. त्याही पक्षांना आपल्या राजकीय भूमिका व भविष्याकडे पाठ फ़िरवून पुढाकार घेता येत नाही. जितके पत्रकार परिषदेत बोलणे सोपे असते, तितले व्यवहारी राजकारणातले पाऊल उचलणे सोपे नसते. म्हणूनच सवाल भाजपा वा फ़डणवीस नाही, तर कोण व कुठली आघाडी-पक्ष याचे उत्तर आता शिवसेनेला वा त्यांच्या मित्रांना द्यावे लागणार आहे. जे कोणी मित्र अज्ञात आहेत, त्यांना समोर येऊन सेने़चा पुरस्कार करावा लागणार आहे. तो त्यांनी कसा करावा किंवा सेनेने त्याचे गणित कसे जमवावे, हा देवेंद्र फ़डणवीस यांची डोकेदुखी नाही.
सत्तेसाठी विचारधारा वा तत्वज्ञानाला तिलांजली देण्याचा इतिहास आपल्या देशात नवा नाही. कुठल्याही विचारांचे लोक कुठल्याही पक्षात दाखल होतात आणि नवी भाषा बोलू लागतात. परस्पर विरोधी विचारांचे पक्ष सत्तेची समिकरणे जुळवताना एकत्र येतात. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉग्रेस यांनी सत्तेसाठी आघाडी केली; म्हणून काही बिघडत नाही. मात्र अशा परस्पर विरोधी भूमिकांचे पक्ष एकत्र येण्याने तात्काळ सत्तेची खुर्ची मिळत असली, तरी अनेक वेदनादायक तडजोडी कराव्या लागतात. त्यातून होणार्या जखमा भरायला प्रचंड कालावधी लागत असतो. म्हणून तशी भाजपाला पर्यायी आघाडी होणार नाही, अशा भ्रमात कोणीही रहायचे कारण नाही. मात्र आघाडी करणार्यांनी आपल्याला भविष्यात मोजाव्या लागणार्या किंमतीचा विचार करणे आवश्यक असते. कारण आज शिव्याशाप देणारे किंवा टाळ्या पिटणारे, ती किंमत मोजणार नसतात. जे आघाडी करतात, त्यांनाच त्याची भरपाई करावी लागत असते. शिवसेना व दोन्ही कॉग्रेस यांच्यात अनेक वैचारिक राजकीय विरोधाभास आहेत आणि त्यांचा मतदारही ठराविक भूमिकेतून पाठीशी उभा राहिलेला असतो. त्याला नाराज किंवा विचलीत करून डावपेच खेळण्यातून जुगार साध्य होत असला, तरी किंमतीचा अंदाज तात्काळ येत नाही. उदाहरणार्थ सेनेला एनडीए आघाडीतून बाहेर पडावे लागेल. कॉग्रेसलाही सेनेच्या जहाल भूमिकांचे समर्थन करावे लागेल. राष्ट्रवादीला आपल्या पुरोगामीत्वाच्या भूमिका शिवसेनेच्या गळी उतरवाव्या लागतील. यापैकी काहीही भाजपाला करावे लागणार नाही. कागदावर संख्यांची बेरीज वजाबाकी जितकी सोपी असते, तितकी व्यवहारी राजकारणातले अंकगणित सहज सोडवता येत नसते. अनेकदा ३+३ मिळून पाच होतात किंवा सातआठही होऊ शकतात. पण सहा नक्कीच होत नाहीत. शिवाय आज मुख्यमंत्री होणे म्हणजे काटेरी मुकूट डोक्यावर चढवून घेणे आहे. त्याचे कुणाला भान आहे काय? की त्यातून सुटल्याचा आनंद देवेंद्रना झालेला असेल?
याक्षणी अवघा महाराष्ट्र अतिवृष्टी व महापुराने बेजार झालेला आहे. अवकाळी बेमोसमी पावसाने हाताशी आलेली पिके बुडवली आहे. सहाजिकच जवळपास अर्धी लोकसंख्या सरकारने आपले पुनर्वसन करावे किंवा मोठी भरपाई द्यावी; म्हणून रांग लावून उभी आहे. भाजपा वगळता बांधावर गेलेल्या प्रत्येक पक्षाने एकरी पंचवीस हजारापासून लाखापर्यंतचे आकडे शेतकर्यांच्या तोंडावर फ़ेकून झालेले आहे. पण ते फ़ेकताना त्यापैकी कोणी आपणच उद्या सत्ता हाती घेणार, अशा समजुतीमध्ये नव्हता. सहाजिकच मोठे आकडे फ़ेकण्यात काय अडचण होती? पण त्यापैकीच आता कोणी मुख्यमंत्री होणार वा सरकार चालवणार असेल, तर त्यानेच बांधावर जाऊन मांडलेले हजारो वा लाखोचे वादे पुर्ण करावे लागणार ना? त्याची एकत्रित किंमत किती होते? राज्याच्या तिजोरीत तितकी रक्कम आहे काय? नसेल तर केंद्राकडून काय मिळू शकते? कोण मिळवू शकतो, असे मुद्दे निकराचे होऊन जातात. भाजपाला सत्तेपासून बाजूला ठेवण्यात पुढाकार घेतलेल्या पक्षांना व नेत्यांना, भाजपाचेच केंद्रातील सरकार कितीसे मुक्तहस्ते मदत करू शकेल? मुद्दा भाजपाला हिणवण्याचा नसून दिवाळखोरीत गेलेल्या दोनतीन कोटी शेतकरी व ग्रामिण जनतेच्या अस्तित्वाचा आहे. त्यांना भरपाई कुठला पक्ष देतो, याच्याही कर्तव्य नसून भरपाई महत्वाची आहे. त्यात जो मुख्यमंत्री होईल, त्याला पुरग्रस्तांच्या तोफ़ेला सामोरे जायचे आहे. गरजू ग्रासलेल्या पुरग्रस्तांच्या भडीमाराला सामोरे जायचे आहे. फ़डणवीस तडजोडी करून मुख्यमंत्रीपद टिकवू शकले असते तरी त्यांनाच अशा भडीमाराला सामोरे जावे लागले असते. त्यातून त्यांची एका राजिनाम्याने सुटका केली आहे आणि सगळा भडिमार नव्याने सत्तेत येणार्या मुख्यमंत्र्याच्या स्वागताला सज्ज आहे. मग देवेंद्रना मुख्यमंत्री होण्यापासून रोखणार्यांनी दिलासा दिला की हटवले? प्रत्येकाने याचा हवा तसा अर्थ काढावा. आपल्या देशात विचारस्वातंत्र्य आहे, अविष्कार स्वातंत्र्यही आहे.
Perfect write up..
ReplyDeleteहे सगळे आदित्यच्या नेतृत्वाखाली करावे लागणार आहे । ते आणखीनच एक संकट असणार आहे । सत्ता मिळवणे सोपे आहे पण ती राबवणे आणि यशस्वीपणे राबवणे मुश्किल असते । पण ह्या सगळ्यात सर्वसामान्य मतदारांचे मात्र हाल होणार हे नक्की । दररोजचा संजय राऊत यांचा कॉमेडी शो आपल्या समोरचे प्रश्न थोडेच सोडवू शकतो ।
ReplyDeleteभाऊ नेहमीप्रमाणेच अतिशय उत्तमरीत्या विचार मांडले आहेत
ReplyDeleteभाऊ नमस्कार, सद्यस्थितीत मुख्य मंत्री फडणवीसांना डोके दुखी पासुन दिलासा मिळाला असता तरी शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासाठी खूप आटापिटा करावा लागणार यात शंका नाही बरे असो आपल्या मते राष्ट्रपती राजवट लागू होइल का?
ReplyDeleteसेनेने केंद्रात रालोआबरोबर राहावे आणि राज्यात युपीएबरोबर. भाजप त्यांना केंद्रातून हकलू शकणारच नाही, आणि राज्यातील सरकारमुळे शिवसेना राज्यात यूपीएचे घटक म्हणून राहील. मराठी जनतेला काही हरकत नाही या नवीन पर्यायाची. शिवसेनेचे हे नवीन पर्यायी सरकार ५ वर्षे नक्की निर्धोक चालायला हवे. भाजपचा माज उतरेल आणि मराठी भूमीतून चालता करता येईल.
ReplyDeleteपवार काका नुसतीच हूल देऊन बाजूला झाले , आता शिवसेनेला तेल ही गेले .... उपमुख्यमंत्री पद पण गेले ....
ReplyDeleteसेनेच्या पक्ष प्रमुखांनी बाळासाहेबांना वचन दिले होते आता त्या प्रमाणे मुख्यमंत्री सेनेचा करावा आणि वचनपूर्ती क्या आनंदात राज्यशकट हाकावा... म्हणजे हा बद्सल्ला ज्याने दिला असेल त्याची ओळख पटेल अशी आशा आहे
ReplyDeleteभाऊ खरं तर सेनेने गेल्या पाच वर्षात मिळालेल्या सत्तेचा वापर करून राज्यात संघटना बळकट करण्यासाठी प्रयत्न केले असते तर चित्र वेगळे दिसले असते आत्ता विषय सारखा पुढे येतोय तो strike रेटचा, आणि गेल्या 25 वर्षात सेना तिथेच मार खाते आहे, युती असताना देखील सेना जास्त जागा लढवून आणि भाजप कमी जागा लढवून जवळपास सारख्या जागा दोघांच्या येत असत, सेनेने गंभीरपणे या विषयात कधीच लक्ष घातले नाही, जे लोक पक्षासाठी खस्ता खात होते ते सगळे बाहेर पडले उदा राणे, गणेश नाईक, वडेट्टीवार,अशा लोकांना समजूत काढून परत जोडले गेले नाही त्यामुळे केवळ मित्र पक्षावर आक्रस्ताळेपणा करून मुख्यमंत्री पद मिळेल अशा भ्रमात एखाद्या फुटकळ संपादकांच्या सल्ल्याने सेनेचे नेतृत्व चालणार असेल तर समोर अमित शहा यांच्या सारखा अत्यंत खमक्या प्रतिस्पर्धी असेल ते सेनेला शक्य होणे अतिशय कठीण आहे.
ReplyDeleteभाऊ, अगदी योग्य विश्लेषण.
ReplyDeletePerfect analysis. Let betrayer now face the public along with old man under the rains.
ReplyDeleteसमजा भाजपाने सरकारात सामील न होता मोठा भाऊ म्हणून लहान भावाला बाहेरून पाठींबा दिला व संपूर्ण कारभार शिवसेनेकडॆ सोपवला तर काय हरकत असावी? वेगवेगळ्या विचारधारांना सामावून घेतांना शिवसेनेची होणारी तारांबळ वाचेल. शिवसेनेलाही अनुभव मिळेल. महाराष्ट्राला तात्काळ नवीन सरकार मिळेल. राष्ट्रपती राजवट टळेल. संभाव्य पुन्हा: निवडणूकीचा खर्च टळेल. यदा कदाचित शिवसेनेला अडीच वर्षाने पुन्हा मुख्यमंत्रीपद भाजपा ला द्यायची सदिच्छा झालीच तर उरलेल्या अडीच वर्षात ती त्यांनी घ्यावी व त्यावेळी सरकारात सामील न होता शिवसेनेने फक्त बाहेरून पाठींबा द्यावा. अट फक्त दोघांना आपल्या मर्जी प्रमाणे राज्यकारभार करू द्यावा, आत्ता जसे सरकारात सामील होत पाठिंबा देवून विरोधक म्हणून ही टीपण्णी करायची ही भुमिका दोन्ही वेळी दोघांनीही ठेवू नये. इतकंच !!
ReplyDeleteभाऊ, राष्ट्रपती शासन की राज्यपाल शासन??
ReplyDeleteFadanvis yanya fact te Brahman aahet mhnun virodh aahe , asa mala watat, yawar aapla Kai mat aahe Bhau ...
ReplyDeleteशेवटचा परिच्छेद फार महत्वाचा आहे. कदाचित याच कारणामुळे अगदी हीच परिस्थिती असलेल्या हरियाणात भाजप सरकार स्थापन झाले. मात्र महाराष्ट्रात भाजपाच्या केन्द्रीय नेतृत्वाने अजिबात रस व सहभाग घेतलेला नाही.
ReplyDeleteखडसे किंवा गडकरी किंवा बावनकुळेंना मुख्यमंत्री करणे व सेनेला निम्मा वाटा (काही काळ मुख्यमंत्रीपद) देणे हे दोघांसाठी फेस सेव्हर ठरेल. अन्यथा मध्यावधी निवडणुकीत दोघांचीही वाट लागेल, हे दोघेही ओळखून असतील.
ReplyDeleteमी परत येईन, किमान २२० जागा मिळतील, आमचे २५० चे लक्ष्य आहे, राष्ट्रवादी व कॉंग्रेसला १०-१० जागा मिळतील या सर्व बढाया जनतेने हाणून पाडल्या. आता निवडणुक झाली तर आपल्याला स्वबळावर बहुमत मिळेल किंवा किमान १२५ जागा मिळतील या भ्रमात फडणवीस आता नसावे अशी इच्छा आणि अपेक्षा आहे.
उद्धव ठाकरेंच्या सर्व चाली बरोबर होत्या. फक्त १ चाल चुकली. त्यांनी राऊतांना तोंड बंद ठेवण्यास सांगायला हवे होते.
फडणवीसांनी कितीही स्पष्टीकरण दिले तरी त्यांनी व शहांनी उद्धवला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचे वचन दिले होते ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच ते दोघांचीही उद्धवना तोंड दाखविण्याची हिंमत नाही. उद्धव आता माघार घेणार नाहीत हे फडणवीसांनी निकालाच्याच दिवशी ओळखले होते व म्हणूनच ते १५ दिवस तोंड लपवून बसले व राऊत एक्स्पोझ होत राहिले. राऊतांबद्दल व पर्यायाने सेनेबद्दल वाईट मत झाल्यानंतर फडणवीसांनी काल साळसूदपणे उद्धवच्या माथी सर्व दोष मारून स्वत: नामानिराळे राहण्याचा प्रयत्न केला.
सेनेला सर्व दोष दिल्याने मध्यावधी निवडणुकीत सेनेची वाट लागून आपल्यालाच फायदा होईल या भ्रमात फडणवीस असतील तर देवच भाजपचे रक्षण करो.
भाऊ, शेतकऱ्यांना भरघोस मदत जाहीर करायला काही तारतम्य लागते का? यात फायदाच फायदा होईल... शेतकऱ्यांच्या नावे स्वतःच्या तुमड्या भरण्याची पद्धत जुनीच आहे.. बाकीच्यांनी दुरून पाहायचे.. बोंबाबोंब केली तर केंद्र सरकारच्या नावाने शिमगा करता येईल.. मुख्य म्हणजे पगार पेन्शन चालू होईल बाकी पुढचे पुढे.. उखळ पांढरे करून घेणे हेच ध्येय!
ReplyDeleteखरंतर आदित्य ठाकरेला कारभार शिकून घेण्याची नामी संधी होती.. मला शंका आहे त्याला महाराष्ट्रातील सर्व जिल्हे तरी सांगता येतील की नाही! 😁
I will never vote, SS. Though I worship BalasahebThakare.
ReplyDeleteभाऊ तुम्ही सेनेच्या माग राहायला पाहिजे 2014 सारख
ReplyDeleteराष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात बोलू नका, या शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरोबा होतोय. काँग्रेसच्या विरोधात बोलायचे नाही. म्हणजे फक्त भाजपच्या विरोधात बोलायचे. २०१६मध्ये नोटबंदीचे शिकार पक्ष एकत्र आले की असे व्हायचंच! कालचक्र एखाद्याला पायापासून डोक्यावर तर दुसऱ्याला डोक्यावरून पायाशी आणून ठेवते!
ReplyDeleteउगीच फडणवीस हे शहाणे म्हणवले जात नाहीत. २०० वर्षांपूर्वी ते पेशवाईतले शहाणे होते आणि आज राजकारणातले. 😀😀😀
ReplyDeleteनुसते फडणवीस नाही, भाजपा सगळ्यातुन सुटली आहे. बघुया उरलेले काय करतायत...
ReplyDeleteभाऊ, आजपर्यंत भाजपाला हरवायला म्हणून जे जे असे एकत्र आले, ते भाजपची ताकद वाढायला कारणीभूत ठरले आहेत. आता पुढे जाऊन भाजपा आणि राष्ट्रवादीने मिळून शिवसेनेला खाऊन टाकलं तर आश्चर्य वाटायची गरज नाही.
ReplyDeleteसुटका करायची होती तर मग मी येणार मी येणार असे काय लावून बसले होते.
ReplyDeleteआचार्य अत्रे यांच्या एव्हरग्रीन म्हणून उल्लेख होणाऱ्या ' लग्नाची बेडी' या नाटकाप्रमाणे सेनाभाजपचे युतीची बेडी हेही कायम चालत राहणारे नाटक आहे . त्यातीलच एक प्रसिद्ध वाक्य थोडा बदल करून रचता येईल ते असे " मतदार हा क्षणाचा राजा असतो तर अनंत काळचा (अगतिक)प्रेक्षक असतो ".
ReplyDeleteउत्तम ... बालहट्टाचे दुष्परिणाम ह्याविषयी एखादा ब्लॉग किंवा विडिओ बनवावा ..
ReplyDelete