Saturday, November 30, 2019

आकड्यांची लोकशाही

Image result for uddhav swirn in

प्रेमात पडणे सोपे असते आणि त्यातून उदभवणार्‍या संबंधांना व नात्याला निभावणे अतिशय कठीण काम असते. राजकारणात सत्ता संपादनाचा हेतू बाळगूनच विविध नेते व पक्ष आखाड्यात उतरत असतात. पण सत्तेची खुर्ची प्रत्येकाला मिळतेच असे नाही. पण ज्याला मिळते, त्याच्यासाठी तो डोक्यावरचा कातेरी मुकूट असतो. तो मिळेपर्यंतच त्याचे कौतुक असते. जेव्हा चहूकडून ते काटे टोचायला लागतात, तेव्हा जीव मेटाकुटीला येत असतो. शिवसेनेला आता तेच धडे नव्याने गिरवायचे आहेत. दोन दशकापुर्वी मनोहर जोशी हे सेनेतले मुरब्बी व्यवहारी नेते हुशार नेता होते आणि शरद पवार यांच्याशी त्यांची बर्‍यापैकी जवळीक होती. म्हणून त्यांनी तेव्हाचे सरकार युतीचे असूनही चांगले चालवले होते. अर्थात त्यांच्यापाशी खुप प्रशासकीय अनुभव होता व सार्वजनिक जीवनातील महत्वाची पदे त्यांनी समर्थपणे हाताळली होती. त्या दृष्टीने उद्धव ठाकरे पुर्णपणे अननुभवी आहेत. त्यामुळेच त्यांना एकदम अशा सर्वोच्चपदी बसताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. या़चे पहिले कारण म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून आजवर त्यांचा जो हुकूम आमदारांवर चालत होता, तो तसाच्या तसा सरकारमध्ये सहभागी झालेल्या पक्षांच्या आमदारांवर चालणार नाही. त्यापैकी अनेकजण यापुर्वी आपापल्या परीने महत्वाची प्रशासकीय पदे भूषवलेले आहेत. किंबहूना त्यांच्यापेक्षा उद्धव यांचा अनुभव नगण्य आहे. सहाजिकच त्यांच्यावर मुख्यमंत्री म्हणून हुकूमत राखणे अवघड काम आहे. त्यासाठी आवश्यक असलेली लवचिकता उद्धवना दाखवावी लागेल. त्याखेरीज अशा आघाडीच्या राजकारणात मातब्बर असलेले शरद पवार सत्तेबाहेर बसून नव्या सरकारची सुत्रे हलवणार आहेत. आजवर विरोधी पक्षात असताना किंवा सत्ताधार्‍यांना धारेवर धरताना कसलीही अडचण नव्हती. कारण जबाबदारीही नव्हती. आता सर्वात मोठी जबाबदारी त्यांनीच घेतलेली आहे. ती किती त्रासदायक आहे, त्याची प्रचिती शपथेच्या दुसर्‍याच दिवशी येऊ लागलेली आहे.

गुरूवारी नव्या सरकारचा शपथविधी झाला आणि त्याच रात्री मंत्रिमंडळाची पहिली बैठकही पार पडली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना सेक्युलर म्हणजे काय. अशा विषयावरून उद्धव आणि पत्रकार यांच्यात खटका उडाला. दुसर्‍या दिवशी मित्रपक्षात कोणाला कुठली सय्त्तापदे द्यायची, त्यावर सुद्धा एकमत होऊ शकलेले नाही. दोन्ही कॉग्रेसनी राज्यपालांकडे उद्धव यांच्या नेतृत्वाला पाठींबा देणारी पत्रे दिलेली असली, तरी त्याने सरकार स्थापणे शक्य झाले. पण सरकार चालवणे म्हणजे या सर्व पक्षांना सोबत घेऊन व त्यांच्या सत्ताकांक्षी नेत्यांना सोबत ठेवून कारभार करणे असते. आपल्या पक्षाचा तोल संभाळायचाच असतोच. पण आता अन्य दोन मित्रपक्षातील वादातही समेट घडवणे किंवा तोडगे काढण्याची जबाबदारी नव्या मुख्यमंत्र्यांवर आहे. त्यांना आदेश देऊन गप्प करता येणार नाही. उदाहरणार्थ उपमुख्यमंत्री कोणाचा व सभापती कोणाचा, यावरून दोन्ही कॉग्रेस पक्षात जुंपलेली आहे. कॉग्रेसला अजितदादा उपमुख्यमंत्री म्हणून नकोत आणि राष्ट्रवादीला सभापतीपदी पृथ्वीराज चव्हाण नको आहेत. म्हणजेच सत्तावाटपात जी दोन महत्वाची पदे मित्रांना देऊ केलीत, त्यावर त्या पक्षांनी कोणाला बसवावे, यावरही एकमत होऊ शकलेले नाही. तब्बल एक महिनाभर चर्चा व उहापोह केल्यावरही इतक्या प्राथमिक बाबींवर सहमती होत नसेल, तर नित्यनेमाने कारभार हाकायचे निर्णय कसे व कधी घेतले जाणार आहेत? ते अशक्य आहे असे अजिबात नाही. पण ते वेळेवर होण्यासाठी नेत्याची हुकूमत असावी लागते. आपले अनुयायी व सहकारी आहेत, त्यांना काबूत ठेवता आले तरच अशी कारकिर्द यशस्वी होऊ शकते. धोरणात्मक मोठे निर्णय घेण्याचा मार्ग सुकर होत असतो. उद्धव ठाकरे यांच्यासमोरचे तेच पहिले व मोठे आव्हान आहे. सत्तेत बसलेल्यांना उठसूट संपादकीय इशारे देण्याइतके ते काम सोपे सरळ नाही. त्याची समज हळुहळू येत जाईल. किंबहूना सरकार व संघटना यांच्या कामकाजातला फ़रक तिथून शिकता येणार आहे.

महिनाभर खपून अखेरीस तिन्ही पक्षांचे किमान समान कार्यक्रमावर एकमत झाले आहे. त्यासाठीही नव्या मुख्यमंत्र्यांना खुप नाकदुर्‍या काढाव्या लागलेल्या आहेत. वास्तविक त्यासाठी इतका वेळ लागण्याची गरज नव्हती. भाजपाला सत्तेपासून दुर ठेवणे, हा कॉग्रेस व राष्ट्रवादीचा जुनाच किमान समान कार्यक्रम आहे. आता शिवसेनेनेही तो पत्करला वा स्विकारलेला आहे. तेव्हा त्याविषयी इतके चर्वितचर्वण होण्याची काहीही गरज नव्हती. पहिल्या बैठकीतच त्यावर एकमत व्हायला हवे होते. ते झाल्यावर उरलेला वेळ सत्तापदे व खातेवाटपावर चर्चा व्हायला हवी होती. मग महिना वाया गेला नसता आणि आता शपथविधी झाल्यावर दुसर्‍याच दिवशी असले वादविवाद उभे राहिले नसते. आता गंमत अशी आहे, की अजितदादा तीन दिवसासाठी उपमुख्यमंत्री व्हायला भाजपासोबत आले आणि तोंडघशी पाडून त्यांनीच उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग सोपा व प्रशस्त केलेला आहे. त्यांनी जे काही ‘महान’ कार्य केलेले आहे, त्याचा योग्य मोबदला त्यांना अपेक्षित असणार. त्यापासून त्यांना वंचित ठेवणे म्हणजे सरकारला सुरूंग लावण्यासाठी बॉम्बच्या वातीला बाहेर काढून ठेवणेच होईल. पण गंमत अशी आहे, की शपथविधीच्या पहिल्या दिवशीच दादांच्या नावावर सहमती होऊ शकली नाही आणि ते बाहेर बसलेले आहेत. त्यांचे राष्ट्रवादीतले अनुयायी पाठीराखेही अस्वस्थ आहेत. त्यावरचा तोडगा सर्वोच्च नेते शरद पवारच काढतील, असे म्हटले जाते. पण त्यांना सवड मिळालेली नाही आणि इतक्यातच शपथविधी होऊनही गेला आहे. अर्थात आघाडीच्या सरकारमध्ये अशा कुरबुरी नेहमीच असतात. कर्नाटकात त्याची प्रचिती आलेली आहे. कुमारस्वामी नामक मुख्यमंत्र्याला नित्यनेमाने श्रोत्यांपुढे रडगाणे गाण्यापेक्षा अन्य काही करता आलेले नव्हते. त्यामुळे महाराष्ट्रात वेगळे काही घडते आहे असेही मानायचे अजिबात कारण नाही. लोकांनी व पत्रकारांनी त्याचीही सवय लावली पाहिजे.

भारतीय लोकशाहीत आता विचारधारा व धोरणांना महत्व उरलेले नाही. संख्याबळ हा लोकशाहीचा निकष झाला आहे. अमूक तमूकांची बेरीज जमली आणि बहूमताचा आकडा ओलांडला, मग मुख्यमंत्री शपथ घेऊ शकतो व सत्तास्थापन होऊ शकत असते. ते चालावे किंवा सरकारने कारभार करावा, ही घटनात्मक अपेक्षा आहे. पण माध्यमात बसलेल्या वा विद्यापीठात राज्यशास्त्र शिकवणार्‍यांना त्याचा पत्ता नाही. म्हणून मग निवडणूकीचे निकाल लागले; मग विविध पक्षांच्या विजयी झालेल्या उमेदवारांच्या बेरजा वजाबाक्या मांडून माध्यमात सरकार स्थापनेचा खेळ् सुरू होतो. हळुहळू राजकीय पक्षही त्याच्या आहारी गेलेले आहेत. त्यामुळे आपल्या देशात अंकगणिताची लोकशाही अवतरली आहे. त्यात विविध पक्षांच्या निवडून आलेल्या सदस्यांच्या बेरजा राज्यपाल राष्ट्रपतींना दाखवून सरकारे स्थापन केली जातात. ते सरकार चालेल किंवा नाही, याचा विवेक बाळगण्याचाही अधिकार राज्यपालांना उरलेला नाही. त्यामुळे कारभारी हा विषय मागे पडलेला असून, संख्याबळ दाखवू शकणारा मुख्यमंत्री आपल्या वाट्याला आला आहे, येणार आहे. त्याविषयी तक्रार करण्याचा अधिकार ही लोकशाही आपल्याला देत नाही. एका पक्षाला बहूमत देत नाहीत, त्या मतदारालाही त्यावर तक्रार करता येणार नाही. मतदारानेच दिलेला कौल गोंधळात टाकणारा असेल, तर निवडून आलेल्या पक्षांनी व नेत्यांनी तरी काय करावे? बहूमत पुर्ण करायला जो कोणी मदत  करील, तो आपली किंमत वसुल करणारच. कारभारापेक्षा त्याच्या इच्छा व आकांक्षेला प्राधान्य मिळणारच. जनतेने त्याचा विचार केल्याशिवाय मतदान उरकले असेल, तर दोष कुणाचा? आज महाराष्ट्रात स्थापन झालेले सरकार त्या अंकगणितातल्या लोकशाहीचे आहे. त्यातून कारभाराचे बीजगणित सुटण्याची अपेक्षा करू नये. आपल्यातील विरोधाभासाच्या ओझ्याने ते सरकार कोसळून नवी व्यवस्था वा नवे पर्याय उपलब्ध होण्याची प्रतिक्षा करण्याखेरीज जनतेच्याही हातात काय आहे?

16 comments:

  1. भाऊ, हे सरकार पूर्ण पाच वर्षे चालावे हीच माझी इच्छा आहे, मग उद्धवना आटेदालका भाव मालूम होगा. बाळासाहेबांची शेवटची इच्छा हे खोटे सांगून भोळ्याभाबड्या सैनिकांना भुलवता येते, मग सैनिकांना सोनिया पवार यांचे सत्तेसाठी पाय धरणे हे पटून जाते पण तीच सत्ता चालवणे म्हणजे मातोश्रीवरुन आदेश देण्याइतके सोपे नाही आणि समोर भोळेभाबडे सैनिक नाहीत शिवाय सहकारी हे मुरलेले राजकारणी आहेत, म्हणूनच हे सरकार पाच वर्षे चालायलाच हवे.

    ReplyDelete
  2. किती योग्य लिहिले आहे
    छान

    ReplyDelete
  3. सध्यातरी काँग्रेस असो वा राष्ट्रवादी असो वा शिवसेना या तिन्ही पक्षांचा आपल्या आमदारांवर विश्वास नाही असे दिसते. कारण सर्व आमदारांना अजून हॉटेलमध्ये एकत्र ठेवले आहे.

    ReplyDelete
  4. अगदी खरे आहे.

    ReplyDelete
  5. अप्रतिम विश्लेषण भाऊ सर. दुर्दैवाने राज्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या प्रकल्पावरही या विरोधाभासी सत्ताधाऱ्यांचा प्रभाव पडायला सुरुवात झाली आहे. प्राथमिकता कोणत्या गोष्टींना द्यायची त्याचे अग्रक्रम ठरवणे सोपे जावे यासाठी तुम्ही वैयक्तिक पातळीवर ठाणे, डोंबिवली येथे काही व्याख्याने हि दिलीत. ते मोठ्या प्रमाणावर व्हायला हवे.

    ReplyDelete
  6. भाजपाला सत्तेपासून दुर ठेवणे, हा कॉग्रेस व राष्ट्रवादीचा जुनाच किमान समान कार्यक्रम आहे. आता शिवसेनेनेही तो पत्करला वा स्विकारलेला आहे. तेव्हा त्याविषयी इतके चर्वितचर्वण होण्याची काहीही गरज नव्हती
    👌👌👌👌👌👌👌👌

    ReplyDelete
  7. भाऊ भारतीय राजकारणात हा आकड्यांचा खेळ 1996 मध्ये देवेगौडा यांच्यापासून सुरू झाला, त्यानंतर सलग 18 वर्षे आघाड्यांचे वाजपेयी मनमोहन सिंग असे प्रयोग होतहोत 2014 मध्ये नरेंद्र मोदींच्या एकपक्षीय बहुमताने केंद्रात हा आकड्यांचा खेळ थांबला,मे 2019 मध्ये मोदींना जास्त भक्कम असे बहुमत मिळून केंद्रातील आकड्यांचा खेळ संपला आहे. महाराष्ट्रात गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत हिंदुत्ववादी भाजप शिवसेना 170 ते 180 मिळवून पहिल्या क्रमांकावर आले होते तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस हे लागोपाठ दोनदा शंभर पार करू शकले नाहीत, पण सेना या वेळी निवडणूक पूर्व आघाडी मोडून विरोधी आघाडीत सहभागी झाली, आता त्यामुळे सेनेला मिळणाऱ्या मतांची पोकळी ही भाजप भरून काढेल कारण भाजप एकटा 288 जागा लढवेल आणि भक्कम बहुमत मागेल कारण एकदा निवडणूक पूर्व आघाडीवरचा विश्वास उडाला की मतदार एकपक्षीय बहुमताकडे वळतो हा गेल्या दहा वर्षात अनेक राज्यात याचा अनुभव आला आहे 2019 च्या निमित्ताने महाराष्ट्राच्या मतदाराच्या मनातील गोंधळ पूर्णपणे संपला आहे, जेंव्हा केंव्हा मतदारांना भविष्यात संधी मिळेल तेंव्हा हा आकड्यांचा खेळ संपेल महाराष्ट्रात भक्कम बहुमताने एका पक्षाचे सरकार येईल हे नक्की

    ReplyDelete
    Replies
    1. परमेश्वर करो आणि आपले म्हणणे खरे होऊ दे

      Delete
  8. हया सगळ्या सावळ्या गोंधळा मध्ये मतदारांनी काय करावे? तुम्ही काय सल्ला द्याल? पुढच्या वेळी मतदान कोणाला द्यायचे? आणि मी मत दिलेल्या पक्षाला बहुमत नाही मिळाले तर? ते कोणा बरोबर ही जाऊन सत्ता स्थापन करणार? फ़क्त सत्तेसाठी ........?

    ReplyDelete
  9. तिरुपती बालाजी ला केस दिल्यास, ते विकून त्याचा धंदा केला जातो... तसेच राजकारणात आपण दिलेल्या मतांचा जीवावर धंदा केला जातो.

    ReplyDelete
  10. हे ठीकच आहे, खरी मुख्य जबाबदारी विरोधी पक्ष म्हणून भाजपा च्या सर्व आमदारांची आहे. एव्हढी तेव्हढी कारणे काढून नव्या सरकारला घालून पाडून तक्रारी करण्याचे वा कोर्टात प्रकरणे नेण्याचे टाळावे. त्याने रडीचा डाव खेळत अस्ल्याचा संदेश बाहेर जाईल व त्याला लगोलग जनतेचा पाठींबा मिळेलच असे नाही. उलट सहमतीचे राजकारण विरोधी पक्ष करीत आहे हाच संदेश बाहेर जायला हवा व जनतेची सहानुभुती मिळवत रहात गेलॆत व नंतर एखादी मोठी चूक नवे सरकार घेत असेल तेव्हाच असे हत्यार वापरायला हवे. मुख्य काम, हा पराभव का झाला ,निवडणूकीत मतदार मोठ्या संख्येने कसे येतील, नवे सरकार ज्या योजना नव्याने मांडतील त्यांचा व्यवस्थित अभ्यास आदि वर भर हवा. त्यांनी त्यांचे एक शॅडो कॅबिनेटच बनवायला हवे ! म्हणजे कुणा उपटसुंब्यांना आम्हालाच मजबूत विरोधी पक्ष बनावायला निवडून द्या म्हणण्याची पाळी येणार नाही !

    ReplyDelete
  11. Voters who casted their votes on a certain assurance have been betrayed due to powerlust of a families.

    The new government is JV of Pawar Pvt. Ltd. + Thakare Pvt. Ltd. + Gandhi Pvt. Ltd.

    ReplyDelete
  12. भाऊ हे शासन लोकांच्या अति-आवश्यक गरजा(उदा. मुंबई मेट्रो)पुरवण्याच्या बाबत उदासीन असेल तर किती काळ टिकेल?(सहकारी पक्षांना त्याचे चटके जाणवतील काय?)

    ReplyDelete
  13. आता झाले ते झाले, भूतकाळ झाला. १) पण युती करताना प्रत्येक जण बहूमतापेक्षा कमी जागा लढतो.२) त्यामुळे जनतेने बहूमत दिले होते.३) मागण्या करून मुमं पद मिळवणे, किंवा मी मुमं होणार म्हणून एस एस, बीजेपीने युती आता तोडून अस्थिरता आणली आहे.बाकी आपला लेख योग्य आहे. धन्यवाद

    ReplyDelete
  14. वडिलांना दिलेले वचन पूर्ण झाले .जनतेला दिलेल्या वचनांची पूर्ती करण्याचे इतर पक्षांच्या सहकार्यावर अवलंबून राहणार आहे हे जनतेला पटवून देण्याची गरज आहे.महापालिकेच्या कारभारात लोकाना जाणवेल एवढी सुधारणा झाली तरी लोकांना सेनेबाबत विश्वास वाटू लागेल.शिवरायांचे नाव शंभर वेळा घेण्यापेक्षा त्यांच्या रयतेबाबतच्या आस्थेचा अंश किंवा लेश जरी सरकारी कामकाजात दिसला तरी पुरे आहे.

    ReplyDelete