Saturday, November 16, 2019

‘शब्द’ कोणी दिला?

विधानसभेच्या निकालानंतर महाराष्ट्रातील राजकारणाचे जे विचित्र वळण घेतले आहे, त्यामुळे विविध राजकीय पक्षांची सत्तालालसा चव्हाट्यावर आलेलीच आहे. पण त्याहीपेक्षा आपला बुद्धीवादी वा वैचारिक टेंभा मिरवणार्‍यांची लज्जास्पद अवस्था करून टाकली आहे. आधी सरसकट पुरोगामीत्व म्हणून हिंदूत्ववादी संघटना संस्थांची टिंगल वा हेटाळणी करण्याचा सुलभ मार्ग त्यांना उपलब्ध होता. कारण हिंदुत्व आणि पुरोगामी  अशा दोन गटात राजकारण विभागले गेले होते. पण निकालानंतर शिवसेनेने मुख्यमंत्रीपद मिळावे म्हणून हट्ट धरला आणि त्यातून पेचप्रसंग निर्माण झाल्यामुळे सगळा संघर्षच मुळात दोन हिंदूत्ववादी पक्षात विभागला गेला. त्यात कोणीच तथाकथित पुरोगामी नसल्याने कुठल्या बाजूने टाळ्या पिटायच्या आणि कुणाची हेटाळणी करायची, असा पेचप्रसंग पुरोगामी बुद्धीमंतांसाठी यक्षप्रश्न बनुन समोर आला. अर्थात या लोकांना शिवसेना वा भाजपा यापैकी कोणाही विषयी आस्था वा प्रेम नाही. पण जो काही राजकीय व्यवहार चालू आहे, त्यात आपलेही काही मत आहे, हे दाखवणे किंवा व्यक्त करण्याची खाज शमत नाही. त्यामुळे गप्प बसले तर आपली ओळखही लोक विसरून जातील, याची चिंता आहे. म्हणून मग दोन हिंदूत्ववादी पक्षापैकी एकाची बाजू हमरातुमरीवर येऊन मांडण्याची बौद्धिक कसरत अशा पुरोगामी शहाण्यांना करावी लागते आहे. जितका हा राजकीय पेच गुंतागुंतीचा होत चालला आहे, तितक्या या बौद्धिक कोलांट्या उड्या अधिकच मनोरंजक होत चालल्या आहेत. दोन दशकांपुर्वी युती सरकारच्या शिवशाहीचे वर्णन ‘शिव्याशाही’ अशा शब्दात करणार्‍या निखील वागळे यांना आज शिवसेनेचे सरकार सत्तेत बसण्याविषयी लागलेली उतावीळ बघितल्यावर, पुण्यतिथीदिनी बाळसाहेब ठाकरेंना मिळालेली सर्वात मोठी श्रद्धांजली म्हणायला हवी.

निखील वागळे किंवा तत्सम पत्रकारितेचा उदयच मुळात शिवसेनेला विरोध करण्यासाठी होता. त्यामुळे त्या काळात किंवा आजही तत्सम पत्रकार बुद्धीमंतांनी शिवसेनेचे राजकारण, हिंदूत्व किंवा एकूण भूमिकांची यथेच्छ टवाळी करण्यात काहीही गैर नव्हते. हे लोक कधीही पत्रकार नव्हते. तर आपला लाडका राजकीय अजेंडा पुढे रेटण्यासाठीच त्यांनी कधी पत्रकार वा बुद्धीजिवी अभ्यासक असे मुखवटे चढवलेले होते. त्यामुळे हातामध्ये आलेल्या साधनांचा उपयोग त्यांनी कुठल्याही हिंदू संघटना वा राजकीय पक्षांच्या विरोधात केल्यास नवल नाही. सहाजिकच शिवसेना व भाजपा यांची १९९० नंतरच्या काळत भक्कम युती झाल्यावर त्यांनी या युतीवर कडाडून हल्ला करणे योग्यच होते. त्यांच्या स्वभावधर्माला धरूनच होते. म्हणूनच १९९५ नंतर जेव्हा तीच युती राज्यात सत्तेवर येऊन बसली, तेव्हा युतीला पदोपदी टिकेचे आरोपांचे लक्ष्य करण्यात अशा लोकांनी धन्यता मानलेली होती. मग अशा टिकेचा समाचार शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’मधून घेतला जायचा. त्याची ठाकरी भाषा अशा पुरोगामी विचारवंत पत्रकारांसारखी तुपात घोळलेली नसल्याने गावठी शब्दात समाचार घेतला जायचा. त्यावर तशाच भाषेत उत्तर देणे जमत नसल्याने वागळे यांनी युतीच्या त्या सरकारचे ‘शिव्याशाही’ असे बारसे केलेले होते. आता त्याला चोविस वर्षांचा किंवा दोन तपांचा कालावधी उलटून गेला आहे. म्हणजेच दोन तपांची तपश्चर्या करूनही त्यांना आपले पुरोगामीत्व अखेरीस पराभूत होताना बघावे लागलेले आहे. निदान महाराष्ट्रात त्याला दोन हिंदूत्ववादी पक्षांची युती कारण झाली आणि आता त्या युतीतच जुंपली म्हटल्यावर अशा निराश वैफ़ल्यग्रस्तांना आगीत तेल ओतण्याची अपुर्व संधी चालून आलेली आहे. पण त्यातली गंमत समजून घेतली पाहिजे. या दोन पक्षातही भाजपापेक्षा या लोकांनी शिवसेनेचा अधिक द्वेष केला होता. आज त्यांना त्याच सेनेचा पुळका आलेला आहे. बाळासाहेब, यापेक्षा मोठी कुठली श्रद्धांजली असू शकते ना?

भाजपाला कमी जागा मिळाल्या, पण युती असताना सेनेच्या सोबत असलेल्या युतीला बहूमताचा कौल मतदाराने दिलेला आहे. त्यात आपल्यालाच मुख्यमंत्रीपद मिळाले पाहिजे, म्हणून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हटून बसले आणि बहूमत मिळूनही युतीला सत्ता स्थापन करता आलेली नाही. त्यामुळे युतीचा मतदार विचलीत झाला आहे. ती गोष्ट बाजूला ठेवू. कारण उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यानुसार त्यांनी बाळासाहेबांना अखेरच्या क्षणी रुग्णशय्येवर असताना शब्द दिलेला होता, म्हणून सेनेचाच मुख्यमंत्री बनवणे हा त्यांचा हट्ट आहे. पित्याला दिलेला शब्द पाळण्याला हिंदू समाजात महत्व आहे. पण तो शब्द प्रत्यक्षात आणत असताना उद्धवजींनी केलेली राजकीय खेळी बाळासाहेबांना वेगळ्या कारणास्तव नक्कीच आवडली असती. ज्यांनी शिवसेनेला शिव्याशाप देण्यासाठीच आयुष्य वाहून टाकलेले होते, सेनेला सत्ताभ्रष्ट करण्यासाठीच आपली सर्व बुद्धी पणाला लावलेली होती, तेच आज सेनेला सत्तेत आणण्यासाठी अधिक उतावळे झालेले बघून साहेबांचेही डोळे पाणावले असते ना? उद्धवजी यापेक्षा मोठी गोष्ट कुठली असू शकते? तिथे युतीपलिकडचे राजकीय समिकरण जुळवून दोन्ही कॉग्रेस पक्षांना सोबत घेण्याचे डाव उद्धव खेळत आहेत आणि त्यांना त्यात कुठलीही घाई नाही. त्यांनी सोबत घेतलेले शरद पवारही म्हणतात सरकार स्थापनेला वेळ लागला तरी हरकत नाही. पण सरकार टिकवायचे, तर स्थापनेला वेळ लागणारच. पण तितकाही संयम वागळे इत्यादिकांना उरलेला नाही. त्यांनी आता कॉग्रेस व तिच्या नेत्यांना शिव्याशाप देण्यापर्यंत मजल मारली आहे. विनाविलंब कॉग्रेस राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठींबा देऊन सेनेचा मुख्यमंत्री सत्तेत आणुन बसवायला हवा म्हणून ही मंडळी इतकी उतावळी झालेली आहेत, की साहेबांना शब्द कोणी दिला, असा प्रश्न खुद्द उद्धवजींनाच पडावा. विदुषकांना चाणक्य केले मग चंद्रगुप्तांना कसरतपटू होऊन सर्कस करावी लागतेच ना?

तर अशा पुरोगामी विचारवंत पत्रकार मंडळींची ही बौद्धिक कसरत बघून अनेकजण अचंबित झालेले आहेत. शिवसेनेला प्रतिगामी वा जातियवादी म्हणून शिव्याशाप देण्यात हयात घालवलेल्यांचे आजचे बहूमोल मार्गदर्शन व विश्लेषण बघून त्यांचेच अनेक चहातेही बुचकळ्यात पडलेले आहेत. या मंडळींना शिवसेनेचा पुळका अकस्मात कसा आला? किंवा सेनेचा मुख्यमंत्री होण्याची यांना इतकी घाई कशाला, असा प्रश्नही अनेकांना सतावतो आहे. तर त्यात कुठलेही काही अतर्क्य घडलेले नाही. अशा बहुतांश शहाण्यांचे बालपण कॉग्रेसला सत्ताभ्रष्ट करायच्या शपथा घेण्यात खर्ची पडले. पण कॉग्रेस नामशेष होत असताना तिची जागा घेण्याइतके बळ अंगी नसल्याने आघाड्या करून थकले आणि अखेरीस ती जागा भाजपा वा राज्यात शिवसेना घेताना दिसल्यावर, हेच लोक पुरोगामीत्वाचा रंग कॉग्रेसलाच लावून त्याच पक्षा़चे मुके घेत पुढे सरकलेले आहेत. त्याचा अर्थ ते कॉग्रेसचे विरोधक नव्हते की शिवसेना वा भाजपाचेही शत्रू नव्हते. त्यांची बुद्धी कशी चालते ते समजून घेतले पाहिजे. त्या त्या प्रसंगी ही मंडळी कोणाचा अधिक द्वेष करतात, त्यानुसार त्यांची बुद्धी चालत असते. भाजपा सेनेचा जोर नसताना ते कॉग्रेसचा द्वेष करीत होते आणि जेव्हा सेना किंवा भाजपा जोरात आले, तेव्हा त्यांच्या हिंदूत्वाचा द्वेष करताना त्यांनी कॉग्रेसला चुंबण्याची भूमिका घेतली. आता दोन्ही कॉग्रेस पार दुबळ्या होऊन गेल्यात आणि दोन हिंदूत्ववादी पक्षात भाजपा शिरजोर आहे. तर त्याला आव्हान देणार्‍या शिवसेनेचा पुळका त्यांना आलेला आहे. ते सेनेविषयीचे प्रेम अजिबात नाही. त्यापेक्षा भाजपाचा द्वेष त्या सेनाप्रेमात सामावलेला आहे. यशस्वी असतील त्यांचा द्वेष करण्यावर ज्यांची बुद्धी विसंबली आहे, त्यांना हल्ली पुरोगामी बुद्धीमंत, अभ्यासक, पत्रकार समजले जाते. त्यामुळे सामान्य माणसाने त्यांना समजून घेतले पाहिजे. मग निखील आज शिवसेनेचा मुख्यमंत्री आणण्याचा उतावळेपणा करतोय, त्याचा उलगडा होऊ शकेल. पण कुठून का असेना बाळासाहेबांना त्यांच्या पुण्यतिथी निमीत्त सर्वात मोठीच श्रद्धांजली मिळाली हे नाकारता येणार नाही.

11 comments:

  1. "विनाविलंब कॉग्रेस राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठींबा देऊन सेनेचा मुख्यमंत्री सत्तेत आणुन बसवायला हवा म्हणून ही मंडळी इतकी उतावळी झालेली आहेत, की साहेबांना शब्द कोणी दिला, असा प्रश्न खुद्द उद्धवजींनाच पडावा"
    .
    .
    .
    "यशस्वी असतील त्यांचा द्वेष करण्यावर ज्यांची बुद्धी विसंबली आहे, त्यांना हल्ली पुरोगामी बुद्धीमंत, अभ्यासक, पत्रकार समजले जाते. त्यामुळे सामान्य माणसाने त्यांना समजून घेतले पाहिजे"
    .
    .
    हे मात्र जबरदस्त....👍👍👍

    ReplyDelete
  2. Khupach Chan... Aiktoy tyanch vishleshan.. Agadi saty rakhatalay tumhi

    ReplyDelete
  3. Apratim. Mala vatwagle che video bagun hech Samjat navta ki ha achanak Congress la Ka shivya ghaltoy ushir kela asa bomblat....ATA kalla...
    Tyamage BJP dwesh jasta ani senaprem Kami....

    ReplyDelete
  4. भाऊ आताचा काळ हा सोशल मीडियाचा आहे, साताऱ्यात शरद पवार प्रचारादरम्यान पावसात भिजल्याची घटना ट्रेंड झाली आणि पश्चिम महाराष्ट्रापुरते देवेंद्र फडणवीस पुरते भुईसपाट झाले, त्यांचे जलयुक्त शिवार, मराठा आरक्षण, शेतकरी कर्जमाफी असे सगळे मुद्दे साताऱ्याच्या पावसात अक्षरशः वाहून गेले, आता मागच्या आठवड्यापासून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे सोशल मीडियावर आक्रमणाच्या तडाख्यात सापडले आहेत आणि कारण ठरले आहे आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत हिंदुत्वाचा आणि स्वाभिमानाचा झालेला अपमान, मुंबई ठाण्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांवरून बाळासाहेबांना मानणाऱ्या जनतेने सेनेला उदारपणे माफ केले आहे, पण सेना पक्ष प्रमुखांनी मातोश्री बाहेर पडून काँग्रेस राष्ट्रवादी नेत्यांच्या घेतलेल्या गाठी भेटी या बाळासाहेब ठाकरे यांना मानणाऱ्या सगळ्यांनी हा बाळासाहेब यांचा अपमान मानला आहे आणि याचाच उद्रेक समाज माध्यमांवर झाला आहे आणि याची धग आता आठवड्यानंतर सेनेला जाणवू लागली आहे, मागच्या रविवारी सामना मधून रोखठोक मध्ये हिटलरचे भूत मेले अशी तलवार काढणाऱ्या संजय राऊत यांना आजच्या रोखठोक मधे शिवाजी महाराजांच्या पायाशी अक्षरशः लोळण घ्यावी लागली आहे आणि आम्ही हिंदुत्वपासून फारकत घेतली नाही हे अप्रत्यक्षपणे कबुल करावे लागले आहे, आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाला आणि स्वाभिमानाला सोडचिठ्ठी देण्याची प्रचंड किंमत शिवसेनेला मोजायला लागणार आहे हे मात्र नक्की.

    ReplyDelete
    Replies
    1. sataryachya pavsat nahi.. tya adhi sangli-kolhapurachya puratach fadnavis vahun gele hote.. pan tyanna kalale nahi.. janatela madat karaychi natke kashi kartat ani kase nava gheun lokanna sodavnyasathi swataha mothe mothe mantri dhavun jata yacha tyanna anubhav navhata.. tyane bicharyne pach varshe maharashtra panidar karanyasathi ghalavli pan shevatachya varshi maharashtra itka panidar hoil yachi tyane kalpana keli navhati.. pan kay hotay he lakshat alyane pavsat ubhe rahayche ek natak tya purache sare credit gheun gele.. khara fatka pashchim maharashtrat basla.. tithe bjp chya jaga kami houn aghadichya jaga vadhalya tithe sagle samikaran chukale..

      Delete
  5. आदरणीय भाऊ ,

    आपण शिवसेना बाळासाहेब ठाकरे किंवा उद्धव ठाकरे किंवा अगदी राजठाकरे सुद्धा यांच्याबाबत जे काही लिहिता त्याबद्दल जरादेखील प्रतिक्रिया देण्याची कोणाचीच योग्यता नाही .कारण आपण सेनाप्रमुखांचे सोबत अनेक दशकांचा काळ अत्यंत जवळून घालवलेला आहे . त्यांच्या खाजगी बैठकीत ऊठबस असलेली काही मोजकी महाराष्ट्रातील जी मंडळी होती त्यातील आपण एक त्यांचे अत्यंत लाडके होतात त्यामुळे आपण जे काही बोलाल ते सर्व आम्हाला शिरसावंद्य आहे . उलट पक्षी आपले मत हे बाळासाहेबांचेच मत असेच आम्ही मानत असतो . बाळासाहेबांची मते काय व कशी होती याबाबत देखील विस्तृत लिखाण करुन ठेवावे ते भविष्यातील शिवसैनिकांना कायमचे मार्गदर्शक ठरेल

    ReplyDelete
  6. विदुषकांना चाणक्य केले मग चंद्रगुप्तांना कसरतपटू होऊन सर्कस करावी लागतेच ना? फारच छान

    ReplyDelete
  7. निखिल वागळे म्हटले की वटवघळाची आठवण येते, त्याना पण जग उलटं दिसत

    ReplyDelete
  8. भाऊ अप्रतिम विश्लेषण

    ReplyDelete