Monday, November 4, 2019

चंद्राबाबूंच्या पावलावर पाऊल

Image result for chandrababu

कालपरवा म्हणजे लोकसभा निवडणूकांचे निकाल लागून चार महिने उलटल्यावर आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री व मोदी विरोधी गठबंधनाचे दिड वर्षापुर्वीचे महान सेनापती चंद्राबाबू नायडू यांनी आपल्या आत्महत्येची कबुली देऊन टाकली. जुन २०१८ मध्ये त्यांनी आपल्या तेलगू देसम पक्षाने एनडीए आघाडीला काडीमोड दिल्याची घोषणा केली होती आणि त्यानंतर ते भाजपाला देशातून उखडून फ़ेकून देण्याची अतिशय आक्रमक भाषा बोलू लागले होते. त्यांच्या इतक्या विखारी भाषेचा ‘सामना’ तेव्हा तरी अन्य कोणी करू शकत नव्हता. पण प्रत्यक्षात चंद्राबाबूंनी आणलेले ते फ़क्त अवसान होते. २९ खासदार निवडून लोकसभेत पाठवणार्‍या चंद्राबाबूंपाशी तितकी क्षमता नव्हती. पण बोलायला जीभ लांब असली, मग त्याला कोणी आवरू शकत नसतो. म्हणून मध्यंतरीच्या दहा महिन्यात चंद्राबाबू देशभरच्या माध्यमांच्या वा वाहिन्यांच्या गळ्यातले ताईत झालेले होते. त्यांनी बेताल बोलावे आणि त्यावरून गदारोळ सुरू व्हावा, हा जणू खाक्याच होऊन बसला होता. वास्तविक चंद्राबाबू त्यांच्यासाठी भलत्याच कोणी लावलेल्या सापळ्यात ते स्वत:ला अलगद अडकवून घेत होते. पण झिंग चढलेल्यांना कोणी कधी शुद्धीवर आणू शकला आहे? आपण एका राज्याचे मुख्यमंत्री असल्याचे विसरून चंद्राबाबू देशाच्या कुठल्याही राज्यात भटकत होते आणि आपला बालेकिल्ला असलेल्या आंध्रप्रदेशात आपले स्थान खिळखिळे होतेय, याकडे बघायलाही त्यांना उसंत मिळत नव्हती. तिथेच तर त्यांच्यासाठी जगनमोहन नावाच्या तरूणाने सापळा लावलेला होता. म्हणूनच त्यानेच चंद्राबाबूंच्या एनडीएतून बाहेर पडण्याचे सर्वात प्रथम स्वागत केलेले होते. त्याचे नाव आहे जगनमोहन रेड्डी. आज तोच आंध्राचा मुख्यमंत्री बनून बसला आहे आणि चंद्राबाबू कपाळावर हात मारून एनडीए सोडण्यात घोडचुक झाल्याची कबुली देत आहेत. डोळे मिटण्याची वेळ आल्यावर ‘डोळे उघडून’ काय उपयोग असतो ना?

तेव्हा जगनमोहन यांनी आंध्रला विशेष दर्जा मिळण्यासाठी आंदोलन पुकारले होते. तोच तर आधीच्या विधानसभा लोकसभा निवडणुकीत तेलगू देसमचा अजेंडा होता. पण त्याची पुर्तता झाली नाही, म्हणून जगनमोहन यांनी राज्यव्यापी आंदोलन पुकारले होते. सहाजिकच केंद्र सरकारमध्ये सहभागी असलेल्या चंद्राबाबूंची कोंडी झाली. त्यांनाही हातपाय हलवावे लागले. पण असे काही करताना आपल्या आवाक्याचा विचार गंभीरपणे करावा लागत असतो. नुसत्या फ़ुशारक्या मारून वा वल्गना करून काहीही निष्पन्न होत नसते. चंद्राबाबूंना त्याचे भान राहिले नाही. घटनात्मक बाबींमुळे एनडीए किंवा मोदी सरकार आंध्राला विशेष दर्जा देऊ शकत नव्हते. पण सहकार्‍याला खुश करण्यासाठी मोदी सरकारने चंद्राबाबूंच्या राज्य सरकारला भरपूर आर्थिक अनुदानाची खैरात केलेली होती. सहाजिकच टोकाला जाऊन विशेष दर्जासाठी राजकीय प्रतिष्ठा पणाला लावणे हा जुगार होता. जगनमोहन याने चंद्राबाबूंना त्यांच्याच सापळ्यात अडकवणारा डाव खेळला. त्याने त्याच मागणीसाठी लोकसभेतील आपल्या पक्षाच्या पाचसहा खासदारांना राजिनामे द्यायला लावले आणि चंद्राबाबूंसाठी सापळा लावला. त्यांनी आपल्या दोन्ही मंत्र्यांना सरकारमधून बाहेर पडायला लावले आणि त्यानंतरही मोदी सरकार बधत नसल्याने पक्षालाच एनडीएतून बाहेर काढण्याचा पर्याय निवडला. इथपर्यंतही ठिक होते. कारण त्यात पुन्हा मैत्रीची शक्यता शिल्लक होती. पण पुढे चंद्राबाबूंच्या अंगात हजार हत्तीचे बळ संचारले आणि त्यांनी मोदी सरकार व भाजपालाच देशातून उखडून फ़ेकण्याचा चंग बांधला. त्यासाठी देशव्यापी बिगर भाजपा आघाडी उभारण्याचे काम हाती घेतले. पण आंध्रात आपल्याला भाजपाशिवाय निवडणुका जिंकणे अशक्य असल्याचे भान राखले नाही. परिणामी २०१९ च्या निवडणूकीत त्यांचा खुर्दा उडाला. कारण २०१४ मध्ये भाजपाच्याच दोनचार टक्के मतांमुळे तेलगू देसम बहूमतापर्यंत पोहोचू शकला होता. त्यालाच लाथ मारणे म्हणजे आत्महत्याच होती ना?

तेव्हा तमाम पुरोगामी पक्ष व विश्लेषकांनी चंद्राबाबूंची पाठ थोपटली होती. त्यामुळे जोशात येऊन २०१८ च्या जुन महिन्यात झालेल्या पावसाळी अधिवेशनात चंद्राबाबूंनी आणखी एक धाडसी पाऊल उचलले. त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणलेला होता. बहुधा पाच वर्षातला तोच पहिला अविश्वास प्रस्ताव होता. त्यावरून कल्लोळ सुरू झाला, तेव्हा सोनिया गांधी एक दिशाभूल करणारे विधान करून गेल्या होत्या. मोदी सरकारपाशी एकट्याचे बहूमत असतानाही सोनियांनी ‘आपल्यापाशी आकडा नाही असे कोण म्हणतो’, असा दावा केला होता. मग काय बहुतांश वाहिन्यांनी आकड्यांचे अंकगणित मांडण्याचा खेळ आरंभला आणि जेव्हा प्रत्यक्ष प्रस्ताव लोकसभेत आणला गेला, तेव्हा त्यापासून भाजपाचा सहकारी असलेली शिवसेनाही बाहेर बसली होती. तिने चर्चेतही सहभागी होण्याचे टाळले आणि प्रस्तावाचा धुरळा बसून मतदानाची वेळ आली, तेव्हाही सेना अनुपस्थित राहिली होती. म्हणून मोदी सरकार पडले नाही. उलट अपेक्षेपेक्षाही अधिक मतांनी अविश्वास प्रस्ताव फ़ेटाळला गेला आणि चंद्राबाबूंचे नाक कापले गेले. तिथून त्यांची पदोपदी नाचक्की होण्याचा सिलसिला सुरू झाला. तो अगदी अलिकडे त्यांनीच आपल्या मुर्खपणाची कबुली देण्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. आज शिवसेनेच्या प्रवक्त्यांच्या वल्गना ऐकताना वा वाचताना चंद्राबाबूंच्या वर्षभर आधीच्या त्या गर्जना क्रमाक्रमाने आठवतात. किंबहूना त्यावेळी म्हणजे चंद्राबाबू एनडीएतून बाहेर पडले, तेव्हा सेनेचे प्रवक्ते म्हणाले होते, नायडूंनी शिवसेनेपासून प्रेरणा घेतली. असो, सांगायचा मुद्दा इतका़च, की आज चंद्राबाबूंकडे कुठला पत्रकार कॅमेरा घेऊन फ़िरकत सुद्धा नाही, ते आपल्या जखमा चघळत चाटत बसलेले आहेत. सोनियांनी तेव्हा आपल्यापाशी आकडा असल्याची हुलकावणी दिल्याने हवेत उडालेले अनेक फ़ुगे नंतर जमिनीवर येऊन धुळ खात पडलेले आहेत. महाराष्ट्रातल्या सत्तास्थापनेला विलंब होत असताना रंगलेला तमाशा, त्या अलिकडल्या इतिहासाची आठवण करून देणारा आहे.

कसरती बघून टाळ्या पिटणारे खुप असतात. पण म्हणून कसरत करणार्‍याने आपला तोल सोडून किती धोका पत्करावा, याचे भान सोडुन चालत नसते. कारण तोल जातो आणि अपघात होतो, तेव्हा इजा फ़क्त कसरती करणार्‍याला होत असते. अशी इजा जिवावर बेताणारीही असू शकते. पण टाळ्यांची झिंग चढलेल्यांना त्याची पर्वा कुठे असते? चंद्राबाबूंना कुठे भान होते? ते आत्महत्या करत होते आणि सभोवार जमलेले टाळ्याच पिटत होते ना? कारण टाळ्या पिटणार्‍यांचे पक्ष वा राजकीय पत पणाला लागलेली नव्हती. आज शिवसेनेला बळ चढलेले आहे आणि रोजच्या रोज नवनव्या गर्जना डरकाळ्या ऐकू येत आहेत. शिकार टप्प्यात नसताना गुरगुरणारा वाघ शिकार कितीशी करू शकतो? सावज टप्प्यात येईपर्यंत हल्ला करू नये आणि नीरव शांतता राखून सावजाला बेसावध गाठण्यातून शिकार सफ़ल होत असते. गुरगुरून सावजाला सावध करणारा वाघ जगात कोणी बघितला आहे काय? शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणायचे, ‘सौ सोनारकी, एक लोहारही’. आजकालची शिवसेना लोहाराचा घण घालणारी उरली आहे काय? सोनाराने आपल्या इवल्या हातोडीने टकटक करावी, तशी रोजच्या रोज टकटक चालू आहे आणि कधी एकदा अमित शहा किंवा नरेंद्र मोदी घणाचा घाव घालतात, त्याची प्रतिक्षा चालू आहे. शिवसेना इतकी अगतिक कधीच नव्हती. एक आमदारही नसताना शिवसेना शब्दाचा दबदबा जितका होता, तितका आज पन्नास साठ आमदार वा खासदार असताना धाक शिल्लक उरलेला नाही. फ़क्त वल्गना करणारे नेते झाल्यावर यापेक्षा वेगळे काय घडू शकते? गेल्या सहासात वर्षात कॉग्रेसची दैन्यावस्था प्रवक्ते म्हणून तोंडपाटिलकी करणार्‍यांनीच करून टाकली ना? मोदी-शहा किंवा भाजपा हे निव्वळ निमीत्त होते. आत्मघाताला प्रवृत्त झालेल्यांना कोणी संपवावे लागत नाही, तेच स्वत:ला  र्‍र्‍हासाकडे घेऊन जात असतात. चंद्राबाबू त्याचे विदारक उदाहरण आहे. पण धडा कोण घेतो?

36 comments:

  1. कसरती बघून टाळ्या पिटणारे खुप असतात. पण म्हणून कसरत करणार्‍याने आपला तोल सोडून किती धोका पत्करावा, याचे भान सोडुन चालत नसते. कारण तोल जातो आणि अपघात होतो, तेव्हा इजा फ़क्त कसरती करणार्‍याला होत असते. अशी इजा जिवावर बेताणारीही असू शकते. पण टाळ्यांची झिंग चढलेल्यांना त्याची पर्वा कुठे असते?

    ReplyDelete
  2. भाऊ .............तुमच्या पूर्वीच्या लेखातील एक वाक्य मला चांगलेच आठवते आणि ते वाक्य आवडतेही....ते म्हणजे ' गळ्यात माळ घालून वधस्तंभाकडे धावत निघालेल्याला कोण अडवणार ' ?

    ReplyDelete
  3. सेना भाजप विरोधी बाकावर बसण्याची तयारी करत आहेत.

    ReplyDelete
  4. भाऊ कालपर्यंत आपल्याला 175 लोकांचा पाठिंबा असे सांगणारे सेनेचे प्रवक्ते आज सगळ्यात मोठ्या पक्षाला म्हणजे भाजपला सत्ता स्थापनेचे निमंत्रण द्या म्हणून राज्यपालांना सांगायला गेले आहेत, आपण वर वर्णन केले आहे ते खरे आहे, सेना या प्रवक्त्याच्या सल्ल्याने आत्महत्या करते आहे आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया बेभान होऊन टाळ्या पिटत आहे

    ReplyDelete
  5. पुन्हा मीच येणार असे म्हणणाऱ्या अहंकारी व सर्वत्र गाजर दाखवणाऱ्याला शिवसेनेने माजी बनवलेच ना? काय म्हणता?

    ReplyDelete
    Replies
    1. अरेरे.... शिवसेना समर्थक, आणि शिवसेना दोन्हीच्या राजकीय बुद्धी सारखीच.... असो

      Delete
    2. हातातील सावज सोडून पलत्या मागे पाळणारा वाघ उपाशी राहतो आणि थकून जमिनीवर आदळतो.... अर्थात हवास बुरी बला है,. किती ताणायचे न कळ ल्यास रबर हातातून सुटते ब त्याच रबरा मे तोंडावर उलटा फटका पडतो तसे हातातोंडाशी ने आआलेला. घास आता जाणार असे दिसते, काँग्रेसत्तापर्यंत कितीजणांना कचरा केला त्यान आता आणि एक भर पडणार बहुदा

      Delete
    3. भाऊ स्वतः च्या नावाने ब्लॉग लिहितात. लोक aaplya नावाने प्रतिक्रिया लिहितात. हे नाव नसलेले anonymous कोण? ज्याना स्वतः चे नाव वापरण्याची सुद्धा लाज वाटते ते भाऊंना प्रश्न विचारतात. ह्यालाच म्हणतात लोकशाही.

      Delete
  6. महाराष्ट्रात चंद्राबाबू २.० कडे वाटचाल?

    ReplyDelete
  7. शिवसेना स्थापनेपासून काँग्रेसच्या यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या नेत्यांना कसे डावलले जाते आणि त्यावरून मराठी माणसांवर कसा अन्याय होतो याचे रसभरित वर्णन करत. त्याआधी संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या चळवळीचा आणि त्यामध्ये १०५ हुतात्म्यांचा उल्लेख करत नसत. संयुक्त महाराष्ट्र समितीचे रुपांतर संपूर्ण महाराष्ट्र समितीत झाले होते.त्यासमितीचा उपहासात्मक उल्लेख करत असत. साम्यवादी आणि त्यांचे सहकारी यांच्यावर सणाणून टीका करत असत. जनसंघ, प्र. स. पक्ष आणि सं. स. पक्ष यांच्यावर टीका विशेष न करता काँग्रेसची भलामण करत असत. प्रेक्षकांत असलेले बहुसंख्य हे फक्त मार्मिक वाचणारे आणि इतर कोणत्याही पक्षाच्या सभेला न गेलेले असत. त्यानंतर १९७१ ला प्रथम लोकसभेची निवडणूक लढवली आणि त्यात इतर विरोधी पक्षांप्रमाणे दारुण पराभव झाला. त्यानंतर १९७१ ते १९८५ च्या निवडणूकीपर्यंत उघडपणे काँग्रेसचे समर्थन करत असत. आणिबाणीत त्याचा कळस झाला होता. इतकी वर्षे काँग्रेसचे समर्थन करून आपले स्थान बळकट करता येत नाही. याचा साक्षात्कार झाला आणि हिंदुत्ववादी विचार स्विकारला.
    आता पूर्ववत काँग्रेसवादी होऊन हिंदुत्ववाद्यांना हिणवत आहेत. हे फक्त सामना वाचत असलेल्यांना पटेल पण इतरांना पटेल का? आता शिवसेना ३५ वर्षे मागे का जात आहे? त्यांचा चंद्रबाबू होणार ही काळ्या दगडावरची रेख आहे.

    ReplyDelete
  8. खूपच छान राजकीय विश्लेषण

    ReplyDelete
  9. चंद्राबाबू चे छान उदाहरण.शिवसेना एन डीएत आहे.निवडणूकपूर्व युती झाली.टोकाबाहेर बार्गेनिंग अपयशाकडे नेते.छान लेख

    ReplyDelete
  10. Shivsenas unique selling point is Marathi manoos and Hindutva.So common point of Hindutva and strong nationalism gels well With BJP.If SS remain together with BJP in near future both of them occupy d space created by ncp and congress.And hence there is every chance that BJP and SS will become only two main parties in Maharashtra.This time due to d support garnered by Shared Pawar this process is delayed by 5yrs.But this is going to happen.Hence from longterm view for both BJP and SS shud continue UTEE and form govt.

    ReplyDelete
  11. भाऊ, सगळं ठिक. पण भाजपने तरी इतका अडमुठेपणा का दाखवायचा? हा भाजपचा नालायकपणा झाला. तुम्हाला नितीशकुमार चालतो, चौतला चालतो, त्यांना त्यांच्या कलाने सगळं मिळतं, मग सेनेला का नाही?

    ReplyDelete
    Replies
    1. कारण ते सत्तेत राहून सामनातून सरकारविरोधी लेख लिहीत नाहीत आणि सरकारला "इशारे" देत बसत नाहीत. सत्तेत असल्याप्रमाणे वागतात.

      Delete
    2. दुप्पट जागा मिळवूनही भाजपने शिवसेनेचा मुख्यमंत्री का कबूल करावा,हे जे काही सुरू आहे ते शुद्ध ब्लॅकमेलिंग आहे. ब्लॅकमेलिंग मध्ये नेहमीच ब्लकमेलर हा नुकसान सहन करतो कारण ब्लॅकमेल व्हायला नकार दिल्यानंतर ब्लकमेलरची हालत खराब होत असते. भाऊंनी छान सोदाहरण समजावून सांगितले आहे.

      Delete
  12. दोन दिवसांपासून माझ्याही मनात चंद्राबाबूंचाच विचार आला व त्यांची सध्याची परिस्थिती. आजचा ब्लॉग त्यामुळे मनाला खूपच भावला.

    ReplyDelete
  13. बरं झालं तुम्ही लिहीलात भाऊ . भाजपसमर्थक आधीच बॅकफूटवर गेले होते . निदान आता तरी त्यांना धीर येईल .😁

    ReplyDelete
  14. हे मात्र शंभर टक्के खरंय

    ReplyDelete
  15. इतिहासाचे अवलोकन करून अतिशय समर्पक तुलना!

    ReplyDelete
  16. भाजप-सेना युतीला सरकार स्थापन करता आले नाही व त्यामुळे मध्यावधी निवडणुक झाली तर सेना व भाजप या दोघांचाही दारूण पराभव होऊन कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सत्तेवर येईल.

    युती करताना अत्यंत अव्यवहार्य व भरमसाट आश्वासने सेनेला दिल्याने, ती आश्वासने पूर्ण करण्याची संपूर्ण जबाबदारी भाजपचीच आहे. अन्यथा सेनेची फसवणूक होईल. सेना जे मागते आहे ते योग्यच आहे कारण भाजपने तसे जाहीर आश्वासन दिले होते.

    सेनेला जास्तीत जास्त वाटा देऊन सेनेचे समाधान करून युती सरकार स्थापन झाले नाही तर दोघेही संपतील व असे होण्यासाठी भाजपच जबाबदार असेल.

    ReplyDelete
    Replies
    1. आश्वासनाची जाहीर सभितील व्हिडिओ आहे काय मी शोध घेतला पण मिळाला नाही .. असल्यास लिंक टाका

      Delete
    2. जाहीर आश्वासन? अजिबात नव्हे..उलट जाहीरपणे फडणवीस मुख्यमंत्री होणार असे अमित शाहदेखील म्हणालेले , तेसद्धा विधानसभा निवडणुकीच्या आधीच. तेव्हा उधोजिंचे तोंड शिवले होते का?

      Delete
  17. Bhau khup Chan tumi explain kela ahe. kharch balasaheb thakare Astana Shivaena ha word khup strong hota. Pan ata te kahi disat nahi ahe. Ani he swatchya payvar dagad marun ghet ahe. Pawar sarakhi Manus tyana ajun divachat ahe

    ReplyDelete
  18. मुळात सध्याचा भाजप हा विश्वास घातकी पक्ष आहे असेच चित्र आहे. कोणताही मित्र पक्ष ते टिकावू शकले नाही. लोकसभा निवडणुकीत जे काही आश्वासन दिले असेल ते आता पाळायला तयार नाहीत, त्यामुळेच शहा आता बोलायला तयार नाहीत. फडणवीसांनी आपल्याच पक्षातील सिनियर सहकाऱ्यांचे खाच्चीकरण केले आहे. त्यामुळे फडणवीस आता एकटे पडले आहेत. मुळात भाजपने, जनतेला गृहीत घरून जी मेगभरती केली त्याचे हे फलित आहे.

    ReplyDelete
  19. भाजपने बिहारमध्ये पूर्वी समतपक्षापेक्षा जास्त आमदार असूनही उदारमनाने नितीशकुमार यास मुख्यमंत्रीपद दिले आणि मग तोंडघशी पडले.ती चूक भाजपा पुन्हा करेल असे वाटत नाही.मात्र शिवसेनेने राष्ट्रवादीच्या मदतीने मुख्यमंत्रीपद मिळवले तर ती शिवसेनेची आत्महत्या ठरेल.

    ReplyDelete
  20. भाऊ, तुम्ही मराठा नंतर सामना मध्ये पण होतात, सध्याचे संपादक कमीत कमी तुम्हाला तरी ओळखत असतील आणि तुमचे लेख वाचत असतील असे समजुया, कारण काल परवा ते मी तरुण भारत वृत्तपत्र ओळखत नाही म्हणत होते

    ReplyDelete
  21. हे निरिक्षण योग्य आहे.

    ReplyDelete
  22. आता तरी दोन्ही पक्षांनी विचार करून सत्ता स्थापनेचा मार्ग लवकर निवडावा.

    ReplyDelete
  23. एकदम खरं आहे हे शिवसेना आत्महत्याच करतेय

    ReplyDelete
  24. शिवसेनेने जर शेतकर्याकडे लक्ष दिले तर पुर्ण गेमच चेंज होईल

    ReplyDelete
  25. मला एक कळत नाही असा कोणतं सत्तेचं काम आहे जे शिवसेना उप मुखमंत्री होऊन करू शकली नसती . हा फक्त इगो आहे जो त्यांना डुबवणार . मंत्री पद म्हणाल तर महत्वाचे बरेच मंत्री पद भाजपाला द्यावे लागले असते आणि हो जर भाजप ने काही दगा केला तर मग सरकार पडायचे होते .

    विनाशकाले विपरीत बुद्धी !!!!!!!

    ReplyDelete
  26. सर , माझे काही प्रश्न आहेत.

    १) ९० पासून युती आहे, आणि युतीमध्ये भाजपाचाच फायदा होत आहे, हे दिसत असून त्याला प्रतिबंध करण्यासाठी सेनेकडून काहीच केले गेले नाही का?

    २)प्रतिबंधानंतर स्वतःची वाढ करण्यासाठी सेनेकडून काय करणे अपेक्षित होते? व ते का केले गेले नाही?

    ३) युतीत राहून भाजपा असे कोणते डावपेच खेळत होता की जे सेनेला त्याच युतीत शक्य नव्हते?

    4) युतीमध्ये राहून वाढ होत नाही, मान्य! पण बाहेर पडल्यानंतर वाढ कशी होणार आहे? आणि ज्यामुळे होईल ते युतीमध्ये का करता येत नव्हते?

    ३) सेनेची ताकद 50-60 च्या वर जात'च' नाही? राष्ट्रवादीची ताकद 50-60 च्या वर जात'च' नाही. अगदी मा. बाळासाहेब ठाकरे आणि मा. शरद पवार असे मातब्बर नेते असूनदेखील 50-60 च्या वर ताकद का जात नाही? त्याचवेळी तुम्ही सांगताय तसे भाजपा कुठच्या कुठे निघून गेला? त्यांच्याकडे तर राज्यपातळीवर तसा 'सक्षम ' कोणी नेतासुद्धा नाही. मग असे का होते आहे?

    4) पवार साहेबांची ताकद 50-60 आमदारांच्या पलीकडे गेल्या 40 वर्षात का गेली नाही?

    सर, प्लिज उत्तर द्या.मला समजून घ्यायला आवडेल

    ReplyDelete