(डावीकडून दुसरे हशू अडवाणी)
आज याक्षणी किंवा गेला महिनाभर ज्याप्रकारे मी इथे राजकीय विश्लेषण करीत आहे, त्यातून शिवसेनेचे समर्थन होते असे कोणालाही वाटले तर नवल नाही. पण जो चोखंदळ व चिकित्सक वाचक असेल, त्याला त्यातला आशय नक्की समजू शकेल. इथे कधीच शिवसेनेचे म्हणजे पर्यायाने शिवसेनेच्या नेतृत्वाचे वा त्यांच्या निर्णय धोरणांचे समर्थन झालेले नाही, की करणारही नाही. पण त्याचवेळी त्या पक्षातल्या उत्साही कार्यकर्त्यांना पाठबळ देण्याची मला अजिबात लाज वाटत नाही. आणि त्यात एकट्या शिवसैनिकालाच पाठबळ दिले जाते असेही कोणी मानू नये. जसे निष्ठावान व निस्पृह कार्यकर्ते शिवसेनेत आहेत, तितकेच निरपेक्ष कार्यकर्ते प्रत्येक पक्ष व संघटनेत असतात. त्यांच्याशिवाय कुठलीच संघटना उभी राहू शकत नसते. कम्युनिस्ट असोत किंवा रा. स्व. संघ असो, त्यांना अशाच कष्ट उपसणार्या कार्यकर्त्यांनी बळ दिले आहे. पण जेव्हा त्याच बळावर उभे रहाणारे आपल्या पायावर कुर्हाड मारायला जातात, तेव्हा त्या पायांना वाचवायला कोणी तरी पुढाकार घ्यावा लागतो. कारण त्या कार्यकर्ता मनोवृत्तीला जपण्याची निकड असते. ज्यांनी त्याचे लाभ उठवले आणि मोठे झाले, त्यांनीच आपापल्या मतलबासाठी कार्यकर्ता खच्ची करायचा विडा उचलला, तर संघटना व तिच्या नावापेक्षा त्यामागची मनोवृत्ती जगवणे अगत्याचे होऊन जाते. तेच काम गेल्या दोन वर्षात नरेंद्र मोदी यांनी केले आणि आपल्याच नेत्यांना, ज्येष्ठांना बाजूला सारत पक्षातल्या कार्यकर्त्याला नवी उभारी दिली. तोपर्यंत मान खाली घालून बसलेल्या अनेक भाजपावाल्यांना आज झिंग चढलेली आहे. त्यापैकी कितीजणांना मागल्या दहा वर्षात अशी मस्तवाल भाषा बोलता येत होती? तेव्हा जी भाषा सेक्युलर व कॉग्रेसजनांच्या तोंडी होती आणि भाजपाला सतत खिजवले जात होते, तीच भाषा आज भाजपावाले सेनेसाठी वापरत आहेत. ह्याला काळाचा महिमा म्हणतात.
थोडे मागे इतिहासात जायला हरकत नाही. आज मोठ्या आवेशात सेनेची खिल्ली उडवणार्यांचा कदाचित तेव्हा जन्मही झालेला नसेल. त्यामुळे आज आपला चेहरा कोणासारखा दिसतोय, त्याचे त्यांनाही भान नसावे. १९८४ च्या अखेरीस इंदिरा हत्येनंतर झालेल्या लोकसभा निवडणुका सहानुभूतीच्या लाटेत वाहून गेल्या होत्या. त्यात तमाम बिगर कॉग्रेस पक्षांची अवस्था आजच्या शिवसेनेपेक्षा खुपच दयनीय झाली होती आणि त्यातलाच एक पक्ष होता भाजपा. पहिली लोकसभा निवडणूक लढवताना त्याचे अवघे दोन खासदार लोकसभेत पोहोचू शकले होते आणि चरणसिंग यांच्या लोकदलाचे तीन. तेव्हा ४१५ जागा जिंकणारे राजीव गांधी काय म्हणाले होते? ‘अरे ये तो दो या तीन रह गये. लोकदल तो परलोक सिधारा’. त्यावेळी अडवाणी किंवा भाजपावाल्यांचे चेहरे कसे होते? आज त्याचा मागमूस त्याच चेहर्यावर दिसत नाही. पण त्यांच्या चेहर्यावर राजीव गांधींचे तेव्हाचे सर्व भाव जसेच्या तसे दिसत आहेत. तेव्हा राजीवना ४०० हून अधिक जागा मिळाल्या होत्या. चार पंचमांश इतके ते बहूमत होते. भाजपाला साधे बहूमतही राज्य विधानसभेत मिळालेले नाही, तर त्यांनी राजीव गांधींचा अवतार धारण केलाय. पण त्याच वेळी तीस वर्षापुर्वीच्या कॉग्रेसवाल्यांचे चेहरे मात्र तीन दशकांपुर्वीच्या भाजपावाल्यांसारखे दिस्रत आहेत. तेव्हाही माझ्यासारख्या मुठभर लोकांनी असेच भाजपा वा लोकदल आदी पक्षांना धीर देण्यात पुढाकार घेतला होता. राजीव गांधीच्या लाटेत सगळेच वाहून जात असताना, गटांगळ्या खाणार्यांना धीर देण्याची गरज होती. त्याला आम्ही पराभूत भाजपाचे समर्थन समजलो नव्हतो. म्हणूनच आजही चालले आहे, ते शिवसेनेचे समर्थन नाही. वास्तवाची जाणीव विजयाच्या क्षणी राहिली नाही, मग त्या यशाला नाट लागते आणि विजयाची झिंग चढू लागते. ती उतरवणारा नाही, तरी सावधानतेचा इशारा देणारा कोणी असावा लागतो.
त्या १९८४ च्या राजीव लाटेत अटलबिहारी यांच्यासारखे दिग्गजही पराभूत झाले होते. त्या पराभवाला हिणवण्यात आम्ही धन्यता मानायची होती काय? अडवाणींना ‘तुमची हीच लायकी’ असे खिजवण्यात शहाणपणा होता काय? तितक्या दूर तरी कशाला जायचे? अवघ्या पाच वर्षापुर्वी २००९ सालात मागल्या लोकसभा निवडणूका झाल्या, तेव्हा भाजपाच्या वाट्याला काय आले होते? मतमोजणी सुरू होईपर्यंत भाजपाचे तमाम नेते विजयाची गाजरेच खात होते आणि खुद्द अडवाणी ‘सबसे निकम्मा प्रधानमंत्री’ अशी मनमोहन सिंग यांची हेटाळणी करीत होते. मग मतमोजणीच्या दुपारी कौल स्पष्ट झाला, तेव्हा सगळ्या वाहिन्यांवर एकच गाणे वाजत होते, ‘सिंग इज किंग’. तेव्हा कॉग्रेसवाल्यांची भाषा काय होती? त्यांनी अडवाणींचे कौतुक चालविले होते, की भाजपाला खिजवले होते? तेव्हा मतदाराने कोणाला लायकी दाखवून दिली होती? अडवाणींचा तो ओशाळवाणा चेहरा आजही मला आठवतो. तेव्हा किती भाजपावाले ‘वास्तवाचे भान’ ठेवून अडवाणींना त्यांची लायकी सांगायला हिरीरीने पुढे सरसावले होते? वास्तवाचे भान अशी सोयीची बाब नसते. तेव्हा ज्यांनी अडवाणींना खडे बोल ऐकवण्याची हिंमत केली असेल, त्यांनी आज जरूर शिवसेनेला किंवा उद्धव ठाकरे यांना वास्तवाचे शहाणपण शिकवावे. राजकारणात व निवडणूकीच्या यशापयशाचे स्वरूपच औटघटकेचे असते. विजयाची मस्ती पुढल्या अपयशाची पेरणी करीत असते. कारण इंदिराजी, राजीव किंवा सोनियांची जादू कायम चालणारी नसते, तशीच मोदी नावाची जादूही अमरत्व घेऊन आलेली नसते. विजय मिळवण्यापेक्षा तो पचवण्याची क्षमता अशा जादूला दिर्घकालीन बनवू शकत असते. ज्यांना आपलेच पुर्वकालीन कटू अपयश आठवत नाही, त्यांच्यासाठी पुढल्याच वळणावर पराभव दबा धरून बसलेला असतो, असे इतिहासच सांगतो. पण बिचार्या इतिहासाचे ऐकतो कोण?
१२३ आमदार निवडून आल्याची धुंदी अनेकांना चढली असताना माझ्या माहितीतल्या तीन जागा भाजपाने गमावल्याची वेदना अधिक व्याकुळ करणारी वाटते. जेव्हा जनसंघाला महाराष्ट्रात कोणी फ़ारशी किंमत देत नव्हते, तेव्हा १९६७ सालात हशू अडवाणी यांनी चेंबूरमधून विधानसभेत बाजी मारली होती. पुढे हयात असेपर्यंत त्यांनी त्याला आपला बालेकिल्ला बनवून ठेवला. तशीच कोकणातल्या गुहागर आणि देवगड (कणकवली) ची गोष्ट. अपार कष्ट करून ज्यांनी हे मतदारसंघ प्रतिकुल परिस्थितीत पक्षाची संघटना उभी करून जिंकले, तेच यावेळी भाजपाने गमावले आहेत. त्याच्या बदल्यात दहापटीने नव्या जागी आमदार निवडून आलेत, यात शंका नाही. पण जे आलेत ते कितपत टिकतील, याची शंका आहे. प्रतिकुल परिस्थितीत झुंजून उभी केलेली संघटना व पक्ष कुठल्याही प्रलयाला झुगारून कायम टिकून रहातात. या तीन जागा माझ्या माहितीतल्या. अजूनही अशा मुठभर जागा असतील. पण त्या जागा यावेळी सत्ता मिळवताना भाजपाने गमावल्या असतील, तर त्याची वेदना मला अधिक आहे. कारण त्यांच्या गमावण्याने अथक परिश्रम घेतलेल्या शेकडो कार्यकर्त्यांची मेहनत वाया गेली आहे. उसनवारीच्या आयात उमेदवारांचे यश पक्षासाठी कायम टिकणारे नाही किंवा पक्षाचे संघटनात्मक बळ वाढवणारे नाही. मात्र हशू अडवाणी, डॉ. श्रीधर नातु, गोगटे-जठार यांच्या गमावलेल्या जागा मोठे नुकसान आहे. मागल्या विधानसभेच्या वेळी युतीमध्ये भाजपाने गुहागरची जागा भाजपाने शिवसेनेच्या रामदास कदम यांच्यासाठी सोडली, तेव्हा मी भाजपावर कडाडून टिका केली होती आणि ती सुद्धा ‘मुंबई तरूण भारत’ या भाजपाप्रणित दैनिकातच. कारण माझ्या मते एका आमदारापेक्षा भाजपाच्या कार्यकर्त्याचा तो मुखभंग मोठा हानिकारक होता. आज तीही जागा भाजपाने गमावल्याच्या वेदना म्हणूनच जिंकलेल्या १२३ जागांच्या आनंदापेक्षा अधिक दाहक आहे.
ज्या ज्या पक्षाने वा नेतृत्वाने आपल्या कार्यकर्त्यांना झुगारून विजयाच्या उन्मादात रंगल्या तोंडाचे मुके घेण्यात पुरूषार्थ शोधला, त्यांना इतिहासाच्या कालचक्राने कुठल्या कुठे गायब करून टाकले, त्याचा थांग लागत नाही. ४१५ खासदारांचे पाठबळ लाभलेल्या कॉग्रेसला तीन दशकानंतर त्याच लोकसभेत विरोधी पक्ष म्हणून मान्यता मिळवायला गयावया कराव्या लागत आहेत. उलट त्याचवेळी २८२ जागा मिळवणार्या भाजपावाल्यांना मात्र राजीव गांधींपेक्षा अधिक झिंग चढली आहे. त्यांना महाराष्ट्रात हुकलेल्या बहूमतातही अजिंक्य अढळपद मिळाल्याची नशा बेभान करते आहे. उसनवारीच्या उमेदवारातून मिळालेल्या १२३ जागांच्या मेजवानीत कार्यकर्त्याची कष्टाची भाकरी त्यांना भिकारडी वाटत आहे. नुसती वाटत नाही, तर त्या कष्टाच्या भाकरीची हेटाळणी करण्यात आपल्या विजयाची स्वप्ने रंगवायची आहेत. संघाच्या नऊ दशकाच्या अपार कष्टापेक्षाही अन्य पक्षातल्या उसनवारीने मिळवलेल्या विजयात रममाण झालेल्यांना, शुभेच्छाच वाचवू शकतात. माळीन गावात धावलेल्या अथवा अन्य आपात प्रसंगी निस्पृह भावनेने राबणार्या स्वयंसेवकापेक्षा, राष्ट्रवादी कॉग्रेसमधून कालपरवा भाजपात दाखल झालेल्यांची प्रतिष्ठा वाढते; तेव्हा माझ्यासारख्या केवळ कार्यकर्त्याच्या पूजकाला संकटाची चाहुल लागत असते. सव्वाशेपेक्षा शंभरच भाजपाचे ओरीजिनल कार्यकर्ते आमदार झाले असते आणि भले सत्तेचे गणित हुकले असते, तरी मी भाजपाचे दिलखुलास स्वागत केले असते. दिर्घकाळ पक्षाच्या उभारणीसाठी राबलेल्यांना बाजुला फ़ेकून, सत्तेचे गणित जमवताना मिळवलेला हा विजय ज्यांना सुखावतो, त्यांनाच तो लखलाभ होवो. भाजपाच्या मुखवट्यातला कॉग्रेसचा चेहरा मला भावणार नाही. माझ्यासाठी इर्षेने लढणारा शिवसैनिक किंवा माळीन गावात कुठलीही अपेक्षा नसताना मृतदेह उचलणारा स्वयंसेवक व कार्यकर्ताच जास्त मोलाचा आहे. मी त्याची तळी उचलतच राहीन. मग तो कुठल्याही पक्षाचा वा संघटनेचा असो.