ज्या दिवशी महाराष्ट्रातील विधानसभेचे मतदान झाले, त्याच संध्याकाळी अनेक वाहिन्यांनी एक्झीट पोल नावाचा कार्यक्रम सादर केला होता. त्यात कुठल्या पक्षाला किती यश व जागा मिळू शकतील, याचा उहापोह झाला होता. त्यापैकी ‘एबीपी माझा’ या वाहिनीवर सहभागी झालेले दोन पाहुणे होते, द्वारकानाथ संझगिरी आणि अजित सावंत. यातले अजित सावंत यांची उमेद कॉग्रेस पक्षात गेली आहे. एकदा त्यांनी माहिममधून कॉग्रेस उमेदवार म्हणून विधानसभेची निवडणुकही लढवलेली आहे. मागल्या पालिका निवडणुकीत मुंबई प्रदेश कॉग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंग यांनी अधिकाधिक अमराठी उमेदवारांना पक्षाची तिकीटे वाटण्यात भ्रष्टाचार केल्याचा आरोप केल्याने सावंत यांची पक्षातून हाकालपट्टी झाली होती. तरीही कॉग्रेसने निष्ठावंत म्हणून त्यांनी सातत्याने सेना-भाजपा यांच्या विरोधातच भूमिका मांडलेली होती. मध्यंतरी लोकसभा निवडणूकीच्या कालखंडात त्यांनी आम आदमी पक्षाची कास धरली होती. पण तिथेही त्यांच्या फ़टकळपणाची डाळ शिजली नाही. सहाजिकच आज ते कुठल्याच पक्षात नाहीत. मुद्दा इतकाच, की त्यांचा शिवसेनेशी दूरान्वये संबंध जोडता येणार नाही. दुसरे पाहुणे त्यात सहभागी झाले होते संझगिरी. त्यांचे सानेगुरुजीप्रेम जगजाहिर आहे. त्यांची उमेद समाजवाद्यांच्या सहवासात गेलेली आहे. अशा या दोघांची त्या दिवशीच्या एक्झीट पोल कार्यक्रमातील भाषा व वक्तव्ये थक्क करून सोडणारी अशी होती. कुठल्याही कडव्या शिवसैनिकालाही लाजविल, अशा भाषेत हे दोघे मुंबईतल्या मराठी अस्मितेची बाजू तावातावाने मांडत होते. ज्यांनी तो कार्यक्रम बघितला असेल, त्यांना याचे नवल वाटल्याशिवाय रहाणार नाही. कारण या दोघांनी सातत्याने शिवसेनेच्या आक्रमक पवित्र्याची टिंगलच केलेली आहे. पण त्या दिवशी त्यांचा आवेश सेनेच्या कुठल्याही कार्यकर्त्याला थक्क करणारा होता. याचे रहस्य काय असावे?
हे दोघे त्या अर्थानेही आजचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे समर्थक म्हणता येणारे नाहीत. मग त्यांच्यात असा शिवसैनिक त्या मतदानाच्या दिवशी कशाला संचारला होता? त्याचे उत्तर त्यांना कोणी विचारले नाही, किंवा त्यांनी तिथे स्वेच्छेने त्याचा खुलासाही केलेला नाही. पण चार दिवसांनी जे मतमोजणीतून निकाल लागले, त्यातून याचा खुलासा झालेला आहे. मुंबईतून मराठी माणसाचा टक्का प्रचंड प्रमाणात घसरलेला असताना अणि जवळपास सर्वच अमराठी मुंबईकर सेनेच्या विरोधात उभे असताना, मुंबईत सेनेच्या १४ जागा निवडून आल्या, त्या यशातच संझगिरी व सावंत यांच्यातला शिवसैनिक दडलेला होता. यावेळच्या मुंबईतल्या मतदानाचे प्रचंड धृविकरण झाले आणि पक्षाच्या व जातधर्माच्या सीमा ओलांडून मराठी माणसाने शिवसेनेला एकहाती मतदान केले. किरकोळ प्रमाणात भाजपा, कॉग्रेसकडे मराठी लोक झुकलेही असतील. पण अमराठी मतदाराशी मराठी म्हणून झुंज असल्याचे प्रतिबिंब मतदानात पडले आणि त्याचाच पडसाद या दोन बिगर शिवसैनिक असलेल्या पाहुण्यांच्या वक्तव्यातून निनादत होता. आज साधारण २५ टक्क्यांपर्यंत मुंबईचा मराठी लोकसंख्येचा टक्का घसरला असल्याचे म्हटले जाते. त्यातून सेनेला इतके आमदार मुंबईतून निवडून आणणेच अशक्य होते. कारण एकगठ्ठा गुजराती मुंबईकर मोदींसाठी भाजपाच्या बाजूला झुकलेला होताच. पण आजवर सेनेच्या विरोधात कॉग्रेसच्या पाठीशी ठामपणे उभा रहाणारा हिंदी भाषिक व दाक्षिणात्य असा अन्य मुंबईकरही भाजपाकडे झुकला. त्यामुळेच भाजपाला मुंबईत इतके मोठे यश मिळू शकले. सेना त्यामुळेच मागे पडली. पण तरीही सेनेला तुल्यबळ जागा मिळू शकल्या. त्या मिळवून देणारा मतदार शिवसेनेचा जुना निष्ठावान मराठी मतदार नव्हेतर इ्तर पक्षाकडे असलेला मराठी माणूसही ‘इज्जतचा सवाल’ म्हणून सेनेच्या पाठीशी एकवटला.
ज्याला राजकीय भाषेत धृविकरण म्हणतात, तसे यावेळी मुंबईत गुजराती व मराठी माणसाचे विभाजन झालेले आहे. त्याचा लाभ भाजपाला मिळाला. पण नेमक्या त्याच कारणाने सेनेपासून दिर्घकाळ दूर राहिलेल्या मराठी मुंबईकरालाही सेनेच्या गोटात यावेळी धृविकरणाने आणले. ही किमया अर्थातच सेनेच्या ‘अपप्रचाराने’ केली असे कोणीही म्हणू शकतो. पण ती वस्तुस्थिती नाही. कारण संझगिरी वा सावंत यासारखी मंडळी अपप्रचाराला भुलण्याइतकी बावळट वा भाबडी नाहीत. त्याच कार्यक्रमात सहभागी झालेले ‘लोकसत्ता’चे स्तंभलेखक संजय पवार यांनीही जवळपास तीच भाषा वापरली. मोदी पंतप्रधान झाल्यापासून गुजराथी माणसांची अरेरावी वाढली आहे. घाटकोपर मुलूंडला ट्रेनमध्ये चढणार्या व भजनांचा धुमाकुळ घालणार्यांना माज आला आहे, असे डाव्या विचारांकडे झुकलेले पवार म्हणतात, तिथे त्यांचा कल स्पष्ट होतो. अशा प्रत्येकाला शिवसैनिक म्हणता येणार नाही, की उद्धव ठाकरे यांचा भक्त म्हणता येणार नाही. पण त्यांनी कोणाला मत दिले असेल, त्याचा अंदाज येऊ शकतो. असली भावना शिवसेनेने मुंबईत वा महाराष्ट्रात जोपासली काय? शिवसेनेची मराठी अस्मिता राजकीय असेल, पण या तीन पाहुण्यांनी उघड व्यक्त केलेली अस्मिता कुठली होती? त्यांच्यासारखे लक्षावधी मराठी लोक असतील, ज्यांना शिवसेना, तिचे राजकारण, वर्तन वा धोरणे अजिबात मंजूर नसेल, त्यांनीही यावेळी सेनेच्या उमेदवाराला घराबाहेर पडून अगत्याने मते दिली. तसे झाले नसते, तर सेनेला १४-१५ आमदार मुंबईत निवडून आणणेच अशक्य होते. सेनेचा हटवाद, आडमुठेपणा असे आरोप होऊ शकतात. पण त्यांच्या त्या ‘पोरकटपणा’ला मुंबईच्या मराठी मतदाराने इतका भरभरून प्रतिसाद कशाला द्यावा? उद्धव त्यांचा लाडका नेता नक्कीच नाही. मागल्यावेळी सहा आमदार दिलेल्या मनसेकडेही मराठी माणसाने साफ़ दुर्लक्ष करीत, उद्धवला साथ कशाला द्यावी?
साधी गोष्ट आहे. शिवसेना मराठी माणसाला हवीहवीशी वाटते. शिवसेनाच मराठी अस्मितेसाठी आक्रमक होते. असे खुलासे खुप होऊ शकतील. पण त्यात अजिबात तथ्य नाही. त्यासाठी आपल्या वैचारिक, धोरणात्मक वा पक्षीय सीमारेषा ओलांडून मराठी माणूस जाणार नाही. कारण डिवचले नाही, तर मराठी माणूस वैचारिक भूमिका सोडत नाही. यावेळी मराठी माणुस डिवचला गेला होता. त्याचा राजकीय लाभ शिवसेना किंवा उद्धव ठाकरे यांना जरूर मिळाला. पण ज्यांनी असे शिवसेनेला मतदान केले, त्यांनी सेनेच्या पारड्यात उद्धव किंवा शिवसेनेसाठी मते टाकलेली नाहीत. त्यांनी मराठीपणाला डिवचणार्यांच्या विरोधातल्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मात्र त्याचे स्पष्टीकरण कुठल्या विवेचनात आलेले नाही, किंवा खुद्द शिवसेनेच्या नेतृत्वाला त्याचा थांगपत्ता लागलेला नाही. ते आपल्याच अहंकारात मग्न आहेत आणि आपल्याच एकूण निवडणूक पराभवाच्या जखमांवर फ़ुंकर घालण्यात गर्क आहेत. कारण त्यांनाही अजून मिळालेली मते शिवसेनेची वाटत आहेत आणि मतदाराने असा कल कशाला दिला, ते उमजू शकलेले नाही. भाजपाच्या अनेकांना तर शिवसेनेला आपण खच्ची केल्याच्या उकळ्या फ़ुटलेल्या आहेत. पण आपण कुठल्या पायावर आज उभे आहोत, त्याचा पत्ता लागलेला नाही. म्हणूनच असे लोक सेनेला अजून खिजवण्यात रमले आहेत किंवा हिणवण्यात धन्यता मानत आहेत. नरेंद्र मोदी ही आपल्या हाती लागलेली जादूची कांडी आहे, अशा समजुतीने भाजपाला पछाडले आहे. पण मोदी नावाची जादू कुठल्या अस्मितेतून उदयास आली, त्याचे त्यांनाही भान उरलेले नाही. मग मराठी अस्मिता यापैकी कुणाला उमगावी? शिवसेना हे एका पक्षाचे नाव असले, तरी ती मराठी मनातली सुप्त इच्छा आहे. ती बाळासाहेबांची वा उद्धव यांची मालमत्ता नाही. पण आज तरी उद्धव व त्यांचा पक्ष त्या अस्मितेचे प्रतिक आहे. त्याची बूज राखण्यात तोच पक्ष तोकडा पडला, तर त्यालाही बाजूला करून मराठी अस्मिता नवा पर्याय उभा करू शकते, असे इतिहास सांगतो. हे सर्वांनी लक्षात घेतलेले बरे.
Bhau jabardast lekh...pan shivsene chya senapati na ya gostinch vishleshan karavas vatat nahi...te swatacha ahamgand japanyat magn ahet
ReplyDeleteएकदम सटीक भाऊ! निशब्द होऊन तुम्हाला एक सलाम ठोकतो!
ReplyDelete