Wednesday, October 22, 2014

शिवसैनिक जिंकले, मग हरले कोण?



गेल्या रविवारी विधानसभा निवडणूकीचे निकाल लागल्यापासून राज्यात कुठले सरकार येणार, त्यावर गुर्‍हाळ चालले आहे. एकूणच अशी अपेक्षा होती, की भाजपाचे बहूमत हुकल्याने पुन्हा सेना भाजपा युती होईल. पण त्यात राष्ट्रवादीतर्फ़े शरद पवार यांनी बिनशर्त पाठींबा भाजपाला जाहिर केल्याने सगळी समिकरणेच बदलत गेली. आधीच युती तुटल्याने दोन्ही मित्र पक्षात कटूता आलेली होती आणि या अनपेक्षित पाठींब्याने त्या कटूतेत भर घालायला मदत केली. आता भाजपाला सेनेकडे जावे लागणार असे म्हटले जात असतानाच, राष्ट्रवादीने त्याची गरज नसल्याचे सूचित केले. त्यामुळेच मग प्रचाराच्या काळात एकमेकांवर दोन्ही मित्रांनी केलेल्या आरोपांना नवी धार आली. भाजपाचे प्रमुख प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेवर टिका करणार नाही, अशी आधीच भूमिका घेतली होती. सहाजिकच भाजपाकडून कटूता येऊ नये, याची पुरेशी काळजी घेतली गेली होती. पण आपणच शिवसेनाप्रमुख असल्याच्या भ्रमात असलेल्यांच्या भाषेने मात्र ती मर्यादा संभाळली नाही. बाळासाहेबांची भाषा त्यांना शोभत होती. इतरांनी तशी भाषा बोलणे वा तसा अभिनिवेश आणण्यात अर्थ नसतो. त्याचे भान सेनेच्या मुखंडाना राहिले नाही. आता निकालानंतर त्याचीच किंमत त्यांना मोजायची पाळी आलेली आहे. कारण अशी तोंडपाटिलकी करणारे आखाड्यात उतरून संघर्ष करत नाहीत, की लढाईच्या परिणामांना सामोरे जाण्याची त्यांच्यात ताकद नसते. ते सारे घाव सामान्य शिवसैनिकाला भोगावे लागत असतात. आताही स्वबळाची लढाई सामान्य शिवसैनिक लढला आहे आणि त्याने युती तुटल्यावरही ६३ जागा जिंकून दाखवल्या आहेत. राज्यभर प्रथमच शिवसेनेने आपले बळ सिद्ध केले आहे. त्यामुळेच आजवरच्या लोकसभा, विधानसभा निवडणूकीतले हे शिवसेनेचे सर्वात मोठे यश मानायला हरकत नाही.

बाळासाहेबांच्या निर्वाणानंतर शिवसेना पंगू झाली, वाटणार्‍यांना सामान्य शिवसैनिकाने तितक्याच ताकदीने लढून दाखवले आहे. एका बाजूला राज्यातले राष्ट्रवादी व कॉग्रेस असे प्रबळ पक्ष मोदी लाटेने कुठल्या कुठे फ़ेकले जात असताना, शिवसेनेने इतक्या जागा त्याच लाटेच्या विरोधात मिळवणे लक्षणिय आहे. मागल्या सर्व लोकसभा किंवा विधानसभा निवडणूका सेनेने युती म्हणून लढताना यश मिळवले होते. म्हणूनच जागावाटपाच्या वेळी परिस्थिती बदलल्याचे दावे भाजपाने केलेच.  लोकसभेत सेनेला मिळालेले यश तिचे स्वत:चे नाही, तर मोदी लाटेचे यश असल्याची खिल्ली उडवण्यात आलेली होती. पण विधानसभेच्या निकालाकडे नजर टाकली, तर सेनेला मिळालेली मते, नेमकी लोकसभेतील टक्केवारी कायम दाखवणारी आहेत. मात्र त्यापेक्षा जनतेने भाजपाला अधिक कौल दिला, ही वस्तुस्थिती आहे. त्याचे कारण अर्थात मोदींची लोकप्रियता हेच आहे. सहाजिकच मतदाराने त्या पक्षाला कौल दिला हे मान्य करून, शिवसेनेने भाजपाला सत्ताग्रहणास मान्यता देणे योग्य ठरेल. पण त्याचाच अर्थ सत्तेत सहभागी होणे किंवा सत्तेत वाटा मागणे असा होत नाही. सेनेची प्रचारातील भाषा व मुद्दे बघितले, तर सत्तेची सौदेबाजी करणे, नुसती मतदाराची फ़सवणूक नाही, तर सामान्य शिवसैनिकाच्या भावनांची केलेली प्रतारणा असेल. उलट युती तुटल्यानंतर घेतलेली भूमिका कायम ठेवून, विरोधी पक्ष म्हणून विधानसभेत बसणे हा सेनेसाठी योग्य व दुरगामी राजकारणातला लाभदायक मार्ग असू शकतो. अर्थात ज्याप्रकारचे सत्तालोलूप पक्षप्रमुखांच्या भोवताली आहेत, त्यांच्याकडून तशी अपेक्षा करता येत नाही. कारण त्यातल्या बहुतांश नेते, चौकडीला शिवसैनिकांच्या वा मतदारांच्या भावनेपेक्षा सत्तेची उब मोलाची वाटत आलेली आहे. त्यांना पक्षाच्या राजकीय भविष्यापेक्षा आपापले स्वार्थ मोलाचे वाटत असतील, तर कार्यकर्त्याच्या भावनांना विचारतो कोण?

असो, आज विरोधात बसण्याने शिवसेना काय साधू शकते? विधानसभेची संख्याच अशी आहे, की सेना बाजूला राहिली तर भाजपाने इतरांच्या मदतीने बनवलेले सरकार कायम पवारांच्या व राष्ट्रवादीच्याच मर्जीवर अवलंबून राहिल. त्याला पवारांची मर्जी जपूनच कारभार करावा लागेल. सहाजिकच पाच वर्षात राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर जे आरोप केलेत व कारवाईच्या डंका पिटलेला आहे, त्या कारवाया करता येणार नाहीत. कारण त्यांच्याच पाठींब्यावर हे सरकार तगून रहाणार आहे. पण विरोधी बाकावर बसून त्याच भाजपा सरकारकडे कारवाईची मागणी शिवसेना करत राहू शकते. त्यातून राष्ट्रवादी समर्थित भाजपा सरकार गोत्यात येऊ शकते. सेनेला ते पाडण्याचीही गरज असणार नाही. योग्यवेळी खुद्द पवारच ते परावलंबी सरकार पाडतील. पण त्यात आणखी दिडदोन वर्षे जातील. तेव्हा मोदीलाटेचा प्रभाव ओसरलेला असेल आणि आपल्याच आरोपाची चौकशी कारवाई न केलेल्या भाजपाला मतदारासमोर उत्तर देणे अवघड होऊन जाईल. ज्या जागांच्या बळावर आज भाजपा वरचष्मा गाजवते आहे, त्यांच्या बदल्यात भाजपाला मिळालेली मते निर्विवाद नाहीत. दोनचार टक्के मतांच्या घटीने असलेले संख्याबळ भाजपा निम्म्याने गमावू शकते. अर्थात तोपर्यंत सेनेला संयम दाखवणे शक्य झाले पाहिजे. सत्तेच्या खुर्चीसाठी उतावळे झालेल्यांना तितका संयम नसतो. म्हणूनच भाजपाकडून कुठला प्रस्ताव येत नसल्याचे दिसल्यावर सेनेचे नेते स्वत:च दिल्लीला जाऊन आले. बिनशर्त पाठींबा देत असल्याच्या बातम्याही सुत्रांकडून आल्या. त्याचाच अर्थ लढण्याची कुवत जी सामान्य शिवसैनिकाने दाखवली व सगळी शक्ती पणाला लावली, त्यांचे नेतेच शरणागत व्हायला उतावळे झालेत. त्यांनी निकालानंतर आपल्या हाती असलेला हुकूमाचा पत्ताही विचारात घ्यायची इच्छा गमावलेली असल्यावर, ‘सेना लढणार’ कशी व कशासाठी?

विरोधात बसायची ठाम भूमिका हाच सेनेसाठी आजच्याही परिस्थितीत हुकूमाचा एक्का आहे. त्यामुळे भाजपाचे सरकार बनण्यात अडचण येणार नाही. अल्पमताचे सरकारही भाजपा बनवू शकते आणि अशा सरकारला सतत राष्ट्रवादीच्या पाठींब्यावर अवलंबून रहावे लागेल. जितके त्यावर अवलंबून रहायचे तितके ते सरकार पवारांच्या हातातले खेळणे होऊ शकते. उलट त्याच राष्ट्रवादी मंत्र्यांवर सतत आरोपाची फ़ैरी झाडणार्‍या एकनाथ खडसे व देवेंद्र फ़डणवीसांना मंत्री म्हणून कुठलीच कारवाई शक्य नसेल आणि विरोधात बसून नित्यनेमाने शिवसेना कारवाईची मागणी करू शकेल. कारवाई होत नसेल, तर भाजपा-राष्ट्रवादीच्या मिलीभगतचा आरोपही सेना करू शकेल. थोडक्यात सत्ता हाती येऊनही भाजपाला काहीही करणे अशक्य, अशी त्यांची कोंडी होऊ शकते. पण यासाठी शिवसेनेकडे संयम असायला हवा. साडेचार वर्षाच्या सत्तेतून जी सत्तालोलूपता सेनेच्या काही नेत्यांमध्ये आलेली आहे, त्यांना इतका संयम राखणे अवघड आहे. त्याचीच चिन्हे निकालानंतर दोनच दिवसात दिसू लागली व सेनेचे दोन नेते दिल्लीला गेल्याच्या बातम्या झळकल्या. त्यालाही हरकत नाही. पण मग युती तुटल्यावर वा प्रचारात ‘दिल्लीला मुजरा’ करणार नाही, असल्या वल्गना करण्याचीही गरज नव्हती. ज्या मराठी माणसाने त्या अस्मितेच्या गर्जनांना प्रतिसाद दिला, त्याची अशा वागण्यातून सेना नेतृत्व प्रतारणा करीत नाही काय? कार्यकर्ता जिद्दीने लढला आणि त्याच्यासह मुंबईतल्या घटलेल्या मराठी मतदाराने १४ आमदार निवडून दिले, ते मोजक्या सत्तालंपट नेत्यांच्या हव्यासासाठी होते काय? पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांना त्याचा विचार करावा लागेल. अन्यथा पुढल्या निवडणूकीत तोही मराठी मतदार सेनेसोबत रहाणार नाही. त्याला अस्मितेसाठी सत्तेवर लाथ मारू शकणारा दुसरा पर्याय शोधावा लागेल. कारण लढणार्‍या सैनिकाला शरणागत सेनापती आवडत नसतो.


11 comments:

  1. The Cartoon exactly speaks out what you say in your blog

    ReplyDelete
  2. उत्तर भारतातील काही अंध मोदी भक्तान्ना उद्धव ठाकरेंचा नितीशकुमार झालेला पहायचा होता. त्यांचा जळफळाट समजू शकतो. परंतु भाजपचा मोदी लाटेचाच भोपळा फुटला व अमित शहाचे कारस्थान भाजप वरच उलटले हे वैशिष्ट्य. आता भाजपला सत्ता स्थापनेसाठी प्रादेशिक पक्षाबरोबर तडजोड करावीच लागेल ! शिवसेना मात्र विरोधी पक्षात बसून मजा बघू शकते. कारण पुढच्या वेळी काही कॉंग्रेस रा. कॉंग्रेस वेगळे असणार नाहीत, मोदी लाटेचे लाथेत रूपांतर झालेले असेल व एकट्याने लढण्याची भाजपमधे हिम्मत नसेल.

    ReplyDelete
  3. Replies
    1. श्री साहेब, शिवासेनेवर टीका केली की आपल्याला लेख चांगला वाटतो. परंतु भाजप विरोधात काही लिहले की आपण काय म्हणता याची जरा आठवण असू द्या. भाऊ सतत निपक्ष विश्लेषण करत असतात. हे लक्षात असू द्या!

      Delete
  4. भाऊ भारी लिहिलंय. " आली उर्मी साहे.... तुका म्हणे थोडे आहे...."

    ReplyDelete
  5. खरंय भाऊराव! शिवसेनेने विरोधी पक्षात बसायची तयारी केली पाहिजे. सत्ता आज आहे उद्या नाही. मराठी माणूस दुरावला की शिवसेनेची मनसे व्हायला वेळ लागणार नाही.

    शिवाय उद्धव ठाकऱ्यांनी प्रचंड संयम बाळगायला हवाय. शिवाजीमहाराज वगैरे निवडणुकीच्या प्रचारात येण्याचं कारणच नव्हतं मुळातून. आणि काय तो दिल्लीचा अफजलखान! हल्ली गावागावात फेसबुक पोचलंय. ताबडतोब टिंगलटवाळी सुरू होते.

    शिवाजी महाराजांकडून शिकायचं असतं. त्यांची शिकवणूक कृतीत परावर्तित झालेली दिसायला पाहिजे. मोदींच्या बाबतीत दिसते तशी. किती धूर्तपणे त्यांनी शिवसेनेवर टीका करायचं टाळलं. महाराजांचं नाव भाषणात घेतलं तर ते लोणच्यासारखं तोंडी लावण्यापुरतं हवं. लोणचं हे जेवण होऊ शकत नाही. हे सगळं सांगणार कोण! आणि सांगितलं तरी ऐकणार कोण!!

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
    Replies
    1. मार्मिक प्रतिक्रिया आणि मुद्देसूद लेख . एवढी प्रगल्भ विचारसरणी सेनेची होण्यासाठी फार फार वेगळ्या लोकांची आवश्यकता असते , जी पूर्वी जनसंघाच्या तळमळीच्या कार्यकर्त्यांकडे असायची . आता सत्तेलोलूप सेने कडे (शिव शब्दच मी टाळतो ) ती तळमळ कशी असेल ? उर्मट घोसाळकर सेनेच्याच महिला नगर सेविकेबरोबर छळवाद आरंभतो आणि सेनाप्रमुख तो पुरवत असलेल्या रसदी पुढे निष्क्रिय राहतात , यातच काय ते समजा .

      Delete
  6. भाऊ, खरेच शिवसेनेने विरोधी पक्षात बसायला पाहिजे. त्यामुळे मान राहील.

    ReplyDelete
  7. लोकसभेत वेगवेगळे पक्ष नेहमीच एकमेकांवर टीका करत असतात . अशीच एकदा काँग्रेस आणि भाजपची जुगलबंदी जर अधिक तीव्र झाल्यावर त्यावेळच्या विरोधी पक्ष नेत्या सुषमा स्वराज यांनी एक शेर ऐकवला होता. त्याचा गोषवारा असा :

    "टीका करताना भान असावं - टीका इतकी जहरी असू नये कि भविष्यात कधी एकत्र यायची वेळ आली तर स्वतःलाच स्वतःची लाज वाटू नये"



    आता उद्धव ठाकरे मोदींना भेटल्यावर काय सांगतील? आमच्या एका संपादकाने तुमचा बाप काढला होता . पण जाऊ दे आता पुन्हा एकत्र येऊया . मी तुम्हाला अफझलखान म्हणालो होतो पण सोडून द्या .



    अर्थात शिवसेना आणि सभ्यपणा किंवा शरम यांचा संबंध कधी होता म्हणा !



    सभ्य असणं आणि सभ्य राहणं म्हणजे बावळट पणा नव्हे ! सभ्य असायला आणि सभ्य राहायलाही धैर्य लागतं !

    ReplyDelete
  8. स्वबळाची लढाई, एकाकी लढा हे शब्द आजकाल वापरले जातात. पण या वेळी जो तो स्वबळावरच लढत होता - त्यामुळे विना आघाडी / विना युती लढणे हे काही मोठे कौतुक राहिले नाही. जर असेलच तर "एकाकी" लढून भाजपाने १२२ सीट मिळवल्या असे म्हणावे लागेल. म्हणजेच भाजपने फक्त ११९ सीट लढवल्या पाहिजेत हा सेनेचा हट्ट किती रास्त होता हे समजून येते. खरे म्हणजे ही ताणून धरण्याची लढाई न खेळता एकमेकांची ताकद ओळखून / एकमेकांचा पाणउतारा करण्याची इच्छा न करता एकत्र येणे केव्हांही योग्यच. आज गेल्या पंचवीस वर्षांत मतदानाचा हक्क मिळालेला मतदार या दोन्ही पक्षांसाठी आपलेपणा असलेला आहे, त्याच्यावर सेना किंवा भाजपा असा शिक्का नाही. याचा विचार करून सेना आणि भाजपा दोघांनीही एकत्र यावे, एकत्र लढावे, आणि समजुतीने राहावे. कुरघोडीची इच्छा संपवावी. अन्यथा महाराष्ट्रात वतनदारी प्रवृत्तीने शेकडो वर्षे राज्य केले आहे. अगदी शिवाजीमहाराजांनाही ती प्रवृत्ती संपवता आलेली नाही. त्यांच्या घराण्याविरुद्ध फितुरी करून ही प्रवृत्ती जिवंत राहिली. महाराजांनी संपवलेली वतनदारी त्यांनी योग्य वेळेला दबाव वापरून परत मिळवली, पुढे ब्रिटिशांना साथ देऊन - स्वातंत्र्यानंतर कॉंग्रेसमध्ये शिरून जातीच्या राजकारणाच्या आधाराने तगून राहिली - सत्ताधारी झाली. भाजपा - सेना एकत्र आले नाहीत तर यांच्याशी लढण्यात कमी पडतील.

    ReplyDelete
  9. शिवसेना विरोधी पक्षात असावी

    ReplyDelete