Thursday, October 9, 2014

युती मोडण्याची अनाकलनीय रणनिती

युती मोडताना किंवा शिवसेनेकडल्या अधिक जागांवर हक्क सांगताना, भाजपाचे नेते एकनाथ खडसे यांच्यापासून प्रत्येकाचा युक्तीवाद काय होता? आम्हाला कुठल्याही परिस्थितीत राज्यातील सत्ताधारी कॉग्रेस राष्ट्रवादी आघाडीला सत्तेपासून दूर ठेवायचे आहे. सर्व शक्ती पणाला लावून राज्याला दिवाळखोरीत घेऊन जाणार्‍या सत्ताधार्‍यांना नेस्तनाबूत करायचे आहे. त्यासाठीच मग जागांचे फ़ेरवाटप व्हायला हवे. कुठल्या जागांचे फ़ेरवाटप व्हायला हवे होते? तर सेनेकडे असलेल्या कधीच न जिंकल्या ५९ आणि भाजपाने कधीच न जिंकलेल्या १९ जागा असे फ़ेरवाटप त्यांना हवे होते. ते नसेल तर त्यांनी युतीच मोडून टाकली. मुद्दा असा आहे, की प्राधान्य कशाला होते? भ्रष्ट सत्ताधारी पक्षांना सत्तेतून घालवायला महत्व होते, की जागांचे अट्टाहास महत्वाचा होता? ज्याला सत्ताधारी बदलायचे असतात, त्याने जागांचा हट्ट पुढे करून युती मोडली नसती. आणि युती मोडून भाजपाने काय साधले आहे? प्रचाराचा सूर बघता भाजपाला एकपक्षीय बहुमत हवे आहे आणि ते मिळण्यासाठी युतीच नको असावी. सहाजिकच कुठले तरी निमीत्त युती तोडण्यासाठी हवे होते आणि कधीच जिंकल्या नाहीत, त्या जागांना निमीत्त म्हणून पुढे करण्यात आले. परिणामी युती मोडण्याच्या खेळीत भाजपा यशस्वी झाला आहे. पण त्याचा राजकीय लाभ तो पक्ष उठवू शकणार आहे काय? खरेच त्यांना सत्ताधार्‍यांना नेस्तनाबूत करायचे होते, की प्रादेशिक पक्ष असलेल्या मित्र शिवसेनेला खच्ची करण्यात अधिक रस होता? केवळ कॉग्रेस-राष्ट्रवादी पक्षांना पराभूत करून सत्ताबदल करायचा असता, तर युती मोडण्याची वा जागांचे फ़ेरवाटप करण्याची कुठलीही गरज दिसत नाही. ज्या मोदीलाटेचा आग्रह भाजपानेते धरतात, तिच्यानुसारच कुठलेही नवे जागवाटप न करताही युतीला निर्विवाद बहूमत मिळू शकले असते. मात्र त्यात भाजपाला सर्वात मोठा पक्ष होऊन मुख्यमंत्री पदावर दावा सांगता आला नसता. आजवर जसे जागावाटप होते, तसेच कायम राहिले असते, तरी युतीला २०० जागांपर्यंत मजल मारता आली असती. आकडेच त्याची साक्ष देतात.

लोकसभा मतदानात युतीने जवळपास अडीचशे विधानसभा मतदारसंघात आघाडी घेतली होती. त्याला आधार मानायचा, तर मग १९+५९ अशा ७८ जागा पडायच्या, हा दावा खोटा पडतो. लोकसभेप्रमाणेच लढती झाल्या असत्या तर युती त्या २४० हून अधिक जागी जिंकण्याची शक्यता दिसते. याचा अर्थ असा की केवळ ४८ जागाच पडू शकणार्‍या होत्या. आणि त्या ४८ जागाही जिंकण्याच्या मोहात सापडून भाजपाचे नेते युती मोडायला निघाले असतील, तर त्यातून दोन्ही सत्ताधारी पक्षांना पराभवातून सावरण्याची संधी भाजपा देतो, असाच त्याचा अर्थ निघत नाही काय? लोकसभा मतदानाचे आकडे डोळे दिपवणारे आहेत. ३९ जागा अशा आहेत जिथे युतीच्य्या उमेदवाराला ६० हजारापासून एक लाखापर्यंतचे मताधिक्य मिळाले होते आणि २१ जागा अशा आहेत जिथे युतीला ५० ते ६० हजाराचे मताधिक्य होते. याचा साधासरळ अर्थ असा, की या विधानसभेच्या ६० जागा नक्कीच युतीच्या पारड्यात विनासायास पडायच्या होत्या. त्यानंतर ३९ जागा अशा, की जिथे ४०-५० हजाराचे मताधिक्य तर आणखी ४२ जागा युतीला ३०-४० हजाराचे मताधिक्य देणार्‍या होत्या. त्याचा साधा अर्थ असा, की युती तशीच राहिली असती, तर लोकसभेप्रमाणे झुंज देऊन या ८१ जागा किंचित मेहनत घेऊनही जिंकता आल्या असत्या. अशी सगळी बेरीज केल्यास, १४१ जागा युतीला अर्ज भरण्यापुर्वीच जिंकलेल्या मानता याव्यात अशा होत्या. त्यात काही गडबड झाली तरी निदान सव्वाशे जागा नक्कीच जिंकता येणार्‍या होत्या. पण ते नंतर बघू. उरलेल्या जागांचा हिशोब तपासू. आधीच्या १४१ जागा सोडून आणखी ४७ जागा अशा आहेत, जिथे लोकसभा मतदानात युतीने २०-३० हजाराची आघाडी घेतली होती. आणखी २८ जागा अशा, की जिथे युतीला १०-२० हजाराची आघाडी होती. म्हणजे आधीच्या १४१ जागा वगळून आणखी ७५ जागा अशा शिल्लक उरतात, जिथे युतीला चांगली झुंज देऊन ४० जागा जिंकणे शक्य होते. लोकसभा मतदानाच्या आकडय़ानुसार बघितल्यास अशा जवळपास २०० जागा विधानसभेच्या निघतात; जिथे पाव शतकापासून चाललेली युती अभेद्य़ राहिली तर अभूतपुर्व यश संपादन करणे शक्य होते. उरलेल्या ८८ जागांकडे युतीपक्षांनी पाठ फ़िरवूनही राज्याची सत्ता निर्विवाद बहुमताने हस्तगत केली असती.

जर ८८ जागांकडे पाठ फ़िरवून बहूमत मिळणे शक्य असेल, तर मग गेल्या २५ वर्षात कधीच न जिंकलेल्या ७८ जागांवरून आज भांडण उकरून काढण्याचे काही कारण उरते काय? याचा अर्थ युतीला सत्ता मिळण्याचा किंवा मुजोर आघाडीला सत्तेवरून घालवण्याचा जागावाटपाशी कुठलाही संबंध येत नाही. वादाचे कारण भलतेच काही असू शकते, पण पडायच्या जागा विवादाचे कारण असू शकत नाही. तरीही सतत पडायच्या जागा शिवसेना सोडायला तयार नाही, ही निव्वळ भाजपा नेत्यांनी केलेली दिशाभूल होती. यामागचे राजकारण किंवा डावपेच साफ़ आहेत व होते. कुठल्याही परिस्थितीत यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेस यांच्या विरोधात प्रखर लोकमत असल्याने युती तुटली तरी आघाडीला बहूमत मिळणार नाही, हे ओळखूनच भाजपा युती मोडायच्या हेतूने राजकारण खेळत होता. युती मोडली आणि आघाडी टिकली असती, तरी भाजपा व शिवसेना यांची बेरीज बहूमताच्या पुढे जाऊ शकेल आणि निकालानंतर सत्तेत एकत्र बसता येईल, असे त्यामागचे गणित होते. मात्र ते उद्दीष्ट साध्य करताना आजवर बलवान असलेल्या मित्र पक्षाची शक्ती कमी करता आली तर डाव साधून घ्यावा; असा यामागचा हेतू असू शकतो. कदाचित अशा मारामारीत आपल्याला पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेवर स्वार होऊन विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष बनण्याची संधी मिळून जाईल, तर ती घ्यावी, इतके हे साधेसरळ राजकारण आहे. पण सामान्य माणसाला व मतदाराला ते उघड सांगता येत नाही. त्यासाठी निमीत्त व कारण आवश्यक असते. त्यासाठी मग नसलेला पडीक जागांचा वाद उकरून काढण्यात आला. मात्र असले डाव खेळताना भाजपाची रणनिती एका बाबतीत कमी पडली. त्यांनी स्वबळावर सर्व जागा लढवायची इच्छा तर बाळगली होती. पण तिथे लागणारे उमेदवार मात्र त्यांच्याकडे नव्हते. त्यासाठी मग अन्य पक्षातले इच्छुक गोळा करायचा सपाटा लावला होता आणि पराभूत सत्ताधार्‍यातले अनेकजण भाजपाच्या गळाला लागलेही होते. तरीही शेवटी तशी वेळ आल्यावर भाजपाला पुरेसे उमेदवार उभे करता आलेले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.

कुठलाही राजकीय पक्ष स्पर्धात्मक खेळी खेळत असतोच. त्यामुळे आपल्या बळावर मोठे होण्याचा भाजपाचा हव्यास चुकीचा म्हणता येणार नाही. पण त्यासाठी पोषक वेळही बघावी लागते. अजून राज्यातील कॉग्रेस व राष्ट्रवादी इतके कमजोर वा दुबळे झालेले नाहीत, की सेना भाजपांनी परस्परांच्या विरोधात लढावे. आजही परस्पर विरोधी लढून दोन्ही पक्ष निकालानंतर एकत्र येऊन सत्ता संपादन करतील. पण दरम्यान आपसात लढताना कॉग्रेस राष्ट्रवादीला जिवदान मात्र देणार आहेत. त्यासाठी युती तोडण्याने हातभार लावला गेला आहे. युती कायम राहून २०० हून अधिक जागा जिंकल्या असत्या, तर कॉग्रेस राष्ट्रवादीची मजल एकत्रित ६० च्यापलिकडे जाऊ शकली नसती आणि त्यांचा सत्तेअभावी पाया पुरता उखडला गेला असता. भाजपाच्या जागांच्या अट्टाहासाने ती संधी गमावली आहे आणि युती तुटण्याने त्याच पक्षाना नवे जिवदान मिळाले आहे. एका बाजूला भाजपाने ही चुक केली आहेच, पण दुसरीकडे आपले राज्यातील राजकीय बळ वाढवण्यासाठी उसनवारीचे उमेदवार आणायच्या उतावळेपणातून आपलाच राजकीय पाया मात्र खणून काढायची संधी आपल्या शत्रूंना बहाल केली आहे. अशाप्रकारे झटपट राजकीय बळ व सत्ता प्राप्त करताना शंभरी ओलांडणार्‍या कॉग्रेस पक्षाची आजची दुर्दशा कशामुळे झाली, त्याकडे भाजपाने डोळेझाक करून चालेल काय? मित्राचे पंख छाटण्याच्या हव्यासापायी आपल्या वैचारिक शत्रूला जिवदान देण्याच्या रणनितीला काय म्हणायचे?

9 comments:

  1. अगदी सहमत भाऊ. आपले विचार एकदम योग्य आहेत. कॉंग्रेस राष्ट्रवादीला सावरायची संधीच दिली आहे भाजपने. महराष्ट्रात पंचरंगी लढत असली तरी महराष्ट्रातल्या बहुतांश जागांवर ती दुरंगी किंवा तिरंगी होणार आहे. काही जागांवर भाजप शिवसेनेत विभाजन होऊन कॉंग्रेसला/राष्ट्रवादीला फायदा होणार आहे.
    विविध सर्व्हे भाजप १०६, ९६ वगैरे जे काही सांगत आहेत ते खरंच आकलनापलीकडचं आहे. महाराष्ट्रात शिवसेनेच्या जेवढ्या शाखा आहेत तेवढी भाजपची कार्यलये महाराष्ट्रात नसतील. तरी असा पक्ष केवळ मोदी लाटेमुळे विजयराथावर स्वार होईलसे वाटत नाही. माध्यमे सरसकट लोकसभे प्रमाणे विधानसभेला मतदान होईल असे गृहित धरुन चालले आहेत. शिवसेना मार खाणार असे कितीही कुणी सांगितले तरी प्रत्यक्षात शिवसेना पुढे असेल हे फक्त १९ नंतरच दिसून येईल.

    ReplyDelete
  2. भाऊराव,

    आयात केलेले उमेदवार वापरून भाजप कसेकाय बहुमत मिळवणार देव जाणे. यांच्या राजकारणामागे शरद पवार असावेत असे वाटतेय. एकीकडे भाजपने घरचं फुकटचं गिळायला मिळत असतांना थाळी लाथाडली (=युती तोडली) आणि दुसरीकडे दारोदार उकिरडे फुंकत हिंडताहेत (= २८८ उमेदवार नाहीत).

    महाराष्ट्र भाजपला या हलकटपणाची शिक्षा मिळालीच पाहिजे. ती देण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे शिवसेनेच्या पारड्यात मते टाकणे.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
  3. भाऊ, तुम्ही सुद्धा!!!!!!!

    शिवसेनेने युती टिकवण्यासाठी १५१ वर किती कोलांट्या मारल्या ते आपण पहिले आहे ना? रामदास आठवलेंना युतीमध्ये शिवसेनेने आणले ना? मग राज्यसभा निवडणुकीच्या वेळी त्यांना कसे हाकलले? भाजपला त्यांना खासदारकी द्यावी लागली, मग युती तुटल्यावर त्यांचे महत्व लक्षात आल्यावर उप=मुख्यमंत्री पदाचे गाजर कुणी दाखवले? अपरिपक्वता कुणात आहे ते राजच्या कालच्या खुलाशाने सिध्द नाही झाले का? शिवसैनिक कानी कपाळी दोन्ही भावानी एकत्र यावे असा गेली ३/४ वर्षे गजर करत असताना आणि संधी असताना शिवसेना कुणाच्या सल्ल्याने असे वागली? गेली १५ दिवस शिवाजी महाराजांचे नाव घेत गलिछ प्रचार कोण करत आहे? तुमच्या लेखावर खाली एक comment आहे. शिवसेनेच्या जेवढ्या शाखा……………… हे वाचून मला हसावे वाटले. पाट्या लाऊन शाखा उभ्या राहत नाहीत जे यांना कुणीतरी समजवायला पाहिजे. आणि आयात उमेदवार, शिवसेनेने काय कमी केलेत(उदय सामंत-रत्नागिरी) चिंचवडचे खासदार श्रीरंग बारणे आधी कुठे होते? अशी अनेक उदाहरणे आहेत. आणि आपला खरा विरोध कुणाला करायचा हेही शिवसेनेचे नेते विसरले आहेत. युतीच्या २५ वर्षात भाजप चा किती अपमान शिवसेनेने केला हे कोण विसरेल? अटलजीना समता, ममता, जयललिता इतकाच त्रास शिवसेनेने दिला होता हे कोण विसरेल? सुरेश प्रभू सारख्या योग्यतेच्या माणसाला मंत्रिपद कुणामुळे सोडायला लागले? (अर्थात अटलजिना त्यांची योग्यता लक्षात आल्याने लगेचच नदीजोड प्रकल्पाचे अध्यक्षपद दिले होते हा इतिहास आहे. पण आम्ही १७ व्या शतकाच्या बाहेर यायला तयार नाही. या पद्धतीने प्रचार आपल्याच मुळावर येत आहे हेही शिवसेनेला कळत नाही याला काय म्हणावे? जनता आता निर्बुध्ध राहिलेली नाही हे लोकसभा निवडणुकीत दिसले आहेच.

    आपला चाहता

    नंदन पेंडसे

    ReplyDelete
  4. भाऊ, मी नंदन पेंडसे यांच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे. भा.ज.प. कडे पुरेसे उमेदवार नव्हते याचा अर्थ हाच आहे की युती तोडण्याची त्यांची इच्छा नव्हती. या उलट शिवसेनेचे सगळीकडे उमेदवार तयार होते आणि युती तुटण्याच्या एक-दोन दिवस आधी त्यांच्या याद्याही तयार होत्या. आत्ता प्रचार करताना देखिल जेवढा संयम भा.ज.प. बाळगतो आहे त्याच्या किमान अंशभर तरी शिवसेनेने दाखवावा. अरे, अफझुलखान खान काय? कोणाची तुलना कोणाशी करतो आहोत याचेही भान राहू नये? आणि हेच उद्धव ठाकरे अमरावती च्या सभेत भा.ज.प. च्या नेत्यांना सरळ नालायक म्हणतात! उद्या चुकून माकून भा.ज.प.ला बहुमत मिळाले तर याच तथाकथित आक्रमाकांसोबत जावे लागेल ना यांना? अशा लोकांसोबत इतकी वर्षे जुळवून घेतले हेच भा.ज.प.चे चुकले असे अतिशय दुखा:ने म्हणावे लागत आहे.

    ReplyDelete
  5. नंदन व श्री पाद शी सहमत,
    मूर्खता पूर्ण वक्तव्ये करून, शिवसेनेच्या पक्क्या मतदारांची नाराजी ओढवून, उद्धवजींच्या अडेलतट्टू चालींचे गौरवपूर्ण वर्णन महागात पडेल असे सामान्य नागरिकांना वाटले तर नवल नाही...

    ReplyDelete
  6. नंदन पेंडसे, श्रीपाद आणि शशिकांत ओक साहेब, आपणा सर्वांना माहीत आहेकी भाऊंनी सतत निपक्ष राजकीय विश्लेषण केले आहे. आपण सर्वांना माहीत आहे की संपूर्ण भारतात काय किंवा महाराष्ट्रात काय भाजपला जे निर्भेळ यश मिळाले आहे ते फक्त आणि फ़क्त मोदींमुळेच मिळाले आहे. याच गोष्टीचा महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना गर्व झाला आहे. भाजप सरळसरळ असे म्हणाले असते की आम्हाला वेगळे लढायचे आहे तर कोणालाही काही वाटले नसते. प्रत्येकाला आपला पक्ष वाढावा असे वाटणे साहजिक आहे. तसे केले असतेतर आफजलखानाची पदवीही मिळाली नसती. जागा वाटपाचा एवढा गोंधळ घालायची आवश्यकता नव्हती. ताकाला जायचे आणि भांडे लपवायचे असे भाजपने केले आहे. शिवसेनेने युतीपक्षांतील इतरांना १८ जागा स्वत:च्याच दिल्या होत्या. भाजपने त्यांच्या साठी एकही जागा सोडली नाही. उलट त्यांना आणखी जागा शिवसेनेकडून पाहिजे होत्या. त्यांना माहीत आहे की शिवसेनेने कुठलीही गोष्ट कधी शांततेत केलेही नाही. आता जे काही घडते आहे त्याची कल्पना भाजपच्या चाणक्यांना नसेल असे म्हणता येईल काय? लोकसभे आधी गडकरी नुसते राज ठाकरेंना भेटले होते तेव्हा सामना मधून किती आणि कशी टीका झाली हे भाजप नेते कसे विसरले.

    ReplyDelete
  7. अफझुलखान ही पदवी! आता बोलणंच खुंटलं.

    ReplyDelete
    Replies
    1. श्रीपादसाहेब, पदवी नाही बोलायचे, तर काय बोलायचे ते आपणच सांगीतले तर माझ्याही ज्ञानात भर पडेल.

      Delete
  8. दि. 19 ला सारे उघड होईल...
    सध्याच्या बढाया, हमरीतुमरी ही तात्कालिक आहे. सत्तेची सुंदरी दिसू लागली की आधीच्या. वल्गना विसरून, 'कैसी जीभ लपलपाई 'म्हणत स्वार्थी धुडगूस चालू झालेले दिसतील. मतदार राजा त्यांचे गळ्यात गळे घालायचे चाळे पहायच्या व्यतिरिक्त काही करू शकणार नाही! काय भाऊ? ...

    ReplyDelete