महिना दिडमहिन्यापुर्वी जम्मू काश्मिरमध्ये महाप्रलय झाला होता. तेव्हा आपल्या माध्यमातील पत्रकारांनी तिथे जाऊन पुरग्रस्तांची आखोदेखी कथा आपल्याला घरात बसून बघण्याची सोय केलेली होती. प्रत्येक वाहिनी अशा जागी जाऊन पोहोचत होती, की जिथे सरकारी मदत तोकडी पडलेली होती. मग तिथे जीव मुठीत धरून बसलेले भयभीत लोक, भुकेने व्याकुळ झालेले लोक, रडकुंडीला येऊन आपल्या व्यथा व कथा सांगत होते. तिथे प्रत्येक कॅमेरावाला किंवा पत्रकार त्यांच्याकडून काय वदवून घेत होता? सरकारने आपल्यासाठी काहीच केलेले नाही. सरकारने आपल्याला वार्यावर सोडून दिलेले आहे, इतकेच ना? अशा बातम्या व सनसनाटीतून लोकांना काय शिकवले जात असते? कुठल्याही संकटात तुम्ही सापडलेले असाल, तर तुम्हाला त्यातून बाहेर काढणे व तुमच्या मदतीला धावणे, ही सरकारची जबाबदारी आहे. त्यात काही चुकीचेही नाही. आगीत फ़सलेल्यांना त्यातून सहीसलामत बाहेर काढणे, ही अग्नीशमन दलाची जबाबदारीच असते. पण ज्याचा जीव धोक्यात सापडला आहे, त्याची स्वत:लाच वाचवण्याची अजिबात जबाबदारी नाही काय? अग्नीशमन दलाचे जवान व उपकरणे तिथे पोहोचण्यापर्यंत पिडीताने आगीकडे शांतपणे बघत बसायचे असते का? त्याने स्वत:च आपला जीव संकटातून वाचवण्यासाठी हातपाय हलवायला नकोत काय? आपण सुखरूप असू, तर आसपास कोणी संकटात असेल, त्याच्या मदतीला धावून जाणे हे सामान्य नागरिकाचे कर्तव्य नसते काय? सरकारने तिथे गेले पाहिजे व मदत केली पाहिजे, यात शंकाच नाही. पण ती मदत पोहोचण्यापर्यंत जवळपास असेल त्याचेही तितकेच कर्तव्य नसते काय? जितके अकस्मात संकट ओढवते, तितकी अशा संकटावर मात करण्याची प्रत्येक सुविधा सुसज्ज नसते. म्हणूनच अशा घटनेत माणूस व नागरिक म्हणून परस्पर सहकार्य हे कर्तव्य असते. त्यालाच गांधीविचार म्हणतात हे आपण विसरून गेलोत.
गेल्या पाच सहा दशकात आपण तेच विसरून गेलोत. एका बाजूला आपण गांधी स्मारके, पुतळे उभारण्यात गर्क आहोत. पण गांधी ही एक व्यक्ती नसून तो विचार व तत्वज्ञान आहे, याचेही गांधीवाद्यांना स्मरण उरलेले नाही. स्वच्छता वा स्वावलंबन असे मुद्दे गांधीजींनी आपल्या आंदोलनाची प्रेरणा बनवली होती. सामान्य माणसाला प्रत्येक बाबतीत स्वयंपुर्ण व स्वयंभू बनवण्य़ाचा विचार त्यांनी कृतीत आणायचा अट्ताहास केला. त्यातून स्वातंत्र्याची चळवळ सार्वत्रिक व सर्वसमावेशक होत गेली. गांधींच्या नंतर त्यांच्याच अनुयायी व प्रसारकांनी या गांधीप्रेरणेचा गळा घोटला आणि गांधी केवळ गोडसेपुरता मर्यादित करून ठेवला. आजच्या आधुनिक गांधीवाद्यांसाठी महात्मा गांधी म्हणजे स्वच्छता, स्वावलंबन, स्वयंपुर्णता, स्वदेशी वगैरे नाही. आजच्या अशा गांधीवाद्यांचा गांधी हा गोडसेने केलेल्या हत्येपासून जन्माला येतो. त्याचा तिळमात्र संबंध स्वच्छता, ग्रामस्वराज्य अशा कल्पनांशी उरलेला नाही. पण वास्तवात ज्या गांधीचे गारूड जनमानसावर अर्धशतकात राज्य करीत होते व त्यातून स्वातंत्र्याची चळवळ उभी राहिली; तो गांधी गोडसेनी गोळ्या झाडून संपवला. पुढल्या काळात गोडसेचा द्वेष करणार्यांनी क्रमाक्रमाने गांधीविचारांना मूठमाती देत महात्म्याची वैचारिक हत्या केली. म्हणून मग नेहरूंचा जमाना सुरू झाला आणि त्यांनी जनतेचा सहभाग संपवून देशाचा उद्धार सत्ता व प्रशासन याकडूऩच होऊ शकतो, असा नवा विचार जनमानसात रुजवला. तिथून देशाच्या भवितव्य व विकास कार्यापासून सामान्य नागरिक दुरावत गेला. स्वातंत्र्यपुर्व काळात ब्रिटीश नोकरशाही रयतेवर राज्य करीत होती, तशीच व्यवस्था पुन्हा प्रस्थापित होत गेली. त्याच नेहरूवादी नोकरशाही राजवटीने गांधीवाद्यांना अनुदाने व निधी देऊन गांधीवादाचा पुरता खात्मा करून टाकला. गांधीविचार म्हणजे देशाच्या, गावाच्या, समाजाच्या भवितव्याचा जनतेला असलेला अधिकार.
गेल्या सहा दशकात तो गांधीविचार कुठल्या कुठे फ़ेकला गेला आणि त्याची जागा पुन्हा पारतंत्र्यातील नोकरशाहीने बळकावली. स्वराज्य व स्वातंत्र्याची जनतेच्या मनातील आकांक्षा नेहरूंच्या नेतृत्वाखाली अशी चिरडली गेली आणि त्यासाठी गांधीवाद्यांची विविध आमिषे प्रलोभने दाखवून मदत घेतली गेली. त्यासाठी आवश्यक होते गांधींची प्रतिमा बदलणे. ती प्रतिमा नथूराम गोडसेच्या कहाणीचे उपकथानक बनवण्यातून साधली गेली. आजच्या पिढिसाठी महात्मा गांधी कोण असतो? ज्याचा खुन गोडसे नावच्या कुणा हिंदूत्ववादी माथेफ़िरूने केला, तो गांधी होता. आणखी या महात्म्याने काय कय केले? नव्या पिढीला त्यातले काही सांगता येत नाही. लहानसहान बाबतीत समस्यांचे समाधान कसे शोधावे, त्याचे गांधींनी केलेले मार्गदर्शनही नव्या पिढीला माहित नसते. कारण तिला त्याचा थांगपत्ता लागू नये, याची मागल्या काही दशकात पुरेपुर काळजी घेण्यात आलेली आहे. मग कोणी खरेच गांधींच्या मूळ विचारांनी काम करीत असेल, तसा प्रयास करीत असेल; तर आजचे गांधीवादी त्याचीच हेटाळणी करताना दिसतील. असे आपोआप घडलेले नाही. त्यामागे पद्धतशीर आखलेली योजना असावी. कुठल्याही योजना वा मोहिमेत सामान्यांचा सहभाग करून घेतला, तर त्याचे एक आंदोलन होते आणि योजना यशस्वी होऊ शकते. हे चरखा, मीठ वा स्वदेशी अशा मोहिमेतून महात्माजींनी सिद्ध केलेले तत्व आहे. परंतु पुढे स्वातंत्र्योत्तर काळात त्यावर पडदा पाडला गेला आणि सार्वजनिक सहभागाला गुंडाळून ठेवले गेले. विकास वा योजना यशस्वी करण्यासाठी सरकार समर्थ आहे आणि त्यासाठी सामाजिक सहभाग व पुरूषार्थाची आवश्यकता नाही, असे जनमानसावर बिंबवले होते. त्यातून आज संपुर्ण समाजच विलकांग परावलंबी होऊन गेला आहे. मग अशा समाजात गांधींच्या प्रेरणा नव्याने जागवल्याची टवाळी झाल्यास नवल ते कुठले?
नवे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या विविध योजना व कल्पना राबवण्यासाठी गांधीविचार व संकल्पनांचा आधार घ्यायला आरंभ केल्याने त्यांच्यावर सातत्याने टिका होते आहे आणि हेटाळणी होते आहे. पण ती हेटाळणी करणार्यांना तरी खरा गांधी कुठे माहिती आहे? त्यांना खर्या गांधींचे विचार कुठे माहिती असतात? त्यांचा गांधी गोडसेपासून सुरू होतो आणि तिथेच येऊन अंतर्धान पावतो. म्हणूनच मोदी यांनी खर्याखुर्या गांधी विचारांचा पाठपुरावा करायला पाऊल उचलले; तेव्हा तमाम गांधीभक्त गोडसेचा धावा करू लागले आहेत. कारण गेल्या काही दशकात त्यांनीच गाडलेल्या गांधीविचारांची या लोकांना भिती वाटते आहे. मोदींनी सत्ताधिकार उपभोगावा. पण गांधीविचार उकरून काढायचे काय कारण? अशी ही भिती आहे. गांधी विचार व कल्पना उकरून काढल्या आणि अंमलात आणल्या; तर गेल्या सहासात दशकात गांधीविचाराच्या नावाने जनतेची झालेली फ़सवणूक व घोटाळे चव्हाट्यावर येण्याच्या भयाने असा दांभिक गांधीभक्तांना भयभीत करून सोडलेले आहे. म्हणुन तर नुसत्या समाध्या व पुतळ्यात अडकून न पडता थेट गांधीमार्गाने देशाच्या विकास व जनतेच्या कल्याणाची कास धरणार्या मोदींच्या स्वच्छता अभियानाची यथेच्छ टिंगल सुरू झालेली आहे. स्वावलंबन, स्वदेशी वा जनतेचा विकासात सहभाग, अशा गांधीकल्पना मोदी राबवू बघतात. तेव्हा लगेच गोडसेचे नामस्मरण सुरू होते. गांधीचे नाव घेऊन ब्रिटीश राजवटीचा वारसा चालवणारे म्हणूनच गांधीच्या नावाने थरारून गेलेले आहेत. थेट गांधींच्या पावलावर पाऊल टाकून मोदींनी आरंभलेली ‘स्वच्छ भारत अभियान’ कल्पना गांधीभक्तांना भयभीत करून गेली आहे. जनता, रयत शहाणी होण्याचे भय तेव्हा ब्रिटिश सत्तेला होते आणि आज त्याच मार्गाच्या नुसत्या कल्पनेने बोगस गांधीवादी थरथरू लागले आहेत. खरा गांधी समोर येऊ लागल्यावर गांधीगिरी करणार्यांना कापरे भरले आहे.
भाऊ मानले तुम्हाला…
ReplyDeleteभाऊराव,
ReplyDeleteस्वतंत्र भारताच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना उद्देशून गांधींनी एकदा मार्गदर्शन केलं होतं. जेव्हा एखादा निर्णय घेतांना तुमचं मन द्विधा असेल तेव्हा भारतातल्या तळागाळातल्या गरीबाचा चेहरा डोळ्यासमोर आणा. माझ्या निर्णयाने त्या माणसाचा लाभ होणार आहे का असा विचार करा. म्हणजे तुमची द्विधा मनस्थिती नष्ट होऊन निर्णयक्षमता वाढेल. ही पद्धती (टेक्निक) अतिशय मोलाची आहे.
मी एका मराठी संकेतस्थळावर बऱ्यापैकी चर्चा करत असतो. मी हिंदुत्ववादी आहे हे तिथे सगळ्यांना माहीत आहे. एके दिवशी वेश्याव्यवसाय कायदेशीर करावा का असा विषय होता. चर्चेच्या ओघात मी गांधींचं वरील तत्त्व वापरलं. त्यातून निष्कर्ष निघाला की व्यवसाय कायदेशीर केल्याने तळागाळातल्या वेश्यांचा फारसा फायदा होणार नाही. सेवाभावी संस्था करताहेत ते पुरेसं आहे.
आता गंमत बघा. हा चर्चेचा धागा त्या संकेतस्थळावरून गायब करण्यात आला. गामा पैलवान हिंदुत्ववादी आहे ना, मग त्याने गांधींचा द्वेषच केला पाहिजे. असा काहीसा तिथल्या गांधीवादी प्रशासकांचा आग्रह आहे. हिंदुत्ववादी माणूस गांधींचं तत्त्व अंमलात आणण्याचं धाडस दाखवतो म्हणजे काय!
आज मला त्या संकेतस्थळावरून हाकलून देण्यात आलंय. कारण म्हणे मी गांधींचा द्वेष करतो. एकंदरीत गांधीद्वेष्टे कोण आहेत ते तथाकथित गांधीवादीच ठरवणार. त्याबद्दल प्रश्न उपस्थित करू इच्छिणारा आपोआपच कमालीचा हिंसक बनतो.
आपला नम्र,
-गामा पैलवान
भाऊ पण मोदींनी काँग्रेसकडून चोरून घेतला हे बरे नाही केले. काँग्रेसला संपवण्याचे हे कारस्थान आहे! माझी आई म्हणायची मी काँग्रेस सोडून कधी कोणालाच मत देणार नाही कारण ही गांधीबाबाची काँग्रेस आहे आणि आपल्याला स्वतंत्र गांधीबाबामुळे मिळाले आहे. आईलातर असेही वाटायचे की इंदिरा गांधी म्हणजे गांधीजींची नातेवाईकच आहे. इकडे महाराष्ट्रात आमच्या शिवछत्रपती शिवाजी राजांनाही हायजैक केले आहे! काय बोलावे या मोदीजिंना कळत नाही!
ReplyDelete