Wednesday, October 1, 2014

भाजपाचे ‘आप’त्ती व्यवस्थापन



आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आता जे उमेदवार मैदानात शिल्लक उरतील. त्यांना माघार घेता येणार नाही. सहाजिकच निवडणूकीचे खरे चित्र साफ़ झालेले असेल. मात्र या निमीत्ताने जी काही पळापळ सर्वच पक्षात झालेली आहे, ती बघता राजकीय नेते जनतेला मुर्ख समजतात, याचीच पुन्हा एकदा साक्ष मिळाली. एका वाहिनीवर मुलाखत देताना राज्यातील ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, तशी आघाडी मोडून सर्वत्र स्ववळावर लढायची सज्जता आधीपासून चाललेली होती. दोन पक्षांचे सरकार चालवताना आपल्या सर्व कल्पना राबवता येत नाहीत आणि अनेक अडचणी येतात. म्हणूनच जनतेकडे साफ़ कौल मागायची मानसिकता पक्षामध्ये होती. पण आजचे त्यांचे विधान खरे मानायचे, तर मागल्या दोन महिन्यात त्यांनीच आघाडी होईलच असा निर्वाळा देण्यामागचे कारण स्पष्ट होत नाही. एका बाजूला त्यांचे पुतणे व उपमुख्यमंत्री अजितदादा मात्र १४४ जागांवर अडून बसले होते आणि स्वबळावर लढायची भाषा बोलत होते. पण पवार यांनी मात्र आघाडी टिकवण्याचे प्रयास अखेरपर्यंत होत असल्याचे छान चित्र निर्माण केले होते. मग आता अखेरच्या क्षणी त्यांनीच स्वबळाची सज्जता चालली होती, असे सांगून आपण लोकांची दिशाभूल करीत असल्याचीच कबुली दिलेली नाही काय? अर्थात प्रत्येक पक्षाला स्वत:चे बळ वाढवण्याचा अधिकार आहे आणि जेव्हा थेट मतदाराचा कौल मागितला जातो, तेव्हाच बलाबल निश्चीत होत असते. पण मग अखेरच्या क्षणापर्यंत आपल्याच इच्छुक व कार्यकर्त्यांना लोंबकळत ठेवायचे कारण काय? तसे पाहिल्यास शरद पवार निदान आपली लबाडी कबुल करताना दिसतात. पण बाकीच्या तीन पक्षांनी तितकेही सत्य कबुल केलेले नाही. आघाडी वा युती टिकवायचे प्रयास फ़सले, हा प्रत्येकाचा अजूनही दावा चालूच आहे.

यातल्या सर्वच पक्षांनी त्या दिशेने हालचाली प्रथमपासून आरंभल्या होत्या. शिवाय त्यांची मैत्री जुनी असल्याने, खालच्या पातळीवर कार्यकर्त्यांकडून हालचालींची खबर मिळतच असते. सेनेच्या मतदारसंघात उमेदवार निश्चीत करून भाजपा जमवाजमव करत असेल, तर स्थानिक शिवसैनिकांपासून ते लपून रहात नाही. त्याचप्रमाणे सेनेची तयारी भाजपाला अंधारात ठेवून होऊ शकत नाही. तोच नियम मग कॉग्रेस व राष्ट्रवादीला लागू होतो. जिंकू शकणार्‍या अन्य पक्षातल्या नेत्यांना आणुन चालू असलेल्या तयारीनेच युती आघाडी फ़ोडायचे प्रयास उघड झाले होते. भाजपाचे चाणक्य मात्र अजून तशी कबुली देत नाहीत किंवा तेव्हाही देत नव्हते. त्यामागची प्रेरणा मोदीलाट अशीच आहे. आपण मोदींच्या लोकप्रियतेवर महाराष्ट्रातही आपले बहूमत संपादन करू शकतो, या आत्मविश्वासाने भाजपा नेत्यांना पछाडलेले आहे. फ़ार झाले तर महायुतीतल्या छोट्या पक्षांना सोबत घेऊन बहुमतापर्यंत मजल मारता येईल, असाही त्यांना आत्मविश्वास आहे. अन्यथा या चाणक्यांनी इतका धाडसी निर्णय घेतला नसता. पण स्वबळावर लढून मोदीलाटेने बहूमत मिळवायला सर्वत्र उमेदवार उभे करायला हवेत. तिथेच भाजपा तोकडा पडत होता. प्रत्येक जिल्ह्यात व तालुका पातळीवर भाजपाचा संघटनात्मक ढाचा असला, तरी तिथे लागणारे कार्यकर्त्यांचे बळ त्याच्यापाशी नाही व नव्हते. म्हणूनच त्यांच्या यशाला सेनेच्या कुबड्या घ्याव्या लागत होत्या. त्यावर मात करण्यासाठी कॉग्रेस वा राष्ट्रवादीचे प्रबळ स्थानिक नेते सोबत घेऊन ती त्रुटी संपवायची रणनिती आखून राबवली गेली. अखेरच्या क्षणाला मग युतीला मोडून स्वबळाचा प्रयोग हाती घेतला गेला. पण त्यात यश कसे मिळणार? त्याचा एकमेव आधार आहे मोदींची लोकप्रियता. मोदींच्या पाचपन्नास प्रचार सभांची रणधुमाळी उडवून दिली, की बहूमत आलेच, असे भाजपाचे मत असावे.

लोकसभा निवडणूका रंगल्या असताना अनेक विरोधकांना भाजपा व मोदी यातला फ़रक उमगला नव्हता. त्यामुळेच बहुतेक राजकीय विरोधक व अभ्यासक भाजपाचा इतिहास तपासून मोदी बहूमताच्या जवळपासही कसे फ़िरकू शकणार नाहीत, त्याचे हवाले देत होते. कारण त्यापैकी कोणाला मोदी समजून घेण्याची गरजच वाटलेली नव्हती. आता शरद पवार यांनी एका वाहिनीला मुलाखत देताना लोकसभेची निवडणूक मोदींनी अध्यक्षीय पद्धतीने घडवण्यात यश मिळवल्याचे मान्य केले. पण निवडणूक ऐन रंगात आलेली असताना तेच मुरब्बी पवार इथे संसदीय लोकशाही असल्याचा हवाला देत होते. अनेक भाजपा प्रवक्तेही संसदीय लोकशाहीत उमेदवार पंतप्रधान असण्याचे समर्थन करीत होते. पण अगदी भाजपा प्रवक्त्यांनीही निवडणूक संसदीय लोकशाहीनुसारच होण्याचा इन्कार केलेला नव्हता. कारण भाजपा नेत्यांनाही मोदी अध्यक्षीय ढाच्यात निवडणूक घेऊन गेल्याचा थांग लागलेला नव्हता. किंबहूना मोदींचे बलस्थान वा त्यांच्या लोकप्रियते मागचे रहस्य, भाजपा नेत्यांनाही समजून घ्यावेसे वाटले नाही. पण त्यामुळे त्यांचे नुकसान व्हायचे नव्हते. कारण प्रचारसह रणनितीची सुत्रे मोदींच्या हाती होती. ती समजून घेतली नाही, तर विरोधकांना फ़टका बसणार होता आणि बसला. पण आज तशी स्थिती इथे विधानसभा निवडणूकीत नाही. म्हणूनच मोदीलाटेवर स्वार व्हायला उतावळे झालेल्या भाजपा नेत्यांनी मोदीलाट समजून घेणे अगत्याचे होते. कारण तिच्यावर स्वार होणार्‍याचा लाभ वा तोटा व्हायचा आहे. त्याच मुलाखतीत पवार यांनी तेच रहस्य उलगडले. मोदींना लोकांनी मते दि,ली कारण ते पंतप्रधान व्हायचे होते. विधानसभा निवडणूकीत मोदी मुख्यमंत्री म्हणून पेश होणार नाहीत. म्हणूनच मोदीलाटेचा इथे प्रभाव पडू शकत नाही, हे पवारांचे मत महत्वाचे व सूचक आहे. पण स्वबळाची झिंग चढलेल्या भाजपा नेत्यांना त्याची जाण आलेली नाही.

आज युती तोडल्यावर स्थानिक भाजपा नेत्यांची भाषा व भाषणे ऐकली, मग आठ महिन्यापुर्वीच्या अरविंद केजरीवाल यांची आठवण होते. चार विधानसभा निवडणूकीत तीन भाजपाने जिंकल्या, पण दिल्लीत बहूमत हुकले. तेव्हा नव्यानेच राजकारणात उडी घेतलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने लक्षणिय यश दिल्ली विधानसभा निवडणूकीत मिळवले होते. माध्यमातील अर्धवटराव मग केजरिवालच मोदींचा विजयरथ रोखणार; अशी बाष्कळ बडबड करू लागले आणि त्या प्रचाराला खुद्द केजरीवाल बळी पडले. राजकीय साठमारीत त्यांना मिळालेले दिल्लीचे मुख्यमंत्रीपद लाथाडून, त्यांनी थेट पंतप्रधान व्हायची स्वप्ने बघायला आरंभ केला. त्यातून मग स्वबळाची नशा आणि वारेमाप प्रसिद्धीची झिंग अशी चढली, की ४२३ जागी डिपॉझिट गमावल्यावरच उतरली. खुद्द दिल्लीतच त्यांच्या पक्षाच सुपडा साफ़ झाला. इतकी मोटी झेप घेण्यापेक्षा दिल्ली व सभोवती त्यांनी शक्ती लावली असती, तर त्यांना तिथेही प्रभाव पाडता आला असता. पण अनपेक्षित यशाची झिंग व स्वबळाची नशाच इतकी दारूपेक्षाही जालीम असते. तेव्हा ७० पैकी २८ जागांची नशा केजरीवालना धुंद करून गेली असेल, तर लोकसभेत ४८ पैकी २४ जागा महाराष्ट्र भाजपाने जिंकल्यावर राज्यातील नेत्यांचा केजरीवाल झाल्यास गैर ते काय? त्यांना दिल्लीच्या यशाने पंतप्रधान व्हायची इच्छा बळावली, मग राज्याचे मुख्यमंत्रीपद भाजपा नेत्यांना भुलवत असेल, तर समजू शकते. त्यातून मग पडणार्‍या जागा, जागावाटप, स्वबळाचा फ़ाजील आत्मविश्वास असे अनेक विनोद उदयास आले. लोकसभा निवडणूकीत विरोधकांनी मोदी समजून घेतला नाही आणि त्या यशानंतर भाजपावाले मोदींना समजू शकलेले नाहीत. मोदी हरायचा बेभरवशी जुगार खेळत नाहीत आणि राज्यातले त्यांचे समर्थक बुडायचा दिवाळखोर जुगार खेळायला निघालेत. मग इथे भाजपाचा आम आदमी पक्ष झाल्यास आश्चर्य मानायची गरज उरेल काय? याला मोदीनिती म्हणता येणार नाही. त्याला केजरीवालांचे ‘आप’त्ती व्यवस्थापन म्हणता येईल

1 comment:

  1. भाऊ, आपले विश्लेषण अगदी योग्य आहे! परंतू महाराष्ट्रात आता भाजप बरोबर आणखी चार पक्ष आहेत. त्यांचा फायदा भाजपला मिळू शकतो. आठवले याची संपूर्ण महाराष्ट्रातील ५-१०% टक्के मते, मेटेंचे २-३% मते, राजू शेट्टीची पश्चिम महाराष्ट्रातील ५-१०% मते तसेच जानकारांची २-३% मते अशी कमीतकमी एकून भाजपची ५-७% मते वाढली तरी भाजप बहुमतात येवू शकते. या उलट परिस्थिती शिवसेनेची आहे. मनसे ५-१०% मते शहरी भागातील तरी खानारच. निवडणूकीवर जर ५-१० टक्क्याचा प्रभाव पडत असेलतर भाजप प्लस मधेच दिसत आहे.

    ReplyDelete