भाजप आणि शिवसेना यांच्यातील 'दुरावा' पाहता पुढच्या सहा महिन्यांतही महाराष्ट्रावर पुन्हा निवडणुका लादल्या जाऊ शकतात. म्हणूनच महाराष्ट्राच्या स्थैर्यासाठी राष्ट्रवादीने भाजप सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावेळी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले. ह्याला शरद पवार यांच्या शुभेच्छा म्हणतात. नुसत्या शुभेच्छा इतक्या थक्क करणार्या असतील, तर मग पाठींबा, म्हणजे पाठीवर थाप पवारांनी मारल्यास काय होत असेल? मंगळवारी भाजपाच्या नव्याने निवडून आलेल्या आमदारांची बैठक होऊन त्यात देवेंद्र फ़डणवीस यांची पक्षनेता म्हणून निवड झाली. त्यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्तेसाठी दावा केला आणि तो मान्य करून राज्यपालांनी त्यांना निमंत्रणही दिले आहे. त्यानुसार आता महिनाअखेर नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. त्यात अन्य कुठल्या पक्षाचा समावेश नसून गुडघ्याला बाशींग बांधून बसलेल्या अनेक शिवसेना नेत्यांचा भ्रमनिरास झालेला असेल. पण सत्ता गमावल्यानंतरही खुश असतील, ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार. कारण राज्याच्या राजकीय रंगमंचावर प्रत्येक पात्र त्यांना हव्या असलेल्या पटकथेनुसार आपापली भूमिका पार पाडते आहे. निकालाआधीच भाजपाला पाठींबा देऊन पवार यांनी सेना भाजपा यांच्यात दुरावा आणखी वाढावा, अशी कुटील खेळी केली. आणि त्याला आठवडा उलटण्यापुर्वीच साहेबांनी तो दुरावा वाढल्याने राज्यात सहा महिन्यात पुन्हा निवडणूका होण्याची भितीही व्यक्त केली आहे. किंबहूना अशा निवडणूका होऊ नयेत, म्हणून विधीमंडळातील मतदानात तटस्थ रहाण्याची हमीसुद्धा भाजपाला देऊन टाकली आहे. त्यामुळेच बहूमताची बेरीज सोडून भाजपाने बाहेरच्या पाठींब्यावर विसंबून अल्पमताचे सरकार स्थापण्याचा निर्णय घेऊन टाकला आहे. त्यामुळे एका जुन्या घटनाक्रमाची आठवण झाली.
१९७९ सालात जनता पक्षात फ़ूट पडली आणि मोरारजी देसाई सरकार बारगळले. वेगळ्या झालेल्या चरणसिंग गटाने मग आधीच विभक्त झालेल्या रेड्डी कॉग्रेससोबत पर्यायी सरकार बनवण्याचा प्रयोग केला. त्यात चरणसिंग पंतप्रधान व यशवंतराव चव्हाण उपपंतप्रधान व्हायचे होते. पण बहूमताचा आकडा पुर्ण होत नव्हता. तिथे त्या उतावळ्यांच्या मदतीला इंदिराजी धावून गेल्या होत्या. अशा आघाडी साकारला इंदिराजींनी आपल्या ९० खासदारांचा ‘बाहेरून’ पाठींबा दिलेला होता. स्वत: इंदिराजी त्या शपथविधीला अगत्याने हजर होत्या. तो विधी आटोपला आणि पत्रकारांशी बोलताना इंदिराजी एकच वाक्य बोलल्या आणि ते नेमके आजच्या पवारांच्या विधानाशी जुळते मिळते वाक्य होते. ‘निवडणुका जवळ आल्यात’, असे इंदिराजींचे ते वाक्य होते आणि ‘बाहेरून’ पाठींबा देणार्या पवारांना नेमकी सहा महिन्यात निवडणुका व्हायची भिती सतावते आहे. त्यावेळी इंदिराजींनी पाठींबा दिल्याने सरकार स्थापन झाले आणि पुढे बहूमत सिद्ध करायची वेळ आली, तेव्हा इंदिराजींची भूमिका बदलली होती. त्यांनी पाठींबा काढून घेतला होता आणि चरणसिंग यांना संसदेत न जाताच राजिनामा द्यावा लागला होता. पण त्यामुळे ‘बाहेरून’ पाठींब्याची एक नवी व्याख्या निर्माण झाली. सरकार स्थापनेला पाठींबा दिला मग नंतर काढून कशाला घेतला, असे पत्रकारांनी मग इंदिराजींना विचारले होते. त्यावरचे त्यांचे उत्तर मोठे सुचक होते. ‘पाठींबा सरकार बनवायला दिला होता, सरकार चालवायला नाही.’ त्यांचा चरणसिंग यांना बाहेरून पाठींबा होता आणि पवारांनीही भाजपाला विधानसभेत ‘बाहेरून’ पाठींबा दिलेला आहे. त्यांना अशा पाठींब्याची व्याख्या अजून तरी कोणी विचारलेली नाही किंवा पवारांनी स्वत:च पुढाकार घेऊन ती स्पष्ट केलेली नाही. त्यामुळेच त्यावर विसंबून अल्पमताचे सरकार स्थापन करणार्या भाजपाला शुभेच्छा आवश्यक आहेत.
एकीकडे पवार पाठींबा देतात आणि त्याचवेळी सेना भाजपा यांच्यातल्या दुराव्यामुळे सहा महिन्यात निवडणूका होण्याचा धोकाही विदीत करतात. यातले त्यांचे कोणते विधान ग्राह्य मानायचे? त्यांचा पाठींबा ठाम असेल व स्थीर सरकारसाठी असेल, तर पवारांनी सेना काय करते, त्याची फ़िकीर करण्याचे काहीही कारण नाही. डाव्या आघाडीने मनमोहन सरकारला बाहेरून पाठींबा दिलेला होता, तेव्हा अन्य कुणी मित्र पक्षाशी कॉग्रेसचा दुरावा झाला, म्हणून निवडणुकांचा धोका वर्तवला नव्हता. आपण दिलेला पाठींबा पक्का असेल, तर अशा मित्राला वा पाठीराख्याला शंका येण्याचे कारण उरत नाही. पण स्वेच्छेने भाजपाला बाहेरून पाठींबा देणार्या पवारांच्या मनात अशा शंका नित्यनेमाने कशाला येत आहेत? इतक्या वेगाने त्यांना असे प्रश्न कशाला सुचत आहेत? इतर पक्ष काय करतील, तो त्यांचा विषय असतो. पवारांना त्याची फ़िकीर कशाला? सभागृहात हजर राहून मतदानातून ते भाजपाचे बहूमत सिद्ध करू शकतात आणि गैरहजर राहूनही तेच सिद्ध करू शकतात. मग सेना भाजपातल्या दुराव्याची त्यांना चिंता कशाला? उलटसुलट वाटणार्या पवारांच्या अशा वक्तव्यांमागे कुठली तरी कुटील रणनिती नक्कीच असणार. कारण पवार हे कच्च्या गुरूचे चेले नाहीत आणि महाराष्ट्राच्या राजकारणातही नवखे नाहीत. अनेक पावसाळे बघितलेले खुप नेते इथे आहेत. पण पावसाळ्या इतकेच दुष्काळही पचवलेला पवार हा एकमेव नेता आहे. म्हणूनच त्यांच्या विरोधाभासी वाटणार्या अशा विधानांकडे दुर्लक्ष करून चालत नाही, तर त्यातल्या विसंगतीत सुसंगती शोधावी लागते. कितीही झाले तरी सेना भाजपाने एकत्र येऊ नये आणि आपल्यावर विसंबून अल्पमताचे सरकार बनवावे, ही त्यांची इच्छा आहे. भाजपाने कोंडी केल्याने सेनेने विरोधात बसावे आणि मग भाजपाला आपल्याच मर्जीवर सत्ता राबवायची नामुष्की यावी, यापेक्षा त्या विसंगतीत कुठली सुसंगती असू शकते?
भाजपा नेमक्या त्याच दिशेने वाटचाल करते आहे ना? शिवसेनेला शक्य तितके अपमानित करायची संधी साधून भाजपाने दुरावा वाढवण्याची पवारांची इच्छा पुर्ण केली आहेच. त्यासाठी अल्पमताचे सरकार बनवण्याची तयारी केली आहेच. त्यामुळे सेनेतील युतीसमर्थक नेत्यांच्या पुढाकारातून अधिकच अपमान वाट्याला येत असल्याचे दिसून आल्याने विरोधात बसायचे दडपण सेनानेतृत्वावर वाढते आहे. पर्यायाने अल्पमताचे सरकार दिवसेदिवस राष्ट्रवादीवर विसंबून रहाण्याची हमी वाढते आहे. असले सरकार आपल्या इच्छेनुसार चालेल तितके दिवस चालवायचे, आणि नको त्या दिवशी पाडायचे हुकूमाचे पान, मग पवारांच्या हाती येते. अर्थात त्यामुळे लगेच मध्यावधी निवडणूका येणार नाहीत. कारण सेनेला सोबत घेऊन राष्ट्रवादी-कॉग्रेसचे पर्यायी सरकारचा प्रस्ताव आल्यास त्याचाही विचार करायची तयारी पवारांनी दाखवलेली आहेच. मात्र त्यासाठी पोषक परिस्थिती आज नाही. कारण सेना तात्काळ दोन्ही कॉग्रेसच्या सोबत यायच्या मनस्थितीत नाही. पण भाजपाकडून खुप दुखावली गेल्यास आणि मुख्यमंत्रीपद सेनेला मिळत असल्यास, सेना त्यालाही तयार होऊ शकेल. मात्र त्यासाठी सेनेची भाजपाशी नाळ संपुर्ण तुटली पाहिजे. कॉग्रेसचा पाठींबा मिळवणे पवारांना अशक्य नाही. कुठल्याही मार्गाने भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कॉग्रेस कायम आपल्या पायावर कुर्हाड मारून घ्यायला उतावळी आहेच. ही सगळी पटकथा प्रत्यक्षात आणायची तर आधी सेना भाजपा यांच्यात हाडवैर निर्माण व्हायला हवे. सध्या ‘बाहेरून’ पाठींबा देऊन पवार ते काम उरकत आहेत. ते पार पडले मग पटकथेचा पुढला अंक सुरू होईल. यात सेनेसह कॉग्रेसला एकत्र आणायचे नाट्य सुरू होईल. तोपर्यंत अल्पमताचे सरकार महाराष्ट्राला मिळावे, ही पवारांची सदिच्छा असावी. त्यामुळेच आता राज्यात नवे सरकार येते आहे. त्यासाठी देवेंद्र फ़डणवीस यांना शुभेच्छा.
"अनेक पावसाळे बघितलेले खुप नेते इथे आहेत. पण पावसाळ्या इतकेच दुष्काळही पचवलेला पवार हा एकमेव नेता आहे." एकदम नंबर वन भाऊ!
ReplyDeleteअनेक नेत्यांना जाणणारे अनेक पत्रकार महाराष्ट्रात आहेत परंतु त्या नेत्यांचे मन जाणणारा एकच पत्रकार आहे, भाऊ तोरसेकर!
अप्रतिम विश्लेषण, एकदम वास्तव...
ReplyDeleteह्यात पवारांचं काय चुकलं? निकालच्या दिवशी त्यांनी भाजपला बाहेरून पाठींबा जाहीर केला हे खरं असलं तरी त्याचं स्पष्टीकरण दुसर्याच दिवशी दिलं होतं. कॉंग्रेसचा सेना-राष्ट्रवादी-काँग्रेस असा सत्ता स्थापनेचा फॉर्म्युला काठावरच्या बहुमतामुळे धुडकावून भाजपला पाठींबा देण्याचा निर्णय घेतल्याचे पवारांनी स्वत:च स्पष्ट केले होते.
ReplyDeleteपवारांच्या ह्या एकतर्फी निर्णयामुळे भाजप आणि सेना तसेच काँग्रेस ह्या पक्षांना आपापले राजकरण करण्यात काही अडचण यायला नको होती. जसं कॉंग्रेसने विरोधी पक्षात बसायचा निर्णय घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.
पण सेना आणि भाजप दोघेही आजपर्यंत कोणतीही स्पष्ट भूमिका जर घेऊ शकले नसतील तर त्याला पवार जबादार कसे? सध्याची राज्यातील गोंधळाची परिस्थिती आणि पुढील राजकीय परिस्थिती ह्याला सेना आणि भाजपचे अपरिपक्व राजकरण एवढेच म्हणावे लागेल.
त्याचे श्रेय पवारांना द्यावे लागते ह्यातून भाजपच्या आणि सेनेच्याही राजकारणातील बुद्ध्यांकाचे अध:पतनच दिसून येते.
https://www.youtube.com/watch?v=kynGGcWRYNg
ReplyDeleteIthalya aaichya dudhat jar asel tar problem ahe
ReplyDelete