ही आहे शिवसेना. चपला पादत्राणांच्या गराड्यात मनमोकळे स्मितहास्य करीत बसलेल्या या माणसाला मिळालेली ही ‘पदके’ हाच सन्मान वाटतो. गेली नऊ वर्षे त्याने पायात चप्पल न घालता अनवाणी काढली. कशाला तो अनवाणी पायपीट करीत जगला? शिवसेनेला सोडून कॉग्रेसमध्ये नारायण राणे गेले आणि त्यांनी शिवसेनाप्रमुखांची अवज्ञा केली, म्हणून या माणसाने व्रत घेतले होते. जोपर्यंत शिवसैनिक उमेदवाराकडून कोकणातच राणेंचा पराभव होणार नाही, तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही. अनवाणी फ़िरेन. यावेळी वैभव नाईक या सेना उमेदवाराने कुडाळ मतदारसंघात राणेंना पराभूत केले आणि या शिवसैनिकाचा संकल्प पुर्ण झाला. तेव्हा त्याने सोलवटलेल्या खरवडून गेलेल्या पायात पुन्हा पादत्राण घातले. हजारो शिवसैनिक व मराठी माणसांनी त्याला चपला पादत्राणांचे जोड देऊन त्याचा ‘सन्मान’ केला. त्याला म्हणतात सन्मान. अरविंद भोसले त्याचे नाव. त्याच्या चेहर्यावरचा आनंद बघितला, तरी विजयाचे पारितोषिक कशाला म्हणतात त्याचा अर्थ समजू शकतो. त्याचा समाधानी चेहरा न्याहाळला, तर स्वाभिमानाचे सुख कसे असते त्याचा अंदाज येऊ शकतो. शिवसेना ४८ वर्षे कुठल्या अनवाणी पायावर सत्तेशिवायही जगली, तगली व फ़ोफ़ावली त्याचे स्पष्टीकरण मिळू शकते. त्याला कुठले मंत्रीपद, उमेदवारी वा सत्तापद अजून मिळालेले नाही. पण अशाच हजारो शिवसैनिकांनी शिवसेना जगवली आणि त्यांनीच आमदार खासदार शून्यातून उभे केले. सत्तापदांची सौदेबाजी करीत गेले बारा दिवस अभिमानाची वाफ़ दवडणार्यांना त्या शब्दाचा अर्थ तरी ठाऊक आहे? असेल वा नसेल, तरी त्यांनी वरळीच्या बीडीडी चाळीत जाऊन अरविंद भोसलेचे दर्शन घ्यावे. त्यांना विरोधात बसण्यातला पुरूषार्थ उलगडू शकेल. नऊ वर्षाची अरविंदची अनवाणी पायपीट सार्थकी लागणार काय?
सध्या अस्मिता व स्वाभिमान, सन्मान या शब्दांचा बाजार तेजीत आहे. पण बाजारात असे शब्द आणले वा त्यांची खरेदीविक्री झाली, म्हणून खर्याखुर्या शब्दांचे मूल्य ठरत नसते किंवा घटत नसते. शिवसेनेला भाजपाने सोबत घ्यावे किंवा नाही, यावर माध्यमातून खुप खल झाला आहे. शिवाय सन्मानाने सेनेला सोबत घ्यावे किंवा सेनेने केलेल्या अपमानाची माफ़ी मागावी, याचाही उहापोह जोरात चालू आहे. पण त्यातल्या कोणालाच मूळ शब्दाचे मूल्य वा आशय कितपत कळला आहे, याचीच शंका येते. युती मोडताना अभिमानाची भाषा सेनेच्या तोंडी होती, तिचा आशय आता शिवसेना नेतृत्वाला आठवेनासा झाला आहे. त्यात कुणाला अफ़जलखान वा आदिलशहा संबोधले, त्यावर काहूर माजले आहे. पण मुद्दा अशा संबोधनांचा नसून दिल्लीपुढे आमचा मुख्यमंत्री मुजरा करणार नाही, अशी अभिमानाची भाषा होती, तिला सर्वाधिक महत्व आहे. ती भाषा वापरली गेली, म्हणून महाराष्ट्रात सेनेला इतक्या जागा स्वबळावर मिळू शकल्या. ज्या काही जागा मिळाल्या त्या मनसबदारी पदरात पाडून घेण्यासाठी विकायला निघालेले सेनेचे जे उतावळे नेते आहेत, त्यांना शब्द भले माहित असतील, पण त्यांना शिवसेना व शिवसैनिक मात्र नक्कीच कळलेला नाही. त्यांना बाळासाहेब वा मातोश्रीची महत्ता उमगलेली नाही असेच म्हणावे लागेल. अमूकतमूक मातोश्रीवर आला पाहिजे म्हणताना, तो तिकडे कशाला यायचा याचा विसर पडून चालणार नाही. कुठल्या पक्षाचा नेता असो किंवा कोणी सेलेब्रिटी मान्यवर असो, तो शिवसेनाप्रमुखांकडे यायचा, तो बाळासाहेबांच्या पाठीशी शेसव्वाशे आमदार किंवा काही मंत्री होते म्हणून नव्हे. तर मुंबई व महाराष्ट्रभर त्यांचा दबदबा होत्ता, म्हणुनच कोणीही मातोश्रीवर यायचा. तो दबदबा म्हणजे शिवसेना होती. ती शिवसेना शेकडो आमदार मंत्र्यांची नव्हती तर रस्त्यावर केव्हाही उतरणार्या हजारो शिवसैनिकांची होती.
शिवसेना म्हणजे एक राजकीय पक्ष, त्याचे नगरसेवक, आमदार वा मंत्री अशी कोणाची समजूत असेल, तर गोष्टच वेगळी. त्या शिवसेनेचा कधीच दबदबा नव्हता. १९६६ पासून १९९०पर्यंत शिवसेनेचे किती खासदार वा आमदार होते? मग त्याही कालखंडात मातोश्रीवर मोठमोठी माणसे कशाला यायची? बाळासाहेब या नावाचा व व्यक्तीचा दबदबा निवडून आलेल्या वा सत्तापदांवर बसलेल्या पाठीराख्यांमुळे नव्हता. तर शिवसेनेमुळे होता, जी शिवसेना नुसत्या आदेशावर रस्त्यावर उतरणार्या शिवसैनिकांची होती. ज्याला उमेदवारी किंवा सत्तापद हवे, त्यांच्यामुळे शिवसेना मुळात उभीच राहिली नाही. उलट ज्यांनी अशा कुठल्या पदाची अपेक्षा केली नाही आणि कितीही अपयश पदरी पडल्यावरही ते पचवून ताठ मानेने उभा राहिलेल्या नेत्याच्या निस्सीम पाठीराख्यांनी बनली होती. तिला शिवसेना म्हणून ओळखले जाते आणि त्यामुळेच बाळासाहेबांचा दबदबा होता. त्या सामान्य झटणार्या कार्यकर्त्याच्या भावभावनांचे प्रतिक व आवाज बनलेला नेता, म्हणून बाळासाहेबांचा दबदबा निर्माण झाला होता. कोण होते बाळासाहेब? ठाण्यात लागोपाठ दुसर्या वर्षी महापौर निवडणूकीत नगरसेवकांची मते फ़ुटली, तेव्हा सर्वांचे सामुदायिक राजिनामे घेऊन तीन वर्षे त्या पालिकेत एकही नगरसेवक नव्हता. तरीही बेचैन नसलेला तो नेता होता, ज्याला लोक शिवसेनाप्रमुख म्हणून ओळखत होते. चार वर्षे ठाण्यात सेनेचा महापौर होऊ शकला नाही, पण त्या दिव्यातून बाहेर पडल्यावर आजतागायत ठाण्यात शिवसैनिक नसलेला महापौर होऊ शकलेला नाही. त्य धाडसाला मराठी माणुस व मतदार दाद देत होता. पद वा सत्ता यासाठी अगतिक झालेला नेता शिवसेनेला चालत नाही, तसाच शिवसेनेच्या मतदाराला चालत नाही. हेच सेनेचा इतिहास सांगतो. ज्यांना त्याचे भान उरलेले नसेल, त्यांना शिवसेना उमगलेली नाही, की टिकवता येणार नाही.
ताज्या विधानसभेच्या निकालानंतर गेले दहा दिवस शिवसेनेचे नेते प्रवक्ते स्वाभिमानाची भाषा बोलत आहेत आणि सन्मानाने वागवावे, असे ठासून साम्गत आहेत. पण त्यांचे वर्तनच जर अगतिक असेल, तर सन्मान कुठून व कोणी द्यायचा? गांधीजी म्हणत तुमच्या सहकार्याशिवाय कोणीही तुमचा अपमान करू शकत नाही. अलिकडचे शिवसेनेचे धोरण बघितले, तर ते प्रतिदिन आपल्याला अपमानास्पद रितीने वागवावे, यासाठीच झटत आहेत काय अशी शंका येते. १९६६ सालात स्थापन झालेल्या शिवसेनेचे १९९० पर्यंत विधानसभेतील स्थान काय होते? परेलच्या पोटनिवडणूकीत पहिला आमदार झाले ते वामनराव महाडीक. मग १९७२ च्या इंदिरालाटेत दुसरा आमदार म्हणून निवडून आले ते प्रमोद नवलकर. त्यानंतर तब्बल तेरा वर्ष कोण आमदार होता सेनेचा? १९७८ आणि १९८० अशा दोन निवडणूकात सेनेला एकही आमदार निवडून आणता आला नाही. पण ती शिवसेना आजच्या ६३ आमदारांपेक्षा जास्त स्वाभिमानी होती. १९८५ सालात छगन भुजबळ हा तिसरा शिवसेना आमदार राजीव लाटेला झुगारून विधानसभेत पोहोचला आणि दोन वर्षांनी पोटनिवडणूकीत पार्ल्यातून जिंकलेले डॉ. रमेश प्रभू हा सेनेचा विधानसभेत पोहोचलेला चौथा आमदार होता. १९६६ ते १९९० अशा चोविस वर्षाच्या प्रदिर्घ कालखंडात सेनेला पाच निवडणूकात अवघे चारच आमदार विधानसभेत पाठवता आले. ती शिवसेना स्वाभिमानी नव्हती व आज ६३ आमदार आलेत म्हणुन स्वाभिमानी झाली म्हणायची? विधानसभेत एकटा शिलेदार भुजबळ असा झुंजायचा, की स्वाभिमान म्हणजे काय ते बघून रस्त्यावर हजारो शिवसैनिकांची छाती फ़ुगून यायची. आज ६३ आमदारांच्या सेनेचे नेते मंत्रीपदासाठी आशाळभूत प्रतिक्षा करताना दिसतात, तेव्हा त्याच रस्त्यावरल्या सैनिकाची छाती फ़ुगलेली आहे, की मान शरमेने झुकलेली आहे, त्याकडे जरा नेत्यांनी बघावे. मग सन्मान शब्दाचा अर्थ वा मूल्य समजू शकेल.
इंदिरालाट. जनतालाट. गिरणीसंप, राजीवलाट अशा अनेक चक्रावातातून अनेक पक्ष आले आणि संपुन गेले आणि नगण्य मानली जाणारी मुंबईतली एक उनाड पोरांची संघटना घेऊन बाळासाहेबांनी साडेचार दशके राजकारणावर आपली छाप पाडली. त्यांची ताकद निवडून येणार्या आमदार खासदारात कधीच नव्हती. ज्या शिवसैनिकाला बाळासाहेब आपल्या अस्मितेचे प्रतिक वाटले, त्याच्यातली झुंजण्याची इर्षा व इच्छा हीच त्यांची खरी ताकद होती. म्हणूनच ती खरी शिवसेना होती. त्या शिवसेनेला निवडणूकीतल्या यशापयशाने कधी विचलित केले नाही, की सत्तेमुळे बळ मिळाले नाही. अशा प्रत्येक पिढीतल्या तरूणांना नेतृत्व देत, त्याच्या झुंजारवृत्तीला जोपासण्याचे शिवधनुष्य पेलणे सोपे काम नव्हते. ते ज्याला साध्य झाले त्याला अवघे जग शिवसेनाप्रमुख म्हणून गेल्या अर्धशतकापासून ओळखत होते. बाळासाहेबांनी आमदार वा खासदार कुठे गेले, त्याची कधीच फ़िकीर केली नाही. पण शिवसैनिक आपल्यापाशी राहिल याची मात्र जिवापाड काळजी घेतली. त्याचा स्वाभिमान अभिमान दुखावला जाणार नाही याची फ़िकीर केली. कुणाला आमदारकी खासदारकी नव्हेतर साहेबांनी शिवसैनिकांना संधी दिली, ज्यातून आमदार खासदार निर्माण झाले. ती शिवसेना आशाळभूत होऊन सत्तापदांचे सौदे करताना कुठल्या शिवसैनिकाला बाळासाहेब आठवतील? सन्मानाची भाषा बोलताना ते बाळासाहेब व ती शिवसेना कुणाच्या लक्षात आहे काय? त्याच इर्षा व इच्छाशक्तीने आज एकाकी लढताना ६३ आमदार निवडून आणले. त्यांनाच पदाच्या सौद्यात बळी दिले गेले, तर ती इच्छाशक्तीच मारली जाईल. त्यातून शिवसेना पुन्हा उभी रहायला वेळ लागेल आणि उभी राहिल याची कोणी शाश्वती देऊ शकत नाही. कारण शिवसेना प्रतिकुल परिस्थितीवर मात करून विस्तारली. उलट संधीसाधूपणाने तिचा सन्मान संपवला. ही शिवसेना नावाच्या स्वाभिमानाची प्रथा, कथा आणि व्यथा.
भाऊ खुपच छान.
ReplyDeleteइतिहासात जगभरातील असंख्य उदाहरणे आहेत. हिटलर घ्या नेपोलियन घ्या किंव्हा आपल्याच देशातील १८५७ चा लढा घ्या किंव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्यास्थापानेचा लढा घ्या. स्वाभिमान आणि अन्यायाविरुद्धाची चीड, राग यातूनच नेहमी क्रांती जन्माला येते. या अन्यायाविरुद्धच्या रागाला योग्य दिशेची आणि वेळेची गरज असते. मग क्रांती अटळ असते. महाराजांनी जशी लोकांच्या मनात घर केले तसेच बाळसाहेबांनीसुद्धा लोकांच्या मनात आपली जागा निर्माण केली ती जागा आजन्म कोणीही नाही घेऊ शकत .
आणि तीच खरी काळाची गरज आहे.
sir bhau torsekar yana hatsoff
ReplyDeletehatsoff sir bahu torsekar
ReplyDeleteभाऊ, तुम्हाला आजपासून सर भाऊ तोरसेकर म्हणायला हरकत नाही. तुम्ही जे काही आज शिवसेनेबद्दल मांडल ते सर्वसामान्य शिवसैनिकांच्या भावनांना वाट करून देणार आहे. शिवसेना जोपर्यंत संघटना होती तोपर्यंत येथे सर्वकाही शिवसैनिक होते. परंतु ज्या पध्दतीने या संघटनेची वाटचाल सुरू झाली आणि शिवसेनाही संघटने ऐवजी पक्ष झाला तेव्हा शिवसैनिकांची शिवसेना संपत गेली आणि या पक्षाच्या माध्यमातुन निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीच्या ताब्यात गेली. एका पक्षाची जी कार्यप्रणाली असावी त्या पध्दतीचे काम आज नेते करीत आहेत.
ReplyDeleteभाऊ, मला नाही वाटत आपल्या इतकी शिवसेना आणि शिवसैनिक आणखी कोणाला कळले असतील! धन्यवाद भाऊ!
ReplyDeleteगोंधळ होतोय.तुम्हाला संघटना हवी आहे का पक्ष हे आधी ठ रवा.पक्ष म्हटला की सत्तेच्या माध्यमातून प्रगति साधावयास हवी.सत्तेच्या उतरंडीत पूर्ण सत्ता,ती न मिलाल्यास भागीदारित सत्ता,तेही न जमल्यास विरोधी पक्षात बसून सत्तेवर अंकुश,असे असावयास पाहिजे.येथे मानापमान अस्मिता असे शब्द फ़क्त पराभूत मनोभूमिकेचे लोकच वापरतात.
ReplyDeleteभाऊ खुपच छान विश्लेषण
ReplyDeletehttp://www.loksatta.com/sampadkiya-news/the-history-of-the-european-union-1122057/
ReplyDelete