Tuesday, October 14, 2014

दगाबाज मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा



गेला साधारण महिनाभर युती तुटण्याच्या संदर्भात मी सातत्याने लिखाण केले. त्यामुळे अनेकजण विचलीत झाले आणि मी शिवसेनेच्या बाजूने पक्षपात करतोय, अशी अनेकांना शंकाही आली. त्याची कारणे मी सांगू शकत नव्हतो. कारण मी जुन्या पठडीतला पत्रकार आहे. आमच्या उमेदीच्या कालखंडात ऑन द रेकॉर्ड आणि ऑफ़ द रेकॉर्ड असा एक प्रकार प्रचलीत होता. अनेकदा नेते वा मोठ्या व्यक्ती खाजगीत पत्रकारांशी मनमोकळे बोलायचे. पण त्यांनी व्यक्त केलेली मते वा दिलेली माहिती खाजगीतला संवाद असल्याने, त्याची जाहिर वाच्यता कोणी करीत नसे. एकप्रकारे दोन व्यक्तीतला तो विश्वासाचा भाग होता. तीच माझी गेल्या चार महिन्यातली अडचण होती. कारण भाजपातील एका महत्वाच्या व्यक्तीकडून युती तुटण्याचे संकेत मला कधीच मिळालेले होते. नेमके सांगायचे तर मोदी सरकारचा शपथविधी व्हायच्या आधीच, हे संकेत मिळालेले होते. मात्र तो खाजगीतला विश्वासाने बोललेला मुद्दा असल्याने मी त्याची खुली वाच्यता करू शकत नव्हतो. पण माहितीच अशी होती, की ती माझ्यातल्या पत्रकाराला गप्प बसू देत नव्हती. पण ज्याने माहिती दिली, त्याच्याशी दगाबाजीही मी करू शकत नव्हतो. त्यातून अडीच महिन्यांनी मिळालेला मार्ग म्हणजे युती व आघाडी तोडण्याचे राजकीय तर्कशास्त्र, मी १ जुलै रोजीच मांडले होते. पण तशी खात्रीपुर्ण माहिती असल्याचे त्यात लिहायचे मी कटाक्षाने टाळले होते. पण जेव्हा युती तुटली, त्यानंतर त्यामागचे हेतू व कर्तेकरविते मला आधीपासूनच ठाऊक होते. म्हणून मी महिनाभर सेनेपेक्षा भाजपानेच युती तोडल्याचे ठामपणे लिहीत होतो. परिणामी भाजपाप्रेमींना मी पक्षपात करतोय असे वाटणे स्वाभाविक होते. पण माझ्या हेतूविषयी शंका घेणे हा माझ्यावर अन्याय होता. आता हे सर्व कशाला लिहायचे? तर भाजपाच्याच राष्ट्रीय सचिव राजीवप्रताप रुडी यांनी मला बंधनातून मुक्त केले. भाजपाच्या इतक्या मोठ्या नेत्यानेच आपल्या पक्षालाच युती नको होती, अशी जाहिर कबुली दिल्याने मल अन्य व्यक्तीकडून मिळालेल्या माहितीबद्दल गोपनीयता राखण्याचे बंधन माझ्यावर रहात नाही. म्हणून त्याबद्दल स्वच्छ व खुलासेवार लिहीणे भाग झाले. असो.

गेल्या काही दिवसात माझ्या लिखाणातून भाजपाने युती स्वार्थाने मोडली, असाच सूर राहिला होता. कारण तसे भाजपाने खुप आधी म्हणजे लोकसभेच्या एकुण निकालांच्या आकडेवारीचा अभ्यास केल्यावरच निश्चीत केले होते. म्हणूनच जुनच्या आरंभापासून युती मोडण्याची जमवाजमव भाजपाने सुरू केली होती. फ़क्त युती मोडण्याचे तर्कशुद्ध निमीत्त शोधले जात होते. शिवाय सेनेला गाफ़ील ठेवून युती मोडायची रणनिती होती. म्हणूनच चार महिने खर्ची घातले गेले. असे म्हटल्यावर राग येऊ शकतो. पण रुडी काय म्हणतात बघा, 'भाजपला राज्यात १३० पेक्षा कमी जागा नको होत्या. हे युती तुटण्याचे मुख्य कारण आहे. मात्र, भाजपचे कार्यकर्ते राज्यातील शिवसेनेच्या युतीला कंटाळले होते. अमित शहा यांनी ते नेमकेपणाने ओळखले होते. त्यामुळे आम्ही युती तोडणारच होतो.' याचा अर्थ काय लावायचा? जे रुडी आज खुलेआम सांगत आहेत, ते मला चार महिने माहित असून मी उघड बोलायचे टाळले. पण सुचक भाषेत लिहीत मांडत होतो. पण त्यालाही महत्व नाही. ज्या मित्रांनी इथे माझ्या हेतूवर शंका घेतली व युती भाजपाने तोडल्याची दिशाभूल मी करतोय म्हटले, त्यांच्या बाजूने त्यांच्याच पक्षाचे सचिव उभे राहिलेले नाहीत. रुडी माझ्या बाजूने साक्ष द्यायलाच पुढे आलेत ना? ‘युती तोडणारच होतो’ याचा अर्थ साफ़ आहे, तो म्हणजे भाजपा निमीत्त शोधत होता. मात्र गेला महिनाभर भाजपाचे प्रवक्ते व समर्थक ‘आम्ही युती वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला’ असे सांगत आहेत. त्यांना खरे मानायचे तर रुडी खोटे पडतात आणि रुडींना खरे मानायचे तर पक्षाचे प्रवक्ते खोटे पडतात. पण प्रवक्ते खोटे बोलत आहेत, हे मला चार महिने आधीपासून माहित होते. मात्र खाजगीतल्या संवादाची जाहिर वाच्यता मी करू शकत नसल्याने गप्प होतो. आता रुडींनीच सत्य समोर आणले आहे. युती तोडायचे कारण केवळ कार्यकर्ते कंटाळले असे नाही. त्याचा तपशील दोन इतर संदर्भ जोडले तर स्पष्ट होतो.

लोकसभेच्या निवडणूकीपर्यंत २५ वर्षे युती एकदिलाने लढत होती. मग यश मिळाल्यावरच भाजपाचे कार्यकर्ते ‘कंटाळले होते’ ही भाषा कुठून आली? कंटाळले होते तर लोकसभेपुर्वीच युती मोडता आली असती. पण तेव्हा मिशन २७२ गाठायचे, तर सेनेला सोबत ठेवायची अगतिकता होती. पण ते मिशन साधले गेल्यावर शिवसेनेचे मिशन १५१ समोर आले आणि ते खरे ठरणारी आकडेवारी लोकसभा निकालांनी सादर केली. तिथेच युती तोडणे अपरिहार्य होऊन गेले. भाजपाचा लोकसभेतील बहूमताचा हेतू साध्य झाला होता. पण आपल्या मदतीने सेनेचा विधानसभा बहूमताचा हेतू साध्य होण्याची शक्यता दिसू लागल्याने पक्षनेते विचलीत झाले होते. त्याला मोडता घालायचा तर युती मोडण्याला पर्याय नव्हता. युती तुटली तरी स्वतंत्र लढून बेरजेने बहूमत साधले जाऊ शकते आणि शिवसेनेला आपले बळ वाढवण्याला वेसण घातली जाऊ शकेल. मतविभागणी होऊनही सेना भाजपाची बेरीज दिडशेहून अधिक होऊ शकत असेल, तर निकालानंतरही सत्ता मिळते. पण दरम्यान शिवसेने्चे पंख त्यांच्याच राज्यात छाटले जातात, ही रणनिती होती. मात्र तसे उघडपणे बोलणे शक्य नव्हते. म्हणून जागावाटपाचा घोळ घातला गेला. आपल्या जागा सोडायच्या नाही आणि सेनेच्या जागेवर दावे करायचे. त्यासाठी सेनेच्या वाट्याच्या जागी इतर पक्षातून बलदंड उमेदवार आयात करायचे आणि त्या जागा मागायच्या; असा डाव खेळला गेला. पण आजवर पडायच्या त्याच सेनेच्या जागा लोकसभा मतदानात आघाडीवर आलेल्या होत्या आणि सहज जिंकणे शक्य होते. मग सेना त्या जागा जिंकायची वेळ आली असताना सोडणार कशा? इथे भाजपाचा दुटप्पीपणा लक्षात येऊ शकतो.

एका बाजूला यावेळी सरकार विरोधी मत व मोदींची लाट असल्याचा भाजपाचा दावा आहे. तो मान्य केला तर कुठलीही जागा पडायचा मुद्दा येतोच कुठे? लोकसभेच्या मतांचा दावा करायचा, तर युतीला अडीचशे जागी मताधिक्य होते. मग उरल्या ३८ जागा. जिथे युती मागे आहे. मोदींची लाट असेल तर अवघ्या ३८ जागा पडायच्या उरतात. मग ‘जुन्या ७८ जागा पडायचा’ सिद्धांत आला कुठून? सेनेच्या ५९ आणि भाजपाच्या १९ जागा कधीच न जिंकलेल्या, असे भाजपा प्रवक्ते सांगतात. त्या त्यांनी कुठून शोधल्या? आपल्या सोयीचे असेल तेव्हा मोदीलाट आणि गैरसोयीचे झाले मग मागल्या २५ वर्षाची आकडेवारी; याला लबाडी म्हणता येईल. ‘उलटतपासणी’ या माझ्या ब्लॉगवर मी मुद्दाम २३० विधानसभा जागी युती लोकसभेत किती मतांनी निर्विवाद आघाडीवर होती आणि त्यात कुठली जागा भाजपा वा शिवसेनेची त्याचा संपुर्ण तपशील दिला आहे. तो बारकाईने अभ्यासला, तर एक गोष्ट लक्षात येते, की युती म्हणून लढले असते तर २००हून अधिक जागा सहज मिळाल्या असत्या. पण त्यात सेनेचा वरचष्मा राहिला असता. कारण जागाच सेनेकडे अधिक होत्या. त्याला रोखायचे तर सेनेच्या जागा कमी करायच्या किंवा युती मोडायची असा पर्याय भाजपापुढे होता. कारण लोकसभेतील बहूमताचे उद्दीष्ट गाठल्यावर भाजपाला मित्र पक्षांच्या कुबड्या नको झालेल्या आहेत. किंबहूना शत्रू परवडला, पण बलदंड मित्र भाजपाला आता नको आहेत. त्यामुळेच निकालानंतर तुटपुंजे बहूमत असलेले युतीचे सरकार बनवणे शक्य असेल, तर युती मोडून सेनेला दुबळी करण्याचा डाव भाजपाने खेळला आहे. अर्थात हे दोन पक्षातले राजकारण असल्याने पत्रकाराने त्यात कोणा एकाची बाजू घेण्याचे कारण नाही. पण घडणार्‍या राजकारणाचे लपवलेले पदर व बाबी उघड करणेही पत्रकारितेची जबाबदारी असते. त्यात पुन्हा सामान्य माणसाची दिशाभूल होत असेल, तर आपल्याला उमगलेल्या गोष्टी चव्हाट्यावर आणणे पत्रकाराचे कर्तव्य असते. अगदी आपल्याला ज्याच्याविषयी आत्मियता आहे, त्या पक्षाच्या आत्मघातकी डावपेचांचे समर्थन करण्यापेक्षा त्याचे कान उपटणे अगत्याचे असते. त्यासाठीच मला ह्यात पुढाकार घ्यावा लागला. कारण भाजपाची ही रणनिती तात्पुरते लाभ देऊही शकेल. पण तो लाभ दुरगामी फ़ायद्याचा असेल काय?

त्याचेही उत्तर इतिहासात अनेकदा मिळालेले आहे. पण जुगारी मानसिकता इतिहासाला कधी जुमानत नसते. म्हणूनच भाजपाने असे पाऊल उचलले आहे. त्याचे काय परिणाम होतात, ते लौकरच दिसतील. मोदींच्या विरोधात अतिरेकी अपप्रचाराचे दुष्परिणाम कॉग्रेस व डाव्यांना भोगावे लागतील, असे मी सातत्याने सात आठ वर्षे लिहीत आलो. पण त्याच रणनितीचे तात्पुरते लाभ उठवणार्‍यांना असे इशारे मोदीभक्ती वाटत होती. २००४ किंवा २००९ सालात त्याचे तात्पुरते लाभ उठवणार्‍यांना आज त्याची किती मोठी किंमत मोजावी लागली, ते वेगळे सांगायची गरज नाही. पण तेव्हा त्यापैकी कितीजणांना माझे मत पटू शकले? मग आज सत्तेची व यशाची अपार झिंग चढलेल्या भाजपाला वा त्याच्या समर्थकांना युती मोडण्यातले तोटे कसे मान्य व्हावेत? त्यांनी आपल्या नशेत चूर राहिल्याने माझ्यासारख्या पत्रकाराचे काहीच नुकसान होणार नाही. ज्यांना मित्रामध्ये शत्रू शोधण्याचे डोहाळे लागलेले असतात, त्यांच्यावर कुणा शत्रूने चाल करण्याची गरज नसते. असे धुंद लोक आपलेच शत्रू व संकटे निर्माण करत असतात. म्हणूनच तर आपल्या बापजाद्यांनी म्हणून ठेवले आहे, दगाबाज मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा.

9 comments:



  1. भाऊराव,

    तुम्ही तर चक्क बॉम्बगोळा टाकलात. युती तोडण्याचं दिल्लीने अगोदरच ठरवलं होतं. आज संघही भाजपचा प्रचार करायला नकार देतोय. काय अर्थ घ्यायचा यातून मतदाराने? संघालाही महाराष्ट्र भाजपचं राजकारण घाणेरडं वाटतं. सामान्य माणसाला वाटल्यास नवल नाही.

    या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या पश्चात महाराष्ट्रीय जनतेने दिलेल्या लढ्याची आठवण होणं अपरिहार्य आहे. त्यावेळेस औरंग्या नामक शत्रू होता. या वेळेस मोदी आहेत. मोदी कोणी शत्रू नाहीत. मात्र मोदींचं धोरण चुकलं, हे मतदाराने ठामपणे सांगायला हवं. तशी संधी उद्या आहे. तिचं सोनं होवो. मराठा लोकं लढाऊ आहेत. त्यांची विजिगीषा (= जिंकण्याची तळमळ) जागृत होवो.

    तसंही पाहता काँग्रेसमुक्त भारत हे मोदींचं स्वप्न आहेच. तर शिवसेनेस मत देऊन पहिल्यांदा भाजपला काँग्रेसमुक्त करूया. रा. स्व. संघाची परवानगी आहेच.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
  2. भाऊ!
    "ज्यांना मित्रामध्ये शत्रू शोधण्याचे डोहाळे लागलेले असतात, त्यांच्यावर कुणा शत्रूने चाल करण्याची गरज नसते. असे धुंद लोक आपलेच शत्रू व संकटे निर्माण करत असतात. म्हणूनच तर आपल्या बापजाद्यांनी म्हणून ठेवले आहे, दगाबाज मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा."
    आपले हे विधान कोनशिळेत कोरून ठेवावे असे आहेत. आभार भाऊ!

    ReplyDelete
  3. भाऊ, तुमची मते पटतात पण मला सांगा २००९ ला घरची भांडण चव्हाट्यावर आणुन सेनेने निवडणुका गमावल्यात. मग भाजप या सगळ्याला कंटाळुन वरचष्मा प्रस्थापित करु इच्छीत असेल तर त्यात काय चूक आहे? अजुन एक मुद्दा महत्त्वाचा असा की भाजप ही कुठल्याही एका माणसावर किंव्हा कुटुंबावर निर्भर नाही. किंबहुना, संपूर्ण भारतात कम्युनिस्ट सोडुन - ज्यांचे बारा वाजले आहेत, भाजप सारखा एकही पक्ष नाही. असे असतांना सेना किंवा अकाली या सारख्या पक्षांसी भाजप पटल नाही तर नवल काय? संघाच्या संस्कारावर वाढलेल्या भाजप कितीही दुर्गुण असु देत पण तो सिध्दांतनिष्ठ पक्ष आहे, व्यक्तीनिष्ठा आणि घराणेशाहीचा विरोधक आहे. त्यामुळे आज ना उद्या गठबंधन तुटणे सहाजिकच होते.

    आणि निवडणुकांचा प्रचार बघता, शत्रुत्व सेनेने पत्कारल आहे. भाजप अजुनही सेनेवर टिका करीत नाहीया पण सेनेनी राष्ट्रवादी किंवा काँग्रेसहुन अधिक भाजप वर टिकेची झोड उठवली आहे. भाजप ला सत्तेची झिंग चढली का ते माहिती नाहे कारण दिल्लीत जरी त्यांची सत्ता आत्ता आली असली तरी गेल्या दहा वर्षात भाजपने सातत्याने विविध राज्यात वर्चस्व प्रस्थापित केलेले आहे (आणि कर्नाटकच्या बाबती गमावलेही आहे!) पण शिवसेनेने मात्र ही राजकीय खेळी वैयक्तीक अपमान समजुन जी राख डोक्यात घालुन घेतली आहे ते बरोबर आहे का?

    ReplyDelete
  4. भाऊ, बाकी सर्व ठीक (वा राजकारणात क्षम्य म्हणा हवे तर), पण मुख्य-मंत्री पदावर हक्क सांगणे हे अतीच नव्हे का? बाजारात तुरी...

    ReplyDelete
  5. शिव सेना किती जागा लढवणार उद्धव ठाकरेंनी मेळाव्यात जाहीर केले आणि ते भा.ज.प. च्या नेत्यांना जेव्हा वर्तमानपत्रांतून कळाले, तेव्हाच युती तुटली होती. भाऊ, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे भा.ज.प. ला युती तोडायची इच्छा असली तरी त्यांना एक सबळ कारण मात्र यांनीच पुरवलेले आहे.

    ReplyDelete
  6. आज घराणेशाहिचा संसर्ग न झालेला भाजप शिवाय एक तरी पक्ष दिसतो का हे शोधून बघा.

    ReplyDelete
  7. भाऊ, इथे आपण सेनेबद्दलचे प्रेम स्पष्ट दाखवत आहात. भाजपा कार्यकर्ते अनेक वर्षांपासून अस्वस्थ होते - हे नक्की. पण सेनेचे आजचे नेतृत्व १५१ सीट्स वर अडले नसते - दोन तीन वेळा एकतर्फी पाठवलेल्या "नव्या प्रस्तावां"द्वारे पुन्हा पुन्हा तोच प्रस्ताव पाठवून मित्रपक्षांना वेड्यात काढले नसते, तरी युती तोडायचे भाजपचे ठरले होते का? तसे असते तर १५१ वरून चार-पाच जागा जरी सेनेने सोडल्या असत्या तरी युती तुटली नसती - हे विधान आपल्या नजरेत आले असेलच. आणि ही अस्वस्थता आणि "एकदा युतीशिवाय लढू" ही इच्छा का निर्माण झाली असावी? युतीला मिळणाऱ्या मतांमध्ये सेनेमुळे किती आणि भाजपामुळे किती ही झाकली मूठ होती. कारण सेना दर वेळी जागा वाटपामध्ये अडवणुकीची भूमिका घेऊन जास्त जागा स्वत:कडे ठेवत असे. आम्हाला एवढ्या जागा - त्याही स्वत:च्या पसंतीच्या नाही मिळाल्या तर युती होणार नाही - आम्हांला गरज नाही (याला पश्चिम महाराष्ट्रात Xडफकीर बनणे असे म्हणतात) - असे दर्शवून सेना हे काम करत असे. हे करत असतानाही सामना मधील लेखांतून, बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तव्यांतून, राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीसारख्या गोष्टींतून - - भाजपा या मित्रपक्षाला वेळोवेळी अपमानित करायची पद्धत सेनेने कायम वापरली. भाजपा चा "कमळाबाई" असा उल्लेख हा या साठी जाणीवपूर्वक केला जात असे. या सर्व काळात सेनेतून भुजबळ, राणे, राज ठाकरे असे मोठे आणि अनेक लहानमोठे लोक बाहेर पडले - पण भाजपा बरोबर असल्यामुळे सेनेला ते धक्के पचवता आले. हा टेकू नसता तर सेनेतून अनेक लोक बाहेर पडू शकले असते. एकीकडे भाजपची ताकद वाढत होती. (भाजपमुळे सेना लहान झाली / भाजपा प्रादेशिक पक्षांना संपवते हे चुकीचे विधान आहे, सेनेला प्रत्यक्षात भाजपचा उपयोग झाला) तरीही भाजपचा महाराष्ट्रातील आकार अशा दडपशाहीच्या "मैत्री"मुळे कृत्रिमरीत्या लहान ठेवला गेला होता. आता मोदी factor मुळे भाजपाकडे आत्मविश्वास आला, या वेळी सेनेच्या जागावाटपातील अडवणुकी पुढे न झुकण्याची हिम्मत भाजपाकडे आली. आता सेनेच्या नेत्यांनी / सामना मध्ये भाजपाचा, नेत्यांचा अपमान केलेला निमूटपणे सहन करण्याची नड भाजपा कडे राहिलेली नाही. इतकी वर्षे अडवणूक करूनही भाजपा जे मान्य करत आली - तशी अडवणूक मान्य न करण्याचा पर्याय यावेळी त्यांना मिळाला. आणि त्यांनी तो घेतला.

    ReplyDelete
    Replies
    1. शिवसेना शंभर जागांपर्यंत खाली आली असती तरी युती तुटलीच असती. कारण युती तोडण्याचा भाजपाचा निर्णय खुप आधीच झाला होता. किंबहूना त्यावरच हा लेख आधारलेला आहे आणि त्याचेच संदर्भ दिले आहेत. निकाल पुर्ण होण्याआधीच शरद पवारांनी भाजपाला बाहेरून पाठींबा देऊन खरी ‘युती’ दाखवून दिली आणि दिलीप देवधर यांनी एबीपी माझाच्या चर्चेत भाजपाच्या राष्ट्रवादी मैत्रीची ग्वाही दिलेलीच आहे.

      Delete
    2. यावेळी युती तुटण्याची भीती घातली तरी आम्ही कमी जागांवर लढणे मान्य करणार नाही - हेच वाक्य असे येऊ शकते; - - - आजवर आम्हांला युती तोडायची भीती घालून कमी जागांवर बोळवण्यात आले, पण आता मात्र युती तोडावी लागली तरी आम्ही कमी जागांवर लढणे मान्य करणार नाही. अशा वाक्याला आपण युती तोडण्याचा निर्णय आधी झाल्याचा पुरावा म्हणून घेत आहात का? सेनेलाही युती करायचीच होती, तर तीन वेळा विविध नवीन प्रस्ताव पाठवून त्यांत स्वत:च्या सीट १५१ असल्याचे सांगणे - ही एक प्रकारची चेष्टा करणे नव्हते काय? ते - सेनेने युती तोडायचा निर्णय आधीच घेतल्याचे - लक्षण मानता येणार नाही का? मला वाटते, सेनेने नेहमीप्रमाणे ताणून धरले. पण बदललेल्या परिस्थितीत डाव जमला नाही. किती ताणायचे याचा अंदाज चुकला. राजकारण हा नेत्यांसाठी करिअरचा भाग असतो. तुम्ही - आम्ही आपल्या आवडीच्या नेत्यांची / पक्षांची पाठराखण करतो. त्या दृष्टीने जेवढे सोयीचे तेवढे स्पष्ट पाहतो. बाकीच्या कडे दुर्लक्ष करतो. दुसरे - - - दिलिप देवधर कोणी भाजपचे अधिकृत प्रवक्ते आहेत का? ते ही इतक्या उघड, आजवर न ऐकलेली इतकी वेगळी गोष्ट सांगून काही गेम खेळत नसतील?

      Delete