Sunday, October 12, 2014

ते नरेंद्र मोदी कुठे हरवलेत आज?



येत्या बुधवारी १५ आक्टोबरला महाराष्ट्र विधानसभेचे मतदान व्हायचे आहे आणि चार दिवसांनी १९ आक्टोबरला मतमोजणी व्हायची आहे. त्याच्या साधारण पाच महिने आधी लोकसभेची मतमोजणी होऊन निकाल लागले होते. १६ मे रोजी देशभर उत्साहाचा माहोल होता. कारण तीस वर्षांनी जनतेने विक्रमी मतदान करून पुन्हा एकदा स्वच्छ बहूमताचा कौल एकाच पक्षाला देण्याचा चमत्कार घडवला होता. राजकीय पक्षांपासून राजकीय अभ्यासकांपर्यंत सर्वांना आघाडीचे युग कधीच संपणार नाही असे वाटत असताना, मतदाराने एकपक्षीय बहूमताचे युग नव्याने या भारतवर्षात अवतरून दाखवले होते. तेव्हा प्रत्येकजण नरेंद्र मोदींना त्या चमत्काराचे श्रेय देत होता. त्याबद्दल कोणाचे दुमत नव्हते, की कोणी त्याला आक्षेप घ्यायची हिंमत करत नव्हता. फ़क्त एकाच माणसाने तशी हिंमत दुसर्‍याचह दिवशी दाखवली होती आणि ती सुद्धा भाजपाच्या दिल्लीतील मुख्यालयात तशी हिंमत केली होती. त्या व्यक्तीचे नाव होते नरेंद्र मोदी. १६ मे रोजी संध्याकाळपर्यंत मतमोजणीचे अंतिम निकाल येतच होते आणि त्या दिवशी आपली गुजरातमधील कारकिर्द गुंडाळण्याची तयारी करीत मोदींनी आवराआवर आरंभली होती. त्यामुळे तो दिवस गुजरातमध्ये व्यतीत करून मोदी दुसर्‍या दिवशी १७ मे २०१४ रोजी मोठ्या समारंभपुर्वक देशाच्या राजधानीत विजयी वीराप्रमाणे आले. विमानतळावरून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत त्यांची राजधानीत मिरवणूक निघाली होती. त्यांनी विमानतळावरून पक्षाचे मुख्यालय गाठले आणि सर्वात प्रथम पक्ष सहकार्‍यांशी व कार्यकर्त्याशी संवाद साधला. तेव्हा कार्यालयाच्या त्या मर्यादित जमावापुढे भाषण करताना मोदी कोणासमोर नतमस्तक झाले होते? त्यांनी पक्षाला मिळालेल्या त्या अभूतपुर्व यशाचा तुरा कोणाच्या माथ्यावर खोवला होता? खुद्द मोदींना किंवा त्यांच्या लक्षावधी भक्तांना तरी आज त्याचे स्मरण उरले आहे काय?

हे यश कुणा एका मोदीचे नाही, हे यश निवडून आलेल्या २८२ भाजपा उमेदवारांचे नाही, की आज राबलेल्या लाखो कार्यकर्त्यांचेही मर्यादित यश नाही. आज भाजपाला देशाची सत्ता एकहाती मिळण्याचे सर्व श्रेय, चार पिढ्या खपलेल्या लक्षावधी आजीमाजी हयात-मृत कार्यकर्त्यांच्या अपरंपार कष्टातून साकारलेले यश आहे, अशा शब्दात मोदींनी आपल्या यशाचे वर्णन केले होते. त्याचा अर्थ खरेच कोणी गंभीरपणे लक्षात घेतला आहे काय? तिथेच ही कहाणी संपत नाही. पुढे संसदेच्या सेन्ट्रल हॉलमध्ये भाजपाच्या नवनिर्वाचित खासदारांची बैठक झाली. तिथे नव्या पंतप्रधानांची निवड झाली. तेव्हा पुन्हा विजयाचे श्रेय वडिलधार्‍या लालकृष्ण अडवाणींनी मोदींनाच दिले होते. ‘केवळ मोदीकृपेनेच आजचा दिवस उजाडला’ असे उदगार अडवाणींनी काढले होते. त्यानंतर आपल्या निवडीबद्दल आभार मानायला उभ्या राहिलेल्या मोदींनी अडवाणी यांच्या त्याच शब्दांवर नाराजी प्रकट केली होती. हे यश वा त्याचे श्रेय ही मोदीने पक्षावर केलेली कृपा नव्हे. पक्ष आईसारखा असतो, आणि पुत्र आईवर कधीच उपकार करू शकत नाही. फ़क्त आईची सेवाच करू शकतो, असे मोदींचे शब्द होते. कितीजणांना आज त्याचे तरी स्मरण उरलेले आहे? ते नुसतेच शब्द होते, की प्रामाणिक भावना होत्या? कारण ते शब्द बोलताना मोदींचा गळा दाटून आला होता. त्यांचे शब्द घुसमटले होते. आपण केवळ पक्षकार्य केले, कर्तव्यबुद्धीने देणे म्हणून परतफ़ेड केली, अशीच त्यामागची धारणा होती. पक्ष हा आईसारखा पवित्र असतो आणि आई कशी असते? मोदींच्याच शब्दात सांगायचे तर ‘बिना मांगे परोसे वह मॉ होती है.’ ती आई आज तशीच आणि तितकीच पवित्र निरागस राहिली आहे काय? मोदींना किंवा त्यांच्या भक्तगणांना त्याचे काही स्मरण उरले आहे काय? असते तर वाडगा घेऊन आलेल्यांना परोसण्याचे व्यवहारी राजकारण कशाला झाले असते?

चार पिढ्यांचे आयुष्य भाजपा (किंवा पुर्वाश्रमीच्या जनसंघाला) उभारण्यासाठी खपलेल्यांचा पक्ष, संसदेत बहूमत मिळाल्यानंतर कष्टापेक्षा कुठल्याही मार्गाने बहूमताची सत्ता प्राप्त करण्यासाठी धावत सुटला, त्याला कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणता येईल काय? ही व्याख्या माझी नाही, की कुठल्या पुस्तकात छापलेली नाही. इतक्या मोठ्या अभूतपुर्व विजयानंतर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेली ती पक्षाची व्याख्या आहे. आणि त्या व्याख्येनुसार पक्षाकडून काही मागता येत नाही किंवा त्याच्यावर उपकार करता येत नाहीत. त्याची सेवा करता येते. ती सेवाच पक्षाला यशस्वी करत असते. कार्यकर्त्याच्या अपार त्यागातून व कष्टातून पक्ष उभा रहातो. हे शब्द विजय दुर असताना तेव्हा बोलले तर पोकळ व दिखावू असतात. पण मोदींनी विजयाच्या पहिल्या क्षणी केलेला हा शब्दोच्चार होता. पक्षाची ताकद कार्यकर्त्याच्या मेहनतीतून वाढते, असेच मोदींना त्यातून म्हणायचे होते ना? तसे असेल तर मग अवघ्या पाच महिन्यात भाजपाला महाराष्ट्रात आपले सगळे चार पिढ्या राबलेले कार्यकर्ते किंवा नेते अगदीच निष्फ़ळ व नाकर्ते वाटू लागले असे म्हणायचे काय? त्यांचा कार्यकर्ता व मोदींच्या शब्दावरील विश्वास उडाला म्हणावा काय? कारण आता त्यांनी पक्ष कार्यकर्ता किंवा संघटना यांना फ़ाटा देऊन, घाऊक प्रमाणात जिंकणार्‍या उमेदवारांची आयात केलेली आहे. सत्तेचे गणित जमवण्यासाठी जिंकणारे उमेदवार आयात करणे हा आपद धर्म असल्याचे भाजपाचे राज्यातील नेते सांगतात. त्यालाही हरकत नाही. पण मग त्यांनी मोदींच्या लोकप्रियतेवर स्वार होण्याचे कारण उमगत नाही. याच मार्गाने दहापंधरा वर्षापुर्वीही भाजपाला महाराष्ट्रात आपले बळ वाढवता आले असते. त्यासाठी त्यांनी शरद पवारांकडून धडे गिरवायला हरकत नव्हती. इतके दिवस-वर्षे थांबायची काय गरज होती? हाच योग्य मार्ग होता, तर विजयी होणार्‍यांना पक्षात आणून कधीच मोठी झेप घेता आली असती.

शरद पवार यांनी काय वेगळे राजकारण केले? शिवसेनेतून छगन भुजबळ यांना दिड डझन आमदारांसकट कॉग्रेसमध्ये आणायचा असाच प्रयोग पवारांनी बावीस वर्षापुर्वी केला होताच. बबनराव पाचपुतेंना अर्धा डझन आमदारांसह कॉग्रेसमध्ये आणून त्यांनी बळ मिळवलेच होते. भाजपाला तेव्हाही असे बळ वाढवता आलेच असते. अकारण शिवसेनेसारख्या प्रादेशिक पक्षाशी युती करून मनाविरुद्ध कुचंबणा करून घ्यायचे काही कारण नव्हते. नारायण राणे तर जुन-जुलै महिन्यातच यायला निघाले होते. त्यांना नकार देण्याची काय गरज होती? जिंकणारे उमेदवार जमा करून पक्षाचे बळ वाढत असते, तर वाजपेयी, अडवाणी, म्हाळगी, मुरलीमनोहर जोशी तरी इतकी वर्षे भाजपात कशाला थांबले? त्यांनाही कॉग्रेसने हसतहसत आपल्यात सामावून घेतले असते आणि त्यांनाही उमेदीच्या वयात सत्तेची उब घेता आलीच असती. पुढल्या काळात त्यांनाही पुन्हा जिंकणारे म्हणून भाजपात माघारी येता आलेच असते. त्यांनी विरोधी पक्षाच्या वनवासात आपली संपुर्ण उमेद कशाला खर्ची घातली? पक्षाचे बळ वाढवण्याचे इतके सोपे समिकरण उमजायला इतका विलंब कशाला लागला? त्यात किती गुणी भाजपा नेते हयात गमावून बसले ना? त्यांच्यावर एकप्रकारे अन्यायच नाही का झाला? आज पुळका आल्यासारखे घाऊक आयातीचे समर्थन चालले आहे, त्या समर्थकांना हयात खर्ची घालणारे आपलेच जुनेजाणते नेते मुर्ख वाटतात काय? उद्धवराव पाटिल, म्हाळगी, हशू अडवाणी, वामनराव परब इत्यादींना व्यवहार समजला नाही, की पक्ष उमजला नाही म्हणायचे? की चार पिढ्यांच्या निरपेक्ष कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे सारे श्रेय खरे मानायचे? १७ मे रोजी भाजपा मुख्यालयातील मोदींचे शब्द खरे मानायचे, की आज जिंकणार्‍या उमेदवारांच्या आयातीचे समर्थन खरे मानायचे? कार्यकर्त्याच्या शिरपेचात आपल्या यशाचा तुरा खोववणारे ते नरेंद्र मोदी कुठे हरवलेत आज? आमच्यासारख्या लक्षावधी सामान्य बुद्धीच्या लोकांना पडलेला हा यक्षप्रश्न आहे आणि त्याचे उत्तर शोधूनही सापडत नाही.

4 comments:

  1. भाऊ, मी इतरांचे सांगत नाही, परंतू मला स्वत:ला मोदी जिंकले तर खुप चांगले होईल असे वाटत होते. परंतु ही भावना आता राहिली नाही. का ते कळत नाही, परंतु मनाने पूर्ण विरोधी सुर लावला आहे. जुने मोदी आता राहिले नाहीत हेच खरे आहे!

    ReplyDelete
  2. भाऊ, तुम्ही सांगता त्यावर मी काही अंशी सहमत आहे. परंतु मला वाटते की महाराष्ट्रात ही स्थिती वेगळी होती. नरेंद्र मोदीच्या परीसस्पर्शाने भाजपाचे सोने झाले होते. त्यांचे हे यश म्हणजे चार पिढ्यातील लोकांनी केलेल्या परिश्रमाचे फळ होते. मोदी वगळता अन्य वरिष्ठांनी या निवडुकांत प्रयत्न केले असते तर कदाचीत हे आपार यश मिळाले नसते. युती, आघाडी तुडल्यानंतर प्रत्येकाला आपले आस्तित्व निर्माण करण्याची संधी मिळाली आहे. यातुन भाजपा हा आयात केलेल्या का उमेदवारांच्या पाठबळावर का होईना परंतु सत्ता स्थापन करू पाहतो आहे. पुढील पाच वर्षाच्या कार्यकाळासाठी हे उमेदवार आमदार म्हणून वावरणार आहेत. या आमदारांना मोदी काय आहे हे जर कळाले तर राज्याचे चित्र बदलू शकते. परिस शोधण्याचा नादात परिसस्पर्श कधी झाला हे कळणार नाही. आता चित्र बदलत आहे. भूतकाळात काय झाले यापेक्षाही वर्तमानातील संधीमुळे भविष्य आशावादी वाटत असले तर संधीने दार ठोठवण्याची वाट पाहण्या अगोदर तिला घरात घ्यावे.

    ReplyDelete
  3. Bhau tumhi khupach bhavnecha bharat lihit aahat ase nahi vatat? Mi tumcha likhanacha chahata aahe mhanun hi bhavana vyakt keli..

    ReplyDelete